नोंदणीचे महत्व
युनिसेफच्या एव्हरी चाईल्ड ब्राईट ईनेकविट्स अँड बर्थ रजिस्ट्रेशन या नुकतेच प्रकाशित करण्यात आलेल्या 161 देशातील आकडेवारी विश्लेषणाचा अहवालानुसार भारतात प्रत्येक तीन मुलामागे एकाच्या जन्माचे कोणतीही नोंद नसते. पाच वर्षाखालील अशा अनोंदणीकृत मुलांची संख्या तब्बल 71 दशलक्ष असून जागतिक पातळीवर हीच संख्या दोनशे तीस दशलक्ष अशी आहे. यानुसार भारतात जन्म नोंदणीचे प्रमाण 41 टक्के आहे जी की जगात सर्वात कमी आहे. भारतातील हिंदू व मुस्लिम या दोन सर्वाधिक लोकसंख्येच्या समुदायात जन्म नोंदणीचे प्रमाण सर्वांत कमी असून याच्या तुलनेत अल्पसंख्यांक जैन व शीख समुदायात प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे. जन्माची नोंद करणे ही बाब अधिकाराहून अधिक आहे. मुलांना त्यांचा अधिकार नाकारला जाणार नाही, याची हमी आहे, असे युनिसेफच्या उपकार्यकारी संचालक गीताराव गुप्ता यांनी म्हटले आहे. युनिसेफने प्रकाशित केलेला अहवाल तमाम भारतीयांसाठी निश्चितच अभिमानास्पद नाही. जन्म नोंदणीचे प्रमाण एवढे कमी का होत असेल ? यावर काही उपाय करता येतील का ? याविषयी देशपातळीवर चर्चा, सभा, सल्लामसलत होऊन या अनुषंगाने विचार करणे योग्य वाटते.
जगाच्या तुलनेत भारतात जन्म नोंदणीचे प्रमाण अत्यंत कमी असण्याची अनेक कारणे आहेत. ज्यामुळे देशातील जनता या बाबीकडे दुर्लक्ष करते, कानाडोळा करते.
जनतेचे अज्ञान - भारतात सर्वात जास्त अज्ञानी, निरक्षर लोकांचे वास्तव्य आहे, हे सत्य नाकारून चालणार नाही. याच अज्ञानामुळे जनतेला जन्मनोंदणीचे महत्व लक्षात येत नाही. आणि ते या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. जर कधी या विषयाच्या संदर्भात काम पडले तर या जन्म नोंदणीची आठवण येते. तसेच जन्म नोंदणीला म्हणावे तसे महत्त्वाचे स्थान देण्यात आले नाही.
वयाची सहा वर्षे पूर्ण झालेल्या मुलास पहिल्या वर्गात प्रवेश दिला जातो. मात्र प्रवेश देताना जन्म नोंदणी कार्यालयातील प्रमाणपत्राकडे पालक आणि शाळा सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात, असे बहुतांश ठिकाणी घडते. मुलास शाळेत प्रवेश देताना पालकांनी मुलांची जी जन्म तारीख सांगेल तीच त्याची जन्मतारीख आयुष्यभर सोबत जोडली जाते. ग्रामीण भागात तर पालक शिक्षकांनाच विचारतात आणि अंदाजित तारीख ठरविण्याचे प्रकार सध्या नाही. मात्र वीस- पंचवीस वर्षापूर्वी नक्कीच घडल्याची अनुभव ऐकण्यास मिळतात. म्हणूनच बहुतांशवेळा शाळा जून महिन्यात उघडली जाते. तेव्हा अंदाजित तारीख टाकताना जून महिन्यातीलच तारीख घेतली जाते. त्यामुळे एकतर मुलाचे वय सहा वर्षे पूर्ण होतात आणि सर्वाच्या समस्या संपुष्टात येतात. त्याऐवजी जन्म नोंदणी प्रमाणपत्राच्या आधारावर प्रवेश देण्याची प्रक्रिया बंधनकारक केल्यास बऱ्याच समाधानकारक गोष्टी घडू शकतात.
