Monday, 4 March 2024

काटकसर ( katakasar )

काटकसर म्हणजे बचत 

काटकसर म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे पैश्याची बचत किंवा काटकसर. फक्त पैश्याचीच बचत किंवा काटकसर करता येते अन्य दुसऱ्या कोणत्याही वस्तूची आपणांस बचत वा काटकसर करता येत नाही का ? यावर देखील विचार करायलाच हवं. आपण पावलोपावली पैश्याची बचत कशी करावी ? याविषयी इतरांना सांगतो किंवा इतरांकडून ऐकतो. म्हणूनच त्या गोष्टीवर जास्त लक्ष ठेवून पैश्याची बचत करत असतो. पैश्याची जास्तच काटकसर करणाऱ्या व्यक्तीला ' कंजूष ' या नावाने देखील संबोधले जाते. माणसाच्या वृत्तीत कंजूषपणा असायलाच हवं. नाहीतर काटकसर करण्याची वृत्ती कशी निर्माण होईल ? असेल तर दिवाळी अन् नसेल तेव्हा शिमगा ही वृत्ती काही कामाची नाही. कोणत्याही बाबीची काटकसर करून बचत केल्याने त्याचा फायदा भविष्यात नक्की होतो किंवा फायदा व्हायलाच पाहिजे म्हणून काटकसर करू नये तर ती सवय आपणांस लागायला हवी. पैश्याची बचती सोबत अजून आपणाला कोणकोणत्या बाबीची बचत करता येऊ शकते, यावर थोडा विचार करू या....
निसर्गाकडून जे मुबलक प्रमाणात मिळते परंतु ठराविक कालावधी नंतर ते संपून जाण्याची शक्यता आहे अश्या बाबी काटकसरीने वापरले पाहिजे. उदाहरणार्थ पेट्रोल. पेट्रोल मानवनिर्मित नाही तर निसर्गनिर्मित आहे. पेट्रोलचा साठा मर्यादित स्वरुपातील आहे. म्हणून पेट्रोलवरील वाहने वापरतांना काळजीपूर्वक वापरायला पाहिजे. गरज नसेल त्या ठिकाणी गाडीच्या ऐवजी सायकल किंवा पायी हा पर्याय वापरून आपण पेट्रोलची बचत करू शकतो. पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या गाड्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे भविष्यात आपल्याजवळ पैसा असून देखील पेट्रोल मिळणार नाही असे चित्र बघायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून एक जागरूक नागरिक या नात्याने पेट्रोलची बचत करणे व काटकसरीने त्याचा वापर करणे आपले कर्तव्य आहे. 
त्यानंतरची दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे पाणी. पाणी हे देखील निसर्गनिर्मित बाब आहे. 100 वर्षांपूर्वी पासून आजपर्यंत चा इतिहास अभ्यास केला तर लक्षात येईल की, पाणी कसे कमी कमी होत गेले आहे. नदीच्या काठावर वसलेली आपली माणसे त्या नदीला कधी गिळंकृत केली हे कळालेच नाही. आपणाला पाणी विविध माध्यमातून मिळते. ते सर्वच माध्यम हे निसर्गाचे आहेत. कुण्या प्रयोगशाळेत किंवा अन्य कोठे पाणी तयार करता येत नाही. पावसाळ्यात मुबलक दिसणारे पाणी उन्हाळ्यात तोंडचे पाणी पळवून नेते. म्हणूनच पाण्याची बचत किंवा त्याचा काटकसरीने वापर करणे देखील खूप गरजेचे आहे. पाण्याची निर्मिती करू शकत नाही मात्र बचत करू शकतो, ही भावना मनात निर्माण होणे आवश्यक आहे. 
आपण काही गोष्टी वापरतांना अजिबात विचार करत नाही. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे विजेचा वापर. बटण दाबले की दिवा लागतो, पंखा फिरतो, टीव्ही चालू होते. त्यामुळे आपले काम सारे बटणावर चालत असते. पण बटण दाबण्यापूर्वी आपण विचार करतो का ? की खरंच या वेळेला पंख्याची किंवा दिव्यांची गरज आहे का ? काही मंडळी तर घरातले दिवे आणि पंखे सदानकदा चालूच ठेवतात. शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयात असे चित्र खूप वेळा बघायला मिळते. त्यामुळे विनाकारण वीज खर्च होतो की नाही ? वीज जरी मानवनिर्मित असेल तरी वीज तयार करण्यासाठी जो खटाटोप करावा लागतो ते खूपच महागडे आहे. एक युनिट वीज तयार करण्यासाठी काय काय करावे लागते हे एक वेळा प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहायला हवं, तेव्हाच त्या विजेचा वापर कळायला मार्ग सुचेल असे वाटते. 
जगात अन्नावाचून मरणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. जगात असेही लोकं आहेत ज्यांना एकवेळचे पोटभर जेवायला मिळत नाही तर दुसरीकडे अन्न वाया घालविण्याऱ्याची संख्या देखील भरपूर आहे. एखादं सण, समारंभ, लग्न, उत्सव किंवा विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने अन्न वाया जात असलेले चित्र आपण नेहमीच पाहतो. यात काही बदल करता येईल का ? यावर विचार होणे आवश्यक आहे. हे झालं सार्वजनिक किंवा जास्त लोकांच्या बाबतीत पण कुटुंबात किंवा ठराविक लोकांच्या मर्यादेत असतांना देखील अन्न वाया टाकल्या जाते, हे योग्य नाही. विशेष करून महिलांनी या विषयी जागरूक राहून किती अन्नाची गरज आहे तेवढाच स्वयंपाक करावे. बहुतेक वेळा घरातील लोकांचा अंदाज न घेता स्वयंपाक केल्याने उरलेला अन्न फेकून देण्याशिवाय अन्य पर्याय नसतो. वारंवार असे होऊ नये याची काळजी महिलांनी घ्यायला हवे. माणसाकडून अन्नधान्याची निर्मिती होते. पण त्याची निर्मिती करतांना शेतकऱ्यांना किती हालअपेष्टा सहन कराव्या लागतात याची जाण आपणांस असायला हवी. म्हणूनच अन्नाची नासाडी होणार नाही याची महिला सह पुरुषांनी देखील काळजी घ्यायला हवी. अन्नाचा देखील काटकसरीने वापर करायला हवं.
निसर्गनिर्मित असो व मानवनिर्मित असो प्रत्येक वस्तूची बचत करायला शिकणे आणि काटकसरीने वापर करणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य असायला हवं. 
आजच्या दिवशी तसा संकल्प करून काटकसर करायला प्रारंभ करू या. 
मनस्वी शुभेच्छा ........!

- नासा येवतीकर, स्तंभलेखक

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...