Friday, 30 August 2019

नांदेड जिल्हा परिषद विषय शिक्षक समुपदेशन प्रक्रिया

*न भूतो न भविष्यति अशी समुपदेशन प्रक्रिया*

नांदेड जिल्हा परिषद :-
गेल्या पाच वर्षांपासून रखडलेली पदवीधर विषय शिक्षक पदाची नेमणूक जिल्हा परिषद नांदेड कडून खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण केल्याबद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन करावेसे वाटते. ज्यापद्धतीने विषय शिक्षक ( भाषा, विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्र ) पूर्ण प्रक्रिया राबविण्यात आली, त्यामुळे सहसा कोणावर अन्याय होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली गेली. सभागृहातून बाहेर येणारा प्रत्येक शिक्षक हसरा चेहरा घेऊन बाहेर पडताना दिसत होता. हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्याच शिक्षकांना त्यांच्या सॊईस्कर जागा मिळाले नाहीत, त्यामुळे ते जरासे नाराज दिसून आले. समुपदेशन प्रक्रिया घेण्यापूर्वी शिक्षकांकडून होकार व नकार घेतल्यामुळे सभागृहात होणारा संभाव्य गोंधळ खूप कमी झाला असे म्हणण्यापेक्षा गोंधळ झालाच नाही, असे म्हणणे उचित ठरेल. सभागृहात समुपदेशक शिक्षकांच्या व्यतिरिक्त कोणालाही बसण्याची परवानगी दिली नाही, मोबाईलवर बोलण्यास बंदी केली, आपापसात चर्चा केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला, यामुळे दोनशे लोकांचा सभागृह पिन ड्रॉप सॅलेंट होता. काही कडक पावले उचलले तर त्याचे परिणाम चांगले बघायला मिळते, याचा अनुभव या निमित्ताने आला. कसल्याच प्रकारचे छुपे प्रकार न करता सर्वंच्या सर्व शाळा स्क्रीन वर दाखविण्यात आल्यामुळे ( विज्ञान / गणित विषय निवड करतांना अट टाकावी लागली ) शिक्षकांना त्यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार पसंदीचे गाव घेता येणे सॊईस्कर झाले. जिल्ह्यात विषय शिक्षकांच्या जागा रिक्त असल्यामूळे विद्यार्थ्यांचे फार मोठया प्रमाणात नुकसान होत आले आहे. यापुढे जिल्ह्यात प्रत्येक क्षेत्रात हुशार विद्यार्थी घडतील आणि जिल्ह्यातील विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करतील असे विद्यार्थी घडविण्याचे चांगले कार्य करा अशी शुभेच्छा नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. अशोक काकडे यांनी सर्व नवनियुक्त विषय शिक्षकांना दिली. त्यामुळे प्रत्येकांना एक वेगळी स्फूर्ती मिळाली. प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मा. प्रशांत दिग्रसकर यांनी सभागृहाला सोपी नियमावली सांगितली ज्यामुळे संपूर्ण प्रक्रिया यंत्राप्रमाणे पूर्ण झाली. नांदेड जिल्हा परिषदेत शिक्षण विभागात काम करणारी सर्व यंत्रणा ( ज्यात संगणकावर काम करणारे तंत्रस्नेही पासून गटशिक्षणाधिकारी आणि विस्तारअधिकारी ) अगदी शिस्तबद्धरित्या काम केल्यामुळे कोणात्याही शिक्षकांना त्रास झाला नाही. आजपर्यंत जे काम कोणत्याही अधिकाऱ्यांनी केले नाही ते काम यांनी करून दाखविले, त्याबद्दल त्यांचे हार्दीक आभार. मोठ्या प्रकल्पावर काम करताना छोटेसे त्रुटी होत असतात त्यामुळे मोठ्या कामाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पुढील पाच वर्षांनंतर दहावीचा निकाल जेंव्हा लागेल त्यावेळी याचे खरे परिणाम पाहायला मिळतील. जे शिक्षक पदवीधर शिक्षक म्हणून निवड केली ते मनातून आपल्या विषयाला न्याय देतील आणि सक्षम भारत निर्माण होण्यासाठी चांगले नागरिक तयार करतील. या प्रक्रियेत विषय शिक्षक म्हणून निवड झालेल्या माझ्या सर्व शिक्षक बांधवाना पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा ......!

