Friday, 21 March 2025

जागतिक जल दिन ( World Water Day )

22 मार्च - जागतिक जल दिन त्यानिमित्ताने लेख 

               जल है तो कल है 
पाणी म्हणजे जल किंवा नीर असे ही म्हटले जाते. सजीवांना त्यांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते. त्याशिवाय कोणताही सजीव जिवंत राहूच शकत नाही. पशु-पक्षी, वेली, वनस्पती, झाडे, आणि मानवाना पदोपदी पाण्याची गरज भासते. अश्मयुगीन काळातील लोकं पाण्याचे ठिकाण पाहून आपली वस्ती तयार करत होते. कारण त्याशिवाय त्यांचे जगणे अशक्य होते. आज ही आपली तीच परिस्थिती आहे. शहरात किंवा खेड्यात कोठेही घर बांधण्यापूर्वी पाण्याची व्यवस्था कशी आहे ? याबाबी लक्षात घेतले जाते. त्यानंतरच घर बांधणीचा विचार केला जातो. एखाद्या ठिकाणी पाणी उपलब्ध नाही म्हटल्यावर तेथे सहसा कोणी घर बांधकाम करत नाहीत, त्या भागातील जमिनीचे दर देखील खूप कमी असतात. वाढती लोकसंख्या आणि वाढते घरं यामुळे प्रत्येकजण पाण्याची व्यवस्था करण्यासाठी जमिनीला चारशे ते पाचशे फूट खाली पर्यंत छिद्र करत आहेत. त्यामुळे जमिनीचे अक्षरशः चाळणी झाल्यासारखी अवस्था झाली आहे. पूर्वीच्या काळी पन्नास फूट खोलीवर असणारे पाणी आज दहापट खाली उतरले आहे. काहीजणांना पाणीच लागत नाही तेव्हा ते अजून एक दोन छिद्र करून पाणी मिळवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे पृथ्वीवरील जमिनीचे संतुलन बिघडत चालले आहे. गावात आणि शहरात नळ योजना असताना देखील लोकं खाजगीमध्ये बोअरवेल करतात. यावर मर्यादा आणणे गरजेचे आहे. सध्या तर पाणी हा एक मोठा व्यवसाय झाला आहे. दहा वर्षांपूर्वी जर कोणी म्हटलं असतं की, पिण्याच्या पाण्यासाठी भविष्यात पैसे मोजावे लागतील तर त्याच्यावर आपण मोठ्याने हसलो असतो आणि त्याला मूर्खात काढलं असतं. पण आज परिस्थिती तीच आहे. फिल्टर पाणी पिण्यासाठी योग्य असते म्हणून गेल्या चार पाच वर्षात आपण साधे पाणी पिणेच बंद करून टाकले आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी जे की फुकट मिळत होते त्यास आज आपण मासिक सरासरी तीनशे रु. खर्च करत आहोत तर वार्षिक तीन हजार सहाशे रु खर्च करत आहोत. एका कुटुंबाचा वार्षिक खर्चावरून जर गाव आणि शहरातील लोकांची एकत्रित खर्च काढला तर लक्षात येईल की आपण पिण्याच्या पाण्यासाठी किती खर्च करत आहोत. परंतु ही सेवा स्थानिक प्रशासनाने दिल्यास योग्य राहील असे वाटते. 
पाण्याच्या दुनियेत जे काही संघर्ष चालू आहे ते थांबेल. कुणीतरी सांगून ठेवलं आहे की यापुढील तिसरे महायुद्ध हे पाण्यावरून होणार आहे. असेच जर चालू राहिले तर भविष्यात नक्कीच होऊ शकते, यात काही नवल नाही.
भारतात मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होते त्यामुळे त्याचा अपव्यय देखील मोठ्या प्रमाणावर होते. पावसाळ्यात पाण्याची दिवाळी आणि उन्हाळ्यात पाण्यासाठी शिमगा असतो. ग्रामीण भागात आजही अनेक खेडी असे आहेत की ज्यांना कोस दोन कोसवरून डोक्यावर पाणी वाहून आणावे लागते. अश्या लोकांना या पाण्याचे महत्व कळते. घरात बसून बटन मारले की हजार लिटरची टाकी भरून घेणाऱ्यांना या पाण्याचे महत्व कधीच कळणार नाही. आज जागतिक जलदिन आहे. तसेच उन्हाची तीव्रता देखील वाढत आहे. त्यानिमित्ताने पशु-पक्षी यांना पिण्यासाठी पाण्याची जमेल तशी व्यवस्था करू या, एखादा वाटसरूला तहान लागली असेल आणि आपल्याजवळ महागडे पाण्याचे बॉटल असेल म्हणून दुर्लक्ष न करता त्याला पाणी पाजवा, दारावर येणाऱ्या कामकरी कष्टकरी माणसांना पिण्यासाठी पाणी द्यावे. एखादेवेळी जेवण नाही दिलं तरी चालेल पण तहानलेल्या लोकांना नक्की पाणी द्या, हीच यानिमित्ताने आपणा सर्वांना विनंती. 

