Wednesday, 14 December 2022

World Tea Day ( चहा दिवस )

जगभरातील काही देशात 15 डिसेंबर हा दिवस जागतिक चहा ( World Tea Day ) दिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र, चहाचा व्यापार आणि चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 21 मे रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा केला जातो. चहा विषयी वाचू या मनातील भाव

जागतिक चहा दिवस निमित्ताने

एक कप चहा

प्रिय चहा
चहा या दोन अक्षरी शब्दांत खूप मोठी ताकत आहे. कारण या चहामुळे दोन मनाचे मिलन होते, थोडावेळ एकमेकांना बोलता येते, कितीही घाईत असलो तरी चहा घेण्यासाठी थोडा वेळ विश्रांती नक्की मिळते. चहाला इंग्रजीत एकाक्षरी शब्द म्हणजे टी असे म्हणतात तर हिंदीत चाय म्हटले जाते. तसे राजेश खन्नावर चित्रित केलेलं एक गाणं सुद्धा खूप प्रसिद्ध आहे, शायद मेरी शादी का खयाल दिल में आया है, इसिलिए मम्मीने मेरे तुमहें चाय पे बुलाया है। आज ही प्रथा कायम आहे की, मुलगी बघायच्या कार्यक्रमात पोहे खाणे झाल्यानंतर नवरी मुलगी हातात चहाचा ट्रे घेऊन येते आणि आपला परिचय देते. बऱ्याच कामासाठी चहा हे एक निमित्त म्हणून त्याचा वापर केला जातो. एखाद्या ठिकाणी काही सौदा किंवा व्यापार झाला म्हणजे लगेच तोंड गोड करण्याची प्रथा असते. चहा हे एक गोड पेय, त्यामुळे सर्वजण चहा घेतात. दोन मित्र बाजारात खूप दिवसांनी असो वा काही तासानंतर असो त्यांची भेट झाली की, पहिलं वाक्य, चल एक कप चहा घेऊ. चहा पिता पिता मग खूप गप्पाटप्पा, अनेक विषयांवर चर्चा होते. याच दरम्यान गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या गप्पा रंगतात. म्हणून काहीजण खास करून टी पार्टी आयोजित करतात, चाय पे चर्चा करण्यासाठी. म्हणजे येथे ही चहा हे एक निमित्त असते. तेच जर मित्राने चहा पिऊ असं म्हटलं नाही तर तो चारचौघात सांगतो त्याने मला साधं चहा सुद्धा विचारलं नाही. घरी नातलग किंवा पाहुणे आले की चहा विचारावं लागते आणि चहा पाजवावे लागते. नाहीतर समाजात साधी चहा देखील दिली नाही म्हणून आपली खूप बदनामी होते. घरी आलेल्या नातलगांची सरबराई करण्याचे प्रमुख साधन म्हणजे चहा. सकाळ व सायंकाळच्या स्वयंपाकाची सुरुवात चहानेच होते. लहानपणी कपबशीचा आवाज आला की जाग यायची, कधीकधी चहाचा वास देखील नाकात जायचं आणि मग जाग यायचं. पावसात भिजून आल्यावर आणि हिवाळ्याच्या थंडीत गरम चहा खूप चांगले वाटायचे. चहामुळे तरतरी येते, सर्व काही योग्य होते, असे मनाला वाटते. 
दुधाची चहा आणि काळी चहा असे चहाचे प्रामुख्याने दोन प्रकार मोडतात. दुधाच्या चहात साखर, चहापत्ती आणि दूध एकत्रित गरम केल्या जाते तर काळी चहा म्हणजे डिकाशन चहा यात दूध नसते. पण ही चहा दुधाच्या चहापेक्षा चांगली असते. या डिकाशन चहात आद्रक, दालचिनी आणि तुळशीची पाने टाकल्यास ते खूप चांगले वाटतेे. लहान मुलांनी शक्यतो चहा पिणे टाळावे असे घरातील वडील मंडळी म्हणतात मात्र लहान मुलांना दुधापेक्षा चहा पिणे खूप आवडते. सकाळचा चहा आणि पेपर याचे अतूट नाते आहे. चहाविना पेपर वाचावे वाटत नाही आणि पेपरविना चहा प्यावे वाटत नाही. चहा आणि बिस्कीट याचे नाते देखील असेच आहे. काही मंडळी चहासोबत पाव म्हणजे ब्रेड किंवा खारी असे पदार्थ देखील खातात. जेव्हा खूप काम करून जरासा थकवा जाणवायला होते त्यावेळी चहा पिण्याची ईच्छा निर्माण होते. माणसाला स्वयंपाकातले कोणते पदार्थ तयार करता येवो किंवा न येवो चहा मात्र करता आले पाहिजे. नाही तर मित्रांमध्ये आपले हसे होते आणि मित्र म्हणतात, तुला, साधी चहा करता येत नाही. चहा करता आली तर त्याचे अनेक फायदे होतात. स्वयंपाक शिकण्याची पहिली पायरी म्हणजे चहा करता येणे. 
चहाचा शोध कसा लागला असेल ? हे एक संशोधन करण्याची बाब आहे. एक व्यक्ती झाडाखाली पाणी उकळत ठेवला होता तेव्हा वरून झाडाचे एक पान त्या उकळत्या पानात पडले तेव्हा त्या पाण्याला त्या पानाचा वास आला. त्याने ते पिऊन बघितले तर त्याचा थकवा दूर झाल्याचे जाणवले. अश्याप्रकारे चहाची सुरुवात झाली. भारतातल्या लोकांना हे चहा वगैरे काही माहीत नव्हते. भारतावर इंग्रजांचे राज्य होते. अगदी सुरुवातीला सकाळी सकाळी इंग्रज लोकं भारतीय लोकांच्या घरापुढे या पानांची पुडी अगदी मोफत टाकू लागले. भारतीयांना त्या पानांची चव कळाली आणि जरा गोडी लागली. मग तेच पाने फुकट ऐवजी काही पैसे देऊन घ्यावे लागू लागली. यापद्धतीने चहाचा प्रचार व प्रसार वाढला. आज चहा पत्तीचे अनेक कंपनी चहा विक्री करतात. पूर्वी चहा पत्ती म्हणजे सुपर डस्ट एवढंच माहीत होतं. पण आज चहाचे अनेक कंपन्यामार्फत विक्री होत असून मोठ्या प्रमाणावर उत्पादन देखील करण्यात येत आहे. यातून भरपूर पैसा देखील मिळत आहे. साध्या चहाच्या दुकानावरून अनेक लोकांची प्रगती झाली आहे. यात देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. महाराष्ट्रात येवले अमृततुल्य चहा प्रत्येक जिल्ह्यात स्थान मिळविले आहे. कमी भांडवलावर चहाची विक्री कोठेही करता येणे अगदी सोपे आहे. रेल्वेत अनेक मंडळी सकाळी सकाळी चहा विकून आपल्या संसाराला चांगल्याप्रगती पथावर नेले आहेत. बसस्थानक, रेल्वेस्थानक, बाजारातील मुख्य ठिकाण, थिएटर, मार्केट, शाळा, विद्यालये, महाविद्यालयाच्या परिसरात चहाची विक्री करून आर्थिक स्थिती मजबूत करता येऊ शकते. म्हणूनच वर म्हटले आहे, साधी चहा करता येत नाही, तुला. ते जर जमलं तर आपण सुखी जीवन जगू शकतो. चहाच्या व्यवसायावर आज लाखो लोकं जगत आहेत, कोणी चहाची पत्ती विकून तर कोणी गरमागरम चहा विकून. काहीजण म्हणतात चहा शरीरासाठी घातक आहे पण लाखो बेरोजगार युवकांच्या हाताला काम देण्यासाठी आपला एक कप चहा काही विघ्नसंतोषी ठरणार नाही. म्हणून जास्त विचार करू नका, चला एक कप चहा घेऊ या ....!

- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769

Monday, 5 December 2022

अस्ट्रोनॉमी ( Astronomy )

सूर्यमाला व त्यातील विविध ग्रहांची माहिती फोटोसह

                      सूर्यमाला 
सूर्यमाला ही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंनी बनलेली आहे. सूर्यमालेत आठ मुख्य ग्रह आहेत. सूर्यापासूनच्या अंतराप्रमाणे ग्रह असे आहेत - बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस (हर्षल) व नेपच्यून (वरुण). प्लूटो हा त्याच्या शोधापासून (म्हणजेच १९३० पासून) सूर्यमालेतील नववा ग्रह मानला जातो.


                सूर्य


सूर्य दर सेकंदाला चार कोटी टन हायड्रोजन अणुइंधन वापरतो. सूर्य सतत जळत राहतो. सूर्याचे तापमान हजारो अंश सेल्सिअस आहे. सूर्य हा तारा आपल्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे. पृथ्वी व सूर्यमालेतील इतर ग्रह हे सर्व सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. हा सूर्यमालेतील एक तप्त गोळा आहे. सूर्यमालेतील एकूण वस्तुमानापैकी ९९% पेक्षा जास्त वस्तुमान एकट्या सूर्यामध्ये आहे.सूर्यापासून पृथ्वीचे सरासरी अंतर जवळजवळ १५ कोटी किलोमीटर किंवा ९ कोटी ३० लाख मैल आहे. सूर्यप्रकाशाला पृथ्वीवर पोचायला ८.३ मिनिटे लागतात. या प्रकाशाच्या ऊर्जेमुळे प्रकाश-संश्लेषण नावाची एक जैव-रासायनिक अभिक्रिया होते. ही अभिक्रिया पृथ्वीवरील जीवनाचा आधार आहे. सूर्याचा पृष्ठभाग हायड्रोजन, हेलियम, लोह, निकेल, ऑक्सिजन, सिलिकॉन, सल्फर, मॅग्निशिअम, कार्बन, नियॉन, कॅलशियम, क्रोमियम आदी घटकांपासून झाला आहे. यापैकी हायड्रोजनचे प्रमाण ७४% आणि हेलियमचे २४% आहे.
                 
               01) बुध ग्रह

बुध हा सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वांत जवळ असलेला ग्रह आहे. त्याचे सूर्यापासूनचे अंतर ५७, ९०९१७५ किलोमीटर आहे. बुध त्याची सूर्याभोवतीची प्रदक्षिणा ८८ दिवसात पूर्ण करतो. आकाराने हा एक छोटा ग्रह आहे. सूर्याच्या फारच जवळ असल्याने दुर्बिणीतून फार क्वचित दिसतो. त्याला कोणतेही नैसर्गिक उपग्रह नाहीत.


                 02) शुक्र ग्रह

सूर्यमालेमध्ये शुक्र हा सूर्यापासून बुधानंतर, आणि पृथ्वीअगोदर येणारा क्रमाने दुसरा ग्रह आहे. जरी सर्व ग्रहांच्या भ्रमणकक्षा लंबगोलाकार असल्यातरी शुक्राची भ्रमणकक्षा जवळजवळ वर्तुळाकार आहे. याचा व्यास १२,१०४ कि. मी. एवढा आहे. शुक्र देखील अंतर्वर्ती ग्रह आहे. यामुळेच शुक्रदेखील आपल्याला आकाशात फक्त सकाळी किंवा संध्याकाळीच दिसतो. या ग्रहावर वातावरण अतिशय दाट असल्यामुळे सूर्याचा शुक्रावर पडलेला प्रकाश मोठ्याप्रमाणात परावर्तित होतो. म्हणून शुक्र आपल्याला इतर ग्रहांपेक्षा अधिक तेजस्वी दिसतो.

                  03) पृथ्वी ग्रह


पृथ्वी हा सूर्यमालेतील सूर्यापासूनच्या अंतरानुक्रमे तिसरा तर आकारानुक्रमे पाचवा ग्रह आहे. सूर्यमालेतील खडकाळ ग्रहांमध्ये हा सर्वांत मोठा आहे. पृथ्वीला 'निळा ग्रह' असेही म्हणतात. जिथे जीवन आहे, अशी पूर्ण विश्वात ही एकमेव ज्ञात जागा आहे . आपण याच पृथ्वीवर राहतो. पृथ्वीची निर्मिती साधारणपणे ४५७ कोटी वर्षांपूर्वी झालीअसावी आणि तिचा उपग्रह चंद्र साधारणपणे ४५३ कोटी वर्षांपूर्वी पासून तिला प्रदक्षिणा घालू लागला. हिचा व्यास १२,७५६ कि.मी. एवढा आहे. सूर्यापासून पृथ्वीचे अंतर साधारणपणे १४,९५,९७,८९० कि.मी. एवढे आहे.



                  04) मंगळ ग्रह


मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे. त्याच्या तांबड्या रंगामुळे त्याला तांबडा ग्रह असे सुद्धा म्हटले जाते. तांबडा रंग त्याला आयर्न ऑक्साइडमुळे मिळाला आहे. हा एक खडकाळ ग्रह (terrestrial planet) असून त्यावरील वातावरण विरळ आहे. ऑलिम्पस मॉन्स ही मंगळावर असलेली ज्वालामुखी आपल्या सूर्यमालेतील सर्वात उंच ज्वालामुखी आहे.



                05) गुरू ग्रह
             
गुरू (Jupiter) हा अंतरानुसार सूर्यापासून पाचव्या स्थानावर असलेला सूर्यमालेमधील आकाराने सर्वांत मोठा ग्रह आहे. गुरू ग्रह हा मुख्यत्वेकरून हायड्रोजन व थोड्या प्रमाणात हेलियमचा बनला आहे. गुरूला कमीतकमी ६३ उपग्रह आहेत. यापैकी चार मोठ्या उपग्रहांचा शोध गॅलिलियोने १६१० मध्ये लावला होता.




               06) शनी ग्रह
             
सूर्यमालेतील ग्रहांमध्ये शनी (Saturn) हा सूर्यापासून सहाव्या स्थानावर आहे. त्याचे बरेचसे वस्तुमान वायूंमुळे असून हा सूर्यमालेतील आकारमानाने दुसऱ्या क्रमांकाचा मोठा ग्रह आहे. शनीभोवती बर्फ व आंतरिक्ष कचऱ्यापासून बनलेली कडी आहेत. गुरू ग्रहापेक्षा लहान असला तरी हा त्याच्या भोवताली असलेल्या देखण्या कड्यांमुळे अधिक प्रसिद्ध आहे. शनीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास साधारणत: २९ वर्ष लागतात.


                  07) युरेनस ग्रह

युरेनस हा सूर्यमालेमध्ये सूर्यापासून सातव्या क्रमांकावर असलेला ग्रह आहे. हर्शल पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. तो बराचसा वायूंचा बनलेला आहे. तो व्यासानुसार तिसरा आणि वस्तुमानानुसार चौथा ग्रह आहे. युरेनस ग्रह पृथ्वीच्या तुलनेत अनेक पटींनी मोठा आहे. पृथ्वीपासून त्याचे अंतर २.८ अब्ज कि.मी. आहे. युरेनसला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पुरी करण्यास ८४ वर्ष लागतात. नासाच्या "व्हॉयेजर २" या यानाने युरेनस ग्रहाला भेट दिली आहे. आधुनिक काळात शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे. सर विल्यम हर्शल यांनी हा ग्रह १३ मार्च १७८१ला शोधल्याची घोषणा केली. युरेनसला हिंदी-मराठीत अरुण म्हणतात.

              08) नेपच्यून ग्रह


नेपच्यून हा ग्रह सूर्यापासून आठवा व सूर्यमालेतील सर्वांत बाहेरचा ग्रह आहे. या ग्रहाला हिंदीत व मराठीत वरुण असे म्हणतात. नेपच्यूनचा शोध ४ ऑगस्ट १९६४ रोजी लागला. हा ग्रह दुर्बिणीनेच पाहता येतो.स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास यास साधारणतः १९ दिवस लागतात. तर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास यास जवळपास 
 १६५ वर्षे लागतात.




