शांतता ........परीक्षा चालू आहे !
फेब्रुवारी - मार्च महीना उजाडला की सर्वत्र परीक्षेचे वारे वाहायला लागते. माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावी - बारावीच्या परीक्षेने या परीक्षा सत्राला सुरुवात होते. ज्यांच्या घरात दहावी किंवा बारावीच्या वर्गात शिकणारी मुले असतात त्यांच्या घरात कमालीची शांतता दिसून येते. आपल्या मुलांना अभ्यास करताना कसलाच त्रास नको म्हणून आई वडील मुलांच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात. मुलांना काय हवे आणि काय नको याची दक्षता घेतात. त्यामुळे राहून राहून वाटते की परीक्षा पाल्याची आहे की पालकांची. कारण प्रत्येक बाबतीत ते मुलांच्या अभ्यासाची काळजी करतात. यात मुलांना ही काही तरी विशेष अशी जाणीव होते आणि ते सुद्धा नेमके याच वर्षी धीर गंभीर होतात. दहावीच्या वर्गात येण्यापूर्वी पालक आणि विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाकड़े लक्ष देत नाहीत. मग दहावीच्या वर्गात प्रवेश केल्याबरोबर पालक आणि विद्यार्थी दोघे पण जागे होतात. ऐन वेळी अभ्यास केल्याने यश मिळते काय ? याचा जरा देखील विचार करीत नाहीत.
घरातील वातावरण -
परिक्षेच्या काळात घरातील वातावरण मजेशीर आणि हसत-खेळत असायला पाहिजे परंतु त्या उलट परिस्थिती प्रत्येक घराघरात पाहायला मिळते. सर्वात पहिल्यांदा घरातील सर्वाना आवडते असलेले टीवी बंद केल्या जाते. या टीवीचा परिणाम सर्वावर होतो विशेष करून घरात अभ्यास करणाऱ्या मुलांवर होतोच होतो. सायंकाळच्या वेळी मुले जेंव्हा अभ्यासाला बसतात नेमके त्याच वेळी टीवीवर कोणता ना कोणता खास कार्यक्रम चालू असतो. ते कार्यक्रम पहावे अशी मुलांची पण ईच्छा असते मात्र पालक त्यास अभ्यास कर म्हणत खोलीत बसवितात. तो शरीराने जरी खोलीत असला तरी मनाने तो पुस्तकात नसतो मुळीच. या वाचनाचा किंवा अभ्यासाचा काही अनुकूल परिणाम दिसतात काय ? अर्थात त्याचे उत्तर नाही असेच येते. त्यामुळे घरातील टीवी बंद ठेवणे हा सर्वोत्तम उपाय आहे काय ? क्रिकेट हे मुलांचे सर्वात आवडते खेळ आहे. मुले आपला जास्तीत जास्त वेळ खेळण्यात घालवितात, त्यातल्या त्यात क्रिकेट खेळण्यात. क्रिकेट मंडळ सुध्दा नेमके परीक्षेच्या काळातच क्रिकेटच्या सामन्याचे आयोजन करतात. त्यामुळे मुलांचे अभ्यासात अजिबात लक्ष राहत नाही आणि त्याचा परिणाम निकालावर होतो. याविषयी क्रिकेट मंडळाने विचार करून परीक्षा संपल्यावर म्हणजे एप्रिल- मे महिन्यात सामन्याचे आयोजन केल्यास मुलांचे नुकसान होणार नाही. परिक्षेच्या काळात घरातील प्रत्येकजण काळजीपूर्वक वागतात. मुलांच्या अभ्यासासाठी त्रास होणार नाही यांची काळजी प्रत्येक सदस्य घेताना दिसून येतो. एवढेच नाही तर पाहुणे मंडळी सुध्दा विचार करूनच घरी येतात. मुलांची आई शेजाऱ्यां-पाजाऱ्यांकडे सहज बोलून जाते, यावर्षी मुलां-मुलींचे दहावीचे वर्ग आहे बाई, मला कुठे जायलाही जमत नाही. त्यांना सोडून कुठे जावे. त्यांचा अभ्यास बुडेल आणि त्यास कमी मार्क पडतील असे बोलते. त्यांच्या परीक्षेमुळे आई कोणाच्या ही घरी जाणे किंवा कार्यक्रमास जाणे टाळते. मुलांच्या परीक्षेचा घरात वर्षभर परिणाम जाणवतो. आई-बाबा कुणाच्या लग्नाला तर जात नाहीतच शिवाय घरात कोणाचे लग्नाच्या कार्यक्रमाचे आयोजन सुध्दा केल्या जात नाही. दरवर्षी सहलीला जाणारे कुटुंबसुध्दा आपली सहल रद्द करुन मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देतात. काही क्षणापुरतेच सण समारंभ साजरे केली जातात. मुलांच्या परिक्षेच्या काळात घरातील मंडळी सर्व काही त्याग करतात. याचे मुलांच्या मनावर सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल काय ? हा एक मोठा प्रश्न आहे.
