विद्यार्थी शिक्षकांचे नाते घडते बिघडते
शिक्षणाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे आदी समाजसुधारक मंडळींनी आपले आयुष्य वेचले. महात्मा फुले यांनी आपल्या निरक्षर पत्नी सावित्रीबाईला शिकवून भारतातील पहिली महिला शिक्षिका बनविले. एकीकडे पती-पत्नी तर दुसरीकडे विद्यार्थी शिक्षकांची सुद्धा भूमिका ते निभावत होते. मुलींच्या शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी पुण्यातील भिडेच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा उघडली. ज्यामुळे आज असंख्य महिला शिक्षणाने प्रगती साधत आहेत. याचसोबत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मागासवर्गीय लोकांना स्वतःचा विकास साधण्यासाठी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला. यामुळे तमाम जनता शिक्षणाकडे वळू लागली. मानवाचा विकास आणि कल्याणासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही.
मुलांच्या जन्मापासून शिक्षण ही प्रक्रिया चालू होते. कुटुंबातील वातावरणात मुलावर अनुभवाचे संस्कार नकळत पडत असतात आणि आजूबाजूच्या लोकांचे वागणे यांचा मुलांवर प्रभाव पडतो. हीच शिदोरी घेऊन ते मूल सहा वर्षाचे झाले की शाळेत प्रवेश घेते. याच ठिकाणी त्याचा आणि शिक्षणाचा संबंध प्रारंभ होत. पहिल्या वर्गात येणारी मुले बहुतेक वेळा रडतच येतात असे चित्र नेहमीच दाखविले जाते. त्याच्या मनात शाळेविषयी प्रेम किंवा आपुलकी का राहात नाही ? याचा विचार पालक किंवा शिक्षकांनी करणे आवश्यक आहे. पण तसे होत नाही. काही ठिकाणी यात बदल होत आहे, ही आनंदाची बाब आहे, शिक्षण प्रक्रियेतील महत्त्वाचा वर्ग ज्याला पाया समजला जातो ते म्हणजे पहिला वर्ग. या वर्गात येणारे विद्यार्थी आणि शिक्षक नाते प्रेमाचे, ममतेचे, जिव्हाळ्याचे व आपुलकीचे असेल तर त्या विद्यार्थ्यांचे भावी शिक्षण चांगल्या प्रकारे होऊ शकते. ज्याप्रकारे इमारतीचा पाया मजबूत असेल तर त्यावर उभी रहाणारी इमारत ही शाश्वत आणि चिरकाल टिकणारी असते. अगदी त्याच प्रकारे या पहिल्या वर्गाचे आहे. तेव्हा शिक्षक मंडळीने विद्यार्थ्याचे नाते बिघडू नये यासाठी काळजी घेणे अत्यावश्यक व गरजेचे आहे.
मूल जसे जसे मोठे होत जाते तसे तसे त्याच्या मनात पहिल्या वर्गात प्रवेश घेतांना शाळेविषयी असलेली भीती दूर होते. ते अगदी बिनधास्तपणे शाळेत येतात, खेळतात आणि घरी जातात. शाळेमध्ये विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याची जबाबदारी अर्थातच शिक्षकांची आहे. कारण शाळा हे संस्काराचे केंद्र समजल्या जाते आणि समाजातील पालक मोठ्या आशेने आणि विश्वासाने त्यांचे मूल शिक्षकाकडे सोपवितात. विद्यार्थ्यांना घडविण्याचे एक महान पण कठीण काम शिक्षकांना करावे लागते. जे शिक्षक या कार्याला समजून घेऊन विद्यार्थ्यांसोबत वागतात किंवा रहातात त्यांचे संबंध कधीच बिघडत नाही. उलट ते शिक्षक विद्यार्थीप्रिय बनतात. समाजात त्यांचा सन्मान होतो. ते सर्वांना हवेहवेसे वाटतात. परमपूज्य साने गुरुजी हे विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. त्यांचे काळीज मातृहृदय होतं, त्यांनी शिक्षकी पेशाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यांच्या नावाने आज सर्वच गुरुजनांना मानसन्मान आणि आदर मिळतो. जीवनाचा खरा मार्गदर्शक हा गुरू असतो. ती जागा आज शिक्षकांना मिळाली हे खरोखरच परम भाग्याचे काम आहे. मात्र हेच शिक्षक विद्यार्थी नाते घडण्याऐवजी बिघडते तेव्हा तळपायाची आग मस्तकाला जाते आणि डोके गरगरते.
