माझे माहेर पंढरी
सकाळी रेडियोवर पं.भीमसेन जोशी यांच्या आवाजातील माझे माहेर पंढरी ,आहे भीम रे त्या तिरी हे गाणे ऐकत ऐकतच उठायचो. लहान असल्यापासून या पंढरीच्या विट्ठलाचे आकर्षण असायाचे त्याला कारण ही तसेच होते. माझे काका वारकरी संप्रदायतील होते ,त्यामुळे ते आषाढी एकादशीला पंढरीची वारी करून परत यायचे आणि येताना आम्हां लहान मुलांसाठी काही आणित असत. त्याचे आम्हाला उत्सुकता असायची. वर्षामागून वर्ष सरले आणि आम्ही मोठे झालो तसे या वारीचे आकर्षण कमी झाले. पण वारी समजू लागलो आणि वारीमध्ये जायचे असेल तर भजन करावे लागते ही अट गावातील चर्चेमधुन ऐकण्यास मिळाले. यामुळे भजन करण्याकडे वळलो .टाळ कधी हातात घेता आले नाही, मात्र हाताने टाळ वाजवायचो आणि भजनी मंडळात सामिल व्हायचो, असे शालेय जीवनात घडले. हे सर्व त्या पंढरीच्या विठोबाच्या दर्शनासाठी करायचो. शालेय जीवन संपले आणि महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर या भजनापासून दूर झालो. मात्र पंढरीचे आकर्षण कमी झाली नाही यामागे काय कारण असेल .....?
आषाढी एकादशी ही पंढरीची वारी पावासळ्याच्या तोंडावर येते. वारकरी मंडळी सहसा शेतकरी असतो आणि शेतात आपली पेरणी पूर्ण करून वारीसाठी रवाना होत असतो. कधी कधी निसर्ग नियम मोडते आणि पेरणी करायला उशीर होतो. तरी शेतकरी आपली वारी चुकवत नाहीत. या वारीत बरेच काही शिकायला मिळते. मुंगी ज्याप्रमाणे वाटचाल करतात अगदी त्याच प्रकारे वारकरी आपल्या घरातून जथ्याच्या जथ्थी निघातात आणि वारीत सामिल होतात. शिस्त ही त्यांच्या अंगात असलेली एक अत्यंत महत्वाचे गुण येथे दिसून येते. कुठल्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा नसताना ही वारकरी लोकांची स्वयंशिस्त पाहण्याजोगे असते. स्वतः तयार केलेली शिस्त असल्यामुळे ते मोडण्याचा प्रश्नच येत नाही.
या लोकांमध्ये अजुन एक महत्वाचे गुण दिसून येते ते म्हणजे इतरांना सहकार्य करणे .वारीमध्ये पायी चालत असताना अनेक समस्या निर्माण होतात पण त्याचे काहीच वाटत नाही .कारण वारीमधे लोक एकमेकांना सहकार्य करीत वाटचाल करीत असतात. त्यामुळे कोणालाही समस्या निर्माण झाली तरी त्याचे काही वाटत नाही. प्रेम करीत जा आपणास नक्कीच प्रेम मिळेल द्वेषातुन द्वेषच निर्माण होते याची प्रचिती सुद्धा या निमित्ताने येते. सासरी गेलेल्या मुलीला आषाढीच्या निमित्ताने माहेरी जाण्याचा योग येतो वर्षातील सणांची सुरुवात या सणाने होते. जशी तिला माहेराची ओढ लागलेली असते. अगदी तसेच वारकरी लोकांना पंढरीच्या वारीची ओढ लागलेली असते म्हणूनच म्हणावेसे वाटते
पाऊले चालती पंढरीची वाट
हरी ओम विठ्ठला
- नासा येवतीकर धर्माबाद
No comments:
Post a Comment