Saturday, 13 July 2019

अक्षर मानव शिबीर

*अक्षर मानव नांदेड जिल्हा शिबिर*

रविवार, २१ जुलै २०१९
वेळ - सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत.

माणसांमाणसांतले जात, धर्म, लिंग, प्रदेश किंवा इतर सगळेच भेद बाजूला ठेवून माणसं निव्वळ माणूस म्हणून एकत्र यायला हवीत. त्यांच्यात निखळ मानवी संवाद व्हायला हवा. कारण, एकमेकांशी झालेल्या संवादातून मानवी जगण्याचे असंख्य प्रश्न सुटु शकतात अशी *अक्षर मानव* ची धारणा आहे. अक्षर मानव ही कुठल्याच एका विचारधारेची किंवा राजकीय संघटना नसुन, मानवी जगण्याशी संबंधित असणाऱ्या शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, शेती, संविधान, कला, साहित्य यासारख्या ३२ मुलभुत विभागात काम करते. अक्षर मानव राज्य भरातील प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यात विस्तारलेली आहे. माणसं सतत एकत्र यावीत आणि त्यांचा बौद्धिक स्तर उंच व्हावा याकरीता विविध प्रकारचे संमेलन, कार्यशाळा, परिसंवाद यांचे आयोजन करते. यातुन एका नैतिक, सुखी आणि आदर्श मानवी समाजाची रचना करणं हाच एकमेव अक्षर मानव संघटनेचा उद्देश आहे.
      सदर शिबीराला मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध साहित्यिक आणि अक्षर मानवचे विश्वस्त *मा. राजन खान सर* , अक्षर मानवचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत डांगे, मराठवाडा कार्याध्यक्ष सुरेश शिरसिकर, राज्य संघटक जावेदा जिंदगी, राज्य शिक्षण विभाग प्रमुख सतिश इंदापूरकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. शिबीराला उपस्थित राहण्याकरिता कसलीही अट नाही. प्रवेश शुल्क नाही. कुठल्याही वयाचा, कोणत्याही क्षेत्रातला माणूस इथं येऊ शकतो.
            अक्षर मानव म्हणजे काय ? अक्षर मानव का सुरु करावं लागले ? स्त्री-पुरुष असा भेद न करता माणूस म्हणून आपण एक आहोत हे जाणून घ्यायचंय का ? माणूस म्हणून जगायचं म्हणजे नेमकं काय करायचं? माणसाला पुरक अशा सर्व क्षेत्रांच उत्थान करायचं असेल तर त्याकरिता कोणती पावलं उचलायला लागतील आणि सुखी, शांत जगायचं म्हणजे नेमकं कसं जगायचं ब्बाँ?
यासारख्या अनेक प्रश्नांची उकल सदर शिबीराच्या माध्यमातून होणार आहे.
          *याकरिता नाव नोंदणी आवश्यक असुन,* जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन  डॉ. प्रताप, उलीगडे माधव,  निर्भय गायकवाड, शशिकांत केंद्रे, देवानंद चव्हाण, आश्विनी वाघमारे, प्रज्ञा कुलकर्णी मॅडम, इम्रान मांजमकर, लक्ष्मण शिंदे सर, प्रा. बालाजी कोंपलवार, नासा येवतीकर, गोविंदवार सर, उमेश कस्तुरे, बालाजी विजापूरे, डॉ.देवानंद, ओमकुमार कुरुडे, दिगंबर कल्लेपवार यांनी केले आहे.

*शिबीर स्थळ -*
स्वामी रामानंद तीर्थ स्मारक आणि संशोधन केंद्र सभागृह,
पीपल्स कॉलेज परिसर,
स्नेह नगर, नांदेड

*संपर्क व नाव नोंदणी -:*

डॉ प्रताप -
9423747664
आश्विनी वाघमारे-
7020671878
दिंगबर कल्लेपवार-
9767173688
माधव-
7350845785