शासनाने नुकतेच शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 ची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. ज्यात पालकांनी आपल्या पाल्यांच्या जन्माबाबत स्वयं घोषणापत्र दिल्यानंतर त्यांच्या पाल्यास वयानुसार वर्गात थेट प्रवेश देणे शाळांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे त्यामुळे परत एकदा या जन्म नोंदणीला दुय्यम स्थान दिल्यासारखे वाटते. तर थेट वर्गात प्रवेश देण्याची मुभा मिळाल्यामुळे बहुतांश पालक आपल्या पाल्यांचे खरे वय लपवून त्यास खालच्या वर्गात प्रवेश घेण्याकडे त्यांचा कल वाढत आहे. आपली पाल्य जास्तीत जास्त काळ शाळेत कशी राहतील ? आणि शासनाच्या विविध योजनेचा लाभ कसा उठविता येईल ? या दृष्टीनेही काही पालक नक्कीच विचार करत असतील तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे निश्चितच नसेल. त्यास्तव जन्म नोंदणीचे प्रमाण वाढवायचे असेल तर मुलांचे नाव शाळेत प्रवेश करताना त्यासोबत जन्म नोंदणीचे प्रमाणपत्र बंधनकारक केल्यास याचे प्रमाण निश्चितपणे वाढू शकेल आणि गैरमार्गावर सुद्धा आळा बसू शकेल
जन्म नोंदणी कार्यालयाकडून होणाऱ्या जन्म प्रमाणपत्राला सध्या महत्त्वाचे असे स्थान न दिल्या गेल्यामुळे या बाबीकडे दुर्लक्ष झाले आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. मूल जन्माला आल्यानंतर एका महिन्याच्या आत जन्म नोंदणी कार्यालयात त्याची नोंद करणे आवश्यक आहे. मात्र बहुतांश पालक या बाबीकडे कानाडोळा करतात कारण त्यांना या नोंदणीची कुठेही गरज पडत नाही किंवा त्याचे महत्त्व माहीत नाही. त्याचसोबत शासनाच्या उदासीन धोरणामुळे सुद्धा या जन्म नोंदणीचे प्रमाण वाढताना दिसून येत नाही. बऱ्याच वेळा पालक आपल्या पाल्याची जी तारीख सांगतील तीच तारीख जन्म पत्रावर टाकून सक्षम अधिकारी सही व शिक्का मारून मोकळे होताना दिसून येतात. मात्र त्यांची सरकारी दस्तऐवजात ठराविक वेळात नोंदणी झाली आहे किंवा नाही याची साधी खातरजमा केली जात नाही ही फार मोठी शोकांतिका आहे. पालकांना ज्या वेळेस त्या जन्म प्रमाणपत्राची गरज भासते त्याच वेळेस ते या कार्यालयाकडे फिरकतात. ज्याचे काम पडत नाही ते इकडे येतच नाहीत आणि नोंदणी करीत नाहीत. त्याचे काम जर सरकारी सक्षम अधिकाऱ्यांनी रोखून ठेवले असते तर कदाचित लोकांना त्याचे महत्त्व कळाले असते. परंतु ही बाब छोटीसी आहे त्यासाठी जनतेला वेठीस धरल्यासारखे होईल म्हणून कोणीही ही बाब गांभीर्याने घेत नाही हेही तेवढेच सत्य आहे. त्यासाठी पालक आणि सरकारी सक्षम अधिकारी दोघांनी मिळून या जन्म नोंदणीचे महत्व लक्षात घेतले तर येणाऱ्या काळासाठी ही एक चांगली सोय होऊ शकते. आज आपण प्रत्यक्ष अनुभव घेत आहोत की 20 ते 30 वर्षापूर्वी कसल्याच प्रकारची नोंदणी केल्या जात नव्हती त्यामुळे किती समस्या निर्माण होत आहेत ? जुने कागदपत्र मिळवताना ते कसे मिळतात आणि त्यासाठी कसा खटाटोप करावा लागतो ? याचा अनुभव जसा आपणाला येतो तसा अनुभव आपल्या पुढच्या पिढीला येऊ नये हे लक्षात घेऊन जन्म नोंदणीचे महत्व सर्वांनी गरजेचे आहे असे वाटते.
