Tuesday, 5 November 2019

विद्यार्थी प्रवेश दिवस

विद्यार्थी प्रवेश दिनानिमित्त प्रासंगिक लेख

     *आजीवन विद्यार्थी जीवन*

विद्यार्थी म्हणजे काही गोष्टी शिकणारा व्यक्ती. विद्यार्थी दोन शब्दापासून बनला आहे. विद्या आणि अर्थी ज्याचा अर्थ होतो विद्या घेणारा. विद्यार्थी कोणत्याही वयाचा असतो छोट्या मुलांपासून ते वृद्धापर्यंत प्रत्येकजण विद्यार्थी असतो. म्हणूनच म्हटले जाते मनुष्य आजीवन विद्यार्थी असतो. कारण व्यक्ती प्रत्येक वेळी, दररोज काही ना काही नवीन शिकत असतो. या जगात परमेश्वराशिवाय कोणीही परिपूर्ण नाही. बाकीचे आपण सर्वजण अपूर्ण आहोत. एखादा व्यक्ती एखाद्या क्षेत्रात किती ही पारंगत असेल तरी त्याला कोणाकडून तरी नवीन गोष्ट शिकायला मिळतेच मिळते.
संस्कृतमध्ये विद्या आणि विद्यार्थी यांच्या बाबतीत खूप सुंदर सुभाषित आहे.
काकचेष्टा बकोध्यानं श्वाननिद्रा तथैव च।अल्पहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम्॥
अर्थात विद्यार्थीमध्ये पाच लक्षण असायला हवी. कावळ्यासारखी सगळीकडे पाहण्याची दृष्टी आणि त्वरित निर्णय घेण्याची क्षमता असावी,  बगळ्यासारखी एकटक लावून ध्यान करण्याची धारणा असावी ज्यामुळे शिकलेलं सर्व लक्षात राहील, कुत्र्यासारखी कमी झोप असावी, थोडी जरी चाहूल लागली की कुत्रा जागी होतो आणि आजूबाजूच्या परिसरात आपली दृष्टी फिरवतो, अल्पहारी म्हणजे कमी जेवण करणारा असावा, विद्यार्थ्यांनी नेहमी आपल्या जेवणाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. वेळेवर जेवण न करता आपले कोणतेही काम पूर्ण होऊ शकत नाही. तसेच पोटभर खाल्ले तर आळस येऊन झोप येऊ शकते. शेवटचे गुण म्हणजे गृहत्यागी, आपल्या आई वडिलांपासून दूर राहणारा. पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धत अस्तित्वात होती. ज्यामुळे मुले विद्यार्जन करण्यासाठी जंगलातील गुरूच्या आश्रमात जाऊन शिक्षण घेत असत. पण आज ती पद्धत नाही. हे पाच गुण ज्या व्यक्तीमध्ये आढळून येतात तोच खरा विद्यार्थी समजला जातो. ह्या पाच गुणांच्या आधारे मनुष्य आजीवन विद्यार्थी जीवन जगू शकतो.
सुख दुःख आणि शिक्षण विद्यार्थ्यांसोबत कसे असते याबाबतीत एका सुभाषितांमध्ये म्हटले आहे
सुखार्थी वा त्यजेत विद्या विद्यार्थी वा त्यजेत सुखम्।
सुखार्थिनः कुतो विद्या विद्यार्थिनः कुतो सुखम्॥
अर्थात सुख पाहिजे असेल तर शिक्षण सोडून दिले पाहिजे आणि शिक्षण पाहिजे असेल तर सुख सोडून दिले पाहिजे. कारण सुख पाहिजे असणाऱ्याला शिक्षण मिळू शकत नाही आणि शिक्षण घेणाऱ्याला दुःख पहावेच लागते, त्याला सुख कसे मिळणार ?
आपण आजपर्यंतचा अनुभव पाहिला तर वरील ओळीचा आपणास देखील कधी ना कधी अनुभव पाहायला मिळतो. ज्याच्या घरी सर्व सोयीसुविधा आणि कोणत्याच गोष्टीची कमतरता नसते त्यांच्या घरातील मुले सहसा शिक्षणात चमकत नाही. पण त्याउलट ज्यांच्या घरात दारिद्र्य असते, गरिबी असते, कोणत्याच सोयीसुविधा नसतात अश्यांची मुले शिक्षणात चमकतात आणि यशस्वी देखील होतात. पैसा आणि शिक्षण एकत्र नांदू शकत नाही असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. आज पैश्याच्या बळावर पालक मंडळी आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण देऊ इच्छित आहेत. जर मुलांच्या मनात शिक्षण घेण्याची जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची क्षमता असेल तरच तो शिकू शकतो. हीच क्षमता त्या गरीब पालकांच्या मुलांमध्ये पदोपदी जाणवते, त्याला गरिबीचे चटके लागलेले असतात. शिक्षणाशिवाय त्याला कोणताच पर्याय दिसत नाही. म्हणून तो प्रगती करू शकतो. म्हणूनच विद्यार्थ्यांनी जीवनात प्रगती साधायची असेल तर आपल्या अंगी जिद्द, चिकाटी, मेहनत करण्याची तयारी, कठीण परिश्रम करणे आवश्यक आहे
