जागतिक महिला दिनानिमित्त ...... कर्तृत्ववान महिलांची संघर्षगाथा
सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बिवी
देशातील कोणत्याही उच्च न्यायालयात नियुक्त झालेल्या पहिल्या मुस्लिम महिला न्यायाधीश, इतकच नाही तर आशिया खंडातील कोणत्याही देशाच्या सर्वोच्च न्यायालयात महिला न्यायाधीश होणाऱ्या पहिल्या महिला, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सदस्य म्हणून काम केले आणि तामिळनाडूच्या राज्यपाल म्हणून स्वत:ची छाप उमटवलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे न्यायाधिश फातिमा बिवी. त्या हुशार होत्या आणि त्यांच्या नावावर अनेक विक्रम देखील होते. त्यांच्या जीवनाकडे पाहिले तर दिसून येते की, इच्छाशक्तीच्या जोरावर प्रतिकुल परिस्थितीत देखील कसे यश मिळवता येते. जगतिक महिला दिनानिमित्त त्यांच्या जीवनावर टाकलेला एक प्रकाश.
फातिमा बीवी यांचे पूर्ण नाव मीरा साहिब फातिमा बीवी असे आहे. त्यांचा जन्म 30 एप्रिल 1927 रोजी रोजी केरळ मधल्या पतनमतिट्टा या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मीर साहिब, तर आईचे नाव खदीजा बीबी असे होते.
त्यांचे शालेय शिक्षण पथनामथिट्टा येथील कॅथलिक हायस्कूल येथे झाले. त्यानंतर तिरुअनंतपुरमच्या विद्यापीठातून विज्ञान शाखेची पदवी घेतली. पुढे तिरुवनंतपुरम या शहरातील लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली. पदवीच्या पहिल्या वर्षी तिच्या वर्गातल्या फक्त पाच मुलींपैकी ती एक होती. दुसऱ्या वर्षी फातिमासह फक्त तीन मुली उरल्या होत्या. मात्र, त्यावेळी कोणालाच माहीत नव्हते की, फातिमा नावाची ही सामान्य मुलगी भविष्यात इतिहास घडवेल.
6 ऑक्टोंबर 1989 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून निवड झाली. भारतातून एवढ्या मोठ्या पदावर जाणाऱ्या त्या पहिल्या पहिल्या महिला होत्या. 29 एप्रिल 1992 रोजी त्या सेवानिवृत्त झाल्या. दरम्यान त्यांनी 1997 ते 2001 या काळात तमिळनाडूच्या राज्यपाल म्हणून देखील काम पाहिलं.
न्यायदानासारख्या अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रात महिलांना इतका सहज आणि मुक्त प्रवेश नव्हता. त्या काळात फातिमा बिवी यांनी पुरुषी वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात महिलांसाठी संधीची कवाडं उघडली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार आणि अत्यंत बुध्दीमान असलेल्या फातिमा बिवी यांनी एलएलबीमध्ये विद्यापीठाचे सुवर्णपदक पटकावले होते. १९५० मध्ये कोल्लम जिल्हा न्यायालयातून फातिमा बिवी यांनी त्यांच्या कायदा क्षेत्रातील करियरला सुरुवात केली. फातिमा बिवी यांची प्रखर बुध्दीमत्ता बघून त्यांनी कायद्याच्या क्षेत्रात करियर करावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. आपल्या वडिलांचा विश्वास त्यांनी सार्थ ठरवला. 1950 मध्ये बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. त्या वेळी या परीक्षेत अव्वल ठरणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात फातिमा यांनी वकील म्हणून नोंदणी केली आणि केरळच्या कनिष्ठ न्यायव्यवस्थेत त्यांची प्रॅक्टिस सुरू केली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होण्यापूर्वी फातिमा बीबी न्यायिक सेवांमध्ये कार्यरत होत्या.
14 नोव्हेंबर 1950 रोजी वकील म्हणून त्यांनी काम सुरू केलं. मे 1958 मध्ये तिची केरळ सब-ऑर्डिनेट ज्युडिशियल सर्व्हिसेसमध्ये मुन्सिफ म्हणून नियुक्ती करण्यात आली. 1968 मध्ये त्यांची सबऑर्डिनेट जज म्हणून आणि 1972 मध्ये मुख्य न्यायदंडाधिकारी म्हणून, 1974 मध्ये जिल्हा आणि सत्र न्यायाधीश म्हणून पदोन्नती मिळाली. 1980 मध्ये प्राप्तिकर अपील न्यायाधिकरणाच्या न्यायिक सदस्य आणि 8 एप्रिल 1983 रोजी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 06 ऑक्टोबर 1989 रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर 24 एप्रिल 1998 रोजी त्या निवृत्त झाल्या.
भारताचे तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा हे फातिमा बिवी यांच्याविषयी म्हणाले, "संविधान आणि कायद्यांच्या कामकाजाचा त्यांचा अनुभव आणि अंतर्दृष्टी ही मौल्यवान संपत्ती आहे."
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्यानंतरही फातिमा बीबी या तामिळनाडूच्या राज्यपाल होत्या. 25 जानेवारी 1997 मध्ये तमिळनाडूच्या राज्यलपालपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली.
आपल्या एका मुलाखती दरम्यान फातिमा बीवी यांनी म्हटलं होतं की, सध्या बार आणि बेंच या दोन्ही ठिकाणी अनेक महिला आहेत. पण त्यांचा सहभाग कमी आहे. त्यांचे प्रतिनिधित्व पुरुषांच्या बरोबरीचे नाही. महिलांनी हे क्षेत्र उशिरा निवडल्याचेही एक मोठं कारण त्यामागे आहे. महिलांना न्यायव्यवस्थेत समान प्रतिनिधित्व मिळण्यासाठी वेळ लागेल.
फातिमा यांनी 'द वीक'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणतात, न्यायाधीशांच्या श्रेणीत महिलांची संख्या वाढवण्याची गरज आहे आणि उच्च न्यायव्यवस्थेत महिलांची संख्या वाढवण्यासाठी आरक्षणाचाही विचार करणे आवश्यक आहे.
ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या गौरवशाली कार्यकाळात न्यायमूर्ती फातिमा बीवी अतिशय संयमी आणि नेहमी संतुलित होत्या. ती जेव्हा जेव्हा कोणत्याही मुद्द्यावर निर्णय घ्यायला बसायची तेव्हा त्या केसशी संबंधित प्रत्येक लहान-मोठी गोष्ट तिला माहीत असायची. त्या खटल्याचा संपूर्ण इतिहास वाचून ती कोर्टात येत असे.
भारतात ज्या काळात पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा होता, त्या काळात फातिमा यांनी न्यायाधीश होण्याचं स्वप्न पाहिलं होते. जे त्यांनी पूर्ण देखील केलं. 1950 रोजी भारतात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. पण त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाला महिला न्यायाधीश मिळण्यासाठी 39 वर्षांचा कालावधी लागला. 39 वर्षांनंतर भारताच्या सर्वोच्च न्यायालयात फातिमा बीवी यांना पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून सन्मान मिळाला.
