Friday, 24 November 2017

संविधान दिवस

भारतीय संविधान दिन

देशाचा राज्य कारभार सुरळीत चालण्यासाठी तयार करण्यात आलेले कायदे ज्या ग्रंथात एकत्रित करण्यात आले त्यास भारताचे संविधान असे म्हणतात. संविधानास राज्यघटना असे सुध्दा म्हटले जाते. संविधानातील तरतुदी लेखी स्वरूपात आहेत. याच आधारावर देशांतील लोकप्रतिनिधी नियमांच्या चौकटीत राहून आपला कारभार करीत असतात. नागरिकांचे हक्क, शासन संस्थेची रचना व अधिकार हे सर्व या संविधानात नमूद केलेले आहे. यामूळे देशाला बराचसा फायदा होतो जसे की, अधिकाराचा दुरुपयोग होण्यास प्रतिबंध करता येते, नागरिकांचे हक्क व स्वातंत्र्य सुरक्षित राहतात, जनतेचा राज्यकारभारातील सहभाग वाढतो म्हणून संविधानानुसार राज्यकारभार केल्यास लोकशाही बळकट होते. 
सन 1942 साली झालेल्या चले जाव लढ्याने देशाला आत्ता लवकरच स्वातंत्र्य मिळणार असे चित्र निर्माण झाल्यावर सन 1946 मध्ये संविधान निर्मीतीची प्रक्रिया सुरू झाली. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल असा आग्रह स्वातंत्र्य चळवळीतील अनेक नेत्यांचा होता. म्हणूनच आपल्या देशाचे संविधान तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती आणि या समितीला संविधान सभा असे म्हटले आहे. घटना समितीचे हंगामी अध्यक्ष म्हणून डॉ. सच्चिदानंद सिन्हा निवडले गेले. त्यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या अध्यक्षपदी डॉ. राजेंद्रप्रसाद यांची तर  घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणुन डॉ. एच. सी. मुखर्जी यांची निवड झाली. संविधानाचा कच्चा आराखडा म्हणजे मसुदा तयार करण्यासाठी मसुदा समिती तयार करण्यात आली व त्याचे अध्यक्ष म्हणून विविध देशाचा कायदा आणि कलम म्हणजेच तेथील संविधानाचा गाढा अभ्यास असलेले डॉ. भीमराव रामजी आंबेडकर अर्थात बाबासाहेब आंबेडकर यांची नेमणूक करण्यात आली. 
          या संविधान सभेत एकूण 299 सदस्य होते. यात सर्व जाती धर्माच, विविध भाषा बोलणारे आणि विविध व्यवसाय करणाऱ्या लोकांचा या समितीत समावेश होता. डॉ. राजेंद्र प्रसाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह पंडीत जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू, जे. बी. कृपलानी, राजकुमारी अमृत कौर, दुर्गाबाई देशमुख, हंसाबेन मेहता आदि अनेक मान्यवर या संविधान सभेत सदस्य म्हणून होते. बी. एन. राव या कायदेतज्ज्ञ व्यक्तीची  संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली. 
संविधान सभेचे पहिले अधिवेशन या संविधान सभेचे अध्यक्ष असलेले डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 09 डिसेंबर 1946 रोजी संपन्न झाली व प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात करण्यात आली. संविधान सभेचे एकूण अकरा अधिवेशने भरविण्यात आले. प्रत्यक्ष कामकाज 165 दिवस चालले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महीने आणि 17 दिवस असे अहोरात्र अभ्यास व चिंतन करून भारताचे संविधान तयार केले.  घटना समितीने भारताच्या राष्ट्रध्वजाची निर्मिती केली. तर गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांच्या भारत भाग्य विधाता, या गीताला राष्ट्रगीताचा मान देण्यात आला.संविधान सभेत चर्चा, सल्ला मसलत, विचार विनिमयाच्या आधारे निर्णय घेण्यात आले. घटनेच्या मसुद्यामध्ये 395 कलमे व 08 परिशिष्टे आहेत. विरोधी मतांचा आधार व त्यांच्या योग्य सूचनांचा स्वीकार करून या संविधानास मूर्त स्वरूप देण्यात आले आणि अखेर 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे तयार करण्यात आलेले संविधान देशाला अर्पण करण्यात आले. म्हणूनच 26 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. राज्यघटना निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे. म्हणूनच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते. 
               स्वातंत्र्यलढ्याच्या काळात संपूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सन 1930 मध्ये भरविण्यात आले आणि त्यात 26 जानेवारी हा दिवस " स्वराज्य दिन" म्हणून साजरा करण्याचा ठराव करण्यात आला आणि सर्वानी त्यास मंजूरी ही देण्यात आली. इंग्रजांना आत्ता देशातून हाकालून दिल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही अशी शपथ घेण्यात आली आणि स्वातंत्र्यलढ्याची चळवळ जोर धरू लागली.  इंग्रज भारत सोडून गेले आणि आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वंतत्र झाला. 26 जानेवारी या दिवसाची देशांतील नागरिकांना सतत स्मरण व्हावे यानिमित्ताने या संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून सुरू करण्यात आली. म्हणून 26 जानेवारी हा दिवस 1950 पासून स्वराज्य दिन ऐवजी प्रजासत्ताक दिन वा गणराज्य दिन म्हणून संपूर्ण भारतात साजरी करण्यात येत आहे. 
भारतीय संविधानात स्वातंत्र्य, समता, समानता, बंधुता, सहिष्णुता, धर्मनिरपेक्षता, या मूल्यांचा स्विकार केलेला आहे. यात नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य स्पष्ट सांगितले आहे. आपण सर्व या संविधानाचा आदर केला पाहिजे. चला तर मग आज आपण सर्व संविधानाची शपथ घेऊ या 

" आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक, व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्र्वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता: 
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा आणि त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्र्वासन देणारी बंधूता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करुन, 
आमच्या संविधान सभेस आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत."

संविधान दिनाच्या सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा. 

      -  नागोराव सा. येवतीकर 
         मु. येवती ता. धर्माबाद 
          9423625769

Thursday, 23 November 2017

मुलांच्या प्रगतीसाठी


मुलांच्या प्रगतीसाठी .........!

शाळेची गुणवत्ता खराब आहे किंवा शाळेतील मुलांना काही न येणे ह्यासाठी फक्त शिक्षक जबाबदार नाहीत असे यूनेस्कोने नुकतेच आपल्या न्यू ग्लोबल एजुकेशन मॉनिटेरिंग रिपोर्टमध्ये म्हटले आहे. शिक्षक हा एक दिशादर्शक आहे. मात्र त्या दिशेचे पालन योग्य प्रकारे होत नसेल तर शिक्षक त्यात दोषी कसा असू शकतो असा ही प्रश्न निर्माण होतो. विद्यार्थ्याची प्रगती ही तीन बाबीवर अवलंबून असते. एक म्हणजे तो स्वतः असतो, दुसरा त्यांचा पालक आणि त्यानंतर शेवटी येतो शिक्षक.  विद्यार्थ्याच्या मनात शिक्षणाविषयी गोडी, अभिरूची किंवा आवड जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत कोणत्याही शिक्षकाला काहीच करता येत नाही. बहुतांश वेळा पालक शिक्षकांकडे तक्रार करतात की, हा शाळेलाच जात नाही. शाळेला जा म्हटले की, रडत बसतो. काय करावे कळत नाही. अशी समस्या जेंव्हा पालक व्यक्त करतात तेंव्हा शिक्षक काय करू शकतो ? एखादा उपक्रमशील शिक्षक काही तरी आयडिया वापरून त्याला शाळेत आणण्याचे काम करेल. पण हे सर्व शिक्षकांना जमेल असे खात्रीपूर्वक सांगता येत नाही. आज देशात किती तरी मुले शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर आहेत. त्याची संख्या लाखाच्या घरात आहे. न्यायालयाने देखील सरकारला याविषयी मार्चअखेर सर्वेक्षण करण्याचे सूचविले आहे. ही मुले विविध कारणामुळे शाळाबाह्य राहतात. महिन्यातून अर्धे दिवस शाळेतून गायब राहणाऱ्या मुलांच्या गुणवत्तेसाठी शिक्षकांना जबाबदार धरणे संयुक्तिक वाटत नाही. घरात नवरा-बायकोचे भांडण किंवा वाद झाले की बायको माहेरी निघुन जाते आणि सोबत शाळेतील मुलांना घेऊन जाते. काही महिन्यानंतर त्यांचा वाद मिटतो. तोपर्यंत त्या मुलांची शाळा वाऱ्यावर असते. असे उदाहरण ग्रामीण भागातील अनेक शाळेत अनुभवास येतो.  काही पालक घरातील आणि शेतातील कामासाठी अधुनमधून शाळेत शिकणारी मुले गुरुजींना सांगून घेऊन जातात. असे एक दोन वेळा झाले तर ठीक आहे. मात्र सुगी आली की, त्यांचे हे रोजचे असते. उडीद-मुग सोयाबीन तोडणीच्या वेळी आणि त्यानंतर कापूस वेचणी अश्या काळात मुलांची उपस्थिती कमी आढळून येते. तिथे पालकाना देखील काही म्हणता येत नाही कारण ती त्यांची गरज असते. उद्याच्या काळजी पेक्षा त्यांना आजची चिंता जास्त खाते. यामुळे नाइलाजास्तव काही पालकाना असे पाऊल उचलावे लागतात. अश्या वेळी ही मुले अभ्यासात मागे राहतात. मग दोष कुणाला द्यावा. अश्या वेळी परिस्थिती ही फार मोठी दोषी आहे, बाकी काही नाही, असे वाटते. पालक शिक्षणाच्या बाबतीत जागरूक असेल तर त्यांची मुले नक्कीच हुशार असतात. असा आपल्या सर्वांचा अंदाज आहे आणि तो खरा आहे. मग जागरूक नसलेल्या पालकांची मुले गुणवंत नसतात काय ? तर ते देखील असतात कारण त्यांना गरीबीचे चटके लागलेले असतात. त्यांना शिक्षणात एक ज्योत दिसते म्हणून ते चिकाटीने आणि जिद्दीने अभ्यास करतात. दिवसरात्र मेहनत करून यश मिळवितात. त्यांच्या यशाचे श्रेय शिक्षकांना आहे काय ? शिक्षकांना श्रेय मिळतेच पण खरी मेहनत त्या मुलांची आहे. मला असे मुळीच म्हणायचे नाही की, चांगले झाले की ते श्रेय शिक्षकांनी घ्यावे आणि काही वाईट झाले की पालकावर सोडावे. मुलांच्या प्रगतीत जेवढा पालकांचा वाटा असतो तेवढाच वाटा शिक्षकांचा देखील असतो. शाळेत शिकविणारा शिक्षक घरात पालक होऊन मुलांना शिकवू शकत नाही. म्हणून पालक किती ही ज्ञानी असला तरी त्याला त्याच्या मुलांना यशस्वीपणे शिकविता येत नाही. आमचे गुरुजी जे म्हणाले तेच खरे असे बरीच मुले घरी बोलतात. म्हणून शिक्षकांनी देखील मुलांच्या प्रगती आणि गुणवत्ता याबाबतीत पालकासोबत हातात हात घालून चालल्यास मुलांची प्रगती नक्कीच दिसून येईल, असे वाटते.

- नागोराव सा.येवतीकर
प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिरली
ता. बिलोली जि. नांदेड
9423625769

