Sunday, 29 December 2019

30 डिसेंबर 2019 सोमवार

*उपक्रम - फलक लेखन आणि वाचन*
                 *वाचू आनंदे*
   दिनांक - 30 डिसेंबर 2019 सोमवार
••••••••★••••••••••★••••••••••★•••••••••••
कृती - 
*शिक्षकांनी वर्गनिहाय खालील उताऱ्याचे प्रथम फलक लेखन करावे.*
*त्यानंतर विद्यार्थ्यांकडून वाचन करून घ्यावे.*
*वाचन संपल्यानंतर वहीत लिहिण्याची सूचना द्यावी.* 
*मग उताऱ्यावर आधारित सोपे प्रश्न विचारावे.*
••••••••★••••••••••★••••••••••★•••••••••••
वर्ग - पहिला आणि दुसरा

तळे सुंदर आहे.
तळ्यात बगळा उभा आहे.
तळ्यात मासे पोहत आहेत.
चटकन बगळ्याने मासा पकडला.

संकलन - सौ.सुनिता वावधाने,  सहशिक्षिका
जि.प.प्रा.शा.शहाजीनगर, ता.जि.नांदेड
••••••••★••••••••••★••••••••••★•••••••••••
वर्ग - तिसरा आणि चौथा

प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या 
गरजा जिथे पूर्ण होतात, तिथेच 
ते सजीव आढळतात. वाघाच्या 
गरजा गवताळ प्रदेशात पूर्ण होतात, 
म्हणून वाघ गवताळ प्रदेशात आढळतो. 
तर जी वनस्पती पाणवनस्पती नाही, 
ती पाणथळ जागी तग धरत नाही. 

संकलन - पवळे अर्चना                      
जि. प. प्रा. शाळा अजनी, 
ता.माहुर जि.नांदेड
••••••••★••••••••••★••••••••••★•••••••••••
वर्ग - पाचवा आणि सहावा

एकदा एक दयाळू शेतकरी होता. बऱ्याच वेळा, तो इतर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात मदत करायचा. पशुपक्ष्यांनाही प्रेम द्यायला त्याला आवडायचे. एके दिवशी तो शेतकरी जवळच्याच एका खेड्यात गेला. परत येत असताना त्याला रस्त्यात एक जखमी साप दिसला. त्याच्या अंगावरून एखादी बैलगाडी गेली असावी. त्याच्या जखमातून रक्तस्त्राव होत होता. त्या दयाळू शेतकऱ्याने त्या सापाला एका कपड्यात गुंडाळले आणि त्याला घरी घेऊन आला. घरी आल्यावर त्या शेतकऱ्याने जखमी सापावर औषध लावले आणि त्याला जंगलात सोडून दिला. 

संकलन - नासा येवतीकर, विषय शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा, धर्माबाद
ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769
••••••••★••••••••••★••••••••••★•••••••••••
वर्ग - सातवा आणि आठवा

छोटे आजार घरगुती उपचारांनी बरे होऊ शकतात. घरातील अनुभवी, वडीलधार्‍या व्यक्तींना असे घरगुती उपाय माहीत असतात. 
सदीर्मध्ये गरम पाण्याचा वाफारा घेतात, छाती शेकतात. उलट्या होत असतील तर लिंबाचे सरबत देतात. पूर्वी आजीचा बटवा म्हणून असे काही उपचार केल्या जात असत. प्रथमोपचार म्हणून ते खूपच फायदेशीर ठरतात.    

दिपश्री वाणी, सहशिक्षिका
जि प प्राथमिक शाळा आर्वी
ता हवेली, जि पुणे
••••••••★••••••••••★••••••••••★•••••••••••
मुख्य संकलन - नासा येवतीकर, विषय शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा, धर्माबाद
ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769
••••••••★••••••••••★••••••••••★•••••••••••

Thursday, 26 December 2019

संतोष कंदेवार वाढदिवस शुभेच्छा


श्री संतोष कंदेवार यांचा 
प्राथमिक शिक्षक ते मुख्य लेखाधिकारीचा प्रवास

प्राथमिक शिक्षक ते मुख्य लेखाधिकारी असा प्रवास करणारे संतोष हणमंतराव कंदेवार साहेब यांचा आज वाढदिवस. नांदेड शहरात दिनांक 29 डिसेंबर 1978 रोजी त्यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील हणमंतराव कंदेवार हे उमरा येथील शाळेतुन सहशिक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत तर त्यांची आई सौ. रेणुका ह्या गृहिणी आहेत. श्री हणमंतराव आणि सौ. रेणुका यांना तीन अपत्ये त्यापैकी संतोष हे पहिले अपत्य असून त्यांना सुषमा व स्वाती असे दोन बहिणी आहेत. संतोष यांचे घरातले नाव राजू असे आहे. आज ही घरात त्याच नावाने त्यांना बोलाविले जाते. त्यांचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण उमरा ता. लोहा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले तर त्यापुढील पाचवी ते दहावीचे शिक्षण गोकुळनगर मधील पीपल्स हायस्कुल येथे पूर्ण झाले. या शाळेतून त्यांना संजय डाड, चैतन्य दलाल, भूषण परळकर, राजेश उमरेकर, कै. सुरेश सोळंकी, अर्जुन वाकोरे, उमाकांत शिंदे, सचिन तांबट, योगेश जंगले, प्रकाश पाटील, पराग देशमुख, दामोदर डहाळे, डॉ. सुरेश तेलंग, डॉ. पावडे, शिवा टाले, सुनील देबडवार, भगवान तेलंग, उल्हास देबडवार, किरण पाटील, सचिन भोजनकर, गणेश कल्याणकर यासारख्या मित्रांची साथ मिळाली. नांदेडच्या यशवंत महाविद्यालयातुन त्यांनी विज्ञान शाखेतून अकरावी आणि बारावीचे शिक्षण पूर्ण केले. याच ठिकाणी माझी आणि त्यांची भेट झाली. संतोषमुळे मला त्यांची टीम भेटू शकली. मी ग्रामीण भागातून शहरात आलो होतो मात्र ह्या टीम मधील एकाही मित्राने मला कधी ही त्रास दिला नाही उलट मला त्यांचे सहकार्यच मिळाले. आमची मित्रमंडळी म्हणजे अख्खी क्रिकेट टीम होती राखीव खेळाडूंसह. आम्ही कॉलेजात कधी दंगामस्ती किंवा धिंगाणा न करता मैत्रीपूर्ण वातावरणात राहत होतो. त्याचमुळे कॉलेज जीवन संपल्यावर देखील आम्ही सर्व मित्र मैत्रज्योत या समूहात आज ही एकत्र राहत आहोत याचा आम्हांला नक्कीच अभिमान आहे. अर्थातच याचे श्रेय संतोष कंदेवारसह सर्वाना जाते. इंजिनीरिंग साठी औरंगाबादच्या JNCE कॉलेजमध्ये त्यांचा नंबर लागला होता, परंतु त्यांची घरच्या परिस्थितीमुळे त्यांनी D Ed करण्याचा निर्णय घेतला, मग नाईलाजाने शिक्षणशास्त्र म्हणजे डी एड कडे वळावे लागले. नांदेडच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्रातून त्यांनी आपले डी एड पूर्ण केले. येथे त्यांची मैत्री नांदेडमधील सुप्रसिद्ध निवेदक दिवाकर चौधरी यांचेशी झाली. त्यानंतर त्यांनी पुढील अभ्यास चालू ठेवण्यासाठी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मध्ये पदवीच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला. नोकरीची सुरुवात वयाच्या 19 व्या वर्षी माधवराव पाटील विद्यालय राजगडनगर नांदेड येथील खाजगी शाळेतून केली व त्यानंतर जिल्हा परिषद शाळा बोरवाडी ता. भोकर येथे दीड वर्ष प्राथमिक शिक्षकांची नोकरी केली मात्र त्यांना त्यात स्वारस्य नव्हते. म्हणून त्यांनी त्या नोकरीचा राजीनामा दिला आणि ज्या शाळेत पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले होते त्याच गोकुळनगरच्या पीपल्स हायस्कुलमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली. या शाळेत त्यांना अरविंद काळे, विनोद टेकाळे आणि राजाराम राठोड सारखे जिवाभावाचे शिक्षक मित्र भेटले. येथे असतांनाच त्यांची पदवी पूर्ण झाली आणि त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. येथे त्यांनी चार वर्षे शिक्षक म्हणून नोकरी केली. त्यांच्या अंगी असलेली अभ्यासू वृत्ती, जिद्द आणि चिकाटी यामुळे या स्पर्धा परीक्षेत त्यांनी यश मिळविले आणि सर्वप्रथम हिंगोली जिल्ह्यात त्यांना लेखाधिकारी म्हणून नेमणूक मिळाली. त्यानंतर नांदेड जिल्हा परिषदेत लेखाधिकारी म्हणून काही काळ काम पाहिले. चंद्रपूर येथे पदोन्नतीने मुख्य लेखाधिकारी म्हणून रुजू झाले. तेथे काही काळ काम केल्यानंतर ते नांदेड महानगरपालिकेत मुख्य लेखाधिकारी म्हणून काम पाहिले. काही काळ त्यांनी याच पालिकेत उपायुक्त म्हणून देखील काम पाहिले होते. नांदेड महापालिकेत त्यांनी उपायुक्त म्हणून काम करताना धडाडीची कामे केली होती. त्यात अतिक्रमण काढणे, कर वसुली करणे यात त्यांचा पुढाकार महत्वाचा होता. प्रशासनातील त्यांची ही शिस्त काही जणांना कठीण वाटत असली तरी काही काळानंतर त्याचे महत्व पटले हे विशेष. त्यानंतर ते वाशीम जिल्ह्यात सहाय्यक संचालक , स्थानिक निधी लेखा अधिकारी येथे काम केले. सध्या नांदेड येथील सहाय्यक संचालक, स्थानिक निधी लेखा परीक्षा कार्यालयात लेखाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आपल्या कामातील शिस्त आणि वक्तशीरपणा यासाठी ते ओळखले जातात.
त्यांना क्रिकेट खेळाची खूप आवड होती, आमच्या क्रिकेट संघात ते जलद गोलंदाज म्हणून ओळखले जात. त्यांची फलंदाजी देखील उत्तम होती. आज ही ते आपल्या शरीराची योग्य देखभाल करताना सकाळची मॉर्निंग वॉक, योगा, व्यायाम नियमितपणे करतात. त्याचसोबत त्यांना वाचन-लेखनाची देखील आवड आहे. तसेच ते उत्तम चित्रकार आणि गायक देखील आहेत. फावल्या वेळात ते आपला छंद आजही जोपासतात. त्यांच्या पत्नीचे नाव सौ. संगीता नामेवार असून त्या जिल्हा परिषद नांदेड मध्ये प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांना दोन अपत्ये आहेत. त्यापैकी मोठा मुलगा आदर्श आपले इंजिनियरिंग शिक्षण पूर्ण करून UPSC परीक्षेची तयारी करत आहे तर छोटा मुलगा आयुष अकरावी विज्ञान वर्गात शिक्षण घेत आहे. सुसंस्कारी घरात वावर असल्यामुळे त्यांच्यावर योग्य प्रकारचे संस्कार झाले आहेत. आज जरी ते मोठ्या पदावर विराजमान झाले असले तरी बालपणी, शालेय आणि महाविद्यालयीन मित्र परिवारास ते विसरत नाहीत. सर्वांच्या सुखदुःखात सामील होतात. त्यांचे भावी आयुष्य सुख समृद्धीचे, समाधानाचे आणि प्रगतीचे जावो हीच आजच्या 44 व्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा .....!

