सगरोळी येथे करण्यात येणाऱ्या भाषणाचा संपादित अंश
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि वाचन संस्कृती
शाळेत शिकत असताना गुरुजी सर्व मुलांना विचारतात की मोठे होऊन तुम्हाला काय व्हायचे आहे ? मुले सुद्धा आपल्या अपेक्षेप्रमाणे ठराविक उत्तर देतात. काही जण डॉक्टर होऊ म्हणतात तर काही इंजिनियर होऊ म्हणतात. ज्याच्या त्याच्या बौध्दिक कुवती नुसार मी हे होईन आणि मी ते होईन असे आपले स्वप्न सांगतात. पण कुणी मी माणूस होईन असे म्हणणार नाही. कारण माणूस होण्यासाठी जी बुध्दिमत्ता लागते ती डॉक्टर आणि इंजिनियरच्या पलीकडची आहे. आज समाजात जेवढे ही डॉक्टर आणि इंजिनियर किंवा मोठ्या पदावरील व्यक्ती आहेत त्यांच्याजवळ कुठेच माणुसकी नावाची वस्तु दिसून येत नाही. कारण त्यांनी कधी माणूस होण्याचा साधा प्रयत्न देखील केला नाही. म्हणून मुलांनी प्रथम माणूस व्ह्ययला शिकणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्यासाठी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र नुसते वाचन करून चालणार नाही तर त्यांच्या त्या चरित्रावरुन आपल्या ही वागण्यात बोलण्यात बदल झाला पाहिजे. त्यांनी आपल्या जीवनात किती कष्ट उपसले, किती त्रास सहन करावा लागला. असे म्हणतात की टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही. असाच त्रास आयुष्यभर सोसले, सहन केले म्हणूनच आज त्यांचे नाव सर्वांच्या मुखात आहे. " शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा " असा संदेश देणारे महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार आणि भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या कार्याची थोडक्यात माहिती थोडक्यात जाणुन घेत असताना त्या कार्यातून आपणास कोणती प्रेरणा मिळते ? आपल्या जीवनात त्याचा अंगीकार कसा करावा याचा विचार आपण त्यानिमित्ताने करावयाचे आहे. रामजी आणि भिमाईच्या पोटी 14 एप्रिल 1891 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेश मधील महू येथे झाला. त्यांचे मूळ नाव त्यांच्या आईच्या नावा वरुन भीमराव असॆ ठेवण्यात आले होते. परंतु भारतातच नाही तर परदेशात सुध्दा ते बाबासाहेब या नावानेच परिचित होते. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई होते. भीमराव लहान असताना म्हणजे वयाचे पाच वर्षे असताना त्यांची आई देवाघरी गेली. तेंव्हा त्यांच्या आत्याने त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यास मदत केली. त्यांचे ऋण आयुष्यभर त्यांच्या सोबत होते. त्यांचे वडील रामजी हे उद्योगी, महत्वाकांक्षी आणि शिस्तीने वागणारे होते. लष्कराच्या शाळेत शिकून लष्कराच्याच शाळेत नोकरी करीत होते. ते सुभेदार मेजर या पदापर्यंत पोहोचले होते. शिक्षणाविषयी त्यांचे वडील जागरूक होते, त्यामुळे त्यांनी भीमरावाच्या शिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष दिले. जागरूक पालक त्यातल्या त्यात वडील असतील तर ते आपल्या पाल्याकडे विशेष लक्ष देतील. तेच याठिकाणी दिसून आले. कुटुंबामध्ये आई किंवा वडील यापैकी कोणी तरी एक जण शिक्षणाविषयी जागरूक आस्था ठेवणारा असला पाहिजे. कोणत्याही समाजाची उन्नती, त्या समाजाच्या शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबुन आहे. समाजामध्ये राहणारे कुटुंब जर शिक्षणात रुची ठेवणारा असेल तरच प्रगती होते