Thursday, 24 May 2018

मी गरीब नाही

मी गरीब नाही

इंग्रज भारतात येण्यापूर्वी भारतातून सोन्याचा धूर निघत होता असे म्हटले जाते. याचा अर्थ येथील सर्वच लोक श्रीमंत होते असा अर्थ  काढण्यास हरकत नसावी. मात्र इंग्रज लोकांनी जवळपास दीडशे वर्षे भारतावर राज्य करून या देशाला पूर्णपणे पिळून काढले आणि भारत देश गरीब झाला, असेही म्हटले जाते. स्वातंत्र्याच्या 65 वर्षानंतर भारत स्वतःच्या कर्तुत्वावर आज जगात महत्त्वाच्या देशांच्या यादीत जाऊन बसला आहे, हे निश्चितच एक अभिमानास्पद बाब आहे. मात्र, तरीही देशातील लोकांची स्थिती जर बघितली तर एकीकडे खूप श्रीमंत लोक दिसतात तर दुसरीकडे अत्यंत गरीब लोक बघायला मिळतात. दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणाऱ्या कुटुंबाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. येथे स्वतःला गरीब म्हणवून घेणाऱ्याची संख्या सुद्धा लक्षणीय आहे. सरकारच्या योजना मिळविण्यासाठी बरीच मध्यमवर्गीय मंडळीसुद्धा दारिद्र्यरेषेखालील कुटुंबात समाविष्ट होण्याचा खटाटोप करतात, हे अत्यंत क्लेशदायक वाटते. याविषयी प्रसिद्ध साहित्यिक प्रेमचंद यांचे म्हणणे योग्य वाटते. ते म्हणतात की गरिबीचे प्रदर्शन करणे हे गरीबीचे दुःख भोगण्यापेक्षा ही अधिक कष्टदायक आहे. मुळात जी व्यक्ती मी गरीब आहे असे वारंवार लोकांना सांगते ती व्यक्ती गरीब नसतेच मुळी. कारण जोपर्यंत त्यांच्या बाहूत शक्ती आहे आणि पायात बळ आहे तो या दोन गोष्टींच्या हिमतीवर गरीबीला पळवून लावू शकतो. मात्र मुळात आपण याच दोन गोष्टीचा वापर न करता गरिबाला मदत करा म्हणून इतरांपुढे हात पसरतो. उद्योगपती धीरूभाई अंबानी यांनी आपल्या शक्ती व बळाचा वापर केल्यामुळेच श्रीमंत होऊ शकले. विद्यार्थी आयुष्यभर गरीब राहू नये म्हणून कर्मवीर भाऊराव पाटलांनी युवकांमध्ये " कमवा व शिका " हा मंत्र दिला. पैसा नाही म्हणून कोणी गरीब समजले जात नाही, याविषयी महात्मा गांधी म्हणतात की, धनवान असुन देखील ज्यांची धनाची लालसा कमी होत नाही ते सर्वात अधिक गरीब आहेत. स्वतःला गरीब समजणे म्हणजे आपला आपल्यावरचा आत्मविश्वास कमी असणे होय. जे स्वतःला गरीब समजतात तेच लोक गरीब असतात वास्तविक गरिबी स्वतःला गरीब समजण्यात असते असे इमर्सन ने म्हटले आहे, ते सत्यच आहे. त्यास्तव स्वतःला गरीब म्हणत रडण्यापेक्षा आपले भाग्य आपल्या शक्ती व बळाने बदलविण्याचा विचार करून मी गरीब नाही हे आपल्या मनाला ठासून सांगितले पाहिजे.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि.नांदेड
9423625769

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...