Wednesday, 14 December 2016

Mens story

एका पुरुषाची आत्मकथा

मी एक पुरुष. माझा जन्म पुरुष योनीत झाला आणि समाज मला पुरुष म्हणून ओळखू लागला. मी लहानाचा मोठा होऊ लागलो. समाज मला माझ्या कामाची जाणीव करून देऊ लागली. हे काम तुझे नाही, तू हे काम करू नये, अश्या प्रकारचे सल्ले देऊ लागले. त्यामुळे माझी काय काय कामे आहेत ? मी काय करावे ? हे मला कळु लागले. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी संपूर्ण घर डोक्यावर घेऊ लागलो. चॉकलेट, बिस्कीट किंवा हव्या असलेल्या वस्तुची मागणी रडून का होईना पूर्ण करून घेऊ लागलो. तरी सुध्दा मला प्रसाद म्हणजे मार मिळत नव्हता कारण घराचा मीच एकमेव कुलदीपक होतो. माझ्यशिवाय वंश कसे पुढे जाईल ?  दिवसभर खेळ खेळणे, उडया मारणे, इतरांशी वाद करणे, भांडण करणे यातच मी पूर्ण वेळ घालवायचो.  शाळेचा अभ्यास पूर्ण न केल्यामुळे शिक्षकांची छडी खाणे ही सर्व कामे मी शालेय जीवनात अगदी नेटाने पूर्ण केली. मुलींच्या कामाला अजिबात हात लावायचे नाही अशी शपथ घेतली होती. म्हणून वेळ प्रसंगी उपाशी झोपलो पण मुलींच्या कामाला कधीही हात लावला नाही. माझे वय वाढू लागले तसा मी आत्ता मोठा झालो. घरातील लोकांचे माझ्यावरील प्रेम हळू हळू कमी होत आहे असे दिसू लागले. पूर्वी मला जे मागितले ते मिळायचे ती माझी मागणी आत्ता सर्रास फेटाळली जाऊ लागली. रडत बसण्यापेक्षा मला माझ्यासाठी व घरासाठी पैसे कमाविणे गरजेचे वाटू लागले. मी वयात आल्यानंतर माझे दोनाचे चार हात झाले. सोज्वळ दिसणाऱ्या पत्नीने माझ्या जीवनात गृहप्रवेश केला येथूनच माझ्या दुसऱ्या जीवनास प्रारंभ झाला. या पूर्वी मी घरातील सर्व सभासदावर सारखेच प्रेम करीत होतो, परंतु लग्न झाल्यावर घरातील व्यक्तीत विशेष करून आई, बहीण वर माझे प्रेम कमी झाले असा गोड गैरसमज करून घेऊन पत्नी सोबत त्यांचे मतभेद दिसू लागले. लेकी बोले सुने लागे असा काहीसा प्रकार माझ्या कानावर ऐकू येऊ लागला. मी फक्त पत्नीचे ऐकतो व तिच्या बोलण्यानुसार वागतो असे आरोप माझ्यावर होऊ लागले. मी आत्ता पूर्वीचा राहिलो नाही. आईचे ऐकावे तर पत्नी रागावते अन पत्नीचे ऐकावे तर आई नाराज होते. माझी स्थिती अडकित्यात सापडलेल्या सुपारीप्रमाणे झाली. मला ना माझी आई समजून घेते ना पत्नी. अश्या विपरीत स्थितीत मी करावे तरी काय ? मग काही गोष्टी मी नळी फुंकिले सोनारे इकडून तिकडे वाहे वारे या म्हणीप्रमाणे सोडून देत गेलो. जेंव्हा ही बाब हाताच्या बाहेर जाऊ लागली. त्यावेळेस मनात नसताना सुद्धा कुटुंबातून विभक्त होण्याचा निर्णय मनावर दगड ठेवून  घ्यावा लागला. मग सुरु झाला येथून माझी तारेवरची कसरत. पूर्वी मला कुटुंबाकडे लक्ष द्यायची गरज नव्हती. पण आत्ता विशेष लक्ष द्यावे लागत होते. माझ्या मुलाना आजी-आजोबांच्या गोष्टी ऐकायला मिळत नव्हत्या. त्यांचे प्रेम मिळत नव्हते. विभक्त झाल्यावर पत्नी आनंदात राहते परंतु मी मात्र आतल्याआत ओल्या लाकडासारखा धूर सोडत जळत राहतो. ज्यांची झळ फक्त मलाच कळते आणि जाणवते. घर, नोकरी आणि मुलांचे सुखदुःख या चक्रातून माझे जीवन चालत चालतच राहते. परंतु मला कोणी ही समजून घेत नाहीत. स्त्रियांच्या हालअपेष्टा, त्यांना होणारा त्रास विविध वाहिन्या चॅनेलवरील मालिकेतून दाखविल्या जातात. म्हणून त्यांच्या विषयी प्रत्येकाच्या मनात कणव निर्माण होते. माझी आंतरिक व्यथा मात्र कोणालाच समजून पडत नाही, कोणत्याही वाहिन्या चॅनेलवर दाखविली जात नाही. त्यामुळे माझी कथा नेहमीच दुर्लक्षित राहिली आहे. मला कोणी समजून घेतले नाही तरी चालेल निदान जीवनभर साथ देणाऱ्या अर्धांगिनीने म्हणजे माझ्या बायकोने तरी समजून घेतले तर माझे पुरुष जन्म धन्य झाले असे समजेन.
- नागोराव सा. येवतीकर
   मु. येवती ता. धर्माबाद
   9423625769

