नागोराव सा. येवतीकर

Saturday, 26 May 2018

शिक्षक-विद्यार्थी संबंध

विद्यार्थी शिक्षकांचे नाते घडते बिघडते

शिक्षणाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे आदी समाजसुधारक मंडळींनी आपले आयुष्य वेचले. महात्मा फुले यांनी आपल्या निरक्षर पत्नी सावित्रीबाईला शिकवून भारतातील पहिली महिला शिक्षिका बनविले. एकीकडे पती-पत्नी तर दुसरीकडे विद्यार्थी शिक्षकांची सुद्धा भूमिका ते निभावत होते. मुलींच्या शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी पुण्यातील भिडेच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा उघडली. ज्यामुळे आज असंख्य महिला शिक्षणाने प्रगती साधत आहेत. याचसोबत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मागासवर्गीय लोकांना स्वतःचा विकास साधण्यासाठी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला. यामुळे तमाम जनता शिक्षणाकडे वळू लागली. मानवाचा विकास आणि कल्याणासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही.
मुलांच्या जन्मापासून शिक्षण ही प्रक्रिया चालू होते. कुटुंबातील वातावरणात मुलावर अनुभवाचे संस्कार नकळत पडत असतात आणि आजूबाजूच्या लोकांचे वागणे यांचा मुलांवर प्रभाव पडतो. हीच शिदोरी घेऊन ते मूल सहा वर्षाचे झाले की शाळेत प्रवेश घेते. याच ठिकाणी त्याचा आणि शिक्षणाचा संबंध प्रारंभ होत. पहिल्या वर्गात येणारी मुले बहुतेक वेळा रडतच येतात असे चित्र नेहमीच दाखविले जाते. त्याच्या मनात शाळेविषयी प्रेम किंवा आपुलकी का राहात नाही ? याचा विचार पालक किंवा शिक्षकांनी करणे आवश्यक आहे. पण तसे होत नाही. काही ठिकाणी यात बदल होत आहे, ही आनंदाची बाब आहे, शिक्षण प्रक्रियेतील महत्त्वाचा वर्ग ज्याला पाया समजला जातो ते म्हणजे पहिला वर्ग. या वर्गात येणारे विद्यार्थी आणि शिक्षक नाते प्रेमाचे, ममतेचे, जिव्हाळ्याचे व आपुलकीचे असेल तर त्या विद्यार्थ्यांचे भावी शिक्षण चांगल्या प्रकारे होऊ शकते. ज्याप्रकारे इमारतीचा पाया मजबूत असेल तर त्यावर उभी रहाणारी इमारत ही शाश्वत आणि चिरकाल टिकणारी असते. अगदी त्याच प्रकारे या पहिल्या वर्गाचे आहे. तेव्हा शिक्षक मंडळीने विद्यार्थ्याचे नाते बिघडू नये यासाठी काळजी घेणे अत्यावश्‍यक व गरजेचे आहे.
मूल जसे जसे मोठे होत जाते तसे तसे त्याच्या मनात पहिल्या वर्गात प्रवेश घेतांना शाळेविषयी असलेली भीती दूर होते. ते अगदी बिनधास्तपणे शाळेत येतात, खेळतात आणि घरी जातात. शाळेमध्ये विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याची जबाबदारी अर्थातच शिक्षकांची आहे. कारण शाळा हे संस्काराचे केंद्र समजल्या जाते आणि समाजातील पालक मोठ्या आशेने आणि विश्वासाने त्यांचे मूल शिक्षकाकडे सोपवितात. विद्यार्थ्यांना घडविण्याचे एक महान पण कठीण काम शिक्षकांना करावे लागते. जे शिक्षक या कार्याला समजून घेऊन विद्यार्थ्यांसोबत वागतात किंवा रहातात त्यांचे संबंध कधीच बिघडत नाही. उलट ते शिक्षक विद्यार्थीप्रिय बनतात. समाजात त्यांचा सन्मान होतो. ते सर्वांना हवेहवेसे वाटतात. परमपूज्य साने गुरुजी हे विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. त्यांचे काळीज मातृहृदय होतं, त्यांनी शिक्षकी पेशाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यांच्या नावाने आज सर्वच गुरुजनांना मानसन्मान आणि आदर मिळतो. जीवनाचा खरा मार्गदर्शक हा गुरू असतो. ती जागा आज शिक्षकांना मिळाली हे खरोखरच परम भाग्याचे काम आहे. मात्र हेच शिक्षक विद्यार्थी नाते घडण्याऐवजी बिघडते तेव्हा तळपायाची आग मस्तकाला जाते आणि डोके गरगरते.
