Tuesday 27 December 2016

महिलांचे उज्ज्वला भविष्य

महिलांचे उज्ज्वला भविष्य

गरिबाच्या स्वयंपाकघरात नि:शुल्क एलपीजी कनेक्शन उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत महाराष्ट्रातील ४.१५ लाख कुटुंबीयांची स्वयंपाकघरे धूररहित झाली आहेत अशी एक बातमी नुकतेच वाचण्यात आली आणि आनंद झाला. गरीबांच्या घरी चूल कशी पेटते आणि साधा चहा जरी करायचे म्हटले तर किती त्रास सोसावा लागतो हे त्यांच्या घरी गेल्यावरच कळते. त्याशिवाय कळत नाही. त्यामुळे या गरीबांच्या घरात सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळाच चूल पेटते. एकदा चूल पेटले की सारा स्वयंपाक करूनच बाजूला होतात. कारण वारंवार चूल पेटविणे अशक्य असते. या चूलीचा त्रास सर्वाना होतो. स्वयंपाक करणाऱ्या महिलांना तर होतोच शिवाय घरात सर्वत्र धूर पसरल्यामुळे त्याचा त्रास घरातील इतर मंडळीला देखील होतो. त्यातल्या त्यात सरपण जर ओले असेल तर सांगता सोय नाही. पावसळ्याच्या दिवसात चूल पेटता पेटत नाही. चूलीत फुंकुन फुंकुन जीव जाण्याची वेळ येते. पण जाळ काही होत नाही. यामुळे या दिवसात प्रत्येक महिलेला चुलीचा त्रास नक्की जाणवतो आणि यापेक्षा धूर न होणारी चूल मिळाली तर किती बरे होईल अशी अपेक्षा प्रत्येकाना होते. एलपीजी गॅस हे एक असे चूल आहे ज्याठिकाणी अजिबात धूर होत नाही आणि आटोपशीर स्वयंपाक होऊ शकतो. पण गरीब घरातील लोकांना हे विकत घेणे फारच खर्चिक आहे असे वाटते. पण सरपण किंवा इतर ईंधनापेक्षा एलपीजी गॅस सहज उपलब्ध होणारे आणि स्वयंपाकाचा कसलाही त्रास होऊ न देणारे इंधन आहे याची जाणीव या लोकांना नसल्यामुळे ते या बाबीपासून कोसो दूर होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार मधील पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या पुढाकाराने एक धडक कार्यक्रम हाती घेतला असून देशभरातील दारिद्ररेषेखाली जीवन जगणाऱ्या ५ कोटी कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्रातील १४ लाख गरीब कुटुंबांनी यासाठी अर्ज केले असून त्यापैकी १०.८६ लाख अर्ज मंजूर करण्यात आले. त्यात ४ लाख १५ हजार कुटुंबाकडे गॅस कनेक्शन त्यांच्या घरी पोहोचवून देण्यात आले असल्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली. आकडेवारी कडे लक्ष दिल्यास असे दिसून येते की पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक अर्ज (७८,७५७) प्राप्त झाले होते , त्याखालोखाल सोलापूर (७६,७४४), नांदेड (७२,८५९), नाशिक (७१,३७३) आणि अहमदनगर (७०,०५२) या जिल्ह्यातील लोकांनी गॅस कनेक्शन मिळण्यासाठी अर्ज केले. मात्र  अर्जाच्या तुलनेत विचार केले असता लातूर जिल्ह्यात सर्वाधिक गॅस कनेक्शन (२९,४४३) देण्यात आले. त्याच्या नंतर सांगली (१७,७८७), अहमदनगर (१७,४६६), धुळे (१७,६३२) आणि पुणे (१७४६६) या जिल्ह्यातील लोकांना गॅस कनेक्शन देण्यात आले. अर्ज मंजूर झालेल्या अर्जदारास काही महिन्यातच कनेक्शन देण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. घरगुती गॅस कनेक्शनमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. यावर्षी आॅक्टोबरपर्यंत ८१ टक्के कुटुंबाकडे घरगुती गॅस कनेक्शन आहे. एकूण २.३८ कोटी कुटुंबांपैकी २.०९ कोटी कुटंब गॅसवर स्वयंपाक करतात. संपूर्ण देशात जिल्हास्तरावर ६०० नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. अधिकाऱ्यानुसार ते फिल्ड काम करतात. ते अर्जदार व गॅस वितरणादरम्यान समन्वयाचे काम करताना योजनेच्या अन्य पैलूंवर बारकाईने लक्ष ठेवत आहेत. म्हणून त्यांना या योजनेचा कणा समजला जात आहे. ज्यामुळे समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत ही योजना पोहोचेल असा विश्वास वाटतो आहे. मात्र तरी ही यात काही अडथळे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. गॅसचा वापर वाढू लागल्यामुळे त्याचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. गॅस चे दर वाढतील ज्याचा फटका मध्यमवर्गीय लोकांना बसू शकतो. गरीब लोकांचे जीवन परावलंबी होऊन जाते. लोक आळशी होतात. कारण आज शेतातून येता येता सरपण आणणात. शेणाचा वापर करतात, वाळलेले लाकुड किंवा इतर काही साधनाचा वापर करून स्वयंपाक केल्या जात असे ते बंद पडेल असे वाटते. हिवाळ्याच्या दिवसात चूली जवळ बसून जेवण करण्याची मजा काही औरच. त्याची लय या गॅसच्या स्वयंपाकला येणार नाही हे ही सत्य आहेच. कष्टकरी महिलेचे प्रतिक म्हणजे चूलीवर केलेला स्वयंपाक होय. या नैसर्गिक चूलीवर स्वयंपाक केलेल्या अन्नाची चव इतर कोणत्याही इंधनावर केलेल्या स्वयंपाकमध्ये येणार नाही हे निर्विवाद सत्य आहे.

- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद
  9423625769

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...