शब्दांकन : नागोराव सा. येवतीकर
विषय शिक्षक तथा स्तंभलेखक
9423625769

Saturday, 7 December 2019

एकच ओळखपत्र

एक व्यक्ती एक मतदान 



राष्ट्रीय मतदार पडताळणी मोहिमेतून मतदार याद्याचे शुद्धीकरण करण्यात येणार असून बोगस मतदान टाळण्यासाठी देशभर एक व्यक्ती एक मतदान करण्याचा निवडणूक आयोगाने निर्णय घेतला असल्याची बातमी नुकतेच वाचण्यात आले. खरोखरच त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करायलाच हवे. आजची मतदार यादी जर नजरेखालून घातली तर असे लक्षात येते की त्या यादीतले पाच ते दहा टक्के मतदार हे मयत, दुबार किंवा स्थलांतरित असतात. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाची टक्केवारीवर देखील याचा परिणाम दिसून येतो. त्याचसोबत काही मतदारांचे नाव दोन ठिकाणी आढळून येते. खास करून सीमावर्ती भागात काही मतदारांचे नावं दोन राज्यात असतात आणि ते दोन्ही राज्यात मतदान करून दोन्ही राज्यांतील योजनांचा लाभ घेत असतात. काही जणांचे एका राज्यात असून देखील दोन ठिकाणच्या मतदार यादीत नाव असते. अश्या बाबीवर नियंत्रण आणण्यासाठी निवडणूक आयोगाने जे पाऊल उचलले आहे ते अभिनंदनीय आणि स्वागतार्ह आहे. यासाठी निवडणूक आयोग काय योजना तयार केली आहे याची माहिती मतदारांना होणे आवश्यक आहे. याबाबतीत पहिल्यांदा मतदार जागरूक होणे गरजेचे आहे. ही पडताळणी करताना मतदारांस आपला मोबाईल क्रमांक आणि त्याचे आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्मदाखल्यासह आवश्यक कागदपत्रे अपलोड करावयाचे आहे. त्यामुळे एक व्यक्ती देशभरात कुठे ही एकाच ठिकाणी आपले नाव मतदार यादीत नोंदवू शकणार आहे. त्याला एकदाच मतदान करता येणार आहे. ग्रामपंचयात, नगरपालिका, मनपा, जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी बोगस नोंदणी केली जाते असे दिसून आले आहे. त्यामुळे याबाबीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आयोगाने हे पाऊल उचलले आहे. संबंधित मतदारांच्या मोबाईल वर एक मेसेज येईल ज्याद्वारे मतदाराला स्वतः ला एक लॉगिन आय डी आणि पासवर्ड तयार करावे लागणार आहे. त्याच क्रमांकावर वन टाइम पासवर्ड म्हणजे ओटीपी येणार आहे. त्याद्वारे मतदार लॉगिन करणार आहे. त्यामुळे एकापेक्षा जास्त नावाना हा क्रमांक वापरता येणार नाही. यासाठी आयोगाचे बिलओ मतदारांना सर्वतोपरी मदत करणार आहेत. आयोगाने सुरू केलेल्या या कार्यक्रमात सर्वच मतदारांनी स्वतः हुन पुढे येत पडताळणी करून घेण्याचे आवाहन निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. देशातील बोगस मतदार शोधून ते कमी करण्याचे काम या कार्यक्रमातून होणार आहे. भारत हा जगातील लोकशाहीच्या माध्यमातून उभारलेला एक बलशाली राष्ट्र आहे. जेथे वयाची 18 वर्षे पूर्ण केलेला प्रत्येक भारतीय मतदान करू शकतो. त्याच्या एका मताला अमूल्य असे किंमत आहे. सध्या प्रत्येक घरात मोबाईल पोहोचले आहे पण एक समस्या असू शकते एखाद्या व्यक्तीजवळ मोबाईल नसेल तर काय करायचे ? त्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत ? याबाबत अजून काही माहिती कळाली नाही.  प्रत्यक्ष निवडणूक घेतांना मतदान ओळखपत्र सोबत अन्य पुरावे देखील ग्राह्य समजले जात असल्यामुळे मतदान ओळ्खपत्राचे महत्व खूप कमी झाले आहे. त्यामुळे मतदानासाठी मतदान ओळखपत्र सक्तीचे करण्यात यावे. ज्याच्याजवळ मतदान ओळखपत्र नसेल त्यांना तहसील कार्यालयातून ओळखपत्र उपलब्ध करून देण्याची सुविधा निर्माण करावी. प्रत्येक नागरिकांकडे आज आधारकार्ड आहे. कारण त्याचा उपयोग अनेक ठिकाणी केला जात आहे. यदाकदाचित ते कार्ड हरवले असेल तरी ऑनलाइन उपलब्ध होते. तशीच काही क्रिया मतदान ओळ्खपत्रासाठी करता येईल काय ? यावर विचार मंथन होणे आवश्यक आहे. मतदान प्रक्रियेत सहभागी न होणाऱ्या मतदारांना पुढे चालून काही दंड भरण्याची तरतूद देखील करण्याचा विचार आयोगाने करायला हवे. मतदान करण्याविषयी लोकांमध्ये किती ही जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी शिकले सवरलेले मतदार मतदान प्रक्रियेपासून दूर राहतात. मतदानासाठी सुट्टी देऊन देखील कर्मचारी मतदान करण्या ऐवजी त्या सुट्टीचा उपयोग सहलीसाठी करताना दिसून येतात. त्यामुळे या विषयी काही विशेष यंत्रणा तयार करून मतदान न करणाऱ्या मतदारांचा शोध घेऊन त्यावर अभ्यास करणे आवश्यक आहे. ह्या मतदारांनी मतदान का करू शकले नाहीत याचा शोध लावून अभ्यास करणे अत्यावश्यक आहे. यापुढील निवडणुकीत ऑनलाइन तंत्रज्ञानाचा उपयोग करून निवडणूक आयोग आपल्या निवडणूक प्रक्रियेत काही आमूलाग्र बदल करेल अशी आशा बाळगायला काही हरकत नाही. निवडणूक आयोगाच्या कोणत्याही योजनेत मतदारांचे सहयोग आणि सहकार्य असल्याशिवाय ती योजना सफल होत नाही. म्हणून मतदारांनी सजग होऊन आयोगाला सर्वतोपरी मदत करायलाच हवे, असे वाटते. 
- नागोराव सा. येवतीकर, स्तंभलेखक

Friday, 6 December 2019

स्मार्ट बॉय : काळाची गरज

*स्मार्ट बॉय : काळाची गरज*

हैदराबादच्या हायटेक सिटी मध्ये डॉ. प्रियांका रेड्डी हिच्यावर चार नराधमांनी आमनुषपणे अत्याचार करून पुरावा नष्ट करण्याचा हेतूने तिला जिवंत जाळले. 