- नासा येवतीकर, येवती
ता. धर्माबाद जि. नांदेड, 9423625769


*💧 जलसाक्षरता : काळाची गरज💧*

मानवी जीवनच नव्हे तर प्रत्येक सजीवांसाठी पाणी हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जीवन जगण्यासाठी ज्याप्रकारे अन्न आणि हवा याची गरज असते अगदी त्याचप्रमाणे पाण्याचीही गरज असते. पाणी कसे तयार होते ?
 याविषयीच्या जलचक्रची माहिती आपणा सर्वांना ज्ञात आहेच. वास्तविक पाहता प्रयोगशाळेतून पाणी म्हणजे H2O हायड्रोजन डाय-ऑक्साइड तयार करणे फार खर्चिक आणि जिकरीचे काम आहे. त्याद्वारे तयार करण्यात आलेले पाणी आपण वापरू ही शकत नाही, त्यास्तव आपण त्या भानगडीत सुद्धा पडत नाही. कारण पृथ्वीवर जमीन कमी म्हणजे 29% तर पाण्याचा भाग जास्त म्हणजे 71% हे आहे. पृथ्वीवर पाणी मुबलक प्रमाणात असल्यामुळे पृथ्वीला निलग्रह असेसुद्धा म्हटले जाते. त्यामुळे आपल्याकडे निसर्गतःच पाणी भरपूर आहे अशी समाजाची धारणा होती. त्याचा परिणाम असा झाला की, उपलब्ध पाणीसाठा किती आहे व ते किती महत्त्वाचे आहे याचा विचार करणे माणसाने सोडून दिले.

 पाण्यापासून पैसा तयार करण्याच्या मानवाच्या अति स्वार्थी स्वभावामुळे, स्वतःच्या स्वार्थासाठी व विकासासाठी पाण्याचा पुरेपूर किंवा त्यापेक्षा जास्त वापर करून आज पाणीटंचाई सारख्या भीषण समस्येच्या गर्तेत अडकून पडला आहे. 
आदिमानव किंवा आपले पूर्वज पाण्याचे महत्व ओळखून होते. म्हणूनच त्यांच्या वस्त्या ह्या नदीच्या काठावर किंवा ज्या ठिकाणी पाणी आहे त्याच ठिकाणी आढळून आल्या आहेत. पाण्याचा वापर करून शेती करता येते याची जाणीव सुद्धा त्यांच्यामध्ये निर्माण झाली. पाण्यामुळे अन्न मिळू लागले याची जाणीव त्यांच्या मनात निर्माण झाल्यावर त्यांनी पाण्याला पंचमहाभूतात समाविष्ट केले. पाणी पावसाच्या रूपाने जमिनीवर येतो हे समजल्यावर पाऊस व त्या पावसाची निर्मिती करणारा समुद्र यांना त्यांनी देवत्व बहाल केले. संगणक युगातील पिढी या लोकांना अशा वागण्यामुळे मूर्खात काढतील कदाचित परंतु त्यांच्या मनात भीती होती आपण निसर्गाचे नियम तोडले तर तो कदाचित आपणाला शिक्षा देऊ शकतो. भीतीपोटी तो निसर्गाने तयार केलेले नियम तोडत नव्हता आणि पर्यावरण संतुलित राहून त्याचा समतोल कधी बिघडत नव्हता. परंतु आज आपण सजग, जागरूक, सज्ञान झालो आहोत म्हणून वरील गोष्टी काही मानत नाही. मात्र आपण जलसाक्षर झालो नाही. लिहिता वाचता यावे म्हणून साक्षर झालो खरे परंतु पाण्याची चणचण तुटवडा यावर मात करण्यासाठी जलसाक्षरता निर्माण होणे ही काळाची गरज आहे.

एका वर्षातून पावसाचे चार महिने ठरलेले असतात. त्या पर्जन्याच्या काळात योग्य प्रमाणात पाऊस झाला तर त्यावर्षी कोणत्याच बाबींची चणचण भासत नाही. मात्र तसे होत नाही. पावसाची वेळ, त्याचा वेग आणि त्याचे प्रमाण याबद्दल काही अंदाज व्यक्त करणे फारच कठीण आहे. हवामान तज्ज्ञ दरवर्षी पावसाचा आपला अंदाज व्यक्त करतात. मात्र त्या प्रमाणात पाऊस पडतोच असे नाही.

