Tuesday 13 September 2022

महात्मा गांधी ( Mahatma Gandhi )

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता - महात्मा गांधी


महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामतील प्रमुख नेते आणि तत्वज्ञ होते. त्यांनी देशहितासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला. स्वातंत्र्य चळवळीतील ते असे नेते होते ज्यांनी अहिंसेचा मार्ग अवलंबून ब्रिटीश राज्यकर्त्यांना सळो की पळो करून सोडले होते. 
महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणूनही संबोधले जाते. मार्टिन ल्यूथर किंग आणि नेल्सन मंडेला यांच्यावरही त्यांच्या सत्य आणि अहिंसेच्या विचारसरणीचा खूप प्रभाव होता. 
महात्मा गांधींनी आफ्रिकेत सलग २१ वर्षे अन्याय आणि वर्णद्वेषाविरुद्ध अहिंसक लढा दिला, ज्याची किंमत केवळ आफ्रिकेतच नव्हे तर भारतातही ब्रिटिशांना भोगावी लागली. रवींद्रनाथ टागोर यांनी बापूना सर्वप्रथम “महात्मा” ही उपाधी दिली होती. तर सन १९४४ साली सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधी यांना “राष्ट्रपिता” म्हणून पहिल्यांदा संबोधले होते.

महात्मा गांधी यांचे बालपण आणि प्रारंभिक जीवन 
मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी पश्चिम भारतातील सध्याच्या गुजरातमधील पोरबंदर शहरामध्ये झाला. त्यांचे वडील करमचंद गांधी हे सनातन धर्मातील पानसारी जातीचे होते. ब्रिटिश राजवटीत ते काठियावाडच्या एका छोट्या संस्थानाचे (पोरबंदर) दिवाण होते. आई पुतळीबाई या धार्मिक स्त्री होत्या.  त्या सतत उपवास करीत असत. त्यांनी महात्मा गांधी यांच्यावर बालवयात केलेल्या धार्मिक संस्कारांचा प्रभाव त्यांच्या पुढील जीवनात दिसून येतो. मोहनदास यांच्या मनावर त्यांच्या बालपणीच अहिंसा, शाकाहार, सहिष्णुता, व प्राणिमात्रांवर दया करणे या सारखे अनेक संस्कार त्याच्या आईकडून गिरवण्यात आले होते.

गांधीजी यांच्या लहानपणी त्यांच्या आई पुतळाबाई त्यांना जैन संकल्प आणि त्यांच्या प्रथांबद्दल माहिती सांगत असत. यामुळे लहानपणापासून त्यांना उपवास करण्याची ओढ लागली होती. जैन धर्मातील संकल्प आणि प्रथांचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव पडला.

महात्मा गांधी स्वत: कबूल करतात की, पौराणिक कथा श्रावणबाळ आणि राजा हरीश्चंद्र या दोन कथांचा त्यांच्या जीवनावर खूप प्रभाव पडला. महात्मा गांधी यांचा विवाह मे १८८३ मध्ये वयाच्या १३व्या वर्षी कस्तुरबा माखनजी यांच्याशी झाला. महात्मा गांधीजी त्याांना बा असे म्हणत. त्यांना एकूण चार मुले होती.