                    चंद्र उपग्रह   
             
चंद्र पृथ्वीचा एकमात्र नैसर्गिक उपग्रह आहे. चंद्र आकारमानाप्रमाणे सूर्यमालेतील पाचवा मोठा नैसर्गिक उपग्रह आहे. पृथ्वी व चंद्रामधील अंतर ३,८४,४०३ कि.मी. असून, हे अंतर पृथ्वीच्या व्यासाच्या सुमारे ३० पट आहे.  चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा घालण्याकरीता २७.३ दिवसांचा कालावधी लागतो. तसेच चंद्र, सूर्य व पृथ्वी यांच्यातील भौमितिक स्थानांमुळे दर २९.५ दिवसांनी चंद्राच्या कलांचे एक आवर्तन पूर्ण होते. चंद्राने बऱ्याच वर्षांपासून पृथ्वीला लघुग्रहांपासून संरक्षण केले आहे. 
चांद्र मास हा तीस दिवसांचा असतो, तर चांद्र वर्ष ३६० दिवसांचे. हे सूर्याधारित सौरवर्षापेक्षा ११ दिवसांनी लहान असते. सूर्यवर्षाच्या बरोबर येण्यासाठी साधारणपणे सुमारे दर ३३ महिन्यांनी अधिक चांद्रमास येतो. त्यातूनही राहिलेली तफावत दूर करण्यासाठी सुमारे १९ किंवा १४१ वर्षांनी क्षयमास येतो.

संकलन :- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा, धर्माबाद, जि. नांदेड
9423625769

भारतीय शास्त्रज्ञ ( Indian Scientist )

भारतातील काही महान गणिततज्ञ आणि शास्त्रज्ञ

      भारतीय गणितज्ञ - आर्यभट्ट

जगाला सर्वात आधी शून्याची ओळख देणारे महान भारतीय खगोलशास्त्री आणि गणितज्ञ म्हणजे आर्यभट्ट. त्यांना खागोलशास्त्रात आणि गणितामध्ये एक विशेष आवड होती, त्यांनी गणितामध्ये सुद्धा बरेचसे सूत्र शोधून काढले आहेत. १५ एप्रिल १९७५ साली आर्यभट्ट यांच्या १५०० व्या जयंतीनिमित्त भारताने “आर्यभट्ट” नावाचा पहिला उपग्रह अवकाशात सोडला.
 
                
            भारतीय शास्त्रज्ञ - सर सी. व्ही. रामन
( जन्म :-  7 नोव्हेंबर1988 मृत्यू :- 21 नोव्हेंबर 1970 )

सी.व्ही.रमण हे आधुनिक भारतातील एक महान वैज्ञानिक होते.. ‘रमण प्रभाव’ (Raman Effect) हा त्यांच्या संशोधनांला 1930 साली नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आलं. 28 फेब्रुवारी 1928 साली सी.व्ही.रमण यांनी ‘रमण इफेक्ट‘ चा शोध लावला होता. म्हणून या दिवसाला भारत सरकारने दरवर्षी ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. त्यांना 1954 साली भारताच्या सर्वोच्च अश्या ‘भारतरत्न’ देऊन गौरव करण्यात आला.
                 
             भारतीय शास्त्रज्ञ - डॉ. हरगोविंद खुराना
( जन्म :- 19 ऑक्टोबर 1910  मृत्यू :- 09 नोव्हेंबर 2011 )

डॉ. हरगोविंद खुराना यांना सन १९६८ साली अनुवांशिक संहिताची भाषा समजण्यासाठी आणि प्रथिने संश्लेषणातील भूमिका याबद्दल नोबेल पारितोषिक देण्यात आले. नोबेल पारितोषिक मिळवणारे ते भारतीय वंशाचे तिसरे व्यक्ती होते. सन १९६९ साली भारत सरकारतर्फे पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

                       
           भारतीय शास्त्रज्ञ - सुब्रह्मण्यम चंद्रशेखर
( जन्म :-  9 जानेवारी 1922 मृत्यू :- 21 ऑगस्ट1995  )
सन १९६८ साली भारत सरकारतर्फे पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यांना एस. चंद्रशेखर म्हणून सुद्धा ओळखले जाते. 
त्यांना ‘ताऱ्यांची रचना आणि उत्पत्ती’च्या शोधासाठी १९८३ साली नोबेल पारितोषिक मिळालेले आहे.


                   
         भारतीय शास्त्रज्ञ - डॉ. होमी भाभा
( जन्म :-  30 ऑक्टोबर 1909 मृत्यू :- 24 जानेवारी 1966  )

यांना भारतीय अनुशास्त्राचे जनक म्हटल्या जाते. यांच्याद्वारे भारतात अणु उर्जेच्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे.
सन १९५४ साली भारत सरकार तर्फे पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.


                        
भारतीय शास्त्रज्ञ - डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
( जन्म :-  15 ऑक्टोबर 1931 मृत्यू :- 27 जुलै 2015  )

भारतीय क्षेपणास्त्राचे जनक,  पहिल्या स्वदेशी क्षेपणास्त्राचे श्रेय डॉ. कलाम यांना जाते.
वर्ष 1997 मध्ये भारतातील सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न देऊन गौरविण्यात आले.
सन 2001 मध्ये भारताच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदावर विराजमान झाले. 


                   
        भारतीय गणितज्ञ - श्रीनिवास रामानुजन
( जन्म :-  22 डिसेंबर 1887  मृत्यू :- 26 एप्रिल 1920  )

रामानुजन यांना गणित आणि इंग्रजी या दोन विषयांची विशेष आवड होती. रामानुजन यांनी ३५०० पेक्षाही जास्त गणिताची प्रमेय लिहिलेली होती. 



                
             भारतीय शास्त्रज्ञ - विक्रम साराभाई
( जन्म :-  12 ऑगस्ट1919  मृत्यू :- 30 डिसेंबर 1971  )

भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेचे जनक आणि भारतातील अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. विकर्म साराभाई यांनी अहमदाबाद येथे साकारलेल्या रिसर्च सेंटर मधून सन १९७५ साली आपल्या देशांतील पहिला अंतरीक्ष उपग्रह ‘आर्यभट्ट’  अवकाशात सोडण्यात आला. सन १९६६ साली पद्मभूषण पुरस्कार आणि सन १९७२ साली मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार

                    
      भारतीय वनस्पती शास्त्रज्ञ - डॉ. जगदीशचंद्र बोस
( जन्म :-  30 नोव्हेंबर 1858  मृत्यू :- 23 नोव्हेंबर 1937  )

डॉ. जगदीशचंद्र बोस यांनी विद्युतशक्तीवर संशोधन केले. विद्युत चुंबकीय तरंगांचा शोध घेऊन त्यांनी बॅटरी बनवली. या शोधाची कीर्ती सर्वदूर पसरली तसेच वनस्पतींना संवेदना असतात’ हे त्यांनी सिद्ध केले. ते एक भारतीय जीवशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ तसेच पुरातत्त्वज्ञ होते. 

                               
              
      भारतीय शास्त्रज्ञ - डॉ. शंकर आबाजी भिसे 
(जन्म :- 29 एप्रिल 1867  मृत्यू :- 07 एप्रिल 1935 ) 

हे एक मराठी शास्त्रज्ञ व संशोधक होते. त्यांना भारताचे एडिसन असे म्हटले जाते. सौरऊर्जेवर चालणाऱ्या मोटारी तयार करण्याची मूळ कल्पना डॉ. शंकर आबाजी भिसे यांची होती. आगगाडीच्या स्वयंचलित दरवाजाचा शोध त्यांनीच लावला. अमेरिकेतील भारताचे पहिले शास्त्रज्ञ 


                       
 भारतीय शास्त्रज्ञ - डॉ. वसंत गोवारीकर
(जन्म :- 25 मार्च 1933  मृत्यू :- 03 जानेवारी 2015 ) 

भारतात विज्ञानाचा पाया रचणारे, पहिला भारतीय अग्निबाण बनवणारे, इस्रो संस्था प्रमुख महान शास्त्रज्ञ, खतांचा जागतिक ज्ञानकोश निर्मिती करणारे व पंतप्रधान विज्ञाम सल्लागार म्हणून कार्य केले. 


                            
भारतीय शास्त्रज्ञ - डॉ. जयंत नारळीकर
                (जन्म :- 19 जुलै 1938 ) 

सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्न केले आहेत. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. डॉ. जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ मांडली.



       रघुनाथ अनंत माशेलकर

रघुनाथ अनंत माशेलकर यांचा जन्म १ जानेवारी १९४३मध्ये गोवा या राज्यातील माशेल गावात झाला. त्यांना रमेश माशेलकर या नावानेही ओळखले जाते.. ते जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व थोर मानवतावादी विचारवंत आहेत. ते वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ (CSIR) या संघटनेचे माजी अध्यक्ष आहेत. बासमती तांदूळ आणि हळदीचे पेटंट मिळविले. भारत सरकारकडून त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कार मिळाले आहेत. 

संकलन :- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड
9423625769

सौजन्य :- इंटरनेट

धन्यवाद .........!

Sunday, 4 December 2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr. B R Ambedkar )

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी लिहिलेले कविता व वैचारिक लेख. 

निळ्या अक्षरावर क्लीक करून वाचावे. 

शिका, संघटित व्हा ....



।। विनम्र अभिवादन ।।

Sunday, 27 November 2022

एका वोटची शक्ती ( power of one vote )

एका वोटची शक्ती


ज्या ज्या वेळी आपण मतदार म्हणून निवडणुकीला तोंड द्यावे लागते त्या त्यावेळी आपल्या समोर एकच प्रश्न पडतो की, मतदार म्हणून मी काय करावे ? कोणत्या व्यक्तीला किंवा कोणत्या पक्षाला मतदान करावे ? आपण एक जागरूक मतदार असाल तर नक्कीच या प्रश्नाचे निराकरण स्वतःच्या मनाशी विचारून नक्की करू शकता. त्यासाठी स्वतः मतदार यांनी सर्वप्रथम कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये. छोट्या छोट्या आमिषाचा स्विकार करू नये. खाण्या-पिण्याच्या पार्टीला हजेरी लावू नये. बहुतांश वेळा निवडणुकीच्या काळात हे चित्र हमखास बघायला मिळते. शे-पाचशे रुपयांच्या लालसेपोटी आपण आपले अमूल्य असे वोट वाया घालवतो. सुज्ञ मतदार म्हणून आपण सर्वांनी मतदानाला जाण्यापूर्वी सर्व पक्ष, पॅनल व त्यांचे उमेदवार यांची एकदा तरी चाचपणी करावी. ज्या पक्षाची किंवा पॅनलची विचारधारा चांगली आहे, त्याचा नेता विचारी आणि दूरदृष्टी असलेला नेता असेल, त्यात काम करणारी मंडळी चांगली, अभ्यासू आणि विश्वासू आहेत, अश्याची निवड करून त्यांना मतदान करण्यात आपले खरे हित लपलेले आहे. हा माझा जवळचा, तो माझा मित्र, सखा, नातलग, सोयरा असे नातेसंबंध जोडून मतदान करणे कोणत्याही मतदाराला भविष्यात धोक्याचे ठरू शकते. मतदान करतांना जेव्हा आपणाला अनेक उमेदवार निवडायचे असते त्यावेळी एक इकडे आणि एक तिकडे मतदान करून आपण स्वतः संकटात सापडत असतो. असे केल्याने येणारी सत्ता ही कोणा एकट्याची येत नाही. संमिश्र सत्ता असलेल्या शासनाची प्रगती कशी होते हे आजपर्यंत आपण पाहत आलोत आणि अनुभवत आलो आहोत. म्हणून मतदान करायचे असेल तर पॅनल टू पॅनल मतदान करावे. यात आपलेच हित आहे, हे सर्वप्रथम आपण जाणून घ्यावे. आपण ज्या पॅनल किंवा पक्षात काम करता त्यातील व्यक्ती स्वार्थी, मतलबी व अविश्वासू आहेत हे माहीत असून देखील आपण त्यांच्या इच्छेखातर त्यांनाच मतदान करत असाल तर सरळ सरळ ते आपल्याच पायावर आपणच दगड टाकल्यासारखे होईल. फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जे व्यक्ती आपली भेट घेते आणि पुढील पाच वर्षे आपणाला साधे विचारत देखील नाही अश्या व्यक्तीपासून दूर राहिलेले बरे. संकट काळात जो मदत करतो तो खरा मित्र आणि संकटाच्या वेळी जो आपल्या पाठीशी उभा राहतो तोच खरा पक्ष किंवा पॅनल हे लक्षात असू द्यावे. माझ्या एका मतदानाने काय फरक पडणार आहे ? हा विचार आपल्या मनातून काढून टाकून योग्य उमेदवारांना आपले मत करावे. मतदानाला जातांना आपल्या जवळ आपली ओळख पटविणारे निवडणूक ओळखपत्र, आधारकार्ड, वाहन परवाना यापैकी कोणताही एक पुरावा जवळ ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा ऐनवेळी आपली पंचायत होऊ शकते. आपल्या भारतीय राज्यघटनेने आपल्या मतदानाला गोपनीयता दिलेली आहे. म्हणून कोणाच्या दबावाखाली किंवा कुणी दाखविलेल्या प्रलोभनाला बळी न पडता जरा सद्सद्विविवेक बुद्धी जागृत करून मतदान करू या, आपले अमूल्य वोट असेच वाया जाणार नाही याची काळजी घेऊ या. निवडणुकीत एका - एका मतदानाला किंमत असते याचे भान ठेवू या आणि स्वतःची प्रगती साधू या. शेवटी मतदार बंधू भगिनींना एवढंच सांगावे वाटते,

*मतदान करतांना विचार करा जरा नीट*
*एका-एका मताने मिळे विजयाची शीट*


- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769

( प्रस्तुत लेखात व्हायरल होत असताना काहीजण बदल करू शकतात. अश्या वेळी वाचकांना काही शंका येत असेल तर मूळ लेख वाचण्यासाठी माझ्या nasayeotikar या blog ला अवश्य भेट द्यावे. धन्यवाद .....! )

Thursday, 24 November 2022

यशवंतराव चव्हाण ( Yashwantrao Chavhan )

यशवंतराव बळवंतराव चव्हाण 

यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम केले होते. तर काही काळ ते भारताचे संरक्षणमंत्री सुद्धा होते. यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म हेन्द्रे पाटील मराठा समाजात १२ मार्च, १९१३ रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी १ मे १९५८ रोजी धुम्या गडावर जाऊन तिथे पांडुरंगाची मूर्ती स्थापन केली व राष्ट्रसंत भगवानबाबांच्या समोर धूम्या गडास भगवानगड नाव दिले. ते प्रागतिक विचारसरणीचे होते. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ख्याती आहे. ते रसिक व साहित्यिकही होते. “युगांतर”, “सह्याद्रीचे वारे”, “कृष्णाकाठ”, “ऋणानुबंध” ही त्यांची साहित्यसंपदा आहे.
त्यांनी महाराष्ट्रात विविध योजना राबविल्या आहेत 

 पंचायत राज या त्रिस्तरीय ( जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत) व्यवस्थेची सुरुवात केली.

- राज्य पंचवार्षिक योजनांचा प्रारंभ.

कोल्हापूर प्रकारच्या बंधाऱ्यांचा प्रचार. कोयना व उजनी ह्या प्रमुख प्रकल्पांच्या उभारणीला गती.

- १८ सहकारी साखर कारखान्यांची स्थापना

मराठवाडा (आत्ताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) व कोल्हापूर विद्यापीठ यांची (शिवाजी विद्यापीठाची) स्थापना.