विद्यार्थी समाजात कोठून आणि कसे ज्ञान मिळवीत असतो, याबाबत संस्कृत सुभाषितात म्हटले आहे
आचार्यात् पादमादत्ते पादं शिष्यः स्वमेधया ।पादं सब्रह्मचारिभ्यः पादं कालक्रमेण च ॥
अर्थात विद्यार्थी एक चतुर्थांश ज्ञान आपल्या गुरुजीकडून प्राप्त करीत असतो, एक चतुर्थांश ज्ञान आपल्या बुद्धीद्वारे प्राप्त करीत असतो, आपल्या सहकारी मित्रांकडून एक चतुर्थांश ज्ञान मिळवितो तर राहिलेले एक चतुर्थांश ज्ञान काळानुसार जे अनुभव मिळते तेथून प्राप्त करत असतो. म्हणून विद्यार्थ्यांच्या जीवनात हे चारही गोष्टी अत्यंत महत्वाचे आहे. गुरू आणि शिष्य यांचे खूप जुने संबंध आहेत. गुरुविना विद्यार्थ्यांना ज्ञान मिळत नाही. याबाबतीत संत कबीर आपल्या दोह्यात म्हटले आहे की,
गुरु पारस को अन्तरो,
जानत हैं सब सन्त |
वह लोहा कंचन करे,
ये करि लये महन्त ||
म्हणजे गुरु आणि परीस मध्ये मुख्य फरक आहे, हे सर्व संतांना माहीत आहे. परीसच्या स्पर्शाने लोखंडी वस्तू सोन्यात रूपांतरित होते मात्र गुरूच्या स्पर्शाने विद्यार्थी गुरूसारखा तयार होतो. म्हणून प्रत्येकांना गुरूची आवश्यकता आहे. गुरूकडून मिळालेलं ज्ञान विद्यार्थी आपल्या बुद्धीमध्ये साठवितो आणि ज्यावेळी हवे त्यावेळी त्याचा वापर करत असतो. विद्यार्थी जीवनाच्या दशेत त्यांचे सोबतचे मित्र कसे आहेत ? यावर त्यांची प्रगती अवलंबून असते. या काळात लाभलेले चांगले मित्र आयुष्यभर सोबत असतात. विद्यार्थ्यांच्या जीवनात त्यांचे सहकारी देखील महत्वपूर्ण आहेत. म्हणूनच विद्यार्थ्यांनी चांगल्या मित्रांची निवड करून आपले जीवन सफल करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनातील चौथे महत्वाचे घटक म्हणजे त्याला काळानुसार परिसरातून मिळत असलेला अनुभव. ज्या परिसरात विद्यार्थी राहतो, फिरतो, वावरतो त्याचा काही अंशी परिणाम त्याच्या मनावर होत असतो. आज सात नोव्हेंबर म्हणजे विद्यार्थी प्रवेश दिवस. आजच्या दिवशी भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना साताराच्या गव्हर्नमेंट हाईस्कूल आताचे 'प्रतापसिंह हाईस्कूल' मध्ये इंग्रजी पहिल्या वर्गात प्रवेश देण्यात आला होता. सन 2017 पासून हा दिवस विद्यार्थी प्रवेश दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्याचा मुख्य उद्देश्य म्हणजे जीवनात प्रगती करायची असेल तर शिक्षण हे एकमेव साधन असून कठीण परिश्रम केल्यानेच ते प्राप्त होते याची जाणीव मुलांना व्हावी, जे की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्र वाचनातून कळते. अत्यंत गरीब आणि हलाखीच्या जीवनातून डॉ. आंबेडकर यांनी शिक्षण घेतले. आजीवन विद्यार्थीचा उत्कृष्ट नमुना म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय. प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्या जीवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एक तरी गुण अंगिकरण्याचा प्रयत्न करावा तरच आपले जीवन सफल बनू शकते. विद्यार्थ्यांने आपले जीवन शिक्षण मिळविण्यासाठी व्यतीत करावे. जितके जास्त कष्ट विद्यार्थी दशेत घ्याल तितकेच जास्त सुख मोठेपणी मिळू शकते. म्हणून विद्यार्थ्यांनी आळस झटकून अभ्यासाच्या मागे लागावे आणि आपल्यासकट आपल्या परिवाराचे जीवन सुखी व आनंदी करावे, एवढंच या दिवसानिमित्ताने आपणास सांगावेसे वाटते.
- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

मतदान जनजागृती ( Voting Awarness )

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जनजागृती चला मतदान करू लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.  चला मतदान करू .......! ...