वर्तमानपत्रात विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या अनैतिक संबंधातील बातम्या जेंव्हा वाचण्यात येतात तेव्हा मन सुन्न होतं. ज्यांच्यावर विश्वास ठेवून आपली मुलं जवळपास सहा तास शाळेमध्ये शिक्षकांच्या ताब्यात दिले जाते,  तेव्हा मुलांचे रक्षक असलेले जर भक्षक बनत असेल तर काय करावे ? पालकांचा शिक्षकावर असलेला विश्वास उडून गेला तर मुलांचे शिक्षण तरी कसे पूर्ण होणार ? आज मुलींच्या शिक्षणावर शासन करोडो रुपये खर्च करीत आहे, तरी मुलींच्या शिक्षणात म्हणावी तेवढी प्रगती का नाही ? आठव्या वर्गापर्यंत मुलींची 25 टक्के गळती होते आणि त्यापुढील दोन वर्षात अर्ध्याहून अधिक मुली शाळा बंद करतात. या ठिकाणी विद्यार्थी आणि शिक्षक यांचे नाते बिघडण्याची जास्तीत जास्त शक्यता बळावते. म्हणून पालक वर्ग अपघातापूर्वी हीच सावधान होतात आणि मुलींना शाळेत पाठविणे बंद होते, ही ग्रामीण भागातील सत्यता आहे. यातून समाजामध्ये एक वाईट संदेश जातो आणि मुलींचे शिक्षण अपूर्ण राहते. शिक्षकांच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे हे घडते म्हणून यास सर्वस्वी जबाबदार म्हणून शिक्षक मंडळीकडे पाहणे चुकीचे ठरणार नाही. समाजात अशा एक-दोन घटना घडल्या आहेत याचा विचार पालक या भूमिकेत जाऊन गरजेचे आहे.
विद्यार्थी आणि शिक्षक यांचे नाते बिघडविण्यात अजून बरीच कारणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे विद्यार्थ्यांना समजून घेत नाहीत. बऱ्याच वेळा मुलांना समजून न घेता त्यांच्यावर शिक्षण लादले जाते. त्यांच्या कलागुणांना वाव दिला जात नाही. स्वतःचा साक्षात्कार मुलांना करू न दिल्यामुळे ती मुले कुणाचेच ऐकत नाहीत आणि त्यांचे नाते बिघडण्यास प्रारंभ होतो. तसे पाहिले तर मुलांचा शिक्षकाची संबंध फक्त सहा तासाचा असतो. बाकी सर्व वेळ तो आपल्या कुटुंबात वावरतो. मात्र याठिकाणी एक गोष्ट खास करून नमूद करावेसे वाटते ते म्हणजे मूल शिक्षकांचे बोलणे ब्रह्मवाक्य समजतात. शिक्षक जे सांगतील तेच मुले करतात. आमचे शिक्षक असे म्हणाले तेव्हा आम्ही असेच करू असे घरातील सदस्यांना ठणकावून सांगतात. यावरून विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांविषयी काय भावना आहेत हे आपण समजू शकतो. शिक्षक सोडून घरातील कुणाचेच ते ऐकत नाहीत, याची जाण ठेवल्यास विद्यार्थी - शिक्षक संबंध नक्की सुधारतील.
