Sunday, 21 August 2016




*शालेय अभ्यासक्रमात खेळाचे महत्व*

रिओ ऑलिम्पिक मध्ये भारत पदक तालिकेत आपले खाते उघडते किंवा नाही याबाबत प्रत्येक भारतीयांच्या मनात शंका निर्माण होत असताना साक्षी मलिकने कुस्तीत कास्य पदक जिंकून 125 कोटी भारतीयांची शान राखली तर बैडमिंटनपटु पी व्ही सिंधुने रौप्य पदक मिळवित सर्व भारतीयांची मान उंचावली. तसे पाहिले तर इतर देशाच्या तुलनेत आपली एवढी मोठी लोकसंख्या असून सुध्दा पदक मिळण्याच्या बाबतीत खुपच मागे का आहे ? यावर विचार करणे आवश्यक आहे. खरे तर खेळाची सुरुवात प्राथमिक शाळेपासून व्ह्ययला पाहिजे.
उत्तम आरोग्य असेल तर त्याचे डोके सुध्दा उत्तम असते अश्या अर्थाची एक म्हण वाचण्यात येते. त्याचा अर्थ शालेय जीवनापासून लक्षात घ्यायला हवे. कारण प्राथमिक शिक्षणाची सुरुवात शाळेत होते आणि याच ठिकाणी त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्या जाते. मुलाचा शारीरिक,भावनिक विकास होण्यासाठी खेळ आवश्यक आहे. मुले खेळण्यात जास्त वेळ घालू लागली की पालकाची ओरड ठरलेली असते की आत्ता किती वेळ खेळणार ? चल बस अभ्यासाला. ही नेहमीची पालक वर्गाची ओरड प्रत्येक घरात दिसून येते. यास पालकाना दोष देऊन चालणार नाही कारण सध्या परिस्थितीच आहे तशी खेळापेक्षा अभ्यासाला महत्व जास्त देण्यात येते.
संगणकच्या युगात काही चांगले घडत आहे तर काही वाईट सुध्दा घडत असताना दिसत आहेत. मोबाईल नावाच्या जादुई खेळणीने मुलांचे सर्वच खेळ हिरावुन घेतले आहे असे वाटते. पूर्वी ग्रामीण भागातील शाळा आणि रिकामी जागा मुलांच्या खेळाने भरून जात असत. शहरात खेळाची मैदाने सायंकाळी आणि रविवारच्या दिवशी मुलांनी फुलून जायचे. पण आज हे चित्र फार कमी पाहायला मिळत आहे. कारण आज मुले घरात बसल्या ठिकाणी मोबाईल वर सर्व खेळ खेळत आहेत. मैदानी खेळ कमी झाले. त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होत आहे. त्यांचा मेंदू काम करेनासे झाले आहे. शरीर जड होत आहे. मुलामध्ये चैतन्य नावाची वस्तु सापडत नाही. या सर्व बाबीवार एकच उपाय ते म्हणजे शारीरिक खेळ. मुलांचा अभ्यास तेंव्हाच चांगला होऊ शकतो ज्यावेळी त्यांचे मन प्रसन्न असेल आणि मन प्रसन्न ठेवण्यासाठी त्यांना मैदानावर खेळण्यास नेणे गरजेचे आहे. मैदानावर फिरणे असो खेळ खेळणे असो वा इतर काही करणे यामुळे मुलांना ताजी हवा मिळते जे की शरीरला आवश्यक आहे आणि मन प्रफुल्लित होते. म्हणून मुलांना नुसते अभ्यास करा असे म्हटल्याने मुलांचा अभ्यास नीट होणार नाही. ते आपल्या धाकामुळे वाचन लेखन अभ्यास करतील पण त्यांच्या लक्षात राहणार नाही, हे ही तेवढेच सत्य आहे त्यामुळे रोज सकाळी आणि सायंकाळी थोडा तरी वेळ खेळ खेळणे आवश्यक आहे. पण आज आपल्या मुलांची सकाळ आणि सायंकाळची वेळ ही शिकवणीमध्ये जात आहे. शाळेत सुध्दा खेळाचा एक तास असतो मात्र शाळेत किती व कोणकोणते खेळ शिकवल्या जातात हा एक संशोधन करण्याचा विषय होऊ शकतो. त्यास शिक्षक दोषी आहेत असे नाही कारण तेथे खेळाच्या शिक्षकाची कमतरता भासते. आज कित्येक