भारतात हे पहिलेच प्रकरण आहे असे ही नाही. यापूर्वी देखील अश्या अनेक घटना घडल्या आहेत मग त्यात निर्भया प्रकरण असेल किंवा असिफा प्रकरण. यात माणुसकीला काळिमा फासणारी कृत्य घडलेले आहे. अश्या लोकांना एकदम कडक शिक्षा व्हायलाच पाहिजे पण त्यापूर्वी हे असे का घडत आहे, यावर ही चिंतन होणे अपेक्षित आहे. नवतरुण युवक असे मार्ग का अंगिकारत आहे ? यावर ही संशोधन व्हायलाच हवे. अश्या घटनांचा विरोध करण्यासाठी मुलीने स्वतः ला तयार केले पाहिजे. कराटे शिकले पाहिजे, मुलांना प्रतिकार करता येईल असे काही केले पाहिजे, अर्थात स्मार्ट गर्ल व्हायला पाहिजे असा एक सुर सध्या सर्वत्र ऐकायला आणि पाहायला मिळत आहे. त्याऐवजी आपल्या घरातील मुलांना स्मार्ट बॉय करायला पाहिजे यावर कुठे ही चर्चा होतांना दिसत नाही. मुलांना नैतिकतेचे धडे शिकविले तर ही नामुष्की नक्कीच येणार नाही. त्यासाठी प्रशासन देखील तेवढेच कठोर कायद्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
घरातून नैतिकतेचे शिक्षण -
आपल्या घरात असलेल्या मुलांना सर्वप्रथम नैतिकता शिकवायला हवी. कोणासोबत कसे वागावे, बोलावे ? याचे शिक्षण देणे गरजेचे आहे. पालकांनी वाढत्या वयाच्या मुलांसोबत मित्रासारखे संबंध ठेवून त्यांच्याशी संवाद करत राहणे आवश्यक आहे. दहाव्या उत्तीर्ण झाले की आज मुलांना मोबाईल आणि गाडी याची आवश्यकता भासत आहे. या दोन वस्तू दिल्याशिवाय तो पुढील शिक्षण घेणार नाही असे स्पष्टपणे बोलतांना दिसत आहेत. या दोन गोष्टी मुळेच आजची मुले अनैतिक मार्गाकडे वळत आहेत. गाडी आणि मोबाईल म्हटलं की पॉकेटमनी देखील आलेच. आजकाल पालकांकडे पैसा ही मुबलक प्रमाणात असल्याने ते ही मुलांना पॉकेटमनी देत राहतात. याचे विपरीत परिणाम पाहायला मिळते. सध्या मोबाईलवर अनेक प्रकारचे वेबसाइट उपलब्ध आहेत जे की, या युवकांना वाईट मार्गावर घेऊन जातात. मित्रपरिवारामध्ये हळूहळू ही बाब गंभीर वळण घेत जाते. काही खराब मित्रांच्या संगतीमुळे मुलगा वाईट बाबीकडे वळायला लागतो. उरलेल्या पैश्यातून मग त्याला दारू पिणे, सिगारेट ओढणे, तंबाखू खाणे, मुलींच्या मागे लागणे यासारखे घाणेरडे व्यसन लागतात. या वयातील मुले मग एका संधीची वाट पाहत असतात. ज्याप्रकारे जंगलात शिकारी आपल्या शिकारच्या शोधात असतो अगदी तसेच. म्हणूनच आपल्या घरातील मुले या वेगळ्या वळणावर जाणार नाहीत याची काळजी प्रत्येक पालकांनी घेणे आवश्यक आहे. घरातली मुलगी सात च्या आत घरात राहावे असे वाटते तर मुलगा रात्री किती वाजता ही आलेले आपणांस चालते, यात पहिल्यांदा बदल करणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी राक्षसांचा संचार असतो आणि या कचाट्यात मुलगी येऊ नये याची काळजी जसे आपण घेतो तशीच काळजी पालकांनी मुलांच्या बाबतीत देखील घ्यायला हवी. मुलांचा मोबाईल दर आठ दिवसांनी किंवा अधूनमधून कधी ही न सांगता तपासून घ्यायलाच हवे. याची मुलांच्या मनात भीती असेल तर तो मागेपुढे विचार करू शकतो. मुलांना देत असलेल्या प्रत्येक पैश्यांचा हिशेब देखील घ्यायलाच हवं आणि सोबत त्यांच्या मित्रांची देखील एकदा ओळख करून घ्यावी. या सगळ्या गोष्टी पालक म्हणून आपण कटाक्षाने करत असू तरच आपली मुलं स्मार्ट बॉय होऊ शकतात.
प्रशासनाने कडक व्हावे - असे अनैतिक प्रकार थांबविण्यासाठी प्रशासन अगदी कडक भूमिका घेणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी गाडीवर फिरणारे युवक दिसले तर त्यांची कसून चौकशी व्हायलाच पाहिजे. एक दोन वेळा अशी चौकशी झाली तर रात्रीच्या वेळी फिरायला हे युवक कचरतील. मोठ्या शहरात रात्रीच्या वेळी काही युवक मंडळी शाळेच्या मैदानात किंवा उघड्यावर जेथे रात्रीला कोणीच येत नाही अश्या निर्मनुष्य ठिकाणी चार पाच मित्र मिळून कॉकटेल पार्टी करतात. ह्या बाबीवर पोलीस प्रशासन नियंत्रण आणू शकते. रात्री सात ते दहा या वेळांत एकदा पेट्रोलिंग केलं की अश्या गोष्टीवर आळा बसू शकतो. ह्या वयातील मुले नशेच्या धुंदीत असे दुष्कृत्य करतात. त्यावेळी त्यांचे डोके सैतानाचे बनलेले असते. त्याचसोबत ह्या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षाच दिली पाहिजे तसा वटहुकूम देखील काढण्यात आला आहे. पण त्याची कडक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. कायद्याची भीती मनात बसल्याशिवाय ही मंडळी घाबरणार नाहीत. चांगल्या घरातील आणि सुसंस्कारी घरातील मुले असे दुष्कृत्य सहसा करत नाहीत. ज्या मुलांकडे लक्ष देण्यास कोणी वालीच नसतो, अश्या मुलांकडून असे कृत्य होते. म्हणून समाजातील अश्या मुलांचा शोध घेणे आवश्यक आहे. ज्यांच्या हाताला काही कामधंदा नसते अशी मुले गैर मार्गाला लागतात. म्हणून प्रत्येक गावात आणि शहरातील वॉर्डात रिकामटेकडे मुलांचा शोध घेऊन त्यांच्यावर पाळत ठेवणे ही गरजेचे आहे. कमी वयोगटातील मुले काही ठिकाणी गैरवर्तन करत असतील तर त्यांना वेळीच अटकाव करणे गरजेचे आहे हे हैद्राबादच्या घटनेतुन शिकायला मिळते. भारत देश महिलांसाठी असुरक्षित देश आहे ही काळिमा प्रशासनाच्या सहकार्याशिवाय शक्य नाही. अशी घटना यापुढे घडणार नाही याची काळजी देशातील प्रत्येकाने देखील घेणे गरजेचे आहे, असे वाटते. ( लेख लिहीत असतांनाच हैद्राबादच्या त्या चार नराधमाचे एंकौंटर झाले अशी बातमी कानावर धडकली. )

- नागोराव सा. येवतीकर, स्तंभलेखक
www.nasayeotikar.blogspot.com

  

रानमेवा - बोरं

रानमेवा - बोरं

खास करून हिवाळा ऋतूमध्ये अनेक फळे खाण्यासाठी उपलब्ध होतात जसे जांभ आणि बोरं. ही दोन्ही फळं खाल्याने सर्दी आणि खोकला होण्याचा धोका असतो म्हणून पालक वर्ग मुलांना हे फळं खान्यापासून मज्जाव करतात. तरी देखील मुलं चोरी चोरी चुपके चुपके खातातच. सायंकाळच्या वेळेला जेंव्हा शिंक येते त्यावेळी आई बरोबर ओळखते आणि बोरं किंवा जांभ खाल्लं का ? म्हणून जोरात बोलते. लहान मुलांना खास करून आवडणारे फळ म्हणजे बोरं. जंगलातील हा रानमेवा. झिझिफस मॉरीटिएना नावाच्या जातकुळातील हे फळ असून ते भारतात बोर नावाने प्रचलित आहे. याशिवाय ते ‘जुजुबी’, ‘चायनीज डेट्स’ किंवा ‘चायनीज अ‍ॅपल’ या नावांनीही ओळखलं जातं. तसं पाहिलं तर गावालगत बोराचे अनेक झाडं असतात. ज्या झाडांची बोरं आंबट असतात त्या झाडाकडे सहसा कोणी फिरकत नाही. मात्र ज्या झाडांची बोरं गोड असतात त्या झाडाजवळ अनेक मुलं गोळा होत असतात. काही जणांच्या मालकीची देखील ही झाडं असतात त्यामुळे ते या झाडांची रखवाली करतात. ग्रामीण भागात वृद्ध मंडळी सहसा या झाडांची रखवाली करताना दिसून येतात. काही मंडळी टोपल्यात ती बोरं जमा करतात आणि गावात विक्री करतात. शाळेतील लहान मुले ही त्यांची खास गिऱ्हाईक होत. अनेक वेळा शाळेत मुले बोरं खातात आणि बोराच्या वर्गात टाकतात त्यामुळे शिक्षक मुलांवर खूप रागावतात. ते कितीही रागावले तरी मुलांचा बोरं खाण्याचा सिलसिला काही बंद होत नाही. बोरं विशिष्ट उग्र वासामुळे पटकन लक्षात येते. याचा उपयोग लोणचं टाकण्यासाठी सुद्धा केला जातो. ज्या ऋतूत जी फळं येतात ती फळं खाल्याने त्याचा वर्षभर फायदा होतो असे आयुर्वेद सांगते. म्हणून ही फळं खायलाच हवी. गोड बोरं, आंबट बोरं आणि खारका बोरं असे काही बोराचे प्रकार आहेत. काही बोरं म्हातारी बोरं म्हणून देखील ओळखले जातात. कच्चे बोरं हिरव्या रंगाचे तर पिकलेले बोरं तपकिरी रंगात दिसून येतात. सहसा हिरव्या रंगाच्या बोरात किडे असत नाहीत मात्र पिकलेल्या बोरात किडे असण्याची शक्यता असते म्हणून ती बोरं बघून खावं लागते. बोरं हे खास करून मुलांपेक्षा मुलींना खूप आवडते. बोरीवरून काही गावांचे नाव देखील वाचायला मिळते. तर काही म्हणी आणि वाक्प्रचार देखील आहेत. ज्या गावच्या बाभळी, त्याच गावच्या बोरी. सध्या संकरित बोरं जे की जांभासारखे मोठे आहेत. त्यात गावरान बोराची चव नक्कीच मिळत नाही. हिवाळ्यात येणारी ही बोरं काही कुटुंबाची रोजगार ठरत असते. म्हणून कोणाच्या डोक्यावर बोराची टोपली दिसत असेल तर नक्की त्या बोराची चव चाखून बघायलाच हवी. जी मजा गावरान बोरं खाऊन मिळते ती मजा त्या संकरित बोरात नक्कीच मिळणार नाही. आज ही बोरं बघितल्याबरोबर तोंडाला पाणी सुटणार हे मात्र नक्की.  

बोरं खाण्याचे अनेक फायदे आहेत. 

कर्करोगासारख्या आजारापासून शरीराचं संरक्षण करण्याचं काम करतं. कर्करोगाला प्रतिकार करणा-या पेशी वाढवण्याचं काम करतं.
यात भरपूर प्रमाणात ‘क’ जीवनसत्त्व असल्यामुळे ते अँटिऑक्सिडंट म्हणूनही काम करतं.
ताण हलका करण्याची क्षमतादेखील या फळात आहे.
सर्दी किंवा शीतज्वरापासून बचाव होण्यास मदत होते. एक चमचा बोराचा रस आणि काळी मिरी यांचं सेवन केल्यास सर्दीपासून संरक्षण होतं.
अतिसार, थकवा तसंच भूक न लागणे आदी विकारांवरही हे अतिशय गुणकारी आहे.
बोर खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्तीदेखील वाढते.
त्वचा कोरडी होणे, काळवंडणे याचबरोबर सुरकुत्या येणे यासारखे विकार कमी करण्यास मदत करतं. त्वचेचं तारुण्य टिकवण्याची क्षमता यात आहे.
अस्थमा आणि मधुमेहाचा त्रास असल्यांनी बोरं आवर्जून खावी. रक्तातील साखर नियंत्रित राखण्याचं काम बोर करतं.
वजन कमी करण्यासही हे मदत करते.
‘अ’ जीवनसत्त्व असल्यामुळे नियमित बोर खाल्ल्यास पचनशक्ती सुधारते.
कॅल्शिअम आणि फॉफ्सरसचं प्रमाण अधिक असल्यामुळे हाडं आणि दातांच्या मजबुतीसाठी हे उत्तम आहे.