शिक्षकांनी शाळेत वावरताना प्रत्येक गोष्टीकडे खूप गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल. शिक्षकांच्या प्रत्येक वर्तणुकीची छाप मुलावर पडत असते. मी सांगे लोकांला, शेंबूड माझ्या नाकाला या वृत्तीने शिक्षकांना वागून चालणार नाही. कारण त्यांच्या समोरील चिमुकली मुलं खूपच संवेदनशील असतात. ते लगेच शिक्षकांच्या वर्तणुकीचे अनुकरण करतात. काही गोष्टी दीर्घकाळाने परिणाम दाखवितात तर काही लगेचच परिणाम दाखवितात. शाळेचे नियम जे मुलांना लागू असतात ते शिक्षकांनासुद्धा असायलाच पाहिजे. उशिरा येणाऱ्या मुलांना शिक्षा करीत असताना आपणास उशीर होत नाही ना याची एकदा शिक्षकांनी चाचपणी करावी. उशिरा न येणाऱ्या शिक्षकांचे विद्यार्थीसुद्धा उशिरा येत नाहीत, प्रयोग करून पाहण्यात हरकत नाही. तंबाखूच्या व्यसनाने संपूर्ण जगाला वेढले आहे, यात शिक्षकही सुटला नाही. तलब आली की खावेच लागते त्यास पर्याय नसतो. परंतु काळ आणि वेळ यांचे भान ठेवून वागल्यास त्याचे विपरीत परिणाम दिसणार नाहीत.  मुलांसमोर तंबाखू चोळल्यावर त्यांच्यावर काय संस्कार होतील ? संबंध घडविण्यासाठी विडी, सिगारेट आणि तंबाखूला शाळेच्या परिसरातून हद्दपार करा. काही वर्षानंतर आपले विद्यार्थी " सर नमस्कार, मी अमुक अमुक आपल्यामुळे असा झालो " असे म्हणतो तेव्हा ऊर भरून येते. चला तर मग एक नवीन भारत घडविण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षक यांचे नाते चिरकालासाठी घडवूया.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

Friday, 25 May 2018

जागरूक पालकच खरे मालक

जागरूक पालकच खरे मालक

मनुष्याच्या जीवन विकासासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. शिक्षणामुळे मनुष्य सुसंस्कारी, सदाचारी आणि शीलवान बनतो. शिक्षणामुळे त्याला जीवन जगण्याची एक नवी दृष्टी मिळते. ज्याच्या आधारावर तो स्वतःचा विकास तर करतोच शिवाय आपल्या कुटुंबाचा पर्यायाने गावाचा विकास साधतो. गावाच्या विकासातून राज्याचा विकास होतो आणि म्हणजे देशाचा विकास होऊ शकतो. म्हणूनच असे म्हटले जाते की, शाळेतून देश घडविला जातो. उद्याच्या देशाचा प्रमुख आधारस्तंभ आज शाळेत घडत असताना दिसत आहे. मनुष्याच्या मूलभूत गरजा आजपर्यंत फक्त तीनच समजल्या जायचे पण त्यात आता आरोग्य आणि शिक्षण याचासुद्धा समावेश झाला आहे. या शिक्षणाच्या बाबतीत आचार्य विनोबा भावे म्हणतात की यशस्वी शिक्षण हा यशस्वी जीवनाचा पाया आहे. मग आज शाळेतून यशस्वी शिक्षण दिल्या जात आहे का ? असा प्रश्न प्रत्येकांना पडणे सहाजिक आहे. समाजातील प्रत्येक घटकाचे या प्राथमिक शिक्षणावर लक्ष आहे. प्राथमिक शिक्षणाचा सध्याचा दर्जा खूपच खालावलेला आहे. सरकारी शाळांची गुणवत्ता समाधानकारक नाही यासारखी ओरड प्रसिद्धी माध्यमातून ऐकायला मिळत आहे. यात काही अंशी तथ्य सुद्धा असेल यात शंका नाही. मात्र या परिस्थितीला कोणता घटक जबाबदार आहे ? शिक्षक, पालक, विद्यार्थी की प्रशासन
शहरी भागातील शिक्षणापेक्षा ग्रामीण भागातील शिक्षणाची स्थिती फारच भयानक आहे. यास विद्यार्थ्याच्या सभोवती असलेले वातावरण, पालकांची आर्थिक स्थिती आणि शिक्षणाच्या सोयीसुविधा यासारखे अनेक बाबी कारणीभूत असतात. यात सर्वात महत्वाचे म्हणजे पालक वर्ग. वास्तविक पाहता शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थ्यासोबत त्यास शिकविणारे शिक्षक जेवढे जबाबदार आहेत त्याच्याच तुलनेत त्यांचे पालक सुद्धा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत कारणीभूत घटक आहेत. शाळेतील शिक्षक मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी विविध उपक्रम राबवत जीवाचे रान करतांना, विद्यार्थ्यांच्या घरात मात्र दूषित वातावरण असेल तर पालथ्या घागरीवर पाणी नव्हे का ? ज्या ठिकाणी शिक्षक व पालक यांच्यात विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत संवाद घडून येतो त्याच ठिकाणी आपणाला विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि प्रगती आढळून येते. आपल्या मुलांच्या शिक्षणाविषयी शहरी भागातील पालक जेवढे जागरूक असतात तेवढे ग्रामीण भागातील पालक दिसून येत नाहीत. पालकांची आपल्या पाल्यांच्या शिक्षणाबाबतची उदासीनता संपल्याशिवाय विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत अजिबात वाढ दिसणार नाही.