- नासा येवतीकर

Thursday, 29 August 2019

पोळा

बैलांचा सण : पोळा
चित्र : विनायक काकुळते, नाशिक

भारत हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. येथील 75 टक्के लोक ग्रामीण भागात, खेड्यात राहतात. ग्रामीण भागात शेतीशिवाय अन्य दुसरा काही व्यवसाय सध्या तरी अस्तित्वात नाही. शेती म्हटले की त्याच्यासोबत बैलाचा संबंध येणारच. बैलाशिवाय शेती करणे फारच अशक्य आहे ( आधुनिक यंत्रामुळे सध्या बैलांची संख्या कमी होत आहे ही बाब वेगळी ) प्रत्येक शेतकऱ्याकडे निदान एक बैलजोडी असतेच असते आणि त्याच बैलाच्या ताकदीवर तो शेतातील सर्व कामे करून घेतो. शेताची नांगरणी, वखरणी, पेरणी किंवा शेतातून घराकडे मालाची ने-आण करण्यासाठी या बैलांचा वापर केला जातो. पूर्वी दळणवळणाची सुविधा एवढी विकसीत झाली नव्हती तेव्हा शहरात जाण्या-येण्यासाठी बैलगाडीतून प्रवास करावा लागायचा. सायकल नावाची वस्तू फारच कमी जणांच्या घरी बघायला मिळत असे. पूर्वीच्या काळी लग्नकार्यात नवरदेव सायकलसाठी रुसून बसला आहे असे आपण आज ऐकलं तर हसायला येते. याच बैलगाडीला 80 ते 90 च्या दशकात खूप मोठा दर्जा होता. एवढेच काय लग्नकार्याला जाणाऱ्या वऱ्हाडींना सुद्धा याच बैलगाडीचा आधार घ्यावा लागत असे. दवाखाना असो वा कोणाच्या सोयरीकीला जाणे असो प्रत्येकजण या बैलगाडीचा वापर करीत होते. आज तो काळ राहिला नाही. बैलांचा वापर आत्ता शेतीच्या कामापुरतेच मर्यादित राहिलेले आहे. प्रत्येक ठिकाणी उपयोगी पडणार्‍या या बैलाचा सण म्हणजे पोळा. श्रावण महिन्यातील अमावास्येला पोळा हा सण साजरा केला जातो. प्रत्येक शेतकरी या सणाची आतुरतेने वाट पाहतात. आपल्या बैलाविषयी असलेले प्रेम, माया, जिव्हाळा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदात दिसून येते. आपल्या पोटच्या लेकरासारखे ते बैलाची निगा राखतात, काळजी घेतात आणि पोळ्याला ते सारे प्रेम पाहायला मिळते. तसे पाहिले तर पोळा सणांची चाहूल श्रावण महिना प्रारंभ झाला की या सणांचे वेध सुरू होतात.
श्रावण महिन्याविषयी प्रसिद्ध बालकवी एका कवितेत म्हटले आहे की, " श्रावणमासी, हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे." या महिन्यात पावसाचे सरासरी प्रमाण जास्त असते. पावसामुळे सर्वत्र हिरवीगार सृष्टी दिसते. जणू असे वाटते की निसर्गाने हिरवा शालू नेसला आहे. या महिन्यात सणांची नुसती रेलचेल असते. सर्वप्रथम येथे ती नागपंचमी. मुक्या प्राण्यांवर प्रेम करा आणि त्यांना आपले समजा असा संदेश यातून दिला जातो. त्यानंतर पौर्णिमेला येतो रक्षाबंधनाचा सण. भाऊ बहिणीच्या पवित्र प्रेमाची महती सांगणारा सण संपल्यानंतर महिन्याच्या शेवटी येणारा सण म्हणजे पोळा. श्रावण महिना प्रारंभ झाला की शेतकरी रोज सकाळी आपल्या बैलांना स्वच्छ पाण्याने धुतात आणि त्यांना चारापाणी करून शेताकडे नेतात. पूर्वी खूप पाऊस पडायचा. नद्या, नाले, तलाव तुडुंब भरलेले असायचे. म्हणून शेतकरी तलाव किंवा नदीवर बैलांना धुण्यास घेऊन जात असत. पण आज तेवढा पाऊसच नाही. तलाव किंवा नदी सोडा साध्या खड्ड्यात पाणी दिसत नाही त्यामुळे बैलांना आज फक्त घरीच बादलीभर पाण्याने धुण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
पोळा सणाची खरी सुरुवात आदल्या दिवशी होते त्यास खांदे मळणी असे म्हणतात. याच दिवसापासून बैलांना काम लावले जात नाही. बैलाच्या खांद्याला तूप किंवा लोणी लावून चोळले जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी बैलांना स्वच्छ धुतले जाते आणि त्यानंतर त्यांची शिंगे रंगविली जातात. कपाळावर भिंगे लावतात. अंगावर झूल घालतात. गोंडे बांधतात आणि त्यास जंगलात चरवण्यास घेऊन जातात. गावातील मानकरी यांच्या हस्ते सायंकाळी पाच बैलांची पूजा केली जाते आणि पोळा फुटतो. तेथून शेतकरी आपले बैल घेऊन गावभर फिरत घरी येतात. गृहलक्ष्मी त्या बैलांची पूजा करते, मंत्र म्हटले जातात आणि बैलाला पुरणाचा नैवेद्य खाण्यास दिला जातो. आपल्या मित्रांना व नातलगांना पुरणपोळीचे मेजवानी देतात. वर्षभर बैलांनी आपल्या शेतात केलेल्या कष्टाचे कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे आपला हा पोळा होय. 
- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक व प्राथमिक शिक्षक
9423625769