Tuesday, 13 December 2016

Brother


प्राणप्रिय दादास ...........

प्रिय दादास,
सप्रेम नमस्कार
सनविवि
खुप दिवसा नंतर असे पत्र लिहित आहे त्यामुळे मनात एक वेगळा उत्साह संचारलेला आहे. माझ्या अंधारमय जीवनात आपल्या प्रेमाचा प्रकाश पसरल्यामुळे आज मी एक यशस्वी व्यक्ती म्हणून जीवन जगात आहे. आपले जीवन माझ्यासमोर नेहमीच एक आदर्श आहे. बालपणापासून तर आतापर्यंत आपल्यासोबत माझा सहवास तसा कमीच आहे, तरीही आपला प्रभाव माझ्या वर सदोदित आहे आणि राहील. आपली प्रत्येक सवय मी जवळून पाहिलो आणि तीच सवय माझ्या अांगी नकळत येत गेले. शिक्षणासाठी तुम्ही
परगावी गेलात तेव्हा मी खूप लहान होतो जेमतेम दहा वर्षाचा. महिन्या दोन महिन्यानी आपली एक किंवा दोन दिवसासाठी भेट होत होती. सुट्ट्यात घरी आल्यानंतर पुस्तकाला कधी तुम्ही वेगळे केले नाही विरंगुळा म्हणून रेडीओ ऐकण्याची व क्रिकेट
खेळण्याचा छंद आजही मला आठवतो. आकाशवाणी औरंगाबाद-परभणी केंद्र आणि  नागपूर केंद्रावर मराठी गाण्याची आवड पाठवायची आणि दर रविवारी दादाचे नाव येणार म्हणून मी रेडीओ लावून बसायचो. आज मी सुद्धा अधूनमधून आकाशवाणी केंद्रावर आवड कळवतो. रेडीओवरील सुप्रभातम ऐकल्याशिवाय आपली सकाळ झाली नाही .बी.बी.सी. हिंदी ऐकाल्याशिवाय झोपायचे नाही. क्रिकेट समालोचन ऐकण्याची आपल्या सवयीमुळे मी लहानपणी मनिंदरसिंगच्या आवाजात क्रिकेट समालोचन केल्यावर तुम्ही माझी तोंड भरून स्तुती करत. या सवयीमुळे माझी वक्तृत्व कला सुधारण्यास मदत झाली. शब्दकोडे सोडविण्याचा छंद सुद्धा जगावेगळे कोडे सोडविण्यासाठी
शब्दार्थ पाठ हवेत या शिकवणीमुळे मी मराठीतले शब्दार्थ पाठ केले आणि माझी शब्दसंपत्ती वाढीस लागली. माझ्यात आणि तुमच्यात दहा-बारा वर्षाचे अंतर त्यामुळे कधी कोणत्या वस्तूसाठी भांडण झालेच नाही त्यामुळे आयुष्यभर भांडण म्हणजे काय मला कळलेच नाही. यामुळे शत्रू कमी आणि मित्र जास्त बनवत गेलो .एके दिवशी दै.लोकमत मध्ये आपला छोटेखानी लेख प्रकाशित झाला. तेव्हा माझ्यासह घरातील सर्वाना खूप आनंद झाला. माझ्या मनात उत्सुकता होती की असे पेपरमध्ये लेख आणि नाव कसे प्रकाशित होतात ?  याबाबत तुम्ही दिलेल्या मार्गदर्शनामुळेच आज मी विविध वृत्तपत्रातून लेखन करीत आहे. सगळ्याच्या मनात आपल्या विषयी आदर आहे, कारण आपण शांत, संयमी, व अभ्यासू आहात. अडीअडचणीच्या वेळी गावातील युवक आपल्याकडे येवून मार्गदर्शन घेत होते आणि तुम्ही त्यांना सोप्या शब्दात मार्गदर्शन ही देत आलात. त्यामुळे संपूर्ण गाव आपल्या प्रति अभिमानी आहेत. यासारख्या अनेक गुणाचा परिपोष आज माझ्यात आणि कुटुंबात नकळत