- राज्यातील कृषी विद्यापीठांच्या स्थापनेतही संकल्पनात्मक सहभाग

- मराठी साहित्य संस्कृती महामंडळ व विश्र्वकोश मंडळाची स्थापना

- नागपूर येथे दीक्षा भूमीवर डॉ. आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय तसेच त्यांच्या आदरापोटी डॉ. आंबेडकर जयंतीची सुट्टी (१४ एप्रिल) देण्याची प्रथा यशवंतरावांनी महाराष्ट्रात सुरू केली

- यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने काही संस्था देखील निर्माण करण्यात आले आहेत.

  • यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक
  • यशवंतराव चव्हाण मेमोरियल (म्युनिसिपल) हॉस्पिटल (YCM), पिंपरी(पुणे)
  • यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे
- 25 नोव्हेंबर 1984 रोजी त्यांचा मृत्यू झाला.

महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना पुण्यतिथी निमित्ताने विनम्र अभिवादन .......!

संकलन :- नासा येवतीकर

Thursday, 17 November 2022

क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त ( Batukeshvar Datt )

क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त


सायमन कमिशन ला विरोध करतांना पंजाब केसरी लाला लजपतराय जखमी झाले आणि त्यातून ते सावरले नाही. अखेर त्यांचा मृत्यू झाला. याचा बदला घेण्यासाठी क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी एक योजना आखली. त्यांना या कामात उत्स्फूर्तपणे व साहसीपणे मदत करणारा एक युवक होता, त्याचे नाव होते बटुकेश्वर दत्त. बटुकेश्वर दत्त एक भारतीय क्रांंतिकारी होते. त्यांनी ८ एप्रिल १९२९ रोजी नवी दिल्लीमधील केंंद्रीय विधिमंडळात भगतसिंग यांच्याबरोबर बॉम्बस्फोट घडवून आणले होते. यासाठी त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा झाली. शिक्षेदरम्यान त्यांनी व भगतसिंग यांनी भारतीय राजकारणाच्या कैद्यांवरील अपमानास्पद वागणुकीविरोधात निषेध करणारे ऐतिहासिक उपोषण केले.
दत्तांना बी.के. दत्त, बट्टू आणि मोहन या नावानेही ओळखले जायचे. त्यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९१० रोजी बंगालमधील पूर्व बर्दमान जिल्ह्यातील ओरी या गावातील गोठा बिहारी दत्त यांचे घरी झाला. त्यांनी कॉवनपूरमधील पी.पी. एन हायस्कूलमधून पदवी प्राप्त केली.
भगतसिंग सारख्या क्रांतिकारकांचा उदय रोखण्याच्या हेतूने ब्रिटीश सरकारने भारतीय संरक्षण कायदा १९१५ (the Defence of India Act 1915) लागू केला, ज्याने पोलिसांना अनेक अधिकार दिले. फ्रेंच अराजकतावाद्यांनी केलेल्या फ्रान्सच्या चेंबर ऑफ डेप्युटीजच्या घटनेपासून प्रेरणा घेऊन भगतसिंघांनी केंद्रीय विधानसभेत बॉम्ब स्फोट करण्यासाठी योजना आखली. सुरुवातीला असे ठरविण्यात आले की बटुकेश्वर दत्त आणि सुखदेव हे बॉम्ब लावतील आणि सिंग युएसएसआरच्या दिशेने प्रवास करतील. तथापि, नंतर योजना बदलली आणि दत्तला सिंह यांच्यासमवेत बॉम्ब लावण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. ८ एप्रिल १९२९ रोजी सिंग आणि दत्त यांनी दर्शदीर्घतेतून धाव घेत विधानसभा परिसरात दोन बॉम्ब फेकले. बॉम्बच्या धुराने हॉल भरले आणि त्यांनी "इन्कलाब जिंदाबाद"च्या घोषवाक्यांचा जयघोष करीत कायद्याचा निषेध करणारी पत्रके फेकायला सुरुवात केली. या पत्रकानुसार दावा केला की केंद्रीय विधानसभेत ठेवण्यात आलेला हा कायदा व्यापार विवादांचा आणि सार्वजनिक सुरक्षा विधेयकाला विरोध करीत आहे आणि त्यात लाला लाजपत राय यांच्या मृत्यूच्या निषेध नोंदवण्यात आला आहे. स्फोटात काही लोक जखमी झाले, पण कुणाचाही मृत्यू झाला नाही. सिंग व दत्तानी हे जाहीर केले कि हे कृत्य नियोजित होते व स्वतःला त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. २० जुलै १९६५ रोजी नवी दिल्ली येथे त्यांचा मृत्यू झाला.

संकलन :- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

Wednesday, 16 November 2022

पंजाब केसरी लाला लजपत राय ( Lala Lajapat Ray )


पंजाब केसरी लाला लजपत राय

लाला लजपतराय यांचा जन्म २८ जानेवारी १८३६ रोजी पंजाब मधील धुंढिक येथे झाला. ते पंजाबी, भारतीय राजकारणी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी योगदान दिले. लाल-बाल-पाल या त्रिकुटापैकी लाल म्हणजे लाला लजपत राय हे होते. ते जहाल मतवादी नेते होते. त्यांना पंजाब केसरी असे म्हणतात. त्यांनी पंजाब नॅशनल बँकेची स्थापना केली.

लाला लजपतराय यांचे वडील मुन्शी राधाकृष्ण अग्रवाल सरकारी शाळेत उर्दू आणि पर्शियनचे शिक्षक होते. त्यांच्या आईचे नाव गुलाबदेवी अग्रवाल होते. १८४९ मध्ये लाला लजपतरायांचा विवाह राधादेवींशी झाला. १८७० च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांच्या वडलांची बदली रेवरी येथे झाली. तेथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत लजपतरायांचे सुरुवातीचे शिक्षण झाले.

सुरुवातीच्या आयुष्यात लजपतराय यांचे उदारमतवादी विचार आणि हिंदुत्वावरील त्यांचा विश्वास त्यांचे वडील आणि अतिशय धार्मिक आई यांच्यामुळे तयार झाला. १८८० मध्ये, लजपतरायांनी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी लाहोर येथील सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेतला. येथेच ते देशभक्त आणि भविष्यातील स्वातंत्र्यसैनिक लाला हंसराज आणि पंडित गुरुदत्त यांच्या संपर्कात आले. लाहोरमध्ये शिकत असताना स्वामीदयानंद सरस्वतीच्या हिंदू सुधारणा चळवळीचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि ते आर्यसमाजाचे सदस्य बनले. तसेच लाहोर स्थित आर्य गॅझेटचे संस्थापक, संपादक बनले.
हिंदुत्वावरील वाढत्या विश्वासामुळे ते हिंदू महासभेत सामील झाले. त्यामुळे त्यांना नौजवान भारत सभेच्या टीकेला सामोरे जावे लागले. कारण ही महासभा धर्मनिरपेक्ष नव्हती. भारतीय उपखंडातील हिंदू जीवनपद्धतीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे पुढे भारतीय स्वातंत्र्यासाठीच्या यशस्वी आंदोलनासाठी त्यांनी शांततामय मार्गाने चळवळी केल्या. १८८४ मध्ये त्यांच्या वडीलांची बदली रोहतक येथे झाली आणि लाहोर येथील अभ्यास संपवून लजपतरायसुद्धा त्यांच्या बरोबर आले. १८८६ मध्ये ते वडीलांच्या बदलीबरोबर हिसारला आले आणि तेथे त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला. बाबू चूडामणींसह लजपतराय हिसारच्या बार कौन्सिलचे संस्थापक सदस्य बनले.
लहानपणापासूनच देशसेवा करण्याची राय यांची तीव्र इच्छा होती. त्यामुळे देशाची पारतंत्र्यातून सुटका करण्याची लजपतरायांनी शपथ घेतली. त्याच वर्षी त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची हिसार जिल्हा शाखा स्थापन केली. तसेच बाबू चूडामणी, चंदूलाल तयाल, हरीलाल तयाल आणि बालमुकुंद तयाल हे तयाल बंधू, डॉ. रामजीलाल हुडा, डॉ.धनीराम, आर्यसमाजी पंडित मुरारीलाल, शेठ छाजूराम जाट आणि देवराज संधीर यांच्याबरोबर लाला लजपतरायांनी आर्य समाजाची स्थापनासुद्धा केली. काँग्रेसच्या अलाहाबाद येथील वार्षिक अधिवेशनात हिसार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांची १८८८ आणि १८८९ मध्ये निवड झाली. १८९२ मध्ये उच्च न्यायालयात वकिली करण्यासाठी ते लाहोर येथे गेले. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारताच्या राजकीय धोरणाला आकार देण्यासाठी ते पत्रकारिता सुद्धा करत. त्यांनी द ट्रिब्यून सहित अनेक वृत्तपत्रांमध्ये नियमितपणे लेखन केले.
१८८६ मध्ये त्यांनी महात्मा हंसराज यांना लाहोरमध्ये दयानंद अंग्लो-वैदिक स्कूलची स्थापना करण्यास मदत केली. भारताच्या १९४७ साली झालेल्या फाळणीनंतर लाहोरमधील या विद्यालयाचे रूपांतर इस्लामिया कॉलेजमध्ये झाले.
१९१४ मध्ये स्वातंत्र्यलढ्यात योगदान देण्यासाठी लजपतरायांनी वकिलीला रामराम ठोकला. ऑक्टोबर १९१७ मध्ये त्यांनी न्यूयॉर्क मध्ये भारतीय होमरूल लीगची स्थापना केली.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी झाल्यानंतर आणि पंजाबमधील राजकीय निदर्शनामध्ये भाग घेतल्यानंतर, मे १९०७मध्ये कोणताही खटला न चालवता लाल लजपतरायांची ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात रवानगी करण्यात आली. पण त्यांना अटक करून ठेवण्यासाठी पुरेसा पुरावा नाही, असे लॉर्ड मिंटो यांनी ठरवल्याने नोव्हेंबरमध्ये त्यांना परत जाण्याची परवानगी देण्यात आली.
१९२० साली कोलकाता येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या खास अधिवेशनात ते अध्यक्ष म्हणून निवडून आले. १९२१ मध्ये त्यांनी लाहोरमध्ये लोक सेवक मंडळ या ‘ना नफा’ तत्त्वावरील कल्याणकारी संघटनेची स्थापना केली. फाळणीनंतर या संस्थेचे कार्यालय दिल्ली येथे हलवण्यात आले. भारतभरात या संस्थेच्या अनेक शाखा आहेत.
१९२८ मध्ये भारतातील राजकीय परिस्थितीबद्दल अहवाल देण्यासाठी सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिटिश सरकारने एका आयोगाची स्थापना केली. भारतातील राजकीय पक्षांनी या आयोगावर बहिष्कार घातला, कारण या आयोगाच्या सदस्यांमध्ये एकही भारतीयाचा समावेश नव्हता. या आयोगाविरुद्ध भारतभर निदर्शने झाली. ३० ऑक्टोबर १९२८ रोजी जेव्हा या आयोगाने लाहोरला भेट दिली, तेव्हा त्याविरुद्ध मूक निदर्शनांचे नेतृत्व लाला लजपत राया यांनी केले. पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट यांनी या निदर्शकांवर लाठी हल्ला करण्याचे आदेश दिले. जखमी होऊनसुद्धा लाला लजपतरायांनी या जमावासमोर भाषण केले. "आज मी ज्या लाठ्या खाल्ल्या, त्या म्हणजे ब्रिटिश सरकारच्या भारतातील राजवटीच्या शवपेटिकेवरील शेवटचे खिळे ठरतील, असे मी जाहीर करतो." हे त्यांचे यावेळचे उद्गार होते. निदर्शनांच्या वेळेला झालेल्या लाठी हल्ल्यातून लाला लजपतराय पूर्णपणे बरे झाले नाहीत आणि हृदय विकाराच्या धक्क्याने १७ नोव्हेंबर १९२८ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन

( वरील सर्व माहिती इंटरनेटवरून संकलित करण्यात आली आहे. )


संकलन :- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद
9423625769


Thursday, 3 November 2022

जय हरी विठ्ठल ( Jay Hari Vitthal )

            ।। जय हरी विठ्ठल ।।

मिटवूनी दुःख । मिळे आम्हा सुख ।।
विठ्ठलाचे मुख । पाहुनिया ।।

दूर ती पंढरी । पायी चाले वारी ।।
मूर्ती डोक्यावरी । घेऊनिया ।।

विसरुनी भान । चाले रानोरान ।।
मुखी एक नाम । विठ्ठलाचे ।।

आज एकादशी । बैसे तुजपाशी ।।
प्रत्येक दिवशी । करी ध्यान ।।

एकच मागणी । विठ्ठला चरणी ।।
मिळो अन्नपाणी । बळीराजा ।।

- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद 9423625769

सर्व माऊलींना प्रबोधिनी एकादशीच्या हार्दीक शुभेच्छा ......!

Monday, 31 October 2022

31 ऑक्टोबर दिनविशेष ( Dinvishesh )

31 ऑक्टोबर दिनविशेष ......

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान
प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांचा  स्मृतिदिन व लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती त्यानिमित्ताने विनम्र अभिवादन .........! 

जीवन परिचय ......👇🏼
••••••••••••••••••••••••••
एक आठवण ......👇🏼
••••••••••••••••••••••••••
जीवन पट .....👇🏼
••••••••••••••••••••••••••

संकलन - नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769

सरदार वल्लभभाई पटेल ( Sardar Patel )

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल


31 ऑक्टोबर 2022 रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची 147 वी जयंती आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी संपूर्ण देशाला एकात्मतेच्या धाग्यात बांधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळेच वल्लभभाई पटेल यांची जयंती देशात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. नरेंद्र मोदी भारताच्या पंतप्रधान पदी विराजमान झाल्यानंतर 2014 मध्ये प्रथमच देशात राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. सरदार पटेल हे स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्रीही होते.  

 सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 रोजी गुजरातमधील नडियाद येथे झाला. लंडनला जाऊन त्यांनी बॅरिस्टरचे शिक्षण घेतले आणि परत येऊन अहमदाबादमध्ये वकिली करू लागले. महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. सरदार पटेल यांचे स्वातंत्र्य चळवळीतील पहिले आणि मोठे योगदान 1918 मध्ये खेडा लढ्यात होते. 1928 च्या बारडोली सत्याग्रहातही त्यांनी शेतकरी चळवळीचे यशस्वी नेतृत्व केले. या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे ते एक महत्त्वाचे नेते होते. 