महात्मा गांधी यांनी शिक्षणा करिता केलेला प्रवास –
महात्मा गांधी यांची लहानपणापासून डॉक्टर बनण्याची इच्छा होती, परंतु त्यांच्या वडिलांची त्यांना सरकारी नोकरीत दाखल करण्याची इच्छा होती. ई.स. १९८८ साली आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते उच्च शिक्षणाकरिता इंग्लंडला गेले. उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेल्यानंतर त्यांनी इनर टेंपल या गावी राहून भारतीय कायदा आणि न्यायशास्त्राचा अभ्यास केला.
लंडन विद्यापीठामधून आपले वकिलीचे शिक्षण पूर्ण केले.  इंग्लंडमध्ये गेल्यानंतर त्यांना तेथील रीतीरिवाज समजून घेण्यात त्यांचा काही वेळ गेला. इंग्लंडमध्ये सर्व मांसाहारी पदार्थ मिळत असल्याने, त्यांना शाकाहारी पदार्थ मिळेपर्यंत उपाशी राहावं लागतं असे. आईला दिलेल्या वचनाशी कटीबद्ध असल्याने त्यांनी त्या ठिकाणी मांसाहार,मद्यपान करणे वर्ज्य केले. त्याठिकाणी त्यांनी शाकाहारी माणसे शोधली आणि त्यांची एक संघटना स्थापन केली आणि स्वत: ते त्या संघटनेचे अध्यक्ष बनले.
गांधीजी लंडन मध्ये ज्या शाकाहारी लोकांना भेटले होते, त्यातील काही लोक ही ‘थीयोसोफिकल सोसायटी’ चे सदस्य देखील होते. गांधीजीनी त्याठिकाणी राहून तेथील चालीरीती शिकण्याचा प्रयत्न केला. इंग्लंड मध्ये वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर बॅरिस्टर बनून सन १८९१ साली ते भारतात आले व येथे आल्यानंतर ते वकिली करू लागले. ज्यावेळी त्यांनी वकिली करण्यास सुरुवात केली होती, त्यावेळी त्यांना न्यायादिशा समोर एखादा मुद्दा मांडणे देखील अजिबात जमत नव्हतं. आपल्या लाजाळू वृत्तीच्या स्वभावामुळे ते कोर्टात फार बोलत नसत.


महात्मा गांधी यांचा दक्षिण आफ्रिकेतील प्रवास (१८९३-१९१४) –

सन १८९३ साली वयाच्या २४ व्या वर्षी महात्मा गांधी हे भारतीय व्यावसायिकांचे न्यायालयीन सल्लागार म्हणून दक्षिण आफ्रिकेला गेले होते. दक्षिण आफ्रिका ही एक इंग्रजांची वसाहत होती. त्याठिकाणी त्यांनी आपल्या आयुष्याची २१ वर्षे घालविली. त्याठिकाणी गांधीनी आपले राजकीय दृष्टीकोन, नैतिक आणि राजकीय नेतृत्व कौशल्ययाचे बारकाईने धडे गिरविले.
महात्मा गांधी यांना दक्षिण आफ्रिकेमध्ये राहत असतांना समाजात अस्तित्वात असलेल्या विकलांगपणाची जाणीव झाली. भारतीय संस्कृती आणि धर्म यामध्ये असणाऱ्या गुंतागुंतीच्या समस्येपासून आपण भरपूर दूर आहोत याची जाणीव त्यांना झाल्यानंतर त्यांनी तेथे राहून भारतीय लोकांचे प्रश्न सोडविण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेत उद्योग, व्यवसाय आणि इतर कामधंद्यासाठी त्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या भारतीय लोकांचे प्रश्न समजून घेवून त्यांचे निराकरण करण्याचा गांधीनी प्रयत्न केला. त्यांची अशी धारणा होती की, असं केल्याने आपण भारत देशाला समजून  घेऊ.
दक्षिण आफ्रिकेत गांधीजींना गंभीरपणे वांशिक वर्ण भेदाचा सामना करावा लागला. त्याठिकाणी भारतीय लोकांना देण्यात येणारी अपमान जनक वागणूक त्यांनी अनुभवली.
एके दिवशी महात्मा गांधी रेल्वेचा प्रवास करीत असतांना त्यांच्याजवळ पहिल्या वर्गाचे तिकीट असतांना सुद्धा त्यांना ‘पीटर मारित्झबर्ग’ येथील रेल्वे स्थानकावर एका रेल्वे अधिकाऱ्याने खाली उतरवून तिसऱ्या वर्गाच्या डब्यात बसण्यास सांगितले.
गांधीजीनी त्यांना नकार देताच त्या अधिकाऱ्याने गांधीजींना गाडी बाहेर ढकलून दिले गांधीजी खाली पडले. त्या दिवशी त्यांनी संपूर्ण रात्र फलाटावर काढली होती.
बापूंच्या मनात आलं असत तर ते त्या इंग्रज अधिकाऱ्याला धडा शिकवू शकले असते परंतु, सुडाच्या भावनेतून कोणाला शिक्षा करणे असा त्यांचा कधीच हेतू नव्हता. गांधी अहिंसावादी असल्याने केवळ अन्यायकारक व्यवस्था बदलणे हाच त्यांचा मुख्य उद्देश होता. दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधीना अनेक कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. शिवाय त्यांना त्याठिकाणी समाजात असणाऱ्या समस्याचा देखील अनुभव आला. उदाहरणार्थ, प्रवाशांना वाट काढून न दिल्यामुळे महात्मा गांधी यांना मार देण्यात आला होता.
हॉटेल मध्ये वास्तव्यास असतांना त्यांना बाहेर काढून देण्यात आलं होत. याशिवाय, महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतील ‘डर्बन’ या शहरात वकिली करीत असतांना त्यांना न्यायाधीशांनी डोक्यावरील टोपी काढून ठेवण्याचा आदेश दिला होता. परंतु, त्यांनी न्यायाधीशाचा आदेश अमान्य केला. अश्या प्रकारचे अनेक अनुभव घेतल्यानंतर गांधीजीनी एक सामाजिक नागरिक म्हणून ब्रिटीश राज्यातील आपल्या लोकांच्या समस्या विषयी प्रश्न मांडण्यास सुरुवात केली.
भारतीय लोकांवर होणारे अत्याचार आणि आपलं सामाजिक स्थान निर्माण करण्याचा विचार त्यांच्या मनात येऊ लागला. सन १९०६ साली ब्रिटीश सरकारने दक्षिण आफ्रिकेत वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांचा मतदानाचा हक्क काढून घेणारा कायदा लागू केला होता. त्यावेळी गांधीजीनी आफ्रिकेतील भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी आपलं तेथील मुक्काम वाढवलं, आणि भारतीय नागरिकांना राजकीय व सामाजिक हक्कांसाठी संघर्ष करण्याची प्रेरणा दिली.
तसेच, दक्षिण आफ्रिकेच्या ब्रिटीश सरकारकडे भारतीय लोकांच्या नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला. यावेळेस त्यांनी आपल्या अहिंसेच्या सत्याग्रहाचा पहिला प्रयोग केला होता. सन १८९४ साली त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील वेगवेगळ्या समाजात विखरलेल्या भारतीय नागरिकांना एकत्रित करून ‘नाताळ भारतीय कॉन्ग्रेस ‘ नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला.

