Friday, 16 April 2021

महावीर जयंती

वर्धमान महावीर जयंती
जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर अहिंसेचे मूर्तिमंत प्रतिक होते. वैशाली राज्याच्या कुंडलपूर येथे इसवी सन पूर्व 599 मध्ये त्यांचा जन्म झाला. वडिलांचे नाव सिद्धार्थ तर आईचे नाव त्रिशला होते. बिहारमधील मुजफ्फरपुर जिल्ह्यात पूर्वीचे वैशाली होते. 

भगवान वर्धमान यांच्या भावाचे नाव नंदिवर्धन तर बहिणीचे नाव सुदर्शना होते. त्यांचे बालपण राजेशाही थाटात गेले. आठ वर्षांचे असताना त्यांना शिक्षण व शस्त्रविद्येचे ज्ञान घेण्यासाठी शाळेत पाठविण्यात आले. 

श्वेतांबर पंथाच्या म्हणण्यानुसार भगवान वर्धमान यांनी यशोदा यांच्याशी विवाह केला होता, तर दिगंबर पंथाच्या म्हणण्यानुसार त्यांनी विवाह केला नसून ते ब्रम्हचारी होते. महावीरांचे कुटुंबीय जैनांचे तेवीसावे तीर्थंकर पार्श्वनाथ यांचे अनुयायी होते. 

भगवान महावीर 28 वर्षांचे असताना त्यांच्या आई वडिलांचा मृत्यू झाला. वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी श्रामणी दीक्षा घेतली. त्यानंतर बहुतांश वेळ ते ध्यानात मग्न असत. काही दिवसांनी त्यांनी पूर्ण आत्मज्ञान झाले. त्यांनी बारा वर्षांपर्यंत मौन पाळले होते. हटयोग्याप्रमाणे त्यांनी शरीराला खूप कष्ट दिले. 

शेवटी त्यांना केवलज्ञान प्राप्त झाले. ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी जनकल्याणासाठी उपदेश देण्यास सुरवात केली. त्यासाठी त्यांनी त्यावेळी लोकांमध्ये प्रचलित असलेल्या अर्धमागधी भाषेचा आधार घेतला. इंद्रिय व व विषय वासनांचे सुख दुसर्‍याला दुःख देऊनच मिळवता येते, असे त्यांचे मत होते. 

त्यामुळेच त्यांनी जैन धर्माच्या अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह या बाबींमध्ये ब्रम्हचर्याचाही समावेश केला. त्याग, संयम, प्रेम, करूणा, शील व सदाचार हे त्यांच्या प्रवचनाचे सार आहे. त्यांनी चतुर्विध संघाची स्थापना करून समता हेच जीवनाचे लक्ष्य असल्याचे सांगितले. 

देशात ठिकठिकाणी फिरून महावीरांनी पवित्र संदेशाचा प्रसार केला. इसवी सन पूर्व 527 मध्ये बिहार येथील पावापुरी येथे वयाच्या बाहत्तराव्या वर्षी त्यांचे निर्वाण झाले. तो दिवस होता कार्तिक कृष्ण अमावस्येचा. भगवान महावीरांच्या निर्वाणादिवशी घराघरात दिवे लावले जातात.

संकलन

Wednesday, 14 April 2021

14/04/2021 babasaheb

महामानव ....
चौदा एप्रिल तारीख जगात आहे लय भारी
भीमराव हे जन्मले भीमाई-रामजीच्या दारी
रामजी कार्यरत सैन्याच्या सुभेदार पदावर
पत्नीच्या निधनाने लक्ष सारे लागले घरावर
लहानपणी खूप त्रास झाला भीमरावांना
पदोपदी त्यांनी अपमानाचा केला सामना
पैसा नव्हता तरी ही सोडला नाही अभ्यास
रात्रंदिवस लागला पुस्तक वाचनाचा ध्यास
भीमरावांच्या मनात वाचनाने झाली क्रांती 
संविधान लिहून दिली भारतीयांच्या हाती 
आपले नाव इतिहासात अजरामर राही
आपले उपकार कोणी ही विसरणार नाही

