Tuesday, 17 July 2018

शनिवारची दप्तरमुक्त शाळा

दप्तरमुक्त शाळेचे नियोजन कसे कराल ?

शनिवार हा दिवस शक्यतो दप्तरमुक्त शाळेसाठी निवड करण्यात यावे. त्या दिवसाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे केल्यास मुलांना नक्की आनंद मिळेल.

परिपाठ - अर्धा तास

मास पी टी - अर्धा तास

श्रवण क्रियेसाठी - प्रत्येक वर्गातील एक कविता audio स्वरूपात ऐकविणे - अर्धा तास

भाषण - प्रत्येक वर्गातील मुलांना बोलते करण्यासाठी विविध प्रश्न आणि संदर्भ देऊन बोलते करणे. यात मुलांनी स्वतःचा परिचय, कुटुंबाची माहिती, गावाची आणि तालुक्याची माहिती दिली तरी चालेल. - अर्धा तास

वाचन - इयत्ता पहिली आणि दुसरी वगळता इतर वर्गातील मुलांकडून एक गोष्ट किंवा उताऱ्याचे अभिवाचन करून घेणे. जमल्यास फळ्यावर लिहिलेले वाक्य वाचन करणे. - अर्धा तास

संभाषण - दोन मुलांचे संवाद करण्याची क्रिया मराठी आणि इंग्रजी भाषेतून घ्यावी. यामुळे इतरांना संवाद कसे करावे याची माहिती मिळेल.

खेळ - विविध प्रकारचे Bमैदानी आणि बैठे खेळाचे आयोजन करून त्यात मुलांना सहभागी करून घेता येईल. मुलांना आनंद होईल अश्या खेळांची निवड करणे ह्यात शिक्षकांचे कौशल्य पणाला लागते. मुलांना नेमके कोणते खेळ आवडतात याची माहिती घेऊन त्याअनुषंगाने साहित्य गोळा करणे आवश्यक आहे. - अर्धा तास

भाषिक खेळ - मैदानावरील खेळ संपल्यावर मुलांना शालेय पोषण आहाराची चव द्यावी. जमल्यास या दिवशी पूरक आहाराची चव दिल्यास मुलांना अजून छान वाटेल. त्यानंतर सुमारे एक तास भाषिक खेळांचे नियोजन करावे. त्यात आठवड्यात शिकलेल्या भागावर मुलांनी प्रश्न विचारणे आणि मुलांनीच उत्तर देण्याचा उपक्रम अगदी मजेशीर घेता येऊ शकतो. अंताक्षरीचा खेळ।घेता येऊ शकतो. मुलां-मुलीची नावे, गावाची नावे याचे देखील अंताक्षरी खेळता येते. मजेशीर कोडी विचारून मुलांच्या डोक्याला खुराक देता येईल. सरते शेवटी आजचा दिवस कसा वाटला ? याचे feedback एक दोन मुलांकडून घेणे गरजेचे आहे.

साहित्य - मिनी स्पीकर with माईक, ( यास मोबाईल attach करता येते.)

या सर्व क्रिया करतांना मुले कंटाळवाणे होणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक आहे.

एक शनिवार दप्तरमुक्त शाळा करून पाहावे. मुलांना तर आनंद वाटेलच शिवाय शिक्षक म्हणून आपणास समाधान देखील मिळेल याची खात्री आहे.

- नागोराव सा.येवतीकर
प्राथमिक शिक्षक, धर्माबाद

Monday, 16 July 2018

नासा येवतीकर यांची मुलाखत

काव्यप्रेमी शिक्षक मंच समूहात सन्माननीय अतिथी प्राथमिक शिक्षक तथा स्तंभलेखक नासा येवतीकर यांची ऑनलाईन मुलाखत......
   
विजया पाटील - नमस्कार दा.....आपण कधीपासून लिखाणाकडे वळलात??
नासा येवतीकर : मी माध्यमिक शाळेत असतांना मराठी विषयात निबंध लिहा असा प्रश्न असायचा त्या प्रश्नाचे उत्तर मी सविस्तर लिहीत असे. माझे शिक्षक मला पेपर वाचण्यास सांगायचे त्यावेळी माझी नजर वाचकांची पत्रे यावर पडली. मी ठरविले की, लिहायचे. पहिला लेख दहाव्या वर्गात असताना सन 1993 मध्ये प्रकाशित झाला.