 त्याच्याबाबतीत वाट पाहणे एवढेच आपल्या हातात आहे. कधीकधी वर्षभराचा पाऊस एका महिन्यात तर कधीकधी एका महिन्याचा पाऊस एका दिवसात पडतो. पाऊस जास्त पडला तर अतिवृष्टी आणि कमी पडला तर अनावृष्टी यासारखी नैसर्गिक संकट ओढावू शकतात. पावसाचे पडलेले पाणी वाहून जाणे आणि पाण्याचा वाटेल तसा वापर करणे यामुळे पाण्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात. म्हणूनच निसर्गतः आपणास प्राप्त झालेले पाण्याचे स्तोत्र जपून वापरणे, पावसाचे पडलेले पाणी साठवून ठेवणे, दैनंदिन जीवनात पाण्याचा योग्य व जपून वापर करणे या गोष्टीबाबत सजगता निर्माण करण्यासाठी जलसाक्षरतेची अत्यंत आवश्यकता आहे.
जलसाक्षरता म्हणजे फार मोठे काम नाही. परंतु लहान-सहान गोष्टीकडे सुद्धा जाणीवपूर्वक लक्ष देऊन पाणी कसे वाचविता येईल किंवा बचत करता येईल ? याचा विचार करणे म्हणजे जलसाक्षरता म्हणता येईल. घरात असलेले नळ तर आपण वेळोवेळी तपासणी करतो परंतु नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीमार्फत जे पाणी आपण नळाद्वारे घेतो त्याची वेळोवेळी तपासणी करावी. बहुतांशी ठिकाणी हे नळ उघडेच राहतात. त्याला चालू बंद करायची तोटी नसते त्यामुळे आपण जेव्हा एखाद्या गावाला जातो त्यावेळी या नळाद्वारे भरपूर पाणी वाया जाते. ते पाणी तोटी लावून वाचविता येऊ शकते याचा प्रत्येकाने जरूर विचार करावा. सार्वजनिक ठिकाणी असलेले नळ चालू असेल तर लगेच ते बंद करण्याची काळजी आपण घ्यावी. दररोज सकाळी दात घासताना, दाढी करताना, हात-पाय धुते वेळेस नळ चालू करून भरपूर पाणी वापरण्याची प्रथा आपण बंद करावी व कमीत कमी पाण्यात उपरोक्त क्रिया करावी. यामुळे पाण्याची बचत होईल. मोटार चालू करून वाहने धुण्याची बऱ्याच लोकांची सवय असते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. त्याऐवजी बकेटभर पाणी घेऊन स्पंजद्वारे गाडी पुसल्यास पाणी कमी लागेल आणि गाडी साफ ही होईल. पाण्याची टाकी पूर्ण भरल्यानंतर ओवरलोड साठी एक पाइप बाहेर काढल्या जाते. त्याद्वारे जास्त पाणी बाहेर येणार नाही याची काळजी नेहमी घेणे गरजेचे आहे. बहुतांश वेळा आपण पाण्याची टाकी भरण्यासाठी मोटार चालू करतो आणि टाकी भरून पाणी उलटून जाते तरी आपले लक्ष राहत नाही. त्यामुळे बरेच पाणी वाया जाऊ शकते. या सर्व बाबीसाठी घरातील महिलांना सजग करणे गरजेचे आहे. पाण्याची अत्यंत आवश्यकता त्यांनाच असते व त्याची काळजी सुद्धा सर्वात जास्त त्यांनीच घेणे आवश्यक आहे.
घरात पाहुणे मंडळी आली असता त्यांना ग्लास भरून पाणी न देता अर्धा ग्लास भरलेले पाणी द्यावे. ज्यामुळे त्यांना आवश्यक असल्यास पाहुणे अजून पाणी मागतील किंवा कमी पाणी दिल्यास तेवढे संपवतील. परंतु आपण या छोट्या बाबीचा विचार ही सहसा करत नाही. पाहुणे मंडळी सुद्धा आपली तहान लक्षात घेऊन विचार करावा अन्यथा " नको " म्हटलेले केव्हाही चांगले. त्यामुळे पाण्याची नक्कीच बचत होईल. आपल्या घरात पिण्यासाठी किती पाणी लागते याचा अंदाज घेऊन भाडे भरून घ्यावे. पाणी कधीही शिळे होत नसते याची जाणीव सर्वप्रथम महिलांनी करून घेऊन पाण्याची भांडी रोज ओतून देऊ नये. भाजी किंवा फळे धुण्यासाठी वापरलेले पाणी परसबागेतील किंवा कुंडीतील झाडाना टाकणे आवश्यक आहे. घरातील सांडपाणी सुद्धा बागेसाठी वापरावे यामुळे बागेला स्वतंत्रपणे पाणी देण्याची आवश्यकता रहात नाही. झाडांना किंवा शेतात पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर द्यावा. ज्यामुळे कमी पाण्यावर उत्तम शेती होईलच शिवाय त्या पिकांना मुळापर्यंत पाणी जाऊन त्याची योग्य वाढ होईल. याउपर सर्वात महत्त्वाचे म्हणजे पावसाचे पडणारे पाणी साठवणे व त्याचा वापर करणे. आपण या पावसाच्या पाण्याचा शेती वगळता त्याचा काहीही उपयोग करून घेत नाही. दरवर्षी पावसाचे पडणारे कितीतरी पाणी वाहून जाते. त्याची साठवणूक कशी व कोठे करावे आणि त्याचा वापर नंतर कसा करावा याचे ज्ञान नसल्यामुळे आपणास ते पाणी साठविता येत नाही. राज्यातील राळेगणसिद्धी येथे मा. अण्णा हजारे यांनी पावसाचे पाणी वापरून त्या गावाला कसे नंदनवन केले हे प्रत्यक्षात या गावाला भेट दिल्याशिवाय कळणार नाही.
 व्यक्ती अनुभवातून बरेच काही शिकतो त्यासाठी हिवरेबाजारचे आदर्श सरपंच श्री पोपटराव पवार यांना भेटून ही माहिती मिळवू शकतो. रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टिमद्वारे आपण पावसाचे पाणी जमिनीत मुरवू शकतो किंवा भांड्यांमध्ये पावसाचे पाणी जमा करून त्याचा वापर करू शकतो. अशाप्रकारे फार लहान लहान घटनांमधून पाणी वाचविता येऊ शकते. थेंबे थेंबे तळे साचे म्हणीप्रमाणे एखादी क्रिया करताना ती लहान वाटते परंतु काही काळानंतर मोठ्या स्वरूपात दिसून येते. त्याच तो प्रत्येकाने सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून उद्यासाठी पाणी।हवे असेल तर आज आणि आजच ते पाणी वाचवावे लागेल हे घोषवाक्य नेहमी लक्षात ठेवावे. संत रामदास महाराजांनी म्हटल्याप्रमाणे केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे या उक्तीनुसार आपण सर्वांनी पाण्यासाठी हे काम केले पाहिजे. सध्या राज्यात पाणीदार गावासाठी वॉटरकप स्पर्धा चालू आहे. राजीव तिडके नावाच्या एका शिक्षकाने यासाठी आपला एक महिन्याचा पगार देऊ केलाय हे खरोखरच अभिनंदनीय आणि स्तुत्य आहे. अश्या कार्यासाठी प्रत्येकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन कार्य करणे आवश्यक आहे. जलयुक्त शिवार योजनेमधून देखील पाण्याचे बचत आणि वापर करता येऊ शकतो. या योजनेमुळे अनेक गावे टँकरमुक्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. आत्ता खरी गरज आहे हे होऊ शकते असे  प्रत्येकाच्या इच्छा शक्तीची. 