Tuesday, 27 August 2019

भारतीय क्रीडा दिवस

शालेय अभ्यासक्रमात खेळाचे महत्व
रिओ ऑलिम्पिक मध्ये भारत पदक तालिकेत आपले खाते उघडते किंवा नाही याबाबत प्रत्येक भारतीयांच्या मनात शंका निर्माण होत असताना साक्षी मलिकने कुस्तीत कास्य पदक जिंकून 125 कोटी भारतीयांची शान राखली तर बैडमिंटनपटु पी व्ही सिंधुने रौप्य पदक मिळवित सर्व भारतीयांची मान उंचावली. हिमा दास हिने नुकतेच सलग पाच सुवर्णपदक जिंकले आहे. तसे पाहिले तर इतर देशाच्या तुलनेत आपली एवढी मोठी लोकसंख्या असून सुध्दा पदक मिळण्याच्या बाबतीत खुपच मागे का आहे ? यावर विचार करणे आवश्यक आहे. खरे तर खेळाची सुरुवात प्राथमिक शाळेपासून व्ह्ययला पाहिजे.
उत्तम आरोग्य असेल तर त्याचे डोके सुध्दा उत्तम असते अश्या अर्थाची एक म्हण वाचण्यात येते. त्याचा अर्थ शालेय जीवनापासून लक्षात घ्यायला हवे. कारण प्राथमिक शिक्षणाची सुरुवात शाळेत होते आणि याच ठिकाणी त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्या जाते. मुलाचा शारीरिक,भावनिक विकास होण्यासाठी खेळ आवश्यक आहे. मुले खेळण्यात जास्त वेळ घालू लागली की पालकाची ओरड ठरलेली असते की आत्ता किती वेळ खेळणार ? चल बस अभ्यासाला. ही नेहमीची पालक वर्गाची ओरड प्रत्येक घरात दिसून येते. यास पालकाना दोष देऊन चालणार नाही कारण सध्या परिस्थितीच आहे तशी खेळापेक्षा अभ्यासाला महत्व जास्त देण्यात येते.
संगणकच्या युगात काही चांगले घडत आहे तर काही वाईट सुध्दा घडत असताना दिसत आहेत. मोबाईल नावाच्या जादुई खेळणीने मुलांचे सर्वच खेळ हिरावुन घेतले आहे असे वाटते. पूर्वी ग्रामीण भागातील शाळा आणि रिकामी जागा मुलांच्या खेळाने भरून जात असत. शहरात खेळाची मैदाने सायंकाळी आणि रविवारच्या दिवशी मुलांनी फुलून जायचे. पण आज हे चित्र फार कमी पाहायला मिळत आहे. कारण आज मुले घरात बसल्या ठिकाणी मोबाईल वर सर्व खेळ खेळत आहेत. मैदानी खेळ कमी झाले. त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होत आहे. त्यांचा मेंदू काम करेनासे झाले आहे. शरीर जड होत आहे. मुलामध्ये चैतन्य नावाची वस्तु सापडत नाही. या सर्व बाबीवार एकच उपाय ते म्हणजे शारीरिक खेळ. मुलांचा अभ्यास तेंव्हाच चांगला होऊ शकतो ज्यावेळी त्यांचे मन प्रसन्न असेल आणि मन प्रसन्न ठेवण्यासाठी त्यांना मैदानावर खेळण्यास नेणे गरजेचे आहे. मैदानावर फिरणे असो खेळ खेळणे असो वा इतर काही करणे यामुळे मुलांना ताजी हवा मिळते जे की शरीरला आवश्यक आहे आणि मन प्रफुल्लित होते. म्हणून मुलांना नुसते अभ्यास करा असे म्हटल्याने मुलांचा अभ्यास नीट होणार नाही. ते आपल्या धाकामुळे वाचन लेखन अभ्यास करतील पण त्यांच्या लक्षात राहणार नाही, हे ही तेवढेच सत्य आहे त्यामुळे रोज सकाळी आणि सायंकाळी थोडा तरी वेळ खेळ खेळणे आवश्यक आहे. पण आज आपल्या