Friday 13 January 2017

कुटुंबव्यवस्था


वसुदेव कुटुंबकम "

कुटुंब म्हटले की आपल्या डोळ्यासमोर उभे राहते एक असे चित्रं ज्यात आजी-आजोबा, आई-वडील, भाऊ-बहीण, काका-काकू आणि इतर मंडळी असा जवळपास दहा ते पंधरा लोकांचा समूह. या कुटुंबात वावरत असताना मिळतो अनेक गोष्टीचे संस्कार जसे की वडिलांनी एखादी वस्तू घरात आणली असेल तर ती सर्वांनी मिळून मिसळून खावी. यामूळे मुलांवर समानता या मूल्यांची नकळत रुजवण होते. घरात वाडवडिलांचा वावर असल्यामुळे घरातील सर्वच जण दबक्या आवाजात संवाद करतात. म्हणजे नवरा-बायको, भाऊ-बहीण यांच्यात होणारे भांडण किंवा धुसफुसला आळा बसतो. कोणी मोठ्या आवाजात बोलत नाही. घरातील सर्व कामे विभागली जातात. ज्यांना जे काम जमते ते काम कुणी सांगण्याच्या अगोदर केली जातात. काही जण तर वडील मंडळीकडून शाबासकी मिळविण्यासाठी पुढे पुढे येऊन काम करतात. जणू त्यांचामध्ये स्पर्धा लागली असते. घरातल्या प्रत्येक बाबींवर नियंत्रण असते. ते मग खरेदी करण्याचे असेल वा कुठे गावाला जायचे असेल. प्रत्येक गोष्ट वाडवडील मंडळींना विचारूनच करावे लागते त्यामूळे घरातील प्रत्येक व्यक्तीच्या चैन किंवा ऐश आरामच्या बाबीला एकप्रकारे लगाम घातल्या जाते. एकत्रित कुटुंब पध्दतीमुळे बऱ्याच गोष्टी चांगल्या घडतात. लहान मुलांना घरातील आजी अन् आजोबा व्यवस्थितरित्या सांभाळ करतात. त्यांना रामायण  व महाभारत इसापनीती किंवा इतर गोष्टी सांगतात. आजी गाणे ऐकवते त्यामूळे मुले भविष्यात चांगले व्यक्ती बनू शकतात. आजोबा व्यवहारज्ञान देतात.
परंतु सध्याच्या नवीन पध्दतीमधील जोडप्याना असे एकत्र कुटुंब पध्दत म्हणजे डोक्याला ताप वाटत असते. वधूपिता आपल्या मुलीसाठी स्थळ शोधत असताना प्रत्येक गोष्टीची चौकशी करतो त्यात हे पण विचारपूस करतो की लग्नानंतर मुलगा कोठे राहणार आहे ? मुलगा स्वतंत्र राहणार असेल तरच वधूपिता लग्नासाठी होकार देतो अन्यथा नाही. यांत त्या वधूपित्याची काही  चूक दिसत नाही. कारण आपल्या मुलीला सासरी जास्त कष्ट पडू नये, तिने सुखात रहावे याच विचारात प्रत्येक वधूपिता असतो. ज्यावेळी आपल्या मुलांच्या लग्नाची वेळ येते तेंव्हा मात्र हाच वधू पिता सासरी आलेल्या मुलीला नावे ठेवतो. माझ्या मुलाला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करते. सासू सासऱ्या सोबत राहिले तर हिला जास्त काम करावे लागते म्हणून तिच्या घरांच्या लोकांनी आमचं नातं तोडून काढलं असा आव आणतात. परंतु प्रत्यक्षात