*! जागतिक जल दिनाच्या शुभेच्छा !*
__ ना.सा.येवतीकर__

💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧

Wednesday, 12 March 2025

होळी व धुलीवंदन ( Holi & Dhulivandan )

*🔫 होळी व रंगपंचमीच्या शुभेच्छा 🔫*
फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा. होळी हा सण आपल्या आयुष्यात अनेक रंग घेऊन येतो. होळी हा सण शहरात तसेच खेड्या-पाड्यातून मोठ्या आनंदात आणि उत्साहाने साजरा केला जातो. पण कृत्रिम रासायनिक रंगांचा, अंड्याचा, पिशव्यांचा बेशिस्तपणे वापर केला जातो. या कारणामुळे पर्यावरणाला व माणसाला त्रास होतो. म्हणून स्वत:ची काळजी घेऊन इको फ्रेंडली होळी खेळली पाहिजे.

 नासा येवतीकर, स्तंभलेखक
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आमची होळी आणि धूलिवंदन

झजरी दादा, झजरी दादा
फाल्गुन महीना सुरु झाला की आमच्या बच्चे कंपनी ला खुप आनंद व्हायचा कारण सर्वात आवडणारा आमचा होळी चा सण जवळ आलेला असायचा. होळी च्या पंधरा दिवासपूर्वीच आम्हाला वेध लागायाचे. तीन चार मित्र मिळून एक गट केल्या जायचे. सुताराजवळ जाऊन दोन छान लाकडे तासुन घ्यायचे, ज्यास आज टिपरी म्हणतात हे कळले. ते दोन लाकडे एकमेकावर आपटून प्रत्येकाच्या घरा समोर जाऊन *झजरी दादा, झजरी दादा* हे गीत म्हणत असू. हे गीत मराठी व तेलगू मिश्रित होती. 

आम्ही लहान असतांना हे गीत म्हणत घरोघरी ज्वारी मागत असू. आपल्यासाठी सदरील गीत येथे देत आहे.

*होळीची एक आठवण*

झजरी दादा, झजरी दादा
आल्यान गोफण, पल्यान डोळा
डोळ्याचं राखण काय रे दादा
रुंगरुंग पिला रुपया दंडा
दंडा कादू रा दमेली मोंगा
मोंगा कादू रा मोतका निडा
निडा कादु रा निमला बाई
बाई कादु रा पोराडू जुट्टू
जुट्टू कादू रा मिशाला पोट्टू
हडेल पडेल जिंका पिला
पट्टा पेई ते पाम पिला
मुसलदो तसलदो
मुडू कोत्तलं रोयल तेच्या
अचल पचल कारम नूऱ्या
आकिटल्या पेटते आईक मन्या
गुटल्या पेटते गुटूक मन्या

हे गीत म्हणून खांद्यावर असलेल्या झोळीमध्ये घरातील माई, ताई, अक्का वाटीभर ज्वारी टाकायचे. हे दिवस म्हणजे प्रत्येकांच्या घरी शेतातून ज्वारी आलेली असायची त्यामुळे ज्वारी देताना कोणी कुरकुर करायचे नाही. जर कोणी दान दिले नाही तर त्यांच्या नावाने बोंबा मारुन पुढे जायचो. असे आम्ही रोज पंधरा दिवसात पूर्ण गाव पिंजुन काढायचो. जवळपास एक-दीड पायली ज्वारी जमा व्हायची. ते सर्व ज्वारी दुकानात विकून मिळालेल्या पैश्यात खोबऱ्याचे व साखरचे प्रत्येकाला एक-एक मिळेल असे घ्यायचो आणि उरलेल्या पैश्यात रंग घेत असू. होळी च्या सायंकाळी आम्ही सर्व मित्र मारोतीच्या पारा जवळ जेथे होळी तयार केलेली असायची तेथे जमा व्हायचो. वेगवेगळ्या नावाने मग बोंबा मारायचो. गावातील मानकरी वाजत गाजत येऊन होळी पेटवायचा. आम्ही होळी तील जाळ घरी नेऊन छोटी होळी करायचे आणि त्यात खोबरा व हरभरा भाजून खायचो. मग रात्री जेवताना पूरणपोळी आणि कढ़ी ची मजा काही औरच असायची. दुसऱ्या दिवशी सकाळ होण्याची वाटच पाहत असू. सकाळपासून मग मित्रा मध्ये रंग खेळण्याची मजा यायची. कोणी कोणास ओळखू येणार नाही एवढा रंग लावले जायचे. दुपारपर्यंत रंग खेळून झाल्यावर स्नान करून मग घरातच बसायचो. आज परत ते सर्व दिवस आठवू लागले. ते मित्र परत दिसू लागले. परत एकदा छोटे व्हावे आणि खुप मजा करावे असे वाटते. 

