नासा येवतीकर
या ब्लॉग वरील सर्व लेखाचे हक्क सौ.अर्चना नागोराव येवतीकर यांच्याकडे आहेत. परवानगी शिवाय लेख फॉर्वर्ड किंवा प्रकाशित करू नये पाऊलवाट पुस्तकाचे प्रा. इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते प्रकाशन
Tuesday, 19 November 2024
मतदान जनजागृती ( Voting Awarness )
Friday, 15 November 2024
निवडणुका आणि मतदान ( Election & Voting )
सार्वत्रिक निवडणूक आणि मतदान
निवडणुका आल्या की मतदार आणि मतदान याविषयी खूप चर्चा, विचारविनिमय, खलबतं केल्या जातात. निवडणुका संपल्या की याविषयी मात्र कोणी काहीच बोलत नाही. या निवडणुकाच्या काळात सर्वात चर्चिला जाणारा विषय म्हणजे मतदानाची टक्केवारी. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सरासरी 50 ते 60 टक्केच्या आसपास मतदान होते. तर स्थानिक पातळीवरील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत स्तरावरील मतदान मात्र वाढलेली दिसून येते. असे का होत असेल ? यावर जराशी चर्चा होणे क्रमप्राप्त आहे.
2019 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड,तेलंगणा, गुजरात, पंजाब, राजस्थान, जम्मू-काश्मीर आणि झारखंड या 11 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये राष्ट्रीय सरासरी 67.40% पेक्षा कमी मतदान झाले. सन 2019 मध्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी मतदान झालेल्या 11 राज्यांमधील एकूण 50 ग्रामीण लोकसभा मतदारसंघांपैकी 40 लोकसभा मतदारसंघ हे उत्तर प्रदेश (22 पीसी) आणि बिहार (18 पीसी) मधील आहेत. उत्तरप्रदेशात, 51- फुलपूर लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी 48.7% मतदान झाले, तर बिहारमध्ये, 29-नालंदा लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी 48.79% मतदान झाले.
महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभा आणि विधानसभेच्या मागील निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवर नजर टाकल्यास एक गोष्ट स्पष्ट होते की, मतदानाची टक्केवारी 60 च्या आसपास राहते अर्थात 40 टक्के जनता मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी होत नाही. निवडणूक आयोग दरवर्षी विविध उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करत असते तरी देखील या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी का वाढत नाही ? हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. यास अनेक घटक कारणीभूत आहेत.
मतदारांची उदासीनता - होय, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदार निरुत्साही दिसून येतो. वास्तविक पाहता देश आणि राज्याच्या विकासासाठी मतदारांनी या निवडणुकीत हिरीरीने सहभाग नोंदवून आपला आवडता नेता निवडायचं असते आणि देश व राज्याच्या संसदेत पाठवायचे असते. मात्र बहुतांश मतदार या निवडणुकीत मतदान करण्याविषयी तेवढे उत्साही दिसून येत नाहीत जेवढे उत्साही अन्य निवडणुकीत दिसतात. मतदारांसोबत उमेदवारांचे कार्यकर्ते देखील तेवढे उत्साही जाणवत नाहीत जेवढे स्थानिक निवडणुकीत आपले प्राण पणाला लावून काम करतात. मतदारांमध्ये असलेली ही उदासीनता काढण्यासाठी काही उपाययोजना आखणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सहभाग नोंदविलेल्या प्रत्येक मतदाराला एक वेगळं प्रमाणपत्र द्यावे आणि त्या प्रमाणपत्राचा वापर पाच वर्षासाठी करता यावं. मतदान केलेल्या मतदारांना कोणत्याही शासकीय कामात तहसील, असो वा जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत स्तरावरील कोणतेही काम पहिल्या प्राधान्याने पूर्ण करण्याची नियमावली तयार करावी. ज्यामुळे देशातील प्रत्येक नागरिक मतदान करण्यास तयार होईल. आजकाल देशातील जनता ही पूर्णपणे स्वार्थी झाली आहे नव्हे त्याला स्वार्थी बनविण्यात येत आहे. देशभक्ती नावाची चीज आज इतिहासजमा झाली की काय ? अशी शंका येत आहे. मतदारांची मानसिकता अशी झाली आहे की, मी मतदान केलो तर मला काय मिळते ? जर मला काहीच मोबदला मिळत नसेल तर मी का मतदान करू ? अशी मानसिकता आज खूप वाढली आहे. त्यामुळे कोणताही मतदार आपला रोजगार बुडवून या प्रक्रियेत सहभागी होतांना दिसून येत नाही. आपल्या मूळ गावापासून दूर असलेले मतदार स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून मतदान करण्यासाठी येत नाही. हजारात एखादा मतदार तसा आढळतो, तेव्हा त्याच व्यक्तीला इतर मतदार मूर्खात काढतात. काय गरज होती एवढ्या दुरून मतदान करायला यायची ? तुझ्या एका मताने काय फरक पडणार ? पण निवडणुकीत एका-एका मताला किंमत आहे, याची जाणीव अजून ही मतदारांमध्ये झालेली नाही. या निवडणुकीत मतदारांची संख्या लाखाच्या घरात असल्याने माझ्या एका मताला काय किंमत आहे ? असे वाटणे साहजिक आहे. मात्र थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीनुसार एका एका मताचे लाखात रूपांतर होत असते. म्हणून मतदारांनी आपल्या मनात किंतु परंतु अशी कोणतीही शंका मनात न आणता देशाची लोकशाही भक्कम करण्यासाठी मतदान करायलाच हवे.
