आमची माती आमची माणसं
काळी माती म्हणजे मानवाचे पालनपोषण करणारे महत्वाचे साधन आहे. या काळ्या मातीत शेतकरी दिवसरात्र मेहनत करून अन्नधान्य पिकवतो म्हणून तर माणसाला खायला दोन वेळचे जेवण मिळते. अन्यथा काय मिळालं असतं ? मातीमध्ये ही अनेक प्रकार आढळून येतात. मातीच्या प्रकारावरून शेतकरी धान्य पिकवीत असतो. त्या मातीचा अभ्यास शेतकऱ्यांना नसेल तर शेतात टाकलेलं बी चांगले उत्पन्न देईल याची खात्री नसते. म्हणून आपल्या शेतात कोणती पिके येतात याची माहिती प्रत्येक शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी मातीचा पोत कमी होत नव्हतं कारण त्या काळात शेतकरी आपल्या शेतात घरातील केरकचरा शेण आणि त्याचे मलमूत्र वर्षभर जमा करून शेतात टाकण्याचे काम करत. पण आजकाल असे कुठे ही दिसत नाही. आज सर्वत्र रासायनिक खतांचा वापर वाढल्याने मातीचा पोत खालावत चाललं आहे त्यामुळे उत्पन्न देखील वाढण्याच्या जागी कमी होत आहे. याच रासायनिक खताचा परिणाम मानवी जीवनावर देखील होत आहे. त्याचसोबत आज शेतीचे क्षेत्र हळूहळू कमी होत चालले असून त्याठिकाणी सिमेंटच्या घरांची जंगले उभारली जात आहेत. पुढील काही काळात ही काळी माती देखील पहायला मिळेल की नाही शंकाच निर्माण होत आहे. कवी विठ्ठल वाघ आपल्या तिफन कवितेत म्हणतात की, काया मातीत मातीत तिफन चालते. जेवढी ह्या काळ्या माईंची सेवा केली तेवढं जास्त फायदा मानवी जीवनाला होणार आहे. फार दिवसापासून डी डी सह्याद्रीच्या चॅनेलवर आपली माती आपली माणसं नावाची मालिका प्रसारित होते. या मालिकेची धून ऐकली की मनाला जरासे हायसे वाटते. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी मातीचे अनेक प्रयोग केले आहेत. आज ही वर्धा येथे महात्मा गांधीजी यांच्या सेवाश्रम मध्ये मातीचा वापर करून घरे बांधली जातात जे की हिवाळ्यात गरम आणि उन्हाळ्यात थंडगार हवा देतात. मातीचे अनेक उपयोग आहेत त्यांची माहिती करून घेणे आवश्यक आहे.
- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा धर्माबाद
ता. धर्माबाद जि. नांदेड, 9423625769
No comments:
Post a Comment