आपली आठवण अशीच येत राहो, मित्रांनो आपणा सर्वाना होळी आणि धूलिवंदनच्या रंगबिरंगी शुभेच्छा.
- नासा येवतीकर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
कविता - विविध रंगाची होळी

आली आली बघा हो होळी
खाऊ चला पुरणाची पोळी
अवगुण सारे दहन करून
करु या त्याची राखरांगोळी

आज होळीचे करून पूजन
देऊ पुरणपोळीचा नेवैद्य
खायला कुणा कमी न पडो
मिळत राहो गोडगोड खाद्य

फाल्गुन महिन्याचा चंद्र
आकाशी दिसतो कसा शुभ्र
वसंत ऋतूला होते प्रारंभ
हवामान कोरडे नि निरभ्र

होळीच्या दुसऱ्या दिवशी 
असतो विविध रंगाचा खेळ
विविध रंगात विभागलेल्या
लोकांना एकत्र येण्याची वेळ

लाल पिवळा निळा हिरवा
रंगाने एकमेकांना रंगू या
एकमेकांच्या सुखदुःखात
एकत्रित साजरी करू या

पाण्याचा अपव्यय टाळा
अंडे फेकून मारू नका
कोरड्या रंगाने होळी खेळा
रंगपंचमी बेरंग करू नका

- नासा येवतीकर, 9423625769

होळी आणि धुलीवंदनाच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
कविता - होळी करू या ....

होळी करू या दुर्गुणाची
होळी करू या संशयाची
होळी करू या कुविचारांची
होळी करू या दुराचाराची
होळी करू या द्वेषाची
होळी करू या आळसाची
होळी करू या कपट बुद्धीची
होळी करू या वासनेची
होळी करू या लालसेची
होळी करू या मत्सरेची
होळी करू या व्यसनाची
होळी करू या भ्रष्टाचाराची
होळी करू या वाईट संगतीची
होळी करू या वाईट बाबींची
चला होळी करू या .....

- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
...... होळी रे होळी .....

होळी आली रे बघ होळी आली
नाना रंगाची झोळी घेऊन आली

मनातला राग द्वेष काढून टाक
सांगत आला आहे लाल रंग
सकारात्मक विचार करून वाग
बोलतो आहे हिरवा हिरवा रंग
विचारात क्रांती करण्या आली
होळी आली रे बघ होळी आली

सर्वाना आपल्यात सामावून घे 
संदेश देत आहे बघ रंग निळा
इतरांच्या दुःखाचे निवारण कर
आदेशाने सांगतोय रंग काळा
वागण्यात बदल करण्या आली
होळी आली रे बघ होळी आली

धैर्याने संकटाला तोंड देत राहा
प्रेरणा देत आहे तुला केसरी रंग
प्रगतीसाठी अविरत चालत राहा
प्रोत्साहित करतोय पिवळा रंग
जगण्याची उर्मी देण्या आली
होळी आली रे बघ होळी आली

जीवनातील दुःख विसरायला लावी
आठवण करून देती बालमित्रांची
जात-पात धर्म-पंथ बाजूला सारी
सर्वधर्मसमभावची ओळख ही देती
होळी आली रे बघ होळी आली

आबालापासून वृद्धापर्यत सर्वाना आवडणारी
रंगात न्हाऊन निघती अवघी सृष्टी ही सारी
सर्व सणात आहे ही आगळी वेगळी
होळी आली रे बघ होळी आली

- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ही माहिती आपणास आवडली असेल तर 9423625769 या क्रमांकावर whatsapp करावे.

Tuesday, 11 March 2025

जीवन गाणे (Jeevan Gaane )

