निसर्गाची सहल करविणारा निसर्गायण काव्यसंग्रह
किती पाहू अन साठवू किती मनात
ही सारी किमया एका रोपट्याची
निसर्गाची निर्मिती ही एका रोपट्यातूनच होते. याच रोपट्याची नीट काळजी घेतली तर त्याची चांगली वाढ होते आणि त्याला फुले आणि फळे लागतात. आपण ज्या ठिकाणी वास्तव्यास राहतो त्याठिकाणी देखील आपणांस निसर्गाची साथ मिळत असते. पावलोपावली आपणावर निसर्गाचे अनंत उपकार आहेत, याची जाणीव सौ. निर्मला भयवाळ यांच्या निसर्गायण काव्यसंग्रहात पानापानावर आढळून येते. त्याचा हा दुसरा काव्यसंग्रह असून यापूर्वी सन 2008 मध्ये सारीपाट नावाचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. यास पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. प्रत्येक माणसात काही ना काही प्रतिभा लपलेली असते, ती प्रतिभा आपण स्वत: ओळखू शकत नाही, त्यासाठी गरज असते एका मित्राची, गुरुजीची. ज्याप्रकारे महात्मा ज्योतिबा फुले यांनी अक्षरशत्रू असलेल्या सावित्रीबाई फुले यांच्यातील प्रतिभा ओळखून भारतातील पहिली महिला शिक्षिका बनविल्या, त्यांच्या हातून उत्तम साहित्य निर्मिती करण्याची प्रेरणा दिली म्हणूनच बावनकशी सावित्रीबाई आपणांस लाभली. याठिकाणी देखील सौ. निर्मला भयवाळ ह्या मला सावित्रीबाई फुले वाटतात तर त्यांचे पती जेष्ठ साहित्यिक उद्धव भयवाळ हे ज्योतिबा फुले सारखे वाटतात. कारण त्यांच्या पतीने त्यांना प्रोत्साहित केले नसते, प्रेरणा दिले नसते तर सौ. निर्मला भयवाळ यांच्या हातून सारीपाट आणि निसर्गायण सारखे काव्यसंग्रहाचे साहित्य क्षेत्रात आगमन झाले नसते. गेल्या पंचवीस वर्षापासून ते आपल्या पतीसोबत काव्यप्रवास करत आहेत. सौ. निर्मला भयवाळ ह्या एक साधे गृहिणी आहेत पण त्यांच्या अंतर्मनात असलेली कविते विषयांची ओढ, लिखाणाविषयांची उर्मी त्यांना गप्प बसू देत नव्हती. कवयित्री स्वतः या सर्व बाबीचे यशाचे श्रेय आपल्या यजमानांना देतात. कवयित्रीना पूर्वीपासूनच निसर्गामध्ये फिरण्याची आणि रमण्याची आवड आहे. झाडे, फुले, फळे यांच्याविषयी त्यांच्या मनात आत्यंतिक प्रेम आहे. त्यांच्या घराच्या अंगणातील विविध प्रकारची झाडे हे त्यांचे निसर्गावर असलेल्या प्रेमाची साक्ष देतात. म्हणूनच त्यांच्या यजमानांनी त्यांना वृक्षमित्र हा पुरस्कार दिलेला आहे. निसर्गायण या काव्यासंग्रहात निसर्गाची विविध रूपे दाखवणाऱ्या एकंदरीत तीस कविता आहेत. ज्या कविता वाचतांना आपण आपल्या घराभोवतीच्या पर्यावरणात वावरत आहोत की काय अशी शंका येते. या काव्यसंग्रहाला डॉ. ज्योती कदम यांनी प्रस्तावना देऊन सौ. निर्मला भयवाळ यांची पाठराखण केली आहे. आजपर्यंत निसर्गावर अनेक कवी आणि कवयित्री यांनी कविता लिहिल्या आहेत. मात्र सौ. निर्मला यांच्या निसर्ग कविता जरा वेगळ्या वळणाच्या आणि निसर्गात आलेल्या अनुभवावर आधारित आहेत, असे वाटते. म्हणूनच जरासे हटके वाटतात. निसर्गातील वृक्ष, नदी, नाले, ऊन, वारा, पाऊस, चंद्र, चांदणे, सूर्य आणि धरती यावर कविता वाचण्यास मिळतात.
त्यांची पहिलीच अंकुरला एक मोड ही कविता पर्यावरण कसे तयार झाले ? याचे अनुभव विशद करते. जोपर्यंत मोड अंकुरण होत नाही तोपर्यंत त्याची पुढील कोणतीच क्रिया होत नाही. या कवितेतून त्यांचे अति सूक्ष्म निरीक्षण दृष्टीस पडते. निसर्गाने आपणाला भरभरून दिले पण मानवाने परतफेड करायचे विसरून गेला. माणसाने जंगलतोड करून सिमेंटची जंगले उभारली आणि हवा प्रदूषित केली. मोठं मोठी कारखाने उभे करून नद्या नाले सारे दूषित केले. अस्वस्थ निसर्ग या काव्यातून त्यांनी तेच सांगितले आहे.