Wednesday, 22 November 2017

स्मार्टफोनचा विळखा

स्मार्टफोनचा विळखा, वेळीच ओळखा

अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण कालांतराने या मूलभूत गरजामध्ये अजून कांही वस्तूची वाढ होत गेली त्यात प्रामुख्याने मोबाईलचा समावेश करणे अगत्याचे आहे. आज माणसाला एक वेळ अन्न, वस्त्र किंवा निवारा यांची कमतरता असेल तर चालून जाईल मात्र खिशात मोबाईल नसेल तर ती व्यक्ती जिवंत राहू शकत नाही, अशी परिस्थिती सर्वत्र निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आज देशातील निम्यापेक्षा ज्यास्त लोकांकडे मोबाईल उपलब्ध आहे. तसेच जास्तीत जास्त लोक हे स्मार्टफोनधारक आहेत. जिओ सारख्या कंपनीने इंटरनेटची सुविधा कमी दरात उपलब्ध करून दिल्यामुळे इंटरनेट वापर करणाऱ्या लोकांची संख्या सुध्दा गेल्या एका वर्षात भरमसाठ वाढली. इतर कंपनीने देखील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी तोडीसतोड म्हणून वेगवेगळी ऑफर लोकांना देऊ केले. त्याचा एक परिणाम असा झाला की, सोशल मीडियातील फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर इत्यादी सारख्या क्षेत्रात यूजरची संख्या वाढली. ही बाब व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून खुप चांगली असेल कदाचित. मात्र त्याचे दूरगामी परिणामाचा विचार केल्यास याचा प्रभाव सर्वच क्षेत्रात झपाट्याने दिसून येत आहे. ब्ल्यू व्हेल सारख्या गेमने अनेक शाळकरी किशोर मुलांचे बळी घेतले आहेत. अश्या गेमपासून मुलांना दूर ठेवणे आवश्यक आहे असे बोलण्यापूर्वी त्यांच्या हातात चोवीस तासासाठी मोबाईल असणे हेच घातक आहे. कारण ब्ल्यू व्हेल गेमच नाही तर इतरही अनेक तंत्रज्ञानचे ऍप्स या मोबाईलमध्ये आहेत, ज्यामुळे ही शाळकरी किशोर वयातील मुले काही कळण्याच्या आत हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज बरेच तरुण-तरुणी मोबाईल पाहिजे म्हणून घरात हट्ट करतात. मोबाईल ते ही स्मार्ट फोनच पाहिजे म्हणून मागणी करतात आणि मागितल्यानंतर मोबाईल मिळाले नाही तर अगदी टोकाची भूमिका घेण्यास देखील मागेपुढे पाहत नाही. अश्या वेळी पालक चिंताग्रस्त होतात. काय करावे आणि काय नाही हे त्यांना कळत नाही. मोबाईलपेक्षा आपल्या पाल्यांचे जीवन त्यांना अनमोल वाटते म्हणून पालक मुलांना मोबाईल घेऊन देतात. तरी ही अधुनमधून मुलांना गोडीगुलाबीने बोलून, दोन-चार दिवसांनी त्यांचे मोबाईल तपासून पहाणे आवश्यक आहे. समाजात अनेक लबाड माणसे आहेत जे की, अश्या किशोरवयीन मुलांना वेगळ्या काही प्रकरणात गुंतवून ब्लॅकमेल करतात. हे सहन न झाल्याने मुले आत्महत्या करण्याकडे वळु शकतात. म्हणून त्यांच्याशी संपर्कात राहणे आवश्यक आहे. 
