*दप्तरमुक्त शाळा : एक आव्हान*
शाळा म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतात ते विद्यार्थी, शिक्षक, मैदान आणि विद्यार्थ्यांच्या सोबत असलेले दप्तर. खरोखरच दप्तराशिवाय शाळा कोणी विचार देखील करू शकत नाही. कारण विद्यार्थ्याजवळ दप्तर नसेल तर मुलगा शाळेत जाऊन करणार तरी काय ? हे पालकांच्या मनात आलेले प्रश्न आहेत. पालकांच्या या प्रश्नाला राज्यातील अनेक शिक्षकांनी वेगवेगळे उपक्रम राबवून मुलांच्या पाठीवरील दप्तरांचे ओझे कमीच केले नसून मुलांना दप्तरमुक्त केले आहे. या दप्तरमुक्त उपक्रमामुळे मुलांमध्ये एक वेगळा उत्साह संचारला असून शाळेत कधी ही न येणारी मुले शाळेत येऊ लागली हे विशेष. मुलांना शाळेत अगदी मोकळेपणाने खेळायला, बोलायला, नाचायला खूप आवडते. पण पालक आणि शिक्षक विद्यार्थ्यांवर एवढे बंधन टाकतात की, विद्यार्थी आपले बालपण हरवून टाकतात. अभ्यासा सोबत मौजमस्ती देखील करणे आवश्यक आहे. एक किस्सा मला आज ही आठवतो, दुसऱ्या दिवशी परीक्षा असतांना आमचे ओळखीचे एका काकांनी थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहण्याचा सल्ला दिला आणि आम्ही तो पूर्ण केला. तो पेपर सर्वात चांगला सुटला. याचा अर्थ आपले मन प्रसन्न आणि आनंदी असेल तरच अभ्यास चांगला होतो. दबावाखाली किंवा टेंशनमध्ये वाचलेले देखील लक्षात राहत नाही. म्हणून विद्यार्थ्यांना मुक्तपणे शिकू दिलोत तर त्याची प्रगती वेगाने होते. म्हणून एक दिवस त्यांच्यासाठी शाळा भरवायाची. रोज तर आपण त्यांना शिकवितो त्यामुळे ते ऐकतात. पण एक दिवस त्यांचे ऐकले आणि त्यांच्या मनाप्रमाणे केल्यास शाळेत नक्कीच काही तरी बदल होतील असा विश्वास अनेक उपक्रमशील शिक्षकांना आहे. म्हणूनच ते दर शनिवारी दप्तरमुक्त शाळा भरविण्याचे ठरविले आहे. हा उपक्रम शनिवारीच का ? इतर दिवशी का नाही ? कारण शनिवार हा बहुतांश शाळेत अर्ध्या दिवसांची शाळा असते. म्हणजे सुमारे साडेतीन तास शाळा चालते. या वेळांत शाळेतील सर्व मुलांसोबत गप्पा, गाणी आणि गोष्टी केल्यास मुलांची अभिव्यक्ती होऊ शकते. मुलांच्या इतर गुणांचा शोध लावता येतो. पुस्तकाशिवाय देखील जगात खूप काही शिकण्यासारखे आहे याची जाणीव मुलांमध्ये तयार होते. या निमित्ताने ज्या गोष्टी नियमित वर्गात पूर्ण होत नाहीत ते पूर्ण करता येतात. रवींद्रनाथ टागोर किंवा अण्णाभाऊ साठे शाळेत न जाता कसे शिकले ? याचा शोध दप्तरमुक्त शाळेत जाऊन सापडतो. मुलांना नकळत जे शिकविले जाते ते पटकन लक्षात राहते. मुद्दाम शिकविले गेलेल्या गोष्टी काही मुलांच्या पचनी पडत नाहीत. दररोज तेच ते पुस्तक, गृहपाठ, अभ्यास म्हटले की मुलांध्ये स्फूर्ती किंवा चेतना दिसत नाही. मात्र असे काही उपक्रम शाळेत सुरू झाले की, त्याचा अनुकूल परिणाम सर्वत्र दिसून येतात. तसे पाहिले तर दप्तरमुक्त शाळा मुलांसाठी आनंददायी आणि मजेशीर आहे मात्र शिक्षकांसाठी नक्कीच नाही. कारण येथे मुलांना काही ही काम सांगता येत नाही. पुस्तक शिकविणे सोपे आहे मात्र विविध उपक्रम राबवून मुलांना आनंदी ठेवणे खूपच अवघड काम आहे. कारण पुस्तक काढा आणि वाचा असे या दिवशी म्हणता येत नाही. शिक्षकांना पूर्ण वेळ मुलांसोबत राहावे लागते. कोण काय करतोय यावर देखील लक्ष ठेवावे लागते. इतर दिवशी पेक्षा वेगळे काही तरी मुलांना अनुभव द्यावे लागते म्हणून या दिवसाची तयारी आधीपासून करून ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक शनिवारी मुलांसाठी वेगवेगळी कृती निवड करावे लागते जसे की भाषिक खेळ असेल, मैदानी खेळ असतील किंवा वर्गात बसून जे खेळ घेतले जातात ते घेणे. अवांतर वाचन प्रक्रियेमध्ये एका शनिवारी गोष्टीचे पुस्तक वाचणे, वृत्तपत्र वाचन करणे, मासिक वाचणे, चित्रांचे रंगभरण करणे इत्यादी बाबी करता येतात. एखाद्या शनिवारी बालसभा आयोजित करून त्यांच्या मार्फत काही गोष्टी करून घेता येतात. तसेच एखाद्या वेळी निसर्गाचा अनुभव देण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात जाऊन डबा पार्टीचे आयोजन देखील करता येऊ शकते. या ठिकाणी शिक्षकांची कल्पकता खूप मोठे कार्य करून जाते. हे सर्व शिक्षकांच्या डोक्याला ताप जरी वाटले किंवा हे एक आव्हान म्हणून स्वीकार केलोत तर दप्तरमुक्त शाळेमुळे सर्व काही सोपे सोपे झाल्यासारखे वाटेल. तेंव्हा चला तर मुलांच्या आनंदासाठी, शाळेची उपस्थिती आणि गुणवत्ता वाढीसाठी दर शनिवारी दप्तरमुक्त शाळा उपक्रम राबवूया.
- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769