गांधीजी भारतात परतले 
इ.स. १९१५ मध्ये गांधीजी कायम स्वरूपी भारतात परत आले. एक प्रमुख भारतीय राष्ट्रवादी, थिओरिस्ट आणि संघटक अशी त्यांची आंतरराष्ट्रीय ख्याती होती. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अनेक संमेलनांतून बोलले. खऱ्या अर्थी भारताचे राजकारण व समस्या यांचा परिचय त्यांना गोपाळ कृष्ण गोखले यांनी करून दिला.
गोपाळ कृष्ण गोखले हे तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रमुख नेते होते. गोखले त्यांच्या संयम, संतुलन आणि व्यवस्थेच्या आतमध्ये राहून काम करण्याच्या आग्रहाबद्दल ओळखले जात. ते गांधीजींचे राजकीय गुरू म्हणून ओळखले जातात.
गांधीनी गोखल्यांचा ब्रिटिशांच्या व्हीगीश परंपरांवर आधारित उदार दृष्टिकोन अनुसरला, आणि तो पूर्णपणे भारतीय दिसण्यासाठी बदलला. १९२० मध्ये काँग्रेस नेते बाळ गंगाधर टिळक यांच्या निधनानंतर गांधीजी काँग्रेसचे प्रमुख नेते बनले.

महात्मा गांधींचे कार्य
गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले आणि नंतर आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी पावले उचलली. गांधीजींचे संपूर्ण जीवन एका चळवळीसारखे होते. गांधीजींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक चळवळी सुरू केल्या.
गांधीनी काही चळवळी संपूर्ण देशात चालवल्या आणि त्या खूप यशस्वी झाल्य. या मुळे संपूर्ण देशात लोक त्यांना ओळखू लागले. गांधीजींनी चालवलेल्या चळवळी थोडक्यात जाणून घेऊयात.


