Sunday, 30 December 2018

हर कॅलेंडर कुछ कहता है ।

हर कॅलेंडर कुछ कहता है ।

31 डिसेंबर संपला की घरातील भिंतीवर असलेले  कॅलेंडर बदलले जाते आणि त्याठिकाणी नव्या वर्षाची जानेवारी महिन्याची कॅलेंडर लटकविली जाते. पाहता पाहता एक वर्ष संपून जाते. गेल्या एका वर्षात काय काय घडले ? याचा आढावा थोडक्यात घ्यायला बसलोत तर अनेक गोष्टी आपल्या डोळ्यासमोरून सरकतात. काही बाबी तीव्रतेने आठवतात तर काही बाबी आठवण करण्यासाठी डोक्याला ताण द्यावा लागतो. वर्ष संपले की आपण कॅलेंडर फेकून देतो. पण जर हेच कॅलेंडर आपणास विविध प्रकारचे काम करू शकते. त्यानुसार त्याचा वापर करायला हवे. कॅलेंडरवर लिहिण्यासाठी थोडी फार तरी जागा राहते. तेंव्हा त्या ठिकाणी आपण जानेवारी महिन्यात किंवा एखाद्या महिन्यात काही विशेष घटना घडली असेल तर त्यावर नमूद करून ठेवावे. अगदी सहजपणे ते डोळ्याला दिसत राहते. अश्या नोंदी आपल्या कॅलेंडर वर केल्यास वर्ष संपल्यावर ते फेकावे वाटत नाही तेंव्हा त्याच्या बाजूला नवीन वर्षाचे कॅलेंडर ठेवावे म्हणजे दोन्ही कॅलेंडरवर लक्ष जाते आणि गेल्यावर्षी या तारखेला काय घडले याची भूतकाळातील आठवण होते. त्यानिमित्ताने परत एकदा साऱ्या बाबी आठवणीमध्ये येतात. अगदी जवळच्या मित्र-मैत्रिणीचे वाढदिवस या कॅलेंडरवर नोंदी करून ठेवल्यास त्या त्या तारखेला आठवण करून शुभेच्छा देता येतील. कधी कधी वाढदिवसाची आगाऊ तारीख लक्षात राहिल्याने नियोजन देखील करता येईल. विम्याचा हप्ता किंवा आर डी चा हप्ता भरण्याची तारीख नोंद करून घेतल्यास आपण विसरणार नाही. आज काल लेट फी मध्ये खूप मोठी रक्कम भरावी लागते. कॅलेंडरवर नोंद करून ठेवल्यास लेट फी टाळता येऊ शकेल. काही महत्वाचे फोन क्रमांक या कॅलेंडरवर लिहिले तर शोधण्याची गरज राहत नाही. घरात रोज मिळणाऱ्या वरव्याच्या दुधाचे किती पैसे झाले याची माहिती या कॅलेंडरवरूनच मिळते, हे तर आपल्या घरातील गृहिणीमुळे आपणा सर्वाना ज्ञात आहेच. 1990 च्या दशकात क्रिकेटच्या विश्वकपचे घराघरात वारे वाहत होते. त्यावेळी क्रिकेट सामन्याचे वेळापत्रक कॅलेंडरवर लिहिलेले बऱ्याच जाणाला आज ही आठवत असेल.  कॅलेंडरचे असे विविध उपयोग आपणास घेता येऊ शकते. शालेय मुलांनी देखील आपल्या अभ्यासाचे नियोजन व परीक्षेचे वेळापत्रक लिहून ठेवल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो. बाजारात अनेक प्रकारचे कॅलेंडर विकत मिळतात. आजकाल विविध प्रकारच्या कंपन्या आणि बँकेकडून देखील कॅलेंडर अगदी मोफत वितरित केल्या जाते. काही समाजातील मंडळी आपापल्या समाजाची कॅलेंडर काढून वाटप करतात. जेवढं काही वृत्तपत्र किंवा साप्ताहिक आहेत ते देखील आपले कॅलेंडर काढतात आणि वाचकापर्यंत पोहोच करतात. घरात असे तीन-चार प्रकारचे कॅलेंडर जमा झाले तरी घरातील गृहिणीचे मन कालनिर्णय घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. तिची इच्छा असते की, " भिंतीवरी कालनिर्णय असावे. " बरेचजण डायरी वापरत नाहीत पण घरातील कॅलेंडरचा वापर करतात. त्यामुळे प्रत्येक घरातील कॅलेंडर काही ना काही सांगत असते, असे सांगावेसे वाटते. हर कॅलेंडर कुछ कहता है । चला पुन्हा भेटू पुढील वर्षात काही नव्या विचारासह. आपणा सर्वाना नवीन वर्षाच्या मनस्वी शुभेच्छा .....!