त्यांची सु्रुवात कोणाकडून झाली ? माझ्याकडून झाली याचा मात्र विचार केला जात नाही. याच विचार शैलीतून आज एकत्रित असलेली कुटुंब पध्दती विभक्त झाली आहेत. हम दो हमारे दो किंवा आम्ही दोघे राजा-राणी, नको आमच्यात कोणी ही भावना दिवसेंदिवस बळावत चालली आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. कदाचित या गोष्टीची चिंता कोणी करीत नाहीत किंवा त्यांची जाणिव त्यांना अजून झाली नाही. आपल्या आई वडिलांपासून विभक्त राहून खरेच आपल्या कुटुंबाची प्रगती होते काय ? या गोष्टीचा गंभीरतापूर्वक विचार केल्यास, त्याचे  उत्तर नाही असेच येते. मात्र तरी सुध्दा वेगळी चूल मांडण्याचा अट्टाहास कधी बायकोकडून तर कधी नवऱ्याकडून होते. यांत कोणाचा दोष आहे ? यांपेक्षा याची झळ आपल्या लेकरांना लागते हे आपण कधीच विचार करीत नाहीत. विभक्त कुटुंबात राहणारी मुले सहसा एकलकोंडी होतात. प्रत्येक गोष्ट मागितली की मिळते त्यामुळे हट्टी होतात. घरात आणलेली वस्तू आपलीच, त्याच्यावर आपलाच जास्त अधिकार आहे या सवयीमुळे त्याच्यात स्वार्थी भावना खोलपर्यंत रुजते. कारण त्यांचा सहवास फक्त कुटुंबातील आई-वडील आणि भाऊ-बहिण एवढ्यापुरतेच सिमित राहते. त्यांच्यावर आजीच्या गाणी आणि आजोबांच्या गोष्टी ऐवजी टीव्ही वरील अश्लील व बिभत्स गोष्टीचे संस्कार होतात. समाजात काही अनैतिक बाब घडली की आपणंच बोलून मोकळे होतो काय ही आजकालची पोरं, काहीच मॅनर नाहीत.
घराघरात नवरा-बायको यांचा वादविवाद विकोपाला जाऊन त्याचे पर्यावसन घटस्फोटामध्ये होण्याचे प्रमाण वाढण्यामागे सुध्दा ही विभक्त कुटुंब पध्दत कारणीभूत आहे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. घरातील नवरा बायकोच्या भांडणाचे प्रतिकूल परिणाम मुलांच्या भविष्यावर होतो. रात्री भांडण झाले की दिवस उगवल्याबरोबर बाई माहेरी जाते, जाताना सोबत लेकरांना घेऊन जाते. पण लेकरांची शाळा बुडेल, त्याचा अभ्यास राहून जाईल या गोष्टीचा विचार ते कदापिच करणार नाहीत. शहरांत अश्या घटना फार कमी घडत असतील मात्र ग्रामिण भागात असे प्रकार सर्रास घडतात. बायको म्हणेल तसा नवरा ऐकावेच लागते किंवा नवरा म्हणेल तसे बायकोला ऐकावेच लागते असे चित्रं या राजा-राणीच्या कुटुंबात दिसून येते. अश्या कुटुंबात एकमेकास विरोध झाला की भांडण होणार हे ठरलेलं आहे. परंतु जर राजा व राणी दोघेही सामंजस्यपणाने एकमेकाला समजून घेऊन संसार केल्यास त्यांच्याएवढा सुखी जगात शोधूनही सापडणार नाहीत.