मुलांची सकाळ आणि सायंकाळची वेळ ही शिकवणीमध्ये जात आहे. शाळेत सुध्दा खेळाचा एक तास असतो मात्र शाळेत किती व कोणकोणते खेळ शिकवल्या जातात हा एक संशोधन करण्याचा विषय होऊ शकतो. त्यास शिक्षक दोषी आहेत असे नाही कारण तेथे खेळाच्या शिक्षकाची कमतरता भासते. आज कित्येक शाळेत खेळाचे शिक्षकच नाहीत तर काही शाळेत खेळाचे मैदान उपलब्ध नाही तर मुले काय खेळतील आणि कुठे खेळतील ? कधी कधी मुले ज्यांच्या शाळेत मैदान आहे तेथे खेळताना दिसून येतात त्यांना कोणाचे मार्गदर्शन नसते, ना कोणाचा कानमंत्र ते आपले उगीच खेळ खेळत असतात. परंतु त्यांना चांगला गुरु मिळाला तर अनेक स्तरावर आपले नाव व कीर्ती मिळवू शकतात. शाळेत शिकलेल्या खेळाचा आयुष्यात फायदा होतो. शालेय जीवन संपल्या वर आपले कोणत्याच खेळाकडे लक्ष जात नाही कारण त्या खेळाविषयी जी रूची शाळेत तयार व्ह्ययला पाहिजे ते होत नाही. शाळेतील खेळ पावसाळी आणि हिवाळी खेळापूरती औपचारिकपणे पूर्ण केल्या जाऊ नये.
शालेय अभ्यासक्रमात खेळाचा तास हा शेवटचा असतो ज्यात सहसा काहीच होत नाही कारण मुलांना घरी जाण्याचे वेध लागलेले असते. दुपारची पूर्ण वेळ खेळासाठी राखीव ठेवणे आवश्यक आहे. शाळेतून विविध प्रकारच्या खेळाची तयारी होणे अपेक्षित आहे. यासाठी शासनाने या बाबिकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. निदान सहाव्या वर्गापासुन तरी खेळाच्या शिक्षकांची नेमणूक करणे आवश्यक आहे. ज्यामुळे मुले योग्य दिशेत मोकळेपणाने खेळ खेळतील. एखाद्या खेळात निपुण व्हायाचे असेल तर विषय शिक्षकच फक्त त्यास न्याय देऊ शकतो. प्रत्येक सहावी ते दहावीच्या वर्गासाठी क्रीडा शिक्षक असेल तर भविष्यात साक्षी आणि सिंधू मोठ्या प्रमाणावर तयार होतील. अशी आशा करण्यास हरकत नाही. कोणत्याच सोई सुविधा उपलब्ध नसेल तर आपली मुले स्पर्धेत कशी राहतील याचा विचार करणे आवश्यक नाही काय ? जर आत्तापर्यन्तच्या ऑलिम्पिक चा इतिहास पाहिले असता भारत देश सन 1900 पासून यात सहभाग घेत आहे. आजपर्यन्त भारताने 9 सुवर्ण चार रौप्य आणि 12 कास्य असे एकूण 25 पदक गेल्या 116 वर्षात मिळविले आहे आणि गेल्या 20 वर्षाचा मगोवा घेतल्यास असे लक्षात येते की सन 1996 पासून भारताने एक सुवर्ण, तीन रौप्य आणि नऊ कास्य पदकाची कमाई केली याचाच अर्थ गेल्या वीस वर्षपासुन भारताचा ऑलिम्पिक मधील सहभाग वाढला असून जास्तीत जास्त खेळ खेळून पदक मिळविण्याच्या दिशेने प्रयत्न चालू आहेत म्हणण्यास हरकत नाही. मात्र अजूनही मुलांना या खेळाच्या बाबतीत अधिक जागृत करून त्यांना खेळाकडे आकर्षित करणे आवश्यक आहे. शाळा स्तरापासून ते देश स्तरापर्यन्त विविध स्पर्धाचे आयोजन करून खेळाडूना प्रोत्साहन मिळवून देणे याची आत्ता खरी गरज आहे.
- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद
  09423625769