वर्तमानपत्रात विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या अनैतिक संबंधातील बातम्या जेंव्हा वाचण्यात येतात तेव्हा मन सुन्न होतं. ज्यांच्यावर विश्वास ठेवून आपली मुलं जवळपास सहा तास शाळेमध्ये शिक्षकांच्या ताब्यात दिले जाते, तेव्हा मुलांचे रक्षक असलेले जर भक्षक बनत असेल तर काय करावे ? पालकांचा शिक्षकावर असलेला विश्वास उडून गेला तर मुलांचे शिक्षण तरी कसे पूर्ण होणार ? आज मुलींच्या शिक्षणावर शासन करोडो रुपये खर्च करीत आहे, तरी मुलींच्या शिक्षणात म्हणावी तेवढी प्रगती का नाही ? आठव्या वर्गापर्यंत मुलींची 25 टक्के गळती होते आणि त्यापुढील दोन वर्षात अर्ध्याहून अधिक मुली शाळा बंद करतात. या ठिकाणी विद्यार्थी आणि शिक्षक यांचे नाते बिघडण्याची जास्तीत जास्त शक्यता बळावते. म्हणून पालक वर्ग अपघातापूर्वी हीच सावधान होतात आणि मुलींना शाळेत पाठविणे बंद होते, ही ग्रामीण भागातील सत्यता आहे. यातून समाजामध्ये एक वाईट संदेश जातो आणि मुलींचे शिक्षण अपूर्ण राहते. शिक्षकांच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे हे घडते म्हणून यास सर्वस्वी जबाबदार म्हणून शिक्षक मंडळीकडे पाहणे चुकीचे ठरणार नाही. समाजात अशा एक-दोन घटना घडल्या आहेत याचा विचार पालक या भूमिकेत जाऊन गरजेचे आहे.
विद्यार्थी आणि शिक्षक यांचे नाते बिघडविण्यात अजून बरीच कारणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे विद्यार्थ्यांना समजून घेत नाहीत. बऱ्याच वेळा मुलांना समजून न घेता त्यांच्यावर शिक्षण लादले जाते. त्यांच्या कलागुणांना वाव दिला जात नाही. स्वतःचा साक्षात्कार मुलांना करू न दिल्यामुळे ती मुले कुणाचेच ऐकत नाहीत आणि त्यांचे नाते बिघडण्यास प्रारंभ होतो. तसे पाहिले तर मुलांचा शिक्षकाची संबंध फक्त सहा तासाचा असतो. बाकी सर्व वेळ तो आपल्या कुटुंबात वावरतो. मात्र याठिकाणी एक गोष्ट खास करून नमूद करावेसे वाटते ते म्हणजे मूल शिक्षकांचे बोलणे ब्रह्मवाक्य समजतात. शिक्षक जे सांगतील तेच मुले करतात. आमचे शिक्षक असे म्हणाले तेव्हा आम्ही असेच करू असे घरातील सदस्यांना ठणकावून सांगतात. यावरून विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांविषयी काय भावना आहेत हे आपण समजू शकतो. शिक्षक सोडून घरातील कुणाचेच ते ऐकत नाहीत, याची जाण ठेवल्यास विद्यार्थी - शिक्षक संबंध नक्की सुधारतील.
शिक्षकांनी शाळेत वावरताना प्रत्येक गोष्टीकडे खूप गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल. शिक्षकांच्या प्रत्येक वर्तणुकीची छाप मुलावर पडत असते. मी सांगे लोकांला, शेंबूड माझ्या नाकाला या वृत्तीने शिक्षकांना वागून चालणार नाही. कारण त्यांच्या समोरील चिमुकली मुलं खूपच संवेदनशील असतात. ते लगेच शिक्षकांच्या वर्तणुकीचे अनुकरण करतात. काही गोष्टी दीर्घकाळाने परिणाम दाखवितात तर काही लगेचच परिणाम दाखवितात. शाळेचे नियम जे मुलांना लागू असतात ते शिक्षकांनासुद्धा असायलाच पाहिजे. उशिरा येणाऱ्या मुलांना शिक्षा करीत असताना आपणास उशीर होत नाही ना याची एकदा शिक्षकांनी चाचपणी करावी. उशिरा न येणाऱ्या शिक्षकांचे विद्यार्थीसुद्धा उशिरा येत नाहीत, प्रयोग करून पाहण्यात हरकत नाही. तंबाखूच्या व्यसनाने संपूर्ण जगाला वेढले आहे, यात शिक्षकही सुटला नाही. तलब आली की खावेच लागते त्यास पर्याय नसतो. परंतु काळ आणि वेळ यांचे भान ठेवून वागल्यास त्याचे विपरीत परिणाम दिसणार नाहीत. मुलांसमोर तंबाखू चोळल्यावर त्यांच्यावर काय संस्कार होतील ? संबंध घडविण्यासाठी विडी, सिगारेट आणि तंबाखूला शाळेच्या परिसरातून हद्दपार करा. काही वर्षानंतर आपले विद्यार्थी " सर नमस्कार, मी अमुक अमुक आपल्यामुळे असा झालो " असे म्हणतो तेव्हा ऊर भरून येते. चला तर मग एक नवीन भारत घडविण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षक यांचे नाते चिरकालासाठी घडवूया.
- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769