आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त प्रासंगिक लेख
साक्षर भारत ; समर्थ भारत
17 नोव्हेंबर 1965 रोजी युनेस्कोने 8 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन म्हणून घोषित केले. सर्वप्रथम 1966 मध्ये हा दिवस साजरा करण्यात आला. वैयक्तिक आणि सामाजिक साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्दिष्टाने जगभरात हा उत्सव साजरा केला जातो. जगभरात 77 कोटी युवक अजून ही साक्षर झाले नसून प्रत्येक पाच युवकांमागे एक युवक तर दोन तृतीयांश महिलाचा निरक्षरामध्ये समावेश आहे. अजूनही शाळेचे तोंड न पाहिलेले, शाळेत अनियमित येणारी मुले, तर काही मुले मधूनच शाळा सोडलेली अशी जगभर अंदाजे 6 कोटी आहेत. भविष्यात ही मुले निरक्षर म्हणूनच वावरणार यात शंका नाही. आपल्या भारत देशात काही वेगळे चित्र आहे, असे मुळीच नाही.
देशाच्या विकासात साक्षरतेचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. साक्षरतेमुळे व्यक्ती आपला स्वतःचा विकास तर साधतोच त्याशिवाय कुटुंबाचा, गावाचा आणि राज्याच्या विकासात देखील त्यामुळे हातभार लागतो. शिक्षणामुळे व्यक्तीमध्ये डोळसपणा येतो. त्याची बुद्धिमत्ता विकसित होते आणि तो देशहितासाठी विचार करू लागतो. शिक्षण हे माणसांच्या जीवनात खताप्रमाणे काम करते. खत-पाणी योग्य प्रमाणात मिळाले तर झाडांची चांगली वाढ होते आणि उत्तम फळे चाखण्यास मिळतात असेच काही शिक्षणाचे आहे. देशाचा खरोखरच विकास साधायचा असेल तर देशातील प्रत्येक व्यक्ती शिक्षित म्हणजे साक्षर असणे गरजेचे आहे. अज्ञान किंवा अडाणीपणामुळे एक तर त्याचा स्वतःचा विकास होत नाही शिवाय यामुळे देशाची सुद्धा विकास होत नाही.
आपण दीडशे वर्षे इंग्रजांच्या जुलमी राजवटीखाली घालवल्यानंतर जेव्हा 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झालो तेव्हा देशातील लोकांची साक्षरतेचे प्रमाण 40 टक्के पेक्षा खाली होती. तत्कालीन शासनासमोर ही निरक्षरता संपविणे फार मोठी समस्या होती. भारतातील साक्षरतेचे इंग्रजांना काही देणेघेणे नव्हते ते त्यांना लागणाऱ्या कारकून-बाबू लोकांची निर्मिती करण्यासाठी मिशनरीच्या शाळा सुरू केल्या होत्या. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच लोक तेथे शिक्षण घेत होती. त्या गुलामगिरीच्या काळात फक्त इंग्रजीतून शिक्षण दिल्या जात असे त्यामुळे तळागाळातील सामान्य जनता प्राथमिक शिक्षणापासून कोसो दूर होते. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे, जनतेच्या विकासासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही याची जाणीव महात्मा फुलेंना झाली होती. तळागळातल्या सामान्य लोकांना शिक्षण मिळावे म्हणून महात्मा फुले यांनी हंटर कमिशनपुढे साक्ष देताना म्हटले की, " देशातील जनतेला मातृभाषेतून मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यात यावे." त्यांनी नुसते बोललेच नाही तर लोकांसाठी त्यांनी आजीवन धडपडत राहिले. मुलींच्या शिक्षणाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी त्यांनी सन 1848 मध्ये पुणे येथील भिडेच्या वाड्यात मुलींसाठी देशातील पहिली शाळा काढली आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना देशातील पहिली महिला शिक्षिका म्हणून तयार केले. त्या स्वतः निरक्षर महिला होत्या मात्र साक्षर झाल्यामुळे त्यांचे नाव जगभर पसरले यावरून शिक्षणाचे महत्त्व किती आहे ? हे कळून येते.