शिक्षण व नोकरी - मतदानाची टक्केवारी कमी होण्यामागे दुसरे कारण म्हणजे शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने बाहेर गावी राहत असलेल्या मतदारांची संख्या प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आढळून येते. व्यक्तीचे अठरा वर्ष पूर्ण झाले की तो भारताचा नागरिक बनतो आणि त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होतो. त्याच्या आई-वडिलांसोबत त्याचे नाव मतदार यादीत समाविष्ट होते. पण त्याचे शिक्षण चालू असल्याने तो आपल्या आई-वडिलांसोबत न राहता शिक्षणासाठी आपल्या गावापासून शहरापासून दूर राहतो. या वयातील मतदारांच्या मनात निवडणुकीविषयी खूप उत्साह असतो पण घरातील वडील मंडळी मतदानास येण्यास मज्जाव करतात. तुझ्या एका मताने काही फरक पडणार नाही. येणे-जाणे अवांतर खर्च नको, जाणे-येण्याचा त्रास नको, त्यापेक्षा अभ्यासाकडे लक्ष दे असे त्यास बोलल्याने तो देखील या निवडणुकीत मतदानापासून वंचित राहतो. तसेच काही मतदार रोजगार वा नोकरीच्या निमित्ताने आपल्या मतदान केंद्रापासून बरेच दूर असतात. ते देखील आपला रोजगार बुडवून किंवा एखादी रजा टाकून मतदान करण्याबाबत विचार करत नाहीत. तसेच काही नागरिक कामाच्या शोधात मोठ्या शहरात येतात. गावाकडे मतदार यादीतील नाव कमी न करता याठिकाणी येऊन ते मतदार यादीत नाव समाविष्ट करतात. निवडणूक विभागाने याबाबीवर काम करणे आवश्यक आहे. नागरिकांचे नाव मतदार यादीत फक्त एकाच ठिकाणी समाविष्ट करता यावे. काही मतदारांची तर एकाच मतदान केंद्रावर दुबार नावे आलेली दिसून येतात. हे तर इतर गावातील नागरिक असल्याने त्यांची नावे दुसरीकडे असल्याबाबत काही पुरावा नसतो. ज्याप्रकारे एका व्यक्तीचा एकच आधार निघू शकतो तसेच काही या मतदान ओळखपत्राच्या बाबतीत कार्यवाही होणे आवश्यक आहे. त्याशिवाय निवडणूक प्रक्रियेत मतदानाची टक्केवारी वाढणार नाही. बरेच मतदार मात्र ज्यावेळी ते शहर सोडून निघून जातात त्यावेळी मतदार यादीतून नाव कमी करत नाहीत. लग्न होऊन सासरी गेलेल्या बऱ्याच मुलीचे नाव माहेरच्या मतदार यादीत तसेच राहून जातात. मृत्यू झालेल्या मतदारांची नावे देखील मतदार यादीत राहून जातात. कुटुंब प्रमुखांनी त्यांचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे कष्ट घेत नाहीत. मतदार यादीत नाव समाविष्ट करणे सोपे आहे मात्र यादीतून नाव कमी करणे खूप कठीण गोष्ट आहे. कारण नाव कमी करतांना पुरावा जोडणे आवश्यक असतो, बहुतांश वेळा पुरावा उपलब्ध होत नसल्याने ती नावे तशीच मतदार यादीत राहून जातात आणि मतदानाच्या टक्केवारीमध्ये फरक पडतो. शासनाच्या डिजी लॉकरमध्ये आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड आणि इतर महत्वाचे कागदपत्रे समाविष्ट करण्यात आलेली आहेत तसे निवडणूक ओळखपत्र देखील समाविष्ट केल्यास मतदारांची सोय होईल.