रामदास देशमुख : आपल्याला काही साहित्यिक दृष्टीने पार्श्वभूमी लाभली का?
नासा : माझ्या घरात तसे कोणी ही साहित्यिक नव्हते. मात्र माझ्या घरात चांदोबा, किशोर यासारखे पुस्तक दरमहा पोस्टाने येत होते कारण वडील शिक्षक होते. वाचनाची गोडी लागली. हळूहळू मग लेखनाची वाचन केल्याशिवाय अनुभव मिळत नाही म्हणून वाचाल तर लिहाल असे मला वाटते

‪विजया पाटील ‬: निवेदन ही एक कला आहे. त्याचे विशेष शिक्षण घेतले आहे काय?
नासा : निवेदन करण्याची विशेष असे शिक्षण कोठे ही घेतलं नाही. मात्र रेडिओ लहानपणापासून ऐकत आलोय. माझी सकाळ रेडियोच्या धूनने व्हायची. सकाळी उठल्यापासून सायंकाळी झोपी जाईपर्यंत रेडियो सोबत असायचा. रेडिओवर आवडता भाग म्हणजे क्रिकेटचे समालोचन ऐकणे. ऐकून ऐकून समालोचन करण्याची सवय लागली. तीच सवय मला निवेदनामध्ये मदत केली. मनिंदरसिंग यांच्या आवाजात घरी समालोचन केल्याने मला शाबासकी मिळाली हे मला आज ही आठवते.

पंडीत रामहरी ‬: सरजी ई कथा बुक बद्दल सांगा...मला काढायचा असेल तर काही अनुभव शेअर करावा.
नासा: ई बुक म्हणजे स्वस्तात आपली प्रकाशन क्रिया पूर्ण करणे. आपण यासाठी esahity@gmail.com वर mail करून संपर्क करावे पूर्ण माहिती मिळून जाईल.

रामदास देशमुख: आपल्या मोबाईल वर कॉल केला असता,...है प्रीत जहा की रीत सदा.... ही डायलर टोन ऐकली, त्या अनुषंगाने... लेखकाने राष्ट्रीयत्व जोपासावे की प्रांतीयत्व?
नासा : अर्थात देश पहिल्यांदा

‪विजया पाटील ‬: आपली कोणकोणती पुस्तके प्रकाशीत झाली आहेत?
नासा : पाऊलवाट जे की पुस्तक रुपात प्रिंट काढलेली पहिली पुस्तक. त्यानंतर संवेदना, मी एक शिक्षक, जागृती, शाळा आणि शिक्षक हे सर्व ई बुक वैचारिक पातळीचे तर हरवलेले डोळे हा ई कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. बालसंस्काराच्या गोष्टी - प्रगतीपथावर आहे.

विजया पाटील ‬: फ्रेश मार्निंग बुलेटिन या सदरासाठी विशेष कुणाची प्रेरणा मिळाली?
नासा : आमचा मित्राचा एक समूह आहे. ज्यात नेहमी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होते. त्यात एके दिवशी मित्रांनी शाळेत बातम्या वेळेवर मिळत नाही, त्यासाठी काही करता येईल काय ? असा प्रश्न टाकला. तेंव्हा माझा पत्रकार मित्र कुणाल पवारे यांनी बातम्या देण्याची सहमती दर्शविली. मग एकाने सुविचार, दिनविशेष, बोधकथा असे करत ही फ्रेश मॉर्निंग बुलेटीन सेवा 15 ऑगस्ट 2015 रोजी सुरू करण्यात आली. जे की आज संपूर्ण महाराष्ट्रात सर्वदूर पोस्ट होते.