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संस्थानांचे एकत्रीकरण करून अखंड भारताच्या निर्मितीमध्ये त्यांचे योगदान विसरता येणार नाही. त्यांनी 562 लहान-मोठ्या संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण करून भारताची एकता आणि अखंडता यांसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. विनम्र अभिवादन

सौजन्य :- इंटरनेट

संकलन :- नासा येवतीकर

आयर्न लेडी प्रियदर्शनी श्रीमती इंदिरा गांधी ( Indira Gandhi )

       आयर्न लेडी प्रियदर्शनी


प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी नेहरू कुटुंबात अलाहाबाद येथे झाला. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे त्यांचे वडील होते तर कमला नेहरू ही आई. त्या नेहरू दाम्पत्याच्या एकुलत्या एक कन्या होत्या. आई कमला नेहरू यांच्यासोबत अलाहाबादमधील आनंद भवन येथे इंदिरा मोठ्या झाल्या. त्यांचे बालपण एकाकी आणि दुःखात गेले कारण वडील जवाहरलाल नेहरू हे राजकीय चळवळीत सक्रिय सहभागी असल्याने अनेकदा दूर असायचे किंवा तुरुंगात तर असायचे. तर त्यांची आई नेहमी आजाराने अंथरुणाला खिळलेली होती ; पुढे त्यांचा क्षयरोगामुळे लवकर मृत्यू झाला. इंदिरा यांचा नेहरुंशी मर्यादित संपर्क होता, तोही बहुतेक वेळा पत्रांद्वारे असायचा. इंदिराजींना मुख्यतः घरीच शिक्षक शिकवायला येत होते आणि १९३४ मध्ये मॅट्रिक होईपर्यंत त्या अधूनमधून शाळेत जात होत्या. त्या आणि आई कमला या दोघी रामकृष्ण मिशनच्या बेलूर मठ मुख्यालयात राहायला गेल्या, जिथे स्वामी रंगनाथनंद हे इंदिरा यांचे पालक होते. त्या शांतिनिकेतन येथील विश्व भारती येथे शिकण्यासाठी गेल्या, जे पुढे १९५१ मध्ये विश्वभारती विद्यापीठ बनले. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांच्या मुलाखतीदरम्यान इंदिरा यांचे नाव प्रियदर्शनी  ठेवले. संस्कृतमध्ये याचा अर्थ "सर्वकाही दयाळूपणे पाहणारी" असा होतो, आणि पुढे त्या इंदिरा प्रियदर्शिनी नेहरू म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
ब्रिटनमधील त्यांच्या वास्तव्यादरम्यान, इंदिरा गांधी वारंवार त्यांचे भावी पती फिरोज गांधी यांना अनेकदा भेटत असत. त्यांना त्या अलाहाबादमधून ओळखत होत्या आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ते शिकत होते. त्यांचा विवाह अलाहाबाद येेेथे धर्म रितीरिवाजांनुसार पार पडला, जरी फिरोज हे गुजरातच्या पारशी कुटुंबातील होते. त्यांना राजीव गांधी आणि संजय गांधी ही दोन मुले होती.
इंदिरांचे आजोबा मोतीलाल नेहरू व्यवसायाने वकील आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आघाडीचे नेते होते. भारताच्या राजकारणात त्यांना मानाचे स्थान होते.  इंदिरा गांधींचे बालपण आपल्या घराच्या स्वातंत्र्यलढ्याच्या संस्कारांतच झाले. पुढे त्यांनी लहान मुलामुलींची वानरसेना चळवळ सुरू केली. निदर्शने, मोर्चे काढणे, बंदी घातलेल्या गोष्टींची वाहतूक करणे वगैरे गोष्टी ही सेना करीत असे.

१९५९ मध्ये इंदिरा गांधींनी निवडणुकीत भाग घेतला आणि त्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मृत्यूनंतर लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. यात इंदिराजीं यांनी माहिती व नभोवाणीमंत्री हे पद सांभाळले. १९६५ चे भारत-पाक युद्ध या दरम्यान त्या श्रीनगरच्या आसपास सुट्या व्यतीत करत होत्या. पाकिस्तानी सैन्य फार जवळ पोहोचले आहे असे संदेश भारतीय सैन्याकडून मिळूनही त्यांनी जम्मू अथवा दिल्ली येथे जाण्यास नकार दिला. अशा प्रकारच्या धाडसी कामांमुळे त्यांची लोकप्रिय छबी निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या.पाकचे आक्रमण परतून लावण्यात भारताला यश आले. १९६६ च्या जानेवारी महिन्यात तत्कालीन सोव्हियत संघात ताशकंद येथे पाकिस्तानचे आयुबखान आणि लालबहादुर शास्त्री यात शांति समझोता झाला. पण त्यानंतर काही तासातच त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पंतप्रधान पदासाठी स्पर्धाच सुरू झाली. मोरारजी देसाई यांनी आपला अर्ज भरला. पण तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष कामराज यांनी अंतर्गत राजकारणातून इंदिरा गांधींना पाठिंबा दिला. ३५५ विरुद्ध १६९ मतांनी विजय मिळवला. त्या भारताच्या पाचव्या पंतप्रधान आणि पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. पंतप्रधान म्हणून त्यांची कारकीर्द संस्मरणीय अशी ठरली. जुलै १९६९ मध्ये त्यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. सन १९६५ व १९७१ मध्ये भारत-पाक युद्ध, आणि त्यानंतर १९७५ मधील आणीबाणी असे अनेक प्रसंग त्यांच्या कारकिर्दीत घडल्या आहेत. धाडसी निर्णय घेण्यात त्या प्रसिद्ध होत्या. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी, इंदिरा गांधींचे दोन शीख अंगरक्षक, सतवंत सिंग आणि बेअंत सिंग यांनी सफदरजंग रोड, नवी दिल्ली येथील पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या बागेत कथितपणे ऑपरेशन ब्लू स्टारचा बदला म्हणून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या त्यात त्या जागेवरच मृत्युमुखी पडल्या. भारत देशाला प्रगतीपथावर नेणाऱ्या अश्या धाडसी आयर्न लेडीचा स्वतःच्या अंगरक्षकानीच विश्वासघात केला.

प्रियदर्शनी आयर्न लेडी श्रीमती इंदिरा गांधी यांना विनम्र अभिवादन ..... !


सौजन्य :- इंटरनेट
संकलन :- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

Sunday, 30 October 2022

प्रियदर्शनी इंदिरा गांधी ( Indira Gandhi )

           विनम्र अभिवादन ......!

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, आयर्न लेडी आणि धाडसी निर्णयामुळे 70 ते 80 च्या दशकात संपूर्ण जगात ज्यांच्या कार्याची ख्याती पसरले असे प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांची आजच्या दिवशी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानिमित्ताने माझ्या स्मरणात असलेली ही आठवण. 
31 ऑक्टोबर 1984 मी आठ वर्षाचा असेन आणि दुसरी किंवा तिसऱ्या वर्गात शिकत असतांना ही घटना घडली. पण मला आज ही आठवते त्यांचा अंतिम संस्कार सोहळा. 
भारताचे पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर त्यांच्याच अंगरक्षकाने गोळ्या झाडल्या आणि त्यात ते मृत्युमुखी पडल्याची बातमी रेडिओवर ऐकण्यात आली. आमच्या घरात रेडिओ ऐकण्याचे प्रमाण जरा जास्त होते. सकाळी सहा वाजल्याची आकाशवाणी सुरू झाल्याची धून, त्यानंतर वंदे मातरम, पहाटेची भक्तिगीते आणि सातच्या प्रादेशिक बातम्या याशिवाय माझी सकाळ कधी झालीच नाही. माझे बाबा सकाळी उठले की पहिले रेडिओ लावायचे आणि ऐकत बसायचे. त्यांना बातम्या ऐकायची खूप सवय होती आणि क्रिकेटचे समोलोचन ऐकण्याची आवड होती. लाईटवरील रेडिओ पेक्षा बॅटरी सेलवर चालणारा रेडिओ त्यांना आवडायचा कारण लाईटचा रेडिओ एकाच ठिकाणी लावून ठेवावे लागते तर बॅटरी सेलवरील रेडिओ कुठं ही नेता येतो. माझ्या आठवणीनुसार पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर गोळ्या झाडल्याची व ते त्यात निधन पावल्याची बातमी सर्वप्रथम आमच्या बाबांनीच ऐकली आणि ते सर्वाना सांगितले. हा हा म्हणता ही बातमी संपूर्ण गावात पसरली. अंत्यसंस्कार TV वर दाखविण्यात येणार असल्याची बातमी कळाली. त्याकाळी आमच्या गावात फक्त दोघांच्या घरी TV होते. आमच्या घरी TV नव्हते पण माझ्या शेजारच्या घरी TV होते ते ही ब्लॅक अँड व्हाईट. अंत्यसंस्कार सुरू होण्यापूर्वीच शेजारच्या घरात एकच गर्दी होऊ लागली. 
अंत्यसंस्कार सुरू झाले आणि इकडे TV वाल्याचे घर हाऊसफुल्ल होऊन गेले. आम्ही लहान मुले सर्वात पुढे, त्यानंतर महिला आणि त्यानंतर पुरुष असा जमाव त्या घरात बसला होता. तिथे पंखा नसल्याने सर्वजण घामाघूम झाले होते. पण सर्वांच्या नजरा त्या TV वर खिळून होते. इंदिरा गांधी यांच्या चेहऱ्याकडे पाहून अनेक महिला आपल्या डोळ्यांतून अश्रू गाळत होते, जणू काही ती त्यांच्या घरातील बाई लेक होती. गावातील अनेक लोकं मरण पावल्यावर त्यांना कोणी जाळत नव्हते तर जमिनीच्या स्वाधीन करत होते. फक्त मोठ्या लोकांनाच त्यांच्या मृत्यूनंतर जाळतात असा समज त्यावेळी बालमनाला वाटत होते. त्या अंत्यसंस्कारात त्या काळचा सुप्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन आणि इंदिराजीचे पुत्र राजीव गांधी यांना अग्नी देताना पहिल्यांदा पाहत होतो. तेवढ्या भाऊगर्दीत हे दोनच चेहरे ओळखीचे वाटत होते. त्यावेळी माझ्याही डोळ्यांत नकळत अश्रू येऊन गेले. इंदिरा गांधी ही भारतातील कोणीतरी महान व्यक्ती होती एवढंच त्यावेळी कळत होते. पण बालपणीच्या मनावर बिंबून गेलेलं ते अंत्यसंस्कार मी जीवनभर कधीही विसरू शकत नाही. 
आज श्रीमती इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन त्यानिमित्ताने विनम्र अभिवादन ......!

- नासा येवतीकर, धर्माबाद

आला थंडीचा महिना ( Hivala )

         आला थंडीचा महिना

पावसाळा संपला की हिवाळ्याला सुरुवात होते. दिवाळीच्या सणाला हिवाळ्याची चाहूल लागते. पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान करतांना जी थंडी वाजते ती सांगते की, चला हिवाळा महिना सुरू होत आहे. तसं पाहिलं तर हिवाळा हा सर्वांसाठी आल्हाददायक आणि आनंदी असते. दिवाळीच्या सुट्या संपल्यानंतर नुकतीच शाळा सुरू झालेली असते. अश्या या थंडीत बाल गोपाळाना सकाळी लवकर उठावे वाटत नाही. बघता बघता शाळेची वेळ होते. सकाळचं कोवळं ऊन खाताना वेळ कसा निघून गेला हेच कळत नाही. उन्हात गेलं की ऊन लागते आणि सावलीत बसलं की थंडी वाजते अशी अवस्था या महिन्यात अनुभवायला मिळते. तिकडे शेतकरी देखील आपल्या शेतात रब्बी पिकांची तयारी करतो. खरीप पिके घेऊन अनेक शेतकरी थंडी पडण्याची वाट पाहत असतात. सीमेवर देशाची सुरक्षा करणाऱ्या सैनिकांना डोळ्यांत तेल टाकून पहारा द्यावा लागतो कारण याच थंडीचा फायदा घेऊन शेजारील शत्रू आपल्या देशात घुसखोरी करण्याची शक्यता असते. राजकारणी लोकांना देखील हिवाळी अधिवेशनाची चाहूल लागलेली असते. नवीन लग्न झालेले जोडपे गुलाबी थंडीची मजा घेण्यास आतुरलेले असतात. सकाळी सकाळी योगासन करणारे तसेच मोकळ्या हवेत फिरायला जाणारे यांना हे हवामान खूप अनुकूल वाटते. सकाळचा गार वारा अंगावर घेत ही मंडळी थंडीचा खरा आनंद घेत असतात. याच महिन्यात सीताफळ, पेरू व बोरं यासारखी आंबट गोड फळांचा मोसम सुरू होतो. ही फळे खाल्याने सर्दी नि खोकला लागू शकते पण ही फळे खाल्ली तर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. त्यामुळे अति न खाता ही फळे प्रमाणात खावी लागते. एकूणच हा हिवाळा महिना लाभदायी, आरोग्यदायी आणि हितकारक वाटत असले तरी याच हिवाळ्यात अनेक आजार त्रास देत असतात. विशेष करून लहान मुलांना सर्दी, पडसे आणि खोकला यासारखे आजार लवकर होऊ शकतात. म्हणून या काळात लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी लागते. स्वेटर, हातमोजे व पायमोजेचा वापर करणे गरजेचे असते. तसेच थंड पदार्थ खाणे टाळणे आवश्यक असते. वयोवृद्ध लोकांचे अनेक जुने आजार याच काळात आपले डोके वर काढतात. आला थंडीचा महिना, शेकोटी पेटवून पेटवा, मला लागलाय खोकला ह्या गाण्याची महती याच काळात कळायला लागते. 

- नासा येवतीकर, स्तंभलेखक
कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

Thursday, 6 October 2022

Monday, 26 September 2022

Get-Together 2022

राजर्षी शाहू अध्यापक विद्यालयातील विद्यार्थ्यांचा

सिल्व्हर ज्युबली निमित्ताने गेट टूगेदर संपन्न
नांदेड :- वसंतनगर मुखेड येथील राजर्षी शाहू अध्यापक विद्यालयात ई. स. 1995 ते 1997 या वर्षात पदविका शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा गेट टूगेदर नांदेड येथील पद्मावती हॉटेलमध्ये रविवारी संपन्न झाले. 
गेल्या महिनाभरापासून व्हाट्सअप्प समूहाच्या माध्यमातून सिल्व्हर ज्युबली निमित्ताने रविवारी 25 तारखेला नांदेड येथील पद्मावती हॉटेलमध्ये गेट टूगेदर घेण्याचे निश्चित झाले होते. त्याच अनुषंगाने अहमदनगर, कळंब, उस्मानाबाद, लातूर, परभणी, कोल्हापूर असे वेगवेगळ्या जिल्ह्यात सध्या नोकरी करणारे सर्वजण एकत्र आले. 25 वर्षांनी वर्गातील मित्र-मैत्रिणी एकमेकांना भेटण्याचा योग मिळाल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होता. 36 मुले व 14 मुली अश्या एकूण 50 जण आजच्या गेट टूगेदर कार्यक्रमात सहभाग घेतला होता. 
राष्ट्रगीताने गेट टूगेदरच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर गेल्या 25 वर्षात ज्या मित्रांचे दुःखद निधन झाले अश्या माधव कुमदळे, जमदाडे, विनायक काकुळते, आणि लक्ष्मण मिरदोडे या दिवंगत मित्रांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
त्यानंतर एकमेकांच्या परिचयाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. गेल्या 25 वर्षात एकमेकांचे संपर्क तुटलेले, चेहरा ओळखीचा मात्र नाव आठवत नाही असे अनेक मित्र-मैत्रिणीचा या परिचयातून ओळख झाली. काहीजणांनी कॉलेजमधील गमतीजमती सांगून जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला. मुखेड ते वसंतनगर हा बसचा प्रवास कोणीही विसरू शकणार नाही असे एकाने सांगितले. सर्वांनी आपली कौटुंबिक माहिती आणि सध्या कार्यरत असलेल्या शाळेविषयी माहिती करून दिली. परिचय सत्र संपल्यावर सुरुची भोजनाचा आनंद घेण्यात आला. त्यानंतर काही मजेदार खेळ घेण्यात आले जसे की एका मिनिटात फुगे फुगवणे, बादलीत चेंडू टाकणे. कराओकेवर शिवाजी अन्नमवार, नासा येवतीकर, विजय भगत आणि रंजना जोशी यांनी सुंदर गाणे म्हटले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी श्याम दादजवार, गोविंद घोडके, कुलकर्णी आणि सौ. ललिता घंटाजीवार यांनी खूप परिश्रम घेतले. दोन वर्षानंतर पुन्हा भेटू या असे वचन घेऊन सदरील कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Wednesday, 14 September 2022

गौरव गाथा ( gourav Gatha kavita )

            *।। गौरव - गाथा ।।*


मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील कथा
स्वातंत्र्य सेनानीची ऐकू या गौरव गाथा

लढ्याचे नेतृत्व केले स्वामी रामानंद तीर्थ
मुक्तीसंग्राममुळे मिळाला जीवनाला अर्थ

लढ्यातील पहिले हुतात्मे खरे
असे हुतात्मा गोविंदराव पानसरे

मूर्ती लहान पण कीर्ती महान
साहेबराव बारडकरांचे काम छान

शेळके घराण्यातील दगडाबाई
राणी लक्ष्मीबाई सम केली लढाई

लोकांच्या मनात ज्यांनी केला जागर
वैजापूरचे भाऊराव पाटील मतसागर

भूमिगत बनून सर्वत्र फिरत राहिले पाय
डॉ. ताराबाई बनल्या सर्व अनाथांची माय

लोकांवर अत्याचार केला रझाकाराने
प्रत्येकजण पेटून उठला जनजागृतीने

निजामाविरोधी गावोगावी लढा झाला
अखेर मराठवाडा मुक्त झाला

- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

Tuesday, 13 September 2022

महात्मा गांधी ( Mahatma Gandhi )

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता - महात्मा गांधी


महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामतील प्रमुख नेते आणि तत्वज्ञ होते. त्यांनी देशहितासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला. स्वातंत्र्य चळवळीतील ते असे नेते होते ज्यांनी अहिंसेचा मार्ग अवलंबून ब्रिटीश राज्यकर्त्यांना सळो की पळो करून सोडले होते. 
महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणूनही संबोधले जाते. मार्टिन ल्यूथर किंग आणि नेल्सन मंडेला यांच्यावरही त्यांच्या सत्य आणि अहिंसेच्या विचारसरणीचा खूप प्रभाव होता. 
महात्मा गांधींनी आफ्रिकेत सलग २१ वर्षे अन्याय आणि वर्णद्वेषाविरुद्ध अहिंसक लढा दिला, ज्याची किंमत केवळ आफ्रिकेतच नव्हे तर भारतातही ब्रिटिशांना भोगावी लागली. रवींद्रनाथ टागोर यांनी बापूना सर्वप्रथम “महात्मा” ही उपाधी दिली होती. तर सन १९४४ साली सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधी यांना “राष्ट्रपिता” म्हणून पहिल्यांदा संबोधले होते.

