Saturday, 28 October 2017

माझ्या नोकरीची पहिली शाळा

माझ्या नोकरीची पहिली शाळा

पावसाळ्याचे दिवस होते. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. सकाळी सातची वेळ आणि मी साखर झोपेत होतो. तशी घरातील फोनची घंटी वाजली ट्रिन ट्रिन, बाबानी फोन उचलले. तिकडून माझे मोठे बंधू बोलत होते त्यांनी म्हटले की, मला शिक्षकांची नोकरी लागली. हे ऐकून मला खुप आनंद झाला पण थोड्या वेळात कळले की, किनवट तालुका मिळाला. हे ऐकल्याबरोबर मी खिन्न झालो. किनवटला मी नोकरी करणार नाही अशी ठाम भूमिका घेतली होती. कारण किनवट म्हणजे पूर्ण जंगली परिसर, त्यातल्या त्यात नक्षलवादी विजयकुमार यांच्या सर्व कारवाया मी वाचून होतो. घरापासून 200 किमी दूर या सर्व बाबीचा विचार करताना अंगावर काटा उभा राहायचा. त्यामुळे किनवट तालुक्यात नोकरी करणार नाही यावर मी ठाम राहिलो. पाच-सहा दिवस उलटले. घरातल्या सर्वानी माझी समजूत काढली. जाऊन फक्त रुजू होऊन ये त्यानंतर आपण एका महिन्यात बदली करू असा विश्वास दाखविला त्यामुळे मी जाण्यास तयार झालो. अखेर 10 ऑगस्ट रोजी किनवटला जाण्यास सकाळी निघालोत दुपारी बारा-एक वाजेपर्यंत किनवटला पोहोचलोत आणि पंचायत समिती मध्ये पत्र दिलोत. सोबत बाबा होतेच. त्यादिवशी ऑफिस मध्ये गटशिक्षणाधिकारी साहेब नसल्यामुळे लॉजवर रात्र काढावे लागले. त्या ठिकाणी माझा वर्गमित्र चंद्रकांत नोमुलवारची भेट झाली तेंव्हा थोडे बरे वाटले. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ऑफिस गाठले. त्या दिवशी दुपारी अनंतवाडी संकुलातील प्राथमिक शाळा अजनी या शाळेचे आदेश मिळाले. त्याच ऑफिसमध्ये एक दोघांना या शाळेविषयी आणि केंद्राविषयी विचारणा केली असता ते गाव कोणालाही माहित नव्हते. माझं काळीज धस्स केलं. इथल्या लोकांना हे गाव माहित नाही, कोणत्या जंगलात आहे की, असा विचार मनात डोकावला. तेंव्हा स्वतः गटशिक्षणाधिकारी साहेब श्री शिवाजीराव खुडे यांनी त्या गावाची माहिती दिली, अंनतवाडीला कुपटी असे म्हणतात हे त्यांनी सांगितले आणि बस स्टैंडला जा तेथे तुम्हाला गाडी मिळेल त्या गाडीने तुमच्या शाळेच्या फाट्यावर उतरा. मी आणि बाबा निघालो. बस स्टैंडवर बरोबर अडीच वाजता दत्तमांजरी बस लागली. त्या बसमध्ये बसलो आणि बस शाळेच्या रस्त्याने झाडे मागे टाकित, धुरळा उडवित जाऊ लागली. मी प्रत्येक गाव आणि परिसर पाहू लागलो तसे मला धडकी भरु लागली. लोकांचे राहणीमान, त्यांचे बोलणे, वागणे सर्व वेगळे वाटत होते. कारण मी यापूर्वी कधी ही हा भाग बघितला नव्हता. अखेर माझ्या शाळेचे गाव आले. आम्ही खाली उतरणार तोच त्या शाळेचे मुख्याध्यापक बसमध्ये चढले. त्यांनी परत त्याच बसमध्ये बसायला सांगितले. त्यापुढच्या वझरा शे.फ. गावात आम्ही उतरलो. आमची सर्व कहाणी सांगितली. ते खरंच आम्हांला देवमाणूस वाटला कारण त्यांनी त्या दिवशी त्यांच्या घरीच राहायला आणि झोपायला जागा दिली. दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 ऑगस्टला मुख्याध्यापक, बाबा आणि मी सकाळी सकाळी शाळेवर जाण्यास निघालो. तोच हा सुवर्ण दिवस, ज्या दिवशी माझ्या नोकरीला सुरुवात झाली. सर्व परिसर पाहून माझ्या मनात विलक्षण भीती भरली होती. मुख्य रस्त्यापासून दोन किमीमध्ये शेताशेतातून त्या शाळेला रस्ता होता. आजुबाजुला जंगल, खुप भीती वाटत होती. मनात पक्का निर्धार केलो की, काही झाले तरी येथे नोकरी करायचे नाही. आत्ता नाही तर पुढील वेळी आपणांस नक्की नोकरी मिळेल. अर्धा तासाच्या