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक तथा स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

Monday, 24 December 2018

नामकरण ते अंत्यविधीचा प्रवास

नामकरण ते अंत्यविधीचा प्रवास

माणूस जन्माला येतो तेंव्हा त्याचे नाव नसते. त्याला एक ओळख मिळावी म्हणून जन्मलेल्या बाळाचे सर्वात पहिल्यांदा जे संस्करण केल्या जाते त्यास नामकरण किंवा बारसे असे म्हटले जाते. हा विधी बारा दिवसानी, एकवीस दिवसानी किंवा सव्वा महिन्याच्या नंतर केल्या जाते. काही समाजात परंपरेनुसार हा सोहळा संपन्न केल्या जाते. नाव ठेवण्याची ही पद्धत फार पुरातन काळापासून चालू आहे. फार पूर्वीच्या काळाचा इतिहास पाहिला तर असे लक्षात येते की, घरातील वाडवडिलांचे किंवा आजी - आजोबांचे नाव नातू-नातवाला दिले जात असत. त्यामुळे नाव शोधण्याची किंवा त्यासाठी डोके खाजविण्याची काही गरज राहत नसे. मात्र काळ बदलत गेला तसे नावे ठेवण्याची पद्धत देखील बदलत गेली. आधुनिक पद्धतीने आजकाल नाव ठेवल्या जातात. त्यासाठी आज गुगलची देखील मदत घेतली जाते. ज्या अक्षराने घरात नावाची सुरुवात होते त्याच नावाने इतरांची नावे ठेवली जातात. विनोदाचा भाग म्हणून विचार केल्यास एकाच्या घरी सात मुले झाली तर त्यांची नावं सोमवार ते रविवार असे ठेवण्यात आली. काही जण प्रसिद्ध असलेल्या व्यक्तींची नावे आपल्या अपत्याना देतात. नव्वदच्या काळातील बहुतांश मुलांची नावे सचिन असे ठेवण्यात आल्याचे दिसून येते. यावरून लक्ष्यात येईल की, नावाचे किती महत्व होते. पूर्वी कुटुंबनियोजन नव्हते त्यामुळे एकाच नावाच्या समोर मोठा, मधवा आणि लहान असे कोड वापरत असत. जेंव्हा निवडणुकीच्या काळात ही मंडळी मतदानासाठी जातात त्यावेळी मतदान अधिकाऱ्यांची खरी पंचाईत होते. कारण ही नावे एकसारखीच दिसतात. विल्यम सेक्सपियर यांनी नावात काय ठेवलंय ? असा प्रश्न विचारला आहे. मात्र नावात खूप काही दडलेलं आहे. सेक्सपियरला नाव राहिले नसते तर त्यांची ओळख कशी राहिली असती. प्रत्येकजण दिसायला वेगळा असतो. सर्वांची ओळख स्मरणात ठेवण्यासाठी त्यास काही तरी कोड देणे आवश्यक आहे. त्याच अनुषंगाने ही नाव देण्याची प्रथा मानवी जीवनात अत्यंत महत्वाचे आहे. अन्यथा आज आपण ज्या कोणत्या महान व्यक्तीची महापुरुषांची ओळख ठेवतो हे त्यांच्या नावावरूनच ना ! याच नामकरणचा फायदा शाळेत प्रवेश घेतांना होतो. आदिवासी बहुल भागात तेथील लोकं नामकरण सोहळा वगैरे काही करत नसत त्यामुळे शाळा प्रवेश करतांना त्यांना नावं लिहिताना त्रास होत असत. मुलांना ते बाला तर मुलींचे नावं बाली या पद्धतीने ठेवत असत. आज ती प्रथा नाही.  