Monday, 10 December 2018

प्रदूषण एक समस्या

प्रदूषण एक समस्या

मनुष्याचे सरासरी आयुष्य जे की पूर्वी शतकाची होती. ती आता हळूहळू कमी होत आहे. आत्ता माणसाचे आयुष्य सरासरी सत्तरच्या आसपास झाले आहे. विविध कारणामुळे मनुष्य आजारी पडत आहे आणि मृत्युमुखीदेखील पडत आहे. डॉक्टराना देखील निदान होणार नाहीत असे रोग जडत आहेत. एशोआरामच्या जिंदगीमुळे देखील माणसाचे आयुष्य घटत चालले आहे. यातच प्रदूषण ही एक महत्वपूर्ण समस्या जाणवत आहे. नुकतेच एक बातमी वाचण्यात आली की सध्या आठ मृत्यूपैकी एक मृत्यू या प्रदूषणामुळे होत आहे. 
प्रदूषणात अनेक प्रकार आहेत त्यापैकी वायू प्रदूषण, जल प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण दिवसेंदिवस घातक बनत चालले आहे. पूर्वीच्या काळात जी शांतता होती, ती शांतता आज लोप पावत चालली आहे. सकाळी उठल्यापासून जे विविध आवाज चालू होतात ते रात्री झोपी जाईपर्यंत चालूच असतात. दवाखान्यात किंवा घरात जे कोणी आजारी मंडळी असतात त्यांना जास्त करून या ध्वनीचा त्रास जाणवतो. डीजेच्या आवाजाने सर्वसामान्य माणूस देखील हैराण होतो तर आजारी माणसाचे काय सांगावे ? मोठ्या शहरात वेगवेगळ्या गाड्यांचे आवाजाने परिसर पूर्ण हादरतो. तश्या जीवनात एखादं खेडूत किंवा ग्रामीण भागातील व्यक्ती गेला तर त्याला अस्वस्थ वाटायला लागते. लहान मुलांना देखील या आवाजाचा त्रास होतो. आजकाल घराघरांत देखील खूप मोठ्या आवाजात गाणे ऐकण्याची किंवा टीव्ही पाहण्याची सवय लागली. त्यामुळे त्यांना हळू आवाजात बोललेले ऐकूच येत नाही. या सर्व बाबीचा परिणाम आपल्या राहणीमानावर होत आहे याचा कोणी विचार करायला तयारच नाहीत. दिवाळीच्या कालावधीत देखील मोठे फटाके फोडून ध्वनी प्रदूषण केल्या जाते. यावर्षी सरकारने यावर बंदी घातली म्हणून फटाक्यांचा आवाज कमी प्रमाणात ऐकायला मिळाले. पण त्यासाठी कायदा करावा लागतो हीच फार मोठी नामुष्की म्हणावे लागेल. ध्वनीचे तरंग वातावरणात मिसळल्यामुळे प्राण्यांना सुद्धा त्याचा त्रास जाणवतो. म्हणून एक जागरूक नागरिक म्हणून आपले काही तरी कर्तव्य नाही का ? आपण एक जागरूक नागरिक म्हणून ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. घरात मोठ्या आवाजात गाणे ऐकणे किंवा टीव्ही पाहणे टाळणे आवश्यक आहे. रस्त्यावर विनाकारण गाड्याचे हॉर्न वाजवू नये. त्यामुळे होणारा ध्वनी प्रदूषण नक्की टाळता येईल. दिवाळीच्या कालावधीत मोठ्या आवाजाचे फटाके टाळून इतर फटाके वापरण्यावर लक्ष द्यावे. बारीक आवाजात बोलण्याची आणि बारीक आवाजात ऐकण्याची सवय आपल्या सोबत इतरांना लावण्यावर काळजी घेतली तर ही समस्या काही अंशी कमी होऊ शकेल. 
प्रत्येक सजीवाला जीवन जगण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे पाणी अर्थात जल. असे म्हटले जाते की जल है तो कल है ।पाण्याशिवाय कोणताही सजीव जिवंत राहू शकत नाही त्यात मनुष्य देखील आहे. माणसाने आपली वस्ती ही पाणी बघूनच केली. अश्मयुगीन काळातील लोकांच्या इतिहासाकडे जर लक्ष दिले तर लक्षात येईल की, नदीच्या काठावर या लोकांनी समूह करून राहू लागले. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपी जाईपर्यंत पाण्याची आवश्यकता भासते. पूर्वीच्या काळी पाण्याची उपलब्धता भरपूर होती. पाण्यासाठी कोणाला वणवण भटकावे लागले असे कुठे ऐकिवात नव्हते मात्र गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून दरवर्षी पाण्यासाठी लोकांना दाहीदिशा भटकावे लागते. पाण्याचे सर्वच स्रोत आता संपत चालले आहे. ग्रामीण भागातले विहीर किंवा बारव हे नामशेष झाले असून ते कुठे ही पाहायला मिळत नाहीत. बोअरवेल नावाची यंत्रणा निर्माण झाल्यापासून जमिनीत असलेले पाणी देखील मोठ्या प्रमाणात उपसले चालले आहे. भूगर्भाला मोठे मोठे छिद्र केल्या जात आहे ज्यामुळे भूकवचाला धोका पोहचत आहे. काही हुशार लोकांनी पाण्याचा व्यापार करून कृत्रिम टंचाई निर्माण केली आहे.  थोड्या फार प्रमाणात नद्या आज शिल्लक आहेत. मात्र त्या नद्यांचे पाणी देखील फार मोठ्या प्रमाणात प्रदूषित करण्यात येत आहे. जमिनीवर पाण्याचे प्रमाण जास्त असून देखील पाण्यासाठी मारामार चालू आहे. नद्यामध्ये कारखान्यातील रसायनयुक्त पाणी किंवा घराघरातील नाल्यातील पाणी सोडून खराब केल्या जाते आहे. ज्यामुळे वन्यजीवांना त्याचा धोका पोहचत आहे. जनतेला शुद्धपाणी पिण्यास न मिळाल्यामुळे वेगवेगळ्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे.  पाणी मुबलक असणारे पाण्याचा अपव्यय करीत आहेत तर ज्यांच्याकडे पाणी नाही ते पाण्याची बचत करून पाणी वापरत आहेत. असे विरोधाभासाचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. पाणी कोणासाठी का असेना जीवन आहे. त्यामुळे त्याचे प्रदूषण होणार नाही किंवा त्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेणे आवश्यक आहे. छोट्या छोट्या कारणावरून हे सहजपणे करता येऊ शकते. 