जन्म आणि मृत्यू हे जीवनाचे दोन भाग आहेत, ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू अटळ आहे, यात शंकाच नाही. त्यास्तव जन्म नोंदणीसोबत मृत्यूची नोंदणी करणे सुद्धा आवश्यक आहे. जन्मा एवढेच मृत्यूची नोंद ही महत्वाचीच आहे. कुटुंबातील एखादा व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो त्यामुळे त्या कुटुंबातील व्यक्ती ही मृत्यूची नोंद करण्याच्या मनःस्थितीत नसतो, हे सत्य आहे. मात्र त्याचे नातलग किंवा मित्र परिवारातील एखादा व्यक्तीने हे काम निश्चितपणे करू शकतील किंवा एका महीन्याच्या कालावधीत कुटुंबप्रमुख याची नोंदणी करू शकतात. याउपरही सरकारी सक्षम अधिकाऱ्याने संबंधित कुटुंबाची भेट घेऊन तशी नोंद घेण्याचे काम केल्यास ती नोंदणी पूर्ण होईलच शिवाय कुटुंबाचे सांत्वन सुद्धा होईल. मात्र प्रत्यक्षात असे घडताना दिसून येत नाही. मतदार याद्या कित्येकदा तरी नव्याने तयार केल्या जातात तरी त्यात मयत व्यक्तीचे नाव समाविष्ट असतेच असते हे असे का घडते ? कदाचित सक्षम अधिकाऱ्यांना मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी सक्षम पुराव्याची गरज भासते ते त्यांना मिळत नसेल. मात्र मृत्यु प्रमाण पत्र दाखल करून कुटुंब प्रमुखाला किंवा सक्षम अधिकाऱ्यांना हे काम सहजपणे करता येईल. त्याचसोबत मृत्यु प्रमाणपत्रानेच विविध ठिकाणी काम पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यास्तव जन्म नोंदणी सोबत मृत्यूची नोंद करणे ही महत्त्वाचे आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
जन्म आणि मृत्यू एवढेच विवाहाची नोंदणी करणे सुद्धा गरजेचे आहे. मात्र या बाबीकडे सुद्धा आपण तेवढे लक्ष देत नाही. कारण या नोंदणीचा जीवनात कुठेही काम पडत नाही असे वाटते. तसेच शासनाने ह्या नोंदणीला ही महत्त्वाचे असे स्थान दिले नाही. त्यामुळे जनता या नोंदणीकडे सुद्धा साफ दुर्लक्ष करते. त्याचसोबत जनतेत याविषयी जागरूकता निर्माण केल्या गेले नाही. बहुतांश वेळा जीवनात आपणाकडे सक्षम नोंदणीचा पुरावा उपलब्ध होत नसल्यास अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. ज्यावेळी अडचण निर्माण होते त्याचवेळी अशा नोंदणीची आठवण येते म्हणजे तहान लागल्यावर विहीर खणण्यासारखे प्रकार घडतात.
लग्न होऊन सासरी आलेल्या नववधूचे नाव मतदार यादीत समाविष्ट व्हावे म्हणून प्रत्येकजण लग्नपत्रिका जोडतात आणि त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट केल्या जाते. ही प्रक्रिया अधूनमधून पहावयास मिळते. भारतातील विवाहाच्या बाबतीत कायद्यानुसार ज्या मुलीचे वय अठरा वर्षे पूर्ण आहेत तिचेच लग्न लावले जातात. तिचे लग्न झाले याचा अर्थ ती वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेली आहे. मतदार म्हणून सुद्धा वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेली व्यक्ती पात्र समजली जाते. असा ढोबळ अंदाज बांधून ही प्रक्रिया पूर्ण होत असेल तर या सर्व प्रक्रियेला शासन कधी डोळसपणे बघणार आहे का ? असा प्रश्न उपस्थित होतो. निवडणूक आयोगाने सुद्धा याकडे लक्ष दिल्यास काही महत्त्वपूर्ण बदल समाजात होऊ शकतात. ग्रामीण भागात आजही वयाची अठरा वर्षे पूर्ण न झालेल्या मुलीचे लग्न अगदी सर्रासपणे लावले जातात आणि लग्नपत्रिका जोडून ती मतदानास पात्र नसतानाही मतदार यादीत समाविष्ट केल्या जाते. निवडणूक आयोगाने यात लक्ष देऊन नवीन मतदारांचे नाव यादीत समाविष्ट करताना जन्म किंवा विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र बंधनकारक केल्यास लोकांचा नोंदणी करण्याकडे कल वाढू शकेल. यासोबतच विवाहाची नोंदणी करताना वर-वधू यांना वयाचा पुरावा दाखल करण्याची सक्ती केल्यास अनेक बालविवाह आपसूकच थांबविता येऊ शकतील. याबाबतीत काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी हा प्रश्न उचलून धरले तर भविष्यात समाजात चांगला बदल दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज सुद्धा काही लग्न मंदिरात लावले जातात, काही अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविले जाते आणि तिच्यासोबत लग्न केले जाते. अनैतिक संबंधातून ही काही अल्पवयीन मुलींची लग्न लावले जाते या व अशा अन्य गैरमार्गावर आळा घालण्यासाठी विवाह नोंदणी बंधनकारक करणे अत्यावश्यक आहे. नोंदणी कार्यालयाची संमती मिळाल्याशिवाय जे लग्न होतील ते सारेच अवैध ठरविण्यात येऊ लागली की विवाह नोंदणीचे महत्त्व नक्कीच वाढू लागेल.
मनुष्याच्या जीवनातील जन्म, विवाह आणि मृत्यू हे पुन्हा पुन्हा न घडणाऱ्या घटना आहेत. त्यामुळे त्याची योग्य वेळी नोंद करणे भविष्यासाठी हे महत्त्वाचे आहे हे सर्वांनी लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे.
- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769
No comments:
Post a Comment