डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त प्रासंगिक लेख
" शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा "
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेश मधील महू येथे झाला. त्यांचे मूळ नाव भीमराव असॆ होते. परंतु भारतातच नाही तर परदेशात ते बाबासाहेब या नावानेच सुप्रसिध्द आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई होते. भीमराव लहान असताना त्यांची आई देवाघरी गेली. तेंव्हा त्यांच्या आत्यानी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे वडील उद्योगी, महत्वाकांक्षी आणि शिस्तीने वागणारे होते. लष्कराच्या शाळेत शिकून लष्कराच्याच शाळेत नोकरी करीत होते. ते सुभेदार मेजर या पदापर्यंत पोहोचले होते. शिक्षणाविषयी त्यांचे वडील जागरूक होते, त्यामुळे त्यांनी भीमरावाच्या शिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष दिले. बाबासाहेब लहानपणापासूनच जिद्दी स्वभावाचे होते. एखादी गोष्ट पूर्ण करायची म्हटले की, ते पूर्ण केल्याशिवाय त्यांना चैन पडायचे नाही. आपण फुकट वेळ घालवायचा नाही, झटून अभ्यास करायचा ही वडीलांची लहानपणीची शिकवण त्यांनी संपूर्ण जीवनभर अवलंबिले. आजुबाजुला घडणाऱ्या बारीकसारीक गोष्टीकडे बाबासाहेबांचे बारकाईने लक्ष असॆ. बाबासाहेबांना लहानपणापासून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. शाळेत शिकत असताना त्यांना स्वतःच्या गोणपाटावर बसावे लागायचे, तसेच शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या हौदेला हात लावण्याची परवानगी नव्हती. शाळेत चपरासी उपस्थित असेल तरच पिण्यासाठी पाणी मिळत असॆ अन्यथा तसेच घरी जावे लागत असॆ. ओंजळीने पाणी प्यावे लागत असॆ. सर्व मित्रांसोबत एकत्र बसण्याची परवानगी नव्हती लहानपणी त्यांच्या जीवनात आलेल्या या कटू अनुभव आणि दाहकता त्यांच्या मनाला चटके देऊन गेली. यातूनच बाबासाहेब घडत गेले. याच प्रसंगांतून शिकवण घेऊन त्यांनी सन 1927 मध्ये इतिहासात खूपच प्रसिध्द असलेला महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह केला, येथूनच त्यांच्या लढ्यास प्रारंभ झाला असॆ म्हणण्यास काही हरकत नसावी. त्यानंतर त्यांनी नाशिकचा काळाराम मंदिरात प्रवेश मिळविण्यासाठी लढा दिला आणि त्यात ते यशस्वी सुध्दा झाले. ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला, त्या लोकांचा उध्दार करणे हे आपले कर्तव्य आहे ही जाणिव ज्यांना आहे ते धन्य होत असॆ ते मानीत. त्यांच्या या विचारांची आज खरी गरज आहे. स्वतःचा समाज आणि जमात यांच्याविषयी ज्यांच्या मनात तळमळ राहत नाही, त्यास जगण्याचा खरा अर्थ ही कळत नाही. बाबासाहेबांना स्वतःच्या समाजाविषयी व जातीविषयी खूप तळमळ होती. लोकांची दयनीय अवस्था पाहून त्यांना अस्वस्थ वाटायचे. लहानपणी बाबासाहेबांना ज्या ज्या गोष्टीचा त्रास झाला, तो तो त्रास समाजातील इतर बांधवांना होऊ नये यांसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. शेवटी सनातन्यांच्या अवमानी वृत्तीला कंटाळून बाबासाहेबांनी एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे धर्मांतराचा. बुद्धाला शरण गेल्यावाचून केवळ अस्पृशच नव्हे तर साऱ्या भारताला तरणोपाय नाही असा त्यांचा ठाम निश्चय झाला होता. बाबासाहेबांना बुद्धाचा जीवनमार्ग लोककल्याण , सदाचार , समता , स्वातंत्र्य व बंधुतेचा वाटला, बौद्ध धर्माचे त्यांना खूप आकर्षण होते. ह्याच धर्माच्या आधाराने आपल्या लोकांचा विकास साधता येतो म्हणून विजयादशमीच्या पर्वावर दिनांक 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षा भूमीवर हजारों अनुयाया सोबत बौद्ध धर्माचा जाहिररित्या स्विकार केला आणि “साऱ्या भारताला मी बौद्धमय करीन ” अशी गगनभेदी भीमगर्जना केली.
