वृत्तपत्राचे जनक : बाळशास्त्री जांभेकर
घरातील वडीलधारी मंडळी रोज सकाळी ज्याची आतुरतेने वाट पाहतात ते म्हणजे वर्तमानपत्र अर्थात पेपर. वर्तमानपत्र वाचल्याशिवाय त्यांची सकाळ सुरूच होत नाही. एखाद्या दिवशी वर्तमानपत्र वाचण्यास मिळाले नाही तर दिवसभर काही तरी हरवल्यासारखे वाटते. तळागाळात, खेडापाड्यात अगदी दुर्गम गावात देखील आज हे वर्तमानपत्र पाहायला मिळते. मग खरोखरच हे वर्तमानपत्र कुणी आणि केव्हा सुरु केले ? याची माहिती जाणून घेण्यात सुद्धा आपण नक्कीच उत्सुक असाल. बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर अर्थात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक असे म्हणतात. त्यांचा जन्म दिनांक ६ जानेवारी १८१२ रोजी कोकणातील राजापूर तालुक्यातील पोंभूर्ले या गावी एका गरीब ब्राम्हण घरात झाला. लहानपणापासूनच ते अतिशय हुशार, चुणचुणीत व कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. म्हणूनच त्यांनी अगदी लहान वयातच अनेक विषयातील शिष्यवृत्ती मिळवली आणि संशोधन सुद्धा केले. त्यांना माहित होते कि, ब्रिटिशांना भारतातून हाकालायचे असेल तर लोकांना जागरूक करणे अत्यंत करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी वर्तमानपत्र हे माध्यम सर्वात चांगले आहे. म्हणून त्यांनी गोविंद कुंटे व भाऊ महाजन यांच्या सहकार्याने वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजे ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण ‘ नावाचे वर्तमानपत्र प्रकाशन करण्यास सुरुवात केली. दर्पण म्हणजे आपले प्रतिबिंब हुबेहूब दाखविणारे एक साधन त्यास आपण आरसा असे म्हणतो. म्हणून दर्पण हे त्या काळातील समाजासाठी आरश्यासारखेच काम केले. ज्या काळात छपाई यंत्रणा, मुद्रण व्यवस्था विकसित झालेली नव्हती, त्या काळात त्यांनी वर्तमानपत्र प्रकाशन करण्याचे धाडस दाखविले. म्हणूनच त्यांचे कार्य अविस्मरणीय असे आहे. अगदी सुरुवातीच्या काळात दर्पण हे भारतीय लोकांसाठी एका बाजूला मराठी व ब्रिटिशासाठी दुसऱ्या बाजूला इंग्रजी अश्या दोन्ही भाषेत प्रकाशन करण्यात येत होती व त्या वर्तमानपत्राची किंमत एक रुपया ठेवण्यात आले होते. जवळपास साडे आठ वर्षे चाललेल्या या वर्तमानपत्रातून आचार्य जांभेकर यांनी इंग्रजानी केलेल्या लोकांवरील छळ, गुलामगिरी याविरुद्ध लोकांना जागे केले. अशिक्षित लोकांमध्ये जागृती निर्माण केली. विधवा पुनर्विवाहासाठी उत्तेजन दिले, त्याबाबत जनप्रबोधन ही केले. आज आपण प्रसिद्धी माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ मानतो. त्या प्रसिद्धी माध्यमात मुद्रित वर्तमानपत्राचे स्थान अग्रगण्य असे आहे. दृक किंवा श्राव्य प्रसिद्धी माध्यमापेक्षा मुद्रित माध्यमाकडे लोकांचा कल सर्वात जास्त असतो आणि हे अगदी स्वस्तात सहज उपलब्ध होणारे असते.
आज वर्तमानपत्राची संख्या भरमसाठ वाढलेली आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेक प्रकारचे विविध भाषेतील वर्तमानपत्र आज आपणास वाचायला व बघायला मिळतात. वर्तमानपत्र चालविणे हे वाटते तेवढे सोपे काम नाही. एखाद्या वर्तमानपत्र किंवा साप्ताहिक चालविणाऱ्या मालक आणि संपादक यांचेशी संपर्क करून त्यांच्यासोबत याविषयी गप्पा करुन पहावे मग नक्कीच कळून चुकेल की रोजचा पेपर कसा बाहेर पडतो ? वर्तमानपत्राचा जमाखर्चाचा ताळेबंद न जुळल्यामुळे दरवर्षी अनेक वर्तमानपत्र काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत. तर वाढत्या महागाईच्या काळात सुद्धा काही वर्तमानपत्र आजही तग धरून आहेत. जोपर्यंत वर्तमानपत्र आस्तित्वात आहेत तोपर्यंत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव कुणीही विसरणार नाहीत.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे मराठी , संस्कृत, इंग्रजी व हिंदी या भाषेवर विशेष प्रभुत्व होतेच शिवाय गुजराती, बंगाली, फ्रेंच, ग्रीक, लॅटीन इत्यादी भाषा सुद्धा अवगत होत्या म्हणून ते उत्तम भाषांतरकार म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांनी लिहिलेली नीतीकथा हे पुस्तक खूप प्रसिद्ध झाले. हिंदी विषयाचे ते पहिले प्राध्यापक होते म्हणूनच त्यांना आचार्य ही उपाधी मिळाली. सन १८४५ मध्ये त्यांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे सर्वप्रथम प्रकाशन केले. वर्तमानपत्र क्षेत्रातील मंडळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचे स्मरण सदोदित मनात राहावे यासाठी त्यांचा जन्मदिवस दर्पण दिन तसेच पत्रकार दिन म्हणून साजरा करतात. आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे अल्पायुषी होते. कारण वयाच्या ३४ व्या वर्षी म्हणजे १८ मे १८३६ रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पावन स्मृतीस कोटी कोटी प्रणाम तसेच या क्षेत्रातील संपादक व पत्रकार, बातमीदार सर्वाना दर्पण दिन व पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक, धर्माबाद
9423625769
No comments:
Post a Comment