परिक्षेची काळजी -
एक काळ होता ज्यावेळी दहावीच्या परिक्षेला खुप महत्त्व होते. दहावी झाली की डी एड करायचे आणि लगेच शिक्षकाची नोकरी लागायाची. त्यासाठी दहावीला चांगले गुण मिळणेे आवश्यक होते. त्यासाठी पालक मंडळी वेगवेगळ्या योजना वापरत असत. कसे ही करून दहावीला 75% च्या वर गुण मिळावे यासाठी ज्या ठिकाणी नकला खुप चालतात अश्या शाळेत पैश्याच्या बोलीवर मुलांना प्रवेश दिल्या जायचे. शाळेचा तो एक प्रकारे व्यवहार सुरु झाला होता. ऐन परिक्षेच्या काळात मुलांना मोकळेपणाने म्हणजे नकला मारुन पेपर लिहू द्यावे यासाठी ही पालकांची धडपड असायची. शाळेकडे जे तोंडी गुण असायचे त्यासाठी सुध्दा पैसा दिला जायच्या. यात नकलाचा एवढा सुळसुळाट वाढला होता की, लिहिता-वाचता न येणारा विद्यार्थी देखील चांगल्या मार्काने पास होऊ लागला. पुढे डी एड ला ही त्यांचा नंबर लागू लागला आणि तीन वर्षात शिक्षक म्हणून नोकरी सुरु. अश्या या पध्दतीत विद्यार्थ्यापेक्षा पालकाना त्यांच्या परीक्षेची जास्त काळजी असायची. मात्र गेल्या दहा वर्षात सर्व पध्दती बदलून गेल्या. बोर्डाने सुद्धा परीक्षा पध्दतीत आमुलाग्र बदल केला आणि प्रशासनाने ही यात मोलाची साथ देत कॉपीमुक्त परीक्षा घेण्यास सहकार्य केले. त्यामुळे पूर्वी दहावी आणि बारावीच्या परिक्षेला जे जत्र्याचे स्वरुप येत होते, ते आत्ता बंद झाले. बारावी नंतर डी एड करण्यात आले आणि गेल्या सहा वर्षा पासून शिक्षक भरती बंद आहे त्यामुळे डी एडचे ही आकर्षण कमी झाले. म्हणजे आज पालकांच्या डोक्यावरील ओझे खुप प्रमाणात कमी झाले आहे असे वाटत असले तरी काही पालक आपल्या मुलांच्या करियर साठी कोणत्याही स्तरावर जाऊन समोरच्याशी बोलणे करतात. असे अनेक गैरप्रकार परिक्षेच्या काळात वाचायला आणि पाहायला मिळतात. एखादा विद्यार्थी अभ्यासात मध्यम असेल तर अश्या मुलांच्या पालकाना तर खुपच काळजी लागते. त्या मुलांचे भविष्य त्यांना अंधकारमय वाटते. त्याची काळजी मुलाने करण्याऐवजी पालकच करतात. त्या पेक्षा पालकानी त्या मुलाची आवड निवड लक्षात घेऊन त्यास मार्गदर्शन केल्यास तो जीवनात नक्की यशस्वी होऊ शकतो. पालक आपल्या मुलांना लहान सहान गोष्टीत त्यास कसल्याही प्रकारचा त्रास होऊ न देता मदत करतात याचा अर्थ ते आपल्या मुलांना पंगू करतात, असे नाही काय ? असे केल्याने मुले आळशी होणार नाहीत कश्यावरुन ? सर्वसाधारण पाहणीमध्ये असे दिसून येते की गरीबाची लेकरे ज्या तन्मयतेने शिकतात श्रीमंताची लेकरे ज्यास कोणतीही वस्तू मागितली की मिळते ते शिकत नाहीत. असे का ? यावर कधी पालकानी विचार केला आहे काय ? शिक्षणाची गरज आणि आवश्यकता जोपर्यंत मुलांना समजणार नाही तोपर्यंत पालकाचे सर्व प्रयत्न असफल आहेत. कोणत्याही गोष्टीची कमतरता नसलेल्या मुलांना शिक्षणाचे महत्त्व लवकर कळणार नाही. बाप कमाई वर काही एक कळत नाही. जेंव्हा आप कमाई चालू होते त्यावेळी एक-एक पैश्याचे महत्त्व कळते. म्हणून कमवा आणि शिका यासारखे धोरण खुप मोठे काम करून जातात. वास्तवतेचे चटके लागले पाहिजे तर तो अभ्यासाकडे वळतो. आज मोठ्या शहरात असे अनेक मुले आहेत जे बापाच्या पैश्यावर आणि अभ्यासाच्या नावाखाली मजा करीत फिरतात. परीक्षेत यश नाही मिळाले की पेपर अवघड होता, नशीब साथ दिली नाही, थोडक्यात