- नासा येवतीकर

Thursday, 5 December 2019

शेती दिवस


आमची माती आमची माणसं

काळी माती म्हणजे मानवाचे पालनपोषण करणारे महत्वाचे साधन आहे. या काळ्या मातीत शेतकरी दिवसरात्र मेहनत करून अन्नधान्य पिकवतो म्हणून तर माणसाला खायला दोन वेळचे जेवण मिळते. अन्यथा काय मिळालं असतं ? मातीमध्ये ही अनेक प्रकार आढळून येतात. मातीच्या प्रकारावरून शेतकरी धान्य पिकवीत असतो. त्या मातीचा अभ्यास शेतकऱ्यांना नसेल तर शेतात टाकलेलं बी चांगले उत्पन्न देईल याची खात्री नसते. म्हणून आपल्या शेतात कोणती पिके येतात याची माहिती प्रत्येक शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी मातीचा पोत कमी होत नव्हतं कारण त्या काळात शेतकरी आपल्या शेतात घरातील केरकचरा शेण आणि त्याचे मलमूत्र वर्षभर जमा करून शेतात टाकण्याचे काम करत. पण आजकाल असे कुठे ही दिसत नाही. आज सर्वत्र रासायनिक खतांचा वापर वाढल्याने मातीचा पोत खालावत चाललं आहे त्यामुळे उत्पन्न देखील वाढण्याच्या जागी कमी होत आहे. याच रासायनिक खताचा परिणाम मानवी जीवनावर देखील होत आहे. त्याचसोबत आज शेतीचे क्षेत्र हळूहळू कमी होत चालले असून त्याठिकाणी सिमेंटच्या घरांची जंगले उभारली जात आहेत. पुढील काही काळात ही काळी माती देखील पहायला मिळेल की नाही शंकाच निर्माण होत आहे. कवी विठ्ठल वाघ आपल्या तिफन कवितेत म्हणतात की, काया मातीत मातीत तिफन चालते. जेवढी ह्या काळ्या माईंची सेवा केली तेवढं जास्त फायदा मानवी जीवनाला होणार आहे. फार दिवसापासून डी डी सह्याद्रीच्या चॅनेलवर आपली माती आपली माणसं नावाची मालिका प्रसारित होते. या मालिकेची धून ऐकली की मनाला जरासे हायसे वाटते. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी मातीचे अनेक प्रयोग केले आहेत. आज ही वर्धा येथे महात्मा गांधीजी यांच्या सेवाश्रम मध्ये मातीचा वापर करून घरे बांधली जातात जे की हिवाळ्यात गरम आणि उन्हाळ्यात थंडगार हवा देतात. मातीचे अनेक उपयोग आहेत त्यांची माहिती करून घेणे आवश्यक आहे.

- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा धर्माबाद
ता. धर्माबाद जि. नांदेड, 9423625769

Wednesday, 4 December 2019

एक राष्ट्र, एक रेशनकार्ड


एक राष्ट्र एक रेशनकार्ड

गरीब लोकांसाठी रेशनकार्ड एक महत्वाचे साधन आहे. यामुळे गरिबातल्या गरीब लोकांना पोटभर खाण्यास मिळते. परंतु काही स्थलांतर करणाऱ्या लोकांना रेशन मिळविण्यासाठी आपल्याच गावात येऊन ठराविक वेळेत रेशन घ्यावे लागते. बहुतांश वेळा ते गावात येईपर्यंत कधी कधी रेशन संपण्याच्या घटना घडतात त्यामुळे रिकाम्या हाताने परत जावे लागते. मात्र नुकतेच अन्नधान्य पुरवठा मंत्री मा. रामविलास पासवान यांनी एक देश एक रेशनकार्ड योजना संपूर्ण देशात एक जून पासून राबविण्याचे सुतोवाच केले. सध्या 14 राज्यामध्ये पॉश मशीन द्वारे ही सुविधा सुरू झाली असून लवकरच 20 राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशात ही सुविधा सुरू करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी लोकसभेत सांगितले. त्यामुळे याचा फायदा सर्व लोकांना होणार आहे. विशेष करून स्थलांतरित लोकांना याचा जास्त फायदा होणार. आधारकार्ड आणि रेशनकार्ड यांचा समन्वय करून सदरील योजना अस्तित्वात येणार आहे. त्यामुळे या रेशनिंग मध्ये होणारा गडबड गोंधळ देखील काही अंशी कमी होण्यास मदत मिळेल. त्याच बरोबर रेशन दुकानात वर्षभर धान्य उपलब्ध करून दिल्या जाणार आहे त्यामुळे जनतेला जेव्हा गरज असेल तेंव्हा धान्य घेता येऊ शकेल. हे करत असताना परत एकदा सर्व्हे करून खऱ्या गरीब लोकांचा शोध घेणे आवश्यक आहे असे वाटते. दारिद्र्य रेषेखालील लोकांची यादी जी की खूप जुनी आहे त्यात देखील सर्व्हे करून खऱ्या लाभार्थ्यांचा त्यात समावेश केल्यास ही योजना सफल होऊ शकते. दारिद्र्य रेषेखालील यादीत आपले नाव समाविष्ट करण्यासाठी काही मध्यम वर्गीय आणि श्रीमंत लोकं प्रयत्न करतात त्यांच्यावर आळा घालणे आवश्यक आहे. लोकांना कमी दरात धान्य मिळत असल्यामुळे लोकं आळशी होत आहेत अशी ओरड देखील अधूनमधून ऐकायला मिळते. ग्रामीण भागात तर काम करायला देखील माणूस मिळत नाहीत असे ही बघायला मिळते. त्यामुळे खरे लाभार्थी शोधून त्यांनाच या योजने अंतर्गत लाभ मिळेल याकडे जातीने लक्ष देणे गरजेचे आहे. रेशन दुकानातील धान्य काळ्या बाजारात विक्रीला जातात असे अनेकवेळा निदर्शनास आले आहे. यापुढे असे होणार नाही याकडे ही लक्ष देण्याची खरी गरज आहे. समाजात असे ही काही गरीब लोकं दिसून येतात ज्यांच्याकडे धान्य खरेदी करण्यासाठी पैसे नसतात. असे लोकं कोणाकडून तरी पैसे उधार घेतात. रेशन दुकानात माल विकत घेतात आणि अन्यत्र विक्री देखील करतात. या सर्व बाबीचा विचार करून ही योजना कार्यान्वित करणे आवश्यक आहे, असे वाटते. 

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक तथा स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