पाण्याच्या नंतर सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे हवा. ज्यात मनुष्याला जगण्यासाठी जे ऑक्सिजन लागते ते या हवेतून मिळते. तसे तर हवेत ऑक्सिजन सोबत अन्य भरपूर घटक असतात मात्र त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे ऑक्सिजन. आज वातावरणात पसरलेल्या वायू प्रदूषणामुळे शुद्ध हवा म्हणजे ऑक्सिजन मिळणे फार कठीण बनले आहे. मोठ्या शहरात प्रामुख्याने ही समस्या जाणवत आहे. येथील लोकांना शुद्ध हवा मिळविण्यासाठी भल्या पहाटे घराच्या बाहेर पडावं लागते. तरी देखील शुद्ध हवा मिळेल याची खात्री नसते. मुंबईसारख्या शहरात शुद्ध हवा तर सोडा घाण वायूने माणसं त्रस्त होतात. सर्वांच्या तोंडावर पट्टी बांधलेली दिसून येते. ऑक्सिजन निर्माण करण्याचे फार मोठे कार्य झाडाकडून केले जाते. मात्र त्याच झाडांची कत्तल करीत गेल्यास ऑक्सिजन निर्माण कसे होणार ? हा एक फार मोठा प्रश्न पडतो. पण तरी ही याकडे कानाडोळा केल्या जाते. दरवर्षी पर्यावरण दिनी वृक्षारोपण केल्या जाते मात्र त्यातील हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच वृक्ष जगतात. झाडांची कटाई करणाऱ्या लोकांना याची काही काळजी वाटत नाही. नुकतेच परवा राष्ट्रीय मार्गावरून जात असताना रस्त्यावर अनेक झाडांची कत्तल केल्याचे पाहून मनाला खूप कळवळा वाटले. न राहवून विचारले तर कळाले की, हा केंद्रशासनाचा समृद्धी मार्ग आहे. त्यामुळे ह्या झाडांची कत्तल करण्यात येत आहे. तेंव्हा काय बोलावे हेच कळेना. रस्ता असावा मात्र त्यासाठी या झाडाची कत्तल करणे खरंच आवश्यक आहे का यावर शासन किंवा गुत्तेदार विचार करीत नाही, याचे फार मोठे दुःख होते. एकीकडे वृक्ष लावण्याचा संदेश देणारे वृक्षतोड कसे करतात ? या प्रश्नांची उकल काही केल्या होत नाही. वायू प्रदूषणात औद्योगिककरण हे ही महत्वाचे कारण आहे. कारखान्यातून निघणारे धूर आणि विविध वायूमुळे परिसरातील लोकांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्यांना श्वसनाचे अनेक विकार जडतात. वाढत चाललेल्या वाहनाची संख्या हे ही प्रदूषण वाढण्याचे एक कारण आहे. पूर्वी लोकं दळणवळण करण्यासाठी सायकलचा वापर करीत ज्याच्यापासून कोणताच वायू बाहेर पडत नव्हता शिवाय शारीरिक व्यायाम देखील होत असे. मात्र आजकाल सायकल चालविणे हे  कमीपणाचे समजल्या जात आहे. मोटारसायकलसारखी दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनाची संख्या वाढीस लागली तसे वायू प्रदूषण देखील वाढीस लागले आहे हे मात्र खरे आहे. आज जेंव्हा लोकांना याचा त्रास जाणवत आहे. तेंव्हा यावर उपाय शोधल्या जात आहे. आठवड्यातून एक दिवस नो व्हेहिकल डे साजरा करणे, सायकलचा वापर करणे याबाबीचा उपयोग केल्या जात आहे. प्रदूषण ही एक समस्या जरी असेल तरी त्याचे निराकरण करणे ही फार कठीण बाब निश्चित नाही. त्यासाठी प्रत्येक नागरिकांनी स्वतः जागरूकपणे वागणे आवश्यक आहे. मी या देशाचा नागरिक आहे आणि या देशाप्रती माझे ही काही कर्तव्य बनते याची जाण सर्वप्रथम निर्माण होणे आवश्यक आहे. कायदे करून कोणती समस्या आजपर्यंत सुटली नाही आणि यापुढे सुटणार देखील नाही, त्यासाठी स्वतः जबाबदारीने आणि संयमी वागणूक ठेवायला हवी तर कोणतीही समस्या मिटू शकते. 
चला तर मग या नवीन वर्षात पदार्पण करतांना भारताचा एक जबाबदार नागरिक होऊन जबाबदारीने वागू या आणि प्रदूषणमुक्त भारत घडवू या.

- नागोराव सा. येवतीकर, स्तंभलेखक
  मु. येवती ता. धर्माबाद 

9423625769

मतदान जनजागृती ( Voting Awarness )

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जनजागृती चला मतदान करू लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.  चला मतदान करू .......! ...