वर्षा भोज : फ्रेश मॉर्निंग बुलेटीन हा सर्वात सुंदर उपक्रम आहे . सकाळी ७ वा आम्ही सर्व वाट पहात असतो
नासा : धन्यवाद

रामदास देशमुख: साहित्यिक चळवळी रुजवण्यासाठी व्हाट्स अँप सारखी समाज माध्यमे खऱ्या अर्थाने कार्य करतील का?
नासा : छान प्रश्न विचारलात सर, आमचा साहित्य स्पंदन नावाचा समूह आहे. या समूहतील काही सदस्य त्यात सहभागी आहेत. आम्ही नवोदित साहित्यिकांना प्रेरणा मिळावी म्हणून सप्ताहात विविध स्पर्धा आयोजित करीत होतो. जयतून अनेककनी लेखन केले आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचे उत्तर होय असे देतो.

खुशाल गुलहाने ‬: मा.सरजी,पुस्तक वाचनाचा जसा लेखनासाठी उपयोग होतो तसा माणसं वाचनाचा होतो का ?
नासा : अशी काही लेखकांची पुस्तके वाचावी लागतील ज्यात माणसांची वागणे मंडली आहेत. विशेष करून पुल ची पुस्तकं वाचावीत म्हणजे माणसं कळायला लागतील.

पंडीत रामहरी ‬: सरजी,
किशोर मासिकाच्या लेखन कार्यशाळेविषयी माहिती असेल तर कळवा..भाग घ्यायचा आहे....
नासा : किशोर मासिकाच्या कार्यशाळे विषयी तेवढी माहिती मला नाही.

‪मीना सोसे ‬: निवेदनासाठी ठराविक मजकूर पाठांतर करावे लागते का
नासा : काही वेळा आठवणीवर देखील आपल्या हजरजबाबीने निवेदन द्यावे लागते. बहुतांश वेळा लिखित स्वरूपात असलेले निवेदन देण्याची वेळ येते.

‪विजया पाटील : दा.. आपल्या शाळेतील विद्यार्थी आपल्या लिखाणाचं वाचन करतात काय? त्यांच्या प्रतिक्रिया काय असतात?
नासा: पूर्वी ज्यावेळी पाऊलवाट प्रकाशित झाला होता त्यावेळी माध्यमिक शाळेवर वर्ग सहावीला मी शिकवीत होतो. तेंव्हा शाळेतील मुलांकडून रोज एक प्रकरण अभिवाचन करून घेतल होतं. मुलांनी आनंद व्यक्त केलं. आज ही मला ते फोन करतात. पेपरमध्ये लेख वाचल्यावर

‪मीना सोसे ‬: व्हाॅटस अप फेसबुक मुळे पुस्तक वाचन सगळ्यांचे कमी झाले आहे असे वाटते का ?
नासा : पुस्तक वाचणारे आज ही वाचन करत आहेत. मात्र जे कधी पुस्तक उघडून पाहत नव्हते ते मात्र या सोशल मीडियामुळे वाचायला लागली असे वाटते.

रामदास देशमुख : समीक्षण,रसग्रहण, परीक्षण यातील भेद आपल्या दृष्टीने कसा स्पष्ट कराल?
नासा : माझ्यासाठी जरा कठीण प्रश्न आहे. राखीव ठेवतो.

मीना सोसे ‬: साहित्यिकांनी स्वतः स काय शिस्त लावावी जेणे करून लिखाण सकस होईल ?
नासा : साहित्यिकांनी दुसऱ्यांचे साहित्य मन लावून वाचावे. इतरांच्या साहित्याची कॉपी करण्यापेक्षा त्या साहित्याचा आणि आपल्या अनुभवाचा सांगड घालून स्वतःचा एक उत्तम लेख तयार करावा. वाचन एक दिशा मिळावी म्हणून करावे. डोक्यात आलेली कल्पना लगेच कागदावर उतरवून काढावी. रफ लिहा पुन्हा फेर करा, पुन्हा वाचा, मित्रांना वाचण्यास द्या. शेवटी अंतिम करा.

‪खुशाल गुलहाने : चांदोबा, किशोर इ.नी तुमच्यावर निश्चित चांगले संस्कार केले असणार.त्याचा पुढील आयुष्यात आपल्याला कसा उपयोग झाला ? विद्यार्थ्यांना त्याचा आपण कसा फायदा करून दिला.
नासा : यामुळे मला कथा वाचनाचा छंद लागला. कात्रण करणे, कविता वाचणे, चित्र पाहणे यामुळे माझे डोळे सक्षम झाले. वाचनाची गती वाढली. आज मी शाळेतील मुलांना वाचन कसे करावे ? काय करावे हेच सांगत असतो. माझी मुलं त्या पद्धतीने वाचताना पाहून आनंद वाटतो.