शाळेत मुलांची ज्या नावाने प्रवेश होतो त्याच नावाने पुढील आयुष्यभर त्याची ओळख निर्माण होते. काही जणांचे घरात एक नाव तर बाहेर एक नाव असते. पण शाळा कार्यालयात दप्तरी ज्या नावाची नोंद होते तेच नाव कायम त्याच्यासोबत राहते. शाळा प्रवेशानंतरची पुढील वीस वर्षे शिक्षणात जाते. या वीस वर्षात आपल्या नावासाठी दिवसरात्र अभ्यास करतो आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी कुठे ना कुठे नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करतो. त्यानंतर त्याचे लग्न होते आणि संसार प्रारंभ होतो. दोनाचे चार हात झाल्यावर त्याची कीर्ती हळूहळू पसरत जाते. शालेय जीवनात असलेल्या अनेक सवयी संसारात डोकावले जातात. काही जण वाईट सवयी कडे झुकतात तर काही आपल्या चांगल्या सवयी जीवनभर जोपासतात. काही वर्षानंतर त्यांना अपत्य प्राप्ती होते आणि पुन्हा त्यांचे नामकरण संस्कार होते. वयाच्या साठीच्या आसपास सर्वच बाबतीत ते निवृत्त होतात. त्यांच्यावर घरातील लहान मुले सांभाळण्याची जबाबदारी येऊन पडते. त्यांच्या नावानेच त्यांची मुले आणि घर ओळखल्या जाऊ शकते. पूर्वी माणसाचे सरासरी आयुष्य शंभर होते पण आज तितके वर्ष कोणी ही जिवंत राहत नाही. वृद्धापकाळामुळे माणूस शेवटी मृत्युमुखी होतो. ज्यावेळी माणसाचा मृत्यू होतो त्यावेळी त्याच्या जवळचे नातलग सर्वच उपस्थित होतात जसे नामकरण विधीला उपस्थित होते. माणसाच्या जीवनातील शेवटचे संस्कार स्मशानभूमीत केले जाते. अंत्यविधीच्या वेळी त्याच्या नावाची आणि त्याने केलेल्या कर्माची सारेच जण आठवण काढतात. म्हणूनच म्हटले जाते मरावे परी कीर्ती रुपी उरावे. आपल्या माघारी सुद्धा आपले नाव अजरामर राहावं असे वाटत असेल तर निस्वार्थी भावनेने कार्य करीत जावे. सत्कार्य केलेल्या व्यक्तीचे नाव कधी ही बुडत नाही. काही जण तर असे कर्म करून जातात की, घरातल्या लोकांना नाव लक्षात ठेवायला लाज वाटते. आपण कामच असे करायला हवे की, आपल्या जाण्याने खरोखरच तिथे पोकळी निर्माण व्हावी आणि आपली आठवण यावी. कवी भा. रा. तांबे यांनी जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय ? असे म्हटले आहे. आपले कार्य हीच आपली ओळख असते म्हणून चांगले काम करणे अत्यावश्यक आहे. समाजात काही लोकं सहज म्हणतात की, हा पोरगा किंवा पोरगी आई-बापाचं नाव नक्की कमावेल ! याचा अर्थ आपण जाणून घेऊ या. नामकरण ते अंत्यविधीपर्यंतचा प्रवास समजून घेऊ या. आपण येताना काही सोबत आणलो नाहीत आणि जाताना देखील काही घेऊन जाणार नाहीत त्या सिकंदराप्रमाणे खाली हात जाणार. म्हणून मित्रांनो निस्वार्थ भावनेने काम करण्यासाठी आपल्या मनाची तयारी करू या आणि आनंदाने जीवन जगू या. या नवीन वर्षात पदार्पण करतांना असाच एक चांगला संकल्प करूया ज्यातून संपूर्ण मानवजातीचा कल्याण करता येईल. आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ...!