वयाची सहा वर्षे पूर्ण झाली की प्रत्येक जण आपल्या पाल्यांना पहिल्या वर्गात प्रवेश देण्यासाठी गर्दी करतात. प्रवेश प्रक्रिया करताना पालकांनी शाळेत यावे, ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावे, पहिल्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षक मंडळी सोबत आपल्या पाल्याविषयी चर्चा करावी, पाल्याचे सर्व गुणवैशिष्ट्ये सांगावे अशी कमीत कमी अपेक्षा असते. मात्र ग्रामीण भागात असे होत नाही तर यापेक्षा वेगळे चित्र बघायला मिळते. जानेवारी महिन्यात शिक्षकाकडून एक सर्वे केल्या जाते ज्याद्वारे गावात प्रवेश पात्र मुले सापडतात. त्यांची यादी शाळा सुरू होण्यापूर्वी अंगणवाडी शिक्षिकेच्या मदतीने पूर्ण केली जाते. पात्र मुले शंभर टक्के प्रवेश देणे शाळांना बंधनकारक असते त्यानुसार प्रवेश पात्र यादीतील सर्वच मुलांना पहिल्या वर्गात प्रवेश दिला जातो. प्रवेश देताना मुलांसोबत पालक येतातच याची खात्री नसते. अंगणवाडीतून सरळ शाळेत यांना दाखल केल्या जाते. यानंतर पालकांना शाळेत बोलावून घेऊन बाकीच्या क्रिया सोपस्करपणे पार पाडल्या जातात. मुलांच्या पहिल्या वर्गापासूनच पालक दुर्लक्ष करतात. ज्या पालकांना आपल्या पाल्यांची काळजी असते असे पालक शाळेत येऊन आपल्या पाल्यांची नावे शाळेत दाखल करतात. परंतु अशा पालकांची संख्या फारच कमी आहे. याठिकाणी शिक्षकांनी आपल्या कल्पकतेतून एखादा उपक्रम राबविला तर पालक शाळेत नक्की येऊ शकतात. प्रवेश पात्र यादीवरील पालकांची सभा पहिल्याच दिवशी शाळेत आयोजन करून त्यांचं स्वागत केलं, पाल्यांच्या पुढील शिक्षणाविषयी त्यांच्यात जागरूकता निर्माण होण्याबाबत मार्गदर्शन केल्यास त्याचे दूरगामी परिणाम नक्कीच बघायला मिळतात. असे नियोजन फार कमी  शाळेत दिसून येते. त्यामुळेच पालक वर्ग शाळेपासून दुरावल्या जात आहेत. काही पालक आपल्या पाल्यांशी शिक्षकांसोबत नेहमी चर्चा करतात आणि त्यांच्याशी संपर्कात राहतात ते अर्थातच चांगली प्रगती करतात. परंतु अशा पालकांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतके कमी आहे. पहिले दोन चार वर्षे अजिबात लक्ष न देणाऱ्या पालकांचे डोळे खूप उशिरा उघडतात. ज्यावेळी पाल्य पाचव्या वर्गात जातो आणि त्याला लिहिता-वाचता येत नाही, साधे गणित जमत नाही हे लक्ष्यात येते अशा वेळी मात्र याचे खापर शिक्षकांच्या डोक्यावर फोडून मोकळे होतात. ग्रामीण भागात असेही पालक आढळून येतात की, त्यांना स्वतःचे पाल्य कोणत्या वर्गात शिकत आहे ? याचे सुद्धा ज्ञान नसते, अश्या पालकांकडून कसली अपेक्षा ठेवणार ?