महात्मा गांधी यांचे बालपण आणि प्रारंभिक जीवन 
मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी पश्चिम भारतातील सध्याच्या गुजरातमधील पोरबंदर शहरामध्ये झाला. त्यांचे वडील करमचंद गांधी हे सनातन धर्मातील पानसारी जातीचे होते. ब्रिटिश राजवटीत ते काठियावाडच्या एका छोट्या संस्थानाचे (पोरबंदर) दिवाण होते. आई पुतळीबाई या धार्मिक स्त्री होत्या.  त्या सतत उपवास करीत असत. त्यांनी महात्मा गांधी यांच्यावर बालवयात केलेल्या धार्मिक संस्कारांचा प्रभाव त्यांच्या पुढील जीवनात दिसून येतो. मोहनदास यांच्या मनावर त्यांच्या बालपणीच अहिंसा, शाकाहार, सहिष्णुता, व प्राणिमात्रांवर दया करणे या सारखे अनेक संस्कार त्याच्या आईकडून गिरवण्यात आले होते.

गांधीजी यांच्या लहानपणी त्यांच्या आई पुतळाबाई त्यांना जैन संकल्प आणि त्यांच्या प्रथांबद्दल माहिती सांगत असत. यामुळे लहानपणापासून त्यांना उपवास करण्याची ओढ लागली होती. जैन धर्मातील संकल्प आणि प्रथांचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव पडला.

महात्मा गांधी स्वत: कबूल करतात की, पौराणिक कथा श्रावणबाळ आणि राजा हरीश्चंद्र या दोन कथांचा त्यांच्या जीवनावर खूप प्रभाव पडला. महात्मा गांधी यांचा विवाह मे १८८३ मध्ये वयाच्या १३व्या वर्षी कस्तुरबा माखनजी यांच्याशी झाला. महात्मा गांधीजी त्याांना बा असे म्हणत. त्यांना एकूण चार मुले होती.


महात्मा गांधी यांनी शिक्षणा करिता केलेला प्रवास –
महात्मा गांधी यांची लहानपणापासून डॉक्टर बनण्याची इच्छा होती, परंतु त्यांच्या वडिलांची त्यांना सरकारी नोकरीत दाखल करण्याची इच्छा होती. ई.स. १९८८ साली आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते उच्च शिक्षणाकरिता इंग्लंडला गेले. उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेल्यानंतर त्यांनी इनर टेंपल या गावी राहून भारतीय कायदा आणि न्यायशास्त्राचा अभ्यास केला.
लंडन विद्यापीठामधून आपले वकिलीचे शिक्षण पूर्ण केले.  इंग्लंडमध्ये गेल्यानंतर त्यांना तेथील रीतीरिवाज समजून घेण्यात त्यांचा काही वेळ गेला. इंग्लंडमध्ये सर्व मांसाहारी पदार्थ मिळत असल्याने, त्यांना शाकाहारी पदार्थ मिळेपर्यंत उपाशी राहावं लागतं असे. आईला दिलेल्या वचनाशी कटीबद्ध असल्याने त्यांनी त्या ठिकाणी मांसाहार,मद्यपान करणे वर्ज्य केले. त्याठिकाणी त्यांनी शाकाहारी माणसे शोधली आणि त्यांची एक संघटना स्थापन केली आणि स्वत: ते त्या संघटनेचे अध्यक्ष बनले.
गांधीजी लंडन मध्ये ज्या शाकाहारी लोकांना भेटले होते, त्यातील काही लोक ही ‘थीयोसोफिकल सोसायटी’ चे सदस्य देखील होते. गांधीजीनी त्याठिकाणी राहून तेथील चालीरीती शिकण्याचा प्रयत्न केला. इंग्लंड मध्ये वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर बॅरिस्टर बनून सन १८९१ साली ते भारतात आले व येथे आल्यानंतर ते वकिली करू लागले. ज्यावेळी त्यांनी वकिली करण्यास सुरुवात केली होती, त्यावेळी त्यांना न्यायादिशा समोर एखादा मुद्दा मांडणे देखील अजिबात जमत नव्हतं. आपल्या लाजाळू वृत्तीच्या स्वभावामुळे ते कोर्टात फार बोलत नसत.


महात्मा गांधी यांचा दक्षिण आफ्रिकेतील प्रवास (१८९३-१९१४) –

सन १८९३ साली वयाच्या २४ व्या वर्षी महात्मा गांधी हे भारतीय व्यावसायिकांचे न्यायालयीन सल्लागार म्हणून दक्षिण आफ्रिकेला गेले होते. दक्षिण आफ्रिका ही एक इंग्रजांची वसाहत होती. त्याठिकाणी त्यांनी आपल्या आयुष्याची २१ वर्षे घालविली. त्याठिकाणी गांधीनी आपले राजकीय दृष्टीकोन, नैतिक आणि राजकीय नेतृत्व कौशल्ययाचे बारकाईने धडे गिरविले.
महात्मा गांधी यांना दक्षिण आफ्रिकेमध्ये राहत असतांना समाजात अस्तित्वात असलेल्या विकलांगपणाची जाणीव झाली. भारतीय संस्कृती आणि धर्म यामध्ये असणाऱ्या गुंतागुंतीच्या समस्येपासून आपण भरपूर दूर आहोत याची जाणीव त्यांना झाल्यानंतर त्यांनी तेथे राहून भारतीय लोकांचे प्रश्न सोडविण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेत उद्योग, व्यवसाय आणि इतर कामधंद्यासाठी त्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या भारतीय लोकांचे प्रश्न समजून घेवून त्यांचे निराकरण करण्याचा गांधीनी प्रयत्न केला. त्यांची अशी धारणा होती की, असं केल्याने आपण भारत देशाला समजून  घेऊ.
दक्षिण आफ्रिकेत गांधीजींना गंभीरपणे वांशिक वर्ण भेदाचा सामना करावा लागला. त्याठिकाणी भारतीय लोकांना देण्यात येणारी अपमान जनक वागणूक त्यांनी अनुभवली.
एके दिवशी महात्मा गांधी रेल्वेचा प्रवास करीत असतांना त्यांच्याजवळ पहिल्या वर्गाचे तिकीट असतांना सुद्धा त्यांना ‘पीटर मारित्झबर्ग’ येथील रेल्वे स्थानकावर एका रेल्वे अधिकाऱ्याने खाली उतरवून तिसऱ्या वर्गाच्या डब्यात बसण्यास सांगितले.
गांधीजीनी त्यांना नकार देताच त्या अधिकाऱ्याने गांधीजींना गाडी बाहेर ढकलून दिले गांधीजी खाली पडले. त्या दिवशी त्यांनी संपूर्ण रात्र फलाटावर काढली होती.
बापूंच्या मनात आलं असत तर ते त्या इंग्रज अधिकाऱ्याला धडा शिकवू शकले असते परंतु, सुडाच्या भावनेतून कोणाला शिक्षा करणे असा त्यांचा कधीच हेतू नव्हता. गांधी अहिंसावादी असल्याने केवळ अन्यायकारक व्यवस्था बदलणे हाच त्यांचा मुख्य उद्देश होता. दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधीना अनेक कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. शिवाय त्यांना त्याठिकाणी समाजात असणाऱ्या समस्याचा देखील अनुभव आला. उदाहरणार्थ, प्रवाशांना वाट काढून न दिल्यामुळे महात्मा गांधी यांना मार देण्यात आला होता.
हॉटेल मध्ये वास्तव्यास असतांना त्यांना बाहेर काढून देण्यात आलं होत. याशिवाय, महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतील ‘डर्बन’ या शहरात वकिली करीत असतांना त्यांना न्यायाधीशांनी डोक्यावरील टोपी काढून ठेवण्याचा आदेश दिला होता. परंतु, त्यांनी न्यायाधीशाचा आदेश अमान्य केला. अश्या प्रकारचे अनेक अनुभव घेतल्यानंतर गांधीजीनी एक सामाजिक नागरिक म्हणून ब्रिटीश राज्यातील आपल्या लोकांच्या समस्या विषयी प्रश्न मांडण्यास सुरुवात केली.
भारतीय लोकांवर होणारे अत्याचार आणि आपलं सामाजिक स्थान निर्माण करण्याचा विचार त्यांच्या मनात येऊ लागला. सन १९०६ साली ब्रिटीश सरकारने दक्षिण आफ्रिकेत वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांचा मतदानाचा हक्क काढून घेणारा कायदा लागू केला होता. त्यावेळी गांधीजीनी आफ्रिकेतील भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी आपलं तेथील मुक्काम वाढवलं, आणि भारतीय नागरिकांना राजकीय व सामाजिक हक्कांसाठी संघर्ष करण्याची प्रेरणा दिली.
तसेच, दक्षिण आफ्रिकेच्या ब्रिटीश सरकारकडे भारतीय लोकांच्या नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला. यावेळेस त्यांनी आपल्या अहिंसेच्या सत्याग्रहाचा पहिला प्रयोग केला होता. सन १८९४ साली त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील वेगवेगळ्या समाजात विखरलेल्या भारतीय नागरिकांना एकत्रित करून ‘नाताळ भारतीय कॉन्ग्रेस ‘ नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला.

गांधीजी भारतात परतले 
इ.स. १९१५ मध्ये गांधीजी कायम स्वरूपी भारतात परत आले. एक प्रमुख भारतीय राष्ट्रवादी, थिओरिस्ट आणि संघटक अशी त्यांची आंतरराष्ट्रीय ख्याती होती. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अनेक संमेलनांतून बोलले. खऱ्या अर्थी भारताचे राजकारण व समस्या यांचा परिचय त्यांना गोपाळ कृष्ण गोखले यांनी करून दिला.
गोपाळ कृष्ण गोखले हे तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रमुख नेते होते. गोखले त्यांच्या संयम, संतुलन आणि व्यवस्थेच्या आतमध्ये राहून काम करण्याच्या आग्रहाबद्दल ओळखले जात. ते गांधीजींचे राजकीय गुरू म्हणून ओळखले जातात.
गांधीनी गोखल्यांचा ब्रिटिशांच्या व्हीगीश परंपरांवर आधारित उदार दृष्टिकोन अनुसरला, आणि तो पूर्णपणे भारतीय दिसण्यासाठी बदलला. १९२० मध्ये काँग्रेस नेते बाळ गंगाधर टिळक यांच्या निधनानंतर गांधीजी काँग्रेसचे प्रमुख नेते बनले.

महात्मा गांधींचे कार्य
गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले आणि नंतर आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी पावले उचलली. गांधीजींचे संपूर्ण जीवन एका चळवळीसारखे होते. गांधीजींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक चळवळी सुरू केल्या.
गांधीनी काही चळवळी संपूर्ण देशात चालवल्या आणि त्या खूप यशस्वी झाल्य. या मुळे संपूर्ण देशात लोक त्यांना ओळखू लागले. गांधीजींनी चालवलेल्या चळवळी थोडक्यात जाणून घेऊयात.


चंपारण्य सत्याग्रह (१९१७)
बिहारमधील चंपारण्य येथील युरोपीय निळीच्या मळेवाल्यांकडून तीन काथिया पद्धतीमार्फत गरीब शेतकऱ्यांवर अत्याचार होत असे. चंपारण, बिहारमधील जमीनदार, जे प्रामुख्याने ब्रिटिश होते, स्थानिक शेतकऱ्यांना सक्तीने नीळ उत्पादन करावयास लावत असत. त्यांना योग्य मोबदला पण मिळत नसे. यामुळे ते सतत गरिबीत राहत. शेतकऱ्यांची गावे अत्यंत घाणेरडी आणि आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठेवली जात. यावर भर म्हणजे तेथील दुष्काळ, पण इंग्रजानी तरीही अनेक जाचक कर लादले होते आणि ते वाढतच होते.
यावर गांधीजींनी अहिंसक चळवळ सुरू केली. हा सत्याग्रह ब्रिटिश जमीनदाराच्या विरोधात सुरू करण्यात आला होता. गांधीजी यशस्वी झाले आणि इंग्रजांना त्यांचे पालन करावे लागले. अहिंसा व असहकार चळवळीतला गांधीजींच्या जीवनातील हा पहिला विजय होता.

खेडा सत्याग्रह
सन १९१८ साली गुजरात मधील खेडा या गावी सतत पडलेल्या पावसामुळे दुष्काळग्रस्त झालं  होत. तेथील पिकांची अवस्था खूपच वाईट होती. अशी परिस्थिती असतांना सुद्धा इंग्रज सरकार  शेतकऱ्यांकडून सक्तीने शेतसारा वासूल करीत असतं. परिणामी तेथिल शेतकऱ्यांची परिस्थिती खूप वाईट बनली. महात्मा गांधी यांनी त्याठिकाणी एका आश्रम उभारला आणि आपल्या लहान मोठ्या सर्व अनुयायांना एकत्रित केलं.

