Monday, 20 November 2017

पुस्तक - परिचय

पुस्तक - परिचय

' लखलखणारी सरकारी शाळा '

जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळा म्हटले की, प्रत्येकांच्या डोळ्यासमोर एक वेगळेच चित्र उभे राहते. ज्या चित्रात त्या शाळाची, तेथील परिसराची, शिक्षकांची आणि विद्यार्थ्याच्या बाबतीतचे चित्रण भयानक दिसून येते. या शाळांची स्थिती कधीच सुधारणार नाही, अशी धारणा प्रत्येकाची बनलेली असते. या शाळांत फक्त गरिबांची मुलेच शिकतात म्हणून यास गरिबांची शाळा असे सुध्दा संबोधले जाते. ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेशिवाय दुसरा पर्याय देखील नसतो. काही श्रीमंत किंवा पैसेवाले मंडळी आपल्या पैशाच्या बळावर शेजारच्या इंग्रजी शाळेत आपल्या मुलांना पाठवितात. वास्तविक पाहता सरकारी शाळा एवढ्या वाईट नव्हते किंवा नाहीत, सध्या वर्ग एक किंवा दोन पदावर काम करणा-या अधिका-यांचे प्राथमिक शिक्षण कोठून पूर्ण झाले ? या प्रश्नांच्या उत्तरांतून कळेल की, ते सर्व जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेले आढळून येतील.
पूर्वीच्या शाळेचा इतिहास पाहता सध्याच्या सरकारी शाळा त्या मानाने खूप चांगल्या आहेत. खडू - फळा मोहिम आणि सर्व शिक्षा अभियानामूळे पडक्या घरात, ग्रामपंचायतीत किंवा झाडाखाली भरणा-या शाळा स्वत:च्या इमारतीत भरू लागल्या आज गावोगावी सर्व सोयी सुविधायुक्त शाळा आहेत. शिक्षकांना ये-जा करण्यासाठी रस्ते चांगले झाले आहेत. त्यास्तव त्या गावात त्यांना राहण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच स्वत:कडे वाहन असल्यामुळे तर ये-जा करण्याचा प्रश्नच मिटला. आज शाळेवर अध्यापन करण्यासाठी येत असलेला शिक्षक हा स्वत: हुशार असल्यामूळे स्वत:चे प्रतिबिंब विद्यार्थ्यांत पाहणार, यात आश्चर्य ते काय ? याच विचार प्रक्रियेतून आज राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा कात टाकतंय असे म्हणणे चूकीचे अन अतिशयोक्तीचे ठरणार नाही. अशीच एक ' लखलखणारी शाळा ' म्हणजे पुणे-लातूर हायवे वरील लातूर तालुक्यात करकट्टा गावापासून पाच किमी. अंतरावर असलेली माटेफळ येथे कार्यरत लेखिका आणि प्राथमिक पदवीधर उपक्रमशील शिक्षिका अनिता जावळे यांनी स्वतः च्या कार्यकर्तृत्वाने आणि सर्वाना सोबत घेऊन या जिल्हा परिषद शाळेचा संपूर्ण कायापालट कसा झाला याचा इतिहास सांगणारे हे पुस्तक लातूरच्या अरुणा प्रकाशनद्वारे विद्यार्थी दिनी प्रकाशित केले आहे. ज्यांनी हे कार्य करण्यास प्रोत्साहन दिले आणि लेखिकेच्या मनात ज्योत पेटविली त्या पंचायत समिती लातूरच्या गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी पुस्तकाला प्रस्तावना देऊन सर्वाना दिव्याचा प्रकाश दिला आहे. शिक्षक मुलांना शिकवितात म्हणजेच काय काय करतात हे ह्या पुस्तकात सांगितले असल्याचा त्यांचा उल्लेख सर्व शिक्षकांसाठी नक्कीच प्रेरीत करेल. कदाचित लेखिकेच्या संपर्कात मा. तृप्ती अंधारे मॅडम आल्या नसत्या तर लेखिका पुस्तकाच्या रुपात बाहेर येऊ शकले असते किंवा नाही याबाबत मनात शंका निर्माण होते. म्हणजेच पुस्तकाच्या निर्मिती मागे त्यांचा सिंहाचा वाटा आहे. शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक आणि सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व म्हणजे भाऊसाहेब चासकर यांनी या पुस्तकाला शुभेच्छा देताना सरकारी शाळेतील प्रयोगांचे आजवर नीटसे डॉक्यूमेंटेशन झाले नाही ती व्ह्ययला पाहिजे अशी खंत व्यक्त केली. जे की या पुस्तकांच्या निमित्ताने भविष्यात पुढे येऊ शकेल. लेखिकेने पुस्तकात एकूण तीन प्रकरण दिले ज्यातून लेखिका शाळेवर येण्यापूर्वी काय परिस्थिती होती, शाळेत लोकसहभाग कसा मिळविला आणि शाळेत उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी शाळेत कसे रमले असे थोडक्यात पण मार्मिक शब्दात मांडणी केली आहे. प्रत्येक शिक्षक नव्याने जेंव्हा शाळेवर रुजू होतो त्यावेळ च्या आठवणी नेहमी स्मरणात राहतात. तशीच काही आठवण पुस्तक वाचताना प्रत्येक शिक्षकांस होते.
राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार साहेब आणि विभागाचे शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर साहेब यांनी राज्यातील तंत्रस्नेही शिक्षकांना दिलेल्या प्रोत्साहनामूळेच आज महाराष्ट्रात डिजिटल शाळा आणि लोकसहभाग याचे राज्यात सर्वत्र डिजिटल शाळांचे वारे वाहत आहेत. संगणक युगाच्या काळात आज प्रत्येकांच्या घरी मोबाईल, लॅपटॉप आणि संगणकाचा वापर चालू झाला आहे. घरात ही वस्तू असल्यामूळे त्याचा वापर शालेय मुले सुध्दा करू लागली. जमाने के साथ चलो प्रथेनूसार येथील शिक्षक मंडळींनी सुध्दा प्रवाहात सामिल होण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलेत. त्यानुसार ‘डिजिटल शाळा’ ही संकल्पना पुढे आली. त्यासाठी लागणारा लाख-दिड लाख रूपयांपर्यंतचा निधी सरकार ऐवजी शिक्षक, गावकरी, तरुण मंडळ, ग्रामपंचायत याच्या लोकसहभागातून त्यांनी कसा जमा केला याचे अनुभव वाचन करणे खरोखरच प्रशंसनीय आहेत.
ज्ञानरचनावाद युक्त शाळा असेल तर प्रत्येक मूल शिकते. घरी राहणाऱ्या इमरान ला शाळेत कसे रममान करण्यात आले ? वडिलांच्या मृत्यूनंतर ही फिजा शाळेत कशी नियमित येऊ लागली ? मतिमंद विशाल शाळेत कसे शिकू लागला ? लेकरांच्या भावविश्वात शिक्षक सहभागी झाला तर काय चमत्कार होतो ते या पुस्तकात नक्कीच वाचायला मिळेल. लेखक मी होणार या सारख्या उपक्रमातून याच शाळेतील इयत्ता सातव्या वर्गात शिकणारा संकेत चव्हाणच्या डोक्यातून गोट्या नावाची कथा बाहेर पडते आणि पुस्तक रूपाने वाचकासमोर ठेवली जाते. यात लेखिकेचे अपार मेहनतीतून मिळालेले खुप मोठे यश दडलेले आहे.
इंग्रजी शाळेला लाजवेल अश्या सरकारी शाळा पहायला मिळतात. पूर्वीसारखा शिक्षक आज नक्कीच नाही. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर मोबाईल, टॅब, लेपटॉप आणि संगणकाचा वापर करीत मुलांना गुणवंत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. गरज आहे लोकांनी या सरकारी शाळाकडे चांगल्या दृष्टीने पाहण्याची. सरकारी शाळेतील शिक्षकावर विश्वास ठेवून, त्यांना सर्वतोपरी मदत करण्याची, नक्कीच ते चांगले करून दाखवू शकतात. बहुतांश गावात लोकांची मदत शाळेला मिळत नाही, शाळेला भरपूर निधी येतो तेंव्हा या शाळेला आम्ही का मदत करायची ? अशी विचार प्रणाली गावातील लोकांची असते म्हणून त्या गावाची शाळा नावारूपास येत नाही. शीतावरून भाताची परीक्षा न करता आपल्या गावातील शाळांचे भविष्य आपणच घडवावे. तालुक्यात, जिल्हयात माटेफळ सारख्या अनेक शाळा आहेत ज्याचा कायापालट शिक्षकांनी आणि गावातील लोकांनी मिळून केला आहे. आपली एक रुपयांची मदत देखील शाळेला लाखमोलाचे काम करून जाते. गावाला शाळेचा आधार आणि शाळेला गावाचा आधार, शाळा आपली आहे ही संकल्पना तयार होण्यासाठी शाळेला थोडा वेळ द्या, शिक्षकाची समस्या समजून घ्या, त्यांना प्रोत्साहित करा, त्यांना गावकरी मंडळीच्या आधाराची खरी गरज असते. या सर्व बाबीची जाणीव लेखिका अनिता जावळे-वाघमारे यांनी ' लखलखणारी शाळा ' या पुस्तकातून करून दिली आहे. प्रत्येक शिक्षकां नी हे पुस्तक वाचायलाच हवे एवढे च नाही तर एक वेळ या शाळेला प्रत्यक्षात भेट ही देण्याचा प्रयत्न करावा. लेखिका अनिता जावळे-वाघमारे यांच्याशी 9545050292 या मोबाईल क्रमांकावर आणि anitajawale1977@gmail.com या ई मेल आय डी वर तसेच anitajavle.blogspot.com या ब्लॉग वर संपर्क करता येईल. माटेफळ शाळेच्या सर्व शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना पुढील कार्यासाठी मनापासून शुभेच्छा

- नागोराव सा. येवतीकर,
प्राथमिक शिक्षक
जि. प. प्रा. शाळा चिरली
ता. बिलोली जि. नांदेड
9423625769

1 comment:

  1. धन्यवाद सर ..माझ्या या छोटा प्रयत्न आपणास भावला हृदयातून आभारी आहे ..ना.सा .सर

    ReplyDelete

मतदान जनजागृती ( Voting Awarness )

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जनजागृती चला मतदान करू लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.  चला मतदान करू .......! ...