इमारतीचा पाया मजबूत असेल तर इमारत चांगल्या प्रकारे उभी राहते. त्याच अनुषंगाने विद्यार्थ्यांचे प्राथमिक शिक्षण म्हणजे पाया आहे. ते जर पक्के असेल तर त्याचे पुढील शिक्षण सुद्धा चांगले व गुणवत्तापूर्ण होईल. परंतु याच वर्गाकडे नेमके दुर्लक्ष केल्या जाते आणि सुरू होतो अप्रगत विद्यार्थ्याचा गाडा. विद्यार्थी अप्रगत राहण्यामागे शिक्षक कारणीभूत असतीलही कदाचित. कारण आजच्या शाळेची परिस्थिती लक्षात घेता शिक्षकाकडे असलेल्या अतिरिक्त कामाचा बोजा आणि शिक्षक कमतरता यामुळे शाळेत  शिक्षकांचे विद्यार्थ्याकडे लक्ष नाही आणि घरात पालकाचे लक्ष नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय होत चालले आहे. यासाठी एका शिक्षकाच्या डोक्यावर खापर फोडून ही समस्या सुटणार नाही. त्यासाठी पालक दक्ष असणे, सावध असणे अत्यंत गरजेचे आहे. शिक्षक आणि पालक यांच्यात नेहमी संवाद होत राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे जे की आज घडताना दिसत नाही.
एकीकडे पालकांना शाळेत जाण्यास वेळ मिळत नाही तर दुसरीकडे शिक्षक मंडळी पालकांना शाळेत बोलावत नाहीत, त्यांना घाबरतात. एखादा पालक शाळेत आला की शिक्षकांच्या उरात धडकी भरते. कारण आज पालक शाळेत येत आहेत ते फक्त शिक्षकांच्या तक्रारीसाठी. शाळेत काय चालू आहे ? यांच्याशी त्यांचे काही देणे-घेणे नाही. शाळेतल्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी व्हायचे नाही, शाळेला कसल्याही प्रकारची  मदत करायची नाही अशा नकारात्मक भूमिकेत आज पालक वर्ग गेलेला आहे. काही शाळा यास अपवाद आहेत. या भावनेतून शिक्षक आणि पालक यांच्यात संवाद कमी झाले आहेत. शाळेला अनुदान भरपूर येते आणि शिक्षकांचा पगार काही कमी नाही असा समज पालकांनी करून घेतला आणि त्यातून मग संवाद होण्याऐवजी वाद निर्माण होऊ लागले. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी शिक्षकांना जी पत, प्रतिष्ठा, मानसन्मान हे जे काही मिळत होते ते आज नसल्यामध्ये जमा आहे. पूर्वी गावातील लोकं गुरुजींना आदराने नमस्कार करीत होते तर आज गुरुजी मंडळींनाच गावातील लोकांना दबावाखाली नमस्कार करावा लागतो ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. आमच्या पाल्यांना अजिबात शिक्षा करायची नाही, त्यांना काही बोलायचे नाही, कोणतेच काम सांगायचे नाही अशी स्थिती आज निर्माण झालेली आहे. पूर्वी पालक आपल्या पाल्यांना जास्त लाड, प्रेम, लोभ न करता शिक्षणासाठी पाठवत असे. आपली तक्रार घरातील आई-वडिलांपर्यंत गेल्यास आपलं काही खैर नाही असे त्या पाल्यांना वाटायचे. आज मात्र हे चित्र पार बदलून गेले आहे. गुरुजी आमच्या पोराला का मारलं अशी म्हणणारी पालक जेव्हा शाळेत येऊन शिक्षकांना सर्व विद्यार्थ्यांसमोर प्रश्न विचारतात तेव्हा शाळेतील मुलांचे मनोबल वाढते तर त्याच वेळी शिक्षकांची खच्चीकरण होते याचा पालक जरादेखील विचार करीत नाही.