गावातील सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना आपल्या विश्वासात घेतले. शेतकऱ्यांना गांधीजीनी शेतसारा न भरण्याचा आदेश दिला, तेव्हा  सन १९१८ साली शेतकऱ्यांनी शेतसारा बंदीची चळवळ सुरु केली आणि महात्मा गांधी यांना त्या चळवळीचे अध्यक्ष बनवले. गांधीजींच्या नेतृत्वाखाली सरदार पटेल यांनी शेतकऱ्यांच्या समस्येसंबंधी इंग्रज सरकारसोबत चर्चा केली. ब्रिटीश सरकारने त्यांची मागणी मान्य करून सर्व कैद्यांची सुटका केली. अश्या प्रकारे महात्मा गांधी यांची प्रसिद्धी संपूर्ण जगभर पसरली.
अहमदाबाद येथील कामगार लढा –
सन १९१४ साली झालेल्या पहिल्या युद्धानंतर देशात खूप महागाई वाढली होती. अहमदाबाद येथील कामगारांनी वेतनवाढी करीता गिरणी मालकांकडे विनंती केली. परंतु, त्याची मागणी मान्य करण्यात आली नाही.
गांधीजीनी त्या ठिकाणी स्वत: जावून संप पुकारला व उपोषणाला बसले. कामगार देखील गांधीजींसोबत उपोषणाला बसले. गांधीजींच्या अहिंसावादी आंदोलना समोर गिरणी मालकांनी हार पत्करली व कामगारांना वेतनवाढ दिली.


रौलट अक्ट (१९१९)
भारतातील राष्ट्रीय आंदोलन व क्रांतिकारी चळवळीला प्रतिबंध घालण्याकरिता ब्रिटिश शासनाला नवीन कायद्याची आवश्यकता भासत होती. या कायद्याचा अहवाल तयार करण्याकरिता शासनाने सर सिडने रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली.
या समितीने तयार केलेला अहवाल एप्रिल १९१८ मध्ये अनारकिकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राइम अॅक्ट पास केला. या कायद्यातील तरतुदींनुसार कोणत्याही व्यक्तीला विनाचौकशी अटक करण्याचा अधिकार शासनास मिळणार होता. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची तीन न्यायधीशांच्या चौकशी मंडळापुढे चौकशी करून शिक्षा करण्याचा अधिकार शासनास मिळाला होता.
गांधीजींनी १९१९ मध्ये रौलेट कायद्याच्या निषेधार्थ सभा घेतली. ६ एप्रिल १९१९ हा संपूर्ण भारतभर सत्याग्रहाचा दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. या दिवशी हरताळ, उपवास, निषेध मिरवणुकी आणि निषेध सभा असा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
६ एप्रिल १९१९ रोजी हा सत्याग्रहाचा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. हा काँग्रेस मार्फत पाळण्यात आलेला अखिल भारतीय बंद होता.


 जालियनवाला बाग हत्याकांड (१९१९)
सरकारने स्थानिक नेते डॉ. सफुद्दीन किचलू व सत्यपाल या दोन नेत्यांना अटक केल्यामुळे पंजाबमधील अमृतसर शहरात एक निषेध सभा बोलावण्यात आली. लोकांमधील असंतोष लक्षात घेऊन सरकारने जमावबंदी व सभाबंदी आदेश लागू केला, परंतु सरकारी आदेशाला न जुमानता स्थानिक लोकांनी १३ एप्रिल १९१९ रोजी जालियनवाला बागेत निषेध सभा बोलाविली.
या सभेला मोठय़ा संख्येने लोक जमले. सरकारच्या आदेशाविरूद्ध इतक्या मोठय़ा संख्येने लोक एकत्र आल्याचे पाहिल्यावर तेथे बंदोबस्तासाठी उपस्थित असलेला जनरल डायर हा इंग्रज अधिकारी संतप्त झाला. त्याने नि:शस्त्र लोकांना चहूबाजूंनी घेरले आणि जमावाला कोणतीही पूर्वसूचना न देता गोळीबार करण्याचा आदेश आपल्या सैनिकांना दिला.
या घटनेच्या निषेधार्थ गांधीजींनी कैसर-ए-हिंद या पदवीचा त्याग केला.  


खिलाफत चळवळ (१९२०)
जगभराचे मुस्लिम लोक तुर्कस्थानच्या खलिफाला आपला धर्मगुरु मानत असत. भारतीय मुस्लिम जनतेची निष्ठा तुर्कस्थानच्या खलिफासोबत निगडित होती. तुर्कस्थानच्या खलिफाने पहिल्या महायुद्धाच्या काळात जर्मनीच्या बाजूने युद्धात प्रवेश केला.
युद्धाच्या समाप्ती नंतर तुर्कस्थानच्या खलिफाच्या सत्तेला कोणताही धोका पोहोचणार नाही, असे आश्वासन ब्रिटिश शासनाने भारतातील मुस्लिम नेत्यांना दिले होते. या आश्वासनास प्रमाण मानून भारतीय मुस्लिमांनी ब्रिटिशांनी युद्धात मदत केली होती. युद्ध समाप्ती नंतर ब्रिटिश शासन तुर्कस्थानची सत्ता नष्ट करून खलिफाची गादी नष्ट करणार अशी बातमी सर्वत्र पसरली होती.
तेव्हा भारतीय मुस्लिम नेत्यांनी तुर्कस्थानच्या खलिफाची सत्ता टिकविण्याकरिता व धर्मक्षेत्राचे रक्षण करण्याकरिता ब्रिटिश शासनाविरूद्ध चळवळ करण्याचा निर्णय घेतला. ही चळवळ खिलाफत चळवळ म्हणून ओळखली जाते.
हिंदू- मुस्लीम यांच्या ऐक्यावर आधारीत  राष्ट्रीय चळवळ सुरु केली तर, इंग्रज सरकार नक्कीच वठणीवर येईल अशी गांधीजीना वाटू लागले. त्यामुळे खिलाफतचा प्रश्न सोडविण्याकरिता राष्ट्रीय काँग्रेसमधील महात्मा गांधीजी, लोकमान्य टिळक, डॉ. राजेंद्र प्रसाद आदी नेत्यांनी या चळवळीस पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. या चळवळीची विशेषता म्हणजे या चळवळीत  हिंदू-मुस्लीम यांचे ऐक्य दिसून आलं होत.


असहकार चळवळ (१९२०)
महात्मा गांधी हे अहिंसेचे पुजारी असल्याने इंग्रजांविरुद्ध त्यांनी असहकार, अहिंसा आणि शांततामय विरोध हे तीन शास्त्र वापरले. सन १९१९ साली पंजाबमधील जालियानवाला बाग हत्याकांड प्रकरणामुळे देशातील लोकांच्या मनात इंग्रज सरकार बद्दल क्रोधाचा भडका उडाला. देशात जागोजागी मोर्चे निघू लगले, ते मोर्चे दडपून काढण्यासाठी इंग्रज सरकारला खूप दमछाक करावी लागली.
महात्मा गांधी यांनी जालियानवाला बाग हत्याकांडा प्रकरणी इंग्रज सरकारचा निषेध केला. सहकार चळवळ सुरु करण्यामागे महात्मा गांधी यांचा असा हेतू होता की, भारतातील ब्रिटीशांचे राज्य हे केवळ भारतातील लोकांच्या सहकार्यावर अबलंबून आहे. जर भारतीयांनी त्यांना विरोध केला तर त्यांचे शासन पूर्णपणे ढासळून जाईल. या हेतूने त्यांनी जनतेला आपल्या असहकार आंदोलनात सहभागी होण्यास सांगितले.
सन १९२० साली लोकमान्य टिळकांच्या मृत्यू नंतर राष्ट्रीय सभेचे सभेचे संपूर्ण नेतृत्व महात्मा गांधी यांच्याकडे आले. सन १९२० साली नागपुर येथे झालेल्या राष्ट्रीय सभेत चित्तरंजन दास यांनी मांडलेल्या असहकार चळवळीच्या ठरवला मान्यता सभेच्या अध्यक्ष पदी विराजमान असणारे चक्रवर्ती विजयराघवाचार्य यांनी दिली. चळवळीचे नेतृत्व महात्मा गांधी यांच्याकडे देण्यात आलं होत.
असहकार चळवळी नुसार, देशातील नागरिकांनी शासकीय कार्यालये, न्यायालये, परदेशी वस्तू, सरकारी शाळा, महाविद्यालये यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता.असे केल्याने इंग्रज सरकार आपल्याला स्वातंत्र्य देण्याबाबत काही पाऊले उचलतील असे राष्ट्रीय सभेच्या सदस्यांना वाटत होत. परंतु, गांधीजींचे हे आंदोलन फार काळ टिकू शकले नाही.


चौरीचौरा दुर्घटना (उत्तर प्रदेश, १९२२)
डिसेंबर १९२१ मध्ये अहमदाबाद येथे राष्ट्रसभेचे अधिवेशन झाले. हजारो कार्यकर्ते तुरूंगात असतानाही असहकार चळवळ जोमाने चालू ठेवण्याचा निर्णय या अधिवेशनात घेण्यात आला.५ फेब्रुवारी १९२२ साली उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपुर जिल्हाच्या चौरीचौरा भागात एका शांततापूर्ण चाललेल्या मिरवणुकीवर पोलीसांनी गोळीबार केला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारामुळे असहकार चळवळीत सहभागी नागरिक खूप चिडले, त्यांनी प्रतिउत्तर म्हणून तेथील एक पोलीस चौकी जाळून टाकली. या जाळपोळीत एक पोलीस अधिकारी व २२ पोलीस ठार झाले.
या घटनेची माहिती गांधीजीना समजली तेव्हा त्यांना खुप वाईट वाटलं, ते एकदम अस्वस्थ झाले. त्यांना वाटलं लोकांनी असे करायला नाही पाहिजे होत. अहिंसेच्या मार्गावर चालतांना असे प्रसंग उद्भवतातच.
गांधीना वाटू लागलं की, आपण असहकार आंदोलन सुरु करून लोकांना अहिंसेच्या मार्गावर चालायला लावलं परंतु, अहिंसेच्या मार्गावर चालणे इतक सोप नाही.
तसे करणे सर्वांनाच शक्य होणार नाही, म्हणून महात्मा गांधी यांनी आपली असहकार चळवळ मागे घेतली. चौरीचौरा घटना प्रकरणी महात्मा गांधी यांना मार्च १९२२ साली कैद करण्यात आलं.
तसेच, गांधीजीनी सुरु केलेल्या “यंग इंडिया” नावाच्या साप्ताहिक पत्रिकेत त्यांनी स्वत: तीन राष्ट्रद्रोही लेख लिहिली आहेत अश्या प्रकारचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला.
त्यामुळे त्यांना सहा महिने तुरुंगवास भोगावा लागला होता. गांधीजी कैदेत असतांना त्यांची तब्येत खराब झाली, त्या कारणास्तव त्यांची सन १९२४ सली तुरुंगातून सुटका करण्यात आली.


तुरुंगातून सुटका झाल्यानंतर गांधींचे कार्य
सन १९२४ साली आजारामुळे महात्मा गांधी यांची सुटका झाल्यानंतर गांधीजी सन १९२८ सालापर्यंत राजकारणापासून दूर राहिले. या काळादरम्यान त्यांनी स्वराज्य पक्षातील सदस्य आणि भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेस मधील सदस्य यांच्यातील मतभेद दूर करण्यावर भर दिला. तसचं, समाजातील अस्पृश्यता, दारू समस्या आणि देशातील गरिबी कमी करण्यासाठी त्यांनी  आपले प्रयत्न सुरु ठेवले. सन १९२८ साली महात्मा गांधी राजकरणात पुन्हा सक्रीय झाले.
महात्मा गांधी राजकारणापासून दूर असतांना सन १९२७ साली ब्रिटीश सरकारने संविधानात सुधारणा करण्यासठी ‘सर जॉन सायमन’ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती भारतात पाठवली होती. ब्रिटीश शासनाच्या या समितीत एकही भारतीय नागरिक नसल्याने भारतीय पक्षांनी त्या कमिशनवर बहिष्कार टाकला.
सन १९२८ साली कलकत्ता मध्ये झालेल्या भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेस च्या सभेत एक ठराव पास करण्यात आला. या ठरावानुसार, ब्रिटीश सरकारने भारताला सार्वभौम देशाचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली. तसेच, सरकारने राष्ट्रीय सभेची ही मागणी मान्य न केल्यास, देशाच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही पुन्हा असहकार चळवळ सुरु करू असा संदेश सरकारला देण्यात आला

मिठाचा सत्याग्रह (१९३०) | दांडी यात्रा

महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यादरम्यान, झालेला मिठाचा सत्याग्रह हा, भारतातील तत्कालीन ब्रिटिश शासनाने मिठासारख्या जीवनावश्यक गोष्टीवर लावलेल्या कराच्या विरोधात इ.स. १९३० साली घडलेला सत्याग्रह होता. यालाच दांडी सत्याग्रह असेही म्हणतात.

१४ फेब्रुवारी १९३० रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जनतेला गांधीजींच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग करण्याचा आदेश दिला. मिठाचा सत्याग्रह याच चळवळीचा भाग होता.

मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात दांडी यात्रेने झाली. ही दांडी यात्रा (मोर्चा) साबरमती आश्रमापासून १२ मार्च १९३० रोजी सुरू झाली. गांधीजींच्या बरोबर त्यांचे ७८ निवडक अनुयायी होते. त्यात सरोजिनी नायडू, इला भट यांचा समावेश होता. यात्रा पुढे निघाली, तसतशी सहभागी लोकांची गर्दी वाढतच गेली. ही यात्रा २४ दिवस चालली आणि तिच्यातील लोक ३८५ कि.मी. पर्यंत पायी चालले. यात्रा दांडी येथे समुद्रकिनारी ६ एप्रिल १९३०ला पोहोचली. त्या दिवशी जेव्हा सकाळी साडे सहा वाजता गांधीजींनी चिमूटभर मीठ उचलून कायदेभंग केला, तेव्हा कायदेभंगाच्या मोठ्या प्रमाणावरील चळवळीची ती सुरुवातच ठरली. दांडीनंतर गांधीजी मीठ बनवत आणि सभांमध्ये भाषणे करत ते समुद्र किनाऱ्याने दक्षिणेकडे जात राहिले. दांडीच्या दक्षिणेला २५ मैलांवर असलेल्या धारासणा या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह करण्याचे काँग्रेस पक्षाने ठरवले. पण त्यापूर्वीच ४-५ मे १९३० दरम्यानच्या रात्री गांधीजींना अटक करण्यात आली.दांडी यात्रा आणि धारासणा येथील सत्याग्रह यामुळे सर्व जगाचे लक्ष भारतीय स्वातंत्र्यलढ्याकडे वेधले गेले. मिठाचा सत्याग्रह म्हणजे असहकार चळवळीचा एक भाग होता. प्रत्यक्षात मिठावरचा कर हे केवळ निमित्त होते. गांधींना त्या मिषाने लोकसंघटन आणि लोकजागृती साधायची होती. मिठावरील कराच्या विरोधातील हे आंदोलन पुढे वर्षभर सुरू राहिले. गांधीजींची तुरुंगातून सुटका आणि लॉर्ड आयर्विन यांच्याशी दुसऱ्या गोलमेज परिषदेतील चर्चा झाल्यावर हे आंदोलन थांबले. मिठाच्या सत्याग्रहाच्या आंदोलनाच्या दरम्यान ६०,०००हून अधिक भारतीय तुरुंगात गेले.

दांडी यात्रेच्या सत्याग्रहाबद्दल ग.दि. माडगुळकरांनी एक अजरामर कविता लिहिली आहे, तिची सुरुवात अशी आहे :

" उचललेस तू मीठ मूठभर साम्राज्याचा खचला पाया "


हरिजन चळवळ (१९३३)
गांधींनी अस्पृश्यांचे जीवन सुधारण्यासाठी मोहीम राबवली. गांधीजींनी या अस्पृश्यांना हरिजन असे नाव दिले ज्यांना ते देवाची मुले मानत.
८ मे १९३३ रोजी गांधीजींनी हरिजन चळवळीला मदत करण्यासाठी २१ दिवसांचे आत्मशुद्धीचे उपोषण केले.