रामदास देशमुख : आजकाल समाज माध्यमांवर साहित्यिक ग्रुपचे खूपच पेव फुटले, काय भाष्य कराल?
नासा : प्रत्येकांना वाटत असते की, आपली एक कंपनी असावी. आपल्या समूहात आपले मित्र असावेत. काही का असेना पण गेल्या तीन वर्षात खूप काही नवनिर्मिती झाली. त्याचसोबत चोर ही तयार झाले, हे ही विसरून चालणार नाही.

आनंद घोडके : व्हाटसप् मुळे नाते संबंधातील नाजूकता नष्ट होत आहे...यावर काही असे उपाय सांगता येईल की ज्यामुळे नवं युग आणि जुन्या युगातील तफावत कमी होईल?
नासा : खूप गंभीर प्रश्न आहे. यामुळे माणसांनी सर्वप्रथम आपले वेळापत्रक तयार करणे आवश्यक आहे. कोणाला किती वेळ द्यायचा हे जे ठरवितात त्यांना त्रास होत नाही. सदानकदा मोबाईल हातात हे खूप वाईट आहे. यापासून वाचले पाहिजे आणि कुटुंबाला वेळ दिला पाहिजे

‪खुशाल गुलहाने ‬: या गोष्टी सोशल मिडियामुळे कमी झाल्या.थोडक्यात  कागदावरचे लेखनच कमी झाले .ही बाब चांगली की वाईट ?
नासा : अर्थात कागदावरच लेखन कधीही चांगले ज्यामुळे हात, डोळे आणि मेंदू यांचा समन्वय होतो. उलट मोबाईलवर डोळे दुखतात आणि त्यांचे अक्षर दिसत नाही.

‪गणेश कुलकर्णी ‬: बरोबर आहे सर कागदावरिल लेखन अतुट असे असते.
नासा : होय

‪गणेश कुलकर्णी ‬: सरजी लेखनात व्याकरण किती महत्वाचे ते सांगावे
नासा : व्याकरण अर्थात खूप महत्वाचे आहे. तुमचे विचार खूप छान आहेत तर लेखनात असंख्य चूका असतील तर पुढचा जाणकार असेल तर थोडा नाराज होतो. म्हणून शक्यतो आपले साहित्य व्याकरणदृष्ट्या अचूक असायलाच हवे

विजया पाटील : मग चोरांच्या बंदोबस्त करण्यासाठी ठोस अशी काही उपाययोजना सुचवाल काय?
नासा : आपले साहित्य सोशल मीडियावर पोस्ट करण्यापूर्वी, वृत्तपत्रात प्रकाशित करणे, स्वतःच्या ब्लॉग वर प्रकाशित करणे. तसेच पोस्टच्या खाली कॉपी न करण्याची सुचना देणे

खाजभाई बागवान ‬: नासा सर नमस्कार माझा आवडता प्रश्न ही मुलाखत देताना कसं वाटत म्हणजे आपल्या आता कसे feel होत आहे?
नासा: खूप छान, ऑनलाइन मुलाखत देणे ते ही सोशल मीडियात खूप छान कल्पना आहे.

रामदास देशमुख : जे केवळ मोबाईल वरच बोटाने टायपुन लिहितात,अशा मंडळींना काय सल्ला द्याल?
नासा : ज्यात मी पण आलोय, रोज वहीवर एक पान लेखन करत राहावे. म्हणजे हाताला लिहिण्याची सवय कायम राहील.

‪खाजभाई बागवान ‬: सर अजून एक प्रश्न आपले नासा हे टोपण नाव कोणी दिले आपणास
नासा : मी नववी वर्गात असतांना शाळेत एका शिक्षकांनी NASA चा Full Form विचारले होते. आणि त्यांनी त्याचे उच्चार देखील केले. माझ्या जवळ बसलेला माझं जिवलग मित्र हळूच सरला ऐकू जाणार नाही अश्या आवाजात म्हटलं नागोराव सायन्ना झालं त्यादिवशी पासून माझं नाव नासा झालं

रामदास देशमुख: आपण कवितेकडे कधी वळला नाहीत का ? का ?
(साहित्यातील कविता हं)
नासा : कविता करणे हा माझा कधी ही पिंड नव्हता आणि नाही. पण या सोशलने ते मला शिकविले. कविता करतो पण साहित्यातील नाही. मुक्तछंद कविता करतो.