पालकांनी आपल्या पाल्याविषयी चौकशी किंवा विचारपूस शिक्षकांसोबत खाजगीमध्ये करावी ती खरी पालकांची काळजी समजल्या जाते. पण तसे होताना दिसत नाही. काही पालक शाळेत येतात फक्त मुलांची सुट्टी मागण्यासाठी. आज शेतात बैल चारविण्यास कोणी नाही त्याला आज सुट्टी द्या, भावंडाना  सांभाळण्यास कोणी नाही तिला सुट्टी द्या असे बोलणारे पालक त्यांच्या शिक्षणाविषयी विचारण्यास कधीच तयार नसतो. पालक शाळेत येऊन एकच दिवशी सुट्टी मागतात परंतु मुलं त्याचा गैरफायदा घेतात आणि अधूनमधून शाळेला दांडी मारतात. मुले अप्रगत असण्यामागे मुलांची अनियमितपणा किंवा अनुपस्थिती हे एक मोठे कारण आहे. मात्र त्यास कोणीही समजून घेण्यास तयार नाहीत.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षक आणि पालक यांच्यात दर आठवडा नाही तर नाही निदान पंधरा दिवसातून एकदा तरी भेटीगाठी होणे गरजेचे आहे. त्या प्रकारच्या पालक सभेचे नियोजन शाळांनी करणे आवश्यक आहे. कधीकधी पालक शाळेपर्यंत पोहोचू शकत नाहीत तेव्हा शिक्षकाने विविध माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या आईदेखील शाळेत कश्या येतील याचे नियोजन करावे. विविध सणांच्या माध्यमातून हळदीकुंकू सारख्या उपक्रमाद्वारे त्यांच्याशी चर्चा केल्यास शिक्षक पालक यांच्यात प्रेम वृद्धिंगत होईल. शाळा आणि गाव यांच्यातील प्रेमळ वातावरणाचा अनुकूल परिणाम शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर होते. म्हणून म्हटले जाते की गावाला शाळेचा आधार असावा आणि शाळेला गावाचा आधार, एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ या म्हणीप्रमाणे कार्य होणे आवश्यक आहे. पालक आणि शिक्षक मंडळीशी भांडण, वादविवाद करण्यापेक्षा त्यांच्याशी आपुलकी, प्रेम आणि मायेने वागले आणि बोलले पाहिजे. यामुळे शाळेचा सर्वच बाबतीत विकास साधणे सोपे होईल. ग्रामीण भागात आज याच गोष्टीची कमतरता आहे म्हणूनच प्रगत महाराष्ट्र सारखा उपक्रमदेखील असफल ठरताना दिसत आहे. आपल्या पाल्यांच्या शिक्षणाविषयी जागे असलेले पालकच खऱ्या अर्थाने त्याचे मालक ठरतात हे मात्र खरे आहे.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

शिक्षणाचा काय फायदा ?

शिक्षणाचा काय फायदा ?

शिक्षणाने मानवी जीवनाचा विकास होतो म्हणूनच महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे म्हटले आहे. प्रत्येक व्यक्तीला निसर्गतः दोन डोळे लाभतात मात्र शिक्षण हा प्रत्येक मनुष्याचा तिसरा डोळा आहे. दोन डोळे फक्त बघायचे काम करतात तर तिसरा डोळा बघितलेले समजून घेतो म्हणून ते सर्व कायमचे स्मरणात राहते. आपणास चांगल्या प्रकारचा तिसरा डोळा मिळावा यासाठी लहानपणापासून शिक्षणाचे धडे मिळविण्याचा प्रयत्न केल्या जातो. शिक्षण क्षेत्रात आज चालू असलेल्या घडामोडीकडे लक्ष दिल्यास एक बाब प्रकर्षाने जाणवते की, या ठिकाणी जे शिक्षणाचे धडे दिले जात आहेत हे फक्त पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित आहे. त्याचा प्रत्यक्ष जीवनात व्यवहार करताना काडीमात्र उपयोग होणार नाही. येथे फक्त मुला-मुलांमध्ये स्पर्धा पाहिली जाते. पुस्तकी किडा तयार केल्या जात आहे. त्यामुळे सन 2020 मध्ये भारत महासत्ता बनण्याची जे स्वप्ने पाहत आहेत ती कदाचित सत्यात उतरणारच नाही असे वाटते. शालेय अभ्यासक्रमातून मुलांना त्यांच्यावर संस्कार टाकणारे आणि त्यांच्यात सर्वधर्मसमभाव वृत्ती जोपासावी या वृत्तीने आराखडा तयार केला जातो. मात्र शाळा पातळीवर खरोखरच या विचारांची अंमलबजावणी पूर्ण होते का ? अंमलबजावणी होत नसल्यास काय समस्या आहे ? याचा मागोवा घेऊन शिक्षण प्रणालीत सुधारणा घडवून आणणे गरजेचे आहे.