फातिमा बिवी यांच्या जीवनात काही वादग्रस्त निर्णय देखील झाले. त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीला क्लीन चिट दिल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकल्या होत्या. त्यामुळे केंद्र सरकारने देखील रोष व्यक्त केला. दरम्यान त्याच वेळी तत्कालीन केंद्रीय कायदा मंत्री अरुण जेटली यांनी त्यांचा राजीनामा देखील मागितला होता.
त्यानंतरच्या निवडणुकांनंतर जयललिता यांचे विधानसभेतील बहुमत स्वीकारल्याच्या वादग्रस्त परिस्थितीत आणि करुणानिधी ज्यांनी त्यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली होती, यांच्या अटकेमुळे पुन्हा एकदा वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर मात्र फातिमा यांनी त्यांचे पद सोडले. जयललिता यांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाचा बचाव केला. तामिळनाडूच्या तत्कालीन राज्यपाल फातिमा बीवी यांनी 14 मे 2001 रोजी जयललिता यांना तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.
केंद्रीय मंत्रिमंडळाने आपल्या घटनात्मक दायित्वाचे पालन न केल्यामुळे राज्यपालांना परत बोलावण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे करण्याचा निर्णय घेतल्यानंतर फातिमा बीवी यांनी राजीनामा सादर केला. माजी मुख्यमंत्री, एम. करुणानिधी आणि दोन केंद्रीय मंत्री, मुरासोली मारन आणि टी. आर. बालू यांच्या अटकेनंतरच्या घटनाक्रमाचे स्वतंत्र आणि वस्तुनिष्ठ मूल्यांकन न केल्यामुळे केंद्र सुश्री फातिमा बीवी यांच्यावर नाराज होते. आंध्र प्रदेशचे तत्कालीन राज्यपाल डॉ. सी. रंगराजन यांनी त्यांच्या राजीनाम्यानंतर तामिळनाडूचे कार्यकारी राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला. राज्याच्या राज्यपाल म्हणून त्यांनी मद्रास विद्यापीठाच्या कुलगुरु म्हणून देखील काम पाहिलं. त्याचबरोबर त्यांनी केरळ मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सदस्य म्हणूनही काम केले होते.
देशभरातील महिलांसाठी फातिमा बीवी या आदर्श राहिल्या. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्त्वाच्या प्रकरणात निकाल दिला. राज्याच्या राज्यपाल या नात्याने त्यांनी राजीव गांधी हत्या प्रकरणातील चार दोषी कैद्यांनी दाखल केलेला दयेचा अर्ज फेटाळला. कैद्यांनी राज्यपालांकडे दयेचे अर्ज पाठवले होते, ज्यात तिला घटनेच्या कलम १६१ (माफी देण्याचा राज्यपालांचा अधिकार) अधिकार वापरण्याची विनंती केली होती.
2018 साली 'स्क्रोल' वेबसाईटशी बोलताना त्यांनी म्हटलं आहे की, "महिलांसाठी बंद असलेलं दार मी उघडलं. न्यायव्यवस्थेच्या उच्च स्तरावर महिला प्रतिनिधित्त्वाची संख्या फारच वाईट आहे. भारतातल्या एकूण लोकसंख्येत निम्मी लोकसंख्या महिलांची आहे. मग त्यानुसार भारतीय न्यायव्यवस्थेत निम्म्या जागा महिलांसाठी का नाहीत?" असा सवाल त्या करतात.
गेल्या 71 वर्षांचा विचार केला तर 256 न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयात निवडले गेले आणि त्यात केवळ 11 म्हणजे 4.2 टक्के महिला न्यायाधीशांची निवड झालीय. सर्वोच्च न्यायालयात सध्या असलेल्या 34 न्यायाधीशांमध्ये केवळ चार महिला न्यायाधीश आहेत. एकाचवेळी चार महिला न्यायाधीश असण्याचा खरंतर हा विक्रमच आहे. तर भारतातील विविध राज्यांमधील एकूण 25 उच्च न्यायालयांमध्ये 677 न्यायाधीशांपैकी 81 महिला न्यायाधीश आहेत. या 25 पैकी चार उच्च न्यायालयांमध्ये एकही महिला न्यायाधीश नाही. यूकेमध्ये 32 टक्के महिला न्यायाधीश आहेत आणि अमेरिकेत 34 टक्के महिला न्यायाधीश आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयात तीन महिला न्यायाधीश आहेत म्हणजेच एकूण संख्येच्या 15 ते 20 टक्के.
गेल्या डिसेंबरमध्ये भारताचे अटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं की, लैंगिक अत्याचारासंबंधी खटल्यांमध्ये अधिक समतोल साधणारा विचार करण्यासाठी अधिकाधिक महिला न्यायाधीशांची निवड होणं आवश्यक आहे.
सन १९९० मध्ये फातिमा बिवी यांना डी. लिट आणि महिला शिरोमणी सारखे सन्माननीय पुरस्कार मिळाले. त्यांना भारत ज्योती पुरस्कार आणि यूएस-इंडिया बिझनेस कौन्सिल (USIBC) जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. 2023 मध्ये त्यांना केरळ प्रभा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, जो केरळ सरकारने दिलेला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे.
भारताच्या न्यायव्यवस्थेत लिंगभेदाच्या पलिकडे जाऊन बुध्दीमत्ता, अनुभवाच्या जोरावर आपला ठसा उमटवणाऱ्या आणि महिलांना या क्षेत्राची दारं खुली करणाऱ्या फातिमा बिवी यांचं नाव अजरामर झालं आहे. फातिमा बीवी यांचे 23 नोव्हेंबर 2023 रोजी वयाच्या 96 व्या वर्षी केरळमधील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यावेळी केरळचे तत्कालीन आरोग्यमंत्री वीना जॉर्ज यांनी म्हटलं की, फातिमा बीवी या एक बहाद्दुर महिला होत्या. त्यांच्या नावावर आजवर कित्येक रेकॉर्ड नोंदवण्यात आलेत. त्यांनी आपल्या जगण्यातून दाखवून दिलं आहे की, दृढ इच्छाशक्तीवरुन कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते. आज जागतिक महिला दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन .....!
( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलन करण्यात आले आहे. )
संकलन - नासा येवतीकर, स्तंभलेखक
9423625769
---------------------------------------------
राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मूर्मू
कठोर परिश्रमातून पुढे आलेली माणसे समजूतदार असतात त्यांच्या जाणिवा प्रगल्भ झालेल्या असतात, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात मानाची पदे लाभूनही काही माणसं साधी, सरळ मार्गी जमिनीवर पाय ठेवून व्यवस्थित चालणारी असतात. कसल्याही पद्धतीचा अहंकार नाही. साधी राहणी व उच्च विचारसरणी असते, नेहमी समाजाचं कल्याण व्हावं अशी अपेक्षा ठेवणारे व्यक्ती समाजात मोठी होत असतात. सर्वांना सोबत घेऊन चालणारे व्यक्तिमत्व म्हणजेच आपल्या देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्याचा लेखाजोखा या लेखात घ्यायचा आहे.. त्यानिमित्ताने केलेला हा लेखन प्रपंच.....
