जलसाक्षरता : काळाची गरज
मानवी जीवनच नव्हे तर प्रत्येक सजीवांसाठी पाणी हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जीवन जगण्यासाठी ज्याप्रकारे अन्न आणि हवा याची गरज असते अगदी त्याचप्रमाणे पाण्याचीही गरज असते. पाणी कसे तयार होते ? याविषयीच्या जलचक्रची माहिती आपणा सर्वांना ज्ञात आहेच. वास्तविक पाहता प्रयोगशाळेतून पाणी म्हणजे H2O हायड्रोजन डाय-ऑक्साइड तयार करणे फार खर्चिक आणि जिकरीचे काम आहे. त्याद्वारे तयार करण्यात आलेले पाणी आपण वापरू ही शकत नाही, त्यास्तव आपण त्या भानगडीत सुद्धा पडत नाही. कारण पृथ्वीवर जमीन कमी म्हणजे 29% तर पाण्याचा भाग जास्त म्हणजे 71% हे आहे. पृथ्वीवर पाणी मुबलक प्रमाणात असल्यामुळे पृथ्वीला निलग्रह असेसुद्धा म्हटले जाते. त्यामुळे आपल्याकडे निसर्गतःच पाणी भरपूर आहे अशी समाजाची धारणा होती. त्याचा परिणाम असा झाला की, उपलब्ध पाणीसाठा किती आहे व ते किती महत्त्वाचे आहे याचा विचार करणे माणसाने सोडून दिले. पाण्यापासून पैसा तयार करण्याच्या मानवाच्या अति स्वार्थी स्वभावामुळे, स्वतःच्या स्वार्थासाठी व विकासासाठी पाण्याचा पुरेपूर किंवा त्यापेक्षा जास्त वापर करून आज पाणीटंचाई सारख्या भीषण समस्येच्या गर्तेत अडकून पडला आहे.
आदिमानव किंवा आपले पूर्वज पाण्याचे महत्व ओळखून होते. म्हणूनच त्यांच्या वस्त्या ह्या नदीच्या काठावर किंवा ज्या ठिकाणी पाणी आहे त्याच ठिकाणी आढळून आल्या आहेत. पाण्याचा वापर करून शेती करता येते याची जाणीव सुद्धा त्यांच्यामध्ये निर्माण झाली. पाण्यामुळे अन्न मिळू लागले याची जाणीव त्यांच्या मनात निर्माण झाल्यावर त्यांनी पाण्याला पंचमहाभूतात समाविष्ट केले. पाणी पावसाच्या रूपाने जमिनीवर येतो हे समजल्यावर पाऊस व त्या पावसाची निर्मिती करणारा समुद्र यांना त्यांनी देवत्व बहाल केले. संगणक युगातील पिढी या लोकांना अशा वागण्यामुळे मूर्खात काढतील कदाचित परंतु त्यांच्या मनात भीती होती आपण निसर्गाचे नियम तोडले तर तो कदाचित आपणाला शिक्षा देऊ शकतो. भीतीपोटी तो निसर्गाने तयार केलेले नियम तोडत नव्हता आणि पर्यावरण संतुलित राहून त्याचा समतोल कधी बिघडत नव्हता. परंतु आज आपण सजग, जागरूक, सज्ञान झालो आहोत म्हणून वरील गोष्टी काही मानत नाही. मात्र आपण जलसाक्षर झालो नाही. लिहिता वाचता यावे म्हणून साक्षर झालो खरे परंतु पाण्याची चणचण तुटवडा यावर मात करण्यासाठी जलसाक्षरता निर्माण होणे ही काळाची गरज आहे.