दिसून येतो. प्रेम हे व्यक्त करता येत नाही परंतु नकळतपणे अनुभवास येतो. मी दहाव्या वर्गात असताना आपणास मराठवाडा ग्रामीण बँकेत अधिकारी म्हणून नोकरी लागली, तेंव्हा परिवारातील च नव्हे तर गावातील सर्वानाच खूप आनंद झाला. तुमच्या बुध्दिमत्तेनुसार तुम्हास ही नोकरी मिळाली. आपले आदर्श डोळ्यासमोर ठेवून अशीच नोकरी मिळवावी म्हणून मी सुध्दा अभ्यासाला लागलो. दहावीच्या परिक्षेपूर्वी मिळालेल्या आपल्या अनमोल मार्गदर्शनामुळे मी दहावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालो. घरातल्या सर्वांची ईच्छा होती की, बाबासारखे मी सुध्दा एक शिक्षक व्हावे. परंतु तुमच्या मनात मला पुढे शिकवायचे होते म्हणून मला तुमच्यासोबत ठेवून घेऊन माझी पुढील शिक्षणाची सोय केली. माझ्या जीवनातील हे दोन वर्ष अत्यंत महत्वाचे होते. कारण याच काळात आपला सहवास मला जास्त लाभला. या दोन वर्षात मला अनेक धडे शिकायला मिळाले, ज्याचा फायदा मला पुढील आयुष्य जगताना खूपच कामाला आले. दहावीला असतानाचा एक प्रसंग मला आजही जशास तसा आठवतो. शनिवारचा दिवस होता. आमच्या शाळेला दुपारी सुट्टी होती. म्हणून शेजाराच्या घरी टीव्ही वरील चित्रपट पाहण्यासाठी गेलो. सायंकाळी चार ते सात या वेळात तो चित्रपट प्रसारित होत असे. तुम्ही पाच वाजता खोली वर बसलात. बाबाची आई म्हणजे आजी मला जेवण तयार करून देण्यासाठी होती. ती घरी असल्यामुळे तुम्ही खोली वर बसू शकलात. वास्तविक पाहता सायंकाळी सहाच्या बसला तुम्हाला घरी जायचे होते पण बराच वेळ मी घरी न आल्यामुळे तुम्ही गावाकडे जायचे टाळून खोलीवर थांबलात. मला काही माहित नाही. चित्रपट संपल्यावर सात वाजता घरी परतलो. खोलीत तुम्हाला पाहून मी पुरता घाबरून गेलो. माझ्या तोंडून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. कसेबसे जेवण उरकल्यावर तुमची प्रश्नांची सरबत्ती सुरु होईल असे वाटले. पण तुम्ही एकही प्रश्न विचारले नाही कारण आजीने सर्व काही सांगितली होती. त्यावर एकच वाक्य म्हणालात, ' आत्ता टीव्ही बघण्यात वेळ न घालविता अभ्यास केल्यास भविष्यात खुप वेळ टीव्ही पाहता येईल. जर आत्ता अभ्यास न करता टीव्ही पाहत बसलास तर आयुष्यभर टीव्ही पाहता येणार नाही '. आपले हे साधे बोलणे मला खुप जिव्हारी लागले त्यानंतर मी कधीच शनिवारी चित्रपट पाहिला नाही. खुप मन लावून अभ्यास केलो आणि विशेष प्रावीण्य सह उत्तीर्ण झालो. आपला हाच उपदेश मी माझ्या स्वतः च्या मुलांना आणि शाळेतील मुलांना देतो.