भविष्याचा अचूक वेध घेत वाटचाल करणाऱ्या व्यक्ती बोटावर मोजण्या इतक्याच असतात. अशा व्यक्तीमध्ये अग्रणीय नाव असणारे व्यक्तिमत्व म्हणजे उपेरबेडच्या संघर्ष कन्या देशाच्या 15 व्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मूर्मू ह्या आहेत. 26 जानेवारी 1950 रोजी आपला देश प्रजासत्ताक झाला आणि प्रजेच्या हाती सत्ता सुरू झाली त्यामुळे राष्ट्रपतीपद उदयास आले, पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मूर्मू या कर्तुत्वान महिला आहेत. काही माणसं स्व कर्तृत्वावर मोठी झाली आहेत. त्यांचा जीवन प्रवास खडतर होता, संघर्षाच्या आणि संकटाच्या वाटा त्यांच्यासाठी काटेरी होत्या, नेहमी त्यांची सत्वपरीक्षा घेत होत्या, तरीही या संघर्ष कन्येने संपूर्ण संकटावर मात केली, प्रचंड ध्येयवाद, दुर्दम्य इच्छा शक्ती, अथक परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या बळावर त्यांनी मोठी झेप घेतली आणि त्या देशाच्या राष्ट्रपती झाल्या. संघर्षाच्या वाटेवर चालून त्यांनी फुलाच्या पायघड्या तयार केल्या. त्यामुळे त्यांचा सुगंध सर्वत्र आज दरवळत आहे. हे मला अभिमानाने सांगावे वाटते, ही गोष्ट आपल्या तरुण-तरुणींना प्रेरणादायी ठरली आहे, संकटाची मालिका त्यांच्यावर येऊन घरातील तीन व्यक्ती मृत्यू पावले पण त्या थोड्या सुद्धा खचल्या किंवा डगमगलेल्या नाहीत. जीवनातील वास्तवता लक्षात घेऊन ध्येयवादी प्रवृत्तीने कार्य करणाऱ्या व येणाऱ्या अडचणीला हसत हसत त्या तोंड देत आहेत. वास्तवता स्वप्न ,सृष्टी व हास्यरस या तिन्ही गोष्टीचे एकत्र मिश्रण म्हणजे ज्ञान होय, हे जीवनाचे गणित आज मान्य आहे. जीवनात अनेक सुखाचे क्षण येतात ते सूर्याच्या कोवळ्या किरणासारखे सतेज असतात, नंतर भडक होतात तसे त्यांची जीवन तेजोमय झालेले आपल्याला दिसते. महामहीम द्रौपदी मूर्मू यांचा जन्म 20 जून 1958 रोजी ओरिसातील मयूरभंज जिल्ह्यात संथाळ या आदिवासी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नारायण दुडू होते. महाविद्यालयीन शिक्षण भुवनेश्वर मधील रमादेवी महिला महाविद्यालयात झाले. पुढील काळात त्या सहाय्यक लिपीक झाल्या. त्यानंतर त्या शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. राजकारणात त्या 1997 मध्ये प्रवेश केल्या. सुरुवातीला नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या, त्यानंतर रायरंगपूरच्या आमदार झाल्या. पुढे त्यांना बीजेडी सरकार मध्ये मंत्रिपद मिळाले आणि नीलकंठ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास होत नाही असे म्हणतात.
तसे त्या झारखंडच्या पहिल्या महिला नवव्या राज्यपाल म्हणून 18 मे 2015 ते 12 जुलै 2021मध्ये कार्यरत होत्या. त्यानंतरच्या काळात त्या भरघोस मतांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या. त्या सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती आहेत. हा विजय संपूर्ण आदिवासी समाजासाठी व भारतीयांसाठी परिवर्तनवादी ठरला. शिक्षणात किती सामर्थ्य असते हे या विजयाने दाखवून दिले. म्हणून शिक्षण शिका, शिक्षण नाही शिकले तर इतके अनर्थ एका अविद्येने केले, असे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात. श्रमाला फळ मिळाले, भेदभावांचा अंत झाला. जातीयता येथे नष्ट झाली. कर्तृत्वला फळे आली. जे कर्तृत्व करतात ते खरोखरच यशोशिखरावर जातात, अशी जनसामान्यांमध्ये चर्चा होऊ लागली, म्हणूनच कर्तृत्ववान महिलांची संघर्षगाथा आपण अभ्यासत व शिकत आहोत. व्यक्ती कोणत्या जातीत जन्मला हे महत्त्वाचे नसून त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आम्हाला आजही प्रेरणादायी आहेत. म्हणून शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, हे सुद्धा आम्हाला कळाले म्हणून महिला दिनाच्या निमित्ताने अशा गुणवंत व कर्तृत्ववान महिलांचे प्रेरणादायी विचार आपण समाजासमोर ठेवावेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण पुढे जावेत, त्यासाठी लेखन, वाचन, चिंतन, संभाषण फार महत्त्वाचे आहे. घरामधील त्यांची मुले, पती वेगवेगळ्या कारणामुळे मृत्यू पावले. त्यांनी त्यांचे दफन घरामध्येच केले आणि त्या ठिकाणी आज विद्यालय बांधण्यात आले. एका बाजूला आपण अंधश्रद्धा पाळतो तर दुसऱ्या बाजूला त्या घराला विद्यामंदिर म्हणून नावारूपाला आणले, हे येथे सांगावयाचे आहे. आपल्या जीवनभराच्या प्रवासात त्यांनी कधीही कोणावर रागावलेल्या नाहीत.
पाठीमागचा इतिहास पाहिल्यानंतर त्यांची कर्तृत्व अतिशय मोठी आहेत. इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी हे कार्य केलेले आहे. वास्तविकता त्यांच्याकडून आपला शिकता येईल. कष्टकऱ्यांच्या, कामकरी लोकांच्या जीवनाची गाथा काय असते ? हे त्यांनी सांगितलेलं आहे. जाणिवांची प्रगती आणि समाजाची पुनर्वस्था, पुनर्रचना यासाठी शिक्षण हे एक मूलभूत साधन आहे. म्हणून शिक्षण शिका ? असे त्यांना सांगायचे आहे. त्या नेहमी पुस्तके जवळ ठेवतात आणि वाचन करत असतात. हे या ठिकाणी आवर्जून सांगावे वाटते.
आजकालचे तरुण म्हणतात 'आम्हाला वेळ मिळत नाही. वाचन करण्यासाठी ज्या पदावर आज त्या आहेत ते पद सांभाळून सुद्धा वाचन करीत असतात हे वाखाणण्याजोगी गोष्ट आहे, *यत्र नार्यस्तु पुजन्यते ।रमते तत्र देवता।* जिथे स्त्रिया पूजनीय होतात, तेथे देवत्व प्राप्त होते असा संस्कृत श्लोक म्हटला जातो. ते सर्व वास्तविक आहे ज्यांना आईचे बहिणीचे महत्त्व कळाले ते यशस्वी झाले, पत्नी ही क्षणाची असून अनंत काळाची माता आहे. असे विचारवंतांनी म्हटलेले आहे.म्हणून महिलांचा नेहमी आदर करायला शिका. महिला या कोमल आहेत पण कमकुवत नाहीत. याची जाणीव असू द्या. प्राचीन काळातील महिला आणि आजची 21 व्या शतकातील महिला यामध्ये जमीन-अस्मानचे फरक आहे.