- नागोराव सा. येवतीकर, स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

नामकरण ते अंतीम संस्कार

नामकरण ते अंतीम संस्कार

माणूस जन्माला येतो तेंव्हा त्याचे नाव नसते. त्याला एक ओळख मिळावी म्हणून जन्मलेल्या बाळाचे सर्वात पहिल्यांदा जे संस्करण केल्या जाते त्यास नामकरण किंवा बारसे असे म्हटले जाते. हा विधी बारा दिवसानी, एकवीस दिवसानी किंवा सव्वा महिन्याच्या नंतर केल्या जाते. काही समाजात परंपरेनुसार हा सोहळा संपन्न केल्या जाते. नाव ठेवण्याची ही पद्धत फार पुरातन काळापासून चालू आहे. फार पूर्वीच्या काळाचा इतिहास पाहिला तर असे लक्षात येते की, घरातील वाडवडिलांचे किंवा आजी - आजोबांचे नाव नातू-नातवाला दिले जात असत. त्यामुळे नाव शोधण्याची किंवा त्यासाठी डोके खाजविण्याची काही गरज राहत नसे. मात्र काळ बदलत गेला तसे नावे ठेवण्याची पद्धत देखील बदलत गेली. आधुनिक पद्धतीने आजकाल नाव ठेवल्या जातात. त्यासाठी आज गुगलची देखील मदत घेतली जाते. ज्या अक्षराने घरात नावाची सुरुवात होते त्याच नावाने इतरांची नावे ठेवली जातात. विनोदाचा भाग म्हणून विचार केल्यास एकाच्या घरी सात मुले झाली तर त्यांची नावं सोमवार ते रविवार असे ठेवण्यात आली. पूर्वी कुटुंबनियोजन नव्हते त्यामुळे एकाच नावाच्या समोर मोठा, मधवा आणि लहान असे कोड वापरत असत. जेंव्हा निवडणुकीच्या काळात ही मंडळी मतदानासाठी जातात त्यावेळी मतदान अधिकाऱ्यांची खरी पंचाईत होते. कारण ही नावे एकसारखीच दिसतात. विल्यम सेक्सपियर यांनी नावात काय ठेवलंय ? असा प्रश्न विचारला आहे. मात्र नावात खूप काही दडलेलं आहे. सेक्सपियरला नाव राहिले नसते तर त्यांची ओळख कशी राहिली असती. प्रत्येकजण दिसायला वेगळा असतो. सर्वांची ओळख स्मरणात ठेवण्यासाठी त्यास काही तरी कोड देणे आवश्यक आहे. त्याच अनुषंगाने ही नाव देण्याची प्रथा मानवी जीवनात अत्यंत महत्वाचे आहे. अन्यथा आज आपण ज्या कोणत्या महान व्यक्तीची महापुरुषांची ओळख ठेवतो हे त्यांच्या नावावरूनच ना ! याच नामकरणचा फायदा शाळेत प्रवेश घेतांना होतो. आदिवासी बहुल भागात तेथील लोकं नामकरण सोहळा वगैरे काही करत नसत त्यामुळे शाळा प्रवेश करतांना त्यांना नावं लिहिताना त्रास होत असत. मुलांना ते बाला तर मुलींचे नावं बाली या पद्धतीने ठेवत असत. आज ती प्रथा नाही.  