मला आज ही आठवतो तो दिवस, ज्या दिवशी माझा डी.एड.ला क्रमांक लागला आणि मी प्रवेश घेऊन घरी परतलो. तेंव्हा तुम्ही म्हणालात, " तुझ्या मनासारखे क्षेत्र मिळाले." एवढीच आपली प्रेरणा मला खुप काही प्रोत्साहन देऊन गेले. खरोखरच मला शालेय जीवना पासून ज्याची आवड होती त्याच क्षेत्रात प्रवेश घेतल्याचा मला ही आनंद झाला. बारावी ची परीक्षा आणि त्या अनुषंगाने अभ्यास यामुळे लेखानाकडे जो दुर्लक्ष झाला होता तो परत सुरु करता आले. जर या क्षेत्रा कडे आलो नसतो तर कदाचित मी माझी अभिव्यक्ती शोधू शकलो नसतो. शिक्षकी व्यवसाय निवड केल्यामुळे मला बऱ्याच गोष्टी प्राप्त करता आल्या. आवड असल्यामुळे आपोआप सवड निर्माण होते असे मटल्या जाते याची प्रचिती मला आली. मन लावून अभ्यास केल्यामुळे चांगल्या गुणाने मी डी. एड. उत्तीर्ण झालो. निवड मंडळाची परीक्षा कठीण असते, म्हणून माझ्या बऱ्याच मित्रांनी क्लासेसला जाऊ लागले पण मी मात्र घरीच बसून अभ्यास केलो कारण स्पर्धा परीक्षेची सर्वच प्रकारची पुस्तके घरात उपलब्ध होती. वर्तमानपत्र वाचण्याची सवय तर होतीच त्यामुळे रोज किमान पाच सहा वर्तमानपत्र वाचन करणे ठरलेले असायचे. घराजवळ वाचनालय असल्यामुळे तिथे सुद्धा जाण्याची सवय आपल्यामुळे लागली. डॉक्टर किंवा इंजिनियर होऊन मी खुप पैसा कमविला असता कदाचित पण ह्या सर्व बाबी गमविलो असतो असे वाटते. तुमच्यामुळे माझे जीवन यशस्वी झाले असे मी मानतो. माझ्या प्रत्येक हालचालमध्ये आपली सावली आढळून येते. मी स्वतः ला खरोखरच भाग्यवान समजतो की मला तुमच्यासारखा मोठा भाऊ मिळाला.
नोकरी मिळाल्यानंतर सुध्दा तुमचे पुढील शिक्षण चालूच होते. टीव्हीवर फक्त बातम्या तेवढेच पहायचे. तुम्ही थिएटरला जाऊन सिनेमा पहिलात, असे कधीच दिसले नाही. आई आणि ताईच्या आग्रहाखातर सर्व परिवारासह फक्त एकदाच चित्रपट पहिलेले आजही मला आठवते. अर्थात आपल्या जीवनात काल्पनिक गोष्टीला कधीही थारा नव्हता. आपल्या मित्रमंडळी व स्वकीयासोबत तुम्ही प्रेमाने वागायचे, संकटात असलेल्या मित्रांना हातभार द्यायचे संस्कार मला आपल्याकडूनच मिळाले. डॉ. रमेश भूमे आणि डॉ. हृदय कुमार कौरवार सारखे हुशार मित्र भेटल्यामुळे तुम्हाला  अभ्यासाची दिशा मिळाली आणि गतीही मिळाली. रात्रंदिवस केलेल्या अभ्यासचे फळ म्हणजे तुमची ग्रामीण बँकेत ऑफिसर म्हणून निवड झाली. घरात सर्वाना आनंद झाला. आज महाराष्ट्र ग्रामीण बँकेत ते औरंगाबाद येथील मुख्य कार्यालयात माहिती तंत्रज्ञान विभागात वरिष्ठ व्यवस्थापक अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. अधिकारी पदावर असून देखील तुम्ही खूपच साधे राहता अशी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही शिकवण आपल्याकडून मिळाली. बाबांचे तुमच्यावर