विनम्र अभिवादन ......!
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, आयर्न लेडी आणि धाडसी निर्णयामुळे 70 ते 80 च्या दशकात संपूर्ण जगात ज्यांच्या कार्याची ख्याती पसरले असे प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांची आजच्या दिवशी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानिमित्ताने माझ्या स्मरणात असलेली ही आठवण.
31 ऑक्टोबर 1984 मी आठ वर्षाचा असेन आणि दुसरी किंवा तिसऱ्या वर्गात शिकत असतांना ही घटना घडली. पण मला आज ही आठवते त्यांचा अंतिम संस्कार सोहळा.
भारताचे पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर त्यांच्याच अंगरक्षकाने गोळ्या झाडल्या आणि त्यात ते मृत्युमुखी पडल्याची बातमी रेडिओवर ऐकण्यात आली. आमच्या घरात रेडिओ ऐकण्याचे प्रमाण जरा जास्त होते. सकाळी सहा वाजल्याची आकाशवाणी सुरू झाल्याची धून, त्यानंतर वंदे मातरम, पहाटेची भक्तिगीते आणि सातच्या प्रादेशिक बातम्या याशिवाय माझी सकाळ कधी झालीच नाही. माझे बाबा सकाळी उठले की पहिले रेडिओ लावायचे आणि ऐकत बसायचे. त्यांना बातम्या ऐकायची खूप सवय होती आणि क्रिकेटचे समोलोचन ऐकण्याची आवड होती. लाईटवरील रेडिओ पेक्षा बॅटरी सेलवर चालणारा रेडिओ त्यांना आवडायचा कारण लाईटचा रेडिओ एकाच ठिकाणी लावून ठेवावे लागते तर बॅटरी सेलवरील रेडिओ कुठं ही नेता येतो. माझ्या आठवणीनुसार पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर गोळ्या झाडल्याची व ते त्यात निधन पावल्याची बातमी सर्वप्रथम आमच्या बाबांनीच ऐकली आणि ते सर्वाना सांगितले. हा हा म्हणता ही बातमी संपूर्ण गावात पसरली. अंत्यसंस्कार TV वर दाखविण्यात येणार असल्याची बातमी कळाली. त्याकाळी आमच्या गावात फक्त दोघांच्या घरी TV होते. आमच्या घरी TV नव्हते पण माझ्या शेजारच्या घरी TV होते ते ही ब्लॅक अँड व्हाईट. अंत्यसंस्कार सुरू होण्यापूर्वीच शेजारच्या घरात एकच गर्दी होऊ लागली.
अंत्यसंस्कार सुरू झाले आणि इकडे TV वाल्याचे घर हाऊसफुल्ल होऊन गेले. आम्ही लहान मुले सर्वात पुढे, त्यानंतर महिला आणि त्यानंतर पुरुष असा जमाव त्या घरात बसला होता. तिथे पंखा नसल्याने सर्वजण घामाघूम झाले होते. पण सर्वांच्या नजरा त्या TV वर खिळून होते. इंदिरा गांधी यांच्या चेहऱ्याकडे पाहून अनेक महिला आपल्या डोळ्यांतून अश्रू गाळत होते, जणू काही ती त्यांच्या घरातील बाई लेक होती. गावातील अनेक लोकं मरण पावल्यावर त्यांना कोणी जाळत नव्हते तर जमिनीच्या स्वाधीन करत होते. फक्त मोठ्या लोकांनाच त्यांच्या मृत्यूनंतर जाळतात असा समज त्यावेळी बालमनाला वाटत होते. त्या अंत्यसंस्कारात त्या काळचा सुप्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन आणि इंदिराजीचे पुत्र राजीव गांधी यांना अग्नी देताना पहिल्यांदा पाहत होतो. तेवढ्या भाऊगर्दीत हे दोनच चेहरे ओळखीचे वाटत होते. त्यावेळी माझ्याही डोळ्यांत नकळत अश्रू येऊन गेले. इंदिरा गांधी ही भारतातील कोणीतरी महान व्यक्ती होती एवढंच त्यावेळी कळत होते. पण बालपणीच्या मनावर बिंबून गेलेलं ते अंत्यसंस्कार मी जीवनभर कधीही विसरू शकत नाही.
आज श्रीमती इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन त्यानिमित्ताने विनम्र अभिवादन ......!
- नासा येवतीकर, धर्माबाद
No comments:
Post a Comment