त्यासाठी महिला या अबला नसून सबला आहेत .हे तुम्ही लक्षात घ्या. आज सर्वत्र शैक्षणिक वातावरण तयार झालेले आहे, त्यामुळे खूप मुली शिक्षण शिकत आहेत, मोठमोठे पद पादाक्रांत करीत आहेत. शिक्षण, क्रिकेट, ऑलिंपिकच्या स्पर्धा, गिर्यारोहण, राजकारणातील सर्वच पदे या सर्व क्षेत्रांमध्ये महिला आघाडीवर आहेत. आठ मार्च महिला दिनाच्या निमित्ताने शूरवीर, रणरागिणी, दुर्गा, संघर्षचा महामेरू असणाऱ्या महिलांना हार्दीक शुभेच्छा ......!
- प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत
अध्यक्ष : विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी, ता. मुखेड
---------------------------------------------
महिलांचा सन्मान कोणामुळे होत आहे. ..?
आज आठ मार्च जागतिक महिला दिन त्या दिनानिमित्त सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महिला ही जगातील सर्वात उंच शिखर आहे व ती कायम राहणार आहे यात काही शंका नाही आणि ती कायमच रहावे. शेवटी ती नारीशक्ती आहे म्हणूनच होऊन गेलेल्या नारीशक्तींच्या पोटी महा विभूतींनी जन्म घेऊन या साऱ्या जगाचा उद्धार केला आहे अशा त्या होऊन गेलेल्या महान नारिशक्तींना व महाविभूंतीना सर्वप्रथम मी वंदन करते व त्यांच्या कार्यापुढे मी नतमस्तक होते. आधीच्या महिलांमध्ये व आताच्या महिलांमध्ये फरक बघितले तर जमीन आसमानचा फरक बघायला मिळत आहे. तो फरक म्हणजेच आधीच्याही महिला हुशार होत्या, देखण्या होत्या , कष्टाळू होत्या , संस्कारी होत्या, त्यांना आपल्या भारतीय संस्कृतीची जाणीव होती पण, त्या स्वतंत्रपणे जगू शकत नव्हत्या , त्यांना शिक्षण घेता येत नव्हते, बाहेर पडण्याची त्यांना परवानगी मिळत नव्हती म्हणून चार भिंतीच्या आड राहून चूल आणि मुल सांभाळत , निमूटपणे होणारा अन्याय, अत्याचार सहन करत नरकासमान जीवन जगत होत्या कारण त्या सक्षम बनल्या नव्हत्या. पण कुठेतरी त्या आपल्या संस्कृती मात्र विसरत नव्हत्या ही त्यांच्यात असलेली सर्वात मोठी महानता होती म्हणून आजही त्यांच्यात असलेल्या काही गुणांचा आदर केला जातो आणि म्हटले जाते जुने, सोने असते पण का बरं असं म्हणण्याची आज वेळ येत आहे. ...? हा भारी मोठा प्रश्न समाजासमोर उभा आहे. आणि आजच्या महिलांमधील फरक बघितले तर आजच्या महिला सुंदर दिसत आहेत, हुशार आहेत, मेहनती आहेत सोबत सुशिक्षित झालेल्या आहेत आणि खास करून सर्वच क्षेत्रात पोहोचल्या आहेत, पुरूषांच्या खांद्याला, खांदा लाऊन जगून दाखवत आहेत मग एवढे सारे त्यांच्यात गुण असताना सुद्धा जुन्या रितीरिवाजाला किंवा जुन्या महिलांना का बरं महत्व दिल्या जाते....? आजच्याच महिलां विषयी बोलायला पाहिजे म्हणजेच कुठेतरी त्यांची उणीव भासत आहे हे नाकारता येत नाही.
भलेही आधीही महिला होत्या पण त्यांना पाहिजे तो सन्मान मिळत नव्हता कारण त्याकाळची परिस्थिती भयानक होती महिलांचे जगणे नरकासमान झाले होते आणि त्यांना ह्या नरकातून बाहेर काढण्यासाठी, आताच्या महिलांना सुशिक्षित करण्यासाठी महाविभूती असलेले क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या अर्धांगिनीला म्हणजेच क्रांतिज्योती सावित्रीआईला घरीच शिक्षण देऊन सुशिक्षित केले तो काळ कसा असेल या विषयी आजच्या महिलांनी त्या दोन्ही महाविभूंतीना वाचणे गरजेचे आहे. जेव्हा सावित्रीआई घराबाहेर पडायची तेव्हा त्या माऊलीला किती संघर्ष करावा लागत होता बघून कदाचित निसर्ग सुद्धा रडत असेल तिचे जगणे पाहून आपण कल्पना सुध्दा करू शकत नाही आणि ती माऊली मात्र अफाट संघर्ष करून जगत होती ते जगणे स्वतः साठी नव्हते तर सर्वच नारीशक्तींसाठी जगणे होते या विषयी कोणी विचार करावे....? आजच्या महिला एवढ्या स्वार्थी झालेल्या आहेत की, त्यांना फक्त त्यांचे मुले आणि नवरा हवा असतो, मौजमजा, मैत्रींनींशी गप्पा मारणे, अर्धे कपडे घालून फिरणे, टिंगल,टवाळी करणे, नाचगाणे, प्रसिद्धी मिळविण्याची हाव, प्रस्थापितांच्या पाया पडून गुलाम बणून राहण्याची सवय, अजून बरेच काही बाकी कोणाशीही काहीही देणेघेणे नसते पण, त्यात सुद्धा अशा काही महिला नि:स्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या आहेत व करून दाखवत आहेत त्यांचा अभिमान वाटतो. पण, त्या माऊलीने स्वतः विषयी विचार न करता महिलांना कशाप्रकारे घडवता येईल यासाठी शेणाचे गोळे सुद्धा आपल्या अंगावर घेतले ती कोणती नारीशक्ती असेल....? आणि तिच्याच संघर्षातून आजच्या महिला आनंदाने जगत आहेत याचा सुद्धा विसर पडत आहे ही जगातील पहिली व वास्तव शोकांतिका आहे.