> स्मार्टफोन आल्यापासून लोकां-लोकांतील संवाद देखील कमी झाले असून स्मार्टफोनवरील चॅटींग फार मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. रात्री बारा वाजेपर्यंत तर काही जण पहाटेच्या चार वाजेपर्यंत मोबाईलवर चॅटींग करताना दिसून येत आहेत. ह्या मोबाईल चॅटींगचा रोग सर्वत्र पसरलेले आहे. घरात ही आत्ता एकमेकात बोलणे खुप कमी झाले आहे. जो तो सोशल मीडियात चॅटींग करण्यात व्यस्त झाला आहे. त्यामुळे काही ठिकाणी कौटुंबिक वाद झाल्याचे देखील बातम्या ऐकण्यात आले आहेत. यावरून आपण विचार करू शकतो की, स्मार्टफोन किती गरजेची वस्तू बनली आहे. सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांकडे स्मार्टफोन अत्यावश्यक आहे, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. शासनाकडून येणाऱ्या सर्व सूचना आत्ता थेट व्हाट्सअपच्या माध्यमातून मिळत आहेत. त्यामुळे त्यांना स्मार्टफोनचा वापर करणे गरजेचे बनले आहे. एखादी माहिती बघितली नाही की, त्याचा फटका कर्मचाऱ्यांना नक्की बसतोच, हे सत्य असले तरी पण वास्तव काही वेगळेच दर्शविते. कार्यालयीन कामासाठी म्हणून जी स्मार्टफोनची सुरुवात झाली त्याचे त्यानंतर करमनणुकीचे साधन केंव्हा बनले हे त्यांना देखील कळले नाही. आज अनेक कर्मचारी या स्मार्टफोनच्या संपूर्ण आहारी गेले असुन कार्यालयीन वेळात मोबाईलवर चॅटींग करणे आणि कॅण्डी क्रॅश सारखे गेम खेळत बसल्याचे चित्र अनेक ठिकाणी जनतेला पाहायला मिळते. त्यामुळे शासनानी कार्यालयात या स्मार्टफोनचा वापर करण्यावर बंदी घालायला हवी असे जनतेनी मागणी केल्यास त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. माणसाला ज्याप्रकारे बिडी ओढण्याची किंवा पान-तंबाखू खाण्याची सवय असते अगदी तशीच काहीशी सवय स्मार्ट फोनची झालेली आहे. तलब आल्यावर व्यसनी माणसाला जसे राहवत नाही तसे एखाद्या दिवशी सोबत स्मार्टफोन नसेल किंवा इंटरनेट सुरळीत नसेल तर माणसाचा जीव कासावीस होतो. पूर्वी जसे येथे धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे असे फलक जागोजागी दिसत होते त्याऐवजी आत्ता येथे स्मार्ट फोन वापरण्यास मनाई आहे असे फलक जागोजागी लवकरच दिसतील असे वाटते. काही लोकांना आज कोणत्याच गोष्टीची गरज भासत नाही फक्त हातात स्मार्ट फोन असावा आणि त्यात अनलिमिटेड डाटा असावा मग घरात आटा नसेल तरी चालते. त्यांचा दिवस आणि रात्र कसे संपले हेच त्यांना कळत नाही. बहुतांश जणाना या स्मार्टफोन मुळे जग खूप जवळ आले आहे असे वाटत आहे मात्र याचा अति वापर कधी ना कधी मानवासाठी घातक ठरणार आहे, हे मात्र खरे आहे. शासन एकीकडे डिजिटल इंडिया करण्यास पुढे पाऊल टाकत आहे, आहे मात्र या स्मार्टफोनच्या अति वापरामुळे अनेक नवनवीन समस्या निर्माण होत आहेत आणि भविष्यात देखील निर्माण होतील. म्हणून शासनानी कायदा करण्याच्या अगोदर प्रत्येक नागरिकांनी स्मार्टफोन बाबत जागरूक होणे आवश्यक आहे. नविन तंत्रज्ञानामुळे जीवनाचा जेवढा विकास होतो असे वाटते तेवढाच भकास देखील होतो हे ही नेहमीसाठी लक्षात असू द्यावे. म्हणून म्हणावेसे वाटते स्मार्टफोनचा विळखा, वेळीच ओळखा.