चंपारण्य सत्याग्रह (१९१७)
बिहारमधील चंपारण्य येथील युरोपीय निळीच्या मळेवाल्यांकडून तीन काथिया पद्धतीमार्फत गरीब शेतकऱ्यांवर अत्याचार होत असे. चंपारण, बिहारमधील जमीनदार, जे प्रामुख्याने ब्रिटिश होते, स्थानिक शेतकऱ्यांना सक्तीने नीळ उत्पादन करावयास लावत असत. त्यांना योग्य मोबदला पण मिळत नसे. यामुळे ते सतत गरिबीत राहत. शेतकऱ्यांची गावे अत्यंत घाणेरडी आणि आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठेवली जात. यावर भर म्हणजे तेथील दुष्काळ, पण इंग्रजानी तरीही अनेक जाचक कर लादले होते आणि ते वाढतच होते.
यावर गांधीजींनी अहिंसक चळवळ सुरू केली. हा सत्याग्रह ब्रिटिश जमीनदाराच्या विरोधात सुरू करण्यात आला होता. गांधीजी यशस्वी झाले आणि इंग्रजांना त्यांचे पालन करावे लागले. अहिंसा व असहकार चळवळीतला गांधीजींच्या जीवनातील हा पहिला विजय होता.

खेडा सत्याग्रह
सन १९१८ साली गुजरात मधील खेडा या गावी सतत पडलेल्या पावसामुळे दुष्काळग्रस्त झालं  होत. तेथील पिकांची अवस्था खूपच वाईट होती. अशी परिस्थिती असतांना सुद्धा इंग्रज सरकार  शेतकऱ्यांकडून सक्तीने शेतसारा वासूल करीत असतं. परिणामी तेथिल शेतकऱ्यांची परिस्थिती खूप वाईट बनली. महात्मा गांधी यांनी त्याठिकाणी एका आश्रम उभारला आणि आपल्या लहान मोठ्या सर्व अनुयायांना एकत्रित केलं.

गावातील सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना आपल्या विश्वासात घेतले. शेतकऱ्यांना गांधीजीनी शेतसारा न भरण्याचा आदेश दिला, तेव्हा  सन १९१८ साली शेतकऱ्यांनी शेतसारा बंदीची चळवळ सुरु केली आणि महात्मा गांधी यांना त्या चळवळीचे अध्यक्ष बनवले. गांधीजींच्या नेतृत्वाखाली सरदार पटेल यांनी शेतकऱ्यांच्या समस्येसंबंधी इंग्रज सरकारसोबत चर्चा केली. ब्रिटीश सरकारने त्यांची मागणी मान्य करून सर्व कैद्यांची सुटका केली. अश्या प्रकारे महात्मा गांधी यांची प्रसिद्धी संपूर्ण जगभर पसरली.
अहमदाबाद येथील कामगार लढा –
सन १९१४ साली झालेल्या पहिल्या युद्धानंतर देशात खूप महागाई वाढली होती. अहमदाबाद येथील कामगारांनी वेतनवाढी करीता गिरणी मालकांकडे विनंती केली. परंतु, त्याची मागणी मान्य करण्यात आली नाही.
गांधीजीनी त्या ठिकाणी स्वत: जावून संप पुकारला व उपोषणाला बसले. कामगार देखील गांधीजींसोबत उपोषणाला बसले. गांधीजींच्या अहिंसावादी आंदोलना समोर गिरणी मालकांनी हार पत्करली व कामगारांना वेतनवाढ दिली.


रौलट अक्ट (१९१९)
भारतातील राष्ट्रीय आंदोलन व क्रांतिकारी चळवळीला प्रतिबंध घालण्याकरिता ब्रिटिश शासनाला नवीन कायद्याची आवश्यकता भासत होती. या कायद्याचा अहवाल तयार करण्याकरिता शासनाने सर सिडने रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली.
या समितीने तयार केलेला अहवाल एप्रिल १९१८ मध्ये अनारकिकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राइम अॅक्ट पास केला. या कायद्यातील तरतुदींनुसार कोणत्याही व्यक्तीला विनाचौकशी अटक करण्याचा अधिकार शासनास मिळणार होता. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची तीन न्यायधीशांच्या चौकशी मंडळापुढे चौकशी करून शिक्षा करण्याचा अधिकार शासनास मिळाला होता.
गांधीजींनी १९१९ मध्ये रौलेट कायद्याच्या निषेधार्थ सभा घेतली. ६ एप्रिल १९१९ हा संपूर्ण भारतभर सत्याग्रहाचा दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. या दिवशी हरताळ, उपवास, निषेध मिरवणुकी आणि निषेध सभा असा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
६ एप्रिल १९१९ रोजी हा सत्याग्रहाचा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. हा काँग्रेस मार्फत पाळण्यात आलेला अखिल भारतीय बंद होता.


