Monday 19 August 2019

फोटोग्राफी

सहस्त्रकुंड धबधबा जि. नांदेड येथील माझ्या मोबाईलद्वारे काढलेला फोटो

*फोटोग्राफी कालची आणि आजची*

फोटो काढून घेणे अगदी लहानपणापासून आवडायचे. फोटो काढणारा माणूस दिसला की, फोटो काढून घेण्यासाठी आईजवळ रड काढायचो, पण फोटो काढण्याइतके पैसे आईजवळ नसायचे. मग काहीतरी समजूत काढून वेळ काढून न्यायची. फोटो काढणारा सहसा लग्न कार्यात जास्त दिसून यायचा. गावात कोणाचं लग्न आहे म्हटलं की, खास करून त्या फोटोवाल्याकडे बघत राहायचो. तो ज्या दिशेला कॅमेरा फिरवला त्या दिशेने पळत सुटायचो. नावरदेवाच्या मागे आम्हीच आणि नवरीच्या मागे देखील आम्हीच. फक्त फोटो काढण्यापुरते नाचणं. घरी फोटो काढायचं तरी कसं ? बाजाला उभं करायचं, त्याच्यावर एक पांघरून टाकायची मग आमचा मागचा पडदा तयार आणि फोटो काढायचं तेही कृष्णधवल म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट. कॅमेरा मध्ये जो रोल असायचा त्यात फक्त 32 ते 36 फोटोच निघायचे. रोल भरला की पुन्हा दुसरा रोल टाकावं लागायचं. रोल टाकण्यासाठी अंधार असलेल्या घराचा आसरा घ्यावं लागायचं. रोल वर जरासा उजेड पडला तर संपूर्ण रोल खराब होण्याची भीती राहत असे. रोल भरला की, तालुका किंवा जिल्हाच्या ठिकाणी ते धुवायला पाठवित असे. लहानपणी आम्हाला या गोष्टीचा अचंबा वाटायचा की, फोटो धुवायला टाकले म्हणजे आपल्याकडे धोबी जसा पाण्यात कपडे धुतो तसे धुवायचे असतं का ? खूप दिवस त्या बोलण्याचा अर्थच कळाले नाही पण जेव्हा स्वतः कॅमेरा घेतला आणि तो भरल्यानंतर तो रोल धुवायला दिला तेंव्हा कळलं की हे काय भानगड आहे. कोडक कंपनीचा कॅमेरा आणि रोल खूप प्रसिद्ध होता. त्याच्या शोरूममध्ये लोकांची खूप गर्दी असायची.
नव्वदच्या दशकापर्यंत काळे पांढरे फोटोचा काळ होता, त्यानंतर रंगीत फोटोचा काळ सुरू झाला. पेपर किंवा एखाद्या पुस्तकातले फोटो खूप न्याहळून पाहायचो आणि असे फोटोग्राफी आपणांस करता येईल काय ? असा प्रश्न मनात यायचा. हातात कधी कॅमेरा आला नव्हता मात्र फोटोग्राफी करण्याची आवड हे फोटो बघूनच होत गेली. स्टुडियोमध्ये जाऊन फोटो काढण्याचा पहिला प्रसंग दहाव्या वर्गात शिकत असताना घडला. कारण ही तसेच होते, दहावीच्या परीक्षा फॉर्मवर फोटो लावायचा होता म्हणून त्यावेळी पहिला पासपोर्ट काढलो. पुढे पुढे या फोटोविषयी मनात अभिरुची निर्माण होत गेली. कधी कधी मित्रासोबत स्टुडियोमध्ये जाऊन बरेच फोटो काढण्यात आले. आपल्या काही आनंदाच्या क्षणात फोटो काढण्याचा मोह निर्माण व्हायचा पण त्याचा खर्च खिशाला परवडणारे नसायचे म्हणून हा मोह टाळत असायचो. लग्नात जर फोटोवाला नाही लावलं तर नवरदेव अगदी नाराज व्हायचे. लग्न म्हटले की फोटो आलेच, त्याशिवाय लग्न कसे पार पडणार ? गरीबातला गरीब पालक ही लग्नकार्यात फोटो काढणे टाळू शकत नसत. स्वतःची फोटोग्राफीचा हौस नोकरीला लागल्यावर पूर्ण करू शकलो. सातशे रुपयांचा एक कॅमेरा विकत घेतला आणि मनसोक्त फोटोग्राफी करू शकलो. आज ही ते सर्व फोटो पाहतांना मन भूतकाळात जाते. ह्या सर्व गोष्टींचा रिवाइंड करत असताना आजच्या काळात मोबाईल द्वारे जे फोटोग्राफी होत आहे त्याचे काहीच वाटत नाही. कॅमेरा व रोल मुळे ते फोटो धुणे गरजेचे असायचे. पण आज मोबाईलद्वारे काढलेले फोटो मोबाईलमधून नष्ट ही होऊन जातात मात्र त्याची प्रिंट सहसा कोणी काढत नाही. संगणक आणि मोबाईलमुळे जीवनातील प्रत्येक क्षण बंदिस्त करता येऊ लागले ही एक आनंदाची बाब आहे. कुठेही आणि केंव्हाही आज फोटो काढणे सोपे बनले आहे. मात्र काही महाभाग याचा गैरफायदा घेतात तेंव्हा मन उदास होते. आज प्रत्येकजण फोटोग्राफर झालंय हे मात्र खरं आहे. तरी ही फोटो काढण्याची एक कला असते जे की सर्वाना जमत नाही. सर्पमित्र तथा आमचे जिवलग मित्र क्रांती बुद्धेवार एक चांगला फोटोग्राफर आहे. त्याच्याकडे फोटो काढण्याची एक कला आहे, कसब आहे. त्यांच्या हातून उत्तमोत्तम फोटो निघतात. भविष्यात त्यांनी या कलेवर अधिक लक्ष द्यावे आणि सुंदर फोटोग्राफी करावे, असे आम्हांला वाटते. आज जागतिक छायाचित्रण दिवस त्यानिमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा .......

- नासा येवतीकर, धर्माबाद

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...