जागतिक हस्ताक्षर दिवस त्यानिमित्ताने प्रासंगिक लेख
*सुंदर हस्ताक्षर : एक दागिना*
शाळेतील विद्यार्थ्यांच्या गृहपाठाच्या वह्या तपासतांना सुंदर हस्ताक्षरात लिहलेल्या वह्या मनाला आनंदीत करून जातात. खरोखरच वळणदार अक्षराला किती महत्व आहे ! सुंदर हस्ताक्षर पाहुन त्या मुलाचे कौतूक केल्याशिवाय कुणालाच राहवत नाही. ज्याप्रकारे स्त्रियांना त्यांच्या अंगावरील सोने, चांदी व मोती हे सुशोभित करून जातात. त्याचप्रकारे वळणदार व सुंदर हस्ताक्षर हे त्यांच्या लिखाणाला अलंकारित करतात. याचाच दुसरा अर्थ म्हणजे सुंदर हस्ताक्षर म्हणजे प्रत्येकांसाठी एक आलंकारिक दागिनांच होय. परंतु ज्याचे हस्ताक्षर सुंदर किंवा वळणदार नाही, अशा लिखाणाकडे पाहून मनात राग येतो, संताप येते. एकाच वयोगटातील आणि वर्गातील मुलांच्या हस्ताक्षरांत असा फरक कसा काय ? असा प्रश्न सहज पडतो. हस्ताक्षरात सुधारणा करण्यासाठी वा सुंदर अक्षर लेखन करण्यासाठी काय करता येईल ? या प्रश्नांची उकल करतांना अनेक बाबी लक्षात घ्यावे लागतात. वास्तविक पाहता लेखन कौशल्य विकसित करणे फार सोपे आहे.
प्राथमिक शाळेच्या पहिल्या वर्गापासून मुलांच्या लेखनाकडे विशेष लक्ष द्यावे. उजव्या हाताच्या मधल्या बोटावर लेखणी टेकवून अंगठा व पहिले बोट यात पकड़ करावी. त्यामुळे लेखणीला हवे तिकडे वळविणे सोपे जाते. लेखन कार्य प्रारंभ करतांना मुलांच्या हातात बॉलपेनच्या ऐवजी शाई किंवा स्केच घेन द्यावे. यापेक्षा पेन्सीलचा वापर करणे हे तर फारच चांगले. कारण यामुळे मुले सहज अलगदरित्या लेखन करू शकतात. बॉलपेनला जो दाब द्यावा लागतो तो द्यावा लागत नाही. लहानपणी लागलेले वळण सहसा लोप पावत नाही. लेखनात योग्य गती मिळवायचे असेल तर अक्षरांच्या नियमानुसार लेखन करण्याकडे लक्ष द्यावे. बहुतांश वेळा सोपी पध्दत म्हणून विद्यार्थी नियमानुसार लेखन करीत नाहीत त्यामुळे त्यांना लेखनात गती तर मिळत नाहीच शिवाय अक्षर वळणदार व सुंदर सुध्दा काढता येत नाही. याबाबीकडे सर्वप्रथम पालक, शिक्षकांनी गांभीयनि लक्ष द्यावे. येथे जर विद्यार्थ्यांच्या लेखनांकडे दुर्लक्ष झाले तर भविष्यात त्यांच्या लेखनात सुधारणा करणे अवघड जाते.
सर्वच अक्षरांचा आकार एकसमान काढण्यावर भर द्यावा तसेच शब्दां शब्दात योग्य असे अंतर ठेवून लेखन केल्यास हस्ताक्षर नक्कीच सुंदर दिसते त्याचसोबत त्याच्यात सुधारणा होत जाते. मराठीच्या लेखनासाठी प्रारंभी पाच रेघी आणि त्यानंतर दोन रेघी वहीचा वापर नियमितपणे करण्याकडे लक्ष द्यावे. प्राथमिक वर्गातील मुले संवेदनाक्षम असतात. टीपकागदाप्रमाणे ते प्रत्येकाची कृती आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचेच अनुकरण करण्यात ते मग्न असतात. त्यास्तव सर्वप्रथम शिक्षकांचे हस्ताक्षर वळणदार व सुंदर असणे गरजेचे आहे. शाळेतील शिक्षक मंडळीचे फलक लेखन कार्य विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श असते. शाळेतील विविध सुविचार, दिनविशेष, बातम्या ही फलके सुंदर हस्ताक्षरात लिहण्यात यावे. ज्यामुळे विद्यार्थी याकडे आकर्षित होतील आणि त्यांच्या लेखनावर निश्चीतपणे त्याचा प्रभाव पडेल यात शंका नाही.
