चला, राजे शिवाजी होऊ या ....!
महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिलेला काळ म्हणजे छत्रपती राजे शिवाजी महाराजांचा काळ होय. महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला राजे शिवाजी महाराज यांचा अभिमान वाटतो. त्यांच्या नावाचा जयजयकार आज ही घराघरातून केला जातो. सर्वधर्मसमभाव म्हणजे काय असते ? याची शिकवण त्यांनी आम्हांला दिली आहे. त्यांच्या राज्यकारभारात प्रत्येक जातीचा, धर्माचा आणि पंथाच्या व्यक्तीला समान हक्क, अधिकार आणि कर्तव्य होते. त्यांच्यासमोर प्रत्येक व्यक्ती हा समान होता. परस्त्री त्यांना माते समान होती. ही सारी शिकवण त्यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांनी त्यांच्या मनावर लहानपणापासून बिंबवले होते. रामायण आणि महाभारतातल्या साहसी व शूरवीर गोष्टी सांगून त्यांना जिजाऊ यांनी धाडसी बनविले होते. आजच्या काळातील प्रत्येक आईला राजमाता जिजाऊ बनणे आवश्यक आहे. आज आजूबाजूला अनैतिक कृत्य होतांना पाहून आपण माणूस आहोत याची घृणा वाटते. एवढं हिंसक आणि पशु प्रमाणे कृत्य आजकाल घडत आहे. आज घराघरांत एक जिजाऊ पाहिजे आहे शिवबा सारखा मुलगा घडविण्यासाठी. आपल्या सहकारी मावळ्यांवर असलेलं त्यांचे प्रेम आणि विश्वास, ज्याच्या बळावर त्यांनी स्वराज्य स्थापन केले. तगड्या मुघलांच्या विरोधात पाच पन्नास मावळे घेऊन युद्ध करणे म्हणजे साधी व सोपी गोष्ट नव्हे. त्यासाठी हिंमत लागते आणि तेवढा आत्मविश्वास देखील लागतो. शक्तीपेक्षा युक्ती कधी ही श्रेष्ठ असते याचे अनेक उदाहरणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात पाहण्यास मिळतात. शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतांना एकवार त्यांच्या चरित्रात जाऊन पहावं, एकदा आपण ही शिवाजी होऊन पहावं. त्यांनी राज्यातील लोकांची इतकी काळजी घेतली होती की, प्रत्येक व्यक्ती राजावर निस्सीम प्रेम करत होते. निसर्गाची काळजी घेताना त्यांनी वाळलेली झाडे तोडावी असा आदेश दिला होता. तसेच शेतकऱ्यांच्या पिकांना नुकसान होणार नाही याची काळजी देखील त्यांनी घेतली. जनतेचे इतके हितचिंतक राजे यापूर्वी कधी झाले नाही आणि पुढे होणार देखील नाहीत. राजे शिवाजी यांचे बालपण आणि तरुणपण या दोन काळात त्यांनी संघर्षमय जीवन जगले. त्यांना आईचे प्रेम भरपूर मिळाले. त्यांच्या आईमुळे राजे शिवाजी घडले. परिस्थिती माणसाला शिकविते आणि घडविते हे देखील राजे शिवाजी यांच्या चरित्रावरून आपणांस कळते. जिवाभावाचा माणूस आपणाला सोडून गेल्यावर काय दुःख होते हे बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे या सारख्या मावळ्यांच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराज किती शोकसागरात बुडाले होते, हे डोकावून पाहिल्यावर कळते. शिवाजी महाराजांचे पुस्तक वाचून किंवा त्याच्यावरील सिनेमा पाहून त्यांची प्रतिमा हृदयात घ्यायला हवं आणि तसे कार्य करायला हवं. हरहर महादेवची गर्जना म्हणजे काम फत्ते करण्याची हमी होती. तेच कार्य आपणाला घेऊन जायचं आहे. चला तर मग प्रत्येकजण शिवाजी महाराज होण्याचा प्रयत्न करूया, हीच शपथ शिवजयंतीच्या निमित्ताने घेतली तर त्यांना खरी आदरांजली ठरेल.
आमचे दैवत आहेत छत्रपती
आम्हांला नाही कुणाची भीती
- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक तथा विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद
9423625769