त्या भयानक काळात जर त्या माऊलीने अफाट संघर्ष केला नसता तर आजच्या या सुशिक्षित असणाऱ्या बुध्दी गहाण ठेवून जगणाऱ्या महिलांना खरंच सन्मान मिळाला असता का. ..? पण शोकांतिका म्हणावे लागेल की, आजच्या महिला एवढ्या सुशिक्षित असताना व समजदार आणि जगातील सर्वात उंच शिखर असणाऱ्या महिलांना सर्व काही कळून सुद्धा अज्ञानी बनून जगत आहेत. हे कोणीही नाकारू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजेच आजकाल बघितले तर जेथे,तेथे, पुरस्काराचे बाजार भरलेले दिसत आहेत त्यात क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या नावाचा पुरस्कार पैशाने विकत घेतल्या जाते आणि पैशाने विकत दिल्या जाते तो पुरस्कार पैशाने विकत घेताना क्रांतीज्योती सावित्रीआई फुले का बरं देणाऱ्या, घेणाऱ्याला आठवत नाही . ..? आजही त्या माऊलीला भारतरत्न पुरस्कार मिळाला नाही या विषयीची पूर्णपणे माहीती असताना सुद्धा त्याकडे आजच्या महिला दुर्लक्ष करत आहेत पण का दुर्लक्ष करत आहे हा एक भारी मोठा प्रश्न आहे. जेव्हा सावित्रीआईच्या त्यागामुळे आजच्या महिला दररोज सन्मानाच्या मानकरी बनत आहेत मग क्रांतीज्योती सावित्रीआईला भारतरत्न सर्वोच असलेला पुरस्कार मिळवून देण्यासाठी का बरं पुढे होत नाही. ..? असे अनेक प्रश्न पडताना दिसत आहेत. क्रांतिज्योती सावित्रीआई फुले अजूनही पूर्णपणे महिलांना कळली नाही आणि कळणारही नाही कारण तिला वाचण्यासाठी आजच्या तिच्याच लेकींकडे सेंकदाचा वेळ नाही. बाकी व्यर्थ गोष्टींच्या मोहात पडून मौजमजा करण्यासाठी व प्रसिद्धी मिळविण्यासाठी भरपूर वेळ आहे ही आजची सत्य परिस्थिती निर्माण झालेली बघायला मिळत आहे.
आज आणि उद्या होणारा व भविष्यात कधीही महिलांचा सन्मान होत राहील पण, ही प्रथम देण सावित्री आईचीच आहे कारण त्याच माऊलीने चंदनासारखे झिजून या महिलांना त्या योग्यतेचे बनवले आहे म्हणून आजच्या महिला सन्मानाच्या मानकरी होत आहेत पण दु:ख एका गोष्टीचं वाटतं की, आजच्याच महिलांमुळे त्यांच्यात असलेल्या वागणुकीमुळे होऊन गेलेल्या सर्वच नारीशक्तींचा अपमान होत आहे. हे, कधी व कोणाला कळेल की, नाही माहीत नाही पण, एवढ्या तरी खालच्या दर्जाला जाऊन नारीशक्तीचा अपमान करू नये कारण ही भारतभूमी आहे आणि त्या माऊलींनी आपली भारतीय संस्कृती पूर्णपणे शेवटपर्यंत टिकवून ठेवली होती आणि अजरामर झाल्या. पण, आता मात्र त्याच संस्कृतीची वाट लावून जगत असणाऱ्या महिलांना काय म्हणावे...?
सौ.संगीता संतोष ठलाल
मु.कुरखेडा जि.गडचिरोली
७८२१८१६४८५
--------------------------------
महिला दिनाच्या निमित्याने
महिला दिनानिमीत्यानं विचार मांडतांना एक विचार हाही मनात येतो. खरं तर तो संभ्रमाचे विचार आहे. कारण आज महिलांकडे पाहिलं तर महिला सक्षम आहे. त्याची उदाहरणं द्यायची झाल्यास नक्कीच देता येतील. कारण आज कैसर विल्यमसारखी महिला अंतराळात पोहोचलेली आहे. प्रतिभा पाटील सारखी महिला देशाच्या राष्ट्रपती बनल्या. किरण बेदी सारखी महिला राजकारणात सक्रिय झाली. तसंच इंदिरा गांधींसारखी महिला भारताची पंतप्रधान झाली. अशी कितीतरी उदाहरणं देता येतील महिलांच्या सक्षमीकरणांची. यावरुन वाटतं की खरंच महिला सक्षम आहे.
आजचा काळही असाच महिलांच्या सक्षमीकरणाला अनुकूल आहे. आज महिलांनी आपला स्वतःचा विकासच केला नाही तर ती आयतोब्या असलेल्या व स्वतःला पुरुष समजणा-या माणसाला पोषतो. आजही ठोंब्यासारखा बलदंड असलेला पुरुष हातपाय गळल्यागत महिलांसमोर गुलामागत वागतो व आजही घरातील स्नुषा चांगल्या निघाव्या, म्हणून विधात्याकडे साकडे घालणा-या भरपूर सासवा जगात आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजही महिला पुरुषांना आपल्या पत्नीच्या हातचे कळसुत्री बाहुले म्हणून घरात वावरावं लागतं. संसार करावा लागतो. त्यामुळं महिला सक्षमच वाटते.
काल ठीक आहे की महिला सक्षम नव्हती. तिला साधा शिक्षणाचा अधिकार नव्हता. सतत तिच्यावर अत्याचार होत होता. बलात्कार तर वारंवार व्हायचा. घरात, दारात आणि बाहेरही. पुर्वीच्या काळातील महिलांवरील अत्याचाराबाबत सांगायचं झाल्यास पुर्वी बालविवाह व्हायचा. वधू कमी वयाची व वर जास्त वयाचा. यात वर वयानं कितीतरी मोठा असल्यानं मरुन जायचा. मग त्या घरात त्या वधूची साडेसाती सुरु व्हायची. साडेसाती म्हणजे एकाच घरातील सारी मंडळी या तरुण असलेल्या विधवेवर अत्याचार करीत सुचायची. तो बलात्कारच असायचा. परंतू त्यावर आवाजही उठवता येत नव्हता महिलांना. कारण ती सक्षम नव्हती. तसेच कायदेही तसे सक्षम नव्हते. विधवा विवाह बंदी होती.
आज काळ बदलला आहे. महिलांना शिकता येतं. उच्च शिक्षण घेता येतं. महिलांना आपला बालविवाह रोकता येतो. त्यांना विधवा विवाह करण्याची अनुमती आहे. विनाघुंघट कुठेही जाता येतं. कुठंही केव्हाहीपर्यंत विहार करता येतं. एवढंच नाही तर एक पती असतांना तो जर बरोबर वागत नसेल तर वेळप्रसंगी बदलवता येतो किंवा पती असतांनाही बिनधास्तपणे पर पुरुषांसोबत हिंडता येतं. कारण त्यांना कायद्याच्या संरक्षणाचं कवच आहे. मग असे असतांना त्या महिला स्वतःला का कमकुवत समजतात तेच कळत नाही. त्याचं कारण आहे येथील संस्कृती. आपली संस्कृती महान आहे. त्या संस्कृतीला विशिष्ट असं वलय आहे. महिलांबाबतीत सांगायचं म्हणजे ही संस्कृती सक्षम आहे महिला बाबतीत. या भारतीय स्री संस्कृतीला त्यांचा पुर्वइतिहास माहित आहे. तो पुर्वइतिहास म्हणजे दुर्गा, काली अवतारांची. त्यातच त्यांना हेही माहीत आहे की या संस्कृतीनं गार्गी, मैत्रेयीच्या रुपात शास्त्रार्थही केला होता व त्या महिला संस्कृतीनं पुरुषांच्या बरोबरीला खांद्याशी खांदा लावला. महिला कमकुवत नाहीच आणि कोणीही तिला कमकुवत समजून घेवून भूल करु नये. ती कमकुवत सारखी वागते तेही आपल्यासाठीच. तिलाही वाटते की हा देश माझा आहे. माझ्या देशाचा अपमान होईल मी जर अशी संस्कृतीला धरुन वागले नाही तर. हाच हेतू ठेवून महिला वर्ग वागत होता काल. आजही वागतात. परंतू त्या महिला वर्गाच्या तशा वागण्याचा फायदा हा मध्यंतरीच्या पुरुष जातीनं घेतला व त्यांच्यावर विशेष अशी बंधनं घातली व त्यांना गुलामागत वागवलं. यात त्यांनी पुर्ण संस्कृती स्रियांना सोपवून दिली. त्यांनी काय खावं, काय प्यावं याबाबतही बंधनं घातली. डोक्यावर पदर असावा. लुगडंच घालावं अशी बंधनं.