आजची कुटुंब व्यवस्था कशीही असेल आणि आपण एकत्रित असो वा विभक्त कुटुंब पध्दती मध्ये राहत असो आपल्या लेकरांसाठी वर्षातून किमान एक दोन वेळा तरी काही ना काही कारणांनी एकत्र आले पाहिजे मौजमस्ती केली पाहिजे यामुळे मुलांवर योग्य संस्कार होतात जे की किती ही पैसा खर्च केला तरी विकत मिळणारी वस्तू नव्हे त्यासाठी आपण आपल्या वागणूकीत बदल केला पाहिजे. सुखी कुटुंबात सर्व लोकं एकमेकाना समजून घेऊन राहतात म्हणूनच ते दूर दूर राहून सुध्दा सुखी राहतात. त्यांच्याजवळ काही जादूटोणा नाही की मंत्र तंत्र नाही. कुटुंबातील आई-वडील हे फार महत्वाचे व्यक्ती आहेत पण त्यांची काळजी न घेता त्यांना वृध्दाश्रम मध्ये पाठविले जाते. तेंव्हा प्रश्न पडतो की वृध्दाश्रम कश्यासाठी निर्माण झाले असतील. वास्तविक पाहता आई - वडील हेच आपली खरी दौलत आहे. एका कवितेत म्हटले आहे घार उडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी. खरोखरच आई वडीलांची आपल्या लेकरांबाबतची माया निराळीच असते. तळहाताच्या फोडाप्रमाणे आई वडील मुलांची देखभाल करतात, त्यांना मोठी करतात. आजच्या काळात मात्र मुले मोठी झाल्यावर आपल्या जन्मदात्यालाच विसरतात. ज्यांनी आपणाला या सुंदर अश्या पृथ्वीवर आणले, त्यांना वृध्दाश्रमात धाडण्यास सुध्दा मागे पुढे पहात नाहीत. ज्या आई वडिलांनी आपणाला लहानाचे मोठे केले त्यांच्याप्रति आपले काहीच कर्तव्य नाहीत काय ? त्यांच्यावर आपण एवढा अन्याय का करावा ? आजच्या विभक्त कुटुंब पध्दती मुळे नातवंडाना आजोबांची कथा आणि आजीचे गाणी ऐकायलाच मिळत नाहीत.आजी - आजोबांचे प्रेम कसे असते हे फक्त चित्रपटातून पाहण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. या नातवंडाचे किती दुर्भाग्य ! अशा घटनांना सर्वस्वी ही मुलेच जबाबदार आहेत असे मला वाटते. काही कुटुंबात भावाभावाचे वाद होतात. काही वेळा बायकोच्या कटकटीमुळे ईच्छा असूनही मुलांना आई वडिलांपासून दूर रहावे लागते. अशा वेळी घरातील चिमुकल्याचे खूप नुकसान होते. दिवसेंदिवस समाजातील नीतीमत्ता खालवली जात आहे. घरातील थोरासाठी ज्या काळात वृध्दाश्रमाची सोय झाली, त्याच काळात नितिमत्ता लयास जाण्यास सुरुवात झाली. मी माझ्या आई वडिलांना सांभाळू शकत नाही, असे म्हणताना आई वडिलांनी स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन आपले पोट भरविले या गोष्टीची आठवण मुलांनी एकदा तरी ठेवायला हवी. रोज सकाळी उठून देवपूजा करते, देवाला गोडधोड नेवैद्य देते, पण सासू सासऱ्याच्या तब्येतीबद्दल न विचारणाऱ्या सुनेला आयुष्यभर देव कळणार नाही. आजकाल माहेरच्या सांगण्यावरून किंवा कुठल्याही कारणावरून " आम्ही दोघे राजा राणी, घरात नको परका कोणी " अशीच संसाराची पध्दत नवीन मुलींच्या मनात रूढ होऊ पाहत आहे. संकृतमध्ये एक श्लोक आहे मातृ देवो भव, पितृ देवो भव अर्थात आई वडिलांना देव माना व त्यांचा आदर करा, सेवा करा, यांतच मुलांची पुण्याई आहे. एखाद्या तीर्थक्षेत्री ठिकाणी भेट दिल्याने जे पुण्य मिळविता येते असे वाटते त्यापेक्षा जास्त पुण्य आई वडिलांच्या सेवेतून मिळते. आज तुम्ही तुमच्या आई वडिलांना जर वृध्दाश्रमात पाठवित असाल तर उद्या तुम्हांला सुध्दा याच वृध्दाश्रमात तुमची मुलं तुम्हांला पाठवणार नाहीत कश्यावरून. कारण जसे पेराल तसे उगवणार ते तर ठरलेलेच आहे. तेंव्हा प्रत्येक मुलाने " वृध्दाश्रम कश्यासाठी " यावर सखोल चिंतन करून आपल्या आई वडीलांची आजन्म सेवा करावी यातच आपली पुण्याई आहे.