दुसरे महायुद्ध आणि भारत छोडो आंदोलन (१९३९)
१९३९ मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा नाझी जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले. सुरुवातीला गांधीजींनी ब्रिटीशांच्या प्रयत्नांना अहिंसक नैतिक पाठबळ दिले.
इतर काँग्रेस नेत्यांनी लोकप्रतिनिधींचा सल्ला न घेता युद्धात एकतर्फी सहभाग घेण्यास विरोध केला. काँग्रेसच्या सर्व निवडक सदस्यांनी एकत्रितपणे आपल्या पदांचा राजीनामा दिला.
दीर्घ चर्चेनंतर, गांधींनी घोषित केले की भारताला स्वातंत्र्य नाकारले असताना भारत कोणत्याही युद्धाचा भाग होणार नाही. जसजसे युद्ध वाढत गेले, तसतसे गांधींनी ब्रिटिशांना भारत छोडो आंदोलन नावाचे विधेयक देऊन स्वातंत्र्याची मागणी तीव्र केली.
अशाप्रकारे, गांधीजींनी त्यांच्या हयातीत सुरू केलेल्या सर्व चळवळींनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला पाठिंबा दिला.


महात्मा गांधी यांचे वय आणि मृत्यू
३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसेनी महात्मा गांधींची हत्या केली होती. त्यांना 3 गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्याच्या तोंडातून शेवटचे शब्द बाहेर पडले ते म्हणजे ‘हे राम’. 
गांधींच्या मृत्यूनंतर त्यांची समाधी दिल्लीतील राजघाट येथे बांधण्यात आली. वयाच्या ७९व्या वर्षी महात्मा गांधींनी तमाम देशवासीयांचा निरोप घेतला.


महात्मा गांधी पुस्तके
महात्मा गांधी एक उत्तम लेखक सुद्धा होते. त्यांनी आपल्या जीवनावर आणि इतर महत्वपूर्ण विषयांवर पुस्तके लिहिली.
सत्याचे प्रयोग – आत्मकथा
माझ्या स्वप्नातील भारत
हिंद स्वराज
आरोग्याची गुरुकिल्ली
भगवद्गीता गांधींच्या मते

गौरव - गाथा ( Gourav - Gatha )

मा. सौ. वर्षा ठाकूर घुगे मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्या संकल्पनेतील, माध्यमिक शिक्षणाधिकारी मा. श्री प्रशांत दिग्रसकर आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी मा. सौ. सविता बिरगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेला अभिनव उपक्रम

गौरव गाथा - मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांची

नमस्कार, 
गौरव-गाथा उपक्रमात आपले हार्दिक स्वागत आहे. 

गौरव गाथा मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील थोर स्वातंत्र्य सैनिकांची

भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. परंतू त्यानंतरही मराठवाडा हैद्राबाद येथील निजाम संस्थानाच्या राजवटीखाली होते. देशात त्यावेळी अस्तित्वात असलेली संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली होती. मात्र हैद्राबाद, काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. स्वातंत्र्यापूर्वीपासून मराठवाडा प्रदीर्घ काळ निजामाच्या हैद्राबाद राज्याचा भाग होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनेच हा हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढला गेला.
हैद्राबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान याचे राज्य होते. निझामाच्या राजवटीची पाठराखण करणाऱ्या रझाकार संघटनेने ही चळवळ दडपून टाकण्यासाठी हिंसक मार्ग अवलंबला होता तेव्हा त्याला उत्तर देण्यासाठी सशस्त्र लढा उभारण्यात आला. निजामांच्या या अत्याचारातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता. तेव्हा मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात लढा उभारण्यात आला होता.
हैद्राबाद संस्थानामध्ये मराठवाडा, तेलंगणा आणि कर्नाटकचा काही भाग सामील होता. हैद्राबाद संस्थानातून भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी मुक्तीसंग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर अनेक अत्याचार सुरु केले. या अत्याचारास प्रत्युत्तर देण्यासाठी दुसऱ्या बाजूला मुक्ती संग्राम लढा अधिक गती घेत होता. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात अनंत भालेराव, गोविंदभाई श्रॉफ, विजयेंद्र काबरा, दिंगबरराव बिंदू, रवीनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, बाबासाहेब परांजपे आदी नेत्यांनी या लढ्यात महत्वाचे कार्य केले.
आपल्या जीवाची पर्वा न करता मराठवाड्याच्या गावागावातून हा संग्राम लढण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिक पुढे आले. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील जरुळ गावातील भाऊराव भिमाजी मतसागर यांनी हैद्राबाद मुक्तिसंग्रामात त्यांचे तसेच सर्व कुटुंबाचे योगदान व उचललेले कष्ट विशेष उल्लेखनिय होय. बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर येथील दगडाबाई शेळके, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्रजी जाधव, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार, विनायकराव चारठाणकर, विश्वनाथराव कातनेश्वरकर, नांदेड येथील देवरावजी कवळे, जीवनराव बोधनकर, मराठवाड्यात निजामाच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, नळदूर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील होटी गावचे जनार्दन होर्टीकर गुरुजी, तर हिंगोली जिल्ह्यातील चंद्रकांत पाटील गोरेगावकर, दीपाजी पाटील दातीकर, बर्हिजी शिंदे वापटीकर, बापुराव शिंदे वापटीकर, भीमराव उर्फ बाबासाहेब शेषराव नायक सवनेकर, वासुदेवराव बसोले, बाबुलाल माणिकचंद राठौर आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून स्वातंत्र्य संग्राम तेजस्वीपणे लढला गेला. 

वरील माहिती इंटरनेटवरून घेण्यात आले. 
धन्यवाद .......! 
• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • •

नमस्कार, 
गौरव गाथा मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांची यात आज आपण श्री गोविंदभाई श्रॉफ यांची माहिती पाहू या. 
गोविंदभाई श्रॉफ  हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते. हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीत स्वामी रामानंद तीर्थ यांचे ते एक प्रमुख समर्थक म्हणून गणले जात. भारतीय स्वातंत्र्यलढ्या बरोबरच त्यांनी मराठवाड्यातील व आंध्रातील शिक्षण क्षेत्रातही मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांचा जन्म विजापूर (कर्नाटक राज्य ) येथे 24 जुलै 1911 रोजी झाला. औरंगाबाद येथे शासकीय प्रशालेत शिकत असताना गणेशोत्सवात पुढाकार घेतल्यामुळे हेडमास्तरांनी केलेल्या शिक्षेच्या निषेधार्थ ते औरंगाबाद सोडून पुढील शिक्षणासाठी हैदराबादच्या चादरघाट हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. मॅट्रिकच्या परीक्षेत संस्थानात सर्वप्रथम. मद्रास विदयापीठाची इंटरमिजिएटची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर स्वातंत्र्य-चळवळीत भाग घेण्यासाठी शिक्षण स्थगित केले; परंतु चळवळ थांबल्यामुळे पुन्हा शिक्षण सुरू केले. हैदराबाद राज्याचे त्रिभाजन करून भाषिक राज्ये निर्माण करावीत, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मराठवाडयाच्या विकासप्रश्नांसाठी त्यांनी विविध आंदोलने केली. शिक्षण आणि खादी या दोन क्षेत्रांत त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. श्री सरस्वती शिक्षण संस्था, औरंगाबाद; स्वामी रामानंद तीर्थांनी स्थापिलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटी आणि योगेश्वरी शिक्षण संस्था, आंबेजोगाई इ. शिक्षणसंस्थांचे ते एक मार्गदर्शक व पदाधिकारी होते. मराठवाडा खादी ग्रामोदयोग समितीचे संस्थापक तसेच संयुक्त महाराष्ट्र समितीचे ते एक महत्त्वाचे नेते होते. मराठवाडयासाठी राज्यघटनेतील तरतुदीनुसार वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्याचा आग्रह त्यांनी धरला व त्यात यश संपादन केले. मराठवाडा विदयापीठाच्या स्थापनेसाठी, औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे एक न्यायपीठ स्थापन करण्यासाठी आणि औरंगाबाद रेल्वे विभाग ब्रॉडगेजवर आणण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे प्रयत्न केले. त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गोविंदभाई श्रॉफ यांचे वृद्धापकाळाने औरंगाबाद येथे निधन झाले.
मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील या थोर स्वातंत्र्य सैनिकांस विनम्र अभिवादन ........!

ही माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. 
धन्यवाद .......!

• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • •
नमस्कार
गौरव गाथा मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांची यात आज आपण कर्मयोगी साहेबराव देशमुख बारडकर यांची माहिती पाहू या.
श्री साहेबराव देशमुख बारडकर यांचा जन्म 08 एप्रिल 1925 रोजी मौजे बारड जिल्हा नांदेड येथे झाला. सधन व प्रतिष्ठित देशमुख परिवारात जन्मल्यामुळे कोणत्याही बाबीची कमी नव्हती. त्यांचे प्राथमिक शिक्षण बारड येथे झाले. पुढे नांदेड शहरात निवासाची सोय, शहरी आकर्षण व  आर्थिक सुबत्ता यामुळे हायस्कूलच्या शिक्षणासाठी नांदेडला राहिले व हायस्कूलचे शिक्षण पूर्ण केले. या काळात मराठी सोबतच उर्दू, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे त्यांना ज्ञान झाले. वयाच्या 16 -17 व्या वर्षी त्यांना शाळेसोबत बाहेरच्या वातावरणाची माहिती झाली. धाडसी व खिलाडू वृत्तीमुळे समवयस्क मुलांचा गराडा त्यांच्याभोवती असायचा. ते सर्व मुलांमध्ये केंद्रस्थानी असायचे. अर्थात नेतृत्व गुण अंगी असल्यामुळे नेहमी समाज व समूहात राहत गेले. याच काळात सर्व देशभर स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते.
भारतीय काँग्रेसने स्वातंत्र्याचा लढा पुकारला होता. जनता नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या " जयहिंद " नाऱ्यामुळे प्रभावित झाली होती. महात्मा गांधीजींनी अहिंसा व असहकारातून ताकद निर्माण केली होती. याचा सर्व अभ्यास बाल साहेबराव करत होते आणि त्यामुळे त्यांच्यात स्वातंत्र्यासाठी वीरश्री निर्माण झाली व त्यांचे बालपण तेथेच संपले.
विशेषतः सन 1946 ते 1948 मध्ये प्रखर चळवळी झाल्या, त्यामध्ये सर्वाधिक चळवळी व कारस्थाने बारड भागात झाल्या. त्या काळात श्री राजारामजी देशमुख, श्री विठ्ठलराव बारडकर, श्री आबासाहेब लहानकर इत्यादी मंडळी चळवळीमध्ये अग्रेसर होते. याच वयात साहेबराव बारडकर यांनी नांदेड, किनवट, उमरखेड या भागात जनजागृती केली व स्वातंत्र्यसैनिकांचे नेतृत्व केले. केवळ पाच फूट उंची लाभलेली व्यक्ती पण कर्तव्यामुळे, धाडसामुळे आणि पहाडी आवाजामुळे समोरची व्यक्ती प्रभावित होत असे. वक्तृत्वात अशी धार व प्रेरणा होती की आपणही काहीतरी करायलाच पाहिजे असे वाटायचे. त्यांच्या जनसंपर्कामुळे खेड्यापाड्यातील सर्व समाज एकवटला. हा दोन वर्षाचा काळ म्हणजे हैदराबाद संस्थानच्या इतिहासातील  निर्णायक काळ होता. नांदेड जिल्ह्यात सत्याग्रहापासून सशस्त्र चळवळी झाल्या. पारनुर व टेळकी येथील जंगल सत्याग्रह ऐतिहासिक ठरले. या सर्व लढ्यात साहेबरावजींचा सहभाग विशेष होता .
सन 1947 मध्ये स्टेट काँग्रेसच्या आदेशाप्रमाणे तिरंगा राष्ट्रीय ध्वज मराठवाडाभर फडकले आणि नांदेडचा कॅम्प उमरखेडला कायम झाला. या सर्व घडामोडीत साहेबरावजींचा मोलाचा वाटा होता.
गावातील लोक साहेबरावजींना मालक या नावाने संबोधित. साहेबरावजींचे घर म्हणजे कार्यकर्त्यांची जणू राजधानीच झाली होती. साहेबरावजींचा मळादेखील केंद्रच होते, ज्याला बारड रापू म्हणत. यामध्ये चाबरा चोरंबा व रावणगाव या गावापासून लहान नागेली चितगिरी ते थेट भोकरपर्यंत जवळपास 60 गावे होते. त्यानंतर हदगाव ते किनवटच्या हद्दीपर्यंत समाविष्ट झाली. साहेबरावजींच्या पुढाकाराने सरकारी दप्तर ताब्यात घेणे शेतसारा वसूल करणे सरकारचा अंमल झिडकारून देणे असे कार्यक्रम सुरू झाले. या सर्व सत्याग्रह व चळवळीसह रजाकारांशी सशस्त्र सामना यांच्या अनुभवातून साहेबरावजी अतिशय प्रवीण झाले व निर्भीड झाले. त्यांनी आपल्या अल्पवयात देशभक्तीचा जगाला परिचय करून दिला.
मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील या थोर कर्मयोगी स्वातंत्र्यसेनानी यांना विनम्र अभिवादन .........!
ह्या माहितीचे संकलन एकनाथ शिंदे यांनी 

• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • •
नमस्कार,
गौरव गाथा मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांची यात आज आपण श्री भाऊराव पाटील मतसागर यांची माहिती पाहू या. 

सन 1923 मध्ये औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील जरूळ या गावी श्री. भाऊराव भिमाजी मतसागर यांचा जन्म झाला. अत्यंत हलाखीच्या कौटुंबिक परिस्थितीमुळे शालेय शिक्षणापासून त्यांना वंचित रहावे लागले. तथापि प्रचंड जिज्ञासा व इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी मोडी लिपी आणि मराठी भाषेसह तेलुगू, गुजराती, ऊर्दू, इंग्रजी या इतर भाषादेखील स्वपरिश्रमाने आत्मसात केल्या. त्याचबरोबर त्यांनी पौराणिक ग्रंथांचे विश्लेषण करून इतिहास संशोधन केले.
मराठवाडा मुक्तिसंग्रामात भाऊराव भिमाजी पाटलांचे तसेच त्यांच्या कुटुबीयांचे योगदान व त्यांनी उचललेले कष्ट विशेष उल्लेखनीय आहेत. आपल्या जरूळ येथील स्वतःच्या घरावर त्यांनी भारताचा तिरंगा फडकावल्यामुळे निजामी राजवटीत रझाकारांनी त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा अनन्वित छळ केला. त्यानंतरही लाठीहल्ल्यात जखमी होऊन बेशुद्ध होईपर्यंत त्यांनी भारतीय ध्वज उतरविला नाही.
औरंगाबाद येथे केलेल्या सत्याग्रहामुळे श्री. माणिकचंद पहाडे यांच्यावर रझाकार फारूकी यांनी अत्याचार केला होता. त्यामुळे तेथे पुन्हा कुणीही सत्याग्रह करण्यास धजावत नव्हते. भाऊराव मतसागर यांनी हे आव्हान स्वीकारून तेथील सिटीचौकात सत्याग्रह केला. त्याबद्दल त्यांना कारावास भोगावा लागला, तसेच फटक्यांची (टिकटिकीची) सजाही सुनावण्यात आली. परंतु तुरुंगातील सर्व राजकीय कैद्यांनी या सजेविरूद्ध पुकारलेल्या आंदोलनामुळे ही सजा मागे घेण्यात आली.
मराठवाडा मुक्तिसंग्राम संघर्षानंतर त्यांनी औरंगाबादेतील सामाजिक व राजकीय कार्यात भाग घेतला. श्री. विनायकराव पाटील यांच्या सोबत त्यांनी शिक्षण प्रसार आणि सामाजिक सुधारणांच्या कामी स्वतःला वाहून घेतले. याची दखल घेऊन थोर समाज सुधारक श्री. धोंडो केशव कर्वे यांनी त्यांना पारितोषिकही प्रदान केले होते. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती श्री. वि. वि. गिरी यांनी त्यांची राष्ट्रपती भवनात भेट घेऊन सामाजिक आणि शेतकऱ्य़ांच्या समस्यांवर त्यांच्यासोबत चर्चा केली, तसेच तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी त्यांना या मुक्तिसंग्रामातील भरीव योगदानाबद्दल त्यांना ताम्रपत्र बहाल केले.
कृषिक्षेत्रातही भाऊराव मतसागर यांनी आपल्या कार्यकुशलतेची चुणूक दाखवून ओसाड शेतजमिनीवर भरघोस उत्पादन घेऊन दाखविले. ह्या कामगिरीबद्दल त्यांना तत्कालीन राज्यपाल अली यावर जंग यांनी १९७० साली शेतीनिष्ठ शेतकरी या सन्मानाने पुरस्कृत केले. ह्या कार्यक्रमानंतरच श्रीलंकेच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती सिरीमावो भंडारनायके यांनी राजभवनात त्यांची भेट घेऊन कृषिक्षेत्रातील त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.
त्यांच्या इतर शैक्षणिक आणि सामाजिक कार्यांबद्दल माजी पंतप्रधान राजीव गांधी, तसेच पी. व्ही. नरसिंहराव यांनी त्यांना सोनेरी पदके देऊन गौरविले होते. या थोर व्यक्तीचे सन १९९५ साली वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले.
मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील या थोर स्वातंत्र्य सैनिकांस विनम्र अभिवादन ........!