याची जाणीव त्यांना प्रथमपासून होती. म्हणून किती ही त्रास सहन करावा पण घरातील कोणी अशिक्षित राहू नये याची काळजी कुटुंबप्रमुखाने घेणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच शिक्षणाच्या बाबतीत डॉ. आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे त्याचे जो कुणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षणाने माणसाचे डोळे उघडतात, कुणी फसवू शकत नाही. शिक्षण हे एक दुधारी अस्त्र आहे ज्याचा वापर वेळप्रसंगी करता येतो. याची जाणीव खुद्द रामजी यांना तर होतीच शिवाय बाबासाहेबांना ही त्याचे महत्त्व कळायाला वेळ लागला नाही. बाबासाहेब लहानपणापासूनच जिद्दी स्वभावाचे होते. एखादी गोष्ट पूर्ण करायची म्हटले की, ते पूर्ण केल्याशिवाय त्यांना चैन पडायचे नाही. आपण फुकट वेळ घालवायचा नाही, झटून अभ्यास करायचा ही वडीलांची लहानपणीची शिकवण त्यांनी संपूर्ण जीवनभर अवलंबिले. घरात वडील मंडळी कशी वागतात ? बोलतात ? आणि चालतात या सर्व बाबीचा परिणाम घरातील लहान सहान मुलांवर होत असतो. परंतु बहुतांश जण या बाबीचा गांभीर्याने विचार करताना दिसत नाहीत. घरातील वातावरण तणावाचे, वादाचे किंवा संस्कारी नसेल तर मुलांवर कोणते संस्कार होतील ? मुले खरेच चांगले निपजतिल काय ? याचा कुठे तरी विचार करणे आवश्यक आहे. आजुबाजुला घडणाऱ्या बारीकसारीक गोष्टीकडे बाबासाहेबांचे बारकाईने लक्ष असॆ. या सर्व घटना आणि घडामोडी मधून ते घडत गेले. आपले मूल सुद्धा असेच घडत असते. त्यामुळे त्यांना योग्य वातावरण मिळवून देणे हे प्रत्येक पालकांची जबाबदारी नव्हे काय ? बाबासाहेबांना लहानपणापासून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. शाळेत शिकत असताना त्यांना स्वतःच्या गोणपाटावर बसावे लागायचे, तसेच शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या हौदेला हात लावण्याची परवानगी नव्हती. शाळेत चपरासी उपस्थित असेल तरच पिण्यासाठी पाणी मिळत असॆ अन्यथा तसेच घरी जावे लागत असॆ. ओंजळीने पाणी प्यावे लागत असॆ. सर्व मित्रांसोबत एकत्र बसण्याची परवानगी नव्हती. किती ही तहान लागली तरी माठात हात घालून पाणी पिण्याची परवानगी नव्हती. याचा त्या लहान मनावर खोल परिणाम झाला असेल. त्याच चिंतनातून अनेक बाबी त्यांनी जगासमोर मांडले आहे. लहानपणी त्यांच्या जीवनात आलेल्या या कटू अनुभव आणि दाहकता त्यांच्या मनाला चटके देऊन गेली. यातूनच बाबासाहेब घडत गेले. आज ही जेथे वेदना आहे तेथे नक्की सुख आहे. वेदनेनंतर येणाऱ्या सुखाचे महत्त्व आईलाच समजून येऊ शकते. तसे आपल्या जीवनात देखील वेदना असायलाच पाहिजे. परंतु आज प्रत्येकजण वेदनाविरहित जीवन जगु पाहत आहे. जरासा सुध्दा त्रास न होता मला सर्व काही मिळायला हवे ही संकल्पना आज कुटुंबात फोफावत चालली आहे. असे कटु प्रसंग आपणास खुप काही शिकवून जातात. म्हणून वेदना पाहून पळून जाण्यात काही अर्थ नाही हे त्यांच्या आयुष्यावरुन लक्षात येते. याच अशा कटु प्रसंगांतून शिकवण घेऊन त्यांनी सन 1927 मध्ये इतिहासात खूपच प्रसिध्द असलेला महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह केला, येथूनच त्यांच्या लढ्यास प्रारंभ झाला असॆ म्हणण्यास काही हरकत नसावी. जर त्यांच्या जीवनात असे प्रसंग आले नसते तर काय झाले असते ? याचा विचार कधी केलो आहोत काय ? अर्थात त्याचे उत्तर नाही असे येते.