भारत देश स्वतंत्र होऊन सत्याहत्तर वर्षे होऊन ही गेले. देशात 14 वी लोकसभा स्थापन देखील झाली मात्र अजून ही बहुतांश जनतेला आपल्या मतदानाचा अधिकार कळाला नाही, हक्क कळले नाही आणि कर्तव्याची जाणीव झाली नाही. खरंतर जे मतदार निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी होत नाही, आपले मत व्यक्त करत नाही, त्याला या देशाच्या समस्या व विकासाबाबत काहीतरी देणे-घेणे असेल का ? अर्थातच नाही. जोपर्यंत देशाचा प्रत्येक नागरिक निवडणुकीच्या प्रक्रियेत पूर्णपणे सहभागी होत नाही तोपर्यंत या देशाचा विकास खऱ्या अर्थाने होणारच नाही. यासाठी निवडणूक आयोगाने मतदान केल्याने काही कल्याणकारी योजनेचे लाभ मिळू शकेल अश्या प्रमाणपत्राचे आमिष तरी द्यावे जेणेकरून त्या ऑफरचा स्वीकार करून मतदार मतदान करण्यासाठी प्रयत्नशील राहील, असे वाटते.
- नासा येवतीकर, स्तंभलेखक, धर्माबाद
9423625769
Monday, 28 October 2024
आनंददायी दिवाळी ( Happy Diwali )
दिवाळी सण लहानापासून वृद्धांपर्यंत सर्वानाच आवडता सण आहे. प्रत्येकालाच या सणाची उत्सुकता लागलेली असते. कोजागिरी पौर्णिमा संपला की दिवाळीची चाहूल लागते. घराच्या छतावर किंवा अंगणात आकाशकंदील लावला की दिवाळीची प्रतीक्षा सुरू होते. दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. अंधार दूर सारून प्रकाश देणारा सण. लक्ष लक्ष दिव्याने सारा परिसर तेजोमय होतो. सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असते. इतर सर्व सण एका दिवसात संपतात मात्र दिवाळी हा सण पाच दिवस असतो. वसूबारसपासून चालू चालला सण धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, बलीप्रतिपदा म्हणजे पाडवा अर्थात दिवाळी आणि त्यानंतर शेवटी भाऊबीज सणाने संपन्न केला जातो. प्रत्येक दिवसाचे महात्म्य वेगळे आहे आणि महत्व देखील वेगळे आहे.
दिवाळी सणामुळे बाजारात एक नवचैतन्य निर्माण होते. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल करणारा हा सण आहे. घराघरांत फराळाची तयारी केली जाते, त्यामुळे किराणा दुकानातील सर्वात जास्त खरेदी महिला वर्गाकडून केली जाते. साखर, पोहे, शेंगदाणे, गोडेतेल, रवा, मैदा याची सर्वात जास्त मागणी याच दिवाळीच्या काळात केली जाते. वर्षभर जेवढा माल विकल्या जात नाही तेवढा माल या दिवाळीच्या काळात विकला जातो. त्यानंतर कपड्याच्या खरेदीवर देखील लोकांचा कल दिसतो. दिवाळी म्हटले की नवे कपडे आलेच. लहान मुलांना तर दिवाळीची खास करून कपड्यासाठी आकर्षण असते. तसेच माहेरी आलेल्या मुलींना नवे कपडे करून सासरी पाठविण्याची जुनी प्रथा आहे. नुकतेच लग्न झालेल्या मुलींचा व जावईचा दिवाळीसण देखील करावा लागतो. म्हणूनच या काळात कपड्याच्या दुकानात लोकांची एकच गर्दी दिसून येते आणि दुकानदार देखील एकावर एक फ्री देऊन ग्राहकांना आकर्षित करत असतात. दिवाळी आणि फटाके यांचा अनोखा संबंध आहे. फटाक्यांशिवाय दिवाळी अशक्यप्राय वाटते. खास करून लहान