- नासा येवतीकर, विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड

             ।। भीमराव ।।
भिमाईच्या पोटी, चौदावे रत्न जन्मले
रात्रंदिस अभ्यासाने, भारतरत्न झाले

वयाच्या पाचव्या वर्षी, आई गेली सोडूनी
आत्याबाईने त्यांची, पूर्ण केली शिकवणी

सुभेदार रामजी होते, हेडमास्तर शाळेचे
ते जाणून होते पूर्ण , महत्व शिक्षणाचे

बालपणी भीमाला, त्रास खूप झाला
त्याच पायी त्यांनी, हक्काचा लढा दिला

जगण्यास शिकविले, लढण्यास शिकविले
त्यांच्या परिश्रमाने, देशाला संविधान दिले

झोपलेल्या माणसांना, केले प्रबोधनातून जागी 
महामानव असा पुन्हा, या जन्मी होणे नाही

अविरत त्यांचे श्रम, तोड नाही कार्याला
आपोआप हात जुळती, वंदितो विश्वरत्नाला

- नासा येवतीकर, येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

                ।। भीमजयंती ।।


यंदाची भीमजयंती साजरी करू या आपल्या घरी
दीप लावू या ज्ञानाचा प्रकाश पसरेल दारोदारी

नको कोणती मिरवणूक नको नाच गाणे
अभ्यासाच्या नादात विसरू खाणे-पिणे
सर्वांपेक्षा वेगळी चला जयंती करू साजरी
दीप लावू ज्ञानाचा प्रकाश पसरेल दारोदारी

बाबांनी सांगितलं आम्हां उच्च शिक्षण घेत जावा
शिक्षण वाघिणीचं दूध आहे रोज ते पीत राहावा
शिक्षणानेच सन्मान होईल तुझा घरोघरी
दीप लावू ज्ञानाचा प्रकाश पसरेल दारोदारी

त्यांच्या पुण्याईने साऱ्यांचा एवढा विकास झाला
शिकून सवरून चारचौघात खरा शहाणा झाला
त्यांचे गुणगान गाईन माझ्यात प्राण आहे जोवरी
दीप लावू ज्ञानाचा प्रकाश पसरेल दारोदारी

- नासा येवतीकर, येवती, ता. धर्माबाद जि. नांदेड 9423625769

बाबासाहेब ....

समाजात हीन वागणूक होताना
डोळ्यात अश्रूची साठवण होते
अस्पृश्यतेचे दृश्य पाहून आज ही
डॉ. बाबासाहेबांची आठवण येते

गावातील उच्चभ्रू लोकांच्या पंगतीत
बसायला अस्पृश्याना हरकत होती
स्पृश्य आणि अस्पृश्य म्हणून
समाजात त्यांची फारकत होती

बाबासाहेबांना आलेले अनुभव
अजून ही स्मरणात आहेत
तेच अनुभव पुन्हा पुन्हा
लोकांच्या जीवनात येत आहेत

शिक्षणाने सर्व विकास होतो
असे अनेक महात्मे सांगून गेले
सारे शिकून शहाणे झाले तरी
यांच्यात फरक का नाही पडले

असे विचार जेंव्हा करतो
मनात क्रांतीची मशाल पेटते
तेंव्हा एकटाच धावतो सैरभैर
भेटतो अनेकांना मन विशाल वाटते

अनेक विचारवंतांना वाटले होते
शिक्षणाने काही बदल होईल
पण वाटले नव्हते कधीच
या शिकलेलीच माणसाच्या
याच शिक्षणाने एवढा घात होईल

- नासा येवतीकर, धर्माबाद


विश्वरत्न ...

