Saturday, 27 March 2021

28/03/2021

जुन्या चालीरितीचे आजच्या परिस्थितीमध्ये महत्व
लहान असतांना घरातले वाडवडील मंडळी काही गोष्टी आवर्जून करायला सांगायचे त्याचे महत्व आज कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून जी काळजी घेत आहोत, ती काळजी फार पूर्वीपासून आपल्या देशात घेतल्या जात होती याची प्रचिती येते. 
बाहेरून एखादा व्यक्ती मग ते घरातील सदस्य असो वा पाहुणे घरात येत असेल तर त्याला सर्वप्रथम हातपाय धुण्यास सांगितले जाते. ग्रामीण भागात आज ही हात पाय धुण्याची जागा ही घरात प्रवेश करण्यापूर्वीच असते. घरातल्या मुलानी बाहेर खेळून आले की, आई त्यांना हातपाय धुतल्याशिवाय घरात येऊ देत नाही. त्यामागे कारण हेच असू शकते की, बाहेरील कोणते जीवजंतू घरात प्रवेशित करू नये आणि त्याचा त्रास इतरांना होऊ नये म्हणून ही काळजी घेतली जायची. 
घरात बाळंतपण झालेली असेल तर आई सर्वाना बजावून सांगत असे की, हातपाय धुतल्याशिवाय कोणीही बाळाजवळ येऊ नये. त्याचे ही कारण तसेच होते, लहानसे बाळ जीवजंतूला लवकर बळी पडतात, त्यांच्याकडे प्रतिकारशक्ती देखील खूप कमी असते. म्हणून प्रत्येक घरातली आई अशी काळजी घेत. 
कुणाच्या अंत्यविधीला जाऊन आले की, अंघोळ केल्याशिवाय घरात प्रवेश करणे त्याज्य होते. अंत्यविधी ह्या प्रक्रियामध्ये अनेक जीवजंतू आसपासच्या परिसरात वावरतात आणि अंत्यविधीमध्ये सहभागी झालेल्या सर्वाना त्याचा संपर्क होऊन घरात जीवजंतू येऊ नये म्हणून अंत्यविधी करून आल्यावर अंघोळ करण्याची प्रथा योग्य वाटते. 
त्यानंतर महिलांच्या मासिक पाळीच्या वेळी पाच दिवस सर्वांपासून वेगळे राहणे यात देखील असेच काही कारण आहे असे वाटते. आज आपण ज्या पद्धतीने विलगिकरण पद्धत पाहत आहोत ते काही अंशी येथे लागू पडत असेल असे वाटते. संसर्ग आणि संपर्कातुन प्रसार पावणारे रोगांचे फैलाव रोखण्यासाठी एकमेकांपासून दूर राहण्याशिवाय पर्याय नाही. 
जुने जाणते लोकं काही प्रथा किंवा चालीरिती पाळत असत, त्याचे शास्त्रीय कारण त्यांना कदाचित माहीत नसेल पण जीवजंतू, विषाणू, सूक्ष्मजीव घरात येऊ नये म्हणून ते फार पूर्वीपासून काळजी घेत आले आहेत. तेंव्हा आपणही साध्या साध्या बाबी काळजीपूर्वक करू या. कोरोनासारख्या विषाणूला हद्दपार करण्यासाठी नियमित हातपाय धुणे, परक्याशी संपर्क न करणे, घराबाहेर न पडणे, शिंकताना तोंडावर रुमाल धरणे, मास्कचा वापर करणे इत्यादी बाबी जागरूक नागरिक म्हणून आपण सर्वांनी पाळलेच पाहिजे.

- नासा येवतीकर

1 comment:

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...