 जालियनवाला बाग हत्याकांड (१९१९)
सरकारने स्थानिक नेते डॉ. सफुद्दीन किचलू व सत्यपाल या दोन नेत्यांना अटक केल्यामुळे पंजाबमधील अमृतसर शहरात एक निषेध सभा बोलावण्यात आली. लोकांमधील असंतोष लक्षात घेऊन सरकारने जमावबंदी व सभाबंदी आदेश लागू केला, परंतु सरकारी आदेशाला न जुमानता स्थानिक लोकांनी १३ एप्रिल १९१९ रोजी जालियनवाला बागेत निषेध सभा बोलाविली.
या सभेला मोठय़ा संख्येने लोक जमले. सरकारच्या आदेशाविरूद्ध इतक्या मोठय़ा संख्येने लोक एकत्र आल्याचे पाहिल्यावर तेथे बंदोबस्तासाठी उपस्थित असलेला जनरल डायर हा इंग्रज अधिकारी संतप्त झाला. त्याने नि:शस्त्र लोकांना चहूबाजूंनी घेरले आणि जमावाला कोणतीही पूर्वसूचना न देता गोळीबार करण्याचा आदेश आपल्या सैनिकांना दिला.
या घटनेच्या निषेधार्थ गांधीजींनी कैसर-ए-हिंद या पदवीचा त्याग केला.  


खिलाफत चळवळ (१९२०)
जगभराचे मुस्लिम लोक तुर्कस्थानच्या खलिफाला आपला धर्मगुरु मानत असत. भारतीय मुस्लिम जनतेची निष्ठा तुर्कस्थानच्या खलिफासोबत निगडित होती. तुर्कस्थानच्या खलिफाने पहिल्या महायुद्धाच्या काळात जर्मनीच्या बाजूने युद्धात प्रवेश केला.
युद्धाच्या समाप्ती नंतर तुर्कस्थानच्या खलिफाच्या सत्तेला कोणताही धोका पोहोचणार नाही, असे आश्वासन ब्रिटिश शासनाने भारतातील मुस्लिम नेत्यांना दिले होते. या आश्वासनास प्रमाण मानून भारतीय मुस्लिमांनी ब्रिटिशांनी युद्धात मदत केली होती. युद्ध समाप्ती नंतर ब्रिटिश शासन तुर्कस्थानची सत्ता नष्ट करून खलिफाची गादी नष्ट करणार अशी बातमी सर्वत्र पसरली होती.
तेव्हा भारतीय मुस्लिम नेत्यांनी तुर्कस्थानच्या खलिफाची सत्ता टिकविण्याकरिता व धर्मक्षेत्राचे रक्षण करण्याकरिता ब्रिटिश शासनाविरूद्ध चळवळ करण्याचा निर्णय घेतला. ही चळवळ खिलाफत चळवळ म्हणून ओळखली जाते.
हिंदू- मुस्लीम यांच्या ऐक्यावर आधारीत  राष्ट्रीय चळवळ सुरु केली तर, इंग्रज सरकार नक्कीच वठणीवर येईल अशी गांधीजीना वाटू लागले. त्यामुळे खिलाफतचा प्रश्न सोडविण्याकरिता राष्ट्रीय काँग्रेसमधील महात्मा गांधीजी, लोकमान्य टिळक, डॉ. राजेंद्र प्रसाद आदी नेत्यांनी या चळवळीस पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. या चळवळीची विशेषता म्हणजे या चळवळीत  हिंदू-मुस्लीम यांचे ऐक्य दिसून आलं होत.