भोगले नशिबात ज्यांनी
ते इतरांना नको यायला
याच इच्छेपायी त्यांनी
पूर्ण विश्व बुद्धमय केला

शिक्षणाने जीवन बदलते
सांगून गेले महात्मा फुले
बाबासाहेब आजीवन
त्याच वाटेवर अखंड चालले

त्यांनी शिकले जगाला शिकविले
जगण्याचा सन्मार्ग सांगितला
दिवसरात्र अभ्यास करण्याचा
मोलाचा सल्ला त्यांनी दिला

बाबासाहेब आमच्या मनात आहेत
कित्येकाच्या हृदयात आहेत
बाबासाहेबांचे विचार आज
प्रत्येकांच्या घराघरात आहेत

- नासा येवतीकर, धर्माबाद


आज ही तुमचे नाव ओठावर कायम आहे भीमराया 

पहाटे उठल्या क्षणी प्रथम पडतो मी तुमच्या पाया

तुमच्या विचारांमुळेच माझे जीवन सार्थक झाले 

खितपत पडलो असतो कुठं तरी गेलो असतो वाया 

जयंतीच्या निमित्ताने कोटी कोटी प्रणाम भीमराया

- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद


भीमा तुझ्या जन्माने 


भीमा तुझ्या या जन्माने

जगण्यास अर्थ मिळाला

तळागाळातील लोकांना

पुन्हा नवा जन्म मिळाला


स्पृश्यास्पृश्य संपून गेला

मंदिरात प्रवेश मिळाले

महाडच्या चळवळीमुळे

नदीनाले ही चवदार झाले


सर्वाना दिलात अधिकार

भारताची घटना लिहून

हक्काची जाणीव ठेवतो

कर्तव्याला नित्य स्मरून


चौदा एप्रिल मनात बसलंय

विसरेन कशी जयंती बाबांची

खायला मिळते मिरची-भाकर

ही पुण्याई आहे भीमरावांची


- नासा येवतीकर, धर्माबाद

  9423625769


*महामानव भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या 131 वी जयंतीनिमित्त हार्दीक शुभेच्छा ......!* 


Sunday, 11 April 2021

11/04/20021 Covid-19

नकळत डोळे पाणावले

दोन दिवसापासून थोडा त्रास होता
ताप, सर्दी आणि खोकल्याचा
मनात भीती ही होती कोरोनाची
सर्वत्र हाहाकार चालू होता कोरोनाचा
आकडे फुग्यासारखे फुगत होते
बरेचजण कोरोना पॉजिटिव्ह होत होते
माझ्या ही मनात तशी 
शंकेची पाल जराशी चुकचुकली
म्हणूनच परिवारासह कोरोना टेस्ट केली
दोन दिवस रिपोर्टच्या प्रतीक्षेत गेले
सकाळी सकाळी फोनची घंटी वाजली
दवाखान्यातल्या बाईने हळूच आवाजात
माझ्या पत्नीचे नाव घेतलं आणि म्हणाली
ती पॉजिटिव्ह आली सेंटरला आणून सोडा
तसे आम्ही चार जणांनी टेस्ट दिला होता
म्हणून मी प्रश्न केला अजून कोण आहेत ? 
त्यानंतर तिने माझ्या मुलाचा नाव घेतलं
वास्तविक मीच कोरोना पॉजिटिव्ह होतो
पण रिपोर्ट मध्ये मला सोडून हे दोघे आले
घरात सर्वत्र स्मशान शांतता पसरली
मी स्वतःला शिव्या शाप देऊ लागलो
माझं मी बाहेरच राहिलं असतो तर
ही वेळ घरच्यावर आली नसती
अशीच चूक सध्या प्रत्येकाकडून होत आहे
प्रत्येकजण घरात कोरोना वाहून नेत आहे
त्या दोघांना कोव्हीड सेंटरला सोडतांना
दोघांच्या डोळ्यात नकळत अश्रू पाणावले
जशी मुलगी लग्न होऊन सासरी जातांना
आई-बाबांचे डोळे भरून येतात
मित्रानो, कोरोना खूप वाईट आहे की नाही
पण त्यापेक्षा वाईट आहे ते म्हणजे
आपली माणसं आपल्यापासून 
चौदा दिवस घर सोडून दूर राहणे
एक दिवस एका वर्षासारखा भासत होता
जिवंतपणीच मेल्याची कथा झाली होती
हा रोगच असा आहे साथ कोणी नसतात
याची रंगीत तालीम देत होता

- नासा येवतीकर, धर्माबाद 

मतदान जनजागृती ( Voting Awarness )

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जनजागृती चला मतदान करू लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.  चला मतदान करू .......! ...