व किशोरवयीन मुले फटाक्यांची मागणी करत असतात. त्यामुळे दहा-अकरा दिवस या दुकानाची देखील रेलचेल असते. काही व्यापारी फटाक्याच्या विक्रीतून वर्षभराची कमाई करत असतात. त्यानंतर लोकांचा खरेदीचा कल असतो तो चैनीच्या वस्तूकडे. दिवाळी निमित्ताने प्रत्येक कंपनी काही ना काही ऑफर ठेवून ती चैनीची वस्तू लोकांनी विकत घ्यावी अशी जाहिरात करत असतात. आपल्या घरात कोणत्या वस्तूची कमतरता आहे आणि आपले बजेट किती आहे ? यानुसार लोकं कलर टीव्ही, फ्रीज, ए सी, मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटरसह चार चाकी वाहनांची खरेदी करतात. तर काही लोकं पाडवाच्या शुभ मुहूर्तावर सोने वा घराची खरेदी करतात. अश्या लोकांची संख्या जरी कमी असले तरी आर्थिक उलाढालीमध्ये यांच्या खरेदीचे देखील महत्वपूर्ण योगदान असते. त्याचसोबत भाजीपाला मार्केटमध्ये देखील खरेदीची तेजी दिसून येते. फराळासाठी लागणाऱ्या विविध वस्तूची खरेदी करावीच लागते. दिवाळी म्हणजे विद्युत रोषणाई, त्यामुळे वीजेवर चालणाऱ्या विविध आकर्षक लायटिंग वस्तूची बाजारात खूप मागणी होते, त्याच अनुषंगाने दरवर्षी नवनवी डिझाईनच्या वस्तू लोकांना आकर्षित करतात. याच दिवाळीच्या काळात लोकांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी येणे-जाणे होते. बच्चे कंपनीला सुट्या असल्याने घराघरात सहलीचे नियोजन होते. काही लोकं यासाठी सार्वजनिक वा खाजगी वाहनाचा वापर करतात तर काहीजण आपल्या स्वतःच्या वाहनाने प्रवास करतात. त्यामुळे ट्रॅव्हल्स, बस आणि रेल्वेमध्ये प्रवाश्याची एकच गर्दी अनुभवयास मिळते. त्यानिमित्ताने पर्यटन स्थळावरील हॉटेल व लॉज फुल्ल होतात. त्यामुळे त्यांची देखील एकप्रकारे चांदीच होते नाही का ! म्हणजेच दिवाळी हा सण माझा, तुमचा एकट्याचा नसून समाजातील सर्व घटकांचा आहे. म्हणूनच दिवाळीच्या पर्वात सर्वत्र आनंदी आनंद वातावरण दिसून येते.
याच दिवाळीत अजून एक गोष्ट प्रकर्षाने आपल्या भेटीला येत असतात ते म्हणजे दिवाळी अंक. विविध नियतकालिक, दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक आणि मासिक अंक प्रकाशित करणारे या दिवाळीत हमखास विशेषांक काढतात. त्याचसोबत काही विशेष मंडळी दरवर्षी आपला दिवाळी अंक प्रकाशित करतात. पुस्तकाच्या स्टॉलमध्ये हे दिवाळी अंक वाचकांचे लक्ष वेधून घेतात. काही वाचक खास करून या दिवाळी अंकाची आतुरतेने वाट पाहतात. साहित्यिक मंडळी देखील आपल्या लेखणीने वाचकांची दिवाळीच्या फराळासोबत वाचनाची भूक भागविण्यासाठी विविध प्रकारच्या साहित्याची मेजवानी देतात. वर उल्लेख केलेल्या बाजारपेठेप्रमाणे या व्यवहारात जास्त मोठा आर्थिक उलाढाल दिसत नसला तरी दिवाळीची परंपरा जतन करण्याचे काम हे दिवाळी अंक करत असतात. आपण सर्व वाचक वर्गानी दरवर्षी एक तरी दिवाळी अंकाची खरेदी करून वाचन करण्याची सवय लावून घ्यावी म्हणजे आपल्या घरात ही परंपरा कायम चालत राहील आणि दिवाळी अंकाला ही अच्छे दिन येतील, असे वाटते.
