शिवजयंती निमित्ताने प्रासंगिक लेख
महाराष्ट्राचे स्फूर्तिस्थान :- छत्रपती शिवाजी महाराज
महाराष्ट्राचे आराध्य दैवत, सर्वांचे स्फूर्तिस्थान आणि रयतेचा जाणता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत नाही असा एक ही व्यक्ती राज्यात शोधून ही सापडणार नाही. आपल्या राज्यातच नाहीतर देशातील अनेक राज्यात व जगातील काही देशांत शिवाजी महाराजांचे कार्य अनेकांना स्फूर्ती व प्रेरणा देत असते. शिवाजी महाराजांकडे इतर साम्राज्यांच्या तुलनेत छोटी पण सुसज्ज आणि शिस्तबद्ध अशी फौज होती. या फौजेमध्ये मुख्यत्वे मराठा आणि कुणबी जातीचे मावळे समाविष्ट होते. शिवाजी महाराज जाणून होते की मुघलांच्या प्रचंड दारुगोळा व तोफखान्यांनी सज्ज असलेल्या फौजेला पारंपारिक युद्धपद्धतीने हरवणे कठीण होते. त्यामुळे महाराजांनी आपली स्वतःची अशी युद्धनीती विकसित केली, ज्यास ' गनिमी कावा' म्हणून ओळखले जाते. आजूबाजूच्या भौगोलिक प्रदेशाची माहिती आणि येथील दऱ्याखोऱ्यांचे सखोल ज्ञान यावर वेगवान फौज आणि शत्रूला अनपेक्षित हल्ले अशा पद्धतींचा वापर शिवरायांनी केला. ही युद्धनीती अतिशय यशस्वी ठरली. मुघलांच्या मोठमोठ्या फौजा शिवरायांच्या छोटेखानी फौजांसमोर निष्प्रभ ठरल्या. शिवाजी महाराजांच्या गनिमी कावाचा अनेक इतिहास संशोधक आजही अभ्यास करतात, यावरून शिवरायांची युद्धनीतीचे महत्व अधोरेखित होते.
पारतंत्र्याच्या काळात स्वतःचे राज्य निर्माण करण्याचे स्वप्न पाहणे आणि पाहिलेले स्वप्न पूर्णत्वास नेणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. पण शिवाजी महाराजांनी सवंगडी असलेल्या मावळ्यांना सोबत घेऊन श्री चे राज्य निर्माण केले आणि इतिहास घडविला. एक आदर्श राजा कसा असतो ? आज्ञाधारक पुत्र कसा असावा ? रयतेचा जाणता राजामध्ये कोणते गुण असावेत ? याचे उत्तम उदाहरण म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्राकडे पाहतो. सोळाव्या शतकात होऊन गेलेले राजे शिवाजीचे कार्य आज एकविसाव्या शतकात देखील तेवढेच प्रेरक आणि मार्गदर्शक ठरतात. त्यांनी आपल्या जीवनात अनेक चढ-उतार पाहिले, सुखदुःखाचा अनुभव घेतला, जवळच्या व्यक्तीचा विरह सहन केला, अनेक लढाया त्यांनी आपल्या बुद्धीचातुर्य व सहकार्याने जिंकले आहेत.