जीवन गाणे - आनंदी तराणे
चित्रपटातील गाणे असो वा इतर कोणतेही गाणे कुणाला आवडत नाहीत. लहानापासून थोरांपर्यंत सर्वांनाच गाणे खूप आवडतात. मुळात मनुष्य लहानाचा मोठा होता ते गाणे ऐकतच. गाण्याचा आणि माणसाच्या आयुष्याचा फार जवळचा संबंध आहे. बाळाला छान झोप लागावी म्हणून आई छानशी अंगाई गीत गात असते जसे की निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई ...... त्या गुणगुण्याचा आवाज कानी पडताच बाळ अलगद आपले डोळे मिटतो आणि झोपी जातो. थोडं मोठा झाल्यावर जेव्हा तो चालू आणि पळू लागतो त्यावेळी त्याला बडबड गाणे एकविले जाते आणि बोबड्या बोलीतून बोलाविले जाते. तो आपल्या बोबड्या बोलीत जेव्हा एखादे गाणे म्हणतो तेव्हा आई-वडिलांना किती आनंद होतो. अर्थात गाणे सुरात म्हटले पाहिजे असा आपला अट्टाहास कधीच नसतो आणि तो नसायला ही नको हवे. त्यानंतर मूल ज्यावेळी शाळेत प्रवेश करतो त्यावेळी त्याला अनेक कविता व गाण्याची ओळख होत जाते. पहिल्या आणि दुसऱ्या वर्गात त्या मुलांचा आवडता भाग म्हणजे गाणे. जे शिक्षक या वर्गातील मुलांना जास्तीत जास्त गाणे ऐकू घालतात ते त्या मुलांचे सर्वात प्रिय बाई किंवा गुरुजी म्हणून ओळखल्या जातात. गाण्यात काय ताकद आहे ? हे त्या वर्गाला शिकविणाऱ्या शिक्षकांना चांगलेच ठाऊक असायला हवे. शाळेच्या प्राथमिक वर्गात मुले जे काही काही शिकतात ते त्यांच्या चिरकाल स्मरणात राहतात, त्यात गाण्याची खूप मोठी भूमिका असते. आज पन्नाशी ओलांडलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्याच्या बालपणाविषयी विचारले तर ती व्यक्ती बालपणीची स्मरणात असलेली एखादी कविता गाऊन दाखवितो. यावरून गाण्याची ताकद आपणाला समजून येईल.
माणसाचे वय जसजसे वाढत जाते तसतसे गाण्याची आवड देखील बदलत जाते. पूर्वीच्या काळी गाणे ऐकण्यासाठी रेडिओ हे एकच माध्यम होते. आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणारे गाणी ऐकण्यासाठी कान आसुसलेले असायचे. बऱ्याच आकाशवाणी केंद्रावरून त्याकाळी पत्रव्यवहारावर आधारित आपली आवड किंवा आपकी पसंद अश्या कार्यक्रमात तून गाणी ऐकविले जात असे. आपले आवडते गीत ऐकावे म्हणून बरेच रसिक मंडळी पत्राद्वारे आपल्या आवडीचे गाणे लिहून पाठवत असत यासाठी आजही सिलोन व विविधभारती या आकाशवाणी केंद्राची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मध्यंतरीच्या काळात टेपरेकॉर्डर आल्याने आपल्या मनावर गाणे ऐकण्याची सोय झाली. कॅसेटच्या माध्यमातून अनेकजण आपल्या आवडीचे गाणे ऐकू लागले. गुलशन कुमार यांची टी सिरीज नावाची कंपनी याच काळात भरभराटीस आली होती. अश्याच काळात फक्त गाण्याचा शो म्हणून ऑर्केस्ट्रा खूप चालला होता. अनेक कलाकारांना यामुळे स्टेज शो करण्याची संधी ही मिळाली होती. अनेक जणांनी यातून आपले करिअर देखील घडविले. पण गाण्याच्या या स्टेज शोला देखील गळती लागली. त्यानंतर टीव्हीचा जमाना सुरू झाल्यावर लोकांना गाणे ऐकण्यासोबत बघण्याची संधी उपलब्ध झाली. ज्यावेळी दूरदर्शन ही एकच वाहिनी देशभरात बघितले जायचे त्यावेळी येथे प्रसारित होणारी हिंदी सुमधुर गाण्याची रंगोली कोणी ही विसरू शकत नाही. ह्या कार्यक्रमाने प्रत्येकाच्या रविवारची सकाळ प्रसन्नतेने सुरुवात व्हायची. एका तासाभराच्या कार्यक्रमात एखादे गाणे दिवसभर मनात रुंजी घालायचं. याच टीव्हीमुळे टेपरेकॉर्डर मागे पडून व्हीसीआर पुढे आलं. त्यातून रसिक मंडळी आपले आवडते गाणे वाट्टेल तेव्हा टीव्हीवर पाहू लागले. मग डीव्हीडीचा जन्म झाला. मग श्रोते खूप गाणे एका डीव्हीडी मध्ये पाहू लागले. असे करता करता मोबाईलची क्रांती झाली आणि रेडिओ, टेपरेकॉर्डर, व्हीसीआर, डीव्हीडी हे सर्व एका अडगळीत कोपऱ्यात जाऊन बसले. आज एका क्लीकवर आपणाला आवडणारी गाणी ऐकू शकतो आणि पाहू शकतो. त्याला ना वेळेचे बंधन आहे ना काळाचे. पण अर्थातच जुन्या काळात ठराविक वेळेत मिळणारी मजा या मोबाईलच्या जमान्यात नक्कीच नाही. 
तरी देखील गाणे हे मनाला आनंद व समाधान देणारी एक बाब आहे. म्हणून प्रत्येकाने आपले आवडते गाणे ऐकायला व पाहायलाच पाहिजे. अजून त्यापुढील संतोष मिळविणारी बाब म्हणजे आपला आवाज कसे ही का असेना ते गुणगुण करायला पाहिजे. जसे की एक मराठी गीत आहे, मनाच्या धुंदीत लहरीत ये ना, सखे गं साजनी ये ना. तसे आपण ही गाण्याच्या धुंदीत लहरीत जगायला शिकले पाहिजे. मनावरील ताणतणाव, चिंता, काळजी आणि नैराश्य दूर करण्यासाठी आपल्या मनपसंत गायक गायिका यांच्या आवाजातील सुमधुर आणि कर्णमधुर गाणे ऐकायला पाहिजे. घरात निवांत क्षणी अगदी बारीक आवाजात किशोरदा, रफी साहेब आणि लता दीदी यांचे गाणे घरातील वातावरण अजून प्रसन्न केल्यासारखे वाटते. मित्रांनो, आपल्या जीवनात समाधान मिळविण्यासाठी गाणे ऐकणे हा एक सुंदर पर्याय तुम्हांला कसा वाटतो ? यावर एकवेळ जरूर विचार करावा. 