शाळेत मुलांची ज्या नावाने प्रवेश होतो त्याच नावाने पुढील आयुष्यभर त्याची ओळख निर्माण होते. काही जणांचे घरात एक नाव तर बाहेर एक नाव असते. पण शाळा कार्यालयात दप्तरी ज्या नावाची नोंद होते तेच नाव कायम त्याच्यासोबत राहते. शाळा प्रवेशानंतरची पुढील वीस वर्षे शिक्षणात जाते. या वीस वर्षात आपल्या नावासाठी दिवसरात्र अभ्यास करतो आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी कुठे ना कुठे नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करतो. त्यानंतर त्याचे लग्न होते आणि संसार प्रारंभ होतो. दोनाचे चार हात झाल्यावर त्याची कीर्ती हळूहळू पसरत जाते. शालेय जीवनात असलेल्या अनेक सवयी संसारात डोकावले जातात. काही जण वाईट सवयी कडे झुकतात तर काही आपल्या चांगल्या सवयी जीवनभर जोपासतात. काही वर्षानंतर त्यांना अपत्य प्राप्ती होते आणि पुन्हा त्यांचे नामकरण संस्कार होते. वयाच्या साठीच्या आसपास सर्वच बाबतीत ते निवृत्त होतात. त्यांच्यावर घरातील लहान मुले सांभाळण्याची जबाबदारी येऊन पडते. त्यांच्या नावानेच त्यांची मुले आणि घर ओळखल्या जाऊ शकते. पूर्वी माणसाचे सरासरी आयुष्य शंभर होते पण आज तितके वर्ष कोणी ही जिवंत राहत नाही. वृद्धापकाळामुळे माणूस शेवटी मृत्युमुखी होतो. ज्यावेळी माणसाचा मृत्यू होतो त्यावेळी त्याच्या जवळचे नातलग सर्वच उपस्थित होतात जसे नामकरण विधीला उपस्थित होते. माणसाच्या जीवनातील शेवटचे संस्कार स्मशानभूमीत केले जाते. अंत्यविधीच्या वेळी त्याच्या नावाची आणि त्याने केलेल्या कर्माची सारेच जण आठवण काढतात. म्हणूनच म्हटले जाते मरावे परी कीर्तीरुपी उरावे. आपल्या माघारी सुद्धा आपले नाव अजरामर राहावं असे वाटत असेल तर निस्वार्थी भावनेने कार्य करीत जावे. सत्कार्य केलेल्या व्यक्तीचे नाव कधी ही बुडत नाही. काही जण तर असे कर्म करून जातात की, घरातल्या लोकांना नाव लक्षात ठेवायला लाज वाटते. आपण कामच असे करायला हवे की, आपल्या जाण्याने खरोखरच तिथे पोकळी निर्माण व्हावी आणि आपली आठवण यावी. कवी भा. रा. तांबे यांनी जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय ? असे म्हटले आहे. आपले कार्य हीच आपली ओळख असते म्हणून चांगले काम करणे अत्यावश्यक आहे. समाजात काही लोकं सहज म्हणतात की, हा पोरगा किंवा पोरगी आई-बापाचं नाव नक्की कमावेल ! याचा अर्थ आपण जाणून घेऊ या. नामकरण ते अंतिमसंस्कार पर्यंतचा प्रवास समजून घेऊ या. आपण येताना काही सोबत आणलो नाहीत आणि जाताना देखील काही घेऊन जाणार नाहीत त्या सिकंदराप्रमाणे खाली हात जाणार. म्हणून मित्रांनो निस्वार्थ भावनेने काम करण्यासाठी आपल्या मनाची तयारी करू या आणि आनंदाने जीवन जगू या.

- नागोराव सा. येवतीकर, स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

Saturday, 22 December 2018

फोन इन प्रोग्राम

*उपक्रम : हॅलो, मी बोलतेय*

" हॅलो सर मी बोलतेय "
" हॅलो, बोल "
" सर, माझा आजचा अभ्यास झालंय "
" ओके, ठीक आहे. "
अश्या पध्दतीने मुलं आत्ता रोज फोन लावत आहेत आणि आपला अभ्यास पूर्ण करीत आहेत.