खुप प्रेम तसे त्यांचे सर्वा वर सारखेच प्रेम आहे मात्र विशेष प्रेम असल्यामुळे किंवा काळजीपायी आजही ते वडिलांना फोन केल्याशिवाय झोपत नाहीत. ज्यादिवशी त्यांचे दोघांचे फोनवर बोलणे होत नाही त्यादिवशी दोघांना सुध्दा रुखरुख वाटते. मुलगा म्हणजे कसा असावा ? याची प्रचिती तुमच्या वागणुकीतुन स्पष्टपणे झळकते. स्वतः खुप हुशार होते मात्र त्याचा त्यांना कधीच गर्व नव्हता. त्यामुळेच त्यांच्या अंगी विद्या टिकली विद्या विनयेन शोभते या उक्तीप्रमाणे. शालेय जीवनापासून गणित विषयाची खुप आवड होती म्हणून कोणतेही गणित चुटकी सरशी सोडविण्यात त्यांचा हात कुणीच धरत नसे. पुस्तक वाचत राहणे ही एक चांगली सवय होती. नेहमी काही ना काही वाचन करण्याची सवय आज ही कायम आहे. पुस्तकाचे वाचन करण्याचा छंद आपल्याकडून मला शिकायला मिळाले. आज ही तुम्ही रिकामा वेळ कोणते ना कोणते पुस्तक वाचन करण्यात घालवित असता. मोत्यांसारखे अक्षर काढण्याची ईश्वरदत्त देणगी वडिलांकडून तुम्हाला मिळाली, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण बाबाचे अक्षर सुंदर आणि वळणदार होते.  त्यामुळेच तुमचेही अक्षर मोत्यांसारखे सुंदर झाले. तुमचे अक्षर पाहून मला सुद्धा वाटत असे की माझे ही अक्षर असेच सुंदर व्हावे. नियमित लेखनाने अक्षर सुंदर होते, याचा धडा मला तुमच्यापासून मिळाला आणि हस्ताक्षर सुधारले ते तुमच्यामुळे. माझे अक्षर सुंदर झाले, तरीही तुमच्यासारखे नक्कीच नाही.  गावात तुमच्या एवढा हुशार आणि तल्लख बुद्धिमत्तेचा आजपर्यंत जन्माला नाही आणि पुढेल जन्मेल की नाही माहित नाही असे तुमच्या बाबतीत आज ही बोलले जाते. शांत स्वभाव, इतराना मदत करण्याची वृत्ती आणि मितभाषी व्यक्तिमत्व, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असल्यामुळे मलाच नाही तर सर्व गावाला आपला अभिमान आहे.
तुम्ही कधी मला चापट किंवा मार दिलेले तरी मला आठवत नाही. चूक केलेल्या व्यक्तिवर रागावल्याने त्यात सुधारणा होत नाही मात्र प्रेमाने समजावून सांगितल्यावर त्यात नक्कीच फरक पडतो ही आपली शिकवण मला संपूर्ण जीवनभर कामाला पडत आहे. आज आपले आयुष्य सेटल आहे, आपणास काही ही करायचे गरज नाही तरी वरील सर्व सवयी आजही जशास तसे आहे. आज ही टीव्ही वर बातम्या फक्त पाहतात, चित्रपट कमी पाहतात असे म्हणता येणार नाही कारण वर्षातून एक चित्रपट पाहिले तरी खूप झाले ते ही मित्रांच्या आग्रहाखातर. माझे दादा असल्या मुळे मला त्यांचा अभिमान आहेच शिवाय माझ्या कुटुंबासह संपूर्ण गावालाही त्यांचा अभिमान वाटतो. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो.

