गड किल्ले - इतिहासाचे मूक साक्षीदार
आपल्या भारतीय परंपरेला एक इतिहास आहे. आणि हा सर्व इतिहास आपणास गड आणि किल्ल्याच्या शिल्लक असलेल्या अवशेषावरुन लक्षात येते. अनेक इतिहासतज्ञ या पुरातन वस्तूवरुन इतिहास लिहिण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आज उपलब्ध असलेले गड आणि किल्ले हेच खरे तर इतिहासाचे मूक साक्षीदार आहेत. परंतु आपण सर्वजण याची कोणी काहीच काळजी करताना दिसत नाहीत. पहिली गोष्ट तर गड आणि किल्ले सुरक्षित आहेत काय ? याचा विचार तर दुरच हे गड किल्ले पहण्यासाठी कोणी जात नाहीत. जे जातात ते या गड आणि किल्याला प्रदूषित करतात. काही हौसी मंडळी गड आणि किल्ल्यावर आपले नाव लिहितात, कोणी चारोळी लिहून ठेवतात, तर कोणी वेगवेगळे चित्र काढून गड आणि किल्याचे सौंदर्य नष्ट करतात. ते एक ऐतिहासिक वास्तु आहे आणि तिचे संरक्षण करण्याची जबाबदारी माझी हे साफ विसरून जातात. अश्या लोकांना वेळीच आवर घालून दंडित करायला हवे. त्यांना दंड लावले की पुढे कोणी असे विचार डोक्यात आणणार नाही. काही मंडळी गड आणि किल्यावर पिकनिक म्हणून येतात. सोबत येताना खाण्याचे भरपूर खाद्यपदार्थ आणतात. त्याचा आस्वाद घेतात आणि तेथेच कचरा टाकून मोकळे होतात. त्यांना फक्त पिकनिकची मजा घ्यायची असते. आपल्या अश्या वागण्यामुळे गड आणि किल्ले पाहण्यास येणाऱ्या पर्यटकाना किती त्रास होईल याचा अजिबात विचार न करणारे खरोखर त्या गड व किल्याचा अभ्यास करतील काय किंवा संरक्षण करतील काय ? हा फार मोठा प्रश्न पडतो. त्याचसोबत या ठिकाणी असे जोडपे दिसून येतात जे की लग्नाच्या पूर्वी एकत्र फिरण्यासाठी येथे येतात. पुण्याजवळील एक दोन किल्याच्या ठिकाणी कॉलेजमध्ये शिकणारी मुले-मुली एकत्र दिसण्याचे प्रकार खुप आढळून येतात. गड आणि किल्याचा वापर हे नवयुवक असे करत असतील तर त्यांच्याकडून याबाबतीत काय अपेक्षा ठेवता येतील. असे प्रकरण तेथे होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा अश्या गैरप्रकारामुळे गड किल्ले पाहण्याऱ्या लोकांची संख्या अगोदरच कमी आहे त्यात अजून घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच सोबत यावर उपाययोजना म्हणून गड किल्ले पाहायला जाणाऱ्या सर्वांचे आधार कार्ड आणि त्याचे मोबाईल क्रमांक सुद्धा घेण्याची सुविधा निर्माण करावी लागेल. काही दिवसापूर्वी नांदेड जिल्ह्यातील माहूरगडाच्या जंगलात दोन प्रेमी युगुलाची निर्घृण हत्या करण्यात आली. यापूर्वी सुध्दा असे अनेक घटना घडलेल्या आहेत. असे प्रकार होऊ नये याची काळजी घेतली तर या किल्याचा इतिहास शाबूत राहू शकतो. अन्यथा बदनामी होण्यास जास्त वेळ लागत नाही. किल्याचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी शासन स्तरावरुन काही ठोस कृती कार्यक्रम तयार होणे देखील अत्यंत महत्वाचे आहे. जास्तीत जास्त लोकांची या गड आणि किल्याकडे लक्ष जाण्यासाठी महत्वपूर्ण योजना तयार करून त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.
शालेय जीवनात दरवर्षी सहलीचे नियोजन केल्या जाते. या वयातील सहलीत मिळालेली माहिती चिरकाल स्मरणात राहते. मात्र बहुतांश शाळाकडून आयोजित करण्यात आलेल्या सहली ऐतिहासिक स्थळी न जाता प्रेक्षणीय स्थळाना भेट दिल्या जाते. काही शाळा तर शैक्षणिक सहल म्हटले की नुसती डोकेदुखी म्हणून त्या पासून चार हात दूर राहतात. पालक देखील आपल्या पाल्याना अश्या ऐतिहासिक स्थळी घेऊन जात नाहीत. त्यामुळे गड आणि किल्याकडे अभ्यासपूर्ण दृष्टीने पाहण्याऱ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे आणि प्रेक्षणीय स्थळी पर्यटकांची संख्या भरमसाठ वाढत आहे. त्या ठिकाणी देखील काही इतिहास कळतो नाही असे काही नाही. मात्र मुलांना इतिहास या विषयात आवड निर्माण करण्यासाठी, गड आणि किल्याची माहिती संकलित करण्यासाठी त्यांची शैक्षणिक सहल येथे काढणे आवश्यक आहे. अश्या सहलीचे नियोजन करणाऱ्या शाळेला प्रवासात विशेष सवलत देण्याची प्रथा सुरु केल्यास चांगला परिणाम पहायला मिळेल. त्याच सोबत शाळेला एक प्रमाणपत्र वितरित केल्यास अजून चांगले होईल. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ नावाची संस्था कार्यान्वित आहे, त्या माध्यमातून या गड आणि किल्याचे संरक्षण कसे करता येईल ? तसेच इतिहासाचे मूक साक्षीदार म्हणून वर्षानुवर्षे कसे मदतगार ठरतील याची काळजी देखील घेणे आवश्यक आहे. आपल्या पूर्वीचे लोकं या गड किल्यात जगले आहेत, आपण प्रत्यक्षात हे पाहत आहोत तर आपल्या नंतरची पिढी फक्त चित्रात पाहू शकेल असे होणार नाही याची काळजी प्रत्येकानी घ्यायला हवे. गड किल्यावर वर्षातुन एकदा जावे मात्र तेथे कसल्याच प्रकारची गैरवर्तणुक न करता त्या ठिकाणचे सौंदर्य अबाधित राखूया.
नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769
No comments:
Post a Comment