या उपक्रमासाठी मुलांना पहिल्यांदा फोन वर कसे बोलावं हे शिकविले गेलं.
एखाद्या व्यक्तीला आपण फोन लावल्यानंतर पहिल्यांदा नाव सांगावं आणि आपलं काम सांगावं म्हणजे कमी वेळात आपले बोलणे पूर्ण होते.
सरकारी शाळेतील मुलांकडे पालक म्हणावं तेवढं लक्ष देत नाहीत म्हणून ही मुलं घरी गेले की दप्तर फेकतात आणि खेळायला जातात. अभ्यास करीत नाहीत असा आजपर्यंतचा निरीक्षण आहे.

पालक लक्ष नाही दिले तरी मुले अभ्यास करावेत म्हणून हा उपक्रम तयार करण्यात आला.

शाळेत शिक्षकांनी दिलेला अभ्यास पूर्ण करायचा आणि पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी 7 ते 8 या वेळातच फोन करायचं
यामुळे मुलं शाळेतून घरी गेले की अभ्यास करू लागली. अभ्यास झाल्यावर शिक्षकांना फोन करू लागली.
फोनवर शिक्षकांना बोलण्याचा आनंद काही औरच असतो.

फायदा -
पालकांचे लक्ष नसतांना देखील मुले अभ्यासाला लागली.
शिक्षकांना फोनवर बोलल्यामुळे त्यांना एक वेगळाच आनंद मिळतो.
शिक्षकांचे बोलणे मुले 100 टक्के ऐकतात. त्यामुळे हा उपक्रम मुलांना अभ्यास करण्यास भाग पाडतो.
परिपाठात फोन केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव घेतल्यास त्यांच्या चेहऱ्यावर खुशी झळकते.
काही वेळा सातत्याने परिपूर्ण काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देणे इतर विद्यार्थ्यांना प्रेरित करते.
पालकांशी संपर्क वाढतो..

त्रुटी -
काही मुलं विनाकारण फोन करण्याची शक्यता आहे. त्यांना वेळीच तंबी देऊन तसे करणे बंद करता येईल.
काही मुले दिलेल्या वेळात अभ्यास न झाल्यामुळे जेंव्हा अभ्यास होईल तेंव्हा फोन करतात.
काही मुले खोटे बोलण्याची शक्यता देखील आहे म्हणून कधी कधी पालकांना देखील बोलत जावे.

त्रुटी कडे जास्त लक्ष न देता हा उपक्रम मुलांच्या अभ्यासाला नक्की गती देईल याचा विश्वास वाटतो.

( हा उपक्रम आवडल्यास आपण ही आपल्या शाळेत राबवावे, यात काही अजून भर घालावी व तसे मला देखील कळवावे. )