माणसाच्या स्पर्शाने माणूस बाटतो आणि बाटलेला माणूस पशुच्या मुत्राने शुध्द होतो अशी विचारसरणी असलेला धर्म असु शकतो का ? असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला. समाजातील काही लोकांना अस्पृश्य किंवा दलित म्हणून दूर केल्या जात असत. त्या समाजातील लोकांना मंदिरात जाण्यास मज्जाव केला जात असे या सर्व बाबीची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी नाशिकचा काळाराम मंदिरात प्रवेश मिळविण्यासाठी लढा दिला आणि त्यात ते यशस्वी सुध्दा झाले. ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला, त्या लोकांचा उध्दार करणे हे आपले कर्तव्य आहे ही जाणिव ज्यांना आहे ते धन्य होत असॆ ते मानीत. खरोखरच त्यांच्या या विचारांची आज खरी गरज आहे. स्वतःचा समाज आणि जमात यांच्याविषयी ज्यांच्या मनात तळमळ राहत नाही, त्यास जगण्याचा खरा अर्थ ही कळत नाही. बाबासाहेबांना स्वतःच्या समाजाविषयी व जातीविषयी खूप तळमळ होती. लोकांची दयनीय अवस्था पाहून त्यांना अस्वस्थ वाटायचे. लहानपणी बाबासाहेबांना ज्या ज्या गोष्टीचा त्रास झाला, तो तो त्रास समाजातील इतर बांधवांना होऊ नये यांसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. शेवटी सनातन्यांच्या या अवमानी वृत्तीला कंटाळून बाबासाहेबांनी एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे धर्मांतराचा. कदाचित त्यांच्या मनात तो विचार आला असता की नाही माहित नाही परंतु काही लोकांच्या हीन वागणुकीमुळे बुद्धाला शरण गेल्यावाचून केवळ अस्पृशच नव्हे तर साऱ्या भारताला तरणोपाय नाही असा त्यांचा ठाम निश्चय झाला होता. बाबासाहेबांना बुद्धाचा जीवनमार्ग लोककल्याण , सदाचार , समता , स्वातंत्र्य व बंधुतेचा वाटला, बौद्ध धर्माचे त्यांना लहानपणापासून खूप आकर्षण होते. ह्याच धर्माच्या आधाराने आपल्या लोकांचा विकास साधता येतो म्हणून विजयादशमीच्या पर्वावर दिनांक 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षा भूमीवर हजारों अनुयाया सोबत बौद्ध धर्माचा जाहिररित्या स्विकार केला. मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही असे सांगताना “साऱ्या भारताला मी बौद्धमय करीन ” अशी गगनभेदी भीमगर्जना केली.
देशांतील अतिगरीब आणि अति मागास असलेल्या लोकांना शिक्षणाचे महत्व त्यांनी पटवून दिले. शिक्षणानेच समाज परिवर्तन होऊ शकते असे त्यांचे मत होते. शिक्षण प्राप्त झाल्याने मनुष्य विचाराने समृद्ध होतो. माणसाला काय चांगले आणि काय वाईट यातील फरक समजायला लागतो. प्रज्ञा , शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. म्हणूनच लोकांनी शिक्षणाकडे जास्त लक्ष दिले आणि स्वतःसोबत आपल्या परिवाराचा पर्यायाने समाजाचा विकास साधला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्व ओळखले म्हणून त्यांनी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असॆ म्हटले त्याच धर्तीवर डॉ. बाबासाहेब यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला. यांसाठी त्यांनी १९४६ मध्ये पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून मुंबईला सिद्धार्थ कॉलेज आणि औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरु केले. समाजातील तळागाळातील मुलांच्या शिक्षणाची सोय त्यांनी केली. राष्ट्रहिताचे व समाजहिताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय, असे त्यांचे म्हणणे होते. प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्र असून त्याला स्वतःला एक अस्मिता आहे. याची जाणिव प्रत्येकाना होणे गरजेचे म्हणूनच ते एका जातींतल्या लोकांना नाही तर समस्त लोकाना उद्देशून म्हटले आहे की, गुलामाला गुलाम असल्याची जाणिव करून द्या तो नक्की बंड करून उठेल. याच अर्थातून माणसाला माणूस म्हणून ओळख देण्याचा प्रयत्न सुध्दा त्यांनी केला. म्हणूनच आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर महान आहेत. गौतम बुध्दाच्या शिकवणीचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे असॆ गौतम बुध्दानी जे म्हटले त्याचा बाबासाहेबानी आयुष्यभर पालन केले. त्यांचे पुस्तक