महाराष्ट्रातीलच नव्हे तर मराठी भाषेवर नितांत प्रेम करणारी इतर राज्यातील मराठी भाषिक लोकांनी देखील अंकासाठी लेखन करत असतात. यावर्षी नुकतेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, हे आपल्या सर्वच मराठी लोकांसाठी अभिमानाची बाब आहे. नुसता अभिजात दर्जा मिळवून चालणार नाही तर त्यासाठी प्रत्येक मराठी माणसांनी आपली मते आपल्या बोली भाषेतून विविध साहित्य प्रकारातून व्यक्त करत राहणे आवश्यक आहे. वाचकांची संख्या वाढविण्यासाठी लेखकांनी नेहमी लिहीत राहायला हवे आणि लिहित्या हातांना बळ देण्याचे काम हे दिवाळी अंक नेहमीच करत असतात. म्हणून वाचकांनी दिवाळीच्या फराळासोबत दिवाळी अंकाचे देखील उत्स्फूर्तपणे स्वागत करावे आणि एका तरी अंकाचे वाचन करावे. सर्व वाचकांना दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा .......!
- नासा येवतीकर, स्तंभलेखक
Wednesday, 9 October 2024
ललाटरेषा पुस्तक परिचय ( Lalatresha book review )
Sunday, 6 October 2024
वणीची सप्तशृंगी ( Saptashgungi )
वणीची सप्तश्रृंगी
सप्तशृंगी हा गड नाशिक जवळील नांदुरी गावाजवळ वसलेला असून अनेक कुटुंबांची आराध्यदैवत असलेल्या सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र आहे. हे महाराष्ट्रातील देवीच्या महाराष्ट्रात असलेल्या. ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी असे मानले जाते. आदिशक्तीचे हे मूळ स्थान आहे असे मानले जाते. देवीचे अठराभुजा सप्तशृंग रूप येथे पहावयास मिळते. ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे. येथील गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन घडते. या मंदिरात दरवर्षी शाकंभरी नवरात्रोत्सवही साजरा केला. या काळात भाविकांची खूप मोठी गर्दी असते. आईसमोरची सजावट फळे आणि भाज्यांनी केली जाते. शाकंभरी देवी नवरात्रीची सुरुवात आई शाकंभरीपासून झाली आहे, ज्यांचे शक्तीपीठ उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील डोंगराळ भागात आहे, जे उत्तर भारतातील एक मोठे शक्तीपीठ आहे.
सप्तशृंग येथे वास्तव्य करणारी करणारी देवी म्हणजेच सप्तशृंगी असे मानले आहे. दंडकारण्यात राम-सीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथात उल्लेखलेले सापडते. पौराणिक कथांनुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केले. महानुभवी लीळाचरित्रात असा उल्लेख आढळतो की राम-रावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्च्छा येऊन पडला. त्या वेळी हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरीचा काही भाग खाली पडला तोच हा सप्तशृंग गड होय.
कोणत्याही पुरुषाकडून मरण मिळणार नाही असा वर प्रत्यक्ष शंकराकडून मिळाल्यामुळे महिषासुर नावाचा राक्षस माजला होता. त्याने सरळ स्वर्गावर आक्रमण करून करून इंद्राला तिथून हुसकून लावले होते. त्यामुळे तो ब्रह्मा विष्णू व महेश या त्रयींकडे मदतीची याचना करू लागला. त्या तिघांनी आपले सामर्थ्य एकवटून एका तेजाची निर्मिती केली. ते तेज अंबेच्या रूपाने पृथ्वीवर अवतरले. या काळात महिषासुर सप्तशृंगीच्या जवळ होता. देवीने त्याचा तेथेच वध केला आणि जगाला त्याच्या जाचातून मुक्त केले अशी कथा आहे.
( वरील माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आली आहे. )
- नासा येवतीकर
मतदान जनजागृती ( Voting Awarness )
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जनजागृती चला मतदान करू लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे. चला मतदान करू .......! ...
-
दीपोत्सवाचा सण : दिवाळी दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा. वर्षातून एकदाच येणाऱ्या दिवाळी सणाची आबालापासून वृध्दापर्यंत सर्वानाच चातक पक्ष्य...
-
संतुलित आहार - नागोराव सा. येवतीकर , मु. येवती ता. धर्माबाद अन्न , वस्त्र आणि निवारा या माणसाच्या तीन मूलभूत गरजा...
-
सूर्यमाला व त्यातील विविध ग्रहांची माहिती फोटोसह सूर्यमाला सूर्यमाला ही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्य...