शब्दांकन : नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769

Friday, 21 December 2018

मुलांचे गुण शाळेतून दिसतात

मुलांचे गुण शाळेतून दिसतात

शाळा हे एक असे ठिकाण आहे ज्याठिकाणी देशाचा भावी नागरिक घडत असतो. बऱ्याच वेळेला जेंव्हा दोन शिक्षक एकमेकांशी बोलत असतात तेंव्हा ते एकमेकांना प्रश्न विचारतात की, प्रत्येक गोष्ट शाळेतूनच का शिकावी लागते ? मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी शाळेत पाठवा, मुलांना लिहिण्या-वाचण्यासाठी शाळेत पाठवा, मुले संस्कारी होण्यासाठी शाळेत पाठवा. एखादे मूल काही वाईट केलं किंवा खराब केले की लगेच बोलल्या जाते, गुरुजींनी, तुला शाळेत हेच शिकवलं का ? तसं तर तुला घरी हेच शिकवलं का ? असे फार कमी बोलल्या जाते. वास्तविक पाहता यात गुरुजींचा काहीही दोष नसतो मात्र अगदी सहजपणे असे बोलले जाते. प्रत्येकजण शाळेकडून खूप मोठ्या अपेक्षा ठेवतात. सहाव्या वर्षी शाळेत प्रवेश करणारा विद्यार्थी आणि पाच वर्षानंतर शाळेतून बाहेर जाणारा पाचवीचा विद्यार्थी याच्या प्रत्येक बाबीचा विचार केल्यास किंवा निरीक्षण केल्यास लक्षात येते की, मुलांना संस्कारी करण्यात शाळेची भूमिका खूपच महत्वाची होती. शाळेत तो प्रवेशित झाला नसता तर कदाचित असा झाला असता की नाही, असे ही कधी कधी वाटते. आजपर्यंत जे कोणी मोठमोठ्या पदावर पोहोचलेली माणसं आहेत त्यांच्यावर प्राथमिक शाळेतील संस्कारच आजीवन सोबत आहेत. शाळेतून असं काय जादू घडते ? जे घरात घडत नाही असं शाळेत काय होत असेल ?  मुलांवर संस्कार टाकण्याची खरी जबाबदारी पालकांची आहे, यात काही संदेह नाही तरी त्याला शाळेतून सर्वच प्रकारचे संस्कार केले जातात, हे ही सत्य विसरून चालणार नाही. शाळेत विविध जातीचे, धर्माचे आणि पंथाचे मुलं शिकण्यासाठी एकत्र येतात. एका वर्गात, एका बाकावर जेंव्हा विविध जाती-धर्मातील मूलं एकत्र बसतात तेंव्हा त्यांच्यात जी देवाण-घेवाण होते ती घरात कधीच होऊ शकत नाही. काही घरात तर इतर धर्माच्या किंवा जातीच्या मुलांना प्रवेश देखील मिळत नाही. लगेच पालक आपल्या मुलांवर बंधन टाकतात की, अमुक मुलांसोबत राहू नको. घरात भेद शिकविले जाते तर शाळेत सर्वधर्मसमभाव शिकविला जातो. ज्या घरात भेदभाव, उच्च नीच, गरीब श्रीमंत असा भाव बघितला जात नाही, त्या घरातील मुले देखील तसेच निघतात. शाळेत या सर्व बाबी घडतात म्हणूनच याठिकाणी माणूस घडविला जातो असे म्हटले जाते ते काही खोटे नाही. सर्वांसोबत प्रेमाने आणि सहकार्याने वागण्याची रीत मुलांना शाळेत नकळत शिकायला मिळते. मुले एकमेकांना समजून घेऊन काम करीत असतात त्यामुळे ते अगदी सहजरित्या कोणतेही काम करू शकतात. शिक्षकाने शिकविलेली बाब त्याला पटकन कळणार नाही मात्र त्याच्या मित्राने किंवा मैत्रिणीने शिकविलेली कोणतीही कठीण बाब पटकन समजते. घरात पालक आपल्या मुलांना समजावून सांगूच शकत नाही. मुलांच्या मनावर पालकांचा दरारा कायम जाणवतो म्हणूनच ते पालकांनी सांगितलेली कोणतीही गोष्ट पूर्ण करण्यास असमर्थ ठरतात. जे काम पालक आणि शिक्षक करू शकत नाही ते काम त्याचे शाळेतील मित्र नक्की करू शकतात. नुकतेच एक बातमी वाचण्यात अली की, 30-35 वर्षांपूर्वीचे शाळेतील मित्रांनी एकत्र येऊन गेट टूगेदर केल्यावर सर्वांनी लहानपणीच्या गोष्टीना उजाळा