तुमचाच छोटा भाऊ

- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

Sunday, 11 December 2016

School

*शाळेत टाचण काढण्यापासून सूट हवी काय ?*

कोणतेही कार्यक्रम म्हटले की नियोजन आलेच, नियोजनाशिवाय कोणतेही कार्यक्रम यशस्वी होत नाही. असेच काही शाळेच्या बाबतीत घडत असते. शाळेतील वर्षभरामधील दिवस व्यवस्थितरित्या पूर्ण करण्यासाठी वार्षिक नियोजन करावे लागते. त्याच धर्तीवर मासिक नियोजन करता येऊ शकते. मासिक नियोजनामधून मग दैनिक अद्यापनाचे नियोजन करणे शक्य होते, त्यास दैनिक टाचण असे म्हणतात. शाळेत येणारा प्रत्येक अधिकारी किंवा पदाधिकारी सर्वप्रथम शिक्षकांचे टाचण पाहत असतो. टाचण म्हणजे दूसरे तिसरे काही नसून एकप्रकारे रोज अद्यापन करण्याचे नियोजन आहे. मुलांना आज काय शिकवायचे आहे याचा थोडक्यात शिक्षकाना ओळख असावी म्हणून टाचण काढले जाते.  काही जणाची मागणी आहे की शासनाने शिक्षकांची टाचण काढण्यापासून मुक्ती द्यावी अशी मागणी केल्याचे वृत्त वाचण्यात आले. खरोखरच टाचण काढणे जर बंद झाले तर शिक्षक मुलांना योग्य प्रकारे शिकवू शकेल काय ? आज आपण मुलांना काय शिकवलो ? याबाबत शिक्षक बांधवाकडे लेखी पुरावा काय राहील ? बरे टाचण काढण्यासाठी वेळ तरी किती लागतो ? याचा जर विचार केला तर साधारणपणे 10 मिनीटात आपले टाचण पूर्ण होते. आपल्याकडे 10 मिनीट वेळ नसेल काय ? तो वेळ ही वाचवावे आणि विद्यार्थ्याना समर्पित करावे ही भावना खुपच वरच्या लेवलची आहे. एवढा विचार करणारे शिक्षक टाचण काढण्यापासून पळ काढत नाही. तसेच अधिकारी आणि पदाधिकारी मंडळीनी एखाद्या दिवशी टाचण काढली नाही म्हणून लगेच शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारु नये. शिक्षा केल्याने सुधारणा होत नाहीत तर चूका सुधारण्याची संधी दिल्यास अमुलाग्र बदल होऊ शकतो.
पण शिक्षकांनी टाचण काढण्यापासून सवलत मागणे म्हणजे पळवाट आहे असे वाटते. कारण यात फक्त टाचण एवढीच बाब समाविष्ट नसून घटक नियोजन, मासिक नियोजन, आणि वार्षिक नियोजन या बाबी देखील समाविष्ट होतात. म्हणजे एका अर्थाने  ह्यापासून सुध्दा सूट द्यावी अशी मागणी असू शकते. मग शिक्षक मंडळीनी काय करावे. निवडणुका आणि जनगणना तसेच इतर अशैक्षणिक कामे करीत रहावे काय ? म्हणून शिक्षक मंडळीचे नेतृत्व करणाऱ्या मंडळीनी टाचण काढण्यामधून सूट मागण्यापेक्षा इतर समस्याकडे लक्ष देऊन त्यातून शिक्षकांची