पायपीटनंतर शाळेत पोहोचलो. जेमतेम 50 कुटुंब असलेले ते गाव. सर्व घरे सागवानच्या लाकडापासून बांधलेले, मातीचा लेप, एक किंवा दोन घरे पक्की होती. शाळा नशिबाने एकच खोली होती पण पक्की होती. सर्व चिमुकली मुले मुख्याध्यापकांची वाट पाहत उभी होती. ती मुले मला वेगळीच दिसू लागली. आपल्याकडची गोरी गोमटी आणि टापटीप स्थिती मधील मुले माझ्या डोळ्यासमोर होती. बाबांना आणि मला ती मुले निरखुन पाहू लागली. तो दिवस असा तसा संपला. सायंकाळी बाबा गावाकडे निघुन गेले. मी मुख्याध्यापकाच्या घरी पेइंग गेस्ट म्हणून राहिलो. दोन दिवसांनी स्वातंत्र्य दिवस होता. तो दिवस झेंडावंदन करून घरी जाण्याचा नियोजन बाबांनी सांगून गेले होते म्हणून मी झेंडावंदन झाले की दुपारच्या बसने माझ्या गावी घरी आलो. घरी यायला रात्र झाली. घरी आल्यावर रात्रभर रडत बसलो आणि निर्णय दिला की मी त्या शाळेवर नोकरी करणार नाही. दोन दिवस घरी राहण्याची सुटी घेतलो होतो. पण पाच दिवस संपले मी शाळेला गेलोच नाही. पाचव्या दिवशी रात्री परत घरातील सर्वानी मला समजावून सांगितले. नोकरीचे मला काही वाटत नव्हते. माझ्या अभ्यासावर आणि मेहनतीवर मला विश्वास होता. मी कसे ही करून नोकरी मिळवू शकतो याची खात्री होती. ( पण आज वाटत आहे की, मी खरंच खूप मोठी चूक करणार होतो. ) पण बाबांना ही मिळालेली नोकरी सुटु नये असे वाटत होते. सात दिवसानंतर परत एकदा बाबामाझ्या सोबत आले. त्यांनी मला एक खोली घेऊन दिली, सर्व साहित्य घेऊन दिले, त्यांनी दोन दिवस माझ्यासोबत राहिले. मी एकदा तिथे रूळलो की बाबा परत गावी निघून गेले. हळूहळू मला त्या शाळेचा आणि परिसराचा लळा लागला आणि मी त्या दुर्गम शाळेत पाच वर्ष सेवा दिली. त्या शाळेने मला जीवनातील अनेक कडू-गोड अनुभव दिले. त्या गावातील मंडळी मला आज ही आठवतात, आमचे अध्यक्ष रमेश, जायभाये परिवार, अंगणवाडीचे भंडारे ताई, माझे मुख्याध्यापक डी. बी. शेख, बालाजी रेनगुंटवार, जगन्नाथ दिंडे, माधव बाभळे, मोरेश्वर गायधने, अहमद मुल्ला, तेंव्हाचे केंद्राचे मुख्याध्यापक व्ही. बी. सोरते, अशोक गायकवाड, संजय कांबळे, संजय कळसकर, मारोती चोंडीकर, केरबा उमाटे,मंगेश हानवते, दिगंबर शेंगेपलू, स्व. सुभाष कराड, असे अनेक चांगले जिवाभावाचे मित्र दिले. माहूर शहरात ज्यांच्या घरी किरायाने राहत होतो ते सुभाष जाधव आणि परिवार यांचा स्नेहही स्मरणात आहेच. कुपटी गावात ज्यांनी मला त्यांच्या कुटुंबात एका परिवारातील सदस्यांसारखे प्रेम दिले ते संपूर्ण टेकाळे परिवार, ज्यांच्या घरी किरायाने होतो ते डॉ. सातव परिवार आणि कदम परिवार यांनी खरा आधार दिला. रिकामा वेळ गावातील मुलांसोबत क्रिकेट खेळण्यात घालवत असे. त्या सर्व मित्रांची आज ही आठवण कायम स्मरणात आहे. यापैकी कोणाला ही विसरणे अशक्य आहे. आज मला राहून राहून वाटते की, कदाचित तेंव्हा मी त्या शाळेला धुडकावलो असतो तर आज मी जसा आपणास दिसतो आहे तसा राहिलो नसतो, नक्की वेगळाच भेटलो असतो. माझ्या पहिल्या शाळेची ही आठवण मी जीवनभर विसरु शकत नाही. आज 12 ऑगस्ट रोजी माझ्या नोकरीला 21 वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने केलेली एक आठवण

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड

13 comments:

मतदान जनजागृती ( Voting Awarness )

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जनजागृती चला मतदान करू लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.  चला मतदान करू .......! ...