आनेवाला पल जानेवाला है
आनेवाला पल जानेवाला है या हिंदी गीतानुसार सूर्योदय आणि सूर्यास्तानंतर एक-एक दिवस संपत जातो. प्रत्येक दिवशी काही ना काही घडत असते. दिवसामागून दिवस, महिने आणि वर्ष संपतात. तसे 2023 हे वर्ष संपून उद्या 01 जानेवारी पासून 2024 या नवीन वर्षाला सुरुवात होत आहे. तेव्हा मागील 2023 वर्षात जगात, भारतात आणि महाराष्ट्रात शिक्षण, राजकारण, साहित्य आणि क्रीडा क्षेत्रात कोणत्या ठळक घटना घडल्या याचा एक आढावा.
सर्वात पहिल्यांदा राजकारणात काय घडले ? गेल्या वर्षी राजकीय क्षेत्रात अनेक घडामोडी घडून आल्या. दोन पक्षाची युती आपणाला ठाऊक होती. यावर्षी तीन प्रमुख पक्षाची युती झाली. घुसखोरीच्या मुद्यावर एका दिवसात राज्यसभेतून ४५ तर लोकसभेतून 33 खासदारांचे निलंबन झाले. महाराष्ट्र हे देशातील पहिले ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करणारे राज्य ठरले. या वर्षात एक महत्वपूर्ण बाब घडली ती म्हणजे पेट्रोल व डिझेलचे दर वाढले नाहीत. मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड मध्ये भाजप तर तेलंगणामध्ये काँग्रेस विजयी. राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी पहिल्यांदाच आमदार झालेले भजनलाल शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली. राज्य सरकारचा पहिलाच 'उद्योग रत्न' पुरस्कार रतन टाटा यांना जाहीर झाला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इजिप्तच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार आणि पुण्याचा लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच सर्वात जास्त फॉलोअर्सच्या यादीत पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी देखील सर्वोच्च स्थानी राहिले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. औरंगाबाद विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर बदल करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली मान्यता देण्यात आली. महिला आरक्षणाला कॅबिनेटमध्ये मंजुरी देऊन 'नारी शक्ती वंदन अधिनियम' असं विधेयकाला नाव देण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 13 हजार कोटींच्या विश्वकर्मा योजनेचे उद्घाटन करण्यात आले. नव्या संसदेच्या वास्तूवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या उपस्थितीत तिरंगा फडकवला गेला. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्याचा निर्णय घेतला, त्यासोबत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षाचाही राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला. 710 कोटींचा खर्च असलेला अंदमान-निकोबार बेटांमधील पोर्ट ब्लेअर येथील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं. २०२८ मध्ये होणारी ३३ वी हवामान बदल परिषद ही भारतात व्हावी असा प्रस्ताव पीएम मोदी यांनी दुबईतील COP28 उच्च-स्तरीय समितीसमोर ठेवला. सरकारच्या पाठींब्याशिवाय गुजरातमध्ये जगातील सर्वात मोठं हिरे व्यवसाय केंद्र उभारण्यात आले.
संशोधन आणि विज्ञान या क्षेत्रात भारत कधीही मागे राहिला नाही. जगात भारताची मान उंचावेल अशी एक घटना यावर्षी घडली ते म्हणजे चांद्रयान ३ चे यशस्वी प्रक्षेपण झाले. कित्येक वर्षापासून असलेले इस्त्रोचं स्वप्न यावर्षी पूर्ण झाले आणि भारताचे चंद्रावर पहिलं पाऊल पडलं.
साहित्याच्या क्षेत्रात जरासे डोकावून पाहतांना अंमळनेर येथील 97 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली. मराठी कादंबरीसाठी कृष्णात खोत यांच्या रिंगाण या पुस्तकाला साहित्य अकादमीकडून यंदाचे पुरस्कार जाहीर झाले.
यावर्षी शासनाचे काही महत्वपूर्ण अध्यादेश देखील निघाले ज्यात पाचवी व आठवीच्या वार्षिक परीक्षेत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले.
शालेय शिक्षण विभागाने यावर्षीपासून जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षकांची आंतरजिल्हा बदली बंद केली. केंद्राच्या धर्तीवर आता राज्यातही दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी चार टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. खुल्या गटातील महिलांकरीता आरक्षित पदावरील निवडीकरीता तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्राची अट शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावर्षी काही महत्वपूर्ण पुरस्कार जाहीर करण्यात आले ज्यात गोरखपूरच्या गीता प्रेसला गांधी शांतता पुरस्कार, प्रतिष्ठेचा शाहू पुरस्कार यंदा डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांना जाहीर, राजस्थानची नंदिनी गुप्ता फेमिना मिस इंडिया 2023 चा पुरस्कार जिंकली. ज्येष्ठ निरूपणकार डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं, धर्माधिकारी यांनी पुरस्काराचं मानधन मुख्यमंत्री सहायता निधीला दिलं. पुण्यातील कीर्ति सौरभ प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार-2023 अभिनेते अशोक सराफ यांना प्रदान करण्यात आला.