सुटका करावी. जसे सध्या चालू असलेली ऑनलाइन कामे बंद करण्याची मागणी करावी, ते सोइस्कर होईल. शालार्थच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार बंद करण्याची मागणी करावी. आज नावाला पेपरलेस आणि ऑनलाइन पगार चालू आहे मात्र वेतन वेळेवर होत नाही तसेच पूर्वी पेक्षा जास्त कागद वेतनासाठी सादर करावे लागत आहे. *याहीपेक्षा जास्त कहर म्हणजे पुरवणी वेतन काढण्यासाठी तालुका आणि जिल्हा कार्यालय ऑनलाइन विभाग कर्मचारी शिक्षक मंडळीकडून काही ही कारण सांगून पैसे उकळतात* हा प्रकार म्हणजे चोर सोडून संन्यासाला फाशी दिल्यासारखे आहे. हे कुठे तरी थांबले पाहिजे यावर कोणी पुढे येऊन बोलत नाही. आज ऑनलाइन विभागवर काम करणारे सर्वच सरकारी आणि कंत्राटी कर्मचारी मजेत आहेत तर बाकी सर्व सजा भोगत असल्यासारखे राहत आहेत. शालेय पोषण आहाराची रोजची उपस्थितीची माहिती ऑनलाइन करताना जो त्रास होत आहे त्याबद्दल कुणी बोलताना दिसत नाही. महिना भरात शिल्लक राहिलेली उपस्थिती केंद्रप्रमुख किंवा गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगिनवरुन ऑनलाइन भरण्यासाठी पैश्याची मागणी केली जात असल्याची चर्चा मुख्याध्यापक मंडळी खाजगी स्वरुपात करतात. यावर काही उपाय केल्या जात नाही. एखाद्या केंद्रातील किंवा गटातील रोजची विद्यार्थी उपस्थिती अपूर्ण असल्यास त्यास केंद्रप्रमुख किंवा गटशिक्षणाधिकारी यांना जबाबदार धरून प्रक्रिया पुढे नेल्यास या स्तरावर होणारी पैशाची मागणी थांबेल. अन्यथा याचा त्रास अजून वाढतच राहणार, यात शंकाच नाही. राज्यातल्या सर्वच्या सर्व शाळा डिजिटल करण्यात यावे आणि तसे त्या अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेयर शासनानी प्रत्येक शाळेला इनस्टॉल करून देण्याची मागणी करावी. अजून शाळा स्तरावर शिक्षकाना काय समस्या आहेत ? हे एकदा आवाहन करून शिक्षक मंडळीना विचारावे. म्हणजे नक्की कळून येईल काय टाचण काढणे ही शिक्षकांसाठी फार मोठी समस्या नाही, त्याहीपेक्षा भयंकर मोठमोठ्या समस्या आहेत. त्याची सोडवणूक करता आली तर राज्यातील तमाम शिक्षक बांधव आपले उपकार विसरु शकणार नाहीत.

- नागोराव सा. येवतीकर

मतदान जनजागृती ( Voting Awarness )

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जनजागृती चला मतदान करू लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.  चला मतदान करू .......! ...