असहकार चळवळ (१९२०)
महात्मा गांधी हे अहिंसेचे पुजारी असल्याने इंग्रजांविरुद्ध त्यांनी असहकार, अहिंसा आणि शांततामय विरोध हे तीन शास्त्र वापरले. सन १९१९ साली पंजाबमधील जालियानवाला बाग हत्याकांड प्रकरणामुळे देशातील लोकांच्या मनात इंग्रज सरकार बद्दल क्रोधाचा भडका उडाला. देशात जागोजागी मोर्चे निघू लगले, ते मोर्चे दडपून काढण्यासाठी इंग्रज सरकारला खूप दमछाक करावी लागली.
महात्मा गांधी यांनी जालियानवाला बाग हत्याकांडा प्रकरणी इंग्रज सरकारचा निषेध केला. सहकार चळवळ सुरु करण्यामागे महात्मा गांधी यांचा असा हेतू होता की, भारतातील ब्रिटीशांचे राज्य हे केवळ भारतातील लोकांच्या सहकार्यावर अबलंबून आहे. जर भारतीयांनी त्यांना विरोध केला तर त्यांचे शासन पूर्णपणे ढासळून जाईल. या हेतूने त्यांनी जनतेला आपल्या असहकार आंदोलनात सहभागी होण्यास सांगितले.
सन १९२० साली लोकमान्य टिळकांच्या मृत्यू नंतर राष्ट्रीय सभेचे सभेचे संपूर्ण नेतृत्व महात्मा गांधी यांच्याकडे आले. सन १९२० साली नागपुर येथे झालेल्या राष्ट्रीय सभेत चित्तरंजन दास यांनी मांडलेल्या असहकार चळवळीच्या ठरवला मान्यता सभेच्या अध्यक्ष पदी विराजमान असणारे चक्रवर्ती विजयराघवाचार्य यांनी दिली. चळवळीचे नेतृत्व महात्मा गांधी यांच्याकडे देण्यात आलं होत.
असहकार चळवळी नुसार, देशातील नागरिकांनी शासकीय कार्यालये, न्यायालये, परदेशी वस्तू, सरकारी शाळा, महाविद्यालये यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता.असे केल्याने इंग्रज सरकार आपल्याला स्वातंत्र्य देण्याबाबत काही पाऊले उचलतील असे राष्ट्रीय सभेच्या सदस्यांना वाटत होत. परंतु, गांधीजींचे हे आंदोलन फार काळ टिकू शकले नाही.


चौरीचौरा दुर्घटना (उत्तर प्रदेश, १९२२)
डिसेंबर १९२१ मध्ये अहमदाबाद येथे राष्ट्रसभेचे अधिवेशन झाले. हजारो कार्यकर्ते तुरूंगात असतानाही असहकार चळवळ जोमाने चालू ठेवण्याचा निर्णय या अधिवेशनात घेण्यात आला.५ फेब्रुवारी १९२२ साली उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपुर जिल्हाच्या चौरीचौरा भागात एका शांततापूर्ण चाललेल्या मिरवणुकीवर पोलीसांनी गोळीबार केला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारामुळे असहकार चळवळीत सहभागी नागरिक खूप चिडले, त्यांनी प्रतिउत्तर म्हणून तेथील एक पोलीस चौकी जाळून टाकली. या जाळपोळीत एक पोलीस अधिकारी व २२ पोलीस ठार झाले.
या घटनेची माहिती गांधीजीना समजली तेव्हा त्यांना खुप वाईट वाटलं, ते एकदम अस्वस्थ झाले. त्यांना वाटलं लोकांनी असे करायला नाही पाहिजे होत. अहिंसेच्या मार्गावर चालतांना असे प्रसंग उद्भवतातच.
गांधीना वाटू लागलं की, आपण असहकार आंदोलन सुरु करून लोकांना अहिंसेच्या मार्गावर चालायला लावलं परंतु, अहिंसेच्या मार्गावर चालणे इतक सोप नाही.
तसे करणे सर्वांनाच शक्य होणार नाही, म्हणून महात्मा गांधी यांनी आपली असहकार चळवळ मागे घेतली. चौरीचौरा घटना प्रकरणी महात्मा गांधी यांना मार्च १९२२ साली कैद करण्यात आलं.
तसेच, गांधीजीनी सुरु केलेल्या “यंग इंडिया” नावाच्या साप्ताहिक पत्रिकेत त्यांनी स्वत: तीन राष्ट्रद्रोही लेख लिहिली आहेत अश्या प्रकारचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला.
त्यामुळे त्यांना सहा महिने तुरुंगवास भोगावा लागला होता. गांधीजी कैदेत असतांना त्यांची तब्येत खराब झाली, त्या कारणास्तव त्यांची सन १९२४ सली तुरुंगातून सुटका करण्यात आली.