Monday, 2 December 2019

करू नका


      .          ।। करू नका ।।

प्रेमाने बोलत रहा असे करू नका वाद
जीवनात चांगल्या गोष्टीना करू नका बाद

पती-पत्नीनी नेहमी रहावे एकोप्याने 
वाद वाढतील असे करू नका संवाद

संसारात सदा चढ-उतार येतच राहतात
जीवनातल्या कटु प्रसंगाना करू नका याद

मानवी जन्म आहे श्रेष्ठ मिळणार नाही पुन्हा 
जीवन आहे अनमोल असे करू नका बरबाद

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769


कविता - पाऊस


।। पाऊस ।।

आभाळ दाटले बघ नभी
होईल भरपूर बरसात
पाऊसधारा अंगावर झेलू
मनसोक्त नाचू या पाण्यात

वादळवारे लगेच सुटतील
ढगे पळतील वेगात
छत्रीविना पाऊस पाहू
भिजुन जाऊया पाण्यात

पडला जोराचा पाऊस
साचले पाणी खड्यात
कागदाची होडी करू या 
वाहून जाऊ द्या पाण्यात

थांबला एकदाचे पाऊस
खेळूया झिम्मड पाण्यात
एकमेकावर पाणी उडवू
खेळ आलाय पहा रंगात

- नासा येवतीकर, धर्माबाद


Saturday, 30 November 2019

कविता - मामाचे गाव

मामाचे गाव

मामाचे गाव 
खूपच छान
भेटतो सारे
होऊन लहान

मामाचे गाव
आहे लहान
लोकं सारी 
आहेत महान

मामाचे घर 
अगदी लहान
खेळायला मोठे 
अंगण छान

मामाच्या घरची
मिरची भाकर
खातांना वाटते
गोड गोड साखर

मामाच्या घरी 
दिवा वातीचा
तरी ही शोभून 
दिसते रात्रीचा

मामाच्या घरात 
नाही मुळीच टीव्ही
एकमेका संवाद
दुसरा पर्याय नाही

मामाच्या घरी आहे
मोठा काळा कुत्रा
चोरांना पळवून लावी
नव्हता मुळीच भित्रा

मामाच्या घरात
छोटेसे मनीमाऊ
दूध पितांना झालो
आम्ही भाऊ भाऊ

मामाचे गाव
आहे दूर दूर
जाताना मनात
नेहमी हूर हूर

मामाचे गाव
माझ्या मनात
कोरून ठेवलंय
हृदयाच्या कप्प्यात

मामाचे गाव
आवडते भारी
बालपणीचे मित्र
भेटतात सारी 

- नासा येवतीकर
9423625769

कविता - विठ्ठलाचा ध्यास

।। विठ्ठलाचा ध्यास ।।

मनी लागे आस
भेटावया खास
लागला तो ध्यास
विठ्ठलाचा

दूर ती पंढरी
मुखी नाम हरी
पायी चाले वारी
वारकरी

ऊन वारा पाणी
कुणी अनवाणी
संग अन्नपाणी
घेऊनिया

ओढ पंढरीची
पर्वा ना जीवाची
नाम जपायची
पांडुरंगा

सोडुनिया घर
चालला तो दूर
लागे हूर हूर
मनाचिया

- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769

पुस्तक

।। पुस्तक ।।

पुस्तक म्हणजे ज्ञानाचा झरा
पुस्तक म्हणजे माझा मित्र खरा

पुस्तक बोलतो माझ्याशी
पुस्तक ज्ञान देतो सगळ्यांशी

पुस्तकांचे असावे एक घर
वाचत बसावे दिवसभर

पुस्तक देतो स्नेह आणि प्रेम
आईच्या प्रेमासारखंच सेम

एकटा असतो जेंव्हा घरात
डोळे खुपसून असती पुस्तकात

पुस्तकाला करू नका दूर
त्याशिवाय मनाला लागते हूर

चला पुस्तकांशी मैत्री करू
आपल्या डोक्यात ज्ञान भरू

- नासा येवतीकर

विठ्ठल विठ्ठल

।। विठ्ठल विठ्ठल ।।

नाम विठ्ठल
काम विठ्ठल
माझे दाम ही
विठ्ठल विठ्ठल

कर्म विठ्ठल
मर्म विठ्ठल
माझा धर्म ही
विठ्ठल विठ्ठल

पुढे विठ्ठल
मागे विठ्ठल
माझ्या या देही
विठ्ठल विठ्ठल

उठता विठ्ठल
झोपता विठ्ठल
माझ्या सर्वस्वी
विठ्ठल विठ्ठल

चालता विठ्ठल
बोलता विठ्ठल
काम करता ही
विठ्ठल विठ्ठल

नासा येवतीकर, धर्माबाद

Friday, 29 November 2019

पालकांनी मुलांकडे लक्ष द्यावे



कुटुंब ही मुलांची पहिली शाळा असते. आई ही त्याची पहिली शिक्षिका असते तर वडील त्याचे दुसरे शिक्षक. वयाची सहा वर्षे पूर्ण होईपर्यंत म्हणजे शिक्षणासाठी शाळेत जाण्यापूर्वी तो घरातच वावरत असतो. या वयात मुलांना चांगले काही ऐकायला आणि बघायला मिळाले तर आपले मूल नक्की बुद्धिमान होऊ शकते. खास करून आईने मुलांना नेहमी काही ना काही ऐकू घालावे. उदाहरण म्हणून आपण राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन विचारात घेता येईल. मा जिजाऊ यांनी बाल शिवाजी यानाा लहानपणी रामायण आणि महाभारत यातील शूरवीरांच्या गोष्टी सांगितल्या त्यामुळे राजे घडले. प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांसाठी थोडा वेळ अवश्य काढावे. मुलांना असुरक्षित वाटणार नाही याची काळजी घ्यावी. कुटूंबातील वाद किंवा कलह मुलांच्या मनावर विपरीत परिणाम करत असतो. म्हणून कुटुंबात नेहमी प्रेमाचे आणि खेळीमेळीचे वातावरण असायला हवे. 
आपण लावलेले रोपटे चांगले वाढावे म्हणून त्यास आपण नित्यनेमाने पाणी टाकतो. सूर्यप्रकाशात त्याची वाढ चांगली होते. मुलांच्या बाबतीत देखील असेच आहे. मुलांच्या निकोप वाढीसाठी आईने पाण्याचे काम करावे तर वडिलांने सूर्यप्रकाश व्हावे. वयाच्या दहाव्या वर्षेपर्यंत मुलांकडे विशेष लक्ष दिले की पुन्हा त्यांच्याकडे खास लक्ष देण्याची गरज भासत नाही. तेंव्हा नुकतेच पालक झालेल्या आई वडिलांनी ही गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. 
- नासा येवतीकर, 9423625769

Tuesday, 26 November 2019

*।। समजदार नागरिक ।।*

*।। समजदार नागरिक ।।*

टाकू नका इथे तिथे कोठे केरकचरा
त्यामुळे होत नाही पाण्याचा निचरा
आपण सारे प्लास्टिकचा वापर टाळू या
निसर्गाचे नियम सारेच जण पाळू या

आपले जरासे समजपूर्वक वागणे 
वाढविते निसर्गातील सर्वांचे जगणे
बाहेर निघताना एक गोष्ट करू या
कापडी पिशवी सोबत बाळगू या

समजदारीचे आपले एक पाऊल
भावी पिढीला मिळेल खरी चाहूल
प्रत्येक गोष्टीचे सर्वांनी भान ठेवू या
आपण जगून इतरांना ही जगवू या

- नासा येवतीकर, विषय शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा धर्माबाद
9423625769

शिक्षकांना स्वातंत्र्य हवं

शिक्षकांना स्वातंत्र्य असावे

देशाचे भवितव्य शाळेतून घडत असते कारण येथेच देशाचा भावी आधारस्तंभ बनणारा विद्यार्थी शिक्षण घेत असतो. याच माध्यमातून समाज देखील घडत असतो म्हणून शाळा आणि तेथील सर्व यंत्रणा सक्षम असणे अत्यंत गरजेचे आहे. पन्नास वर्षांपूर्वी ची शैक्षणिक स्थिती आणि आजची शैक्षणिक स्थिती यात जमीन-अस्मानचा फरक आहे. मात्र एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, पन्नास वर्षांपूर्वीचे शिक्षक आणि आजचे शिक्षक यात देखील खूप फरक जाणवतो. आजचे शिक्षक पूर्वीच्या शिक्षकांपेक्षा खूप बुद्धिमान असून देखील पूर्वीच्या शिक्षकांप्रमाणे अध्यापन करू शकत नाहीत किंवा पूर्वीच्या शिक्षकांप्रमाणे विद्यार्थी घडवू शकत नाहीत. काय कारण असू शकते ? यावर विचारमंथन होणे आवश्यक आहे. 
त्याकाळी शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार झाला नव्हता त्याकाळी शिक्षण घेणे खूप मोठे आणि अवघड काम समजले जायचे. शाळा शिकणे हे येरागबाळ्याचे काम नाही असेच सर्वाना वाटायचे. शिक्षणासाठी त्यांना घरदार सोडून खूप दूरवर जावे लागायचे. त्यांना शिक्षणाचा छंद लागलेला असायचा आणि ते मिळविण्यासाठी ते अक्षरशः वेडे व्हायचे. त्यासाठी कसलाही त्रास झाला तरी ते सहन करायचे. गुरुजींनी शिक्षा केली म्हणून ते कधी पळून गेले नाहीत तर उलट त्यांची छडी वाचविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळाले होते. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे त्यांना कळून चुकले म्हणून तर अपार कष्ट सोसत अनेकांनी त्याकाळी शिक्षण घेतले. एक गोष्ट येथे लक्षात येते की, त्याकाळी शिक्षकांना कोणाची भीती नव्हती, त्यांना कोणाचा त्रास नव्हता. त्यांच्या डोळ्यासमोर एकच लक्ष्य होतं ते म्हणजे विद्यार्थी शिकला पाहिजे. त्यांना कोणाचेही दडपण नव्हते, ते अगदी मनमोकळेपणाने मुलांना शिकवायचे. माणसाच्या मनावर कशाचे दडपण नसेल तर माणूस उत्तम कलाकृती तयार करू शकतो, ते ही स्व इच्छेनुसार. तेच जर त्याच्यावर जबरदस्ती केली किंवा त्याच्या डोक्याला ताण देऊन काम करायला लावले तर तो उत्तम कार्य करेल याची खात्री नसतेच. दबावाखाली तो काही तरी चुकतो, कंटाळा तरी करतो किंवा कामचुकार पणा देखील करू शकतो. आज शिक्षणाच्या वर्तुळात काय घडत आहे तर हेच घडत आहे. आजच्या काळातला कोणताच शिक्षक आपल्या इच्छेनुसार कार्य करू शकत नाही. त्याला आखीव आणि रेखीव काम सोपविले जाते आणि हे एवढं झालंच पाहिजे असा ताण दिला जात आहे. मनमोकळेपणाने आज शिक्षकांना जगणे खूप अवघड आहे. दिलेल्या रस्त्याने गेलं तरच वेतन मिळणार अन्यथा नाही, अशी बंधने त्याच्यावर टाकण्यात येत असल्यामुळे आजचा शिक्षक मानसिक तणावाखाली वावरत आहे. स्वतः च्या मनाने जगण्याची त्याची पद्धत आज बंद झाली आहे. अधिकारी वर्गांचा त्याच्यावर खूप मोठा प्रभाव आहे. त्या प्रभावाखाली शिक्षक पूर्णपणे दबला जात आहे. घरातल्या कुटुंब प्रमुखांविषयी मनात प्रेम असण्याऐवजी भीती असेल तर घरातील लोकं तणावाखालीच वावरत असतात. अशीच काहीशी स्थिती आज निर्माण झाली आहे. हे केलंच पाहिजे असा आदेश शिक्षकावर काढला जातो. शासनाची सर्व कामे पहिल्या प्राधान्याने करायची आणि शिकविणे दुय्यम स्थानावर गेले आहे. शिक्षणाच्या विकासासाठी काय करता येईल यावर कधीही कोणी बोलत नाही मात्र इतर कामे शिक्षकांकडून कसे पूर्ण करता येतील याचा प्रामुख्याने विचार केला जातो. प्राथमिक शिक्षणाकडे साफ दुर्लक्ष केले जाते आणि दहावीचा निकाल चांगला लागला पाहिजे यासाठी कॉपी मुक्ती सारखी योजना राबवितात. झाड लहान असताना काळजी घेऊन त्याला खतपाणी योग्य प्रमाणात दिल्यास ते झाड मोठे झाल्यावर अपेक्षेप्रमाणे फळ देईल. पण प्राथमिक वर्गात अध्यापन करण्यासाठी पुरेशी शिक्षक संख्या देत नाहीत. दोन ते तीन वर्गासाठी एका शिक्षकांची नियुक्ती केली जाते तेंव्हा खरंच आपण याठिकाणी चुकत नाही का ? असे एकही शिक्षणतज्ञाना वाटत नाही, याचे आश्चर्य वाटते. प्राथमिक वर्गात पुरेशी शिक्षक संख्या असल्यास पुढील वर्गात अध्यापन करणे कठीण जात नाही. पण याच गोष्टी कडे अनेकांचे अजूनही लक्ष गेले नाही. आज ही महाराष्ट्रात आशा अनेक शाळा आहेत जेथे चार वर्ग एक किंवा दोन शिक्षक अध्यापनाचे काम करतात. त्याच सोबत शिक्षकांवर अनेक गोष्टीचे दडपण नेहमी टाकले जाते. सध्याचा शिक्षक नेहमीच दडपणाखाली वावरताना दिसतो. मागील काही दिवसांत याच दडपणाखाली काही शिक्षकांनी आत्महत्या केलेल्या घटना देखील घडले आहेत. 
शिक्षक तणावमुक्त असल्या शिवाय विद्यार्थी घडणार नाहीत, हे उघड सत्य आहे. म्हणून सर्वात पहिल्यांदा शिक्षकांना तणावमुक्त करून त्यांना स्वातंत्र्य मिळवून द्यायला हवे
- नागोराव सा. येवतीकर

लघुकथा - कळी उमलण्याआधीच ....!

