Saturday 19 June 2021

yoga Day

सहशालेय उपक्रम आणि योग

मुलांच्या जडणघडण मध्ये शाळा महत्वाची भूमिका बजावत असते. मुलं घरातून कौटुंबिक ज्ञान घेऊन जेंव्हा शाळेत प्रवेशित होतात तेंव्हा त्यांचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी अर्थातच शाळेवर येऊन पडते. शाळेतील पहिली चार वर्षे म्हणजे इयता पहिली ते चौथी वर्गापर्यंतच्या शिक्षणावरच मुलांचे पुढील भविष्य अवलंबून असते. म्हणून या प्राथमिक शाळेत मुलांवर संस्कार करणारी शाळा नेहमी प्रगतीपथावर राहते. बहुतांश पालक आपला मुलगा हुशार व्हावं असे बोलतात तर काही पालक माझा मुलगा हुशार झाला नाही तरी चालेल पण त्याला सर्व काही आलं पाहिजे, तो सर्वगुणसंपन्न असला पाहिजे असे बोलतात. मात्र अश्या प्रकारे बोलणाऱ्या पालकांची संख्या खूपच कमी आढळून येते. शाळेत विविध उपक्रम आणि प्रयोगाच्या माध्यमातून शिक्षक मुलांना सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करतात. मुलांच्या बौद्धिक विकासासोबत त्याच्या शारीरिक विकासाकडे शाळेतून लक्ष दिले जाते. घरात आणि समाजात वावरत असतांना मुलांनी कसे वागावे ? याचे शिक्षण याच प्राथमिक वर्गात दिले जाते. या लहान वर्गातील मुले घरातल्या आई बाबा किंवा दादा बहीण यांचे अजिबात ऐकत नाहीत मात्र सरांनी किंवा बाईंनी सांगितलेलं काम नेटाने पूर्ण करतात. मुलांचा त्याच्यावर असलेला हा विश्वास असतो. त्याचमुळे शिक्षकांनी देखील मुलांना याच वयात चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न करावा. शाळेत वेगवेगळे खेळ खेळले जातात. काही उनाडकी मुलेच यात सहभागी होतात. पण सारेच मुले खेळात सहभागी करून घेतल्यास त्या मुलांचा फायदा होतो. शाळेत शेवटचा तास म्हणजे खेळाचा हे ठरलेले वेळापत्रक आहे. मुलांना बाहेर खेळायला सोडून दिले की शिक्षक मोकळे असे चित्र बऱ्याच शाळेत पाहायला मिळतं. त्याला कारणे अनेक असू शकतात. मात्र शिक्षकांनी नियोजन करून एखादे खेळ त्यांच्या नियंत्रण आणि मार्गदशनखाली खेळवल्यास मुलांना फायदा होऊ शकतो. खेळाचे शिक्षक याविषयी जेवढा न्याय देऊ शकतात तेवढा साधा प्राथमिक शिक्षक देऊ शकत नाही. लहान मुले कधीच थकत नाहीत. त्यांच्यामध्ये भरपूर ऊर्जा साठविलेले असते. त्याचा वापर आपणांस करता आले पाहिजे. जी मुले लहानपणी खूप खेळतात ते मोठेपणी कमी आजारी पडतात किंवा त्यांच्याकडे प्रतिकारशक्ती असल्यामुळे ते आजाराला पळवून लावू शकतात. तर घरात बसून टीव्ही पाहणारे किंवा मोबाईलवर गेम खेळणारे साधे फडसे जरी आले तरी दवाखान्यात हजार रुपये खर्च करतात. म्हणून शालेय जीवनात मुलांच्या आवडत्या खेळाला प्रोत्साहित केले तर त्याचा फायदा भविष्यात होऊ शकतो. या खेळाबरोबर मुलांच्या आहाराकडे देखील लक्ष देता येते.प्रत्येक शाळेत शालेय पोषण आहार योजने अंतर्गत मध्यान्ह भोजन दिले जाते. यावेळी मुलांना जेवण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे, ताटात आलेले अन्न कुरकुर न करता खाणे, जेवण करतांना पूर्ण लक्ष आपल्या ताटात ठेवणे अश्या गोष्टी मुलांना नकळत कळत जाते. त्याचा फायदा निरोगी शरीर राहण्यास होतो. ज्यांचे शरीर तंदुरुस्त त्याचे मन देखील तंदुरुस्त. मग त्याचे आरोग्य देखील तंदुरुस्त राहू शकते.

21 जून रोजी जागतिक योग दिवस आहे. या दिवसापासून आपण सर्वांनी आपले शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी योग करायचे आहे. मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी प्रत्येक शाळेत परिपाठच्या माध्यमातून दोन मिनिटांचे मौन घेतले जाते. शाळा सुटताना देखील असे मौन काही शाळेत घेतले जाते. ज्याद्वारे आज दिवसभार काय केले ? याची एकदा उजळणी होते. म्हणूनच मुलांनी योग करायचे म्हणजे शाळेतल्या विविध उपक्रमात हिरीरीने सहभाग घ्यावे. शिक्षकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. यातूनच आपणांस सुखी जीवन मिळू शकते. चला तर मग आपले शरीर आणि मन निरोगी राहण्यासाठी शाळेतल्या उपक्रमात सहभागी होऊन आरोग्य वाढवू या.


- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक व विषय शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769  

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...