तुरुंगातून सुटका झाल्यानंतर गांधींचे कार्य
सन १९२४ साली आजारामुळे महात्मा गांधी यांची सुटका झाल्यानंतर गांधीजी सन १९२८ सालापर्यंत राजकारणापासून दूर राहिले. या काळादरम्यान त्यांनी स्वराज्य पक्षातील सदस्य आणि भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेस मधील सदस्य यांच्यातील मतभेद दूर करण्यावर भर दिला. तसचं, समाजातील अस्पृश्यता, दारू समस्या आणि देशातील गरिबी कमी करण्यासाठी त्यांनी  आपले प्रयत्न सुरु ठेवले. सन १९२८ साली महात्मा गांधी राजकरणात पुन्हा सक्रीय झाले.
महात्मा गांधी राजकारणापासून दूर असतांना सन १९२७ साली ब्रिटीश सरकारने संविधानात सुधारणा करण्यासठी ‘सर जॉन सायमन’ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती भारतात पाठवली होती. ब्रिटीश शासनाच्या या समितीत एकही भारतीय नागरिक नसल्याने भारतीय पक्षांनी त्या कमिशनवर बहिष्कार टाकला.
सन १९२८ साली कलकत्ता मध्ये झालेल्या भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेस च्या सभेत एक ठराव पास करण्यात आला. या ठरावानुसार, ब्रिटीश सरकारने भारताला सार्वभौम देशाचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली. तसेच, सरकारने राष्ट्रीय सभेची ही मागणी मान्य न केल्यास, देशाच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही पुन्हा असहकार चळवळ सुरु करू असा संदेश सरकारला देण्यात आला

मिठाचा सत्याग्रह (१९३०) | दांडी यात्रा

महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यादरम्यान, झालेला मिठाचा सत्याग्रह हा, भारतातील तत्कालीन ब्रिटिश शासनाने मिठासारख्या जीवनावश्यक गोष्टीवर लावलेल्या कराच्या विरोधात इ.स. १९३० साली घडलेला सत्याग्रह होता. यालाच दांडी सत्याग्रह असेही म्हणतात.

१४ फेब्रुवारी १९३० रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जनतेला गांधीजींच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग करण्याचा आदेश दिला. मिठाचा सत्याग्रह याच चळवळीचा भाग होता.

मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात दांडी यात्रेने झाली. ही दांडी यात्रा (मोर्चा) साबरमती आश्रमापासून १२ मार्च १९३० रोजी सुरू झाली. गांधीजींच्या बरोबर त्यांचे ७८ निवडक अनुयायी होते. त्यात सरोजिनी नायडू, इला भट यांचा समावेश होता. यात्रा पुढे निघाली, तसतशी सहभागी लोकांची गर्दी वाढतच गेली. ही यात्रा २४ दिवस चालली आणि तिच्यातील लोक ३८५ कि.मी. पर्यंत पायी चालले. यात्रा दांडी येथे समुद्रकिनारी ६ एप्रिल १९३०ला पोहोचली. त्या दिवशी जेव्हा सकाळी साडे सहा वाजता गांधीजींनी चिमूटभर मीठ उचलून कायदेभंग केला, तेव्हा कायदेभंगाच्या मोठ्या प्रमाणावरील चळवळीची ती सुरुवातच ठरली. दांडीनंतर गांधीजी मीठ बनवत आणि सभांमध्ये भाषणे करत ते समुद्र किनाऱ्याने दक्षिणेकडे जात राहिले. दांडीच्या दक्षिणेला २५ मैलांवर असलेल्या धारासणा या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह करण्याचे काँग्रेस पक्षाने ठरवले. पण त्यापूर्वीच ४-५ मे १९३० दरम्यानच्या रात्री गांधीजींना अटक करण्यात आली.दांडी यात्रा आणि धारासणा येथील सत्याग्रह यामुळे सर्व जगाचे लक्ष भारतीय स्वातंत्र्यलढ्याकडे वेधले गेले. मिठाचा सत्याग्रह म्हणजे असहकार चळवळीचा एक भाग होता. प्रत्यक्षात मिठावरचा कर हे केवळ निमित्त होते. गांधींना त्या मिषाने लोकसंघटन आणि लोकजागृती साधायची होती. मिठावरील कराच्या विरोधातील हे आंदोलन पुढे वर्षभर सुरू राहिले. गांधीजींची तुरुंगातून सुटका आणि लॉर्ड आयर्विन यांच्याशी दुसऱ्या गोलमेज परिषदेतील चर्चा झाल्यावर हे आंदोलन थांबले. मिठाच्या सत्याग्रहाच्या आंदोलनाच्या दरम्यान ६०,०००हून अधिक भारतीय तुरुंगात गेले.

दांडी यात्रेच्या सत्याग्रहाबद्दल ग.दि. माडगुळकरांनी एक अजरामर कविता लिहिली आहे, तिची सुरुवात अशी आहे :

" उचललेस तू मीठ मूठभर साम्राज्याचा खचला पाया "


हरिजन चळवळ (१९३३)
गांधींनी अस्पृश्यांचे जीवन सुधारण्यासाठी मोहीम राबवली. गांधीजींनी या अस्पृश्यांना हरिजन असे नाव दिले ज्यांना ते देवाची मुले मानत.
८ मे १९३३ रोजी गांधीजींनी हरिजन चळवळीला मदत करण्यासाठी २१ दिवसांचे आत्मशुद्धीचे उपोषण केले.


दुसरे महायुद्ध आणि भारत छोडो आंदोलन (१९३९)
१९३९ मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा नाझी जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले. सुरुवातीला गांधीजींनी ब्रिटीशांच्या प्रयत्नांना अहिंसक नैतिक पाठबळ दिले.
इतर काँग्रेस नेत्यांनी लोकप्रतिनिधींचा सल्ला न घेता युद्धात एकतर्फी सहभाग घेण्यास विरोध केला. काँग्रेसच्या सर्व निवडक सदस्यांनी एकत्रितपणे आपल्या पदांचा राजीनामा दिला.
दीर्घ चर्चेनंतर, गांधींनी घोषित केले की भारताला स्वातंत्र्य नाकारले असताना भारत कोणत्याही युद्धाचा भाग होणार नाही. जसजसे युद्ध वाढत गेले, तसतसे गांधींनी ब्रिटिशांना भारत छोडो आंदोलन नावाचे विधेयक देऊन स्वातंत्र्याची मागणी तीव्र केली.
अशाप्रकारे, गांधीजींनी त्यांच्या हयातीत सुरू केलेल्या सर्व चळवळींनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला पाठिंबा दिला.


महात्मा गांधी यांचे वय आणि मृत्यू
३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसेनी महात्मा गांधींची हत्या केली होती. त्यांना 3 गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्याच्या तोंडातून शेवटचे शब्द बाहेर पडले ते म्हणजे ‘हे राम’. 
गांधींच्या मृत्यूनंतर त्यांची समाधी दिल्लीतील राजघाट येथे बांधण्यात आली. वयाच्या ७९व्या वर्षी महात्मा गांधींनी तमाम देशवासीयांचा निरोप घेतला.


महात्मा गांधी पुस्तके
महात्मा गांधी एक उत्तम लेखक सुद्धा होते. त्यांनी आपल्या जीवनावर आणि इतर महत्वपूर्ण विषयांवर पुस्तके लिहिली.
सत्याचे प्रयोग – आत्मकथा
माझ्या स्वप्नातील भारत
हिंद स्वराज
आरोग्याची गुरुकिल्ली
भगवद्गीता गांधींच्या मते

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...