आज ब-याच महिला पुढे गेल्या आहेत. राजकारण, अर्थकारण व देशाची धुरा सांभाळत आहेत. आज महिलांनी ओळखलं आहे की आपण जर आवाज उचलला नाही आणि असेच दबत राहिलो तर येथील पुरुष वर्ग आपल्यावर विनाकारणचा अत्याचार करतो. म्हणून त्या सक्षम बनल्या आहेत. आजही ज्या घरी मुली विवाह करुन जातात. त्या घरी मुली आपल्या मनानुसार नवरोबाला वागायला लावतात. जर नवरोबा तसे वागत नसतील तर त्यांना इंगाही दाखवायला त्या मागे राहात नाहीत किंवा पाहात नाहीत. जर नवरोबा व सासूसासरे चांगले असतील तर मुली चांगल्या वागतात. सांस्कृतीक परंपरेनं वागतात. परंतू जर नवरोबा चांगले नसतील तर मात्र अशावेळी त्या संस्कृत्यांनाही गहाण टाकतात. त्यानंतर कोणी नावबोटं ठेवो की अजून काही त्या घाबरत नाहीत. त्या मुली डोक्यावर पल्लूही ठेवत नाहीत. कोणतीच व्रतवैकल्ये पाळत नाहीत.
महत्वपुर्ण गोष्ट ही की महिला ही आज कमकुवत नाही. तिला कोणीही कमकुवत समजू नये. ती कालही कमकुवत नव्हती. कालही ती दुर्गा रुपात वावरुन माजलेल्या महिषासूराचा विध्वंस करीत होती. आजही ती अशाच माजलेल्या महिषासूराचा विध्वंस करण्यास सक्षम आहे. तरीपण आजही अशा काही स्रिया आपण पाहतो की त्यांना पाहिलं की महिला कमकुवत जाणवते. अशा महिला आजही देशात ब-याच आहेत की ज्या आजही अत्याचार सहन करतांना दिसतात. आजही त्यांच्या डोक्यावर पदर दिसतो. घुंघटही दिसतो. आजही त्या महिलांवर घरादारात अत्याचार होत असतो. त्यांना मनमोकळे पणानं वागता येत नाही. ब-याच स्रियांना आजही कुठेही केव्हाही मनमोकळे पणानं फिरता येत नाही. सतत भिती आणि भितीच तसंच भितीदायक वातावरणही दिसतं. त्यांच्या आचरणातून आजही त्यांचं दुय्यम स्थान दिसून येतं.
आज महिला दिन आहे. महत्वाचं म्हणजे आजपासून तरी महिलांनाही चांगलं वागवावं. त्यांनाही सामाजिकता प्रदान करावी. त्या मान ठेवतात म्हणून त्यांच्याकडून जबरदस्तीनं प्रथांचं पालन करुन घेवू नये. तेव्हाच महिलादिनाचं सार्थक होईल एवढंच सांगावेसे वाटते.
- अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०
--------------------------------
सुखाची पखरण ती
'जन्मा येण्या कारण ती प्रितीचे अभिसारण ती
जीवन फुलविणारी, सुखाची पखरण ती,
भाळावरचं गोंदण ती, नवरत्नांचं कोंदण ती
विसावण्या या जगताला गे मिळालेलं आंदण ती'...
अशी 'ती'....हीन ,दीन, दुबळी, लाचार कधीच नव्हती.आजही नाही. विशाल आकाशासारखे हृदय असणारी, धरेसारखी क्षमाशील, नदीसारखी अविरत वाहणारी ,अंधा-या रात्रीचा दिवा होणारी, जीवननौकेला दीपस्तंभाप्रमाणे दिशा दाखविणारी, जीवनातल्या रणरणत्या उन्हांत वाऱ्याची झुळूक होऊन दाह शमविणारी, कधी कामिनी तर कधी दामिनी होणारी, आत्मिक बळ देणारी ,स्वतंत्र बुद्धिमत्ता व अस्तित्व असलेली अशी 'ती' होती आणि आजही आहे.
अध्यात्मिक, सांस्कृतिक, बौद्धिक वारसा धैर्याने चालविणारी 'ती' .आयुष्यातील कोणत्याही प्रसंगी धीराने, संयमाने वाट काढत, विनातक्रार पुढे चालत राहणारी 'ती'. राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीचा वसा चालविणारी 'ती'.' ती' कधीच गौण नव्हती. आजही नाही
संपूर्ण विश्वात स्त्रीत्व हे ओतप्रोत भरलेलं आहे. भारतीय संस्कृतीला माया, ममता,प्रेम, वात्सल्याने 'ती'जोजवत आली आहे.आदर ,विनय,संयम ,कर्तव्य,सहनशीलता या मूल्यांच्या संस्काराचं सिंचन करत आली आहे. आणि म्हणूनच स्त्रीत्वाचं प्रतिनिधित्व करणारे ३६५ हि दिवस खरे तर तिचेच आहेत.तिची प्रतिष्ठा ,मान,सन्मान अपरंपार आहे. संपूर्ण विश्वाची ती प्राण आहे .
'म' म्हणजे महान. जीवनातील कोणत्याही पैलूंचा विचार केला तरी त्या दृष्टीने ती महान असणारी.'हि' म्हणजे हिम्मतवान . डोंगराएवढं संकट कोसळल तरी कधीही हिंमत न हरणारी. 'ला' म्हणजे लाजवंती.समाजातील निंदनीय कृत्यांची लाज बाळगणारी अशी 'ती'. आदिशक्ती, प्रभूची भक्ती. झाशीची राणी, मावळ्यांची भवानी. प्रयत्नांना लाभलेली उन्नती आणि आजच्या युगाची प्रगती म्हणजे 'ती'.