आपण शाळा, महाविद्यालयामधून कितीही शिक्षण घेऊ द्या. आपणास जन्म देणारी आई हीच आपल्या सर्वाची पहिली गुरु आहे. जीवनामध्ये गुरुचे स्थान अनन्य साधारण महत्वाचे आहे. गुरु विना ज्ञान मिळविणे अशक्य आहे, असे संत कबीर आपल्या दोहात सांगतात. लहानपणापासून ते वृध्द अवस्थेपर्यन्त आपणास गुरुची आवश्यकता भासते.जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आणि प्रत्येक वळणावर आपणास गुरुची गरज भासते.गुरु म्हणजे कोण असतो ? गुरु म्हणजे मार्गदर्शक, गुरु म्हणजे ज्ञान देणारा, गुरु म्हणजे अज्ञानरूपी अंधारात दिवा लावून ज्ञानाचा प्रकाश पसरविणारा, गुरु म्हणजे दिशादर्शक. जेव्हा जेव्हा आपणास काही अडचणी निर्माण होतात, समस्या उद्भवतात तेंव्हा तेंव्हा आपणास जाणकार तज्ञ व्यक्तिकडे जावे लागते. म्हणजेच गुरुकडे जावे लागते. गुरु म्हणजे लघू नसलेला, लहान नसलेला. ज्याच्याकडे भरपूर ज्ञान व विद्या आहे तोच खरा गुरु. जे लोक गुरु होण्याचा मुखवटा धारण करतात ते एक ना एक दिवस उघडे पडतात आणि त्यांची पत घसरल्याशिवाय राहत नाही. आपले स्थान टिकविण्यासाठी गुरु लोकांना खुप मेहनत घ्यावी लागते.आपले ज्ञान सतत वाढवत ठेवावे लगाते.त्यासाठी नियमित अभ्यासाचा सराव करावा लागतो. पूर्वीच्या काळात गुरुच्या घरी जाऊन आणि तेथेच राहुन शिक्षण घ्यावे लागत असे त्यास गुरुकुल पद्धत असे म्हटले जाते. त्याठिकाणी गुरु हा शिष्याना ज्ञान देण्याचे काम करीत असत आणि त्या विभागाचा राजा त्या गुरुचा यथायोग्य धनसंपत्ती देऊन स्वागत करायचा, ही पध्दत होती. ही गुरुकुल पद्धत आत्ता हॉस्टेलच्या स्वरुपात दिसून येते. मात्र त्यात गुरुकुलमध्ये जी आत्मीयता , प्रेम किंवा जिव्हाळा दिसून येत असे ते मात्र दिसून येत नाही. मधल्या काळात गावोगावी गुरुकुल ऐवजी शैक्षणिक संस्था म्हणजे शाळा उदयास आली आणि गुरुकुल मधील गुरु हे शिक्षक या नावाने ओळखले जाऊ लागले. विद्येचे घर अगदी आपल्या घराजवळ उपलब्ध झाल्यामुळे शिक्षण घेणारे आणि देणारे यांची संख्या वाढीस लागली. राजाच्या ऐवजी शासन त्यांना दरमहा वेतन देत शासकीय कर्मचारी केले. असे हळूहळू गुरुचे पद व्यावसायिक होत गेले. गुरुच्या व्यवसायात जैसेही लक्ष्मी, पैसा प्रवेश केला तैसे विद्या मंद गतीने दूर निघून गेली. कारण लक्ष्मी आणि सरस्वती सहसा एकत्र राहू शकत नाहीत.