कळी फुलण्याआधीच .....

घरात आज मांगल्याचे स्वरूप आले होते. सारेच जण अगदी आनंदात वावरत होते. फक्त गीताचे वडील पांडुरंगालाभ सोडून. नातेवाईकांना पाहून तो हसण्याचा प्रयत्न करत होता मात्र चिंतेची एक लकेर त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. गीताचा छोटा भाऊ गणेश इकडून तिकडे उड्या मारण्यात व्यस्त होता. त्याला देखील नवा कोरा ड्रेस मिळाला होता त्यामुळे तो जाम खुश होता. घरात आज खूप पाहुणे आले होते आणि त्यांच्या सोबत आलेल्या लहान बच्चे कंपनीमुळे तो खरोखरच आनंदी झाला होता. गीता दीदीला आज नवरी सारखं सजवले होते म्हणून तो अधूनमधून तिला सारखं म्हणत होता, " दीदी आज तुझं लग्न आहे का ? " पण दीदी या प्रश्नाला काहीच उत्तर देत नव्हती. गीताचे आत्या मामा मावशी काका हे सारे पाहुणे रात्रीच आलेले होते तर उर्वरित पाहुणे सकाळी सकाळी उतरले होते. निमित्त होतं, गीता दीदी मोठी झाली होती म्हणजे उपवर झाली होती. ही बातमी गीताच्या आईकडून पहिल्यांदा बाबाला कळाले. मग बाबांनी तसा निरोप पाहुण्यांना कळविले. एक तारीख निश्चित करण्यात आली, कार्यक्रम करण्याचा. गीता ज्यादिवशी उपवर झाली त्यादिवसापासून तिचे बाहेर जाणे बंद करण्यात आले. ती गावातल्याच सातव्या वर्गात शिक्षण घेत होती. तिची शाळा देखील बंद झाली. शाळेतील मॅडम त्यांच्या घरी जाऊन त्यांची भरपूर समजूत काढली पण सारे व्यर्थ ठरले. घरातील वाडवडील मंडळीनी तिला शाळेत पाठविण्यास नकार दिले. तसं गीताच्या मनात शिकण्याची खूप इच्छा होती मात्र तिच्या इच्छेचा विचार करणारा कोणी नव्हता. मुलगी उपवर झाली की सर्वात जास्त चिंता आणि काळजी मुलीच्या बापाला होत असते. कधी एकदा तिचे हात पिवळं करावं असे त्याला होऊन जाते. त्याला कदाचित कारण ही तसंच असू शकते की, रोजच्या पेपरमधल्या बातम्या वाचल्या की काळजात धस्स करतंय. मुलीचे लग्न होईपर्यंत बापाच्या काळजाला एक घोर लागलेले असते. कमी शिकलेल्या आई-बाबांना तर जरा जास्तच काळजी वाटायाला लागते. उपवर झालेल्या मुलीकडे गल्लीतले पोरं ही वाईट नजरेने पाहत असतात. गीताच्या बाबतीत ही तेच घडू नये म्हणून पांडुरंग काळजी करत होता. कार्यक्रमात खूप पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळी आली होती. कोंबडे आणि बकरे कापून सर्वाना मेजवानी देण्यात आली. गीता दिसायला सुंदर होती, त्यात आज अजून सुंदर दिसत होती. दृष्ट लागावी असे तिचे सौन्दर्य उजळून दिसत होते. त्याच पाहुण्यामध्ये एक पाहुणा गीताला पाहून आपल्या घरची सून करून घेण्याची माहिती दिली. तशी ही माहिती पांडुरंगाच्या कानावर गेली. सारं कार्यक्रमाची आवरा आवर झाल्यानंतर गीताच्या आई ला ही बातमी पांडुरंगाने सांगितली तशी ती देखील आनंदी झाली. दुसऱ्या घरात बसून गीता हे सारं ऐकत होती. तिच्या मनात चलबिचल चालू झालं होतं. तिला काही तरी बोलायचं होतं, मात्र कोणाला बोलणार ? ती मनातल्या मनात घाबरून गेली होती. दुसऱ्यांदा शाळेतील मॅडम तिला शाळेत घेऊन जाण्यासाठी आले होते, यावेळी मात्र आईने सरळ गीताचे लग्न ठरले आहे असे सांगितले. हे ऐकून मॅडमला धक्काच बसला. ते निमुटपणे शाळेत परत गेले. गीताला मॅडम शी बोलायचे होते मात्र तशी संधी मिळालीच नाही. एके दिवशी पाहुणे आले नि बघून गेले. ही फक्त औपचारिकता होती. गीता पसंद असल्याचा त्यांनी निरोप दिला. गीताच्या मनात काय आहे ? याचा कोणी ही विचार केला नाही. पाहुण्याचं घर खूप मोठं होतं, त्यांचा एकुलता एक मुलगा होता, भरपूर पैसा, धन दौलत होती. हे सारं पाहून पांडुरंग मागचा पुढचा विचार न करता स्थळ पसंद असल्याचे कळविले. दिवसेंदिवस गीता विचारात गढून राहू लागली. उपवर होण्यापूर्वी ची गीता आता दिसत नव्हती. निद्रानाश झाला होता, डोळे सुजल्यासारखे वाटत होते. ती मोकळ्या मनाने नाचू शकत नव्हती, फिरू शकत नव्हती. ती पार बंधनात अडकून पडली होती. काही वेडेवाकडे करावं तर आपल्या आई-बाबाचे काय ? हा विचार करून ती शांत राहत होती. काही दिवसातच तिचे वयाच्या तेरा-चौदाव्या वर्षात लग्न झाले ते ही तिशीच्या वयातील पुरुषासोबत. गीता ही कोवळी पोर तर तो तिशीचा पुरुष. जोडा काही शोभून दिसत नव्हता पण असे स्थळ पुन्हा मिळणार नाही म्हणून पांडुरंगाने हे लग्न लावून दिले. बापाची काळजी मिटली पण पोरीची चिंता सुरू झाली. तिला घरात कोणत्याच गोष्टीची काळजी नव्हती. सर्व काही सुख सोयी सुविधा होत्या. मात्र तिचा नवरा रोज पिऊन घरी यायचा. त्याला कशाचेही होश राहायचे नाही. त्याच धुंदीत तो गीतासोबत झोपायचा. तिला कधी प्रेमाचा एक शब्द देखील कधी बोलायचा नाही. लग्न झाल्यानंतर पाच सहा महिन्यात तिला गर्भ राहिलं. तिचं वय किती आणि ती आता आई बनणार होती. ही बातमी ऐकून घरीदारी सर्वाना आनंद झाला. मात्र गीताच्या चेहऱ्यावर कोणातच भाव दिसत नव्हता. नऊ महिने पूर्ण झाले होते गर्भाला. तिला खूप त्रास होऊ लागला होता. म्हणून ह्या वेदना अश्याच असतात म्हणत तिचे सांत्वन करू लागले. एके दिवशी खूपच वेदना होत होत्या म्हणून गावातीलच बाळंत करणाऱ्या बाईला बोलून आणण्यात आलं.  तिला वेदना असह्य होऊ लागल्या, त्याच त्रासात ती तडफडून शेवटी आपला देह ठेवला. गर्भ सुद्धा तिच्या सोबतच मेलं. दोन्ही जीव शांत झाले होते. वयाच्या पंधरा वर्षाच्या आत गीताचे जीवन संपुष्टात आलं. नशीबालाच दोष देत पांडुरंग रडत बसला होता. गीताची अंत्यविधी शाळेसमोरून जात असताना सारेच दुःखामध्ये डोळ्यात अश्रू आणून तिला पाहत होते. आई बाबांच्या अज्ञानामुळे अजून एक कळी फुलण्याआधीच गळून पडल्याचं दुःख मॅडमला होत होतं. 
- नागोराव सा. येवतीकर