खुशाल गुलहाने ‬: इतरांनी आपले म्हणजे साहित्यिकाचे साहित्य वाचावे म्हणूून साहित्यिकांनी काय करायला हवे असे आपणास वाटते ?
नासा : स्वतः चा एक ब्लॉग तयार करावे. तेथे सर्व साहित्य पोस्ट करून ठेवावे. मित्रांना share करावे. जमेल त्यावेळी मित्रांना वाचण्याची विनंती करावी. नियमित वृत्तपत्रात प्रसिद्धी द्यावी.

रामदास देशमुख : गझल साधना,उपासना यावर काय सांगाल?
नासा : प्रयत्नाने हे साध्य होऊ शकते हे आमच्या समूहात बहुतेक जनांचे अनुभव पाहुन सांगतो आहे. मला त्यात अजूनही रस निर्माण झाले नाही.

खाजभाई बागवान : आज काल ऑनलाईनच्या जमान्यात काव्यसंग्रहाना साहित्याला हवी तेवढी प्रसिद्धी मिळत नाही तर खर आणि चांगल्या काव्यसंग्रहाना प्रसिद्धी मिळावी यासाठी काय करावे आपले मत सांगा
नासा : प्रत्येकांना स्वतःचे साहित्य छान आहे असे वाटते. त्यात गैर नाही. मात्र त्यासाठी मित्रा-मित्रांनी मिळून छोटे छोटे कार्यक्रम आयोजित करून लोकांपर्यंत साहित्य पोहोचविता येते. सर्वांचे साहित्य चांगलेच असते कारण ते नवनिर्मित असते.

रामदास देशमुख : आपण मंचाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष म्हणून मंच साहित्यिक दृष्टीने प्रगती पथावर नेण्यास काही योजना आहेत का?असतील तर कोणत्या?
नासा : काव्यप्रेमी मंच हे समुहाचे नाव मी गेल्या दोन वर्षांपासून ऐकत आहे. असे वाटते . सोलापूर ला एक काव्यवाचन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते आनंद घोडके सर यांनी पण मला यायला जमले नाही. आठवते थोडं. मात्र कामाचा व्याप आणि असंख्य ग्रुप यामुळे काही गोष्टी विसरून जातो. नक्कीच आपल्या मंचासाठी अनेक योजना तयार होतील. त्यास प्रगतीपथावर देखील नेता येईल. आज आत्ता मी काही योजना सांगू शकत नाही. मात्र थोड्याच दिवसात नक्की सांगेन.

पंडीत रामहरी ‬: सरजी
गझल काव्यप्रकार हाताळता का?
याबाबत काय भाष्य कराल?
नासा : नाही सर

रामदास देशमुख : सोशल माध्यम द्वारे एक आभासी जग निर्माण होत आहे,त्याचे अनेक बळी जात आहेत,साहित्यिक म्हणून काय सांगाल?
नासा : जेथून जे चांगले मिळते ते घ्यावे, बाकी सर्व आहे तिथे सोडून द्यावे. येथील पोस्ट वर जास्त खोलात विचार न करता सो सो विचार करावे. चुकीची कोणतीही बाब आपण स्वतः share करू नये. मित्रांसोबत किंवा कुटुंबातल्या व्यक्तीसोबत रोज एक तास मोबाईल बाजूला ठेवून घालवावे.

