*बदल्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम*
राज्यातील शाळांना दिवाळी सुट्टी सुरू असली तरी राज्याचे शिक्षण खाते शिक्षकांच्या बदल्यांच्या कामात गुंतले आहे. दिवाळीची सुट्टी संपण्याच्या आत राज्यभरातील ५० ते ५५ हजार शिक्षकांच्या हातात बदल्यांच्या ऑर्डर्स पडलेल्या असतील. विनंती बदल्या, अधिकार बदल्या आणि एकाच जिह्यात १० वर्षांहून अधिक काळ शिक्षकी सेवा केलेल्या शिक्षकांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. अशी बातमी नुकतेच वाचण्यात आली. त्यानुसार खेडोपाड्यातील सर्व शिक्षकांच्या बदल्या होतील आणि गावोगावी नविन शिक्षक रुजू होतील. सर्व शाळांना एकसमान शिक्षक असावेत हे या बदल्यांमधील प्रमुख सूत्र आहे. कारण बहुतांश वेळा शहरातील आणि शहराच्या आसपासच्या शाळेत रिक्त पद नसतात. खेडोपाडी असलेल्या अतिदुर्गम भागांमधील शाळांवर जाण्यास शिक्षक राजी नसतात. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळांमध्ये ३० ते ५० टक्के शिक्षकांच्या जागा रिक्तच राहतात. परंतु या बदल्यामुळे ग्रामीण भागतील सर्व रिक्त जागा कसे भरल्या जातील याविषयी प्रत्येकांच्या मनात अजुन ही शंकाच आहे. कारण प्रत्येक शिक्षक ऑनलाइन मध्ये गावांची नावे निवड करताना शहराजवळ आणि रस्त्यावरील गावांचाच विचार केलेला दिसून येतो. तेंव्हा अतिग्रामीण किंवा दुर्गम शाळेत कोण जाणार याविषयी शंका निर्माण होणे साहजिक आहे. याच सोंबत संवर्ग 1 मधील शिक्षकांना हवे ते गाव देण्याची सुविधा दिल्यामुळे शहरातील आणि शहराच्या आसपासच्या शाळा संपूर्णपणे संवर्ग 1 ने भरल्या जाणार असल्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. बदल्यापूर्वी शाळेवर प्रत्येक स्तरातील शिक्षक होते मात्र या बदल्यानंतर असे चित्र याठिकाणी पाहायला मिळणार नाही असे वाटते. त्यानंतर शाळेत 10 वर्ष पूर्ण केलेल्या सर्वात खालच्या म्हणजे ज्युनियर शिक्षकांना कोणती शाळा मिळेल हे अनिश्चित आहे. कारण सेवाजेष्ठतेनुसार त्यांना शेवटची संधी मिळणार म्हणजे उर्वरित गावे त्यांना मिळणार. उर्वरित म्हणजे अतिदुर्गम, शहरापासून दूर आणि ज्या गावाला कोणी निवड केले नाही असे गाव मिळणार आहे. वास्तविक पाहता त्यांना आत्ता बदलीची तेवढी आवश्यकता नाही तरी त्यांना बदली घ्यावी लागत आहे. बदल्याचा हा खो-खो चा खेळ राज्यातील सर्व शैक्षणिक परिस्थिती बदलून टाकणार असे वाटते. गेल्या तीन वर्षापासून राज्यात डिजिटल शाळेचे वारे वाहू लागले आहेत. बहुतांश शिक्षकांनी आपल्या कौशल्यावर लोकसहभाग मिळवून आणि काही ठिकाणी शिक्षकांनी स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून शाळा डिजिटल केले आहेत, त्यामुळे शाळेची गुणवत्ता वाढ होण्यास मदत मिळू लागली. त्यातच या बदल्या म्हणजे काम करणाऱ्या शिक्षकांवर अन्याय नव्हे काय ? असा ही प्रश्न उपस्थित केला जात आहे. यापुढे कोणी सरकारी शाळेसाठी पदरचे पैसे खर्च करतील काय ? असे देखील बोलल्या जात आहे आणि ते सत्य आहे. दिवाळी सुट्टी संपल्याबरोबर प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत पहिली संकलित मूल्यमापन चाचणी होणार आहे. त्यापूर्वी जर पन्नास हजार शिक्षकांना बदल्याचे आदेश मिळाले आणि त्यांना शाळा सोडवी लागली तर नव्या शिक्षकांना ह्या परिक्षेची लिंक लागेल काय ? सर्व ठिकाणी परीक्षा सुरळीत पार पडतील काय ? असे एक नाही अनेक प्रश्न शिक्षकांच्या मनात निर्माण होत आहेत. शेवटी सर्वात महत्वाचे म्हणजे या ऑनलाइन बदल्यामुळे राज्याच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ होईल काय ? शिक्षकांच्या बदल्या झाल्यानंतर वजनदान व्यक्तींचा हस्तक्षेप किंवा दबाव आणून बदली थांबवली जाते. वशिलेबाजीही मोठय़ा प्रमाणात चालते. मात्र यापुढे या गोष्टींना संधी मिळू नये याची खबरदारी घेण्यासाठी सर्व बदल्या संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाइन केल्या जाणार आहेत. बदल्यामध्ये मानवी हस्तक्षेप नको या एकाच कारणासाठी शिक्षकांच्या बदल्या करणे म्हणजे चोर सोडून संन्यासाला फाशी दिल्यासारखे आहे. आज शिक्षक आपल्या पोर्टलवर जे गाव दिसत आहेत त्यातून 20 गाव निवड करीत आहेत. मात्र त्याला बदलीच नको असेल तर त्याला काही सुरक्षितता नाही. कारण कोणी जर खो दिला तर नाइलाजास्तव त्याला तेथून हलावे लागते. शाळेच्या गुणावत्तेच्या बाबतीत देशात राज्याचा तिसरा क्रमांक असल्याची बातमी काही दिवसापूर्वी वाचण्यात आली होती. कारण शिक्षक आनंदात आपली नोकरी करीत होते. मात्र या बदल्यामुळे शिक्षक खरोखर आनंदी राहील काय ? आणि तो जर आनंदी नसेल तर त्याचा गुणवत्तेवर निश्चितपणे फरक पडणार, असे अनेक शिक्षणतज्ञ व्यक्तीनी खाजगीमध्ये बोलताना व्यक्त करीत आहेत. सध्या तरी आपणाला फक्त अंदाज व्यक्त करता येतो याचे परिणाम काय होतील ते दोन तीन वर्षांनंतरच कळेल एवढे मात्र खरे आहे.
- नासा येवतीकर, स्तंभलेखक
No comments:
Post a Comment