शाळेत खेळाचे शिक्षकच नाहीत तर काही शाळेत खेळाचे मैदान उपलब्ध नाही तर मुले काय खेळतील आणि कुठे खेळतील ? कधी कधी मुले ज्यांच्या शाळेत मैदान आहे तेथे खेळताना दिसून येतात त्यांना कोणाचे मार्गदर्शन नसते, ना कोणाचा कानमंत्र ते आपले उगीच खेळ खेळत असतात. परंतु त्यांना चांगला गुरु मिळाला तर अनेक स्तरावर आपले नाव व कीर्ती मिळवू शकतात. शाळेत शिकलेल्या खेळाचा आयुष्यात फायदा होतो. शालेय जीवन संपल्या वर आपले कोणत्याच खेळाकडे लक्ष जात नाही कारण त्या खेळाविषयी जी रूची शाळेत तयार व्ह्ययला पाहिजे ते होत नाही. शाळेतील खेळ पावसाळी आणि हिवाळी खेळापूरती औपचारिकपणे पूर्ण केल्या जाऊ नये.
शालेय अभ्यासक्रमात खेळाचा तास हा शेवटचा असतो ज्यात सहसा काहीच होत नाही कारण मुलांना घरी जाण्याचे वेध लागलेले असते. दुपारची पूर्ण वेळ खेळासाठी राखीव ठेवणे आवश्यक आहे. शाळेतून विविध प्रकारच्या खेळाची तयारी होणे अपेक्षित आहे. यासाठी शासनाने या बाबिकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. निदान सहाव्या वर्गापासुन तरी खेळाच्या शिक्षकांची नेमणूक करणे आवश्यक आहे. ज्यामुळे मुले योग्य दिशेत मोकळेपणाने खेळ खेळतील. एखाद्या खेळात निपुण व्हायाचे असेल तर विषय शिक्षकच फक्त त्यास न्याय देऊ शकतो. तीन वर्षापूर्वी कला , कार्यानुभव आणि क्रीडा विषय शिकविण्यासाठी अंशकालीन निदेशकची नेमणूक करण्यात आली होती. तेंव्हा मुले त्या विषयात अभ्यास करताना आनंदात होती. पण त्यांचा आनंद दीर्घकाळ टिकू शकले नाही. कारण पुढे त्यांची नेमणूक रखडली. प्रत्येक सहावी ते दहावीच्या वर्गासाठी क्रीडा शिक्षक असेल तर भविष्यात साक्षी आणि सिंधू मोठ्या प्रमाणावर तयार होतील. अशी आशा करण्यास हरकत नाही. कोणत्याच सोई सुविधा उपलब्ध नसेल तर आपली मुले स्पर्धेत कशी राहतील याचा विचार करणे आवश्यक नाही काय ?
जर आत्तापर्यन्तच्या ऑलिम्पिक चा इतिहास पाहिले असता भारत देश सन 1900 पासून यात सहभाग घेत आहे. आजपर्यन्त भारताने 9 सुवर्ण चार रौप्य आणि 12 कास्य असे एकूण 25 पदक गेल्या 116 वर्षात मिळविले आहे आणि गेल्या 20 वर्षाचा मगोवा घेतल्यास असे लक्षात येते की सन 1996 पासून भारताने एक सुवर्ण, तीन रौप्य आणि नऊ कास्य पदकाची कमाई केली याचाच अर्थ गेल्या वीस वर्षपासुन भारताचा ऑलिम्पिक मधील सहभाग वाढला असून जास्तीत जास्त खेळ खेळून पदक मिळविण्याच्या दिशेने प्रयत्न चालू आहेत म्हणण्यास हरकत नाही. मात्र अजूनही मुलांना या खेळाच्या बाबतीत अधिक जागृत करून त्यांना खेळाकडे आकर्षित करणे आवश्यक आहे. शाळा स्तरापासून ते देश स्तरापर्यन्त विविध स्पर्धाचे आयोजन करून खेळाडूना प्रोत्साहन मिळवून देणे याची आत्ता खरी गरज आहे.
- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद
  09423625769

No comments:

Post a Comment

मतदान जनजागृती ( Voting Awarness )

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जनजागृती चला मतदान करू लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.  चला मतदान करू .......! ...