Sunday, 25 August 2019

माझा फळा-माझी लेखणी

माझा फळा - माझी लेखणी उपक्रम राबविलेल्या शाळांच्या उपक्रमशील शिक्षकांच्या काही बोलक्या प्रतिक्रिया.

Togarwad Nanded
माझा फळा माझी लेखणी हा खेळ सुंदर आहे मुलांच्या बुद्धिला चांलना देणारा आहे त्यांच्या प्रगतीला पोषक आहे 🙏🙏

+91 96574 68867:
उपक्रम खूप छान.मुल स्वत:हून विचारतात मँडम आज कोणत नाव लिहायचय .

+91 82370 60639
या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांमधील कल्पकता दिसून येते त्यांच्यातिल सुप्तगुणांना आपण थोडी चालना देतो याची जाणीव होते खरच खूप छान अनुभव आहे

+91 94035 40037
या उपक्रमा मुळे मुलांच हस्ताक्षर पण सुंदर होईल..कारण पहिल्या दिवशी स्वत:चे नाव लिहले तेवडं अक्षर चांगल आले नाही..परंतू त्यांना एक सांगीतल ज्याचं अक्षर सगळ्यात छान येईल ..त्याला पेन बक्षिस.. आपल्याला हा उपक्रम रोजच घ्यायचाय वेगवेगळी नावं असतील..चिञ असतील...मुलं अक्षर सुंदर काढण्याचा चांगला प्रयत्न करु लागलेत...अक्षर नक्कीच मुलांच या उपक्रमामुळे छान होईल. आणि यामुळे वाचनाचाही सराव..🙏

+91 99759 77676
21 तारखेला मुलांनी बाबांचे नाव लिहिले बऱ्याच विद्यार्थ्यांना बाबा म्हणजे आजोबा वाटले एकमेकांना त्यांनी त्यांच्या आजोबा बद्दल माहिती सांगितली काही जण माझे आजोबा मिल्ट्री मॅन होते असे सांगत होते तेव्हा ते खूप संवेदनशील झाले

+91 98506 36908
मुले खरच जाणीवपूर्वक माझे अक्षर चांगले कसे येईल याचा प्रयत्न करताना दिसतात. यामुळे शुद्धलेखनही नक्कीच चांगले होईल. उपयुक्त उपक्रम आहे.

Yangndewar Madam
मुलांना फलक लेखन करायची खूप आवड असते.म्हणून मुले उत्साहीत होत आहेत फलक लेखन करण्यासाठी..वर्गात गेल्या बरोबर विचारत आहेत कि आजपण लिहायला लावणार?खूप छान प्रतिसाद मिळत आहे.ना.सा.सर उपक्रम छान👌👌

