*यंदा कर्तव्य आहे .....!*
लग्नासाठी मुलींच्या वयाची अट 18 वरुन 21 वर्षे करण्याचे एक खासगी विधेयक राज्यसभेत सादर करण्यात आले असल्याचे वृत्त वाचून थोडी खुशी थोडा गम अशी स्थिती निर्माण झाली. तृणमूल कॉग्रेसचे खासदार विवेक गुप्ता यांनी ही मागणी केली आणि लोकसंख्येला आळा घालण्याच्या दृष्टीने हा बदल आवश्यक आहे असे ते म्हणाले. त्याच बरोबर कमी वयात लग्न झाल्यामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यापूर्वीच दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी ही लग्नाची अट 21 वर्षे करणे उपयुक्त ठरते असे त्यांचे म्हणणे अगदी बरोबर आहे, यात यत्किंचित ही चूक नाही. मात्र मुलींच्या लग्नाचे वय 18 वरुन 21 वर्षे वर नेताना काय काय समस्या निर्माण होतात ? याचा देखील थोडा विचार करणे आवश्यक आहे असे वाटते.
आज देशात बालविवाह प्रतिबंधक कायदा असूनही देशभरात बालविवाह होतच आहेत. यात अजुन वाढ होणार नाही काय ? असा ही प्रश्न पडतो. देशात विविध प्रकारचे प्रतिबंधात्मक कायदे तयार केले जातात मात्र त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे केली जात नाही. त्यामुळे कायदे असून ही नसल्यासारखे वाटते. आज मुलींचे वय 18 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी लग्न लावणे कायद्याने गुन्हा आहे तरी ही याकडे कुणाचे लक्ष नाही. ग्रामीण भागात बालविवाह करण्याचे प्रमाण जास्त आढळून येते. पालकांचे अज्ञान आणि घरची आर्थिक परिस्थिती या दोन प्रमुख समस्यामुळे हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र शहरात तेच प्रमाण कमी दिसून येते. शहरात आजही मुलींचे शिक्षण पूर्ण करता करता 21 वर्षे कधी पूर्ण झाले ते कळतच नाही. त्यामुळे या विधेयकाचे शहरी भागातून स्वागतच केले जाईल मात्र भागात या विधेयकास विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुलगी ही अत्यंत नाजुक बाब असते आणि म्हणून तिची प्रत्येकजण काळजी घेत असतो. कोणत्याही मुलींचे लग्न होण्यापूर्वी खुप काळजी घेतली जाते, जसे की हिऱ्याची. समाजात मुलीविषयी एक जरी अपशब्द बाहेर पडला तर मुलींना आणि मुलींच्या आई-बाबाला एक मोठी समस्या बनते. म्हणून प्रत्येक पालक आपल्या मुलींवर कठोर संरक्षण ठेवतात. ग्रामीण भागात उपवर झालेली मुलगी जास्त दिवस घरात रहाणे आई-बाबाना धोक्याचे वाटते. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील मुली नेहमीच असुरक्षित असतात. खेडोपाड्यात वयात आलेल्या मुलींना बाहेर सुद्धा फिरता येत नाही. त्याचीच काळजी मुलींच्या घराच्याना लागते. त्यामुळे ते मुलींचे लग्न लवकरात लवकर उरकण्याची घाई करतात. आजकालच्या चित्रपटांमुळे सुद्धा मुले-मुलीं बिघडू लागली आहेत. सोशल मिडीयाच्या प्रसारामुळे मुलांना सर्व काही एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. त्यामुळे ते अनावश्यक बाबी अनुभव घेत आहेत. त्याचेच दुष्परिणाम म्हणून आजच्या या दुर्दैवी घटना पाहण्यास मिळत आहेत. मुला-मुलींमध्ये आकर्षणाचे प्रमाण ही हल्ली वाढू लागले आहे. याचमुळे पालक वर्ग काळजीत पडला आहे. आज स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीने खांद्यास खांदा लावून काम करीत आहे. ती आज खऱ्या अर्थाने मुक्त आहे, मात्र अधुनमधून घडणाऱ्या घटना, विविध गुन्हे, यामुळे महिला आजही असुरक्षित आहेत याची जाणीव होत राहते. मुलींचे लग्न लावून कन्यादान करणे हे प्रत्येक माता-पित्याचे आद्य कर्तव्य आहे. ते कर्तव्य पूर्ण करतांना पालकाना कोणकोणत्या समस्याना तोंड द्यावे लागते ? हे मुलींचे पालक असलेले व्यक्तीच ओळखू शकतात. जावे त्यांच्या वंशा तेंव्हा कळे या उक्तीनुसार इतराना त्यांचे त्रास कदापिही जाणवणार नाही. त्यामुळे मुलींच्या लग्नाचे वय वाढविण्यापूर्वी भारत देशातील ग्रामीण भागातील पालकांच्या समस्याकडे कानाडोळा करून चालणार नाही. याउलट मुलींचे बालविवाह होणार नाहीत याची जरा जास्त काळजी घेतली तरी सरकारचे उद्दिष्ट पूर्ण होईल असे वाटते.
- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
9423625769
No comments:
Post a Comment