कुलदीपक
शिल्पाला मुलगा झाला ही बातमी तिच्या सासूच्या कानावर गेली तशी तिची सासू कमलाबाई खूपच आनंदून गेली. वंशाला दिवा मिळाला म्हणून शेजारी पाजारी आनंदाने सांगत सुटली. शिल्पा सरकारी दवाखान्यात होती, सोबत तिचा नवरा दीपक देखील हजर होता. घरातील काम आटोपून कमलाबाई लगेच दवाखान्यात जाण्यासाठी निघाली. तिला खरोखरच आज खूप आनंद झाला होता. कारण ही तसेच होते, तिला देखील चार मुलींच्या नंतर दीपक झाला होता. तर सुनेला देखील चार मुलीनंतर आज मुलगा झाला. वंश चालविण्यासाठी मुलगा हवाच हा कमला बाईच्या सासूचा तिला तगादा होता, तोच तगादा तिने आपल्या सुनेकडे लावून धरला. तिला सगळ्या गोष्टीची जाणीव होती पण ती त्यातून काही शिकली नाही आणि आपला हट्ट पूर्ण करून घेतली. काही वेळांत ती दवाखान्यात पोहोचली, पाळण्यात तिचा नातू हात पाय हलवत खेळत असतांना पाहून तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू गळाले. नातूच्या आनंदात ती सारेच विसरून गेली होती. या वंशाच्या दिव्याला जन्म देणारी सून कशी आहे याची विचारपूस करण्याचे तिला जराही भान राहिले नाही. थोड्या वेळाने ती भानावर आली आणि आपल्या दीपकला विचारू लागली, " सुनबाई कुठे आहे ? बाजूच्या रूममध्ये ठेवलं आहे का ? " यावर दीपक काही बोलत नव्हता, खाली मान घालून उभा होता, त्यांच्यामध्ये बोलण्याची शक्तीच नव्हती. तिथे उभे असलेल्या नर्सने सांगितले की, " बाळाची आई आता या जगात नाही राहिली, बाळाला जन्म देताक्षणी काही वेळांत तिचा मृत्यू झाला. " हे ऐकून कमलाबाईला अस्वस्थ वाटू लागले. हाय रे देवा हे काय झाले ? असे ओरडत कपाळावर हात मारत रडू लागली. पण वेळ निघून गेली होती. आता काही जरी केले तरी बाळाची आई शिल्पा काही परत येणार नव्हती. दीपकने आईला खूप समजावून सांगितलं होतं पण कमलाबाई त्याचे काही एक ऐकत नव्हती, वंशाचा दिवा पाहिजे म्हणजे पाहिजे असा तिचा हट्ट होता. त्याच हट्टापायी आज शिल्पा जग सोडून गेली होती. तिशीच्या वयात तिचं संपूर्ण आयुष्य संपून गेलं. शिल्पा दिसायला सुंदर जरी नसली तरी नाकी डोळे छान असल्यामुळे पहिल्याच मुलगी पाहणे कार्यक्रमात दीपकने तिला पसंद केले होते. दीपक शहरातील एका दुकानात काम करत होता. तिला देखील दीपक पसंद होता. त्या दोघांचे थाटामाटात लग्न पार पडले. त्यांचा सुखाचा संसार सुरू झाला. तिला दिवस गेल्याचे कळताच सासूबाईला खूप आनंद झाला. ती नेहमी म्हणायची, " बाई, मला नातूच हवा." तिचं हे नेहमीचे बोलणे ऐकून शिल्पाला टेंशन येत असे. मुलगा किंवा मुलगी होणे आपल्या हातात नाही असे ती आपल्या सासूबाईला सांगायची पण ती आपला हट्ट काही सोडत नसे. त्या दिवशी खूपच पोटात कळ उठल्यामुळे दीपक तिला घेऊन सरकारी दवाखान्यात गेला. तिची प्रसूती झाली आणि मुलगी झाली. मुलगी झाली हे कळताच शिल्पाच्या चेहऱ्यावर काळजीची एक लकेर उठून दिसत होती. सासूबाई आता खूप बोलणार याची तिला भीती वाटत होती. मात्र त्याच वेळी दीपक तिला धीर देत होता. सासूबाईला मुलगी झाल्याची गोष्ट कळाली तसे ती हुप्प होऊन बसली. घरात सून आली सोबत लक्ष्मी घेऊन आली तरी तिचे तिला काही सोयरसुतक नव्हते. ती आपल्या सुनेचा तिरस्कार करू लागली. शिल्पाचा यात काही एक दोष नव्हता तरी देखील तिला याचा त्रास सहन करावा लागत होता. असेच दिवस सरत होते. शिल्पाला दुसऱ्यांदा दिवस गेले तसे पुन्हा सासूबाईचा एकच तगादा चालू होता. " मला नातू हवा." शिल्पाचे दुर्दैव असे होते की यावेळी देखील तिला मुलगीच झाली. दीड वर्षाच्या अंतरात ही दुसरी मुलगी झाली होती. कुटुंब नियोजन करण्यावर दीपक आणि शिल्पा यांचे एकमत झाले होते मात्र कमलाबाई यास विरोध करत होती. " नातू म्हणजे वंशाचा दिवा आहे. त्याशिवाय घर कसे चालणार ? ते काही नाही, नातू हवाच ". आईच्या हट्टापुढे दीपकला देखील काही करता येत नव्हते. त्यानंतर शिल्पाला एक वेळा गर्भपाताचा सामना करावा लागला आणि नंतर दोन मुली झाल्या. यामध्ये तिचे शरीर पूर्णपणे खंगुन गेले. सासूबाईला काही म्हणावं तर ती म्हणत असे, " चार मुलीवर मला दीपक झालंय, तुला ही तसंच होईल. या घराची तशी परंपरा आहे. पाच लेकरं जन्मास घालून ही मी कशी ठणठणीत आहे. तुला काय होईल ?" असे ती नेहमी बोलायची. तिच्या तब्येतीकडे अजिबात लक्ष दिले नाही. दिवसेंदिवस तिची तब्येत खालावत चालली होती. डॉक्टरने देखील तिच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले होते मात्र सासूबाईने त्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. शेवटी जे होऊ नये तेच झालं. नातूच्या हट्टापायी शिल्पाला आपला जीव गमवावा लागला. नातू झाल्याचा आनंद झाला मात्र या बाळाला सांभाळणारी आई या जगात राहिली नाही याचे दुःखही वाटत होते. वंशाच्या दिव्यासाठी नाहक हट्ट केला याचा राहून राहून कमलाबाईला पश्चाताप वाटत होता. दीपक भान हरवल्यासारख शून्य नजरेने छताकडे पाहत उभा राहिला. त्याच्या डोळ्यासमोर चार मुली आणि या नवजात मुलाचे जीवन मरणाचा प्रश्न कसा सोडवावे याची काळजी लागली होती.
- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक तथा स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769
-