भारतीय परंपरेत स्त्री-पुरुष दोघांनाही समान दर्जा दिलेला आहे. वीज असली पण दिवा लावला नाही तर विजेचे अस्तित्व कळणार नाही आणि दिवा असला पण वीजप्रवाह नसेल तर दिव्याचा उपयोग नाही. उजेडाकरीता दोन्हीही तितकेच महत्त्वाचे आहे .स्त्री-पुरुषाचे गुण मिश्रित झाले पाहिजेत अशीच निसर्गाची मांडणी आहे. याचा अर्थ 'स्त्रैण पुरुष' किंवा 'पुरुषी स्त्री' असा होत नाही. तर स्त्री मधील वात्सल्य ,करुणा,समर्पण ,त्याग ,लज्जा,सहनशीलता क्षमाशीलत्व हे गुण आणि पुरुषामधील विवेक ,कर्तृत्व ,पौरुष ,निर्भयता इ. परिस्थितीनुसार ,प्रसंगानुरूप परस्परांनी आत्मसात करून उत्तम मानव म्हणून जगणे अपेक्षित आहे.म्हणूनचआपण भगवंताला देखील अर्धनारीनटेश्वर असे म्हणतो.
पण...पण....काळाच्या ओघात कालचक्र उलट दिशेने फिरू लागले आणि समाजपुरुषाने स्वतःचा पुरुषी अहंकार मिरवत तिला दुय्यम स्थान देण्यास सुरुवात केली.स्त्रीजन्म म्हणजे पाप. तिला शिकण्याचा अधिकार नाही.'चूल आणि मूल' इतक मर्यादित क्षेत्र ठेवल. सोयीनुसार तिला रक्षित,संरक्षित ठरवली.वेळप्रसंगी दुर्लक्षितही केली .तर कधी देवता म्हणून देव्हाऱ्यात बसवली.
निसर्गाने दोघांच्या शरीरामध्ये बदल ठेवलेला आहे.पुरुषाला शारीरिक शक्ती तर स्त्रीला मानसिक व प्रजननशक्ती निसर्गानेच प्रदान केलेली आहे. शारीरिक शक्तीच्या जोरावर पुरुष स्त्रीवर अत्याचार करू लागला .अनेक अनिष्ट रूढी-परंपरांचे साखळदंड तिच्या पायात बांधले. अनेक मर्यादांचं वेसण तिच्या दैनंदिन जगण्याला घातलं. आकाशात मुक्तपणे भरारी घेण्याचा तीने कधी प्रयत्न केलाच तर तिला त्याने नको ती दूषणे लावली. भ्रम, भय ,चारित्र्यहनन करुन तिचे पंखच त्याने छाटले आणि तिच्या अस्तित्वाला जणू ग्रहणच लागले.
बदल ह्या निसर्गनियमानुसार त्यावेळच्या समाजात 'ती'च्या दृष्टीने अनुकूल असे बदल घडून लागले .समाजसुधारकांमुळे वैचारिक क्रांती घडून आली. 'स्त्री एक माणूस आहे आणि माणूस म्हणून तिच्याशी माणसासारखं वागलं पाहिजे हि साधी गोष्ट समाजास समजू नये'? या विचारधारेच्या अनुषंगाने तिला तिचा अधिकार प्राप्त करून देण्यासाठी थोर समाजसुधारकांनी त्यावेळच्या प्रवाहाविरुद्ध जाऊन अनिष्ट रूढी-परंपरांवर प्रहार केले. तिच्या पायातील त्या अनिष्ट रूढी परंपरांचे साखळदंड मोठ्या ताकदिनीशी तोडण्यात त्यांना यश आले. एखाद्याच्या डोळ्यावरची पट्टी काढावी तसंच थोर समाजधुरीनांनी समाजपुरुषाच्या डोळ्यांवरचे झापड स्वकर्तृत्वाने बाजूला सारत स्त्रीचं खरं अस्तित्व दाखवून दिलं. तिला पुन्हा एकदा ज्ञानाच्या वाटा दाखवून तिच्या अंधाऱ्या जीवनात उजेड पेरला. स्वत्वाची जाणीव करून देत तिच्या पंखात बळ भरलं.
मागे वळून न पाहता 'ती' ही मग आकाशात गरुडभरारी घेऊ लागली.जीवनकलेच्या विकासासाठी आवश्यक घर तिच्यामुळे तयार होते हे हळूहळू समाजपुरुषाच्या लक्षात येऊ लागले. आणि तिला पुन्हा एकदा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्याने प्राप्त झाला जो निसर्गाने तिला जन्मतः दिलेलाच होता.
- आरती डिंगोरे, नाशिक
--------------------------------
अधोरेखित
अधोरेखित शब्दाचा अर्थ नव्याने उलगडत जातोय. मुलगी जन्माला आली की सगळ्यांनाच आनंद होतो असे नाही. दिसायला सुंदर आणि रंग गोरा असला की, नवरा चांगला मिळेल हो, असे ऐकायला मिळते. म्हणजे मुलीने जन्माला येताना सुंदर असायलाच हवे हे अधोरेखित होते. पुढे मुलींसाठी असे अधोरेखित करणारे प्रसंग आणि गोष्टी वारंवार घडतच राहतात. वयात आलेल्या मुलींनी मोठ्याने हसायचे नाही. मुलांशी जास्त बोलायचे नाही. संध्याकाळी घरी लवकर यायचे. ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगितल्या जातात.
लहानपणापासूनच सगळ्या कामांची सवय करावी लागते नाही तर लग्न झाल्यावर सासुची बोलणी खावी लागतील हे तिच्या मनावर अधोरेखित केले जाते. बाईपणाच्या साच्यात ती स्वत:ला घडवत जाते. जेव्हा ती सासरी येते तेव्हा आणखी नवीन गोष्टी आणि बंधने तिच्यासाठी अधोरेखित करून ठेवलेल्या असतात. माणसांमध्ये बोलायचे नाही. व्यवहाराचे तुला काही कळत नाही. फक्त चूल-मूल हेच तुझे क्षेत्र. त्याच्यामध्येच तू स्वत:ला गुंतवायचे. तिलाही मग सवय होउन जाते. आखून दिलेल्या चौकटीत जगण्याची आणि राहण्याची.आहे त्यातच ती सुख मानायला शिकते. चौकट मोडण्याचा ती प्रयत्न करत नाही. चौकट पुन्हा मग अधोरेखित होत जाते. आयुष्याचे गणित मग सोडवायला शिकते. बेरीज आणि वजाबाक्यांचा ताळा करत राहते. भागाकार केला तर बाकी काही राहत नाही.
अनेक अडचणी येतात. जीव नकोसा होतो. तरी ती हसतमुखाने सारे काही करत राहते. घातलेल्या बंधनांना ऋणानुबंध समजून जपत राहते. सासरच्या गोष्टी माहेरी सांगत नाही. माहेरच्या गोड आठवणी मनातून काढत नाही. जगण्याची गोडी वाढवत राहते. चूल आणि मुलांमध्ये जीव रमवत राहते. लेकरांचे करताना अस्तित्व स्वत:चे विसरून जाते. आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेते. मिळालेल्या सुखाची ओंजळ भरून घेते. न मिळालेल्या गोष्टींना विसरून जाते. मुलीची मग स्त्री केव्हा होते हे तिच्या मनाला कोडे पडते. एका जागी उगवलेली ती नवीन जागी सहजपणे रूजते. बाईपणाचे जिणे पुन्हा अधोरेखित होउन जाते.