दिला. हे सर्व शाळेतच घडू शकते. शाळा मुलांना नकळत बऱ्याच गोष्टी शिकवून जाते. शाळेत फक्त वाचन-लेखन नाही तर भावी जीवनात कामी पडणाऱ्या अनेक गोष्टी शिकविले जातात म्हणून प्रत्येक बाबीसाठी शाळेकडे सर्वप्रथम पाहिले जाते. पण बहुतांश पालक शिक्षकांकडे तक्रार घेऊन येतात, आज मुलांना काहीच होम वर्क दिलं नाही, त्याला खूप काम द्या. असे जेंव्हा ऐकायला मिळतं त्यावेळी खूप नाराजी वाटतं. मुलं म्हणजे काय शेतातील बैल आहेत का ? एवढं काम करायला हवं. त्यासाठी पालकांनी एकवेळ समजून घ्यावं होम वर्क केल्याने मुलं हुशार होत नसतात तर त्यांच्या अंगी असलेल्या कलेचा आविष्कार केल्याने त्यांचा खरा विकास होतो. 
शाळेत शालेय पोषण आहार सुरू करण्यात आले त्याद्वारे मूल जेवण्याच्या अनेक बाबी शिकतो. जेवण्यापूर्वी व जेवल्यानंतर स्वच्छ हात धुणे, जेवताना न बोलणे, अगदी शांततेत जेवण करणे, सर्वप्रकारचे संतुलित जेवण मिळावे म्हणून दररोज वेगवेगळे अन्नपदार्थ तयार केल्या जाते. यातून मुलांवर नकळत जेवण्याचे संस्कार होतात. काही शाळेत जेवण्यासाठी अनेक प्रकारचे उपक्रम राबवित असतात. जसे की जेवतांना पाढे म्हणणे, पुस्तकातील कविता म्हणणे, साउंडसिस्टीमचा वापर करून मुलांना गाणे ऐकविणे असे अनेक उपक्रम राबवून मुलांना संस्कारित केले जाते. शाळेत शौचालयाचा वापर करणे यामुळे त्याला त्याची सवय लागते आणि तो भविष्यात वापर करतो. शालेय जीवनात त्याला त्याचे महत्व कळते म्हणून तो भविष्यात त्याचा नक्की वापर करतो. आजच्या लोकांना किती ही सबसिडी किंवा समजावून सांगितले तरी ते शौचालयाचा वापर करीत नाहीत कारण त्यांनी जेंव्हा शाळा शिकले तेंव्हा त्यांच्या शाळेत शौचालय नावाची वस्तू नव्हती. उघड्यावर मलमूत्र करण्याची त्यांना सवय होती ती कशी जाईल ? भविष्यात काही चांगले बदल बघायचे असतील तर त्या शाळेतील मुलांसाठी स्वच्छ शौचालय असणे आवश्यक आहे. त्याचा नियमित वापर करू लागले की त्यांचे मत परिवर्तन होऊ शकते. शाळेतच शिकविल्या जाते की स्वच्छ पोशाख का वापरायचा ? शाळेत टापटीपपणा टिकवून ठेवला की आयुष्यभर तो तसाच राहतो. शाळेत वेळेवर येणारी मुले मोठी झाल्यावर कोठे ही वेळेचे बंधन पाळतात असे एक निरीक्षण आहे. जी मुलं शाळेत नियम पाळत नाहीत किंवा दिलेले काम करीत नाहीत ती भविष्यात आळशी आणि कामचुकार म्हणून प्रसिद्ध होतात. मुलांचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणे मुलांचे सर्व गुण अवगुण शाळेतच दिसून येतात. शाळेतील वागणुकीवरून कळते की, भविष्यात त्याचे भविष्य कसे आहे ? म्हणून पालक आणि शिक्षकांनी शाळेतल्या प्रत्येक बाबीकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. पुस्तकी ज्ञानासोबत इतर ही ज्ञान मिळणे आवश्यक आहे यशस्वी जीवन जगण्यासाठी. म्हणून मुलांना पुस्तकी किडा न बनविता, मुलांच्या पुस्तकी मार्काकडेपूर्ण लक्ष न देता त्याच्या इतर गुणाकडेदेखील लक्ष द्यायला हवं, असे वाटते.

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक तथा स्तंभलेखक
मु. येवती ता. बिलोली जि. नांदेड
9423625769

मतदान जनजागृती ( Voting Awarness )

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जनजागृती चला मतदान करू लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.  चला मतदान करू .......! ...