Wednesday 25 October 2017

बोलण्याचे संस्कार

*बोलण्याचे संस्कार*

आपल्यावर बोलण्याचे संस्कार आहेत काय ?असे कोणी विचारणा केली तर आपण संभ्रमात पडतो. बोलण्यासाठी कोणत्या संस्काराची गरज आहे ? किंवा तसे संस्कार करता येतात काय ? याविषयी आपण लहान असताना नकळत विचार करतो मात्र त्यास बोलण्याचे संस्कार म्हणतात असे माहित नसतात. उदाहरण म्हणून जर आपण एक अनुभव आठवण करू या, घरात कोणी पाहुणे आले असतील आणि आपल्या घरातील लहान मुले त्या पाहुण्याशी खुप बडबड करीत असेल तर आपण लगेच म्हणतो की गप्प बस असे बडबड करू नये. अश्या मुलांवर बोलण्याचे संस्कार नाहीत असे प्रथम दर्शनी लोकांच्या मनात येते मात्र तुमचे मुल खुप बोलके आहे म्हणून ती वेळ निघुन जाते. मात्र काळ, वेळ किंवा परिस्थिती न पाहता बडबड करणारी मुले भविष्यात खुप बोलणारी होतात आणि त्यांचे बोलणे आणि त्यांना ऐकणे इतरांना कंटाळवाणे वाटत राहते. म्हणून लहानपणी बोलण्याचे संस्कार करणे अत्यावश्यक आहे. त्याची शिकवण मात्र आपल्या घरापासून सुरु करावी लागते. आपल्या समोर बोलणाऱ्या माणसांचे पूर्ण बोलणे ऐकून त्यानंतर आपले म्हणणे व्यक्त करणारे व्यक्तीवर बोलण्याचे संस्कार आहेत असे समजले जाते. आज संसद भवनमध्ये जे बोलणे दिसून येते तेंव्हा वाटते की या सर्व लोकप्रतिनिधीमध्ये बोलण्याचे संस्कार आहेत की नाहीत ? असा प्रश्न पडतो. बोलण्याचे संस्कार हे शालेय जीवनात करणे अत्यावश्यक आहे. शाळेतील हुशार मुले प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लगेच देतात आणि खुप बोलतात, ती अशीच बोलत राहिली तर त्यांच्यावर वेळीच आवर घालणे गरजेचे आहे.तर काही मुले बोलतच नाहीत. जी मुले बोलत नाहीत त्या मुलांना वर्गात बोलते करण्यासाठी काही उपाय योजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी हात वर करणे, बोलण्याची संधी मिळाल्यावर बोलणे, आपले बोलणे पुढील व्यक्तीला समजेल अश्या सोप्या शब्दात सांगणे आदि बाबीची तयारी शाळेत होऊ शकते. मित्रांना कसे बोलावे, वाडवडिलांना कसे बोलावे, शिक्षकांशी कसे बोलावे, शेजारीपाजारी कसे बोलावे या सर्व बाबीची माहिती अगदी लहान वयात मुलांना झाले तर मोठ्यापणी ते व्यवस्थित बोलू शकतील. पण बहुतांश मंडळी या बाबीकडे सामान्य बाब म्हणून दुर्लक्ष करतात. म्हणूनच भविष्यात ही मंडळी नैतिकता विसरून गेलेली दिसून येतात. धनुष्यातून निघालेला बाण जसे माघारी घेता येत नाही तसे तोंडातून निघालेले शब्द ही परत घेता येत नाहीत. त्यामुळे बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोललेले केंव्हाही चांगले असे बोलल्या जाते. घरात लहान मुले असतील तर त्यांच्यासमोर मोठ्याचे बोलणे चांगलेच असावे लागते. लहान मुले प्रत्येक शब्दनशब्द स्विकार करतात आणि मोकळ्यावेळी बोलताना त्या शब्दांचा वापर करतात. मुलांपेक्षा मुली खुप कमी बोलतात. त्यांच्यावर बोलण्याचे संस्कार होतात असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. प्रत्येकाना कसे बोलावे हे प्रत्यक्षात अनुभव घेत शिकतात. आई-बाबा, भाऊ-बहिण, नातलगातील व्यक्ती या सर्वासोबत मुली खुपच नम्रतापूर्वक बोलतात. जे नम्रतापूर्वक बोलतात त्यांच्या जवळ सर्व गोष्टी आपोआप चालून येतात. म्हणून आपल्या वैयक्तिक प्रगतीमध्ये आपल्यावर असलेल्या बोलण्याच्या संस्काराचे महत्त्वपूर्ण वाटा आहे.

- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद
  9423625769

1 comment:

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...