Tuesday, 5 November 2019

विद्यार्थी प्रवेश दिवस

विद्यार्थी प्रवेश दिनानिमित्त प्रासंगिक लेख

     *आजीवन विद्यार्थी जीवन*

विद्यार्थी म्हणजे काही गोष्टी शिकणारा व्यक्ती. विद्यार्थी दोन शब्दापासून बनला आहे. विद्या आणि अर्थी ज्याचा अर्थ होतो विद्या घेणारा. विद्यार्थी कोणत्याही वयाचा असतो छोट्या मुलांपासून ते वृद्धापर्यंत प्रत्येकजण विद्यार्थी असतो. म्हणूनच म्हटले जाते मनुष्य आजीवन विद्यार्थी असतो. कारण व्यक्ती प्रत्येक वेळी, दररोज काही ना काही नवीन शिकत असतो. या जगात परमेश्वराशिवाय कोणीही परिपूर्ण नाही. बाकीचे आपण सर्वजण अपूर्ण आहोत. एखादा व्यक्ती एखाद्या क्षेत्रात किती ही पारंगत असेल तरी त्याला कोणाकडून तरी नवीन गोष्ट शिकायला मिळतेच मिळते.
संस्कृतमध्ये विद्या आणि विद्यार्थी यांच्या बाबतीत खूप सुंदर सुभाषित आहे.
काकचेष्टा बकोध्यानं श्वाननिद्रा तथैव च।अल्पहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम्॥
अर्थात विद्यार्थीमध्ये पाच लक्षण असायला हवी. कावळ्यासारखी सगळीकडे पाहण्याची दृष्टी आणि त्वरित निर्णय घेण्याची क्षमता असावी,  बगळ्यासारखी एकटक लावून ध्यान करण्याची धारणा असावी ज्यामुळे शिकलेलं सर्व लक्षात राहील, कुत्र्यासारखी कमी झोप असावी, थोडी जरी चाहूल लागली की कुत्रा जागी होतो आणि आजूबाजूच्या परिसरात आपली दृष्टी फिरवतो, अल्पहारी म्हणजे कमी जेवण करणारा असावा, विद्यार्थ्यांनी नेहमी आपल्या जेवणाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. वेळेवर जेवण न करता आपले कोणतेही काम पूर्ण होऊ शकत नाही. तसेच पोटभर खाल्ले तर आळस येऊन झोप येऊ शकते. शेवटचे गुण म्हणजे गृहत्यागी, आपल्या आई वडिलांपासून दूर राहणारा. पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धत अस्तित्वात होती. ज्यामुळे मुले विद्यार्जन करण्यासाठी जंगलातील गुरूच्या आश्रमात जाऊन शिक्षण घेत असत. पण आज ती पद्धत नाही. हे पाच गुण ज्या व्यक्तीमध्ये आढळून येतात तोच खरा विद्यार्थी समजला जातो. ह्या पाच गुणांच्या आधारे मनुष्य आजीवन विद्यार्थी जीवन जगू शकतो.
सुख दुःख आणि शिक्षण विद्यार्थ्यांसोबत कसे असते याबाबतीत एका सुभाषितांमध्ये म्हटले आहे
सुखार्थी वा त्यजेत विद्या विद्यार्थी वा त्यजेत सुखम्।
सुखार्थिनः कुतो विद्या विद्यार्थिनः कुतो सुखम्॥
अर्थात सुख पाहिजे असेल तर शिक्षण सोडून दिले पाहिजे आणि शिक्षण पाहिजे असेल तर सुख सोडून दिले पाहिजे. कारण सुख पाहिजे असणाऱ्याला शिक्षण मिळू शकत नाही आणि शिक्षण घेणाऱ्याला दुःख पहावेच लागते, त्याला सुख कसे मिळणार ?
आपण आजपर्यंतचा अनुभव पाहिला तर वरील ओळीचा आपणास देखील कधी ना कधी अनुभव पाहायला मिळतो. ज्याच्या घरी सर्व सोयीसुविधा आणि कोणत्याच गोष्टीची कमतरता नसते त्यांच्या घरातील मुले सहसा शिक्षणात चमकत नाही. पण त्याउलट ज्यांच्या घरात दारिद्र्य असते, गरिबी असते, कोणत्याच सोयीसुविधा नसतात अश्यांची मुले शिक्षणात चमकतात आणि यशस्वी देखील होतात. पैसा आणि शिक्षण एकत्र नांदू शकत नाही असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. आज पैश्याच्या बळावर पालक मंडळी आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण देऊ इच्छित आहेत. जर मुलांच्या मनात शिक्षण घेण्याची जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची क्षमता असेल तरच तो शिकू शकतो. हीच क्षमता त्या गरीब पालकांच्या मुलांमध्ये पदोपदी जाणवते, त्याला गरिबीचे चटके लागलेले असतात. शिक्षणाशिवाय त्याला कोणताच पर्याय दिसत नाही. म्हणून तो प्रगती करू शकतो. म्हणूनच विद्यार्थ्यांनी जीवनात प्रगती साधायची असेल तर आपल्या अंगी जिद्द, चिकाटी, मेहनत करण्याची तयारी, कठीण परिश्रम करणे आवश्यक आहे
विद्यार्थी समाजात कोठून आणि कसे ज्ञान मिळवीत असतो, याबाबत संस्कृत सुभाषितात म्हटले आहे
आचार्यात् पादमादत्ते पादं शिष्यः स्वमेधया ।पादं सब्रह्मचारिभ्यः पादं कालक्रमेण च ॥
अर्थात विद्यार्थी एक चतुर्थांश ज्ञान आपल्या गुरुजीकडून प्राप्त करीत असतो, एक चतुर्थांश ज्ञान आपल्या बुद्धीद्वारे प्राप्त करीत असतो, आपल्या सहकारी मित्रांकडून एक चतुर्थांश ज्ञान मिळवितो तर राहिलेले एक चतुर्थांश ज्ञान काळानुसार जे अनुभव मिळते तेथून प्राप्त करत असतो. म्हणून विद्यार्थ्यांच्या जीवनात हे चारही गोष्टी अत्यंत महत्वाचे आहे. गुरू आणि शिष्य यांचे खूप जुने संबंध आहेत. गुरुविना विद्यार्थ्यांना ज्ञान मिळत नाही. याबाबतीत संत कबीर आपल्या दोह्यात म्हटले आहे की,
गुरु पारस को अन्तरो,
जानत हैं सब सन्त |
वह लोहा कंचन करे,
ये करि लये महन्त ||
म्हणजे गुरु आणि परीस मध्ये मुख्य फरक आहे, हे सर्व संतांना माहीत आहे. परीसच्या स्पर्शाने लोखंडी वस्तू सोन्यात रूपांतरित होते मात्र गुरूच्या स्पर्शाने विद्यार्थी गुरूसारखा तयार होतो. म्हणून प्रत्येकांना गुरूची आवश्यकता आहे. गुरूकडून मिळालेलं ज्ञान विद्यार्थी आपल्या बुद्धीमध्ये साठवितो आणि ज्यावेळी हवे त्यावेळी त्याचा वापर करत असतो. विद्यार्थी जीवनाच्या दशेत त्यांचे सोबतचे मित्र कसे आहेत ? यावर त्यांची प्रगती अवलंबून असते. या काळात लाभलेले चांगले मित्र आयुष्यभर सोबत असतात. विद्यार्थ्यांच्या जीवनात त्यांचे सहकारी देखील महत्वपूर्ण आहेत. म्हणूनच विद्यार्थ्यांनी चांगल्या मित्रांची निवड करून आपले जीवन सफल करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनातील चौथे महत्वाचे घटक म्हणजे त्याला काळानुसार परिसरातून मिळत असलेला अनुभव. ज्या परिसरात विद्यार्थी राहतो, फिरतो, वावरतो त्याचा काही अंशी परिणाम त्याच्या मनावर होत असतो. आज सात नोव्हेंबर म्हणजे विद्यार्थी प्रवेश दिवस. आजच्या दिवशी भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना साताराच्या गव्हर्नमेंट हाईस्कूल आताचे 'प्रतापसिंह हाईस्कूल' मध्ये इंग्रजी पहिल्या वर्गात प्रवेश देण्यात आला होता. सन 2017 पासून हा दिवस विद्यार्थी प्रवेश दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्याचा मुख्य उद्देश्य म्हणजे जीवनात प्रगती करायची असेल तर शिक्षण हे एकमेव साधन असून कठीण परिश्रम केल्यानेच ते प्राप्त होते याची जाणीव मुलांना व्हावी, जे की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्र वाचनातून कळते. अत्यंत गरीब आणि हलाखीच्या जीवनातून डॉ. आंबेडकर यांनी शिक्षण घेतले. आजीवन विद्यार्थीचा उत्कृष्ट नमुना म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय. प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्या जीवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एक तरी गुण अंगिकरण्याचा प्रयत्न करावा तरच आपले जीवन सफल बनू शकते. विद्यार्थ्यांने आपले जीवन शिक्षण मिळविण्यासाठी व्यतीत करावे. जितके जास्त कष्ट विद्यार्थी दशेत घ्याल तितकेच जास्त सुख मोठेपणी मिळू शकते. म्हणून विद्यार्थ्यांनी आळस झटकून अभ्यासाच्या मागे लागावे आणि आपल्यासकट आपल्या परिवाराचे जीवन सुखी व आनंदी करावे, एवढंच या दिवसानिमित्ताने आपणास सांगावेसे वाटते.
- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