वाचनावर विशेष प्रेम होते, त्यांना वाचण्याची प्रचंड आवड होती. त्यामुळे सदानकदा ते वाचन करताना आढळून येत असत. एकदा वाचन करीत बसले की सर्व काही विसरून जात असत. दिवसातील 18 - 18 तास अभ्यास करायचे. या वाचनामुळेच त्यांच्या ज्ञानात भरमसाठ वाढ होत गेली. वाचन किती महत्वाचे आहे हे त्यांच्या जीवन चरित्रावरुन लक्षात येते. आपल्याकडे एक म्हण आहे वाचाल तर वाचाल. हेच त्यांनी सिध्द करून दाखविले आहे. वाचनाने माणूस समृद्ध होतो, विचार कक्षा रुंदावतात, माणूस प्रगल्भ बनतो म्हणून वाचनाकडे विशेष लक्ष असणे अत्यंत आवश्यक आहे हे त्यांच्या जीवन अभ्यासावरुन कळते. त्यांचे घर राजगृह अनेक पुस्तकाने भरून गेले होते. त्यांच्या मृत्यूच्या वेळी 50 हजार पुस्तके होती. त्यांनी अनेक पुस्तकांचा अभ्यास केला आणि विविध विषयांवर 53 पुस्तके लिहली. त्यांची कष्ट करण्याची तयारी आणि जिद्द या दोन गोष्टीमुळे स्वतःचा, समाजाचा, आणि भारताचा कायापालट झाला असॆ म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण त्यांनी दोन वर्ष अकरा महीने सतरा दिवस अहोरात्र विविध देशाच्या कायद्याचा अभ्यास करून भारताची घटना संविधान तयार केली. त्याच घटनेवर आज भारत देश सुरक्षित असून प्रगतशील राष्ट्रांच्या यादीमध्ये भारत अगदी वरच्या स्थानावर आहे. त्यांच्यामुळेच आज देशांतील प्रत्येक व्यक्तीला हक्काने जीवन जगता येतो. आपल्यावर अन्याय होत आहे असॆ वाटल्यास न्यायालयाद्वारे प्रत्येकाला न्याय मिळविता येतो. समता, बंधूता आणि समानता या राष्ट्रीय मूल्यांची जोपासना या घटनेद्वारे केल्या जाते. म्हणूनच त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार असॆ म्हटले जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नुसते पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घालून आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली . त्यांनी मनुष्यमात्रांच्या जीवनातील दुःख, दारिद्र्य आणि क्लेश दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले संपूर्ण ज्ञान आणि माहितीच्या बळावर रंजल्या-गांजल्या जनतेच्या, शेतकरी, मजूर वर्गाच्या आणि पददलितांच्या तसेच स्त्री वर्गाच्या उद्धारार्थ आपले प्राण पणाला लावून योग्य रस्ता दाखविले आणि मानवतेची दिव्यज्योत निर्माण केले. त्यांनी फक्त काही लोकांचाच उध्दार केला नसून समस्त भारतीय लोकांना आपली स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी वाव दिलेली आहे. ती व्यक्ती केवळ वंदनीय नव्हे तर ती व्यक्ती सर्वाना नेहमीच प्रेरक ठरते. या महामानवाचे कार्य म्हणजे समाजासाठी व देशासाठी एक दिशादर्शक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विश्वाला मिळालेली महान देणगी होय. . ज्या मतदानाच्या अधिकारासाठी युरोपमधल्या स्त्रियांना संघर्ष करावा लागला तो अधिकार भारतीय स्त्रियांना न मागताच बाबासाहेबांनी दिला. कामगार किंवा नोकरी करणाऱ्या स्त्रीला प्रसूती रजा मिळवून देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील पहिले व्यक्ती आहेत, भारतानंतरच अनेक वर्षांनी इतर देशातील महिलांना प्रसूती रजा मंजूर झाल्या आहेत. संपूर्ण आशिया खंडात सर्वप्रथम ज्यांनी अर्थशास्त्रात डबल डाँक्टरेट मिळवल आहे. ज्यांच्या Problem of The Rupy या ग्रंथातुन "भारतीय रिजर्व बँक" ची स्थापना करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भारतासह संपूर्ण जगात साजरा केला जातो. जगातील ६५ पेक्षा अधिक देश दरवर्षी आंबेडकर जयंती साजरी करतात.महाराष्ट्र सरकारने १४ एप्रिल २०१७ पासून आंबेडकर जयंती ही ज्ञान दिवस म्हणून राज्यभरात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. अश्या महान अर्थतज्ज्ञाची आज जयंती त्यानिमित्त त्यांच्या अंगी असलेले एखादे गुण तरी आपल्या अंगी बाणण्याचा प्रयत्न केल्यास खऱ्या अर्थाने त्यांची जयंती आपल्या लक्षात राहील. महामानवाच्या पावन स्मृतिस कोटी कोटी विनम्र अभिवादन !
- नागोराव सा. येवतीकर
( लेखक नांदेड जिल्हा परिषदेत उपक्रमशील प्राथमिक शिक्षक आहेत. )
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769