हुकला, स्पर्धा खुप वाढली असे अनेक कारणे सांगून वेळ मारून नेतात. त्याच परीक्षेत अगदी गरीब असलेल्यां मुला-मुलींची ज्यानी कोठे ही शिकवणी लावले नाही त्यांची निवड होते. हे कश्यावरुन तर मुळात मुलांना अभ्यास करण्याची गोडी असावी लागते, आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. म्हणून पालकानी आपल्या मुलांच्या परीक्षा आणि त्यात मिळत असलेले यश यांचे मुलांवर दडपण येणार नाही याची सर्वप्रथम काळजी घ्यावी. परीक्षेत अमुक गुण मिळाले पाहिजे अशी जबरदस्ती मुलांना अधोगतीकडे नेते. त्यांच्यात न्यूनगंड निर्माण करते. भीती निर्माण करते. पहिल्या वर्गापासून मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देणाऱ्या पालकाना दहावी बारावी किंवा इतर कोणत्याही परिक्षेच्या काळात विशेष काही धडपड करावी लागत नाही. तहान लागली की विहीर खोदणाऱ्या पालकांची अवस्था खुप बिकट होते. त्याहुन बिकट त्या मुलांची होते. म्हणून पालकानी आपल्या पाल्याची अभ्यासाची काळजी प्राथमिक वर्गापासून घ्यावी अन्यथा ऐन महत्वाच्या परिक्षेच्या काळात परीक्षा पाल्यांची आहे की पालकांची असा प्रश्न निर्माण
परीक्षेला जाता जाता ....
फेब्रुवारी महिना उजाडला की, सर्वांना परीक्षेचे वेध लागतात. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाद्वारे या परीक्षेच्या कार्यक्रमाचे उदघाटन बारावीच्या परीक्षेने दरवर्षी करीत असते. तसे बारावीच्या परीक्षेला फेब्रुवारी महिन्यात सुरुवात होत असते, तर दहावीच्या परीक्षेला मार्च महिन्यापासून सुरूवात होत असते. मग इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होते. विद्यापीठाच्या परीक्षेने या परीक्षांचा शेवट होतो. परीक्षेच्या काळात मुलांवर एक वेगळ्याच प्रकारचे दडपण जाणवते. वर्षभर केलेल्या अभ्यासाची फक्त दोन ते तीन तासात परीक्षा द्यावी लागते. बहुतांश वेळा असे होते की ऐनवेळी विद्यार्थी प्रश्नाचे उत्तर विसरुन जातात. त्यामुळे परीक्षेच्या काळात गोंधळून जाऊ नये किंवा मनावर जास्तीचे दडपण घेवू नये. परीक्षेच्या आदल्या दिवशी जागरण करून अभ्यास न करता निश्चित झोपी जावे. उद्याचा पेपर कसा जाईल ?याची अजिबात काळजी न करता आपले डोके शांत ठेवल्यास त्याचा परिक्षेच्या काळात निश्चितपणे फायदा होतो. नावडता विषय आपणाला अवघड वाटतो, त्याची जास्तच काळजी वाटते. त्यामुळे त्या विषयातील येत असलेला भाग सुध्दा आपण विसरून जातो. असे होऊ नये यासाठी त्या विषयाची धास्ती मनात न ठेवता परीक्षेला सामोरे जावे. इयत्ता पहिली ते आठव्या वर्गाची परीक्षा पध्दत बंद केल्यामूळे विद्यार्थ्यांचा परीक्षेला तोंड देण्याचा सराव कमी झाला असे म्हणणे चूकीचे ठरणार नाही. पूर्वी पहिल्या वर्गापासून घटक चाचणी व सहामाही म्हणजे प्रथम व द्वितीय सत्र परीक्षा होत असत. परिक्षेच्या काळात शाळेमध्ये सर्वत्र परीक्षेचे वातावरण असायचे, जो तो आपले डोके पुस्तकांत खुपसून अभ्यास करीत बसायचे, शक्यतो गृहपाठाच्या वह्या वाचून काढले जायचे कारण त्यातीलच प्रश्न परीक्षेत विचारल्या जायचे. परीक्षेला जातांना आपल्या उजव्या हाताच्या करंगळीने सामसोळीच्या शेपटाला स्पर्श केला तर पेपर सोपा जातो असं परीक्षेच्या आदल्या दिवशी मित्रांमध्ये चर्चा व्हायची. नेमकं परीक्षेला निघताना ती