Sunday, 7 July 2019

लोकसंख्या दिवस

लोकसंख्या शिक्षणात शिक्षकांची भूमिका

सध्या भारताची लोकसंख्या 1 अब्ज 34 कोटी झालेली आहे. लोकसंख्येच्या बाबतीत चीनच्या खालोखाल असलेला आपला भारत देश येत्या काही वर्षात पहिल्या क्रमांकावर येईल, ही बाब निश्चितच अभिमानास्पद नाही. या लोकसंख्या वाढीमुळे देशातील जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. लोकांची वस्ती वाढून जंगल कमी होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोलपणा पूर्णपणे ढासळत चालला आहे. भारतातील बहुसंख्य लोकांचा व्यवसाय शेती आहे. परंतु या शेतीवर देखील घरांचे अतिक्रमण वाढत आहे. अन्नधान्य उत्पादन लोकसंख्येच्या तुलनेत कमी प्रमाणात होत आहे. अर्थात लोकसंख्या वाढीमुळे राष्ट्रीय विकासाच्या साधनांवर त्याचा विपरीत परिणाम होऊन राष्ट्रीय विकासाला खीळ बसत आहे. मानवी कल्याणासाठी निर्माण होत असलेल्या प्रत्येक योजना असफल होताना दिसत आहेत. महागाईचा डोंगर आकाशाला गवसणी घालत आहे. यामुळे देशातील सर्वसामान्य मानव जातीचा जीवन जगण्याचा स्तर खालावत चालला आहे. याबाबतीत आज खरंच चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे यास अनेक कारणे आहेत. आज ही समाज छोटे कुटुंब ठेवण्यास तयार नाहीत. हम दो हमारे दो हे शासनाचे ब्रीद आहे मात्र याबाबतीत जनता अजूनही अनभिज्ञ आहे. गरीब आणि अशिक्षित लोकांना छोट्या कुटुंबाचे महत्व अजून ही कळाले नाही. गरिबांच्या घरातील मुले कुटुंबाच्या कमाईमध्ये भर टाकतात, मदत करतात. जितकी जास्त मुले तितकी जादा कमाई करता येते, त्यामुळे मुले म्हणजे त्यांना एकप्रकारे वरदानच वाटतात. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त स्त्रिया अशिक्षित आणि निरक्षर आहेत. मुले म्हणजे देवघराची फुले असे ते समजतात. त्याचसोबत जन्मलेली सर्व अपत्ये जगतातच याची देखील त्यांना खात्री नसते म्हणून ही मंडळी दोनच्या वर अपत्यांना जन्म देतात. ही अवस्था अशीच चालू राहिली तर भारतातील लोकांचे जीवन जगणे असह्य होईल यात शंका नाही. ही बाब त्या प्रौढ माणसांना समजावून सांगणे, पटवून देणे अवघड आहे. परंतु भावी काळात प्रौढ बनणारी आजच्या शाळकरी मुलांना या लोकसंख्या वाढीच्या समस्येबाबत जाणीव करून दिल्यास ही मुले भावी काळात छोटे कुटुंब ठेवण्याकडे लक्ष देतील.
शाळेतील मुलांना शिकविण्याची जबाबदारी अर्थात शिक्षकांची असते. आज लोकसंख्या वाढत चालल्यामुळे जनता कोणकोणत्या संकटाचा मुकाबला करीत आहे ? याची जाणीव मुलांना अगदी सहज देता येईल. त्यासाठी एखादा स्वतंत्र विषय ठेवण्यात यावे असे काही नाही. अभ्यासक्रमात अंतर्भूत असलेल्या घटकातून मुलांना याबाबत अवांतर माहिती दिल्यास त्यांच्यात सजगता निर्माण होईल. लोकसंख्या वाढ झाल्यामुळे समाजात कश्याप्रकारे असमतोलपणा निर्माण झाले आहे हे चित्र विद्यार्थ्यांसमोर उभे केल्यास भविष्यात काही अंशी तरी ते नक्की विचार करतील. याबाबतीत एक चलचित्र जे की दूरदर्शन वाहिनीवर दाखविले जात असे ते आठवते. एका फिश टॅकमध्ये दोन मासे होते आणि त्यांना खाण्यासाठी भरपूर धान्य होते. काही दिवसांनी त्यात काही मासे वाढले आणि त्यामुळे अगोदर जे धान्य भरपूर होते असे वाटत होते ते बरोबर होऊ लागले. पुन्हा काही दिवसांनी त्यात मासे वाढले आणि धान्य कमी पडू लागले. त्यानंतर असा एक दिवस आला की, फिश टॅकमध्ये मासे भरपूर वाढले आणि धान्य मिळविण्यासाठी प्रत्येक मासा धावपळ करू लागला. त्यात त्या फिश टॅकचा स्फोट झाला. सारे मासे जमिनीवर पडले आणि काही क्षणात मृत्युमुखी पडले. यातून मुलांना खूप चांगला संदेश देता येऊ शकते. असे काही माहितीपट मुलांना दाखविले तर त्यांच्या डोक्यावर अनुकूल परिणाम होईल. आज समाजात अशिक्षित कुटुंबात पाच अपत्य दिसून येतात तसे सुशिक्षित कुटुंबात देखील दिसून येते. तेंव्हा प्रश्न पडतो की या शिक्षणाचा काय फायदा झाला ? शालेय जीवनात त्यांना लोकसंख्या शिक्षण बाबत मार्गदर्शन मिळाले नाही त्यामुळे ते चांगले शिकलेले असून देखील छोटे कुटुंब ठेवू शकले नाहीत. जास्त अपत्य असणाऱ्या घरातील सुखसोईचे चित्र आणि कमी अपत्य असणाऱ्या घरातील सुखसोईचे चित्र या दृश्यावरून मुलांच्या मनावर या समस्येच्या बाबतीत फार मोठे प्रतिबिंब शिक्षकांना टाकता येईल. लोकसंख्या शिक्षण प्रत्येक मुलांपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. शिक्षकांनी हे काम स्व इच्छेने मनावर घेऊन प्रामाणिकपणे केल्यास पुढील दहा वर्षात चित्र थोड्या फार प्रमाणात बदललेले दिसेल. विद्यार्थी गुरुजींची आज्ञा कधीच मोडत नाहीत. त्यामुळे शिक्षकांनी लोकसंख्या शिक्षणात स्वतः ला झोकून द्यावे तरच देशाचा अर्थात आपला विकास शक्य आहे.

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक तथा स्तंभलेखक
मु. येवती ता. बिलोली जि. नांदेड
9423625769

मतदान जनजागृती ( Voting Awarness )

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जनजागृती चला मतदान करू लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.  चला मतदान करू .......! ...