पक्ष्याची घरटी यामुळे झाली उध्वस्त
म्हणूनच आज निसर्ग आहे अस्वस्थ
निसर्गाचे काही नियम ठरवलेले असतात, त्याच्या विरुद्ध कोणालाच वागता येत नाही. चांगले कार्य व्हावे म्हणून आपण खूप झटतो पण कधी कधी त्या चांगल्या कामात व्यत्यय येत असतात, ज्याचा त्रास काम करणाऱ्यांना होतो. असाच भावार्थ लपलेली कविता म्हणजे एक निवडुंग. आनंदाचे क्षण पाहण्यासाठी काही दुःखाचे क्षण देखील नकळत पाहावे लागतात. म्हणून कवयित्री म्हणतात,
टोचला काटा निवडुंगाचा
आणि क्षणभर विव्हळले मी.
कळी या कवितेतून सामाजिक संदेश देण्याचा कवयित्रीने प्रयत्न केला आहे. आपल्या घरात जर गुलाबाचे झाड असेल तर आपण तिची खूप काळजी घेतो, कोणाच्या दृष्टीस पडू नये असे वाटते पण गुलाबाच्या काही खट्याळ कालळ्या असतात किती जरी काळजी घेतली तरी देखील ते बाहेरच्या लोकांच्या दृष्टीस पडतेच पडते आणि लोकं ' व्वा काय सुंदर फुल!' आहे म्हणून तोडण्यास हात पुढे करतात तेंव्हा तेथे असलेले काटे तोडणाऱ्याच्या हाताला लागतात. याठिकाणी कळीच्या जागी मुलगी असे रूपक वापरले तर कवितेचा भावार्थ अजून गहिरा होतो. कवयित्री स्वतः एक महिला असल्याने त्यांच्या मनातील एक सल कवितेच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत प्रत्येक व्यक्ती एकाच गोष्टीचा शोध घेत असतो ते म्हणजे कुठे झाडाची सावली मिळते का ? पण तप्त उन्हामुळे सर्व झाडांची पाने वाळून जातात आणि कुठेच सावली दृष्टीस पडत नाही. मात्र एकच असं झाड आहे जे की भर उन्हाळ्यात देखील हिरवेगार आणि फुलून दिसतो ते म्हणजे गुलमोहर. याच दृष्टी वरून उन्हाळा या कवितेत त्या म्हणतात की,
छान गुलमोहर डवरला,
डेरेदार तो वृक्ष पाहुनी,
आनंद मनी झाला.
माणसांच्या निरुपयोगी वस्तुंना जीवनात काहीच अर्थ नसतो या आशयाची कविता म्हणजे खुडलेल्या कळ्या. जाईच्या फुलांची मागणी नाही म्हणून माळी जाईच्या सर्व कळ्या खुडून टाकतो तसेच त्याची वेल देखील. या कवितेतून कवयित्रीने समाजात चालत असलेल्या काही गोष्टीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही बाबी निरुपयोगी वाटत असले तरी त्यांचे असणे आपल्यासाठी खूप मोलाचे आहे जसे की आपले वृद्ध आई-बाबा. तेव्हा त्यांना जाईचे फुल समजून घराबाहेर काढू नका किंवा दुर्लक्ष करू नका असा संदेश ते या कवितेतून देऊ इच्छितात असे वाटते. मुके प्राणी एकमेकांना कसे संदेश देतात हा एक संशोधनाचा विषय आहे. लाल मुंग्या एका रांगेत कसे चालतात ? तसे मधमाशी आपले मध कशाप्रकारे गोळा करते ? हा ही एक निरीक्षण करण्याजोगा विषय आहे. कवयित्री आपल्या बारीक नजरेतून हे सारे धुंडाळून काढले आहे मधमाशी विषयीचे सुंदर वर्णन त्यांच्या गंध या कवितेतून वाचायला मिळते.