एका वर्षातून पावसाचे चार महिने ठरलेले असतात. त्या पर्जन्याच्या काळात योग्य प्रमाणात पाऊस झाला तर त्यावर्षी कोणत्याच बाबींची चणचण भासत नाही. मात्र तसे होत नाही. पावसाची वेळ, त्याचा वेग आणि त्याचे प्रमाण याबद्दल काही अंदाज व्यक्त करणे फारच कठीण आहे. हवामान तज्ज्ञ दरवर्षी पावसाचा आपला अंदाज व्यक्त करतात. मात्र त्या प्रमाणात पाऊस पडतोच असे नाही. त्याच्याबाबतीत वाट पाहणे एवढेच आपल्या हातात आहे. कधीकधी वर्षभराचा पाऊस एका महिन्यात तर कधीकधी एका महिन्याचा पाऊस एका दिवसात पडतो. पाऊस जास्त पडला तर अतिवृष्टी आणि कमी पडला तर अनावृष्टी यासारखी नैसर्गिक संकट ओढावू शकतात. पावसाचे पडलेले पाणी वाहून जाणे आणि पाण्याचा वाटेल तसा वापर करणे यामुळे पाण्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात. म्हणूनच निसर्गतः आपणास प्राप्त झालेले पाण्याचे स्तोत्र जपून वापरणे, पावसाचे पडलेले पाणी साठवून ठेवणे, दैनंदिन जीवनात पाण्याचा योग्य व जपून वापर करणे या गोष्टीबाबत सजगता निर्माण करण्यासाठी जलसाक्षरतेची अत्यंत आवश्यकता आहे.
जलसाक्षरता म्हणजे फार मोठे काम नाही. परंतु लहान-सहान गोष्टीकडे सुद्धा जाणीवपूर्वक लक्ष देऊन पाणी कसे वाचविता येईल किंवा बचत करता येईल ? याचा विचार करणे म्हणजे जलसाक्षरता म्हणता येईल. घरात असलेले नळ तर आपण वेळोवेळी तपासणी करतो परंतु नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीमार्फत जे पाणी आपण नळाद्वारे घेतो त्याची वेळोवेळी तपासणी करावी. बहुतांशी ठिकाणी हे नळ उघडेच राहतात. त्याला चालू बंद करायची तोटी नसते त्यामुळे आपण जेव्हा एखाद्या गावाला जातो त्यावेळी या नळाद्वारे भरपूर पाणी वाया जाते. ते पाणी तोटी लावून वाचविता येऊ शकते याचा प्रत्येकाने जरूर विचार करावा. सार्वजनिक ठिकाणी असलेले नळ चालू असेल तर लगेच ते बंद करण्याची काळजी आपण घ्यावी. दररोज सकाळी दात घासताना, दाढी करताना, हात-पाय धुते वेळेस नळ चालू करून भरपूर पाणी वापरण्याची प्रथा आपण बंद करावी व कमीत कमी पाण्यात उपरोक्त क्रिया करावी. यामुळे पाण्याची बचत होईल. मोटार चालू करून वाहने धुण्याची बऱ्याच लोकांची सवय असते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. त्याऐवजी बकेटभर पाणी घेऊन स्पंजद्वारे गाडी पुसल्यास पाणी कमी लागेल आणि गाडी साफ ही होईल. पाण्याची टाकी पूर्ण भरल्यानंतर ओवरलोड साठी एक पाइप बाहेर काढल्या जाते. त्याद्वारे जास्त पाणी बाहेर येणार नाही याची काळजी नेहमी घेणे गरजेचे आहे. बहुतांश वेळा आपण पाण्याची टाकी भरण्यासाठी मोटार चालू करतो आणि टाकी भरून पाणी उलटून जाते तरी आपले लक्ष राहत नाही. त्यामुळे बरेच पाणी वाया जाऊ शकते. या सर्व बाबीसाठी घरातील महिलांना सजग करणे गरजेचे आहे. पाण्याची अत्यंत आवश्यकता त्यांनाच असते व त्याची काळजी सुद्धा सर्वात जास्त त्यांनीच घेणे आवश्यक आहे.