आपला देश स्वातंत्र्य होऊन 70 वर्षे संपली तसे पाहिले तर शेती, उद्योगधंदे, विज्ञान व तंत्रज्ञान, आरोग्य इत्यादी क्षेत्रांमध्ये भारताची लक्षणीय प्रगती आहे. लोकशाही मार्गाने वाटचाल करणारा भारत हा जगातील मोठा देश आहे. सन 2020 पर्यंत भारत महासत्ता बनेल असे स्वप्न माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी देशवासीयांना दाखविले. मात्र आपल्या या प्रगतीत देशातील लोकांची निरक्षरता ही प्रमुख अडचण ठरत आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार आपल्या देशात 26 टक्के जनता निरक्षर आहेत. अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती आणि मुस्लिम अल्पसंख्यांक प्रवर्गातील निरक्षरांची संख्या सर्वात जास्त आढळून येते. महिला वर्गात निरक्षरांची संख्या पुरुषांच्या तुलनेत 35 टक्के एवढी जास्त आहे. आपल्या देशाच्या विकासात गरीबी आणि निरक्षरता यांचा फार मोठा अडथळा निर्माण होतो. लोक गरीब आहेत म्हणून निरक्षर आहेत किंवा ते निरक्षर आहेत म्हणून गरीब आहेत असे खेदाने म्हणावे लागते. शिक्षणाच्या विकासासाठी महात्मा फुले यांच्या सोबतीने महर्षी कर्वे, पंडिता रमाबाई, न्यायमूर्ती रानडे यासारख्या अनेक महापुरुषांनी अथक परिश्रम घेतले. त्यानंतर ही देशातील लोकांच्या विशेष करून महिलांच्या साक्षरतेत काही बदल झाला नाही.
देश स्वातंत्र्य झाल्यानंतर शासनापुढे अनेक प्रश्न आणि समस्या होत्या. त्यात देशातील निरक्षर लोकांना साक्षर करण्याचा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा होता. सुरुवातीला साक्षरता कार्यक्रम हे प्रायोगिक तत्त्वावर काही निवडक विभागात राबविण्यात आले. समाज शिक्षण कार्यक्रम, शेतकऱ्यांसाठी कार्यात्मक साक्षरता कार्यक्रम, राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रम इत्यादी प्रमुख कार्यक्रम होते. परंतु 1978 मध्ये राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत पहिला प्रौढ शिक्षण कार्यक्रम देशपातळीवर राबविण्यात आला. 1988 ते 2007 या काळात राष्ट्रीय साक्षरता मिशन संपूर्ण देशात राबविण्यात आला. यातून जवळ जवळ 13 कोटी लोकांना साक्षर करण्याचे लक्ष होते. तरी सुद्धा या देशातील निरक्षर लोकांची संख्या कमी झाली नाही. म्हणून दिनांक 8 सप्टेंबर 2009 या आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी साक्षर भारत मिशन 2012 या कार्यक्रमाचे उद्घाटन करून देशातील 365 जिल्ह्यातील 70 दशलक्ष निरक्षर लोकांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट ठरविले होते. त्याच अंतर्गत निरक्षरांना साक्षर करण्यासाठी प्रत्येक गावात एक प्रेरक एक प्रेरिकाची नेमणूक करण्यात आली. गेल्या सहा-सात वर्षापासून ही मंडळी अविरत कार्य करीत आहेत.
व्यक्ती साक्षर झाल्यास स्वतंत्रपणे जीवन जगू शकतो. न्यूनगंड कमी होऊन आत्मविश्वास निर्माण होतो. समस्यांना, संकटांना प्रभावीपणे सामना करण्यास सक्षम होतो. मुलांना, कुटुंबातील व्यक्तींना शिक्षणापासून दूर करीत नाहीत. अर्थात शिक्षणाबद्दल त्यांच्या मनात आस्था निर्माण होते. सरकारी किंवा अन्य संस्थांनी चालवलेल्या विविध विकास कार्यक्रमाचा लाभ घेऊ शकतात. त्यांच्यावर होत असलेल्या किंवा झालेल्या अत्याचार अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकतात. आपले हक्क आणि कर्तव्य या बाबतीत जागरूक होतात व सर्वात महत्त्वाचे म्हणजे फसवणुकीपासून स्वतःला वाचवू शकतात. सर्वांनी साक्षर होणे ही काळाची गरज आहे. निरक्षर लोकांना साक्षर करण्यासाठी शासनाने साक्षर भारत या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक गावात प्रेरक व प्रेरिका यांची नेमणूक केलेली आहे त्यामुळे निरक्षर लोकांना साक्षर करण्याचे काम फक्त त्यांचेच आहे असे न मानता सुशिक्षित लोकांची सुद्धा एक जबाबदारी आहे की आपण निदान एका तरी निरक्षर व्यक्तीला साक्षर करावे. असा विचार प्रत्येकाने जर केला तर देशात एकही निरक्षर व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणे गरजेचे आहे. एकदा अक्षर ओळख झाली की त्याच्यात शिक्षणाची गोडी आपोआप निर्माण होते आणि ते स्वतःहून शिकण्यास समोर येतात. मग यातून त्यांचा विकास आपणास साधता येऊ शकतो. 8 सप्टेंबर अर्थात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन त्यानिमित्ताने समर्थ भारत घडविण्यासाठी आपण सर्व सुशिक्षित व्यक्ती एक शपथ घेऊया, " पुढील वर्षाच्या साक्षरता दिवसांपर्यंत निदान एका तरी निरक्षर व्यक्तीला साक्षर करून देशाच्या विकासात हातभार लावेन."
- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769