एकीस मिळता मध
दुसरीस साद घाली
पाहता पाहता सारी
झुंड की हो आली
पौर्णिमेचा चंद्र आणि चांदण्या सर्वाना आकर्षित करतात. खास करून उन्हाळ्यात जेव्हा जेवण झाल्यावर आपण बाहेर फिरतो किंवा बसतो त्यावेळी आकाशात जे सुंदरता दिसते, ते सर्वाना भुलवून टाकते. ते सुंदर दृश्य डोळ्यांत साठवून त्यावरच दिवस जात असतात असे सुंदर विवेचन चांदणे या कवितेत पाहायला मिळेल. निसर्गामध्ये जुने जाणे आणि नवीन येणे ही क्रिया चालूच असते. कोणत्या ऋतूत पाने गळतात आणि कोणत्या ऋतूत नवीन पालवी फुटते याच ज्ञानाच्या आधारावर चिमण्यांचा चिवचिवाट ही कविता निर्माण झाली असावी असे वाटते. फार पूर्वीच्या काळी जो चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू येत होता, तो आवाज आता गायब झाला आहे. त्यामुळे आज कोणाची पहाट रम्य राहिली नाही. आपल्या घरी कोणीतरी येणार हे कळल्यावर घरातील सर्वचजण सजून धजून बसतात. तसे वसंत ऋतूच्या स्वागतासाठी धरणीमाता हिरवा शालू आणि चोळी नेसून सजल्याचे सुंदर चित्रण धरणीमाता या कवितेत केले आहे. धरती ही खनिजांचे भांडार आहे, ऋतुप्रमाणे आपले रूप बदलत असते, निसर्गाच्या बदलामध्ये तो आपणाला काही ना काही संदेश देत असतो. ते पूर्वीचे लोकं समजून घ्यायचे आताच्या लोकांनी समजून घेणं सोडलं आहे. सुंदर आणि रम्य निसर्ग राखण्यासाठी निसर्गाचे बोलणे आपण सर्वांनी ऐकायला हवं असा संदेश निसर्ग काही सांगतो आहे, निर्जर आणि निसर्गाची किमया या कवितेत कवयित्री देण्याचा प्रयत्न करतात. सकाळचा पहाटवारा आल्हाददायक असतो. दिवसभरातील शीण घालविण्यासाठी सकाळची वेळ खूप उत्तम आहे. अंधार संपून उजेड येण्यासाठी सकाळ ही एक महत्वाची नैसर्गिक क्रिया आहे. जीवनात आलेल्या विविध अनुभवाच्या बळावर निसर्गाशी सांगड घालून रचना तयार केल्या आहेत, म्हणून वाचकांना ते नक्की भावतात.
पाऊस पडणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे. पाऊस पडताना ढगांचा गडगडाट आणि विजांचा लखलखाट या दोन गोष्टी घडणारच आहेत. पहिलं पाऊस आणि दरवळलेला मातीचा सुंगध याचे सुंदर असे वर्णन पहिला पाऊस, पावसाच्या धारा, पाऊस पडून गेला आणि पावसा रे पावसा या कवितेत केले आहे. पायवाट या कवितेतून ग्रामीण भागातील भागाचे सुंदर वर्णन करून शहरातील पायवाटला ग्रामीण भागातील पायवाटची गंमत नसल्याची खंत व्यक्त करतात. खास माणसं शोधण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, सामान्य माणसे पावलोपावली भेटतात पण त्यांना काही किंमत नसते. याच अर्थाचा बगीचा ही कविता वाचतांना लक्षात येते की, दुर्मिळ वस्तू शोधण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात.
पावसाळ्यात कधी सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसत नाही मात्र वळवाच्या पावसात तो हमखास दृष्टीस पडतो. ते पाहून मन आनंदी होऊन जाते. या सर्व बाबीचा आढावा वळवाचा पाऊस या कवितेतून पाहण्यास मिळेल. ती कविता वाचतांना शंकर पाटील यांची वळीव ही कथा वाचकांच्या मनात तरळून जाते. एकापेक्षा एक सुंदर आणि भावगर्भ असलेल्या कविता वाचतांना आपण खरोखरच निसर्गात भटकत आहोत याची जाणीव होत राहते.
कोणत्याही गोष्टीचा शेवट गोड व्हावा असे म्हटले जाते तसे कवयित्री सौ. निर्मला भयवाळ यांनी त्यांच्या या काव्यसंग्रहात शेवटची सृष्टीच्या रंगात रंगू या ही कविता वाचकांना प्रोत्साहित करून जाते.
खळखळ वाहे हा झरा
देत चाहुल निसर्गाची
निसर्गाच्या संगतीत हरवू या
गाऊ गाणी निसर्गाची
औरंगाबादच्या जनशक्ती वाचक चळवळने निसर्गायण कवितासंग्रह गेल्या वर्षी 2020 मध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर प्रकाशित केले असून काव्यसंग्रहावरील सुंदर आणि मनोवेधक असे मुखपृष्ठ महेश जोशी यांनी तयार केले आहे. एकूणच काव्यसंग्रहातून निसर्गावरील प्रेम आणि निसर्ग बचाव करण्यासाठी असलेली तळमळ स्पष्टपणे दिसून येते. सर्व कविता साध्या आणि सोप्या भाषेत लिहिलेले आहेत. आबालपसून वृद्धांपर्यंत सर्वाना हा कवितासंग्रह नक्की आवडेल, याची मला खात्री आहे. कवयित्री सौ. निर्मला भयवाळयांना पुढील काव्य लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा
काव्यसंग्रहाचे नाव - निसर्गायण
कवयित्री :- सौ. निर्मला भयवाळ
प्रकाशन :- जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद
पृष्ठ :- 40 पाने
किंमत :- 70 रुपये
पुस्तक परिचय कर्ता
- नागोराव सा. येवतीकर, लेखक व शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769
No comments:
Post a Comment