माझा फळा - माझी लेखणी या उपक्रमाचा जन्म एका अपघातातून झाला. माझ्या वर्गातील एक विद्यार्थी रडत रडत माझ्याजवळ आला आणि म्हणाला " सर, तो सुरेश आहे ना, माझे नाव एका कागदावर लिहिला " यावर मी म्हटलो, " त्यात काय एवढं, तुझं नाव लिहिलं तर बिघडलं कुठं, तुझ्या नावाचे अनेकजण असतात." पण तो ऐकायला तयार नव्हता, त्याची इच्छा होती की, मी त्याला रागवावे. त्याप्रमाणे मी त्याला रागावलो आणि जागेवर बसायला सांगितलं. थोड्या वेळाने मी याविषयी विचार केला की, मुलांना अभ्यासाच्या व्यतिरिक्त लिहायला खूप आवडतं. मग मुलांना फळ्यावर लिहायला तर खूपच आवडते. त्यादिवशी एक प्रयोग म्हणून मुलांना फळ्यावर स्वतःचे नाव लिहायला सांगितलं, मग काय सर्व मुलांनी अगदी उत्स्फूर्तपणे फळ्यावर नाव लिहायला पुढे आली. मग त्यांना सांगितलं की, तुम्हाला रोज फळ्यावर लिहायचं आहे, त्यामुळे असे कुणाचे नाव कुठे ही लिहीत जाऊ नका. सुंदर अक्षर आणि अचूक शब्द लिहा.
खरोखरच मुलांना खूप आनंद वाटला आणि रोज नवीन विषय दिल्यामुळे मुले उत्सुकतेने लिहिण्याची वाट पाहू लागले.

नासा येवतीकर
जि प प्रा शाळा चिरली

+91 73507 21277
*माझा फळा माझी लेखणी*
हा उपक्रम अतिशय सुंदर आहे.या उपक्रमाला जास्त तयारी करावी लागत नाही.अतिशय सोप्या पध्दतीने व उपयुक्तपणे हा उपक्रम आहे.लेखनाला कंटाळा करणारी मुले आनंदाने लेखन करू लागली.अक्षरे छान येण्यासाठी लेखन सराव करू लागली.लेखनातील चूका आपण न सांगता त्यांनाच समजून येऊ लागल्या.मस्तच प्रतिसाद आहे.

साविता बारंगळे जि.प.शाळा धनवडेवाडी सातारा

*माझा फळा माझी लेखणी*
ना सा सर म्हणजे त्यांच्या नावातच नाविन्यपूर्ण साहित्यिक त्यांच्याजवळ आहे.खरोखरच हा उपक्रम अतिशय सुंदर आहे. सर फळा म्हणजे प्रत्येक बालकास लावीते लळा. या उक्तीप्रमाणे फळ्यावर प्रत्येक बालकास लिहिण्यास आवडते कारण आपण जेव्हा शालेय जीवनात असताना कोणी फळ्यावर लिहले तर आपल्यावर गुरुजी रागवायचे.आणि एका बंदिस्त असायचो कारण वर्गात कोणी बोलेल त्यांचाच फळ्यावर लिहायचे परंतु त्यातून कोणतेही उद्दीष्ट साध्य होत नव्हते .परंतु आजची परिस्थिती बदलली आहे.कारण आजचा गुरुजी आपापल्या परीने असो किंवा माझा फळा माझी लेखणी या उपक्रमातून शिक्षण यातून प्रत्येक शिक्षकास प्रेरणा मिळत आहे.आजचा विद्यार्थी अभिमानाने आपल्या नवीन नवीन  परिचित गोष्टी लिहू लागला.या उपक्रमातून वळणदार अक्षरे व कानामात्रा चुका व दुरुस्त एकमेकांना कळू लागल्या व लगेच सुधारणा लक्षात येऊ लागले.या उपक्रमातून शुद्धलेखनात सुधारणा होऊ लागलेत सर आजपर्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे पुढे सुध्दा हा उपक्रम अखंड चालू राहावा हीच अपेक्षा ठेवतो व या उपक्रमास शुभेच्छा देतो.
*आपलाच एक बांधव*
*संतोष वाघमारे*
*जि.प.प्रा.शाळा बाचेगाव ता.धर्माबाद जि.नांदेड*

Ambatwad NV
माझा फळा माझी लेखणी हा उपक्रम अतिशय चांगला आहे कारण या उपक्रमासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांना विशेष तयारी किंवा  खर्च करावा लागत नाही .लेखनातील स्वतःच्या चुका स्वतः दुरुस्त करतांना मुले दिसतात व चुक दुरूस्त झाल्यानंतर त्यांचा आनंद पाहण्यासारखा असतो.