ही माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. 
धन्यवाद
• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • •
नमस्कार,
गौरव गाथा मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांची यात आज आपण मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई दगडाबाई शेळके यांची माहिती पाहू या. 

मराठवाडा मुक्तिसंग्रामात मैलाचा दगड रचला तो जालन्यातील मर्दानी दगडाबाई शेळके यांनी. झाशीच्या राणीप्रमाणे अपंग मुलाला पाठीला बांधून एका हातात बंदूक तर, दुसऱ्या हातात घोड्याचा लगाम धरून त्यांनी सहकारी स्वातंत्र्यसैनिकांना रसद पुरविण्याचे काम मोठ्या नेटाने केली. 
धोपटेश्वर (ता. बदनापूर जि. जालना) येथील दगडाबाई शेळके यांनी निजामी राजवट उलथवण्यासाठी मुक्तिसंग्रामात उडी घेतली. त्यांच्या मर्दानी पराक्रमांची इतिहासाने त्यांच्या जिवंतपणीच नोंद घेतली. दगडाबाईंनी बंदूक आणि हातगोळे चालविण्याचे प्रशिक्षण घेतले. एकदा निजाम सरकारच्या सैनिकांनी त्यांना शस्त्रासह रंगेहाथ पकडले होते. ज्यामुळे त्यांना तुरूंगवास भोगावा लागला. पॅन्ट, शर्ट घालून, मुलाला पाठीशी घेऊन बंदूकीसह घोड्यावर प्रवास करीत असल्याने कुटुंबीय व समाजाने आक्षेप घेतला. पती देवराव शेळके यांच्या रोषालाही त्यांना सामोरे जावे लागले होते, परंतु त्या खचल्या नाहीत. स्वतःच्या जीवाची श्वाश्वती नसल्याने त्यांनी देवराव यांचा मैनाबाईंशी स्वतःहून दुसरा विवाह लावून दिला होता.
दगडाबाईची माहेरची लढाई - 
दगडाबाईंनी निजामाशी अनेकदा दोन हात केले. त्यांची सर्वांत गाजलेली लढाई म्हणजे माहेरची लढाई. भोकरदन तालुक्यातील माहेर कोलते टाकळी शिवारातील लढ्यात त्यांनी हातगोळे टाकून निजामाचा अख्खा कॅम्प उद्धवस्त केला होता.
अश्या धाडसी होत्या दगडाबाई ! त्यांचं आयुष्य म्हणजे एक जीवंत दंतकथाच होती.
मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील या थोर स्वातंत्र्य सेनानी यांना विनम्र अभिवादन ........!

ही माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. 
धन्यवाद

• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • •
नमस्कार,
गौरव गाथा मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांची यात आज आपण अनाथांची आई डॉ. ताराबाई परांजपे यांची माहिती पाहू या. 
डॉ. ताराबाई परांजपे हे मराठवाडा मुक्तिसंग्रामातील एक ठळक नाव. समाजसेवेसाठी त्यांनी प्रसंगी नातेवाईकांचादेखील रोष पत्करला; पण आपल्या विचारांना कधीही तिलांजली दिली नाही. मुक्तिसंग्रामाबरोबरच, प्रौढ शिक्षण, स्त्री शिक्षण, समता परिषद, नशाबंदी, जाती निर्मूलन अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला. शालेय जीवनातच त्यांना मुक्तिसंग्रामातील ज्येष्ठ नेते स्वामी रामानंद तीर्थ यांचा सहवास लाभला. 
ताराबाईंचा जन्म ५ ऑक्टोबर १९३० रोजी हैदराबाद येथे झाला होता.२६ जानेवारी १९४७ रोजी त्यांचा विवाह स्वातंत्र्य सेनानी नागनाथ यांच्याशी झाला. पूर्वाश्रमीच्या ताराबाई आपटे, या परांजपे झाल्या. मुक्तिसंग्रामामध्ये भूमिगत राहून ताराबाईंनी कधी तेलुगू मोलकरणीच्या वेषात, तर कधी कॉलेजकन्या म्हणून शिताफीने पोलिसांना गुंगारा दिला होता. बुलेटिन छपाई यंत्र किंवा रेल्वे पूल उडविण्यासाठी लागणारा दारूगोळा पळविण्याची धाडसाची कामेही त्यांनी केली होती. शालेय मुलींना एकत्र आणून जागृती केली. अनेकदा स्वत:चा जीव धोक्यात घातला. मराठवाडा महिला समता परिषदेतर्फे नांदेडला त्यांनी ‘बालसदन’ सुरू केले. या माध्यमातून त्यांनी अनाथांना मायेचा ओलावा दिला. शिक्षण क्षेत्रासहीत सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान असलेल्या ताराबाईंना अवघा मराठवाडा ‘अनाथांची आई’ म्हणून ओळखत असे.
वयाच्या चौदाव्या वर्षीच हैदराबाद येथील सुलतान बाजाराजवळील असलेल्या भंगी कॉलनीत त्यांनी प्रौढ शिक्षणाचे वर्ग घेतले होते. त्यावरून ‘भंगीणमैत्रीण’ म्हणून त्यांना दूषणे मिळाली; पण त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. नांदेडच्या समाज कल्याण खात्याच्या सहकार्याने त्यांनी सतत तीन वर्षे महिला सहभोजनाचे कार्यकम घेतले.  तब्बल १४ वर्षे प्रौढ शिक्षण समितीचे कार्य त्यांनी केले. प्रौढ महिलांना त्या, दररोज एक तास मराठी आणि इतिहास शिकवीत होत्या. 
ताराबाईंची साहित्य संपदाही मोठी होती. ‘लोकनेते जयप्रकाश’, ‘संन्यस्त स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थ’, ‘सीमा प्रदेशातील लोककथा’, ‘आदिम प्रतिमा आणि स्त्रीजीवन’ आदींचा त्यात समावेश आहे. ‘अनुबंध’साठी ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चा पुरस्कार त्यांना मिळाला, बालसदनातील मुलांवर त्यांनी लिहिलेले ‘निवडुंगाची फुले’ हे पुस्तक अमेरिकेपर्यंत गेले. त्यांना सरकारचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा पुरस्कार मिळाला होता. महिला-बालकल्याण क्षेत्रासाठी ‘जानकीबाई आपटे पुरस्कार’,  ‘गोविंदभाई श्रॉफ पुरस्कार , महाराष्ट्र सरकारचा दलितमित्र पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुरस्कार यांच्यासह अनेक पुरस्कारांनी ताराबाईंना सन्मानित करण्यात आले होते. ‘लोकसाहित्य’ आणि ‘लोकसंस्कृती’ हे त्यांचे अभ्यासविषय होते. तेलुगू भाषेचा मराठीवरील परिणाम हा त्यांचा ‘पीएच.डी.’चा विषय होता. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. 
मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील या थोर स्वातंत्र्य सेनानी अनाथांची आई यांना विनम्र अभिवादन ........!

ही माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. 
धन्यवाद
• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • •

नमस्कार,
गौरव गाथा मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांची यात आज आपण या मुक्तीसंग्रामातील पहिले हुतात्मा ठरलेले गोविंदराव पानसरे यांची माहिती पाहू या. 
गोविंदराव यांचा जन्म 15 मे 1913 ला जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे त्यांच्या मामाच्या घरी झाला. गोविंदराव यांच्या आईचे नाव यमुनाबाई तर वडीलांचे नाव विनायकराव होते. वडील हे मूळचे पुण्याचे रहिवासी होते पण पुढे ते शालीबंडी हैदराबाद येथे राहावयास आले. तेथे वैद्यकीय व्यवसाय करीत होते. गोविंदरावांचे मामा शंकरराव हे बदनापूर येथे स्टेशन मास्तर होते.  गोविंदराव अवघे सहा महिन्याचे असताना त्यांचे आई-वडील वारले. केवळ सहा महिन्याचे बाळ पोरके झाले. अशा अनाथ गोविंदरावांचे पालनपोषण आणि शिक्षण त्यांचे मामा शंकरराव यांनी केले. त्यांचे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण हैदराबादच्या विवेक वर्धिनी येथे झाले. नंतर पुढील शिक्षणासाठी ते निजाम कॉलेजमध्ये दाखल झाले. पण त्यांनी पुढे शिक्षण सोडून दिले. त्यांचे मामा शंकरराव यांची धर्माबाद येथे स्टेशन मास्तर म्हणून बदली झाली व ते तिथेच स्थायिक झाले होते. गोविंदराव त्यांच्याकडे येऊन राहिले व सार्वजनिक काम करू लागले.
हरिपूर काँग्रेस अधिवेशनात स्वयंसेवक म्हणून उपस्थित राहिल्यामुळे त्यांच्या जीवनाला नवे वळण मिळाले. हुतात्मा गोविंदराव पानसरे हे अत्यंत बुद्धिमान विचारी आणि चिकित्सक होते. ते स्वाभिमानी, स्वावलंबी आणि प्रखर राष्ट्राभिमानी होते. त्यांच्याकडे उत्तम वक्तृत्व व संघटन कौशल्य होते. जीवनभर विवाह व नोकरी न करण्याचे ठरवून त्यांनी जनसेवेचे व्रत घेतले. त्यांचा स्वभाव मोकळा, प्रेमळ पण करारी व निर्भीड होता. ते गांधीवादाचे पक्के अनुयायी होते. धर्मवत वाचनालय खादी भांडार व पुढे चालून महाराष्ट्र परिषद व स्टेट काँग्रेसच्या माध्यमातून व्यापक स्वरूपाचे कार्य केले. धर्माबादच्या भोवती चार तालुक्यांच्या बहुतेक सर्व खेडोपाडी पायी दौरे करून काँग्रेसचे व खादीचे प्रचार कार्य त्यांनी केले. त्यामुळे सहा हजार प्राथमिक सभासद व 300 खादीधारी त्यांचे अनुयायी बनले होते. गोविंदराव पानसरे हे स्टेट काँग्रेसचे पूर्णवेळ कार्यकर्ते व मुधोळ तालुक्याचे संघटक होते. या भागात गोविंदराव करत असलेले कार्य रजाकरांना आवडणे शक्यच नव्हते. गोविंदरावांनी कोंडलवाडी येथे केलेले भाषण सरकारला आक्षेपार्ह वाटले त्यामुळे त्यांना अटक झाली व जामीन मिळाला नाही. शेवटी 21 ऑक्टोबरला त्यांना जामीन दिला गेला. सायंकाळी ते पुंडलिकराव पाटील व इतर कार्यकर्त्यासोबत बैलगाडीतून बिलोलीला जात असताना रजाकारांनी अर्जापूर जवळ गाठून त्यांचा खून केला. गोविंदराव पानसरे हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्टेट काँग्रेसचे पहिले हुतात्मा होत. गांधीवादी गोविंदरावांच्या बलिदानाने या भागातील जनता फार मोठ्या प्रमाणात मुक्तीसंग्राम लढ्यात सामील झाली. नांदेड जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते निर्भीडपणे निजामी राजवटीला आव्हान देऊ लागले. हा निर्भयतेचा वसा येथील जनतेला गोविंदराव पानसरे यांनी दिला होता हे मात्र निश्चित
ह्या माहितीचे संकलन भाऊसाहेब उमाटे, सहशिक्षक ज्ञानेश्वर विद्यालय लातूर यांनी केले आहे 

मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील थोर स्वातंत्र्य सेनानी यांना विनम्र अभिवादन .......!
धन्यवाद ......! 
• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • •
नमस्कार,
गौरव गाथा मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांची यात आज आपण या मुक्तीसंग्रामाचे प्रमुख नेतृत्व करणारे स्वामी रामानंद तीर्थ यांची माहिती पाहू या. 
स्वामी रामानंद तीर्थ (ऊर्फ व्यंकटेश भगवानराव खेडगीकर हे एक संन्यासी व हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करणारे चळवळकर्ते होते. त्यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील सिंदगी या ठिकाणी 03 ऑक्टोबर 1903 रोजी झाला. त्यांचे शिक्षण सोलापूर येथील सरकारी शाळेत झाले. उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगा या गावी गुरुकुलात ते कार्यरत होते. इ.स. १९३० मध्ये स्वामी नारायण तीर्थ यांनी त्यांना दीक्षा दिली व ते स्वामी रामानंद तीर्थ झाले. अंबेजोगाई या ठिकाणी त्यांनी योगेश्वरी नूतन विद्यालयाचे नूतनीकरण केले.
‘हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करून लोकशाही मान्य करा व संस्थानाचे स्वतंत्र अस्तित्व संपवा’ अशी हाक रामानंद तीर्थ यांनी सरकार आणि जनतेला दिली. याचा परिणाम होऊन लोक या संग्रामात सामील झाले. मुक्तिसंग्रामात आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी ’व्हिजन’ हे साप्ताहिक चालवले होते. यामार्फत ते भारतीय स्वातंत्र्याच्या विचारांचा प्रचार करत. माणिकराव पहाडे, शंकरभाई पटेल, बाबासाहेब परांजपे. गोविंदभाई श्रॉफ हे तरुण स्वातंत्र्यसैनिक त्यांच्यासोबत होते. हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीत स्वामी रामानंद तीर्थ यांचे ते प्रमुख समर्थक होते. तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी सशस्त्र पोलीस कारवाई करून निजामाला शरण आणले. हैदराबाद संस्थान १७ सप्टेंबर १९४८ रोजी भारतात विलीन झाले. यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांचे विशेष योगदान होते. 
मुक्तीसंग्राम लढ्यातील सर्व स्वातंत्र्य सेनानीना विनम्र अभिवादन  ........!
• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • •
संकलन :- नासा येवतीकर, स्तंभलेखक तथा विषय शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा धर्माबाद 9423625769
• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • •

मतदान जनजागृती ( Voting Awarness )

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जनजागृती चला मतदान करू लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.  चला मतदान करू .......! ...