Thursday, 31 October 2019

श्रद्धा आणि अंधश्रद्धा

आंधळेपणाने एखादी गोष्ट स्वीकारणे यास अंधश्रद्धा असे म्हणतात.
अंधश्रद्धेमध्ये विविध प्रकार आहेत. यामध्ये काळी जादू, तंत्र-मंत्र, जादूटोणा, नरबळी, नजर टोक, तसेच भूत- प्रेत, पिशाच्च या संबंधित अंधविश्वास, अफवा पसरवणे व कृती करणे तसेच या कृतींचाही इतर प्राणी जीवनावर विपरीत परिणाम होणे म्हणजेच अंधश्रद्धा फोफावणे. भारतात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. अंधश्रद्धेमुऴे निरपराध जीवांचे बळी जातात. श्रद्धा आणि अंधश्रद्धा माणसाच्या स्वभावाच्या जीवनाचे दोन पैलू आहेत. सुरुवातीस श्रद्धा वाटत असलेली बाब हळूहळू अंधश्रद्धेत कधी परावर्तित होते, याची कल्पनासुद्धा येत नाही. भारत देश हा दैववादी देश आहे. याठिकाणी ईश्वराला मानणाऱ्याची संख्या जेवढ्या प्रमाणात आहे त्याच प्रमाणात भूतदयेला मानणारे ही आहेत. जे लोक ईश्वर आहे म्हणतात तेच लोक भूत सुद्धा आहे म्हणतात आणि सुरू होतो श्रध्दा आणि अंधश्रद्धा याचा खेळ. लोकांच्या मनात ईश्वरविषयी ओढ असते आणि भूताविषयी भीती. हे सर्व अगदी लहानपणापासून मुलांच्या मनावर प्रतिबिंबित होत असते. प्रत्येकाच्या घरातून बालपणी मुलांवर याविषयी नकळत संस्कार होत जाते. त्यामुळे ते त्या रिंगणाच्या बाहेर जाऊच शकत नाही. काही ढोंगी लोकांमुळे अशिक्षितांमुळे व जुन्या परंपरा आणि विचारसरणीमुऴे अंधश्रद्धेचे प्रमाण वाढत जाते. समाजातील अज्ञानाचा फायदा घेवून विघातक वृत्तीकडून होणारे शोषण थांबविण्यासाठी महाराष्ट्राने २०१३ साली कठोर कायदा केला आहे. याचे संंक्षिप्त नाव महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायदा, २०१३ असे आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र दाभोळकरशाम मानव अशा सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शासनाला हा कायदा करावा लागला. भारत सरकारला जादूटोणा विधेयक तयार करण्याची पाळी आली, हीच फार मोठी नामुष्की मानावे लागेल. या विधेयकामुळे गैर प्रकारावर आळा घालविता येईल अशी आशा सरकारला व या विधेयकाच्या अनुयायी लोकांना वाटत असेल मात्र लोकांच्या मनात असलेली अंधश्रद्धा यामुळे घालविता येईल काय ? याविषयी ठामपणे सांगता येत नाही. कारण लोकांच्या मनात असलेली अंधश्रद्धा या विधेयकामुळे मनात दाबली जाईल, पण कायमचे नष्ट होणार नाही.
आमच्या शेजारी राहणाऱ्या एकाने नवीन दुचाकी गाडी विकत घेतली. त्यानंतर सर्वाप्रमाणे त्यांनी सुद्धा या गाडीची यथायोग्य पूजा करून त्यास गंध लावून, त्याच्या समोर नारळ फोडून, त्या गाडीस मिरच्या, लिंबू, बिब्या, काळे केस असे पदार्थ एकत्र करून बांधले. त्याठिकाणी एक मुलगा हे सर्व पाहत उभा होता. जेमतेम सहा-सात वर्षाचा असेल तो, त्याने त्याच्या वडिलांना विचारले की, हे असे का करतात ? त्या निरागस मुलाने निष्पाप भावनेने प्रश्न विचारला मात्र त्या वडिलांना त्याचे नेमके उत्तर देता आले नाही. थातुरमातुर उत्तर देऊन वडिलांनी वेळ काढून नेली. त्यामुळे त्या मुलांच्या मनातील प्रश्नांची उकल काही होऊ शकले नाही. हे असेच चालत आले. लोकं करतात म्हणून आपण ही करावे, या अंधनुकरणाचे वागणे दिवसेंदिवस वाढतच आहे. असे केले नाही तर आपणाला व आपल्या गाडीला अपघात होण्याची शक्यता असते आणि खरोखरच असे केले तर गाडीचा अपघात होणारच नाही का ? ज्यांचे अपघात झाले त्यांनी असे केले नाही म्हणून झाले काय ? मोबाईलचे हेडफोन कानात टाकून गाडी चालविल्यास अपघात होणारच. त्यासाठी गाडीला मिरची किंवा लिंबू बांधणे किंवा न बांधणे हा भाग येत नाही. अशी अंधश्रद्धा लोकांच्या मनातून हे विधेयक संपविणार आहे काय ? लोकांच्या श्रद्धेचा गैरवापर करून काही महाभाग लोकं जे स्वतः स्वयंघोषित स्वामी किंवा संत जाहीर करतात ही मंडळी त्यांना अंधश्रद्धा च्या खाईत ढकलतात. या विधेयकाने त्यांच्यावर अंकुश ठेवता येईल. परंतु त्यांच्याविषयी बोलण्यास कोणी तयारच होत नसतील तर त्यांचे कोण वाकडे करणार आहे. यासाठी प्रत्येकाच्या मनातून सर्वप्रथम अंधश्रद्धा दूर करावी लागेल. त्याशिवाय असे किती ही विधेयक जरी तयार झाले तरी काही फरक पडणार नाही.
लहानपणच्या वयात मुलांवर चांगल्या प्रकारची संस्कार टाकण्यात आली तर त्याचा मोठेपणी नक्कीच फायदा होऊ शकतो. शिक्षण हे असे एक माध्यम आहे ज्यामुळे बऱ्याच अंधश्रद्धा समूळ नष्ट होण्यास मदत मिळते. त्यामुळे मुलांच्या प्राथमिक शिक्षणातून वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचा आणि अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचा फायदा निश्चितपणे होतो. तसा प्रयत्न शासनापासून घरापर्यंत सर्वांचा होणे आवश्यक आहे. तसे झाल्यासच विद्यार्थ्यांच्या मनात अंधश्रद्धा डोकावणार नाही. याविषयी संबंधित एखादा पाठ्य घटक प्रत्येक वर्गात समाविष्ट केल्यास अध्यापन व अध्ययन प्रक्रियेत त्याचा उलगडा निश्चितपणे करता येईल.
भारतात धर्म परंपरेनुसार काही शाळा स्थापना होतात आणि चालविल्या जातात. त्या शाळेतून त्या त्या धर्माच्या चाली रीती परंपरा त्यानुसार मुलांना शिक्षण दिल्या जाते. त्यामुळे त्या मुलांच्या मनातून अंधश्रद्धा संपविता येईल काय ? वास्तविक पाहता मुलांना जे प्राथमिक शिक्षण दिल्या जाते ते मुळात धार्मिक बाबीवर नसावेच. मुलांना राष्ट्रीय शिक्षण द्यावे. त्यामुळे त्यांच्या मनात राष्ट्राविषयी व येथील विविध पंथाच्या, धर्माच्या, जातीच्या लोकांविषयी आपुलकी, प्रेम निर्माण होईल. एका शाळेत रुजू झालेले विज्ञान निष्ठ शिक्षक त्या शाळेतील दर शुक्रवारी होणारी सरस्वती मातेची पूजा-अर्चा ही प्रथा बंद पाडली. त्यांचे म्हणणे होते की, शाळेतून अशी पूजा-अर्चा करणे म्हणजे अंधश्रद्धा ला खतपाणी घातल्या सारखे होय. त्यांच्या सहकाऱ्यांनी सुद्धा यास विरोध दर्शविला. ते शिक्षक स्वतः हिंदू धर्माचे होते. मग त्यांनी ही प्रथा बंद करविली ते योग्य की अयोग्य ? या विषयी खूप चर्चा झाली. योगायोगाने एके दिवशी ते शिक्षक अचानक आजारी पडले तो दिवस ही शुक्रवारचा आणि लगेच शाळेत चर्चा होऊ लागली. " पहा, सरस्वतीची पूजा बंद करविली म्हणून ते आजारी पडले. माता सरस्वतीने त्यांना धडा शिकविला." ही चर्चा त्यांच्या कानापर्यंत पोहोचली, तसे ते मनातून हादरले. दहा-पंधरा दिवसानंतर त्यांनी शुक्रवारचा दिवस ठरवूनच शाळेत रुजू झाले. सदरील शिक्षक येणार नाहीत या विचाराने नियोजित वेळापत्रकाप्रमाणे वर्गात विद्यार्थी सरस्वती माताच्या प्रतिमेचे पूजन केले आणि प्रसाद वाटत असताना ते आले आणि त्यांनी ब्र देखील काढले नाही. त्यांच्या मनात भीती निर्माण केली ते सहकाऱ्यांच्या चर्चेतून. त्यास्तव देवा विषयी स्वतः च्या मनात असलेली श्रद्धा व भीती इतरांना सांगून आपण त्यांना अंधश्रद्धेच्या वाटेकडे घेऊन जात नाही काय ? निदान लहान मुलांच्या मनात तरी याविषयी योग्य अशी भावना तयार करावी ज्यामुळे त्यांच्या मनात अंधश्रद्धेचे बीज पेरल्या जाणार नाही, याची काळजी घ्यावी.
शासकीय कर्मचारी तरी निदान अंधश्रद्धेला बळी पडू नये,  असे बोलल्या जाते. मात्र याच लोकांच्या माध्यमातून समाजात अंधश्रद्धा फोफावली जात आहे, हे ही तेवढेच सत्य आहे. जिल्ह्याच्या ठिकाणच्या कार्यालयातील अर्थ विभागात काही कामानिमित्त जाणे झाले होते. कार्यालयात अजून कोणी ही आलेले नव्हते. म्हणून मी त्या विभागातील रिकाम्या खुर्चीवर बसलो. थोड्याच वेळांत तेथील कर्मचारी आला. आपल्या टेबलाखाली ड्राव्हर ओढली आणि त्यातून अगरबत्ती काढली. मला वाटले की एखादे फाईल काढेल पण त्यांनी त्यांच्या खुर्चीच्या उजव्या बाजूला असलेल्या लक्ष्मीमाता आणि बालाजीच्या फोटोला अगरबत्ती ओवाळून नमस्कार केला. त्यानंतर माझ्याकडे मोर्चा वळला. मी हे सारे दृश्य पाहून अवाक झालो. मी ज्यांच्या सोबत या कार्यालयात गेलो होतो त्याचे त्याला काहीच वाटले नाही. मी त्यास प्रश्न विचारला हे काय आहे ? त्याने मला समजाविताना म्हणाला की, अर्थ विभाग आहे, लक्ष्मी प्रसन्न व्हावी म्हणून ते रोज सकाळी पूजा करतात आणि कामाला सुरुवात करतात. त्याच्या उत्तराने माझे समाधान झाले नाही व त्याचा तेंव्हा अर्थ ही कळाले नाही. तेथे तर फक्त कागद देऊन कागदरूपी चेक द्यायचे काम असताना त्यांना लक्ष्मी कशी प्रसन्न होईल ? या प्रश्नाने मी हैराण होतो. परंतु जेमतेम एखादा महिना उलटला असेल नसेल त्याच अर्थ विभागातील त्याच कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्याने एक हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्याची बातमी वाचण्यात आली. जिल्हा परिषदेने त्या कर्मचाऱ्यास निलंबित केले. तेंव्हा कळून चुकले की लोकं कशासाठी काय करतात ? वास्तविक पाहता शासकीय कार्यालयात देव-देवतांची पूजा अर्चा करणे योग्य आहे का ? याची उकल अजून ही झाले नाही. गल्लो गल्लीत, गावागावात, शहरात, नगरमध्ये गणपती मूर्तीची स्थापना करून त्याची पूजा अर्चा करणे एकवेळ समजू शकतो परंतु शासकीय कार्यालयात गणपतीची स्थापना व त्याची पूजा अर्चा मोठं मोठ्या अधिकारी वर्गाकडून करण्यात आले तर ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा , अश्या प्रसंगातून समाजात काय संदेश जातो ? याचा विचार मात्र कोणीच करत नाही. घटना तश्या फारच छोट्या आहेत परंतु त्यावर विचारविनिमय केल्यास बऱ्याच काही बाबीवर याचा परिणाम होताना दिसून येतो. या व अश्या अनेक घटना समाजात नेहमीच घडत असतात त्याकडे डोळसपणे पाहण्याची दृष्टी निर्माण झाल्यास अंधश्रद्धा विधेयकाची आपणास गरज भासणार नाही. आपण अंधश्रद्धाळू लोकच बुवाबाजीला प्रोत्साहन देत असतो. आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार या म्हणीप्रमाणे आपण अंधश्रद्धा च्या विळख्यात सापडलोच नाही तर आपणाला कोणी फसविणार नाही.

( वरील सर्व घटना अनुभवातल्या आहेत मात्र त्यात थोडी काल्पनिक झालर देऊन अंधश्रद्धा कशी फोफावत जात आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे. देवाला मानू नका, पूजा-अर्चा करू नका असे माझे मुळीच म्हणणे नसून त्यातून योग्य असा संदेश जाईल असे कार्य करावं एवढंच सुचवावे वाटते. )

- नागोराव सा. येवतीकर
अध्यक्ष अंधश्रद्धा निर्मूलन समिती, धर्माबाद

मतदान जनजागृती ( Voting Awarness )

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जनजागृती चला मतदान करू लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.  चला मतदान करू .......! ...