+91 96374 60738
माझा फळा माझी लेखणी
हा उपक्रम खूप छान आहे. विद्यार्थ्यांना फळ्यावर लिहायला आवडते. रोज लिहायला मिळाल्याने लिहिण्यात सुधारणा होतात. रोज विद्यार्थी वाट बघतात आज काय लिहायचे आहे. लिहिल्यानंतर त्याचे वाचन करतात. लेखन वाचन दोन्ही क्रिया आनंदाने करतात. उपक्रम खूप छान आहे.
Dakshata borkar
जी. प. शाळा. Patharai ता. रामटेक. जी. नागपूर

Kalpna Madewar
माझा फळा माझी लेखणी हा छान उपक्रम आहे.मला विद्यार्थींकडून छान प्रतिसाद मिळत आहे.प्रत्येक मुलाला संधी असल्यामुळे विद्यार्थी खूप खूष आहेत.

+91 94035 43109
माझा फळा माझी लेखणी हा उपक्रम स्तुत्य आहे. ज्ञानरचनावाद उपक्रमास पूरक आहे.उत्स्फूर्त स्वयंलेखन विकासासाठी अभिरुची निर्माण करणाराआहे👌🌹👍

+91 95522 73717
"माझा फळा, माझी लेखणी " याउपक्रमाच्या नावातच  आपलेपणा आहे. मुलांना लिहायला खुपच आवडते .रोज नवीन विषयाची उत्सुकता असते. मला देखील हा विषय खूप आवडला. 👌🙏
श्रीमती. सीमा ज्ञानेश्वर जगदाळे...जि. प. शाळा धुरखेड. ता. शहादा जि. नंदुरबार

*'माझा फळा- माझी लेखणी*
हा उपक्रम मागील आठवड्यात मी माझ्या शाळेवर राबविला.विद्यार्थी दररोज उपक्रमाची आतुरतेन वाट पाहत असत.विद्यार्थ्याना अभिव्यक्तीची संधी उपक्रमाच्या माध्यमातून मिळाली.प्रत्येक विद्यार्थी उपक्रमात हिरीरीने सहभागी होत होता.सर्वांना समान संधी मिळाली.फळ्यावर लिहल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावर असिम आनंद आढळला.
  त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला.उपक्रम सुरु केल्याबद्दल ना.सा.सरांचे मन:पूर्वक आभार.

🙏साईनाथ कामिनवार🙏
          सहशिक्षक
जि.प.प्रा.शा.पाटोदा बु ता.धर्माबाद जि.नांदेड

+91 99231 00360
वसंतराव वैदय विदयालय प्राथमिक शाळा सेनादत्त पेठ पुणे 30
वैशाली सर्जेराव

परिक्षा असली तरी पेपर झाला आता फळयावर लिहियच ना इतकी उत्सुकता मुलांमधे दिसली यावरूनच मुलांना उपक्रम मनापासून आवडतोय व लेखनाची गोडी वाढतेय हे ही दिसून येते 🙏

"माझा फळा माझी लेखणी' हा उपक्रम खरोखर खूपच स्तुत्य आहे. शाळेतील मुले फळ्यावर नाव लिहिण्यासाठी खूप उत्सुक असतात. आपण लिहिलेले नाव इतर मुलांना नेऊन कौतुकाने दाखवतात. या मुळे मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. हस्ताक्षरात सुधारणा झाली. पांढऱ्या खडूपेक्षा आम्ही रंगीत खडूचा वापर केल्यामुळे मुलांमध्ये लेखन करण्याची आवड निर्माण झाली. रोज फळ्यावर काय लिहायचे या बद्दल औत्सुक्य निर्माण झाले. बरेच जणांना ग्रुप जॉईन करायचा आहे ते सर्व या उपक्रमाविषयी विचारत आहेत. उपक्रम सर्वाना खूप आवडला आहे.

श्रीम दिपश्री वाणी
ता हवेली, जि पुणे

धन्यवाद ..........!

संकल्पना - नासा येवतीकर

मतदान जनजागृती ( Voting Awarness )

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जनजागृती चला मतदान करू लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.  चला मतदान करू .......! ...