देशांतील अतिगरीब आणि अतिमागास असलेल्या लोकांना शिक्षणाचे महत्व त्यांनी पटवून दिले. शिक्षणानेच समाज परिवर्तन होऊ शकते असे त्यांचे मत होते. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, त्यांचे जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असॆ त्यांनी लोकाना सांगितले होते. शिक्षण प्राप्त झाल्याने मनुष्य विचाराने समृद्ध होतो. माणसाला काय चांगले आणि काय वाईट यातील फरक समजायला लागतो. प्रज्ञा , शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. म्हणूनच लोकांनी शिक्षणाकडे जास्त लक्ष दिले आणि स्वतः सोबत आपल्या परिवाराचा पर्यायाने समाजाचा विकास साधला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्व ओळखले म्हणून त्यांनी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असॆ म्हटले त्याच धर्तीवर डॉ. बाबासाहेब यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला. यांसाठी त्यांनी १९४६ मध्ये पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून मुंबईला सिद्धार्थ कॉलेज आणि औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरु केले . राष्ट्रहिताचे व समाजहिताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय, असे त्यांचे म्हणणे होते.
प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्र असून त्याला स्वतःला एक अस्मिता आहे. याची जाणिव प्रत्येकाना होणे गरजेचे म्हणूनच ते एका जातींतल्या लोकांना नाही तर समस्त लोकाना उद्देशून म्हटले आहे की, गुलामाला गुलाम असल्याची जाणिव करून द्या तो नक्की बंड करून उठेल. याच अर्थातून माणसाला माणूस म्हणून ओळख देण्याचा प्रयत्न सुध्दा त्यांनी केला. म्हणूनच आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर देवासमान आहेत. गौतम बुध्दाच्या शिकवणीचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे असॆ गौतम बुध्दानी जे म्हटले त्याचा बाबासाहेबानी आयुष्यभर पालन केले. त्यांचे पुस्तक वाचनावर विशेष प्रेम होते, त्यांना वाचण्याची प्रचंड आवड होती. त्यामुळे सदानकदा ते वाचन करताना आढळून येत असत. एकदा वाचन करीत बसले की सर्व काही विसरून जात असत. सलग 18 - 18 तास अभ्यास करायचे. या वाचनामुळेच त्यांच्या ज्ञानात भरमसाठ वाढ होत गेली. त्यांचे राजगृह घर पुस्तकाने भरून गेले होते. त्यांनी अनेक पुस्तकांचा अभ्यास केले आणि विविध विषयांवर 53 पुस्तके लिहली. त्यांची कष्ट करण्याची तयारी आणि जिद्द या दोन गोष्टीमुळे भारताचा कायापालट झाला असॆ म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण त्यांनी दोन वर्ष अकरा महीने सतरा दिवस अहोरात्र विविध देशाच्या कायद्याचा अभ्यास करून भारताची घटना संविधान तयार केली. त्याच घटनेवर आज भारत देश सुरक्षित असून प्रगतशील राष्ट्रांच्या यादीमध्ये भारत अगदी वरच्या स्थानावर आहे. त्यांच्यामुळेच आज देशांतील प्रत्येक व्यक्तीला हक्काने जीवन जगता येतो. आपल्यावर अन्याय होत आहे असॆ वाटल्यास न्यायालयाद्वारे प्रत्येकाला न्याय मिळविता येतो. समता, बंधूता आणि समानता या राष्ट्रीय मूल्यांची जोपासना या घटनेद्वारे केल्या जाते. म्हणूनच त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार असॆ म्हटले जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नुसते पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घालून आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली . त्यांनी मनुष्यमात्रांच्या जीवनातील दुःख , दारिद्र्य आणि क्लेश दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले संपूर्ण ज्ञान आणि माहितीच्या बळावर रंजल्या-गांजल्या जनतेच्या , शेतकरी, मजूर वर्गाच्या आणि पददलितांच्या तसेच स्त्री वर्गाच्या उद्धारार्थ आपले प्राणपणाला लावून योग्य रस्ता दाखविले आणि मानवतेची दिव्यज्योत निर्माण केले. त्यांनी फक्त दलित लोकांचाच उध्दार केला नसून समस्त भारतीय लोकांना आपली स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी वाव दिलेला आहे. ती व्यक्ती केवळ वंदनीय नव्हे तर ती व्यक्ती सर्वाना नेहमीच प्रेरक ठरते. या महामानवाचे कार्य म्हणजे समाजासाठी व देशासाठी एक दिशादर्शक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विश्वाला मिळालेली महान देणगी होय. अश्या महामानवाची दिनांक 06 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले, आज त्यांची जयंती त्यानिमित्त त्यांच्या पावन स्मृतिस कोटी कोटी प्रणाम.
- नागोराव सा. येवतीकर
( लेखक नांदेड जिल्हा परिषदेत उपक्रमशील शिक्षक आहेत. )
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769
nagorao26@gmail.com