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

Monday, 20 November 2017

महत्वाचे दिवस

*वर्षातील काही अत्यंत महत्वाचे दिवस*

*जानेवारी*

3 - सावित्रीबाई फुले जयंती, बालिका दिन
6 - पत्रकार दिवस, आचार्य बाळ शास्त्री जांभेकर जयंती
12 - स्वामी विवेकानंद जयंती
12 - राजमाता जिजाऊ जयंती
26 - प्रजासत्ताक दिन
30 - हुतात्मा दिवस

*फेब्रुवारी*

17 - वासुदेव बळवंत फडके पुण्यतिथी
19 - छ. शिवाजी महाराज जयंती
24 - जागतिक मुद्रण दिन
26 - वि.दा. सावरकर पुण्यतिथी
27 - मराठी भाषा दिवस / कुसुमाग्रज जन्मदिन
28 - विज्ञान दिवस

*मार्च*

8 - जागतिक महिला दिन
15 - जागतिक ग्राहक दिन
23 - जागतिक हवामान दिन

*एप्रिल*

7 - जागतिक आरोग्य दिन
11 - म. फुले जयंती
14 - डॉ. आंबेडकर जयंती
22 - जलसंपत्ती दिन

*मे*
1 - कामगार दिन
8 - रेडक्रॉस दिन
8 - रविंद्रनाथ टागोर जयंती
11 - तंत्रज्ञान दिन
31 - अहिल्याबाई होळकर जयंती

*जून*

5 -जागतिक पर्यावरण दिन
10 - जागतिक दृष्टीदान दिन
26 - छ. शाहू महाराज जयंती

*जुलै*

01 - वनमहोत्सव दिन
03 - वनसंवर्धन दिन
11 - जागतिक लोकसंख्या दिन
23 - लोकमान्य टिळक जयंती

*ऑगस्ट*

01 - अण्णाभाऊ साठे जयंती
09 - क्रांती दिन
15 -स्वातंत्र्य दिन
20 - सदभावना दिवस

*सप्टेंबर*

5 - डॉ. सेवपल्ली राधाकृष्णन जयंती
5 - शिक्षक दिन
14 - हिंदी दिवस

*ऑक्टोबर*

2 - महात्मा गांधी जयंती
2 - लाल बहादुर शास्त्री जयंती
09 - टपाल दिवस
10 - तुकडोजी महाराज पुण्यतिथी 
31 - सरदार पटेल जयंती / समता दिवस

*नोव्हेंबर*

14 - पंडीत नेहरू जयंती / बालदिन
19 - नागरिक दिन
26 - संविधान दिवस
28 - म. फुले पुण्यतिथी

*डिसेंबर*

2 - यशोदा साने स्मृती दिन
3 - जागतिक अपंग दिवस
6 - महापरिनिर्वाण दिन
20 - संत गाडगेबाबा पुण्यतिथी
23 - किसान दिन 
24 - साने गुरूजी जयंती
25 - ख्रिसमस

पुस्तक - परिचय

पुस्तक - परिचय

' लखलखणारी सरकारी शाळा '

जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळा म्हटले की, प्रत्येकांच्या डोळ्यासमोर एक वेगळेच चित्र उभे राहते. ज्या चित्रात त्या शाळाची, तेथील परिसराची, शिक्षकांची आणि विद्यार्थ्याच्या बाबतीतचे चित्रण भयानक दिसून येते. या शाळांची स्थिती कधीच सुधारणार नाही, अशी धारणा प्रत्येकाची बनलेली असते. या शाळांत फक्त गरिबांची मुलेच शिकतात म्हणून यास गरिबांची शाळा असे सुध्दा संबोधले जाते. ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेशिवाय दुसरा पर्याय देखील नसतो. काही श्रीमंत किंवा पैसेवाले मंडळी आपल्या पैशाच्या बळावर शेजारच्या इंग्रजी शाळेत आपल्या मुलांना पाठवितात. वास्तविक पाहता सरकारी शाळा एवढ्या वाईट नव्हते किंवा नाहीत, सध्या वर्ग एक किंवा दोन पदावर काम करणा-या अधिका-यांचे प्राथमिक शिक्षण कोठून पूर्ण झाले ? या प्रश्नांच्या उत्तरांतून कळेल की, ते सर्व जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेले आढळून येतील.
पूर्वीच्या शाळेचा इतिहास पाहता सध्याच्या सरकारी शाळा त्या मानाने खूप चांगल्या आहेत. खडू - फळा मोहिम आणि सर्व शिक्षा अभियानामूळे पडक्या घरात, ग्रामपंचायतीत किंवा झाडाखाली भरणा-या शाळा स्वत:च्या इमारतीत भरू लागल्या आज गावोगावी सर्व सोयी सुविधायुक्त शाळा आहेत. शिक्षकांना ये-जा करण्यासाठी रस्ते चांगले झाले आहेत. त्यास्तव त्या गावात त्यांना राहण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच स्वत:कडे वाहन असल्यामुळे तर ये-जा करण्याचा प्रश्नच मिटला. आज शाळेवर अध्यापन करण्यासाठी येत असलेला शिक्षक हा स्वत: हुशार असल्यामूळे स्वत:चे प्रतिबिंब विद्यार्थ्यांत पाहणार, यात आश्चर्य ते काय ? याच विचार प्रक्रियेतून आज राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा कात टाकतंय असे म्हणणे चूकीचे अन अतिशयोक्तीचे ठरणार नाही. अशीच एक ' लखलखणारी शाळा ' म्हणजे पुणे-लातूर हायवे वरील लातूर तालुक्यात करकट्टा गावापासून पाच किमी. अंतरावर असलेली माटेफळ येथे कार्यरत लेखिका आणि प्राथमिक पदवीधर उपक्रमशील शिक्षिका अनिता जावळे यांनी स्वतः च्या कार्यकर्तृत्वाने आणि सर्वाना सोबत घेऊन या जिल्हा परिषद शाळेचा संपूर्ण कायापालट कसा झाला याचा इतिहास सांगणारे हे पुस्तक लातूरच्या अरुणा प्रकाशनद्वारे विद्यार्थी दिनी प्रकाशित केले आहे. ज्यांनी हे कार्य करण्यास प्रोत्साहन दिले आणि लेखिकेच्या मनात ज्योत पेटविली त्या पंचायत समिती लातूरच्या गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी पुस्तकाला प्रस्तावना देऊन सर्वाना