- नासा येवतीकर, स्तंभलेखक, धर्माबाद
9423625769

Friday, 28 February 2025

वसंतदादा पाटील ( Vasantdada Patil )

*वसंतराव बंडूजी पाटील*

(१३ नोव्हेंबर १९१७ - १ मार्च १९८९) 


महाराष्ट्र राज्याचे पाचवे मुख्यमंत्री. वसंतदादांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. ते पदमाळे, जिल्हा सांगली येथील शेतकरी कुटुंबातील होते. वडील बंडूजी व आई रुक्मिणीबाई. दादांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत झाले. १९३७ मध्ये वसंतदादांनी राजकारणात प्रवेश केला. १९४० मध्ये महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाचा आदेश दिला. त्यात दादांनी भाग घेतला. त्यांना सहा महिन्यांची शिक्षा झाली. १९४२ च्या ‘छोडो भारत’ आंदोलनातही ते सहभागी झाले. ब्रिटिश सरकारने पकड वॉरंट (अधिपत्र) काढून त्यांना पकडण्यासाठी एक हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. अखेर दादा पकडले गेले; दोन वर्षांची शिक्षा झाली; परंतु त्याच दिवशी ते तुरुंगातून पोलिसांच्या बंदुका घेऊन आपल्या काही सहकाऱ्यांसह पळून गेले. त्यांना पुन्हा पकडण्यात आले आणि एकूण तेरा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. १९४६ मध्ये त्यांची मुदतपूर्व मुक्तता झाली. १९५२ मध्ये ते विधानसभेवर निवडून आले. १९६७ पर्यंत ते आमदार होते. १९४८ मध्ये त्यांनी सांगलीला शेतकरी सहकारी साखर कारखाना काढला. त्यानंतर त्यांनी सहकारी तत्त्वावर सूत गिरण्या आणि तेल गिरण्या उभारल्या. म्हणून त्यांना सहकार महर्षी या नावाने ही ओळखले जाते.

वसंतदादा पाटील हे महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष (१९६५), राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंधाचे संचालक व अध्यक्ष (१९७०-७२) व साखर निर्यात मंडळाचे अध्यक्ष (१९७०-७१) होते. यांशिवाय राज्य सहकारी बँक, राष्ट्रीय मिल मजदूर संघ आदी संस्थांचेही ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली (१९६७). १९६९ साली काँग्रेसचे विभाजन झाले. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये मुंबईस काँग्रेसचे अधिवेशन झाले. त्यांनी स्वागताध्यक्ष म्हणून काम केले. दादा १९७१ मध्ये अमेरिका येथे भरलेल्या चौदाव्या आंतरराष्ट्रीय ऊस तज्ञांच्या परिषदेस भारतीय शिष्टमंडळाचे नेते म्हणून हजर राहिले. यापूर्वी तीन वेळा त्यांनी जागतिक प्रवास केला होता. त्या वेळचे मुख्यमंत्री श्री. वसंतराव नाईक यांनी आपल्या मंत्रिमंडळात दादांची पाटबंधारे मंत्री म्हणून नेमणूक केली. ते १९७२ मध्ये विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले. शंकरराव चव्हाणांच्या कारकीर्दीत वर्षभर पाटबंधारे मंत्री होते. पुढे त्यांचा मंत्रिमंडळात अंतर्भाव झाला नाही. त्यानंतर त्यांनी काही दिवस राजकारणातून संन्यास घेतला.

महाराष्ट्रात मार्च १९७७ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत ४८ पैकी वीसच काँग्रेस सदस्य निवडून आले. म्हणून त्यांनी पुन्हा राजकारणात प्रवेश केला. १७ एप्रिल १९७७ रोजी दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मार्च १९७८ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर दादांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस व इंदिरा काँग्रेस यांचे संयुक्त मंत्रिमंडळ अधिकारारूढ झाले. तथापि हे संयुक्त मंत्रिमंडळ समाधानकारक कार्य करू शकत नाही, या कारणास्तव अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीने वसंतदादांना मंत्रिमंडळ बरखास्त करण्याचा आदेश दिला. त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला (१७ जुलै १९७८).

श्रीमती शालिनीबाई या त्यांच्या सुविद्य पत्नी सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान स्थापन केले असून या प्रतिष्ठानाद्वारे महाराष्ट्रात, विशेषतः ग्रामीण भागात, सुसज्ज रुग्णालये उभारण्याची योजना आहे. त्यांच्या कार्यास विनम्र अभिवादन.

( सौजन्य - इंटरनेट )

*संकलन : नासा येवतीकर*

Tuesday, 4 February 2025

डॉ. निला सत्यनारायण ( Nila Satyanarayan )

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त - डॉ. निला सत्यनारायण
डॉ. नीला सत्यनारायण यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९४८ रोजी मुंबईत झाला. त्यांच्या आईचे नाव सुशीला आणि वडिलांचे नाव वासुदेव आबाजी मांडके होते. ते पोलीस विभागात होते. या भारतीय लेखक, कवयित्री आणि प्रशासकीय अधिकारी होत्या. त्यांनी १९७२ च्या बॅचमध्ये भारतीय प्रशासनिक सेवा (IAS) परीक्षा उत्तीर्ण केली आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त म्हणून कार्य केले. 
शिक्षण आणि कारकीर्द : नीला सत्यनारायण यांचे शिक्षण मुंबई, पुणे आणि नाशिक येथे झाले. १९६५ साली दिल्ली स्कूल बोर्डातून संस्कृत विषयात प्रावीण्य मिळवून बोर्डात पहिल्या आल्या. नंतर इंग्रजी वाङ्मय विषयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. १९७२ मध्ये त्यांनी IAS परीक्षा उत्तीर्ण केली. नीला सत्यनारायण यांनी सनदी अधिकारपदाच्या ३७ वर्षांच्या कारकिर्दीत मुलकी खाते, गृहखाते, वनविभाग, माहिती आणि प्रसिद्धी, वैद्यक आणि समाजकल्याण, ग्रामीण विकास यासारख्या अनेक खात्यांत सनदी अधिकारी म्हणून काम केले. धारावीत झोपडपट्टीतील लोकांना निर्यातक्षम चामड्याच्या वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सक्षम करण्यासाठी क्रांतिज्योती महिला प्रशिक्षण अभियान सुरू केले. 