घरात पाहुणे मंडळी आली असता त्यांना ग्लास भरून पाणी न देता अर्धा ग्लास भरलेले पाणी द्यावे. ज्यामुळे त्यांना आवश्यक असल्यास पाहुणे अजून पाणी मागतील किंवा कमी पाणी दिल्यास तेवढे संपवतील. परंतु आपण या छोट्या बाबीचा विचार ही सहसा करत नाही. पाहुणे मंडळी सुद्धा आपली तहान लक्षात घेऊन विचार करावा अन्यथा " नको " म्हटलेले केव्हाही चांगले. त्यामुळे पाण्याची नक्कीच बचत होईल. आपल्या घरात पिण्यासाठी किती पाणी लागते याचा अंदाज घेऊन भाडे भरून घ्यावे. पाणी कधीही शिळे होत नसते याची जाणीव सर्वप्रथम महिलांनी करून घेऊन पाण्याची भांडी रोज ओतून देऊ नये. भाजी किंवा फळे धुण्यासाठी वापरलेले पाणी परसबागेतील किंवा कुंडीतील झाडाना टाकणे आवश्यक आहे. घरातील सांडपाणी सुद्धा बागेसाठी वापरावे यामुळे बागेला स्वतंत्रपणे पाणी देण्याची आवश्यकता रहात नाही. झाडांना किंवा शेतात पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर द्यावा. ज्यामुळे कमी पाण्यावर उत्तम शेती होईलच शिवाय त्या पिकांना मुळापर्यंत पाणी जाऊन त्याची योग्य वाढ होईल. याउपर सर्वात महत्त्वाचे म्हणजे पावसाचे पडणारे पाणी साठवणे व त्याचा वापर करणे. आपण या पावसाच्या पाण्याचा शेती वगळता त्याचा काहीही उपयोग करून घेत नाही. दरवर्षी पावसाचे पडणारे कितीतरी पाणी वाहून जाते. त्याची साठवणूक कशी व कोठे करावे आणि त्याचा वापर नंतर कसा करावा याचे ज्ञान नसल्यामुळे आपणास ते पाणी साठविता येत नाही. राज्यातील राळेगणसिद्धी येथे मा. अण्णा हजारे यांनी पावसाचे पाणी वापरून त्या गावाला कसे नंदनवन केले हे प्रत्यक्षात या गावाला भेट दिल्याशिवाय कळणार नाही. व्यक्ती अनुभवातून बरेच काही शिकतो त्यासाठी हिवरेबाजारचे आदर्श सरपंच श्री पोपटराव पवार यांना भेटून ही माहिती मिळवू शकतो. रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टिमद्वारे आपण पावसाचे पाणी जमिनीत मुरवू शकतो किंवा भांड्यांमध्ये पावसाचे पाणी जमा करून त्याचा वापर करू शकतो. अशाप्रकारे फार लहान लहान घटनांमधून पाणी वाचविता येऊ शकते. थेंबे थेंबे तळे साचे म्हणीप्रमाणे एखादी क्रिया करताना ती लहान वाटते परंतु काही काळानंतर मोठ्या स्वरूपात दिसून येते. त्याच तो प्रत्येकाने सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून उद्यासाठी पाणी।हवे असेल तर आज आणि आजच ते पाणी वाचवावे लागेल हे घोषवाक्य नेहमी लक्षात ठेवावे. संत रामदास महाराजांनी म्हटल्याप्रमाणे केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे या उक्तीनुसार आपण सर्वांनी पाण्यासाठी हे काम केले पाहिजे. सध्या राज्यात पाणीदार गावासाठी वॉटरकप स्पर्धा चालू आहे. राजीव तिडके नावाच्या एका शिक्षकाने यासाठी आपला एक महिन्याचा पगार देऊ केलाय हे खरोखरच अभिनंदनीय आणि स्तुत्य आहे. अश्या कार्यासाठी प्रत्येकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन कार्य करणे आवश्यक आहे. जलयुक्त शिवार योजनेमधून देखील पाण्याचे बचत आणि वापर करता येऊ शकतो. या योजनेमुळे अनेक गावे टँकरमुक्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. आत्ता खरी गरज आहे हे होऊ शकते असे प्रत्येकाच्या इच्छा शक्तीची.
- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक तथा प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769