शिक्षण आणि इतर महत्वपूर्ण घटना देखील नोंद घेण्यायोग्य आहेत. जागतिक सर्वोत्तम शाळा पुरस्कारात भारतातील दोन शाळांचा समावेश झाला. पहिली शाळा महाराष्ट्रातील अहमदनगरमधील स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल आणि दुसरी अहमदाबाद गुजरातमधील रिव्हरसाइड स्कूल आहे. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारात पुण्याचा मृणाल गांजाळे या ठरल्या राज्यातील एकमेव शिक्षिका. राज्यपाल बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियान प्रारंभ करण्यात आले. पहिल्या टप्प्यात ४७८ शाळा, पहिले पारितोषिक ५१ लाख, अभियानासाठी २० कोटी ६३ लाखांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. नाशिकची काठेगल्ली शाळा 'स्मार्ट स्कूल'मध्ये देशात दुसरी आली. पंतप्रधानांच्या हस्ते राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले. इंडिया नाही आता भारतच ! सर्व पुस्तकांमध्ये देशाचं नाव बदलणार, NCERT ने मोठा निर्णय घेतला. कंत्राटी भरतीचा जीआर काढण्यात आला आणि रद्द ही झाला. प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राज्यातील ५०० ग्रामपंचायतींमध्ये योजनेचा शुभारंभ झाला. पुढील शैक्षणिक वर्षापासून 'एक राज्य, एक गणवेश' करण्याचा शासनाने निर्णय केला. एकनाथ महाराजांच्या भागवत ग्रंथाला 450 वर्ष पूर्ण, वारकऱ्यांकडून पंढरपूरमध्ये भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली. भारतातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत एका महिलेचा समावेश झाला आणि सावित्री जिंदाल या 2023 मध्ये भारतातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत.
गेल्यावर्षी देशात व राज्यात खूप अपघात झाले आणि अनेक लोकं मृत्युमुखी देखील पडले. पण समृद्धी महामार्गावरील भीषण अपघात न विसारण्याजोगे आहे.
महाराष्ट्र शेजारी असलेल्या तेलंगणमध्ये सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांना मोफत बसप्रवास; गरिबांसाठी १० लाख रुपयांचा आरोग्य विमा अशी खास भेट देण्यात आली.
देश विदेश मधील महत्वपूर्ण घटना म्हणजे यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार नर्गिस मोहम्मदी तर साहित्य क्षेत्रातला नोबेल पुरस्कार लेखक जॉन फॉस्से यांना जाहीर झाला.
चित्रपट क्षेत्रातील महत्वपूर्ण घटना म्हणजे 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये 'एकदा काय झालं' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट तर आलिया भट्ट आणि कृती सेनन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून जाहीर करण्यात आले, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वहीदा रेहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.
क्रीडा क्षेत्रात देखील महत्वपूर्ण घटना घडल्या आहेत. यावर्षी झालेल्या T20 क्रिकेट वर्ल्ड कपजिंकून टीम इंडियाने विशेष कामगिरी केली. यावर्षी भारतात क्रिकेट वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले होते. आपला भारतीय संघ फायनल पर्यंत खूप छान खेळ दाखविला पण शेवटच्या सामन्यात विजय मिळवू शकला नाही. त्यामुळे वर्ल्ड कप जिंकता आले नाही, ही प्रत्येक भारतीयांच्या मनात असलेली खंत आहे. याच वर्ल्डकप मध्ये सर्वात जलद शतक ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर झाला आहे तर शतकांचे अर्धशतक करून विराट कोहली सर्वांच्या हृदयात स्थान मिळविले आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये विक्रमादित्य सचिन तेंडुलकर यांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अनावरण झाले आहे. वर्ल्डकप गाजवणाऱ्या मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आले. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू अजित आगरकर याची भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचा अध्यक्ष म्हणून निवड झाली. भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्राने सात वर्षात सात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला ! महाराष्ट्राचे ऑलिंपिक कास्यपदक विजेते मल्ल खाशाबा जाधव यांचा जन्मदिन म्हणजेच 15 जानेवारी हा यापुढे राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. नोवाक जोकोविच कारकिर्दीतील 24वं ग्रँडस्लॅम जिंकत US ओपनचा बादशाह ठरला. युवा धावपटू ज्योती याराजी हिने अवघ्या 13.09 सेकंदात 100 मीटर अंतर पार करत सुवर्ण कामगिरी केली. भारताच्या ज्युनिअर महिला हॉकी संघाने आशिया चषकावर नाव कोरत इतिहास रचला.
गेल्या वर्षभरात काही महत्वाच्या व्यक्तीनी जगाचा निरोप घेतला. ज्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली ती कधीही भरून निघणार नाही. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा सख्खा भाऊ विनोदी अभिनेते रवींद्र बेर्डे, ज्युनिअर महमूद, बेडेकर लोणची-मसाले फेम अतुल बेडेकर, जेष्ठ कीर्तनकार हभप बाबा महाराज सातारकर, ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव, प्रसिद्ध निसर्गकवी ना. धों. महानोर, सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई, ज्येष्ठ पत्रकार व लेखक शिरीष कणेकर, ज्येष्ठ गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर इत्यादी मान्यवरांचे निधन झाले.
अश्याप्रकारे 2023 हे वर्ष विविध कारणाने स्मरणात राहण्याजोगे झाले आहे. 2024 या वर्षात स्मरणात राहणाऱ्या चांगल्या घटना घडो अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. सर्वाना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नववर्षाभिनंदन ......!
( वरील सर्व माहिती फ्रेश मॉर्निंग बुलेटिनच्या मदतीने तयार करण्यात आले. )
- नासा येवतीकर, संयोजक, फ्रेश मॉर्निंग बुलेटिन