© सौ.गौरी ए.शिरसाट
विक्रोळी, मुंबई
--------------------------------
जागतिक महिला दिनानिमित्त कविता
--------------------------------
आजची नारी
आज काळ बदलला
रूढी परंपरा झुगारून
स्त्रीने वेगळी ओळख
निर्माण करत दिले पटवून
उच्च शिक्षणातील
पुरुषांची असणारी मक्तेदारी
बनली त्यातही ती
त्यांची भागीदारी
केला तिने खूप
धगधगता प्रवास
तेव्हा कुठे पाहायला
मिळाला हा दिवस
चाकोरीबद्ध जीवनाला
देत थोडे धक्के
समाजात वेगळे स्थान
केले तिने पक्के
बदलली जगण्याची दिशा
लोपुनी जुने स्वरूप
स्त्री बनली आदिशक्ती
खुलून आले नवे रूप
हातात घेतला
सारा कारभार
संसाराला लावत
आपलाही हातभार
नाही असे
कोणते क्षेत्र
सगळीकडे तिचे
असतात नेत्र
प्रगती केली
मोठी झाली
स्वतःची स्वतंत्र
ओळख निर्माण केली
सौ.प्रिती दबडे
पुणे
9326822998
--------------------------------
ती
ती असताना सभोवताली
परिसर होतो गंधीत सारा
ती नसल्यावर घरात नुसता
अस्ताव्यस्त फक्त पसारा
गोकुळ भासते घरात सार्या
तीचा सभोवती वावर प्यारा
ती नसताना चार भिंतीचा
तुरुंग केवळ वाटे सारा
ती असल्यावर सत्यवान मी
मृत्यूला ही तिचा दरारा
ती नसल्यावर वाहात राहते
नयनातून या अश्रूधारा
कौतुक तिचे एकच दिवस
नको सदैव मनी धरा
आकाशाला काय कळाव्या
कळा किती सोशिते धरा
अरविंद कुलकर्णी पुणे
--------------------------------
वैधव्य
वैधव्य आलं त्यात तुझा काय दोष सखी ?
अविचार करून असं होऊ नकोस ग दुःखी.
जन्म मरण काय आपल्या हातात असतं का बाई?नियतीच्या पुढे कुणाचेही काहीही चालत नाही. त्याची बायको गेली म्हणून तो कुढत का बसतो? तिच्या दहाव्याच्या आत दुसरी मिळते का बघतो. मी म्हणत नाही तू बोहल्यावर चढ पुन्हा,
जरी चढलीस तरी थोडाच ठरणार का गुन्हा?
अग बाई! जग वाटतं तितकं नसतं चांगलं, म्हणून म्हणते नको काढूस तू गळ्यातलं डोरलं .
लाव कुंकू ठसठशीत गजराही माळ केसात,
भर बांगड्या हातात आणि पैंजण जोडवी पायात
हवे तसे रहा सखे, हो स्वत:च स्वतःची राणी ,
झालं गेलं विसरून तू गा नव्याने गाणी.
माणूस आहे तू ही समजावं एकदा मनाला, दाखवून दे अस्तित्व तुझे तूच सा-या जगाला. ठेवशील आदर्श जिजाऊ,अहिल्येचा तू मनी
होतील नतमस्तक सारे तुझ्यापुढे मनोमनी.
आरती डिंगोरे, नाशिक
--------------------------------
*जागतिक महिला दिन*
*जा* गृत तू जननी
*ग* ती तू काळाची
*ति* च आहे पत्नी-बहिण
*क* धी आई बाळाची
*म* हती तुझी सर्वत्र
*हि* त करते सर्वांचे
*ला* जवते आज पुरुषांनाही
पद भुषविते गर्वाचे
स्वतःला सिध्द कर *दि* पक तूच वंशाचा
जग निश्चित म्हणेल *न* कोशी आदर सर्वांचा
- प्रल्हाद विश्वनाथराव घोरबांड
नांदेड9011352061 .
--------------------------------
कविता - ती कोण आहे ?
- नासा येवतीकर, 9423625769
ती रोज सकाळी, सर्वांच्या अगोदर उठते
आम्ही सर्व असतो झोपेत, तिच्या कामाला सुरू होते
ती रोज सर्वांसाठी, चवदार स्वयंपाक करते
आम्ही त्याला नावे ठेवतो, तरी ती कानाडोळा करते
ती रोजच आम्हा सर्वांची, एवढी देखभाल ठेवते
आमच्याकडून कसलीच, तिची कधी ही अपेक्षा नसते
सकाळपासून झोपेपर्यंत, ती खूप राब राब राबते
ती आजारी पडते जेव्हा , आम्हांला खरी किंमत कळते
मग ती कोण आहे ? आई आहे ताई आहे
ती कुणाची मावशी तर कुणाची बायको आहे
--------------------------------
मणीपुरच्या प्रकरणात मन अस्वस्थ........
अन् जन्म एका कवितेचा ........
बासणात गुंडाळा तुमची महासत्ता......
बस झाली तुमची भाषणं
कृती मात्र शुन्य...
तुमच्या तोंडाला लागलयं महासत्तेचं रक्त...
आता तुम्हाला इथे शांतता नकोच असते...
शांतता असली तर
तुमचं जातीय राजकारण
कसं फोफावेल बांडगुळासारखं...
तुम्हीचं उखरत राहता
पुन्हा पुन्हा धर्माच्या चमच्याने रोज नवी भांडणं...
कित्येकांचं रक्त जमिनीत
मुरतं अगदी त्यांच्यासकट...
कुणा घरचा आधार जातो
कोणाची रोजी रोटी
पण पक्ष मात्र पुढं जात राहतो अव्याहतपणे...
कुठतरी भर रस्त्यावर
नग्न केल्या जातात कोणाच्या
तरी भगिनी आणि काढली
जाते त्यांची नग्न धिंड .......
हे असं बघतलं की खरच
वाटत नाही
की आपण देवीसमान पुजतो महिलांना
धिंड त्यांची काढली जाते की आमच्या देशाची ?
आम्ही हळहळणार
नाही आहोत का ?
आमच्या मनाला डागण्या लागणार नाहित का ?
आम्ही पेटुन उठणार नाहित का ?
आम्ही सराईतपणे काही दिवसाने विसरुन जाणार .......
आक्रोश मंदावेल आमचा ...
काही दिवस व्हिडीओ होतील
फेसबुक इंस्टाग्रामवर व्हायरल
व होतीलही डिलीट
पण त्या बहिणींच्या
मनावरच्या ओरखड्यांचे काय ?
ते ओरखडे डिलीट करायचं
आहे का एखादे डिव्हाइस...?
नाही ना?
मग तुमची महासत्ता बासणात गुंडाळून ठेवा........
गोपाल वसंतराव खाडे
बाबरे कॉलनी कारंजा लाड, वाशीम
जागतिक महिला दिनानिमित्त सर्वाना शुभेच्छा ........!
संपादन :- नासा येवतीकर, धर्माबाद