सामसोळी मात्र कुठेच दिसायची नाही. पेपर सोपा गेला तर त्याची आठवण सुध्दा यायची नाही. परंतु जर पेपर अवघड गेला असं जर वाटलं तर मनात रुखरुख लागायची. परीक्षेला जातांना अजून एक प्रकर्षाने व्हायचं परीक्षेच्या पॅडला तुळशीचे दोन पान लावायचे. त्याचं काय गुपित आहे ते आजपर्यंत कळाले नाही. आज शहरात अंगण नाही तर तुळस कुठं दिसणार. पण ही बाब अजूनही घरोघरी दिसून येत आहे. परीक्षेचा दिवस उजाडला की, सकाळी सर्व कामे आटोपून परीक्षेला पॅड घेऊन निघतांना आई ओरडून म्हणायची " अरे देवाच्या पाया पड, पेपर सोपा जाईल" तिच्या या बोलण्याचं मला हसू यायचे आणि मी म्हणायचो ‘वर्षभर अभ्यास केल्यामूळे माझं पेपर सोपं जाणारच आहे. त्यासाठी देव काय मदत करणार आहे. तो काय स्वत: येऊन मला लिहायला मदत करणार आहे कां ? असा प्रति प्रश्न तिला विचारायचा. आपल्या देवाला कुणी काही असं बोललेलं तिला खपायचे नाही, रुचायचे नाही. ती मला समजावून सांगे की, ‘देवाला पाया पडल्याने आत्मिक समाधान लाभते, बळ मिळते, एक वेगळा उत्साह येतो. यामूळे देवाला नमस्कार करायचा’. मग शेवटी आईचे मन रहावे म्हणून देवासमोर नतमस्तक व्हायचो. पहिला पेपर सोपा गेला की, आपसुकच दुस-या दिवशी परीक्षेला जाण्यापूर्वी पाय देवघरांकडे वळायचे. मग यानंतर जीवनात कोणती ही परीक्षा असो त्यापूर्वी आपले पाय देवघरांकडे वळतातच. आज ही आम्ही हीच प्रथा किंवा परंपरा आपल्या मुलांपर्यंत पोहचवित आहोत. आज आपली मुले जेंव्हा परीक्षेला निघतांत त्यावेळेस ‘जा देवाचे पाया पड आणि मग परीक्षेला जा’ असे आपण अगदी सहज म्हणतो. परीक्षेला जातांना देवाच्या पाया पडावे किंवा नाही हा वादातीत विषय आहे. त्यावर चर्चा केल्यास वादंग होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मात्र देवाच्या पाया पडल्यानंतर जो आत्मविश्वास मनात तयार होतो, ते अत्यंत महत्वाचे आहे. परीक्षा म्हणजे एक कसोटी, आयुष्यात घेत असलेले महत्वाचे वळण. या कसोटीत निर्भेळ यश मिळविण्यासाठी देवांसोबत घरातील वाड-वडिलांचे आशीर्वाद घेणे सुध्दा अत्यंत महत्वाचे आहे असे वाटते. ज्याप्रकारे पूर्वी रंणागणावर जातांना राजे महाराजे आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद घ्यायचे तसेच काहीसे या परीक्षेच्या बाबतीत होत असते. स्वामी समर्थाच्या ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ या वाक्याने त्यांच्या भक्तात एक नवी प्रेरणा, उत्साह दिसून येतो दे रे हरी पलंगावरी अशी ज्याची वृती नाही त्याला परीक्षेची अजिबात भीती वाटत नाही. परीक्षेत जास्तीत गुण मिळावे यासाठी नकला मारणे ही स्वतः सोबत केलेली फार मोठी चूक आहे. त्यामूळे नकला मारून पास होण्यात काही अर्थ नाही. या परीक्षेत कदाचित तुम्ही पास व्हाल पण आयुष्याच्या परीक्षेत नकलाच नसतात तिथे मात्र नापास होण्याची शक्यता जास्त असते. नकला मारणे म्हणजे चोरी करणे. आणि चोरी कधी ना कधी पकडली जाते. म्हणून मुलांनो, परीक्षेत यशस्वीपणे तोंड देण्यासाठी परमेश्वर आपणास सुबुध्दी देवो, आत्मिक बळ देवो. परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्याना खुप खूप शुभेच्छा.
- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक तथा स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769