लेखन वळणदार व सुंदर असावे सोबत स्वच्छता सुध्दा तेवढीच महत्वाची आहे. ज्याप्रकारे आपण आपले घर, परिसर, शाळा व वर्ग अगदी चकचकीत ठेवतो. थोडा सुध्दा कचरा पडू देत नाही. स्वच्छ जागेत थोडासा कचरा सुध्दा स्वच्छतेला गालबोट लावून जाते. लेखनाचे सुध्दा तसेच आहे. लेखनात एकही चूक होणार नाही व खाडाखोड होणार नाही याकडे जाणिवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच व्याकरणाचे नियम लक्षात न घेता केलेले लिखाण कितीही सुंदर, हस्ताक्षराला नक्कीच गालबोट लावतो. सर्व नियमांची जंत्री विद्यार्थ्यांना करून द्यावे. जास्तीत जास्त वेळा चुकणारे शब्द नेहमी विद्यार्थ्यांच्या दृष्टीस पड़तील अशा ठिकाणी लिहून ठेवावे. गावातील किंवा शहरातील दुकान किंवा इतरत्र लिहण्यात आलेल्या पाट्यावरील मजकूर जसेच्या तसे लिहून आणण्याच्या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासु वृत्ती जागे करता येईल. चूक असलेले शब्द शोधतांना शुद्ध शब्दाची ओळख तर होतेच शिवाय ते शब्द कायम स्मरणातही राहते. कधी कधी शिक्षकांनी जाणूनबुझून चुकीचे शब्द लिहून विद्यार्थ्यांकडून त्यास शुद्ध लिहण्यास सांगावे यामुळे सुध्दा योग्य शब्दाची ओळख होते. लेखनात व्याकरणाला अनन्यसाधारण महत्व आहे याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करावी.
ज्याचे हस्ताक्षर सुंदर नाही त्यांना असे वाटते की, माझ्या अक्षर लेखनात कधीच सुधारणा करता येत नाही. वेळ निघून गेलेली आहे. आत्ता काहीच करता येत नाही. परंतु तसे काही नाही, जिद्द, चिकाटी, मेहनत आणि नियमित सरावामुळे प्रत्येकाचे हस्ताक्षरात नक्कीच सुधारणा होवू शकते. दररोज नित्यनेमाने एक उतारा लिहण्याचा संकल्प केल्यास उत्तरोत्तर हस्ताक्षर सुंदर होत जाते. म्हणूनच शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षक मंडळी रोज एक पान तरी शुद्धलेखन लिहण्यास सांगतात परंतु विद्याथ्यांचे लेखन तपासून त्यांच्या झालेल्या चुका निदर्शनास आणून दिल्यासच त्याच्यात प्रगती होते. नेमके याच ठिकाणी आपण कमी पडतो आणि विद्यार्थ्यांच्या लेखनात सुधारणा दिसून येत नाही. तसेच ठराविक वेळी ठराविक ठिकाणी लेखनाचे काम केल्यास आपली मानसिक तयारी होते. मानसिक तयारी झाली की, यश लवकर मिळते. अशी शिकवण मानसिक तयारी बऱ्याच वर्षापूर्वी संत रामदास स्वामी यांनी दिसामाजि काही तरी लिहावे असे सांगितले आहे. परंतु त्यांच्या शिकवणीकडे आपण आजपर्यंत गंभीरतेने लक्ष दिलेच नाही. सुंदर हस्ताक्षर ही नैसर्गिक देणगी आहे म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करून साधे प्रयत्न ही करत नाही, ही फार मोठी चूक करीत आलो आहोत. निदान यापुढे तरी असे न करता लेखनात सुधारणा घडवून आणण्याचा आपण सर्वांनी जागरूकपणे प्रयत्न करू या. प्रयत्न केल्यानंतर यश नक्कीच मिळेल यात शंका नाही.
- नागोराव सा. येवतीकर मु. येवती ता. धर्माबाद 9423625769