आजही कित्येक लोक असे समजतात की शिकलो म्हणजे नोकरी मिळायलाच हवे. कारण आजचे शिक्षण फक्त नोकरी मिळवण्यासाठी दिले जात असल्याचा अनुभव अनेक ठिकाणी दिसून येतो. कोणतीही शासकीय नोकरी मिळवायची असेल तर स्पर्धा परीक्षा घेतली जाते आणि त्या परीक्षेत पुस्तकातीलच प्रश्न विचारले जातात. वर्ग-1 किंवा वर्ग 2 या पदाच्या भरती सुद्धा त्यांच्या बौद्धिक कसोटी वरूनच ठरवले जातात. त्यामुळे या पुस्तकी ज्ञानाला अधिकचे महत्त्व प्राप्त झालेले आहे. शिक्षणाने त्याच्या बुद्धिमत्तेचा वरचेवर विकास होतो. त्याची बौद्धिक क्षमता वाढते, तो विकसित होत राहतो. स्वतःसोबत कुटुंबाचा विकास करतो. पर्यायाने समाजाचा व देशाचा विकास होतो. मात्र समाजात असे काही प्रसंग किंवा अनुभव बघायला मिळतात की, या शिक्षणाचा फायदा ती व्यक्ती स्वतःला तर देत नाही शिवाय कुटुंबाला, समाजाला आणि देशालाही देत नाही तेंव्हा प्रश्न पडतो की, या शिक्षणाचा काय फायदा ?
समाजात आज आपणास शिकलेल्या लोकांमध्येसुद्धा अंधश्रद्धा असलेले दिसून येतात. वास्तविक पाहता शिक्षणाने समाजातील अंधश्रद्धा समूळ नष्ट व्हायला पाहिजे मात्र तसे झाले नाही. कारण अंधश्रद्धा नष्ट करू पाहणारे शिक्षण त्यांना मिळालेच नाही. मुलांचे घरातील शिक्षण आणि शाळेतील शिक्षण यात फरक असायला पाहिजे. पण तसे सध्यातरी चित्र कुठेही दिसत नाही. परमेश्वर सर्वत्र व्यापून आहे किंवा जो निर्माता आहे तो सृष्टीच्या चराचरात आहे असे शिक्षणातून समजल्यानंतर सुद्धा शिकलेली मंडळी देव-देवतांच्या नावाने यात्रा करीत फिरत राहिले तर खरोखरच आपण घेतलेल्या शिक्षणाचा फायदा काय ? असा प्रश्न पडतो. ही माझी कुणावर वैयक्तिक टीका नाही मात्र यामुळे खरोखरच आपण काय मिळवितो ? पूजा, विधी, अर्चना या कार्यक्रमात महिलांचा जरा जास्तच भर असतो. वास्तविक पाहता शिक्षणाचा खरा परिणाम महिला वर्गावर होणे अत्यंत महत्त्वाचे आहेत. महिलांच्या डोक्यातील अंधश्रद्धेचे भूत जर खाली उतरले तर अर्ध्याहून अधिक समाज सुधारणा होऊ शकते. शिक्षणाने डोळस दृष्टी मिळायला हवे मात्र सध्या तसे चित्र समाजात दिसत नाही म्हणूनच प्रश्न पडतो की या शिक्षणाचा नेमका फायदा काय आहे ? प्रत्येक पालकांना आपले मूल शिकून डॉक्टर, इंजिनीअर व्हावे, त्याला भरमसाठ पगार असलेली नोकरी मिळावी, त्यास सुखी जीवन जगता यावे यासाठी त्याला शिक्षण दिल्या जाते. शिक्षण घेऊन डॉक्टर झालेला व्यक्ती आपल्या ज्ञानाचा वापर लोकांची लुबाडणूक किंवा पिळवणूक करण्यासाठी करीत असेल तर त्याला मिळालेले शिक्षण काय कामाचे ? हे एक उदाहरण आहे पण असे प्रत्येक क्षेत्राच्या बाबतीत घडत असताना दिसून येते. शिक्षणाने त्याला सर्व काही दिले मात्र त्याच्या बुद्धिमत्तेत काही विकास झाला नाही. याउलट शिक्षण न घेतलेला अडाणी माणसाजवळ जेवढी माणुसकी दिसते तेवढी माणुसकी शिकलेल्या लोकांजवळ नसते हा आजवरचा अनुभव सांगतो. यावरून आपण असे म्हणू शकतो की यापेक्षा न शिकलेला बरा. शिकून-सवरून मोठा झालेला व्यक्ती आपले गाव आणि माणसे गावातच मागे सोडून शहरात रहायला जातो. मात्र आपला भूतकाळ विसरून तो शहरात वावरताना कोणालाच ओळख देत नसेल किंवा दाखवत नसेल तर लोकं त्याच्या शिक्षणावर बोलणारच, नाही का ? शिक्षणाने लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याऐवजी अंधश्रद्धा पसरविणाऱ्या लोकांची खूप कीव येते.