दिव्याचा प्रकाश दिला आहे. शिक्षक मुलांना शिकवितात म्हणजेच काय काय करतात हे ह्या पुस्तकात सांगितले असल्याचा त्यांचा उल्लेख सर्व शिक्षकांसाठी नक्कीच प्रेरीत करेल. कदाचित लेखिकेच्या संपर्कात मा. तृप्ती अंधारे मॅडम आल्या नसत्या तर लेखिका पुस्तकाच्या रुपात बाहेर येऊ शकले असते किंवा नाही याबाबत मनात शंका निर्माण होते. म्हणजेच पुस्तकाच्या निर्मिती मागे त्यांचा सिंहाचा वाटा आहे. शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक आणि सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व म्हणजे भाऊसाहेब चासकर यांनी या पुस्तकाला शुभेच्छा देताना सरकारी शाळेतील प्रयोगांचे आजवर नीटसे डॉक्यूमेंटेशन झाले नाही ती व्ह्ययला पाहिजे अशी खंत व्यक्त केली. जे की या पुस्तकांच्या निमित्ताने भविष्यात पुढे येऊ शकेल. लेखिकेने पुस्तकात एकूण तीन प्रकरण दिले ज्यातून लेखिका शाळेवर येण्यापूर्वी काय परिस्थिती होती, शाळेत लोकसहभाग कसा मिळविला आणि शाळेत उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी शाळेत कसे रमले असे थोडक्यात पण मार्मिक शब्दात मांडणी केली आहे. प्रत्येक शिक्षक नव्याने जेंव्हा शाळेवर रुजू होतो त्यावेळ च्या आठवणी नेहमी स्मरणात राहतात. तशीच काही आठवण पुस्तक वाचताना प्रत्येक शिक्षकांस होते.
राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार साहेब आणि विभागाचे शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर साहेब यांनी राज्यातील तंत्रस्नेही शिक्षकांना दिलेल्या प्रोत्साहनामूळेच आज महाराष्ट्रात डिजिटल शाळा आणि लोकसहभाग याचे राज्यात सर्वत्र डिजिटल शाळांचे वारे वाहत आहेत. संगणक युगाच्या काळात आज प्रत्येकांच्या घरी मोबाईल, लॅपटॉप आणि संगणकाचा वापर चालू झाला आहे. घरात ही वस्तू असल्यामूळे त्याचा वापर शालेय मुले सुध्दा करू लागली. जमाने के साथ चलो प्रथेनूसार येथील शिक्षक मंडळींनी सुध्दा प्रवाहात सामिल होण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलेत. त्यानुसार ‘डिजिटल शाळा’ ही संकल्पना पुढे आली. त्यासाठी लागणारा लाख-दिड लाख रूपयांपर्यंतचा निधी सरकार ऐवजी शिक्षक, गावकरी, तरुण मंडळ, ग्रामपंचायत याच्या लोकसहभागातून त्यांनी कसा जमा केला याचे अनुभव वाचन करणे खरोखरच प्रशंसनीय आहेत.
