Thursday 18 August 2016

आई माझा गुरु
जीवनामध्ये गुरुचे स्थान अनन्य साधारण महत्वाचे आहे. गुरु विना ज्ञान मिळविणे अशक्य आहे,असे संत कबीर आपल्या दोहात सांगतात. लहानपणापासून ते वृध्द अवस्थेपर्यन्त आपणास गुरुची आवश्यकता भासते.जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आणि प्रत्येक वळणावर आपणास गुरुची गरज भासते.गुरु म्हणजे कोण असतो ? गुरु म्हणजे मार्गदर्शक, गुरु म्हणजे ज्ञान देणारा, गुरु म्हणजे अज्ञानरूपी अंधारात दिवा लावून ज्ञानाचा प्रकाश पसरविणारा, गुरु म्हणजे दिशादर्शक. जेव्हा जेव्हा आपणास काही अडचणी निर्माण होतात, समस्या उद्भवतात तेंव्हा तेंव्हा आपणास जाणकार तज्ञ व्यक्तिकडे जावे लागते. म्हणजेच गुरुकडे जावे लागते. गुरु म्हणजे लघू नसलेला, लहान नसलेला. ज्याच्याकडे भरपूर ज्ञान व विद्या आहे तोच खरा गुरु. जे लोक गुरु होण्याचा मुखवटा धारण करतात ते एक ना एक दिवस उघडे पडतात आणि त्यांची पत घसरल्याशिवाय राहत नाही. आपले स्थान टिकविण्यासाठी गुरु लोकांना खुप मेहनत घ्यावी लागते.आपले ज्ञान सतत वाढवत ठेवावे लगाते.त्यासाठी नियमित अभ्यासाचा सराव करावा लागतो.
पूर्वीच्या काळात गुरुच्या घरी जाऊन आणि तेथेच राहुन शिक्षण घ्यावे लागत असे त्यास गुरुकुल पद्धत असे म्हटले जाते. त्याठिकाणी गुरु हा शिष्याना ज्ञान देण्याचे काम करीत असत आणि त्या विभागाचा राजा त्या गुरुचा यथायोग्य धनसंपत्ती देऊन स्वागत करायचा, ही पध्दत होती. ही गुरुकुल पद्धत आत्ता हॉस्टेलच्या स्वरुपात दिसून येते. मात्र त्यात गुरुकुल मध्ये जी आत्मीयता , प्रेम किंवा जिव्हाळा दिसून येत असे ते मात्र दिसून येत नाही.मधल्या काळात गावोगावी गुरुकुल ऐवजी शैक्षणिक संस्था म्हणजे शाळा उदयास आली आणि गुरुकुल मधील गुरु हे शिक्षक या नावाने ओळखले जाऊ लागले.विद्येचे घर अगदी आपल्या घराजवळ उपलब्ध झाल्यामुळे शिक्षण घेणारे आणि देणारे यांची संख्या वाढीस लागली. राजाच्या ठिकाणी शासन त्यांना दरमहा वेतन देत शासकीय कर्मचारी केले. असे हळूहळू गुरुचे पद व्यावसायिक होत गेले. गुरुच्या व्यवसायात जैसेही लक्ष्मी, पैसा प्रवेश केला तैसे विद्या मंद गतीने दूर निघून गेली. कारण लक्ष्मी आणि सरस्वती सहसा एकत्र राहू शकत नाहीत.
शाळेच्या बाबतीत सुध्दा असेच घडले शाळेत जैसे ही लक्ष्मीने प्रवेश केला तसे शाळेचेही रूप पालटले. पूर्वी शाळेतल्या गुरुजींना खुप मान सन्मान मिळायाचा, आदर मिळायाचा, लोक त्यांना सन्मानाने बोलायचे,मात्र आज तशी परिस्थिती नाही. आज गुरूजी बदलले,समाज बदललला, आणि परिस्थिती सुद्धा बदलली. आज कोणालाही शाळेतील गुरूजीची गरज भासत नाही. कारण त्यांच्या मुलांना शिकविण्यासाठी घरात संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, मोबाईल, स्मार्ट फोन सारखे तंत्रज्ञान 24 तास त्यांच्या सेवेत उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे त्यांना गुरुचे ज्ञान तोकडे वाटत असेल ? सोशल मिडियाच्या विविध माध्यमातून ज्ञानाची झरे वाहत आहेत. काही वर्षानंतर गुरुची संकल्पना मागे पडते की काय ?अशी भीती सुध्दा राहुन राहुन मनात येते.त्यासोबत अजुन ही या गोष्टीवर विश्वास वाटतो की गुरुशिवाय मनुष्याचे जीवन सफल होऊच शकत नाही. संगणका सारखे निर्जीव वस्तू बटण दाबता क्षणी माहिती देईल ;परंतु गुरु -शिष्य या दोन सजीवात ज्ञानाची जी देवाणघेवाण ते कदापि ही शक्य नाही. मुलांवर संस्कार टाकण्याचे काम निर्जीव वस्तू नक्कीच करू शकणार नाही, त्यासाठी सजीव व्यक्तीच पाहिजे.
मनुष्याच्या जीवनात गुरुचे पहिले स्थान हे आपणास जन्म देणाऱ्या आईला दिले जाते. पृथ्वीवर जन्माला येण्यापूर्वी पासून आईचा संबंध येतो. आई आपल्या बाळाला नऊ महीने नऊ दिवस गर्भात वाढवून मोठी करते. गर्भसंस्कार सुध्दा जीवनात मोलाचे काम करतात. आई आपल्या मुलांवर वेगवेगळ्या प्रकारे संस्कार करते आणि मुलभुत ज्ञान सुध्दा देते. ऐकणे आणि बोलण्याची क्रिया आईने जर शिकविली नसती तर त्या मुलाचा काय विकास होऊ शकतो ? याची आपण कल्पना करू शकतो. समाजामध्ये आणि शाळेत पाऊल ठेवण्यापूर्वी प्रत्येक मुलांना आई ज्ञानाचे धडे देऊन तयार करते. म्हणूनच आई माझा गुरु आई कल्पतरु असे एका कवीने आपल्या कवितेत म्हटले आहे.इतर सर्व गुरुपेक्षा आई ही अत्यंत महत्वाची आद्य गुरु होय. आपले मूल चांगले संस्कारी, हुशार आणि सुजाण नागरिक म्हणून समाजात जगावे असे वाटत असेल तर प्रत्येक आईने तज्ञ गुरुच्या भूमिकेतून आपल्या मुलांना घडविण्याचा प्रयत्न करावा. महाराष्ट्र राज्याचे आणि हिंदवी राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांची आई राजमाता जिजाऊ यांनी घडविले म्हणून ते लहान वयात सुध्दा खुप मोठा पराक्रम करून दाखवू शकले. परमपूज्य सानेगुरूजी सारखा हळव्या मनाचा आणि आईच्या हृद्याचा व्यक्ती आपणास लाभला ते फक्त त्यांच्या आईमुळेच, हे त्यांच्या श्यामची आई पुस्तकातुन पानोपानी दृष्टिस पडते. अशियम्मा सारख्या मातेच्या संस्कारामुळे ए पी जे अब्दुल कलाम सारखे मिसाईल मैन देशाला राष्ट्रपती म्हणून मिळाले.आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुला वंदन तर करायचेच, शिवाय आपल्या आद्य गुरुला म्हणजे आईला ही वंदन करण्यास विसरून चालणार नाही.
- नागोराव सा येवतीकर
  मु येवती ता धर्माबाद

1 comment:

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...