शिक्षणाने माणसाच्या जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत मिळते. एखाद्या घटनेमागची कारणमीमांसा शिक्षणामुळे शोधू शकतो. मात्र आज समाजात पसरलेली अंधश्रद्धा पाहिली की या शिकलेल्या लोकांची कीव यायला होते. एखादे दोन चाकी, तीन चाकी किंवा चारचाकी वाहन खरेदी केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा काय केल्या जाते ? एखाद्या मंदिरासमोर त्या वाहनास उभी केल्या जाते. पौराहितकडून त्याची पूजा केली जाते आणि त्यानंतर त्या गाडीला लिंबू-मिरची,काळे केस असे सर्व एकत्र करून वाहनास बांधल्या जातो. असे केल्यामुळे काय होते ? असे जर कुणाला विचारलले तर प्रत्येकाचे उत्तर वेगवेगळे येते. गाडीचा अपघात होऊ नये यासाठी एवढा सारा खटाटोप केला जातो सरासरी असे उत्तर ऐकायला मिळते. तेव्हा प्रश्न असा पडतो की सध्याचे अपघात वाचण्यात किंवा पाहण्यात येत आहेत त्यांनी वरील क्रिया न केल्यामुळे झाले असतील काय ? या क्रियांनी अपघात वाचविता आले असते तर रस्त्यावर एवढे मोठे अपघात दिसले नसते. त्यामुळे लिंबू मिरची गाडीला बांधण्यापेक्षा वाहनाची वेळोवेळी काळजी घ्या ते तुमची काळजी घेईल हे लक्षात घ्यावे. सुशिक्षित लोकांमध्ये हा प्रकार पाहून त्यांच्या शिक्षणाची कीव आल्याशिवाय राहत नाही. निवडणुकीच्या काळात एक प्रसंग अनुभवास आले. मतदान प्रक्रियेत नव्यानेच ईव्हीएम मशीनने प्रवेश केला होता. या मशीन बाबत जेवढी उत्सुकता मतदारात आणि उमेदवारांमध्ये होती तेवढीच उत्सुकता निवडणूक मतदान अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा होती. म्हणूनच एका ठिकाणी सर्वप्रथम मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारास या अधिकाऱ्यांनी पूजाविधीच्या तयारीसह येण्यास सांगितले. त्यानुसार स्वतः उमेदवार असलेला व्यक्ती पहिला मतदार म्हणून तेथे आला. त्याने ईव्हीएम मशीनची यथोचित पूजाअर्चा केली. दैव चांगले त्याने नारळ त्या ईव्हीएम मशीनवर फोडले नाही, बाहेर पडले तेवढे बरे केले. उमेदवार आणि अधिकारी दोघांना हायसे वाटले. माझाच विजय व्हावं असे उमेदवारास तर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावे या आशेत अधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया सोपस्कारपणे पार पाडली. अशा प्रसंगातून आपणाला काय वाटते ? शिकलेल्या प्रत्येक व्यक्तीने आपली बुद्धिमत्ता जागी ठेवून पुढील पाऊल उचलल्यास शिक्षणाचा खरा फायदा होतो. अन्यथा पालथ्या घागरीवर पाणीच.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769