शहाजी भोसले आणि राजमाता जिजाऊ यांच्या पोटी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळील वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी एका तेजस्वी बाळाचा जन्म झाला. शिवनेरी किल्ल्यात जन्म झाला म्हणून त्या बाळाचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव 'शिवाजी' ठेवले गेले. शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले हे मराठा सेनापती होते, ज्यांनी दख्खनच्या सल्तनतची सेवा केली होती. शहाजी महाराजांना नेहमी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जावे लागत असे त्यामुळे त्यांनी राजमाता जिजाऊ आणि बाळ शिवाजी यांची राहण्याची व्यवस्था पुण्यात केली. राजमाता जिजाऊ यांच्या सान्निध्यात चंद्रकलेप्रमाणे बाळ शिवाजी मोठे होत होते. राजमाता जिजाऊ ह्या एक धाडसी आणि स्वाभिमानी स्त्री होती. त्यामुळे त्यांनी बाळ शिवाजीला लहानपणापासून साहसी व धाडसी लोकांच्या कथा व गोष्टी सांगत असत. प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले शिवाजी महाराजांच्या त्या आद्यगुरू मानल्या जातात. हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजी महाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ती दिली असे काही इतिहासकार मानतात. मुलांना संस्कारी व धाडसी करायचे असेल तर प्रत्येक स्त्रियांनी राजमाता जिजाऊ यांचे जीवन चरित्र डोळ्यासमोर ठेवायला हवे. लहान मुलांना आई जसे शिकवेल तसे ते मूल घडत राहते. म्हणून जीवनात येणारे सुख, दुःख, सोपे, अवघड, कठीण प्रसंगाचे अनुभव लहान मुलांना द्यायला हवे. पण आजकालच्या माता स्वतः अनेक कष्ट व दुःख सहन करतात पण आपल्या लेकराला काडीचा त्रास होऊ देत नाहीत. त्यामुळे त्यांच्यामध्ये त्या विषयीच्या जाणिवा निर्माण होत नाहीत. माता जिजाऊ यांनी आपले स्वतःचे एक राज्य असावे अशी मनोमन इच्छा होती, तशी ती आपली इच्छा त्यांनी शिवाजी महाराजांकडे व्यक्त केली. त्यासाठी त्यांनी बाळ शिवाजीला घोड्यावर बसणे, तलवार चालविणे यासारख्या युद्धकला शिकविल्या. आपल्यापेक्षा मोठ्या लोकांसोबत कसे वागावे ? महिलांसोबत आपले वर्तन कसे असावे ? जीवनातल्या सूक्ष्म घटनांचा त्यांच्या बालमनावर संस्कार केले. याच विचारातून शिवाजी महाराजांनी आपल्या बाळ सवंगड्यासह रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. खरोखरच तो किती धाडसी निर्णय होता. आपल्या मावळ्यांच्या सहकार्याने वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी शिवरायांनी तोरणा किल्ला जिंकून घेतला. पुढील दोन वर्षात शिवरायांनी पुण्याजवळील अनेक महत्त्वाचे किल्ले ताब्यात घेतले. तसं बघायला गेलं तर शत्रू पक्षात कितीतरी सैनिक होते आणि त्यामानाने राजे शिवाजी यांच्याकडे फार तुल्यबळ सैन्य. पण शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे सैन्य यांच्यात जो आत्मविश्वास आणि धमक होती ती शंभर सैनिकाला पुरून उरणारी होती. म्हणूनच त्यांनी अनेक किल्ले जिंकू शकले. त्यांच्या मावळ्यांच्या यादीत सारेच शूर आणि वीर होते. त्यापैकी काही शूर वीर मावळ्यांचा सेनापतीचा उल्लेख केल्याशिवाय शिवाजी महाराजांचे कार्य पूर्णत्वास गेल्यासारखे वाटत नाही.
शिवाजी महाराज यांच्या शूर वीर मावळ्यांच्या यादीत प्रथम नाव स्मरते ते म्हणजे तानाजी मालुसरे यांचे.
तानाजी यांच्या घरी त्यांच्या मुलाच्या लग्नाची जोरदार तयारी चालू होती. त्याचवेळी कोंढाणा किल्ल्यावर स्वारी करण्याची वेळ आली. त्यावेळी तानाजी यांनी आधी लगीन कोंढण्याचे मग रायबाचे असे सगळ्यांना सांगून लढाईसाठी निघून गेले. कोंढण्यावर शत्रूशी चार हात करतांना तानाजी मालुसरे धारातीर्थी पडल्याची बातमी महाराजांच्या कानावर गेले त्यावेळी महाराज निःशब्द झाले. त्यांच्या तोंडून एकच वाक्य बाहेर पडले ते म्हणजे ' गड आला पण सिंह गेला.' तानाजी मालुसरे यांच्यासारखे अनेक मावळ्यांची महाराजवर खूप निष्ठा आणि प्रेम होते म्हणून तर आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी स्वराज्यासाठी आपल्या जीवाचे बलिदान दिले. महाराजांचे जीव वाचले पाहिजे म्हणून स्वतःचे जीव अर्पण करणाऱ्याच्या यादीत बाजीप्रभू देशपांडे यांचे स्मरण करणे अगत्याचे ठरते.
लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे असे म्हणून पन्हाळगडावरून विशालगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर घोडखिंडीत बाजीप्रभू यांनी शत्रूला रोखून धरले. जोपर्यंत महाराज गडावर सुखरूप पोहोचत नाहीत तोपर्यंत त्यांनी शत्रूशी चार हात केले. महाराज गडावर पोहोचल्याची तोफ ऐकल्यावरच त्यांनी आपला जीव सोडला. किती ती निष्ठा ! असे जिवाभावाचे मावळे मिळविणे हे खरंच भाग्याची गोष्ट आहे. अफजलखान यांच्या वधाच्या वेळी महाराजांचे अंगरक्षक जिवा महाल तात्काळ धावून गेला म्हणूनच म्हटले जाते होता जीवा म्हणून वाचला शिवा. अफझलखानाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्याच्या शवाचे इस्लामी पद्धतीने अंत्यसंस्कार करून त्याची एक कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली. यावरून शिवाजी महाराजांची आपल्या शत्रूबद्दल असलेला आदर लक्षात येते. शिवाजी महाराजांच्या जीवनात असे अनेक प्रसंग आले ज्यात त्यांच्या मावळ्यांनी आपले जीव अर्पण करून महाराजांचे जीव वाचविले. अनेक शत्रू राज्यांना त्यांनी सळो की पळो करून सोडले. लाखाचा पोशिंदा जगाला पाहिजे असे सर्वांची मनोकामना असायची आणि त्याच विचारातून प्रत्येकजण स्वयंस्फूर्तीने कामाला लागत होते. महाराजांच्या सैन्यात सर्व जाती-धर्माचे व विविध पंथाच्या लोकांचा समावेश होता. सर्वधर्मसमभाव या वृत्तीने महाराजांचे सैनिक कार्य करत असत. राज्यातल्या प्रत्येक व्यक्ती विषयी महाराजांच्या मनात प्रचंड आस्था होती. कोणत्याही व्यक्तीची पिळवणूक होऊ नये, झाडांची कत्तल करू नका, शेतकऱ्यांच्या पिकांना नुकसान करू नका, स्त्रियांचा सन्मान करा अश्या प्रकारचे आदेश ते आपल्या सैन्याला देत असत यावरून महाराजांची दृष्टी आपल्या लक्षात येऊ शकते. शिवाजी महाराजांनी राज्यकारभारासाठी आठ मंत्री असलेले अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली होती. हे मंत्री राजांना राज्यकारभारविषयक कामाविषयी सल्ले देत असे. राज्यकारभारात तत्कालीन रूढ असलेल्या पारशी भाषेऐवजी मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. शहाजीराजे व जिजाबाई यांची मुद्रा पारशी भाषेत होती, पण शिवाजी महाराजांनी राजमुद्रेसाठी संस्कृत भाषेचा वापर केला. शिवाजी महाराज दिसायला लहान मूर्ती जरी असली तरी त्यांची कीर्ती खूप महान होती. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहेत. शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा सर्वत्र शिवजयंती म्हणून साजरा केला जातो. १६८०च्या एप्रिल महिन्यात वयाच्या ५० व्या वर्षी शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती त्यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन स्मृतीस कोटी कोटी प्रणाम !
- नागोराव सा. येवतीकर, स्तंभलेखक
मु. येवती पो. येताळा
ता. धर्माबाद जि. नांदेड
पिन - 431809
मोबाईल क्रमांक - 9423625769
Mail ID - nagorao.yeotikar@gmail.com