लेखन आणि सांस्कृतिक योगदान : नीला सत्यनारायण यांनी हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषांमध्ये १३ पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे मराठीतील 'एक पूर्ण अपूर्ण' हे आत्मचरित्रपर पुस्तक १० आवृत्त्या ओलांडून पुढे गेले आहे. 'सत्यकथा' हे उद्योजकतेबाबतचे पुस्तक आणि 'एक दिवस (जी)वनातला' हे वन विभागातील अनुभवांवर आधारित पुस्तकही प्रसिद्ध आहेत. त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या आणि काही मराठी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केले. त्यांच्या कथेवरून 'बाबांची शाळा' हा मराठी चित्रपट निघाला, ज्याचे संगीत दिग्दर्शन त्यांनीच केले. 

पुरस्कार : नीला सत्यनारायण यांना त्यांच्या लेखनासाठी आणि सांस्कृतिक योगदानासाठी अनेक पुरस्कार मिळाले, ज्यात केंद्र शासनाचा अहिंदी भाषी लेखक पुरस्कार, 'इंटरनॅशनल लायब्ररी ऑफ पोएट्री'चे इंग्रजी कवितेसाठीचे एडिटर्स ॲवॉर्ड आणि राष्ट्रीय चारित्र्य पुरस्कार यांचा समावेश आहे. 

निधन : १६ जुलै २०२० रोजी करोनाच्या आजारामुळे त्यांचे निधन झाले. 

नीला सत्यनारायण यांची आज जयंती त्या निमित्ताने विनम्र अभिवादन .....!

( वरील माहिती इंटरनेटवरून संकलित केली आहे. )

Friday, 24 January 2025

प्रजासत्ताक दिन ( Republic Day )

प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वाना शुभेच्छा

Thursday, 9 January 2025

विश्व हिंदी दिवस ( World Hindi Day )

विश्व हिंदी दिवस दरवर्षी १० जानेवारी रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश जगभरात हिंदी भाषेचे प्रचार आणि प्रसाराला चालना देणे तसेच जागतिक स्तरावर हिंदीचे महत्त्व अधोरेखित करणे हा आहे.
इतिहास:
हिंदी ही जगातील चौथी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. हिंदी भाषा जगभरात अनेक ठिकाणी शिकली आणि बोलली जाते. पहिल्या क्रमांकावर इंग्रजी भाषा, दुसऱ्या क्रमांकावर मंदारिन आणि तिसऱ्या क्रमांकावर स्पॅनिश भाषा आहे. जगात हिंदीचा विकास व्हावा आणि आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून तिचा प्रचार व्हावा या उद्देशाने जागतिक हिंदी परिषदा सुरू झाल्या. १० जानेवारी १९७५ रोजी नागपुरात पहिली जागतिक हिंदी परिषद झाली.
पहिल्या जागतिक हिंदी परिषदेचे(World Hindi Diwas 2022) उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केले होते. संमेलनाशी संबंधित राष्ट्रीय आयोजन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष बी.डी.जट्टी होते. मॉरिशसच्या भूमीवर दुसऱ्या जागतिक हिंदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. १९८३ साली भारताची राजधानी दिल्ली येथे तिसरी जागतिक हिंदी परिषद आयोजित करण्यात आली होती.
या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून २००६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी १० जानेवारी हा दिवस "विश्व हिंदी दिवस" म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. 
उद्देश:
1. हिंदी भाषेला आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय बनवणे.
2. परदेशातील भारतीय समुदायामध्ये हिंदी भाषा आणि संस्कृती टिकवून ठेवणे.
3. हिंदी भाषेचा विविध क्षेत्रांमध्ये (शिक्षण, साहित्य, माध्यम) वापर वाढवणे.
साजरा करण्याचे स्वरूप:
परराष्ट्र मंत्रालय, भारतीय दूतावासे आणि वाणिज्य दूतावासांद्वारे विविध कार्यक्रमांचे आयोजन.
हिंदी साहित्य, भाषण स्पर्धा, कविता वाचन, चर्चासत्रे आयोजित करणे.
परदेशातील भारतीय विद्यार्थी आणि हिंदीप्रेमींना भाषेच्या महत्त्वाबद्दल माहिती देणे.
जागतिक पातळीवर हिंदीची ओळख निर्माण करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर.
हिंदीचे जागतिक महत्त्व:
हिंदी ही जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक आहे.
हिंदीचे साहित्य, चित्रपट (बॉलीवूड), आणि संगीत यामुळे तिचे आंतरराष्ट्रीय महत्त्व वाढले आहे.
हिंदी दिवस आणि विश्व हिंदी दिवसातील फरक:
हिंदी दिवस हा भारतात १४ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.
विश्व हिंदी दिवस हा १० जानेवारी रोजी जागतिक स्तरावर हिंदीच्या प्रचारासाठी साजरा केला जातो.

विश्व हिंदी दिवस हा हिंदी भाषेचा जागतिक प्रचार-प्रसार करणारा महत्त्वाचा उपक्रम आहे, जो भारतीय भाषा आणि संस्कृतीला जागतिक पातळीवर प्रतिष्ठा मिळवून देतो.

संकलन - नासा येवतीकर

जागतिक जल दिन ( World Water Day )

22 मार्च - जागतिक जल दिन त्यानिमित्ताने लेख                 जल है तो कल है  पाणी म्हणजे जल किंवा नीर असे ही म्हटले जाते. सजीवांन...