शाळेच्या बाबतीत सुध्दा असेच घडले शाळेत जैसे ही लक्ष्मीने प्रवेश केला तसे शाळेचेही रूप पालटले. पूर्वी शाळेतल्या गुरुजींना खुप मान सन्मान मिळायाचा, आदर मिळायाचा, लोक त्यांना सन्मानाने बोलायचे,मात्र आज तशी परिस्थिती नाही. आज गुरूजी बदलले,समाज बदललला, आणि परिस्थिती सुद्धा बदलली. आज कोणालाही शाळेतील गुरूजीची गरज भासत नाही. कारण त्यांच्या मुलांना शिकविण्यासाठी घरात संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, मोबाईल, स्मार्ट फोन सारखे तंत्रज्ञान 24 तास त्यांच्या सेवेत उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे त्यांना गुरुचे ज्ञान तोकडे वाटत असेल ? सोशल मिडियाच्या विविध माध्यमातून ज्ञानाची झरे वाहत आहेत. काही वर्षानंतर गुरुची संकल्पना मागे पडते की काय ?अशी भीती सुध्दा राहुन राहुन मनात येते.त्यासोबत अजुन ही या गोष्टीवर विश्वास वाटतो की गुरुशिवाय मनुष्याचे जीवन सफल होऊच शकत नाही. संगणका सारखे निर्जीव वस्तू बटण दाबता क्षणी माहिती देईल ;परंतु गुरु -शिष्य या दोन सजीवात ज्ञानाची जी देवाणघेवाण ते कदापि ही शक्य नाही. मुलांवर संस्कार टाकण्याचे काम निर्जीव वस्तू नक्कीच करू शकणार नाही, त्यासाठी सजीव व्यक्तीच पाहिजे.
मनुष्याच्या जीवनात गुरुचे पहिले स्थान हे आपणास जन्म देणाऱ्या आईला दिले जाते. पृथ्वीवर जन्माला येण्यापूर्वी पासून आईचा संबंध येतो. आई आपल्या बाळाला नऊ महीने नऊ दिवस गर्भात वाढवून मोठी करते. गर्भसंस्कार सुध्दा जीवनात मोलाचे काम करतात. आई आपल्या मुलांवर वेगवेगळ्या प्रकारे संस्कार करते आणि मुलभुत ज्ञान सुध्दा देते. ऐकणे आणि बोलण्याची क्रिया आईने जर शिकविली नसती तर त्या मुलाचा काय विकास होऊ शकतो ? याची आपण कल्पना करू शकतो. समाजामध्ये आणि शाळेत पाऊल ठेवण्यापूर्वी प्रत्येक मुलांना आई ज्ञानाचे धडे देऊन तयार करते. म्हणूनच आई माझा गुरु आई कल्पतरु असे एका कवीने आपल्या कवितेत म्हटले आहे, ते काही खोटे नाही. इतर सर्व गुरुपेक्षा आई ही अत्यंत महत्वाची आद्य गुरु होय. आपले मूल चांगले संस्कारी, हुशार आणि सुजाण नागरिक म्हणून समाजात जगावे असे वाटत असेल तर प्रत्येक आईने तज्ञ गुरुच्या भूमिकेतून आपल्या मुलांना घडविण्याचा प्रयत्न करावा. महाराष्ट्र राज्याचे आणि हिंदवी राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांची आई राजमाता जिजाऊ यांनी घडविले म्हणून ते लहान वयात सुध्दा खुप मोठा पराक्रम करून दाखवू शकले. परमपूज्य सानेगुरूजी सारखा हळव्या मनाचा आणि आईच्या हृद्याचा व्यक्ती आपणास लाभला ते फक्त त्यांच्या आईमुळेच, हे त्यांच्या श्यामची आई पुस्तकातुन पानोपानी दृष्टिस पडते. अशियम्मा सारख्या मातेच्या संस्कारामुळे ए पी जे अब्दुल कलाम सारखे मिसाईल मैन देशाला राष्ट्रपती म्हणून लाभले होते.
कुटुंबव्यवस्थेत सर्वच घटक अत्यंत महत्वाचे आहेत. त्यामुळे सर्वाशी आदरपूर्वक, सन्मानपूर्वक वागणे आपले कर्तव्य आहे.
चला आपण ही सर्वच जण या गोष्टीचा अंगीकार करू आणि संपूर्ण देश सुखी कुटुंब करू या

- नागोराव सा येवतीकर
  मु येवती ता धर्माबाद
  9423625769

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...