पंडीत रामहरी : सरजी,
आज समाज व साहित्य यात दरी आहे का? साहित्याचे  समाजशास्त्रिय मूल्यमापन आपण कसे कराल?
नासा : दरी आहे असे वाटते. कारण आज जे साहित्य येत आहे त्यात वेदना किंवा जाणिवा फार कमी प्रमाणात दिसून येतात. वरवरचे साहित्य बाहेर पडत आहे. कुठे तरी एखादा साहित्यिक पोटातून लिहीत आहे. समाजाच्या विकासासाठी किंवा प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी ज्यांचे लेखन होते ते लगेच सर्वदूर प्रसिद्ध होते. समाजाचे चित्र साहित्यिकांनी मांडायला हवे

रामदास देशमुख : देशोन्नती मधील स्तंभलेखन बाबतीत अनुभव काय सांगाल?
नासा : माझ्या जीवनातील टर्निंग पॉईंटचा प्रश्न आहे. दैनिक देशोन्नतीने मला महाराष्ट्रात पोहोचविले आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. संपादक मा. प्रकाशजी पोहरे यांचे नेहमी ऋणात असेन. त्यावेळी हे मोबाईल नव्हते. मी रात्री दोन तास कागदावर लिहायचो आणि सकाळी पोस्टात लिफाफा टाकायचो. बरोबर आठ दिवसांनी ते लेख प्रकाशित व्हायचे. अनेक वाचक पत्राद्वारे मला कळवायची. मला हुरूप यायचा. असे करत लिहीत गेलो. देशोन्नतीने मला माझ्या अस्तित्वाची जाणीव करून दिली, हे खरे आहे.

रामदास देशमुख : सरजी ,आपण मंचावर जास्त दिसत नाही त काही व्यस्तत्ता की आणखी काही...काय सांगाल?
नासा : माझी सकाळची वेळ फ्रेश बुलेटीनसाठी राखीव असते आणि दिवसभर शाळेत व्यस्त.  सायंकाळी घरी येऊन whatsapp पाहतो. पण पूर्वी म्हटल्याप्रमाणे अनेक ग्रुप अनेक पोस्ट त्यामुळे कोणाचे ही संदेश काहीच वाचन होत नाही.

रामदास देशमुख : आपल्या लेख लेखनासाठी कुणी आदर्श डोळ्यासमोर ठेवून आहात काय?
नासा : माझे वडील बंधू डॉ. सुरेश येवतीकर हे माझ्यासमोर नेहमी एक आदर्श आहेत. ज्यांच्यामुळे मी घडलो

पंडित रामहरी ‬: सरजी,
आपणास साहित्याचा कोणता प्रकार लिहायला व वाचायला आवडतो?
नासा : अर्थातच वैचारिक आणि प्रेरणा देणारे साहित्य खूप आवडतात.

रामदास देशमुख : आपल्या या मंचाला ही वेळ देण्यासाठी काही वेळ राखून ठेवाल का?
नासा : नक्की आपल्या मंचासाठी यापुढे माझी शनिवारची दुपार वेळ नक्की राहील. रोज वेळ देणे खूप अशक्य आहे.
स्वतःची 15 ग्रुप आहेत. जिथे सातत्याने काही तरी पोस्ट करावे लागते आणि लक्ष ही द्यावे लागते.

‪पंडीत रामहरी ‬: सरजी
वैचारिक लेखनाचे आपल्या मते
निकष कोणते आहेत?
नासा : वैचारिक लेखांचे निकष असे ठराविक काही सांगता येणार नाहीत. मात्र ज्यातून आपण समाजाला एक नवी विचार प्रेरणा देत असू तर ती वैचारिक ठरेल. एखादी नवी कल्पना व्यक्त करत असाल तर ती वैचारिक कल्पकता होऊ शकते. आपली विचारधारा ही हजार लोकांची आहे असे समजून लिहिणे हेच वैचारिक लेखांचे निकष असावे असे वाटते.

रामदास देशमुख : एकंदरीत नवोदित,प्रस्थापित, विस्थापित सर्वांना जाता जाता काय सल्ला द्याल?
नासा : भरपूर वाचन करू या आणि लिहिते लिहिते लिहिते होऊ या

मुलाखत : आनंद घोडके, रामदास देशमुख, विजया पाटील, पंडीत रामहरी, मीना सोसे, खुशाल गुलहाने, गणेश कुलकर्णी, आणि खाजभाई बागवान

मतदान जनजागृती ( Voting Awarness )

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जनजागृती चला मतदान करू लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.  चला मतदान करू .......! ...