*आर्थिक व्यवहार सुरळीत होतील ?*
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक 08 नोव्हेंबर 2016 रोजी पाचशे आणि हजार रूपयाच्या नोटा वर बंदी आणली आणि एका रात्रीत देशामध्ये अनेक लोकांच्या संकटाला सुरुवात झाली. फक्त पन्नास दिवसात सर्व काही सुरळीत होईल असे आश्वासन पंतप्रधानानी जनतेला दिले. मात्र तसे काही झाले नाही. या नोटाबंदीच्या काळात अनेक लोकांना फटका बसला तर काही लोकांना आपल्या प्राणास मुकावे लागले. त्यामुळे त्यांचे घर वाऱ्यांवर आले. नोटाबंदीमुळे सामान्य जनतेला अच्छे दिन पाहण्यास मिळेल असे वाटत होते मात्र आज दोनशे दिवसाचा काळ उलटला तरीही बँकेतील आर्थिक व्यवहार अजुनही सुरळीत झाले नाही. बँकेत पैश्यासाठी दिवसभर रांगेत उभे राहून देखील पाहिजे तेवढी रक्कम मिळत नाही त्यामुळे जनता पुरती वैतागली आहे. काही ठिकाणी तर काउंटरला क्रमांक येईपावेतो पैसे संपून जात आहेत त्याचा मनस्ताप वेगळाच आहे. मोंढा मार्केट मध्ये शेतकऱ्यांनी आपला माल विकल्यानंतर त्यांच्या हातात महिना दीड महिन्यानंतर तेही पाच-पाच हजार रूपयाच्या हिशोबात मिळाले त्यामुळे त्याचे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. स्वतःच्या हक्काचे पैसे आपल्या बँक खात्यावर असून ही वेळेवर मिळत नसल्यामुळे जनतेमधून संताप व्यक्त केल्या जात आहे.
त्याच सोबत बँकेतील गर्दी कमी व्हावी यासाठी एटीएम निर्माण करण्यात आले होते. मात्र नोट बंदीचा फटका याठिकाणी सुध्दा जाणवत आहे. पूर्वी हवी तेवढी रक्कम एटीएममधून मिळत असे मात्र नोटाबंदी जाहिर झाल्यापासून एटीएमवर निर्बंध घलण्यात आले आणि एटीएममध्ये पैश्याचा तूटवडा जाणवू लागले. सुरुवातीला फक्त अडीच हजार, त्यानंतर चार हजार आणि मग आज चाळीस हजार रुपया पर्यंत रक्कम उचलू शकत आहे मात्र एटीएममध्ये पैसेच नसल्याने जनता त्रस्त होत आहे. रोज एटीएमकडे नागरिक चकरा मारत आहेत मात्र त्यांच्या पदरी निराशेच्या खेरीज काहीच मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याउलट बाजुच्या तेलंगाना राज्यात एटीएममध्ये पैसे उपलब्ध असल्याचे दिसून येते. या भागातील काही गरजू मंडळी थेट तेलंगाना मध्ये जाऊन आपल्याला हवी असेल तेवढी रक्कम आणित आहेत. मात्र विनाकारण जाण्यायेण्याचा त्रास जनतेला सहन करावा लागत आहे.
ज्यांच्या घरी एखादे लग्न कार्य किंवा कार्यक्रम आहे ती मंडळी मात्र पैश्याअभावी पुरती वैतागली आहे. प्रत्येक कामाला पैसे लागतात आणि प्रत्येक ठिकाणी ऑनलाइन व्यवहार करणे शक्य नाही. विविध कारणामुळे जनतेला ऑनलाइन व्यवहार देखील अडचणीचे ठरत आहे. बहुतांश दुकानात अजुनही स्वीप मशीन उपलब्ध केल्या गेले नाहीत आणि ज्या ठिकाणी मशीन उपलब्ध केले आहेत ते शंभरामागे दोन रुपये जास्तीचे बील आकारत आहेत. एकीकडे ऑनलाइन पेमेंट करा म्हणायचे आणि जनतेकडून शंभरामागे दोन रुपये जास्त घेणे हा कुठला न्याय आहे हे ही कळत नाही. आमचे पैसे असून आम्हालाच मिळत नाही ही अवस्था सध्या निर्माण झाली. येत्या एका महिन्यात शेतकरी मंडळीचे शेतातील कामे सुरु होणार आहेत. बी-बियाणे आणि औषधाच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या हातावर पैसा असणे अत्यावश्यक आहे अन्यथा ज्यांच्या साठी एवढा खटाटोप केला तीच व्यक्ती दुरावण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच कदाचित याचे परिणाम सरकारवर उलटे होऊ नये त्यापूर्वी बँकेतील आणि एटीएममधील स्थिती पूर्ववत करणे अत्यावश्यक आहे, असे वाटते.
- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक, धर्माबाद
9423625769
••••••••••••••••••••=======•••••••••••••••••••
*युवकांच्या हाती हुंड्याची दोरी*
स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर ही हुंडयासारखी सामाजिक समस्या आजही ज्वलंत आणि उग्र स्वरुप धारण केले आहे. लातूर जिल्ह्यातील शीतल वायाळ या मुलीने आपल्या वडिलांकडे लग्नासाठी पैसे नाहीत, वडिलांची घालमेल पहावत नाही म्हणून स्वतः चे जीवन संपविले. तिच्या बळीने हा प्रश्न समाजापुढे एका वेगळ्या स्वरुपात समोर आले आहे. हुंड्यामुळे कोण कोण त्रस्त होत असतो ? याची जराशी कल्पना यामुळे आली. समाजात आजही हुंडयापायी कोणाचे लग्न थांबणे, नववधुंचा छळ करणे, या सर्व हुंडाबळीच्या घटना आपण डोळ्याने आजही पाहतो आणि वाचन करीत आहोत. समाजातून हुंडा पध्दती समूळ नष्ट करणे म्हणजे समाजातील रुढी आणि परंपरा यांच्याविरुध्द दिलेला एक लढाच नव्हे काय ?
प्रत्यक्षात समाजात काय घडते ? वधू पिता आपल्या मुलींसाठी वर शोधत फिरत असतो. चांगले स्थळ मिळावे यासाठी तो सर्व प्रयत्न करतो. प्रत्येक वधू पित्याची ईच्छा असते की आपली मुलगी ज्या घरी पाठवित आहोत ते घर सुख समृद्धिचे असावे, तिला त्रास होणार नाही याची काळजी घेऊन सोयरीक जुळविली जाते. मग त्यासाठी हवी ती किंमत मोजण्याची तयारी वधूपिता दर्शवितो. याच गोष्टीचा फायदा वरपक्षाकडील मंडळी घेतात. त्यातल्या त्यात मुलगा सरकारी नोकरी किंवा चांगल्या हुद्यावर आणि पगारीवर असेल तर मग मनाला वाटेल ती रक्कम मागितली जाते. सध्या डॉक्टर, इंजिनियर, पोलिस आणि शिक्षक नवरदेवाचे भाव गगनाला भिडले आहेत.
लग्नाच्या प्रक्रियेत सर्वात महत्वाचा घटक म्हणजे नवरदेव. त्याने जर मनात आणले तर ही हुंडा पध्दत समूळ नष्ट होऊ शकते. लग्न जुळते वेळी ही नवरदेव मंडळी याविषयी ब्र ही काढत नाहीत त्यामुळे ही पध्दत फोफावत चालली आहे. सध्या जे युवक लग्न करण्यासाठी बोहल्यावर चढणार आहेत त्यांनी हुंडा न घेता साध्या पध्दतीने लग्न करून घेतल्यास त्याची नोंद समाज नक्की घेईल. प्रत्येक नवरदेवाने याविषयी एक वेळ तरी आत्मचिंतन करावे. आपल्या एवढ्या शिक्षणाचा काही अर्थ राहणार नाही असे वाटते. हुंडा न घेतल्याने समाजात जे मान सन्मान आणि स्वतः ला जो मानसिक समाधान मिळते ते किती ही पैसा देऊन मिळविता येत नाही, हे सत्य आहे. वधूने किंवा वधूच्या पित्याने हुंडा घेणाऱ्या नवरदेवाला मुलगी देणार नाही अशी शपथ घेऊन काही फायदा होईल असे वाटत नाही त्या ऐवजी नवरदेव किंवा त्यांच्या आई-वडिलांनी हुंडा घेणार नाही ही शपथ जास्त फलदायी ठरेल असे वाटते. जे युवक असे लग्न करतील अश्या कुटुंबाचे समाजाने नागरी सत्कार करावा म्हणजे हुंडा न घेता लग्न करण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल आणि जे अनपेक्षित घटना घडत आहेत ते घडणार नाहीत. हुंडा ही आपणच पेरलेले बी आहे तर त्याचे उच्चाटन आपणालाच करावे लागेल, एवढे मात्र खरे आहे.
नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक, धर्माबाद
9423625769