ज्ञानरचनावाद युक्त शाळा असेल तर प्रत्येक मूल शिकते. घरी राहणाऱ्या इमरान ला शाळेत कसे रममान करण्यात आले ? वडिलांच्या मृत्यूनंतर ही फिजा शाळेत कशी नियमित येऊ लागली ? मतिमंद विशाल शाळेत कसे शिकू लागला ? लेकरांच्या भावविश्वात शिक्षक सहभागी झाला तर काय चमत्कार होतो ते या पुस्तकात नक्कीच वाचायला मिळेल. लेखक मी होणार या सारख्या उपक्रमातून याच शाळेतील इयत्ता सातव्या वर्गात शिकणारा संकेत चव्हाणच्या डोक्यातून गोट्या नावाची कथा बाहेर पडते आणि पुस्तक रूपाने वाचकासमोर ठेवली जाते. यात लेखिकेचे अपार मेहनतीतून मिळालेले खुप मोठे यश दडलेले आहे.
इंग्रजी शाळेला लाजवेल अश्या सरकारी शाळा पहायला मिळतात. पूर्वीसारखा शिक्षक आज नक्कीच नाही. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर मोबाईल, टॅब, लेपटॉप आणि संगणकाचा वापर करीत मुलांना गुणवंत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. गरज आहे लोकांनी या सरकारी शाळाकडे चांगल्या दृष्टीने पाहण्याची. सरकारी शाळेतील शिक्षकावर विश्वास ठेवून, त्यांना सर्वतोपरी मदत करण्याची, नक्कीच ते चांगले करून दाखवू शकतात. बहुतांश गावात लोकांची मदत शाळेला मिळत नाही, शाळेला भरपूर निधी येतो तेंव्हा या शाळेला आम्ही का मदत करायची ? अशी विचार प्रणाली गावातील लोकांची असते म्हणून त्या गावाची शाळा नावारूपास येत नाही. शीतावरून भाताची परीक्षा न करता आपल्या गावातील शाळांचे भविष्य आपणच घडवावे. तालुक्यात, जिल्हयात माटेफळ सारख्या अनेक शाळा आहेत ज्याचा कायापालट शिक्षकांनी आणि गावातील लोकांनी मिळून केला आहे. आपली एक रुपयांची मदत देखील शाळेला लाखमोलाचे काम करून जाते. गावाला शाळेचा आधार आणि शाळेला गावाचा आधार, शाळा आपली आहे ही संकल्पना तयार होण्यासाठी शाळेला थोडा वेळ द्या, शिक्षकाची समस्या समजून घ्या, त्यांना प्रोत्साहित करा, त्यांना गावकरी मंडळीच्या आधाराची खरी गरज असते. या सर्व बाबीची जाणीव लेखिका अनिता जावळे-वाघमारे यांनी ' लखलखणारी शाळा ' या पुस्तकातून करून दिली आहे. प्रत्येक शिक्षकां नी हे पुस्तक वाचायलाच हवे एवढे च नाही तर एक वेळ या शाळेला प्रत्यक्षात भेट ही देण्याचा प्रयत्न करावा. लेखिका अनिता जावळे-वाघमारे यांच्याशी 9545050292 या मोबाईल क्रमांकावर आणि anitajawale1977@gmail.com या ई मेल आय डी वर तसेच anitajavle.blogspot.com या ब्लॉग वर संपर्क करता येईल. माटेफळ शाळेच्या सर्व शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना पुढील कार्यासाठी मनापासून शुभेच्छा

- नागोराव सा. येवतीकर,
प्राथमिक शिक्षक
जि. प. प्रा. शाळा चिरली
ता. बिलोली जि. नांदेड
9423625769

मतदान जनजागृती ( Voting Awarness )

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जनजागृती चला मतदान करू लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.  चला मतदान करू .......! ...